युजीसीकडून अंतिम वर्षांच्या परीक्षांसाठी मानक कार्यपद्धती जाहीर
महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत अद्यापही संभ्रमता कायम असताना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने गुरुवारी अंतिम वर्षांच्या परीक्षांसाठी मानक कार्यपद्धती जाहीर केली. यूजीसीच्या नियमांनुसार अंतिम वर्षाची परीक्षा घेणं गरजेचं आहे, असं केंद्रीय गृह मंत्रलयाचं म्हणणं आहे. त्यामुळे यासंदर्भात यूजीसीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातही अंतिम वर्षाची परीक्षा घेणं अत्यंत गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.
यूजीसीने बुधवारी या परीक्षांसाठी मानक कार्यपद्धती (एसओपी) एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली. या पत्रकात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं म्हटलंय की, करोनाबाबत आरोग्य मंत्रालयाच्या नियमावलीचे सर्वांना पालन करावे लागेल. यामध्ये दोन मीटरचे अंतर राखणे, मास्क आणि आरोग्य सेतू अॅप अनिवार्य. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना सर्दी, पडसे, ताप आणि करोना विषाणूचे दुसरी लक्षणं आहेत, त्यांना दुसऱ्या दिवशी परीक्षेला बसू द्यावे किंवा दुसऱ्या वर्गात बसून द्यावे याबाबत निर्णय घेणे, त्याचबरोबर परीक्षकांनाही मास्क आणि हातात ग्लोव्ह्ज घालणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे.