रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 4 जून 2023 (14:22 IST)

ओडिशा रेल्वे अपघातावेळी 'कवच'ला काय झालं? शून्य रेल्वे अपघातांचा दावा कुठे गेला?

गेल्या 15 वर्षांत भारतात 10 रेल्वेमंत्री बदलले. पण रेल्वे अपघातांचं चित्र मात्र अद्याप बदलू शकलेलं नाही.
रेल्वे मंत्र्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सगळेच जण अपघाताविषयी बोलत असताना झिरो टॉलरन्स धोरणाची चर्चा करताना दिसतात.गेल्या दोन दशकांमध्ये रेल्वे अपघात रोखण्यासाठी विविध प्रकारच्या तंत्रज्ञानांवर चर्चा झाली.
 
पण आजपर्यंत भारतीय रेल्वेला अशा एका तंत्रज्ञानाची गरज आहे, जे रेल्वेचं चित्र खरोखर बदलू शकेल.
 
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्या वर्षी म्हणजेच मार्च 2022 मध्ये सिकंदराबादजवळ कवच तंत्रज्ञानाच्या प्रयोगात स्वतः सहभाग नोंदवला होता.
 
त्यावेळी असा दावा करण्यात आला होता की नव्याने आणलेलं कवच हे तंत्रज्ञान रेल्वे अपघात रोखण्यासाठीचं स्वस्त आणि सर्वोत्तम तंत्रज्ञान आहे.
 
रेल्वे मंत्र्यांनी स्वतः रेल्वेच्या इंजीनमध्ये स्वार होऊन याची चाचणी घेतानाचे व्हीडिओ पोस्ट केले होते.
 
कवच काय आहे?
कवच हे एक स्वदेशी तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान भारतीय रेल्वेमध्ये सर्व व्यस्त मार्गांवर वापरलं जाईल. यातून रेल्वे अपघात रोखण्यास मदत होईल, असा दावा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला होता.
 
पण, या दाव्यांनंतरही रेल्वे अपघात रोखता आले नाहीत. त्यातही शुक्रवारी संध्याकाळी ओडिशामध्ये भारतीय रेल्वे इतिहासातील सर्वात मोठ्या अपघातांपैकी एक अपघात घडला.
 
ओडिशा रेल्वे अपघातात आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये नोंद करण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्या प्रकारचे अपघात रोखण्यासाठी कवच तंत्रज्ञानाची निर्मिती करण्यात आली होती, तसाच अपघात ओडिशामध्ये झाला आहे.
 
या अपघातात सर्वप्रथम कोरोमंडल एक्सप्रेसने बाहनगा स्टेशनवर उभ्या असलेल्या मालगाडीला धडक दिली. या धडकेनंतर कोरोमंडल एक्सप्रेसचे किमान 12 डब्बे रुळावरून खाली उतरले.
 
ज्येष्ठ पत्रकार आणि बराच काळ रेल्वेविषयक घडामोडींचं वार्तांकन करणारे अरूण दीक्षित म्हणतात, “रेल्वे मंत्र्यांनी म्हटलं होतं की कवच तंत्रज्ञानामुळे अडथळा असलेल्या ठिकाणावरून 400 मीटरवरच रेल्वे थांबवण्यात येईल. मग हे तंत्रज्ञान कुठे आहे, इतका भीषण अपघात कशामुळे झाला?”
 
असाच आरोप माजी रेल्वे राज्यमंत्री आणि लोकसभेत काँग्रेसचे गटनेते असलेल्या अधीर रंजन चौधरी यांनी लावला आहे.
 
त्यांच्या मते, “मी नेहमी सांगत असतो. आपण आपल्या प्राथमिक पायाभूत सुविधांवर लक्ष देण्याची जास्त गरज आहे. रेल्वेत होत असलेल्या निष्काळजीपणाचा परिणाम आपण भोगत आहोत.”
 
