पोलिसांच्या कारवाईविरोधात हजारो निवासी डॉक्टर रस्त्यावर
दिल्लीमध्ये नीट-पीजी (NEET-PG)परीक्षेमधील विलंबाबात निवासी डॉक्टरांनी काढलेला मोर्चा रोखल्यामुळं सोमवारी रात्री पोलीस आणि डॉक्टरांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला.
निवासी डॉक्टर दिल्लीचे आरोग्य मंत्री मनसुख मंडावीय यांच्या घराकडे निघाले असता पोलिसांनी त्यांना अडवलं. त्यावेळी पोलिसांनी डॉक्टरांना मारहाण आणि महिला डॉक्टरांशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकारानंतर जवळपास चार हजार निवासी डॉक्टरांनी सरोजनी नगर पोलीस ठाण्याच्या बाहेर आंदोलन सुरू केलं. यावेळी त्यांनी पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली. अनेक दिवसांपासून निवासी डॉक्टरांची संघटना याबाबत आंदोलन करत आहे.
दरम्यान, निवासी डॉक्टरांनी अॅप्रन परत करत प्रतिकात्मक विरोधही केला आहे. या आंदोलनामुळं दिल्लीमधील काही रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधांवरही परिणाम झाला आहे.