शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 22 मार्च 2022 (10:15 IST)

मोदी सरकारच्या काळात ईडीचे 2974 छापे, आतापर्यंत 23 जणच दोषी

अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडीनं (ED) 2005 मध्ये प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग (PMLA) अॅक्ट नुसार किती छापे टाकले, किती कारवाया करण्यात आल्या, आतापर्यंत कितीजण दोषी ठरले यासंदर्भातील माहिती दिली आहे.
 
2005 मध्ये कायदा अस्तित्वात आल्यानंतर 2014 पर्यंत काँग्रेसचं सरकार केंद्रात सत्तेत होतं. 2014 ते 2022 पर्यंत नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तेत आहे. लोकसभेत या काळातील ईडीच्या छाप्यांबद्दलची आकडेवारी मांडण्यात आली.
 
काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए सरकारच्या काळात 112 छापे टाकण्यात आले आहेत. ईडीनं गेल्या आठ वर्षांत नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर 2974 छापे टाकले आहेत. 2005 पासून ईडी कारवाया करत असली तरी केवळ 23 व्यक्तींना शिक्षा झाल्याचं समोर आलंय.

केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्त्वातील यूपीए सरकार स्थापन झाल्यानंतर पीएमएलए कायदा अस्तित्त्वात आला. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्त्वात 2004 ते 2014 या काळात ईडीनं 112 छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे. त्याअंतर्गत 5316.16 कोटींच्या गैरव्यवहारासंदर्भात 104 तक्रारी दाखल झाल्या होत्या, असं लोकसभेत सांगण्यात आलं.
 
2014 ते 2022 या मोदी सरकाच्या कार्यकाळात ईडीच्या कारवाया वाढल्याचं चित्र आकडेवारीतून दिसून आलं आहे. ईडीनं मोदींच्या कार्यकाळात 2974 छापे टाकले आहेत. तर, 839 तक्रारीअंतर्गत 95 हजार 432 कोटी रुपयांच्या गैरप्रकारांची चौकशी सुरु असल्याची माहिती लोकसभेत सादर करण्यात आली आहे.