शिक्षक दिन : राष्ट्रपती आज 82 शिक्षकांना करणार सन्मानित
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज विज्ञान भवनात 82 निवडक शिक्षकांना 'शिक्षक पुरस्कार 2024' देऊन सन्मानित करतील. यासाठी उच्च शैक्षणिक संस्था आणि पॉलिटेक्निकमधील 16 शिक्षकांचीही निवड करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार उच्च शैक्षणिक संस्थांच्या शिक्षकांनाही बक्षीस देण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत हा पुरस्कार केवळ शाळेतील शिक्षकांपुरता मर्यादित होता. आता उच्च शैक्षणिक संस्था आणि पॉलिटेक्निकसाठी देखील दोन श्रेणींचे पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरवर्षी 5 सप्टेंबर हा माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. देशातील शिक्षकांच्या अद्वितीय योगदानाचा गौरव करणे हा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचा उद्देश आहे.
यावेळेस तीन टप्प्यातील निवड प्रक्रियेतून शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. या प्रक्रियेमध्ये जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील शिक्षकांची निवड सहभागी असते. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील सोहळ्याचे आयोजन करते. कठोर, पारदर्शक आणि ऑनलाइन निवड प्रक्रियेद्वारे निवडलेल्या देशातील सर्वोत्तम शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात.
Edited By- Dhanashri Naik