सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 ऑगस्ट 2023 (09:18 IST)

'नोकरी शोधायला गेलेल्या माझ्या भावाला चेतन सिंहनं का मारलं?'

madhuman news
चंदन जजवाडे
रेल्वे प्रोटेक्शन फोर्स म्हणजेच RPF वर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी असते. परंतु RPF च्या जवानाच्या गोळीनं प्रवाशांचा मृत्यू झाला.
 
सोमवारी (31 जुलै) सकाळी RPF कॉन्स्टेबल चेतन सिंह यांनी जयपूर-मुंबई सुपरफास्ट ट्रेनमध्ये चार जणांची गोळ्या झाडून हत्या केली. यामध्ये तीन प्रवासी आणि RPF च्या एका एएसआयचा समावेश आहे.
 
या गोळीबारात बिहारच्या मोहम्मद असगर यांचाही मृत्यू झाला असून ते नोकरीच्या शोधात मुंबईला जात होते.
 
कौटुंबिक परिस्थिती
असगर हे मधुबनी जिल्ह्यातील बिस्फी तालुक्यातील पर्वत्ता गावाचे रहिवासी होते. त्यांचं कुटुंब अत्यंत गरीब असून असगर यांच्या मृत्यूनं गावात शोककळा पसरलीय.
 
असगर हे एका वर्षापासून आपल्या कुटुंबासह जयपूरमध्ये राहत होते. इथं ते बांगड्या बनवण्याच्या कारखान्यात कामाला होते.
 
असगरचे भाऊ झिकरुल्लाह यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील मशिदीत काम करण्याविषयी त्यांचं बोलणं झालं होतं आणि त्यासाठीच ते मुंबईला जात होते. पण असगर हे मुंबईला पोहचण्यापूर्वीच ही घटना घडली, ज्यात त्यांचा मृत्यू झाला.
 
मोहम्मद असगर हे पूर्वी मुंबईत मजूर म्हणून काम करायचे. त्यावेळी त्यांचं कुटुंब गावी राहत होतं.
 
वर्षभरापूर्वी ते जयपूरच्या बांगड्या बनवण्याच्या कारखान्यात नोकरी करायला लागले आणि कुटुंबाला घेऊन जयपूरला स्थायिक झाले.
 
48 वर्षीय असगर यांच्या पश्चात पत्नी, चार मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे त्याच्या सर्व मुलांचं वय तीन ते चौदा वर्षाच्या आत आहे. असगर यांच्या घरात आई,पाच भाऊ आणि एक बहीण आहे.
 
कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी असगर यांचा एक भाऊ नागपूरमध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून काम करताहेत आणि एक भाऊ हे दिल्लीत रेशन दुकानात काम करतात.
 
तीन भाऊ अजूनही लहान आहेत. असगर यांना आता त्याच्या बहिणीचं लग्न ही करायचं होतं.
 
घटना कशी घडली?
असगरचे भाऊ झिकरुल्ला यांनी बीबीसीशी बोलताना, रेल्वे विभागानं त्यांना भावाच्या मृत्यूची माहिती दिली आणि भावाचा मृतदेह आणण्यासाठी त्यांना नागपूरहून दिल्लीला जावं लागलं.
 
आपल्या भावाला आरपीएफ जवानानं गोळी का मारली, हे मात्र रेल्वेने आपल्याला सांगितलं नाही, असं झिकरुल्ला यांनी म्हटलं.
 
वृत्तानुसार आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंह त्यांचे वरिष्ठ एएसआय टिकाराम मीणा आणि इतर सहकारी यांच्यासह जयपूर मुंबई ट्रेनमध्ये एस्कॉर्ट ड्युटीवर होते.
 
चेतन सिंह यांनी एएसआय टिकाराम मीणा आणि तीन प्रवाशांवर गोळीबार केला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. चेतन सिंह यांना अटक करण्यात आली आहेत.
 
जयपूर मुंबई ट्रेनमध्ये गोळीबार झाल्यानंतर मुंबई सेंट्रलचे डीआरएम नीरज कुमार यांनी पत्रकारांना सांगितलं की, एकदा गोळीबार केल्यानंतर आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंह हे वाट मिळेल तसे धावत सुटले.
 
जयपूर-मुंबई सुपरफास्ट ट्रेन
या गोळीबारात आरपीएफचे एएसआय टिकाराम मीणा यांच्यासह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आरपीएफ जवान चेतन सिंह चौधरी कथितरित्या आक्षेपार्ह टिप्पणी करताना दिसत आहेत.
 
