गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : गुरूवार, 11 जुलै 2024 (09:46 IST)

भारतात बाबा आणि गुरूंना एवढी लोकप्रियता का मिळते?

jap
“मी खाली पडले आणि माझ्या अंगावर आणखी वीसजण येऊन पडले. मी गुदमरून गेले, माझ्या छातीतली हाडं जणू तुटल्यासारखं मला जाणवत होतं,” भगवान देवी हॉस्पिटलमधल्या बेडवरूनच मीडियाशी संवाद साधतात.
 
त्या आणि त्यांच्यासारखे 2,00,000 जण 2 जुलै 2024 रोजी उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये भोले बाबा नामक स्वयंघोषित धार्मिक गुरूच्या ‘सत्संग’साठी जमले होते.
 
पण तिथे चेंगराचेंगरी झाली, ज्यात 121 जणांचा मृत्यू झाला. मोठ्या संख्येनं यात महिलांचा समावेश होता.
 
ज्या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन झालं, तिथे एवढी गर्दी कशी जमा झाली आअणि नेमकं काय घडलं, याची पोलीस चौकशी करत आहेत.
 
हा सत्संग ज्यांनी आयोजित केला, ते स्वयंघोषित धार्मिक गुरू भोले बाबा उर्फ नारायण साकार उर्फ सूरजपाल जाटव आधी पेशानं पोलीस काँस्टेबल होते. घडल्या प्रकारावर त्यांनी दुःख व्यक्त केलं आहे.
 
भोले बाबांसारखे अनेक स्वयंघोषित गुरू गेल्या काही वर्षांत भारतात लोकप्रिय झाले आहेत आणि भाविक डोळे बंद करून या गुरूंवर श्रद्धा ठेवताना दिसतात. हाथरसमध्येही हे दिसून आलं.
 
“मी नशीबवान नाही, कमनशिबी आहे. मी इथे गेले असते तर माझ्या देवाच्या उपस्थितीत मेले असते आणि मला स्वर्ग गाठता आला असता,” हाथरसमधील एक महिला पत्रकारांना हे सांगत असतानाचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
 
या चेंगराचेंगरीत मारल्या गेलेल्या सावित्री देवींचा मुलगा अजय सिंग प्रश्न विचारतो, “आम्ही यासाठी बाबांना कसं जबाबदार धरणार? जे घडलं ते बाबा गेल्यानंतर घडलं आहे. त्यांनी लोकांना सांगितलं होतं की गर्दी करू नका, घरी जा.”
 
जागतिक समस्या
एखाद्या धार्मिक समारंभादरम्यान अशी दुर्घटना होण्याची ही पहिलीच वेळ नाही. महाराष्ट्रात मांढरदेवी यात्रेदरम्यानची दुर्घटनाही तुम्हाला आठवत असेल.
 
अमृतसर येथे 2018 साली दसऱ्याच्या सोहळ्यादरम्यान रेल्वे ट्रॅकवर जमलेल्या गर्दीला ट्रेनची धडक बसल्यानं 61 जणांचा मृत्यू झाला होतात.
 
अशी गर्दी जमा होणं किंवा एखाद्या गुरूच्या मागे भाविक आंधळेपणानं जाणं हे फक्त भारतापुरतं मर्यादित नाही.
 
गेल्या वर्षी केनियामध्ये धर्मगुरूनं केलेलं उपवासाचं आवाहन 47 जणांच्या जीवावर बेतलं होतं..
 
अमेरिका आणि ब्रिटनसारख्या देशांतही अशा घटना घडल्या आहेत, जिथे एखाद्या पंथाच्या किंवा स्वयंघोषित धार्मिक गुरूच्या अनुयायांना भयानक घटनांचा सामना करावा लागला.
 
धार्मिक विषयांवरचे तज्ज्ञ आणि रिलीजन वर्ल्ड या संस्थेचे संस्थापक भव्य श्रीवास्तव सांगतात, “लोकांना चमत्कारावर किंवा सुपरपॉवरवर विश्वास ठेवायला आवडतं. त्यामुळेच सुपरहिरो फिल्म्सना एवढा प्रतिसाद मिळतो.”
 
भारतासारख्या समाजात स्वयंघोषित गुरूंना सोशल मीडियावर एवढी प्रसिद्धी का मिळते आणि ते एवढे प्रभावी का ठरतात, याविषयी भव्य सांगतात,
 
“भारतात, विशेषतः हिंदू धर्मात अवतार आणि पुनर्जन्म अशा गोष्टींवर विश्वास ठेवला जातो. राम आणि कृष्णासारखे देव मानवाच्या रूपात जन्म घेतात असं मानलं जातं. तसंच सर्वसामान्य माणसानं एखादी तपश्चर्या केली तर तो किंवा ती देवपदाला पोहोचू शकतात अशीही मान्यता आहे. त्यामुळेच स्वतःला ईश्वराचा अवतार मानणाऱ्या गुरू आणि बाबांना एवढी सहज मान्यता मिळताना दिसते.”
 
