गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 7 नोव्हेंबर 2019 (09:32 IST)

आंध्रातून येणारा वीस लाखांचा गांजा हस्तगत नऊ संशयितांसह तीन चारचाकी जप्त

आंध्र प्रदेशातून शहरात विक्रीसाठी गांजा आणणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाला यश आले आहे. पुणे रोडवरील चेहडी जुना जकात नाक्याजवळ मंगळवारी केलेल्या धाडसी कारवाईत नऊ संशयितांसह वीस लाख रूपयांच्या २०३ किलो गांजासह तीन चारचाकी वाहने, आठ मोबाईल असा ४५ लाख, १५ हजार रूपयांचा मुद्देमाल हाती लागला आहे. या कारवाईमुळे शहरातील अंमली पदार्थ विक्रीच्या अवैध व्यवसायाचे कंबरडे मोडले जाणार आहे.
 
आंध्र प्रदेशातून स्विफ्ट डिझायर कारमधून नाशिकमध्ये विक्रीसाठी गांजा आणला जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक निरीक्षक महेश कुलकर्णी यांना मिळाली. त्यानुसार मंगळवारी रात्री चेहडी जुना जकात नाक्याजवळ सापळा रचण्यात आला. संशयित स्विफ्ट कार दृष्टीक्षेपात आली तेव्हा बरोबर इतर दोन कार असल्याचेही पोलिसांनी हेरले. त्यामुळे तीनही वाहने थांबविण्यात आली. चालकाने पोलिसांना चुकवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. तीनही कारची झडती घेतली असता त्यात तब्बल २०३ किलो ४५० ग्रॅम गांजा मिळून आला.
 
कारमधील प्रकाश मधुकर वाघमारे (रा. रविराज व्हिला, पवारवाडी, पंचक शिवार, जेलरोड), सुनिल गेणु जगताप (रा. सैलानीबाबा बस स्टॉपजवळ, जेलरोड), अन्सार निसार शेख (रा. साईनाथनगर, जेलरोड), अजय शाम चव्हाण (रा. लक्ष्मी ज्योत सोसायटीसमोर, जेलरोड), विकास बाबासाहेब जाधव (रा. कोणार्कनगर, आडगाव शिवार), मनोज गजानन लागे (रा. जेलरोड), विशाल दिलीप दांडगे (रा. मोरे मळा, जेलरोड), चंद्रकांत दशरथ कुमावत (रा. राहुलनगर, जेलरोड), शरद प्रकाश कारके (जत्रा हॉटेलजवळ, आडगाव शिवार) अशी संशयितांची नावे असून त्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून स्विफ्ट डिझायर कार (एमएच ०२-बीपी ५५२१) तसेच (एमएच ४१-सी ६७२०), इर्टिगा कार (एमएच ०४-जीएम ८८८३) तसेच आठ मोबाईल जप्त करण्यात आले. गांजा, वाहने, आठ मोबाईल असा ४५ लाख १५ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे. शहर पोलिसांनी केलेल्या या कारवाईने शहरातील अंमली पदार्थ विक्रीवर वचक निर्माण होणार आहे.