शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पिंपरी चिंचवड , गुरूवार, 22 एप्रिल 2021 (15:30 IST)

कोरोना प्रतिबंधक लसीच्या वाया गेलेल्या डोसची ‘लपवाछपवी’; तब्बल 34 हजार डोसची नासाडी

कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून लसीची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. वाया गेलेल्या डोसची लपवाछपवी केली जात असल्याचे उघडकीस आले आहे.
 
‘कोव्हिशील्ड’चे 3 हजार 100 आणि ‘कोव्हॅक्सिन’चे 1 हजार 710 असे 4 हजार 810 डोस वाया गेल्याचे महापालिकेने मंगळवारी सांगितले. तर, बुधवारी  ‘कोव्हिशील्ड’चे 31 हजार 300 आणि ‘कोव्हॅक्सिन’चे 2 हजार 600 असे तब्बल 33 हजार 900 डोस वाया गेल्याचा खुलासा महापालिकेने केला.
 
पिंपरी-चिंचवड शहरात 16 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले आहे. महापालिकेच्या 60 आणि खासगी 18 अशा 78 केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. लसीचा तुटवडा असल्याने काही केंद्रे बंद करावी लागली आहेत. लसीचा साठा संपल्याने एकेदिवशी लसीकरण ठप्प झाले होते.  एका व्हायलमध्ये दहा डोस असतात. लसीकरणाची वेळ संपण्यावेळी  पाचच्या पुढे लोक लसीकरणासाठी आले असतील. तर, या लोकांना लस दिली जाते. त्यामुळे उर्वरित डोस वाया जातात. डोस खराब होत नाहीत, असे महापालिकेकडून सांगितले जात आहे.
 
महापालिकेला लसीकरणासाठी आजपर्यंत पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने बनविलेल्या  ‘कोव्हिशील्ड’चे  3 लाख 31 हजार 100 डोसेस मिळाले. तर, भारत बायोटेकने बनविलेल्या ‘कोव्हॅक्सिन’चे केवळ 38 हजार 400 डोस मिळाले आहेत. असे एकूण 3 लाख 69 हजार 500 डोसेस प्राप्त झालेले आहेत. महापालिकेला  ‘कोव्हिशील्ड’चे जास्त डोस मिळाले आहेत.
 
‘कोव्हिशील्ड’चे 3 लाख 31 हजार 100 (100 टक्के प्रमाण) तर  ‘कोव्हॅक्सिन’चे 32 हजार 710 (84.92 टक्के प्रमाण)  डोसेसचे लसीकरण केंद्रांवर वाटप करण्यात आले. तर,  ‘कोव्हिशील्ड’चे 31 हजार 300 आणि  ‘कोव्हॅक्सिन’चे 2 हजार 600 असे 33 हजार 900 डोस वाया गेले आहेत. महापालिकेकडे सध्या ‘कोव्हिशील्ड’चे 15 हजार 830 आणि  ‘कोव्हॅक्सिन’चे 11 हजार 750 असे 27 हजार 580 लसीचे डोस शिल्लक आहेत.
 
…म्हणून डोस वाया जातात – डॉ. वर्षा डांगे
 
लसीकरण प्रमुख डॉ. वर्षा डांगे म्हणाल्या, “महापालिका 16 जानेवारीपासून लसीकरण करत आहे. एका व्हायलमध्ये दहा डोस असतात. लसीकरणाची वेळ संपण्यावेळी पाचच्या पुढे लोक लस घेण्यासाठी आले असतील. तर, या लोकांना परत पाठविणे योग्य नाही. त्यामुळे व्हायल उघडून लस दिली जाते. उर्वरित डोस वाया जातात. तापमान व्यवस्थित मेंटन असते.
 
शीतसाखळी व्यवस्थित आहे. सगळीकडे तापमान डेटा लॉगर आहेत. इलेक्ट्रॉनिक वॅक्सिन इंटेलिजीइन्स मॉनिटरिंग सिस्टीम आहे. त्यामुळे खराब झाले म्हणून डोस फेकून दिले जात नाहीत. लस घेण्यासाठी नागरिक आल्यास त्यांना नाही म्हटले जात नाही. त्यांना लस दिली जाते. उरलेले डोस लगेच वापरावे लागतात. त्यावेळी नागरिक नसतील तर शिल्लक डोसचा वापर होत नाही. परिणामी, ते डोस वाया जातात”.
 
महापालिका प्रवक्ते शिरीष पोरेडी म्हणाले, लसीकरण करताना वाया गेलेल्या डोसची माहिती चुकली होती.  ‘कोव्हिशील्ड’चे 31 हजार 300 आणि  ‘कोव्हॅक्सिन’चे 2 हजार 600 असे 33 हजार 900 डोस वाया गेले आहेत.  आजपर्यंत 3 लाख 33 हजार 935 जणांचे लसीकरण झाले आहे.