बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: वाराणसी , मंगळवार, 19 सप्टेंबर 2017 (09:04 IST)

वाराणसीच्या घाटांवर अंत्यसंस्कारासाठी लाकडाऐवजी आता शेणाच्या गोवऱ्या

मणिकर्णिका घाटावर होणाऱ्या अंत्यसंस्कारांसाठी आता लाकडाऐवजी शेणाऱ्या गोवऱ्यांचा वापर करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. या घाटावर दररोज किमान शंभर मृत व्यक्तींचे अंत्यविधी केले जातात. या अंत्यविधीमध्ये एका शवाच्या दहनासाठी साधारण दोनशे ते तीनशे किलो लाकूड वापरण्यात येते. त्यामुळे शंभर मृत व्यक्तींच्या दहनासाठी साधारण दोन ते तीन हजार किलो लाकूड वापरले जात असेल. हा हिशोब केवळ एका दिवशी वापरल्या जाणाऱ्या लाकडाचा आहे. ही लाकडे हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या जंगलांमधून आणली जातात. पर्यावरणावर याचा होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी वाराणसी मध्ये आता अंत्यविधीसाठी लाकडाऐवजी शेणाच्या गोवऱ्या वापरण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी ही पावले उचलणाऱ्या शहरांमध्ये वाराणसी हे उत्तर प्रदेशामध्ये अग्रणी ठरले आहे.
 
प्रशासनाच्या या निर्णयामुळे स्थानिक लाकूड विक्रेत्यांमध्ये नाराजी पसरली असली तरी अनेक वेदिक पंडित, आणि पर्यावरणप्रेमींनी या निर्णयाचे मनःपूर्वक स्वागत केले आहे. शेणाच्या गोवऱ्या वापरण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नसून लाकडाबरोबरच गोवऱ्याही वापरण्याची पद्धत आपल्याकडे फार पूर्वीपासूनच असल्याचे वाराणसीतील वेदाभ्यासक चंद्रमौली उपाध्याय म्हणतात. अंत्यविधीसाठी शेणाच्या गोवऱ्या वापरणे ही सनातन धर्माची परंपरा आहे असे ही ते म्हणतात.
 
काशी मोक्षदायिनी समितीच्या अहवालानुसार अंत्यविधीसाठी गोवऱ्या वापरण्याचा निर्णय घेणारे वाराणसी हे उत्तर प्रदेशातील पहिले स्थान असले तरी या पूर्वी नागपूर, जयपूर, रोहतक, जळगाव, इंदूर, रायपुर, कोलकाता, राउरकेला या शहरांमध्ये काही काळ आधीपासूनच लाकडाऐवजी गोवऱ्या वापरण्यात येत असल्याचे समजते. या नव्या पद्धतीमुळे झाडे तोडली जाणे कमी होऊन त्याशिवाय प्रदूषण ही कमी होईल असे पर्यावरण तज्ञांचे म्हणणे आहे.
आणखी एका अहवालानुसार वाराणसीमध्ये दर वर्षी साधारण 33 हजार शवांचे दहन केले जाते. त्यासाठी 16,000 टन लाकूड वापरले जाऊन त्यापासून सुमारे 800 टन राख तयार होत असते. गोवऱ्यांच्या वापराने यामध्ये घट होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.