शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2023
  3. तेलंगणा विधानसभा निवडणूक 2023
Written By
Last Modified: मंगळवार, 5 डिसेंबर 2023 (08:52 IST)

तेलंगणा निवडणुकीत काँग्रेसचे प्रभारी असणाऱ्या माणिकराव ठाकरेंचा असा आहे प्रवास

manik rao thackeray
facebook
तेलंगणामध्ये कॉंग्रेसने 199 पैकी 65 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं. केसीआर यांनी पुन्हा सत्तेत येण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली होती. पण तेलंगणामध्ये कॉंग्रेस या निवडणूकीत सरस ठरली. चार राज्यांपैकी तीन राज्यात कॉंग्रेसला अपयश मिळालं असलं तरी तेलंगणा निकालातून दक्षिण भारतातील अजून एका राज्यात कॉंग्रेसने सत्ता मिळवली.
 
कॉंग्रेसच्या या यशानंतर तेलंगणाच्या प्रभारी पदाची जबाबदारी असलेल्या माणिकराव ठाकरेंचं नाव पुन्हा चर्चेत आलं. मंत्री, प्रदेशाध्यक्ष, प्रभारी अशी अनेक पदांची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. महाविकास आघाडीच्या काळात काही वर्ष ते विधानपरिषदेचे उपसभापती राहिले.
 
त्यानंतर राज्याच्या राजकारणात फारसे सक्रीय दिसले नाहीत. पण कॉंग्रेसने माणिकराव ठाकरेंना राष्ट्रीय राजकारणात संधी दिली. त्या संधीचं तेलंगणाच्या निकालानंतर सोनं झालं आहे असं म्हटलं जातंय. तेलंगणा निकालाच्या निमित्ताने माणिकराव ठाकरेंच्या राजकीय कारकिर्दीवर एक नजर ..
 
माणिकराव ठाकरेंची राजकीय कारकिर्द कशी सुरू झाली?
22 ऑगस्ट 1954 साली यवतमाळ जिल्ह्यातल्या दारव्हा तालुक्यातील हरू या गावात माणिकराव ठाकरेंचा जन्म झाला. त्याचं शिक्षण 12 वी पर्यंत झालेलं आहे.
 
तालुका स्तरावर किसन सेवक युवक मंडळाच्या कामातून त्यांच्या सामाजिक कारकिर्दीला सुरूवात झाली. त्यातून त्यांनी अनेक विकास कामांच्या मुद्यासाठी तालुका पातळीवर पुढाकार घ्यायला सुरुवात केली. 1973 साली दारव्हा तालुक्यातील युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्षपद त्यांना मिळाले.
 
तेव्हापासून कॉंग्रेसमधला त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. 1975 साली सहकारी कारखान्याचे अध्यक्ष बनले. 1979 पहील्यांदा जिल्हा परिषदेवर निवडून गेले.
manik rao thackeray
1980 साली त्यांना दारव्हा तालुक्याच्या समन्वय समितीत घेतले. तरुणाईचे प्रश्न जिल्हा पातळीवर मांडत असताना अनेक पक्षातील वरिष्ठांच्या ते जवळ गेले.
 
1989 साली माणिकराव ठाकरे पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले. 1993 ते 1995 , 1999 ते 2003 आणि 2003 ते 2004 ते राज्याचे राज्यमंत्री राहीले आहेत. कृषी, फलोत्पादन, गृहराज्य यांसारखी खाती त्यांच्याकडे होती.
 
2008 साली ठाकरे हे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनले. राज्यात कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सहा वर्ष राहिलेले ते राज्यातील पहिले प्रदेशाध्यक्ष राहीले. दोन लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांनी राज्यात कॉंग्रेसचं नेतृत्व केलं.
 
विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या तीन मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांनी काम केलं आहे. 2009 ते 2018 या काळात ते विधान परिषदेचे सदस्य राहिले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात माणिकराव ठाकरे यांनी विधानपरिषदेचं उपसभापतीपदही भूषवलं.
 
