शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 फेब्रुवारी 2022 (19:14 IST)

राहुल बजाज : भाजपच्या पाठिंब्यावर खासदार ते नरेंद्र मोदी सरकारचे टीकाकार

ज्येष्ठ उद्योगपती आणि बजाज समूहाचे प्रमुख राहुल बजाज यांचं निधन झालं आहे. ते 83 वर्षांचे होते.
भारतातील प्रसिद्ध बजाज कंपनीचे राहुल बजाज सर्वेसर्वा होते. बजाज कंपनीला देशातील उद्योग क्षेत्रात आघाडीवर नेण्यात राहुल बजाज यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
 
राहुल बजाज हे एकेकाळी भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेत पोहोचले होते. मात्र, मोदी सरकारच्या काळात त्यांनी त्यांच्या सरकारवर टीकाही केली. डिसेंबर 2019 मधील त्यांचं एक वक्तव्य त्यावेळी चर्चेचा विषय ठरला होता.
 
राहुल बजाज म्हणाले होते, "लोक (उद्योगपती) तुम्हाला (मोदी सरकार) घाबरतात. युपीए-2 सरकार असताना आम्ही कोणावरही टीका करू शकत होतो. पण आता जर आम्ही उघडपणे टीका केली तर तुम्हाला ते आवडेल का, याची आम्हाला खात्री नाही,"
 
राहुल बजाज अमित शहांसमोर उघडपणे असं बोलल्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.
 
राहुल बजाज यांच्याविषयी सोशल मीडियावर त्यावेळी बरंच काही लिहीलं गेलं. एका उद्योगपतीने सरकारच्या विरुद्ध बोलण्याची हिंमत दाखवली, खरी परिस्थिती सगळ्यांसमोर आणली, असं म्हणत एकीकडे काहीजण त्यांचं कौतुक करत होते, तर त्यांचं हे विधान राजकीय हेतूंनी प्रेरीत असून, बजाज 'काँग्रेस प्रेमी' असल्याचं म्हणत दुसरीकडे त्यांच्यावर टीकाही केली होती.
 
सोशल मीडियावर राहुल बजाज यांचे असेही काही व्हीडिओज शेअर करण्यात आले होते, ज्यामध्ये ते जवाहरलाल नेहरू आपले आवडते पंतप्रधान असल्याचं सांगत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींचं कौतुक करताना दिसत आहेत.
 
हे सगळे दाखले देत राहुल बजाज 'काँग्रेसचे चमचे' असल्याचं म्हणणाऱ्या भाजप सरकार समर्थकांना एका गोष्टीचा मात्र सोयीस्कररित्या विसर पडलाय.
 
2006मध्ये राहुल बजाज अपक्ष म्हणून राज्यसभेवर निवडून गेले होते आणि त्यासाठी त्यांना भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनेच पाठिंबा दिला होता. अविनाश पांडे हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते आणि बजाज यांनी त्यांचा 90 मतांनी पराभव करत राज्यसभेतली ही जागा जिंकली होती.
देशातल्या आर्थिक स्थितविषयी उद्योगपतींना असलेली चिंता आणि त्यांना वाटणारी भीती राहुल बजाज यांनी व्यक्त केल्यानंतर उत्तर देताना अमित शाह म्हणाले होते, "कोणीही घाबरण्याची गरज नाही आणि कोणीही घाबरवायचा प्रयत्न करत नाहीये."
 
पण राहुल बजाज यांनी टीका केल्यानंतर त्याविषयी गहजब करत भाजप समर्थकांनी गृहमंत्र्यांचं विधान फोल ठरवलं.
 