भारतीय रेल्वेचे प्रवक्ते अमिताभ शर्मा यांनी या मुद्द्यावर म्हटलं की ओडिशामध्ये ज्याठिकाणी हा अपघात झाला, तिथे कवच लावण्यात आलेलं नाही.
खरं तर, भारतीय रेल्वेच्या दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-कोलकाता मार्गावर धावणाऱ्या रेल्वेंचा वेग वाढवण्याचं काम वेगाने सुरू आहे. या रेल्वेमार्गांना सर्वात आधी आधुनिक तंत्रज्ञान आणि सोयीसुविधांनी युक्त बनवण्याबाबत बोललं जात असतं.
 
या अपघातानंतर माजी रेल्वे मंत्री आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रश्न उपस्थित केले.
 
या रेल्वेमार्गावर अँटी कॉलिजन डिव्हाईस लावण्यात आलेलं असतं तर हा अपघात घडलाच नसता, असं बॅनर्जी म्हणाल्या.
 
अँटी कॉलिजन डिव्हाईस
ममता बॅनर्जी यांनी म्हटलं की त्या रेल्वे मंत्री असताना त्यांनी रेल्वेंची एकमेकांना धडक देण्याच्या संदर्भात त्यांचं काम सुरू होतं.
 
भारतात दोन रेल्वे एकमेकांना धडकण्याच्या घटना (हेड ऑन कोलिजन) रोखण्यासाठीचं काम मुळात 1999 वर्षापासून सुरू झालं. त्यावेळी घडलेल्या गॅसल रेल्वे अपघातानंतर ही बाब गांभीर्याने घेण्यात येऊ लागली.
या अपघातात अवध-आसाम एक्सप्रेस आणि ब्रह्मपुत्रा मेल या दोन रेल्वे एकमेकांना धडकल्या होत्या. यामध्ये किमान 300 जणांचा मृत्यू झाला होता.
 
त्यानंतर भारतीय रेल्वेच्या कोकण रेल्वेने गोव्यात अँटी कोलिजन डिव्हाईस तंत्रज्ञानावर काम सुरू केलं.
 
यामध्ये रेल्वे गाड्यांमध्ये जीपीएस आधारित तंत्रज्ञान बसवण्यात येणार होतं. अशा स्थितीत जर दोन्ही गाड्या एकाच मार्गावर जवळ आल्यास सिग्नल आणि हूटरच्या मदतीने त्याची सूचना चालकाला मिळेल, अशी ही यंत्रणा होती.
 
सुरुवातीला या तंत्रज्ञानामध्ये असं आढळून आलं की दुहेरी मार्ग असलेल्या ठिकाणीही एखादी रेल्वे आपल्या दिशेने येत असल्यास त्यातून सूचना मिळायची. यामुळे हे तंत्रज्ञान वापरण्यास मर्यादा दिसून आल्या.
 
यानंतर रेल्वेने व्हिजिलन्स कंट्रोल डिव्हाईस यंत्रणा विकसित करून अपघात थांबवण्यावर विचार केला.
 
पुढे रेल्वेंची धडक रोखण्यासाठी ट्रेन प्रोटेक्शन वॉर्निंग सिस्टिम किंवा TPWS आणि ट्रेन कोलिजन अव्हॉयडन्स म्हणजेच TCAS सिस्टिम लागू करण्याबाबतची विचार झाला.
 
अशा प्रकारचं तंत्रज्ञान परदेशातून विकत घेणं, हे प्रचंड महागडं ठरत होतं. त्यामुळे रेल्वेने स्वतःच अशा प्रकारचं तंत्रज्ञान विकसित करण्याला प्राधान्य दिलं. याच अंतर्गत कवच नामक स्वदेशी तंत्रज्ञान तयार करून गेल्या वर्षी ते वापरात आणलं आहे.
 
रेल्वे अपघात शून्यावर आणण्याचा दावा
भारतीय रेल्वेने नेहमीच अपघातासंदर्भात झिरो टॉलरन्स टूवर्ड्स अक्सिडेंट असं धोरण स्वीकारलेलं आहे.
 
म्हणजेत रेल्वेत एकही अपघात झाला तरी ते सहन केलं जाणार नाही.
 
