शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 4 जून 2022 (23:43 IST)

प्रियकराला तुरुंगात टाकणारी पोलीस अधिकारीच आता अटकेत

arrest
आपल्या होणाऱ्या नवऱ्याला लग्नाच्या काही दिवस आधी तुरुंगात पाठवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यालाच आता अटक करण्यात आली आहे. एका फसवुणकीच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
 
मजौली पोलिसांनी सहायक पोलीस उपनिरीक्षक जुनमोनी राभा यांना फसवणूकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. याच आरोपाखाली त्यांच्या होणाऱ्या नवऱ्यालाही अटक करण्यात आली होती.
 
मजौली पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक गौतम बोरा यांनी या अटकेला दुजोरा दिला आहे. बीबीसी शी बोलताना ते म्हणाले, "महिला पोलीस उपनिरीक्षणक जुनमोनी राभा यांना अनेक आरोपांखाली आज अटक करण्यात आली आहे. फोनवर सगळे आरोप सांगता येणार नाही मात्र मुख्यत: फसवुणकीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे."
 
मजौली मध्ये असताना त्यांनी त्यांच्या नवऱ्याबरोबर संगनमत करून फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्याआधी राम अवतार शर्मा आमि अजित बोरा नावाच्या दोन कंत्राटदारांन जुनमोनी राभा यांचा वाग्दत नवरा राणा पोगाग यांच्या विरुद्ध FIR केला होता. त्यात त्यांनी आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला.
 
जुनमोनी राभाला अटक
या कंत्राटदारांनी आरोप केला होता की जुनमोनी राभाने त्यांची राणा पोगागशी ओळख करून दिली होती आणि या महिला पोलीस अधिकाऱ्यामुळेच त्यांनी पोगागला ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन म्हणजेच ओएनजीसीकडून कंत्राटी काम मिळवून देण्यासाठी पैसे दिले होते.
 
एफआयआरमध्ये जुनमोनी राभाचे नाव समोर आल्यानंतर माजुली पोलिसांनी शुक्रवारी तिची चौकशी केली आणि आज तिला अटक केली.
 
या महिला पोलीस अधिकाऱ्यावरील आरोपांमध्ये राणा पोगाग जुनमोनीच्या बँक खात्यांमध्ये फसवणूक करून लोकांकडून पैसे घेत असे, असे सांगितले जात आहे. यामध्ये माजुलीच्या कॅनडा बँकेच्या खात्यात 11 लाख 33 हजार रुपये आणि अँक्सिस बँकेच्या खात्यात 9 लाख 14 हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे.
 
जुनमोनीचा प्रियकर राणा पोगाग जो सध्या नौगाव तुरुंगात आहे, त्याला भारतीय दंड संहितेच्या कलम 120 बी, 170, 406, 419, 420, 468, 471 आणि 471 अंतर्गत अटक करण्यात आली आहे.
 
जुनमोनी आणि राणा यांची गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये साखरपुडा झाला आणि या वर्षी नोव्हेंबरमध्ये ते लग्न करणार होते. पण त्याआधी जुनमोनी राभाने तिच्या मंगेतरला फसवणुकीसह इतर आरोप करून अटक केली होती.
 
तक्रार काय आहे?
तक्रारीनुसार आरोपी राणा याने जुनमोनी यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीदरम्यान स्वत: ओएनजीसी कंपनीत जनसंपर्क अधिकारी असल्याचं सांगितलं होतं.
 
साखरपुड्यानंतर जुनमोनी यांनी अशा काही गोष्टी आढळल्या ज्यामुळे त्यांचा प्रियकरावरचा विश्वास उडाला.
 
यासंदर्भात जुनमोनी यांनी तपास सुरू केला तेव्हा हा माणूस अनेक अफरातफरीच्या प्रकरणांमध्ये आरोपी असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. राणाने नोकरी देण्याचं आमिष दाखवून अनेकांना गंडा घातल्याचंही स्पष्ट झालं.
 
दोघांची भेट कशी झाली?
गेल्या वर्षी जानेवारीत या दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. जुनमोनी तेव्हा माजुली इथल्या पोलीस स्थानकात कार्यरत होत्या. राणा माजुलीलाच राहणारा आहे.
 
ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झालं. घरच्यांच्या पाठिंब्याने आणि आशीर्वादाने दोघांचा साखरपुडा झाला.
 
साखरपुडा आणि अफरातफरीसंदर्भात जुनमोनी यांनी सांगितलं की, माजुलीत काम करताना आमची ओळख झाली. जानेवारी 2021 मध्ये आमची पहिली भेट झाली. आमच्या ओळखीच्या पोलीस अधिकाऱ्यानेच ओळख करून दिली होती. राणाची पोलीस अधिकाऱ्यांशी ओळख आणि उठबस होती. कदाचित तेही त्या प्रकरणात सामील असतील.
 
