उध्दव ठाकरे यांनी सत्तेसाठी विश्वासघात केला : नड्डा
महाराष्ट्रात आमच्यासोबत सत्तेसाठी धोका झाला. आम्हीच निवडणूक जिंकलो होतो. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत हाच कौल होता मात्र उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी आमचा विश्वासघात केला असे आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी म्हटले आहे.
एका वृत्तवाहिनीने नड्डा यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला. काँग्रेससोबत तुम्ही निवडणूक जिंकता, मात्र राज्यांमधले जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला जिंकताना कष्ट घ्यावे लागतात. त्यावर नड्डा म्हणाले, महाराष्ट्रात ठाकरे तर आमचसोबतच निवडणूक लढले होते. महाराष्ट्रात आम्ही हरलो नाही. महाराष्ट्रात आमच्यासोबत विश्वासघात झाला आहे. सत्तेसाठी भाजपचा विश्वासघात करण्यात आला. महाराष्ट्रात आम्ही निवडणूक जिंकलो होतो. फडणवीस मुख्यमंत्री होतील असाच जनताचा कौल होता, असे नड्डा यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राच विधानसभा निवडणुकीत भाजपने 105 जागा जिंकल्या. तर शिवसेनेने 56 जागा जिंकल्या. या दोन्ही पक्षांनी निवडणूक एकत्र लढवली होती. मात्र अडीच-अडीच वर्षाचे मुख्यमंत्रीपद यावरुन दोन्ही पक्षांचे घोडे अडले. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये झालेला वाद सर्वश्रुत आहे. तसेच या दोन्ही पक्षांनी एकमेकांशी काडीमोड घेतला आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांची आघाडी तयार होऊन महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. भाजपची हार महाराष्ट्रात झालेलीच नाही. सत्तेसाठी आमच्यासोबत विश्वासघात करण्यात आला आणि ठाकरेंनी तो केला असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.