शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (20:41 IST)

डिसेंबरपासून राजधानी, शताब्दीसह ‘या’ गाड्यांमध्ये मिळणार खाद्यपदार्थ

गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेली रेल्वे कॅटरिंग सेवा आत्ता पुन्हा सुरु होणार आहे. यामुळे राजधानी, शताब्दी, दुरांतो, वंदे भारत, तेजस अशा लांब पल्ल्यांच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जेवणाची सुविधा मिळणार आहे. कोरोना महामारीमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये कॅटरिंग सेवा बंद करण्यात आली होती. मात्र येत्या डिसेंबरपासून ही सेवा पुन्हा सुरु होणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या आयआरसीटीसी या कंपनीमार्फत आता डिसेंबरपासून ५० रेल्वे गाड्यांमध्ये शिजवलेल्या जेवणाची सुविधा सुरू होणार आहे.
 
साधारणपणे या गाड्यांमध्ये तिकीट काढताना प्रवाशांकडून जेवणाचे पैसे घेतले जात होते. कोरोनाच्या काळात ही सुविधा बंद करण्यात आली असली तरी आता ही सुविधा पुन्हा सुरू करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत, जर एखाद्याने आधीच तिकीट बुक केले असेल, तर तो प्रवासी जेवणाचे पैसे भरून ही सुविधा घेऊ शकतो. यासाठी प्रवासी तिकीट स्लिपद्वारे टीटीईला जेवणाचे पैसे देऊ शकतो. मात्र अशावेळी जेवणाच्या खर्चाव्यतिरिक्त ५० रुपये अतिरिक्त द्यावे लागतील.
 
अशाप्रकारे वाचवू शकता ५० रुपये
प्रवासादरम्यान कॅटरिंग सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवासी ऑनलाइन पैसे भरू शकतात, असे रेल्वेने म्हटले आहे. रेल्वेच्या या सेवेमुळे प्रवाशांना ५० रुपयांचा फायदा होणार आहे, कारण ट्रेनमध्ये पैसे भरल्यास ५० रुपये जादा मोजावे लागणार आहेत. मात्र ऑनलाईन भरल्यास ५० रुपयांची सुट मिळणार आहे. प्रवाशांना ऑनलाईन पैसे भरता यावे यासाठी रेल्वेची इंफोर्मेशन टेक्नोलॉजी सॉफ्टवेअर विकसित करत आहे. यासाठी आयआरसीटीसी काही व्यवस्था करत आहे.