1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 एप्रिल 2021 (08:29 IST)

टाळेबंदीच्या भीतीमुळे हजारो मजुरांचे स्थलांतर

करोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या जीवघेण्या विषाणूच्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्य सरकारे संचारबंदी व टाळेबंदी लावत असल्यामुळे देशभरात स्थलांतरित मजुरांचे स्थलांतर पाहायला मिळत आहे. 
 
टाळेबंदी अनिवार्य असल्याबाबतची भीती काढून टाकण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी केला असला, तरी देशभरात स्थलांतरित मजूर शहरांमधून व गावांमधून बाहेर पडत आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत करोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये अमर्याद वाढ होत असल्याने हजारो स्थलांतरित मजूर शहराबाहेर पडण्याचा मार्ग शोधण्यासाठी बस स्थानके व रेल्वे स्थानकांवर धाव घेत आहेत. गेल्या वर्षीच्या टाळेबंदीदरम्यान झालेल्या सामूहिक स्थलांतरापासून धडा घेतलेल्या दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने सर्व १५ जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांना स्थलांतरित मजुरांचे समुपदेशन करावे, असे निर्देश दिले आहेत. टाळेबंदीच्या अफवांमुळे आंतरराज्य बस स्थानके आणि रेल्वे स्थानकांवर गर्दी होण्याचा अंदाज आल्याने विशेष शाखेने जिल्हा पोलिसांना रात्रीची गस्त वाढवण्याचीही सूचना केली आहे.