शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 8 जून 2021 (14:08 IST)

उद्धव ठाकरे-नरेंद्र मोदी यांच्यात दीड तास 'या' 9 महत्त्वाच्या विषयांवर झाली चर्चा

मराठा आरक्षण, इतर मागासवर्गीयांचं आरक्षणासह पंतप्रधानांसोबत इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातली बैठक तब्बल दीड तासांनंतर संपली. पंतप्रधानांचं निवासस्थान असलेल्या 7, लोककल्याण मार्ग इथं ही बैठक पार पडली.
 
या बैठकीवेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हेही उपस्थित होते. अशोक चव्हाण हे राज्य सरकारनं मराठा समाजासाठी स्थापन केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्षही आहेत.
 
या बैठकीबाबत आम्ही तिघेही समाधानी आहोत, असं सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी आम्ही सत्तेत एकत्र नसलो तरी आमचं नातं तुटलं नाही, असंही त्यांनी म्हटलं.
 
या बैठकीनंतर उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाण दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून माध्यमांशी संवाद साधला.
 
या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली?
1) मराठा आरक्षण - नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली.
मराठा आरक्षणाबाबत कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली याबद्दल सांगताना अशोक चव्हाण यांनी म्हटलं की, "आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्याचा युक्तिवाद सुप्रीम कोर्टात झाला पाहिजे असं आम्ही त्यांना सांगितलं. मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टानं मांडलेले महत्त्वाचे मुद्दे पंतप्रधान मोदींसमोर मांडले."
 
2) ओबीसींचं राजकीय आरक्षण - महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचं राजकीय आरक्षण संपुष्टात आलंय. याबाबतही पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
 
"ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण काढून टाकण्यात आलंय. एससी, एसटी आणि ओबीसींच्या एकत्रित आरक्षणाची 50 टक्क्याची मर्यादा शिथिल करण्याची विनंती आम्ही पंतप्रधानांना केली," असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं.
 
3) कांजू मेट्रो कारशेड - मुंबईतील मेट्रोच्या कारशेडचा मुद्दा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडला.
मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्ग येथे जागेची उपलब्धता करून द्यावी, अशी मागणी पंतप्रधानांकडे उद्धव ठाकरेंनी केली.
 
4) जीएसटीचा मुद्दा - वस्तू व सेव कर अर्थात जीएसटीचा परतावा लवकरात लवकर मिळावा, याबाबतची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळानं पंतप्रधानांकडे केली.
 
5) वित्त आयोगातील निधी - भारत सरकारच्या चौदाव्य वित्त आयोगाकडून देण्यात येणारा निधी अद्याप देण्यात आला नाही. हा थकीत निधी देण्यात यावा, अशी मागणी पंतप्रधानांकडे केल्याची माहिती अजित पवारांनी सांगितली.
 
6) चक्रीवादळ आणि मदतनिधी - महाराष्ट्राच्या निकारपट्टीवर गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं चक्रीवादळं धडकत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत बोलताना म्हणाले, "केंद्राकडून चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीचे निकष हे जुने आहेत, त्यात बदल करावेत, अशी मागणी पंतप्रधानांकडे केलीय."
 
7) मराठीला अभिजात भाषेचा दर्जा - मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी केल्या अनेक वर्षांपासून होत आहे. ही मागणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर मांडली.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशी भूमिका पंतप्रधानांसमोर मांडल्याची माहिती अजित पवारांनी दिली.
 
8) विधानपरिषद सदस्यांचा मुद्दा - विधान परिषदेच्या 12 सदस्यांची नावं राज्यपालांकडे पाठवून ती अद्याप मंजूर करण्यात आली नसल्याची तक्रार गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडीकडून करण्यात येतेय.
या विधान परिषद राज्यपालनियुक्त 12 आमदारांचा मुद्दा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडला आहे. त्यामुळे आगामी काळात विधान परिषदेच्या 12 सदस्यांचा मुद्दा निकाली निघतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
 
9) पीक विमा - शेतकऱ्यांसाठी पीक विम्याच्या अटींचं सुलभीकरण व्हावं.
या खेरीज इतरही काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचं उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी सांगितलं.