याविषयी बोलताना ज्येष्ठ पत्रकार टी. के. अरूण म्हणाले होते, "हा एक नवीन ट्रेंड झालाय. टीका करण्यामागची भावना समजून घेतली जात नाही. फक्त टीका करणाऱ्यांच्या विरोधात ओरड केली जाते. बजाज यांनी केलेली टीका महत्त्वाची आहे. कारण कोणीतरी बोललं तरी. नाहीतर सीआयआयच्या बंद खोल्यांमध्ये होणाऱ्या बैठकांमध्ये उद्योगपती ज्या गोष्टींविषयी काळजी व्यक्त करत असले, तरी त्याविषयी खुलेपणाने कोणीही बोललेलं नाही."
 
बजाज यांचं हे विधान एका विशिष्ट पक्षाच्या विरोधात नसून, याआधीही त्यांच्या अशा टीकेची चर्चा झाली असल्याचं अरूण म्हणाले होते.
 
राहुल बजाज सुरूवातीपासूनच एक स्पष्टवक्ता म्हणून ओळखले जातात, असं ज्येष्ठ पत्रकार रोहित चंदावरकर म्हणाले होते.
 
चंदावरकर त्यावेळी म्हणाले होते, "राहुल बजाज यांनी भाजप सरकारप्रमाणेच इतर सरकारांवरसुद्धा परखड टीका केलेली आहे. ते वेळोवेळी सरकारच्या धोरणांवर बोलत असतात. पण त्यांनी अमित शहा यांना विचारलेल्या प्रश्नावरून त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे."
 
राहुल बजाज यांचं वक्तव्य म्हणजे फक्त एका कार्यक्रमात विचारलेला प्रश्न नसून त्यामागे तीन वर्षांपासूनची अस्वस्थता असल्याचं रोहीत चंदावरकर यांना वाटतं.
 
त्यांनी पुढे सांगितलं होतं की, "भारत सरकारने काळ्या पैशावर कारवाईकरण्यासाठी पावलं उचलली आहेत. पण याबाबत उपाययोजना करत असताना त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नसल्यामुळे उद्योजकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळेच गेल्या दोन ते तीन वर्षांपासून राहुल बजाज अस्वस्थ आहेत. त्यांची नाराजी वेळोवेळी दिसून आली आहे."
 
पुण्यातील एका कार्यक्रमात राहुल बजाज, शरद पवार आणि नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत उपस्थित होते. त्यावेळी सुद्धा बजाज यांनी सरकारच्या धोरणावर टीका केली होती.
 
उद्योजकांना भारतात व्यापार करणं अवघड बनल्याचं त्यांनी अमिताभ कांत यांना सांगितलं होतं, अशी आठवण चंदावरकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितली.
राहुल बजाज यांची भूमिका अनेकवेळा प्रस्थापितांच्या विरोधी असल्याचं निरीक्षण सीएनबीसी आवाज वृत्तवाहिनीचे माजी संपादक आलोक जोशी यांचंसुद्धा आहे.
 
ते त्यावेळी म्हणाले होते, "राहुल बजाज स्वभावाने बंडखोर मानले जातात. विविध प्रसंगी त्यांनी सरकारविरोधात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. तसंच प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या विरोधातही त्यांनी कणखरपणा दाखवला होता. पियाजिओ कंपनीसोबत कराराचं उल्लंघन केल्याचं प्रकरण त्याचं उत्तम उदाहरण आहे."
 
महात्मा गांधींचा 'पाचवा मुलगा'
राहुल बजाज यांचा जन्म जून 1938चा. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे या उद्योगक्षेत्रातील बजाज कुटुंबाशी अगदी जवळचे संबंध होते.
 
राहुल बजाज यांचे आजोबा - जमनालाल बजाज यांनी 1920च्या दशकामध्ये 'बजाज ग्रुप ऑफ कंपनीज' ची स्थापना केली होती. या समूहात 20 पेक्षा अधिक कंपन्या होत्या. राजस्थानातील मारवाडी समुदायातील जमनालाल यांना दूरच्या एका नातेवाईकाने दत्तक घेतलं होतं. हे कुटुंब महाराष्ट्रात वर्ध्यात रहायचं. म्हणूनच जमनालाल यांनी वर्ध्यातूनच व्यापाराला सुरुवात केली आणि इथूनच धंदा वाढवला. यानंतर ते महात्मा गांधींच्या संपर्कात आले आणि त्यांच्या आश्रमासाठी जमनालाल बजाज यांनी जमीनही दिली होती.
 
