मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: अमेठी , बुधवार, 26 सप्टेंबर 2018 (11:31 IST)

ही तर सुरुवात, पुढे आणखी मजा येईल : राहुल गांधी

This will be the beginning
राफेल विमान खरेदीवरून हल्लाबोल करणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'ही तर केवळ सुरुवात आहे. पुढे तर आणखी मजा येणार आहे', असा चिमटा काढतानाच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयात घोटाळा कसा झाला हे येत्या काही महिन्यात उघड करणार असल्याचा इशारा राहुल यांनी यावेळी दिला. त्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.
 
अमेठी दौर्‍यावर आले असता राहुल यांनी राफेल करारावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. राफेल विमान खरेदी प्रकरणात मोदींनी अनिल अंबानींची बाजू घेत भ्रष्टाचाराला उत्तेजन दिले आहे. जी व्यक्ती भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी आली होती, तिनेच अंबानीला 30 हजार कोटींचे घबाड दिले आहे. आता तर ही सुरुवात झाली आहे. अजून पाहत राहा, आणखी मजा येईल. येत्या 2-3 महिन्यात तुम्हाला अशा अनेक गोष्टी दाखवू, असे ते म्हणाले. 'राफेल, ललित मोदी, विजय मल्ल्या, नोटाबंदी आणि गब्बर सिंह टॅक्स ही सर्व मोदींची कामे आहेत. त्या प्रत्येक कामात चोरी आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
 
'मोदी चौकीदार नाहीत तर चोर आहेत. हे आम्ही एक-एक घोटाळा बाहेर काढून दाखवून देणार आहोत', असा दावाही त्यांनी केला. अमेठी येथे वनविभागाच्या एका गेस्ट हाऊसमध्ये काँग्रेसच्या सोशल मीडिया वर्कर्सशी बोलताना राहुल यांनी ही टीका केली. या कार्यक्रमात मीडियाला प्रवेश देण्यात आला नव्हता. मात्र या बैठकीला उपस्थित असलेल्या काही लोकांनी राहुल यांच्या भाषणाचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला.