राज्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला, १४२ रुग्णांना बाधा
मुंबईत कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, तर दुसरीकडे स्वाइन फ्लूने डोकं वर काढले आहे. त्यामुळे मुंबईकरांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. सध्या राज्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असून आतापर्यत १४२ रुग्णांना बाधा झाली आहे. तसे, सात जणांचा मृत्यू झाला.
काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला. त्यानुसार, राज्यात ८ जूनपर्यंत ८ जणांना स्वाइन फ्लूची बाधा झाली होती, तर शून्य मृत्यूची नोंद होती.
जुलैपासून सुरू झालेल्या जोरदार पावसानंतर या आजाराचा संसर्ग वाढला आहे. गेल्या १० दिवसांत स्वाइन फ्लूचे १२६ रुग्ण आढळले आहेत, तर सात जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आतापर्यत आढळलेल्या रुग्णामध्ये सर्वाधिक म्हणजे ४३ रुग्ण मुंबईत आढळले आहेत. रुग्णसंख्या जास्त असली तरी मुंबईत मृतांची संख्या मात्र शून्य नोंदली आहे. मुंबईनंतर पुण्यात २३, पालघर २२, नाशिक १७, नागपूर महापालिका १४, कोल्हापूर महापालिका १४, ठाणे महापालिका ७ आणि कल्याण डोंबिवलीमध्ये दोन रुग्ण आढळले आहेत. स्वाइन फ्लूमुळे सर्वाधिक तीन मृत्यू कोल्हापूरमध्ये झाले. पुणे आणि ठाणे महापालिकेत प्रत्येकी दोन मृत्यूंची नोंद झाली.