जमनालाल बजाज यांना महात्मा गांधींचा 'पाचवा मुलगा' असं म्हटलं जायचं. म्हणूनच नेहरूंनाही जमनालाल बजाज यांचा आदर होता.
 
जमनालाल बजाज यांना पाच मुलं. सगळ्यात मोठा मुलगा कमलनयन. मग तीन मुली आणि त्यानंतर सगळ्यात लहान मुलगा - रामकृष्ण बजाज.
 
राहुल बजाज हे कमलनयन बजाज यांचा मोठा मुलगा. राहुल यांचे दोन मुलगे - राजीव आणि संजीव सध्या बजाज समूहातील काही कंपन्यांचा कारभार सांभाळतात. इतर काही कंपन्या राहुल बजाज यांचे धाकटे भाऊ आणि चुलत भाऊ सांभाळतात.
 
गांधी आणि बजाज कुटुंबातील घरोब्याचे अनेक किस्से आहेत.
 
राहुल बजाज यांचा जन्म झाला तेव्हा इंदिरा गांधी राहुल यांचे पिता - कमलनयन बजाज यांच्या घरी गेल्या. माझी एक अतिशय मूल्यवान गोष्ट तुम्ही घेतलीत, अशी तक्रार त्यांनी कमलनयन यांच्या पत्नीकडे केली. ही गोष्ट होती - 'राहुल' हे नाव. हे नाव पंडित नेहरूंना आवडलेलं होतं आणि इंदिरांनी आपल्या मुलाचं नाव राहुल ठेवावं, असं त्यांना वाटत होतं. पण नेहरूंनी त्यांच्या डोळ्यांसमोरच लहानाच्या मोठ्या झालेल्या कमलनयन बजाज यांच्या मुलाचं नाव राहुल ठेवलं. असं म्हटलं जातं की इंदिरांनी राजीव गांधींच्या मुलाचं नाव 'राहुल' ठेवण्यामागे हेच कारण होतं. कारण हे नाव त्यांच्या वडिलांच्या आवडीचं होतं.
 
1920 च्या दशकामध्ये ज्यांच्या स्वातंत्र्यसैनिक आजोबांनी सगळ्या कुटुंबासह खादीचा स्वीकार करत आपल्या विदेशी कपड्यांची होळी केली होती, त्यांचाच नातू स्वतंत्र भारतातल्या भांडवलशाहीतला एक महत्त्वाचा चेहरा कसा झाला, याची कहाणीही रंजक आहे.
'लायसन्स राज' मध्ये बजाज
कमलनयन बजाज यांच्या प्रमाणेच राहुल बजाज यांनीही परदेशात शिक्षण घेतलं. दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्राची पदवी घेतल्यानंतर राहुल यांनी जवळपास तीन वर्षं बजाज इलेक्ट्रिकल्स कंपनीत प्रशिक्षण घेतलं. याच दरम्यान त्यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतलं.
 
60 च्या दशकात राहुल बजाज यांनी अमेरिकेतल्या हार्वड बिझनेस स्कूलमधून MBAची पदवी घेतली.
 
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 30 वर्षांच्या राहुल बजाज यांनी 1968मध्ये 'बजाज ऑटो लिमिटेड'चं सीईओपद स्वीकारलं त्यावेळी ते अशा उच्च पदावरचे सर्वांत तरूण भारतीय असल्याची चर्चा झाली होती.
 
त्या काळाविषयी अर्थतज्ज्ञ मोहन गुरुस्वामी म्हणतात, "राहुल बजाज यांच्या हाती कंपनीची धुरा आली तेव्हा देशात लायसन्स राज होतं. म्हणजे देशभरात अशी काही धोरणं-नियम होते ज्यामुळे सरकारच्या मर्जीशिवाय उद्योगपतींना काहीही करता येत नव्हतं. व्यापाराच्या दृष्टीने ही कठीण परिस्थिती होती.
 