साधारपणपणे प्रत्येक रेल्वे मंत्र्यांच्या प्राधान्यक्रमावर हेच ऐकायला मिळतं. पण गेल्या 15 वर्षांमध्ये 10 पेक्षा जास्त मंत्री बदलल्यानंतरही हे अपघात थांबवता आलेले नाहीत.
 
रेल्वे अपघाताच्या बाबतीत मागील सरकारांचा रेकॉर्ड वाईट आहे. पण विद्यमान मोदी सरकारमध्येही मोठे अपघात झालेले आहेत. यामध्ये कित्येक अपघात असे आहेत, ज्यांची चर्चाही होत नाही.
 
ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशनचे महामंत्री शिव गोपाल मिश्रा म्हणतात, “प्रत्येक वर्षी सुमारे 500 कर्मचारी रेल्वे मार्गावर काम करत असताना मृत्यूमुखी पडतात. इकंच नव्हे तर मुंबईतही रोज शेकडो व्यक्ती रेल्वे मार्ग पायी पार करताना मारले जातात. रेल्वेचं पहिलं प्राधान्य हे रेल्वेचा वेग नव्हे तर सुरक्षेला असलं पाहिजे.
 
ज्येष्ठ पत्रकार अरूण दीक्षित म्हणतात, “रेल्वे अपघात रोखण्याची चर्चा दशकानुशके होत आली आहे. पण पुढे काहीच घडत नाही. कोणतंही सरकार त्यासंदर्भात गंभीर दिसत नाही. त्यांना या गोष्टीवर पैसे खर्च करायचे नाहीत.”
 
मोदी सरकारच्या काळात झालेले मोठे रेल्वे अपघात
13 जानेवारी 2022- राजस्थानमधल्या बिकानेरहून आसाममधल्या गुवाहाटी इथे जाणारी बिकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले. हा अपघात पश्चिम बंगालमधल्या जलपैगुडी इथे झाला. ट्रेनच्या इंजिनाची मोटार रेल्वे मार्गावरून घसरली आणि त्यावर ट्रेन चढली. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला.
 
19 ऑगस्ट 2017- उत्तर प्रदेशातील खतौली इथे उत्कल एक्स्प्रेसचे 14 डबे रुळावरुन घसरले. ही ट्रेन पुरी इथून हरिद्वार इथे जात होती. ज्या ठिकाणी अपघात झाला तिथे रेल्वे रुळाचं काम सुरू होतं. या अपघातात 23 जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
 
22 जानेवारी 2017- आंध्र प्रदेशातल्या विजयनगरम जिल्ह्यात हिराखंड एक्स्प्रेसचे 8 डबे घसरले होते. या अपघातात 40 जणांचा मृत्यू झाला होता.
 
20 नोव्हेंबर 2016- कानपूरजवळ पुखराया इथे पटणा-इंदूर एक्स्प्रेसचे 14 डबे रुळावरुन घसरले. या अपघातात दीडशेजणांचा मृत्यू झाला होता.
 
20 मार्च 2015- डेहराडून-वाराणसी जनता एक्स्प्रेस रुळावरुन घसरली होती. या दुर्घटनेत 35 जणांचा मृत्यू झाला होता. हा अपघात उत्तर प्रदेशातल्या रायबरेली इथे झाला होता.
 
24 जुलै 2014- हैदराबादजवळच्या रेल्वे फाटकाशी स्कूल बस आणि ट्रेन यांची टक्कर होऊन 15 शाळकरी मुलांनी जीव गमावला होता. हा अपघात मेडकच्या मसाईपेट परिसरातील मानवरहित रेल्वे फाटकाच्या इथे झाला होता.
 
26 मे 2014- उत्तर प्रदेशातल्या संत कबीर जिल्ह्यातील चुरेब रेल्वे स्टेशनच्या इथे गोरखधाम एक्स्प्रेसचे 6 डबे रुळावरुन घसरले आणि मालगाडीला जाऊन धडकले. यामध्ये 25हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघातात 50हून अधिक प्रवाशी जखमी झाले होते.
 
 
Published By- Priya Dixit