पोलिसांशी ओळख असेल तर भविष्यात कामी ठरू शकतं असं राणाला वाटलं असेल. त्याच्या मनात असंच काहीतरी असावं.
 
बोलणंचालणं वाढलं. त्याने लग्नाचं विचारलं. मी तयार होते पण तू घरच्यांशी बोल असं सांगितलं. त्यानंतर आम्हा दोघांच्या घरचे भेटले आणि लग्न पक्कं झालं. काही दिवसातच आमचा साखरपुडाही झाला. तेवढ्यातच माझी बदली नौगावला झाली. इथे काम करताना राणाच्या कामाविषयी मला शंका वाटू लागली. आणखी खोलात जाऊन तपास केला तेव्हा त्याच्याबाबतच्या धक्कादायक गोष्टी समोर आल्या.
 
जुनमोनी यांनी कोणाचंही नाव न घेता राणाचं बिंग फोडणाऱ्या तीन लोकांचे आभार मानले. या तिघांनी राणाबाबतचे सगळे पुरावे जुनमोनी यांच्यापर्यंत पोहोचवले.
 
जुनमोनी पुढे सांगतात, राणाने ओएनजीसीचा जनसंपर्क अधिकारी असल्याचं सांगितलं होतं. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी अंतर्गत ग्रामीण विकासाचं काम बघत आहेत. मीसुद्धा कॉटन कॉलेजातून जनसंपर्क आणि पत्रकारितेचं शिक्षण घेतलं आहे. जनसंपर्क अधिकारपदी असलेल्या व्यक्तीमुळे मीही प्रभावित झाले होते. हा व्यक्ती ठगवणारा असू शकतो याचा थोडाही अंदाज मला आला नाही.
राणाच्या प्रतापांविषयी सांगताना जुनमोनी सांगतात, राणाने ज्या व्यक्तीला 25 लाखांना फसवलं होतं त्याने त्याच्याबद्दलची सगळी माहिती सांगितली. मी राणाला सातत्याने याबद्दल विचारलं तेव्हा सगळं बाहेर आलं. माझ्यासाठी हा प्रचंड मोठा विश्वासघात होता. यासाठी त्याला शिक्षा व्हायलाच हवी. प्रेमात वेडी होणारी मी मुलगी नाही. मी लगेच एफआयआर दाखल केला.
 
नौगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राणाकडे ओएनजीसीची अनेक कागदपत्रं सापडली आहेत. राणाने नेहमी स्वत:बरोबर सुरक्षा अधिकारी आणि वाहनचालक बाळगला होता जेणेकरून समोरच्या माणसांवर छाप पडावी.
 
भाजप नेत्याला दिलं प्रत्युत्तर
काही महिन्यांपूर्वी जुनमोनी माजुली इथे सेवेत असताना बिहपुरिया मतदारसंघाचे भाजपचे खासदार अमिय कुमार भुयां यांच्याशी झालेलं त्यांचं फोनवरचं बोलणं सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं.
 
पोलिसांनी एक बोट जप्त केली. आदिवासींच्या मागे लागू नका, असं खासदारांनी जुनमोनी यांना सांगितलं.
जुनमोनी यांनी खासदारांच्या पदाचं दडपण न घेता त्यांनाच विचारलं की, तुम्ही लोकनियुक्त प्रतिनिधी आहात. पोलिसांनी कायदे-नियम तोडावेत, असं तुम्ही कसं म्हणू शकता असं जुनमोनी यांनी खासदारांना विचारलं.
 
ब्रह्मपुत्रा नदीत झालेल्या एका अपघातानंतर एकच इंजिन असलेल्या मशीन बोटींच्या वाहतुकीवर प्रतिबंध लावण्यात आला होता. याअंतर्गतच बोटीवर कारवाई करण्यात आली.
 
जुनमोनी यांनी भावनांना शरण न जाता प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला. या धाडसी कृत्यासाठी जुनमोनी यांना सोशल मीडियावर पाठिंबा मिळतो आहे.
 
या घटनेने त्या दु:खी झाल्या नाहीत का? या प्रश्नावर जुनमोनी सांगतात, मी अनेक तास हाच विचार करत राहिले की मी केलं ते चूक की बरोबर. चुकीचं काम करणाऱ्याला शिक्षा तर व्हायलाच हवी. मग तो माणूस घरातला किंवा जवळचा का असेना. त्यामुळे मला अजिबात वाईट वगैरे वाटत नाहीये. मला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याप्रकरणात नेहमीच पाठिंबा मिळाला आहे. मी नेहमीच जबाबदारीला सर्वोच्च प्राधान्य मानत ती निभावली आहे. त्यामुळे चुकीचं काम करणाऱ्याला माणसाला शिक्षा होईपर्यंत मी काम करत राहणार.