मर्यादित उत्पादन होत होतं. ईच्छा असूनही उद्योगपती मागणी पूर्ण करू शकत नव्हते. असं म्हटलं जायचं की कोणी स्कूटर बुक केली, तर अनेक वर्षांनी डिलीव्हरी मिळायची. म्हणजे ज्या परिस्थितीत इतरांना काम करणंही कठीण जात होतं, त्याच परिस्थितीत बजाज यांनी तथाकथितपणे निरंकुश पद्धतीने उत्पादन केलं आणि स्वतःच्या कंपनीला देशातल्या सर्वांत मोठ्या कंपन्यांपैकी एक करण्यात यश मिळवलं."
 
'हमारा बजाज...'
70-80 च्या काळात राहुल बजाज यांची ओळख युथ आयकॉन म्हणून बनली होती. त्यांच्या कंपनीची चेतक ही स्कूटर त्या काळात विशेष लोकप्रिय होती.
 
"या स्कूटरचं 1 लाख उत्पादन करण्याची परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली होती. पण सरकारने त्यांना फक्त 80 हजार स्कूटर तयार करण्याची परवानगी दिली. त्यावरून त्यांची सरकारसोबत खडाजंगी झाली होती," असं आलोक जोशी सांगतात.
 
त्या काळी उत्पादन घेण्याआधी सरकारकडून परवानगी घ्यावी लागत होती. त्यावेळीसुद्धा त्यांनी सरकारच्या विरोधात भूमिका घेतली.
 
पुढे 1991 ला खुली अर्थव्यवस्था स्वीकारल्यामुळे अशा प्रकारचा प्रसंग पुन्हा निर्माण झाला नाही, असं ते सांगतात.
 
रोहित चंदावरकर सांगतात, "बजाजची स्कूटर ऐतिहासिक ठरली होती. तिने भारतीय बाजारपेठेत वेगळं स्थान प्राप्त केलं होतं. या स्कूटरसाठी पंधरा-पंधरा वर्षे वेटिंग लिस्ट असायची. चेतकची हमारा बजाज ही जाहिरात आजसुद्धाअनेकांच्या लक्षात असेल."
 
गेल्या दोन दशकांमध्ये राहुल बजाज यांनी अनेक मोठ्या मुलाखतींदरम्यान 'लायसन्स राज' चुकीचं होतं असं म्हणत यावर टीका केलेली आहे.
बजाज चेतक (स्कुटर) आणि नंतर बजाज पल्सर (मोटरसायकल) यासारख्या उत्पादनांमुळे त्यांच्या ब्रँडची बाजारातली विश्वासार्हता वाढल्याचं त्यांनी अनेकदा म्हटलंय. यामुळेच त्यांच्या कंपनीची उलाढाल 1965 मधील तीन कोटींवरून 2008 मध्ये जवळपास 10,000 कोटींवर गेला होता.
 
विधानाचा परिणाम
आपण आयुष्यात जे काही यश मिळवलं त्याचं श्रेय राहुल बजाज पत्नी रूपा घोलप यांनाही देतात.
 
2016मध्ये राहुल बजाज यांनी जेष्ठ पत्रकार करण थापर यांना एक मुलाखत दिली होती. तेव्हा त्यांनी म्हटलं होतं, "1961मध्ये जेव्हा रूपा आणि माझं लग्न झालं तेव्हा भारतातल्या सगळ्या मारवाडी - राजस्थानी घरांमधलं हे पहिलं लव्ह - मॅरेज होतं. रूपा महाराष्ट्रीयन ब्राम्हण होती. तिचे वडील प्रशासकीय सेवेत होते आणि माझं व्यापारी कुटुंब होतं. म्हणूनच दोन्ही कुटुंबाचं जुळणं तसं कठीणच होतं. पण रूपाचा मला आदर आहे कारण तिच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं."
 
