1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 12 एप्रिल 2022 (09:29 IST)

आंध्र प्रदेशमध्ये रेल्वे अपघात, कोणार्क एक्स्प्रेसने 6 प्रवाशांना चिरडले

Train accident in Andhra Pradesh
आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक भीषण अपघात झाला. रिपोर्टनुसार येथे कोणार्क एक्स्प्रेस ट्रेनची धडक बसून सुमारे 6 जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनीही 6 जणांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात बळी पडलेले सर्व जण गुवाहाटीला जाणाऱ्या सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेनचे प्रवासी होते. बटुवा गावात काही तांत्रिक बिघाडामुळे गाडी थांबली तेव्हा हे लोक लगतच्या रेल्वे रुळावर उतरले. दरम्यान, कोणार्क एक्स्प्रेस गाडी विरुद्ध दिशेने आली आणि या 6 जणांना तुडवून निघून गेली. या अपघातात काही जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे.
 
श्रीकाकुलम एसपी जी. आर राधिकाने सांगितले की, "आतापर्यंत आम्हाला या दुर्घटनेत बळी पडलेले 6 मृतदेह सापडले आहेत. या सर्वांचीही ओळख पटली आहे. या क्षणी आम्ही शोधत आहोत की या दुर्घटनेत इतर लोकांचा बळी गेला आहे का." पोलीस आणि रेल्वेचे पथक या तपासात गुंतले आहेत. आतापर्यंत रेल्वे रुळावर दुसरा मृतदेह सापडलेला नाही. हे लोक रुळावर नसते तर अपघात झाला नसता.
 
मुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्त केले
त्याचवेळी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस जगन मोहन रेड्डी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना मदतकार्य सुरू करण्यास आणि जखमींना योग्य वैद्यकीय सुविधा देण्यास सांगितले आहे. जखमींच्या उपचारात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे.