1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 एप्रिल 2021 (08:09 IST)

बॉश कंपनीने त्यांच्या सीएसआर फंडातून बिटको हॉस्पिटल मध्ये वाढणार १०० बेड

नाशिकमध्ये कोरोना कक्षांचे ऑडिट नाममात्र शुल्कात करून देण्याची जबाबदारी मे.सिव्हिल टेक,नाशिक यांनी घेतली असून बॉश कंपनीने त्यांच्या सीएसआर फंडातून बिटको हॉस्पिटल येथे सुमारे शंभर बेडची व्यवस्था करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी उचललेली असल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.
 
कोरोना सारख्या महामारीच्या भयानक संकटात विविध सामाजिक संस्था चांगल्या प्रकारे नाशिक महानगरपालिकेस सहकार्य करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक महापालिकेच्या वतीने शहरात उभारण्यात आलेले ठक्कर डोम, स्व.मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल,राजे संभाजी स्टेडियम यासारख्या शहरातील कोरोना कक्षांचे शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे स्ट्रक्चरल ऑडिट, इलेक्ट्रिक ऑडिट, फायर ऑडिट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेच्या वतीने हे ऑडिट करण्यात येणार आहे.
 
मनपाच्या स्ट्रक्चरल ऑडिट पॅनल वरील मे.सिव्हिल टेक  या कंपनीने मनपाच्या सर्व कोविड कक्षांचे स्ट्रक्चरल ऑडिट नाममात्र शुल्क एक रुपया दराने काम करून देण्यास सहमती दर्शवली असून याबाबत या कंपनीने मनपास पत्र दिलेले आहे. त्या अनुषंगाने सदरचे काम करण्यास महापालिकेच्या वतीने त्यांना मान्यता देण्यात आली असल्याचे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.
 
बॉश कंपनीने त्यांच्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारी निधी (सीएसआर फंड) तून नाशिकरोड येथील बिटको हॉस्पिटल मध्ये शंभर बेडचे हॉस्पिटल (कोरोना कक्ष) उभारण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. हे शंभर बेडचे हॉस्पिटल (कोरोना कक्ष) उभारण्याच्या दृष्टीने दोन ते तीन दिवसात काम सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन केले जाणार आहे. याबाबतचे पत्र बॉश कंपनीचे जनरल मॅनेजर शशिकांत चव्हाण व कंपनीच्या सीएसआर फंड अधिकारी राहुल आहेर यांनी समक्ष देऊन चर्चा केली असल्याची आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.