राहुल बजाज राज्यसभेचे सदस्य होते. याशिवाय सीआयआय - कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (CII) आणि सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) चे ते अध्यक्ष होते. इंडियन एअरलाईन्सचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. भारतातला तिसरा मोठा नागरी सन्मान असणाऱ्या 'पद्मभूषण' ने त्यांना गौरवण्यात आलेलं आहे.
 
राहुल बजाज यांच्या म्हणण्याला महत्त्व असल्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही असं जेष्ठ पत्रकार टी. के. अरुण म्हणतात.
 
ते सांगतात, "1992-94 मध्ये झालेल्या इंडस्ट्री रिफॉर्म्सवरही राहुल बजाज यांनी उघडपणे टीका केली होती. यामुळे भारतातल्या उद्योगाला फटका बसेल आणि देशी कंपन्यांसाठी स्पर्धा कठीण होईल असं त्यांचं मत होतं."
 
परदेशी कंपन्यांना भारतात खुला व्यापार करू देण्याआधी देशातल्या कंपन्यांना त्यांच्यासारख्या सुविधा आणि तसंच वातावरण देण्यात यावं, म्हणजे या परदेशी कंपन्या भारतातल्या कंपन्यांसाठी धोकादायक ठरणार नाहीत, असं राहुल बजाज यांनी उद्योगपतींच्या वतीने म्हटलं होतं.
 
पण तेव्हाही सरकारशी वैर पत्करायचं नसल्याने फारसे उद्योगपती उघडपणे बोलत नसत आणि आता ही बजाज बोलले असले तरी यामुळे फार लोकांमध्ये बोलायची हिम्मत येईल असं नाही, असं टी. के. अरुण यांना वाटतं.
 
पंतप्रधान मोदींकडून होती अपेक्षा
2014 साली नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर राहुल बजाज यांनी त्यांच्याकडून अपेक्षा असल्याचं म्हटलं होतं. युपीए -2 मोठ्या प्रमाणात असफल ठरल्याने त्यांच्यानंतर मोदींकडे करण्यासारखं खूप काही असेल, असं त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं.
 
पण पाच वर्षांतच राहुल बजाज यांचं मत बदलल्याचं दिसतंय.
 
याविषयी अर्थतज्ज्ञ मोहन गुरुस्वामी सांगतात, "भारतीय उद्योगपतींना मनाला हवा तसा व्यापार करण्याची सवय लागलेली आहे. भारतात सूट घेऊन परदेशात गुंतवणूक करायची, हे नवीन समीकरण झालंय. लोक कर्जाची परतफेड करत नाहीत. जर काही कठोर नियम आणले गेले तर त्याला 'भीती'चं नाव दिलं जातंय. आणि भीतीविषयी बोलणारे हे तेच लोकं आहेत ज्यांनी कोट्यवधीचा निधी देऊन हे सरकार बनवलंय. कॉपोरेट्सकडून आपल्याला किती निवडणूक निधी मिळाला हे भाजपने निवडणूक आयोगाला सांगितलेलं आहे. पण देणगीसाठी आम्हाला घाबरण्यात येतं असं हे लोक कधीही म्हणत नाहीत, कारण तेव्हा या लोकांना स्वतःची 'सुरक्षितता' आणि सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करता येण्याची अपेक्षा होती."
 
"सतत खालावणारा जीडीपी आणि अर्थव्यवस्थेतली मंदी सांगत उद्योगपती आधीच सरकारकडून कॉर्पोरेट टॅक्समधून सूट घेत आहेत. असं होऊ शकतं की बजाज ज्या भीतीबद्दल बोलत आहेत, त्याची ढाल करत उद्योगपती सध्या बॅकफुटवर असणाऱ्या सरकारकडून नवीन सूट मागू शकतात."