या घटनेला द्वेषपूर्ण हिंसाचाराशी जोडलं जात आहे. मात्र, या घटनेपूर्वी कोणताही वाद झाला नसल्याचं रेल्वेचं म्हणणं आहे.
 
मिती या घटनेची कारण शोधून काढणार असल्याचं सांगितलं.
 
पश्चिम रेल्वे पोलीस आयुक्तांनी सांगितलं की, "तो (चेतन सिंह) आजारी होता. यात त्याचा संयम सुटला. आधी त्यानं टिकारामाला मारलं, नंतर ज्याला पाहिलं त्याला मारलं."
 
यासोबत या घटनेपूर्वी कोणत्याही प्रकारचा वाद झाला नसल्याचं रेल्वेनं म्हटलंय.
 
चेतन सिंह सोबत ट्रेनमध्ये उपस्थित असलेले त्यांचे सहकारी घनश्याम आचार्य यांनी सांगितलं की, गोळीबार करण्यापूर्वी ते मला आपली प्रकृती ठीक नसल्याचं बोलले होते.
 
सत्यशोधन समिती
झिकरुल्लाह यांनी या गोळीबाराशी संबधीत सोशल मीडियावर शेअर होत असलेल्या व्हीडिओचा उल्लेख करत संताप व्यक्त केलाय आणि त्याचसोबत सांगितलं की हे आरपीएफचं काम नाहीय.
 
बीबीसी या व्हीडिओच्या सत्यतेची पुष्टी करत नाही.
 
मात्र, याबाबत पश्चिम रेल्वेच्या प्रवक्त्याशी बोलून सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पश्चिम रेल्वेच्या प्रवक्त्त्यांनीही अशा व्हीडिओची सत्यतेची पुष्टी करणाया नकार दिला आहे.
 
ते सांगतात, "पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि आम्ही एक उच्चस्तरीय फॅक्ट फाइंडिंग कमिटी स्थापन केली आहे.यामध्ये बारकाईनं तपास केला जात आहे.तपासानंतर अहवाल सादर केला जाईल."
 
गंभीर राजकीय आरोप
व्हीडिओमध्ये आरोपी कॉन्स्टेबल चेतन हा राजकीय घोषणा देत असल्याचा दावा केला जात आहे. त्यावरून या घटनेला आता द्वेषपूर्ण हिंसाचारशी जोडलं जात आहे. मात्र, या घटनेपूर्वी कोणताही वाद झाला नसल्याचं रेल्वेचं म्हणणं आहे.
 
राष्ट्रीय जनता दलाचे राज्यसभा खासदार मनोज झा यांनी ट्विट करून आरोप केला की, आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंग यांना मानसिक आजार असू शकतो. मानसिक आजार समाजात मोठ्या प्रमाणात फोफावत असल्याचं त्यांनी म्हटलं.
 
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ही घटना म्हणजे सत्तेच्या लालसेपोटी समाजात द्वेष पसरविण्याचा परिणाम असल्याचं म्हटलं आहे. खरगे यांनी ट्वीट करत सरकारवर निशाणा साधला आहे.
 
काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी एका ट्वीटमध्ये आरोप केला आहे की, आरपीएफ कॉन्स्टेबलनं केलेली हत्या ही फूट आणि फुटीरतेच्या वातावरणाचा परिणाम आहे.
 
पीडित कुटुंबाला मदत
पश्चिम रेल्वेच्या प्रवक्त्यानं बीबीसीला सांगितलं की, रेल्वे गोळीबाराच्या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची भरपाई दिली जात आहे.
 
मात्र, ही बातमी लिहून होईपर्यंत असगरचा दुसरा भाऊ मोहम्मद सनाउल्ला यानं बीबीसीला सांगितलं की, त्यांना नुकसानभरपाईबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
 
दुसरीकडे, मधुबनी जिल्हा प्रशासनसुद्धा असगरच्या परिवाराला आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न करत आहे. मधुबनी जिल्हा जनसंपर्क अधिकारी परिमल कुमार यांनी बीबीसीला सांगितलं की, "या कुटुंबाला राज्य सरकारकडून कोणत्या प्रकारे मदत देता येईलं, त्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे."
 
सोमवारी (31 जुलै) सायंकाळी मधुबनी जिल्हा प्रशासनाला या घटनेची माहिती देण्यात आली.
 
मधुबनीचे जिल्हा दंडाधिकारी अरविंद कुमार वर्मा यांनी बीबीसीला सांगितलं की,"कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूनं शोकाकुल वातावरण आहे. त्यामुळं कुटुंब आणि गावकऱ्यांचं सांत्वन करण्यासाठी काही अधिकाऱ्यांनाही गावात पाठवण्यात आलं आहे."