त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत यवतमाळ मतदारसंघातून भावना गवळी यांच्याविरोधात कॉंग्रेसने माणिकराव ठाकरेंना उमेदवारी दिली. पण या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर 2023 पर्यंत ते राजकारणात ते फार सक्रीय दिसले नाहीत. जानेवारी 2023 मध्ये माणिकराव ठाकरे यांची तेलंगणाचे प्रभारी म्हणून नियुक्ती झाली.
 
तेलंगणाचे प्रभारी कसे बनले?
2018 च्या निवडणुकीत बीआरएस यांच्या पक्षाला 101 तर कॉंग्रेसला 19 जागा मिळाल्या होत्या. बीआरएस पक्षाला स्पष्ट बहुमत होतं. केसीआर यांनी तेलंगणाबरोबरच महाराष्ट्रावरही लक्ष केंद्रीत केलं होतं.
 
2023 च्या तेलंगणाच्या निवडणूका वर्षभरावर येऊन ठेपल्या होत्या. कॉंग्रेसला गळती लागली होती. तेलंगणा कॉंग्रेसमधले अंतर्गत वाद वाढत होते. मल्लिकार्जुन खरगे यांनी 2021 साली तेलंगणा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष रेवंत रेड्डी यांची नियुक्ती केली.
 
पण त्यांच्या कार्यशैलीबाबत तेलंगणा कॉंग्रेस पदाधिकारी नाराज होते. त्यांच्या कार्यशैलीच्या निषेधार्थ अनेक वरिष्ठ नेत्यांनी राजीनामा दिला होता. कॉंग्रेस आमदारांपैकी फक्त 5 आमदार उरले होते. कॉंग्रेस आमदारांच्या या गळतीबाबत दिल्लीतील नेते चिंतेत होते. कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी प्रभारी बदलण्याची शिफारस केली.
 
मल्लिकार्जुन खरगे यांनी जानेवारी 2023 ला माणिकराव ठाकरे यांची तेलंगणा प्रभारी म्हणून नियुक्ती केली. त्यावेळी माणिकराव ठाकरे यांचं हे राजकीय पुनर्वसन असल्याची चर्चा झाली. पण कॉंग्रेसचे अंतर्गत वाद संपवण्याची जबाबदारी कॉंग्रेस वरिष्ठांनी माणिकराव ठाकरे यांच्यावर दिली.
 
तीन महिन्यांत सर्व पदाधिकाऱ्यांचे ऐकून घेऊन वाद मिटवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
 
या निवडणुकीच्या निकालानंतर ते वाद बाजूला ठेवून कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांना एकसंघ ठेवून सत्ता आणण्यात ठाकरे यशस्वी झाल्याचं बोललं जात आहे.
 
तेव्हा माणिकरावांवर कारवाई होणार असं वाटलं पण…
माणिकराव ठाकरे हे यवतमाळ जिल्ह्यातील असले तरी कालांतराने ते राज्याचे नेते म्हणून ओळखले जाऊ लागले.
 
अनेक मोठे नेते दिल्लीपर्यंत गेले तरी मतदारसंघात त्यांचा दबदबा असतो. माणिकराव ठाकरे यांच्याबाबतीत असं घडलं नाही.
 
राज्याच्या राजकारणात सक्रीय होत असताना त्यांना यवतमाळ जिल्ह्यावर पकड कायम ठेवता आली नाही.
 
माणिकराव ठाकरे यांचा मुलगा राहुल ठाकरेंनी 2014 साली निवडणूक लढवली पण ते पराभूत झाले.
 
ऑक्टोबर 2010 मध्ये सोनिया गांधी यांच्या वर्धा येथील मेळाव्याच्या आदल्या दिवशी नागपूरमध्ये पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेच्या वेळी माईक सुरू असल्याची बहुधा कल्पना नसल्याने ठाकरे यांनी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्याबरोबर केलेले संभाषण वादग्रस्त ठरले होते.
 
तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण पक्षाला पैसे देत नाहीत असे ठाकरे बोलले आणि ते वाहिन्यांवर प्रसारित झाले. परिणामी ठाकरे यांची तेव्हा गच्छंती निश्चित मानली जात होती. पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.