मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 22 मार्च 2022 (14:21 IST)

ओव्हनमध्ये दोन महिन्यांच्या मुलीचा मृतदेह आढळला

चिराग दिल्लीतुन एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे दोन महिन्यांच्या मुलीचा मृतदेह ओव्हनमधून आढळला आहे . या घटनेतील मुख्य आरोपी इतर कोणी नसून मुलीची आईच आहे. 
वंशाला दिवा असण्याची इच्छा बाळगणाऱ्या या आईने आपल्या दोन महिन्यांच्या मुलीची गळा दाबून हत्या केल्याची घटना घडली आहे. हत्येनंतर मुलीचा मृतदेह घरात पडलेल्या मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये लपवून ठेवल्याचा आरोप आहे. मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. घरात झडती घेतली असता जुन्या ओव्हन मध्ये  मुलीचा मृतदेह आढळून आला. मुलीच्या आईनेच तिची हत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी पाठविले आहे.पोलीस  पालकांची चौकशी करत आहेत.
 
गुलशन कौशिक आपल्या कुटुंबासह चिराग दिल्ली गावात राहतात.  कुटुंबात पत्नी डिंपल कौशिकशिवाय चार वर्षांचा मुलगा आणि दोन महिन्यांची मुलगी होती. गुलशनची आई आणि भाऊही त्याच्यासोबत राहतात. गुलशन घराखालीच किराणा (रेशन) दुकान चालवतात. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सोमवारी पाच वाजण्याच्या सुमारास चिराग दिल्ली गावातून मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता मुलीची आजी आणि शेजारी घराची झडती घेत असल्याचे दिसून आले.
 
दरम्यान, मुलीचा मृतदेह घराच्या दुसऱ्या मजल्यावर जुन्या मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये मृत  अवस्थेत आढळून आला. प्राथमिक पोलिस तपासात मुलीचा जन्म 27 जानेवारी 2022 रोजी झाल्याचे उघड झाले आहे. मुलीच्या आईला मुलगा हवा होता, त्यामुळे मुलीच्या जन्मानंतर ती आनंदी नव्हती.

शेजार्‍यांचे आणि नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, डिंपल आणि तिच्या पतीमध्ये या मुद्द्यावरून अनेकदा भांडण झाले होते. ज्या खोलीतून मुलीचा मृतदेह सापडला त्या खोलीला बाहेरून कुलूप लावले होते. शेजाऱ्यांनी सांगितले की, मुलीची आई मुलगी झाल्यामुळे रागावली होती. तिला मुलगा व्हायला हवा होता, असे ते म्हणाले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.