शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 5 डिसेंबर 2023 (20:27 IST)

Telangana: काँग्रेसला विजय मिळवून देणारे रेवंत रेड्डी मुख्यमंत्रीपदाची 7 डिसेंबर रोजी शपथ घेणार

Anumula Revanth Reddy
तेलंगणामध्ये काँग्रेसला विजय मिळवून देणारे रेवंत रेड्डी हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील. ते 7 डिसेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षांनी तेलंगणा विधिमंडळ पक्षाचे नवे सीएलपी म्हणून रेवंत रेड्डी यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. ते राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील. तेलंगणाच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा 7 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.
 
काँग्रेसचे दिग्गज नेते जयपाल रेड्डी यांचे जावई रेवंत रेड्डी यांनी मलकाजगिरी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांनी टीआरएस उमेदवार मारी राजशेखर रेड्डी यांचा पराभव केला. आता 2023 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी कोडंगल आणि कामारेड्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. कोडंगलमधून रेवंत रेड्डी विजयी झाले पण कामारेड्डी मतदारसंघातून पराभूत झाले.
 
तेलंगणा विधानसभा निवडणूक 2023 चे निकाल 3 डिसेंबर रोजी घोषित करण्यात आले होते. राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होणार आहे. पक्षाने के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीचे (BRS) हॅट्ट्रिकचे स्वप्न भंगले. काँग्रेसला 64 जागा मिळाल्या होत्या, तर बीआरएसला 39 जागा जिंकता आल्या. भाजपने आठ जागांवर तर एआयएमआयएमने सहा जागांवर विजय मिळवला होता. सीपीआयला एक जागा मिळाली होती. 119 जागांच्या विधानसभेसाठी 30 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते.
 
Edited by - Priya Dixit