समाजशास्त्रज्ञ दिपांकर गुप्ता सांगतात, “हिंदू धर्म सांगतो की तुम्ही एकटं घरीच प्रार्थना केली तरी मोक्ष मिळवू शकता. इतर काही धर्मांतल्या कम्युनियनसारखे औपचारिक सामूहिक प्रार्थनेचे सोहळे होत नाहीत. पण लोकांना एका समाजाचा भाग असायला आवडतं, त्यामुळे ते एखाद्या गुरू किंवा बाबांची सेवा करू लागतात. त्यातून त्यांना एक ओळख मिळवायची असते.”
 
आस्थेपेक्षा निष्ठा मोठी
“एखाद्या गुरू किंवा बाबावर तुम्ही शंका घेतली, प्रश्न विचारले तर त्यांचे अनुयायी असलेला समाज तुम्हाला वाळीत टाकू शकतो,” असं भवदीप कांग सांगतात. भवदीप यांनी 'स्टोरीज ऑफ इंडियाज लीडिंग बाबाज' नावाचं पुस्तकही लिहिलं आहे.
 
त्या पुढे सांगतात, “तुम्ही एकदा अशा माणसाचं श्रेष्ठत्व मान्य केलंत, की तुमचं कुटुंब, मित्रपरीवार आणि प्रियजनांपेक्षाही तो गुरू वरचा मानावा लागतो.”
 
अशा धार्मिक, आध्यात्मिक गुरूंची भारतात कमतरता नाही. ओशो रजनीश यांचे अनुयायी जगभरात पसरले होते. सत्य साई बाबा यांच्या अनुयायांमध्ये अनेक प्रसिद्ध व्यक्ती, राजकारणी आणि सैन्यअधिकाऱ्यांचा समावेश होता.
 
सत्ता आणि प्रसिद्धीसोबत असं जवळचं नातं असल्यानं असे स्वयंघोषित बाबा स्वतःला सर्वश्रेष्ठ किंवा अजिंक्य समजू लागतात. काहीजण अपराधाकडे झुकतात. याआधीही काही बाबांवर बलात्कार आणि खुनासारखे आरोप लागले होते.
 
2019 पासून फरार असलेला आणि बलात्काराच्या आरोपासाठी वाँटेड असलेला वादग्रस्त बाबा नित्यानंद यानं तर 'युनायटेड स्टेट्‍स ऑफ कैलासा' नामक काल्पनिक देशच स्थापन केला.
 
लोक बाबा आणि गुरूंमागे का धावतात
अशा काही घटना घडल्यावरही अनेकजण स्वयंघोषित बाबा, गुरू, स्वामींच्या मागे जाताना दिसतात. कारण रोजच्या जगण्यातल्या कुठल्याही समस्यांपासून हे बाबा लोकांचं मन दुसरीकडे वळवतात.
 
भक्तांच्या वैयक्तिक आयुष्यातले ताणतणाव आणि अडथळे दूर करण्यासाठी बाबा चमत्कार किंवा उपाय करण्याचा दावा करतात.
 
“जागतिकीकरणानंतरचा काळ पाहिला तर जगाला अनेक युद्ध आणि आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला आहे. अशा कुठल्याही संकटात लोकांना सरकारऐवजी देवाची आठवण आधी येते,” भव्य श्रीवास्तव नमूद करतात.
 
ते सांगतात, “लोकांना एकटं वाटत असतं आणि त्यांना आपल्या सोबत कुणीतरी आहे अशी जाणीव दिलासा देते. त्यामुळे आधुनिक आणि शहरी गुरूंची संख्या वाढली आहे आणि त्यातल्या काहींना जगभरात पाठीराखे मिळाले आहेत.”
 
फक्त गरीब आणि अशिक्षित लोकच बाबांच्या मागे जातात असं नाही. दिपांकर गुप्ता सांगतात की जेव्हा एखाद्या अर्थव्यवस्थेत संक्रमणाचा काळ असतो तेव्हा आर्थिक अस्थिरतेमुळे लोकांना सगळं संपल्यासारखं वाटू लागतं. ही परिस्थिती त्यांना बाबा, बुवांकडे जाण्यासाठी प्रेरीत करते.
 
“1980च्या दशकात अमेरिकेत रोनाल्ड रेगन यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या काळात टीव्हीवरचे इव्हँजेलिस्ट्स (धर्मप्रचारक) बरेच लोकप्रिय झाले. हा तो काळ होता जेव्हा अमेरिकन अर्थव्यवस्था नव-उदारमतवादाकडे वाटचाल करत होती,” असं उदाहरण दिपांकर गुप्ता देतात.
 
विकसनशील देशांमधले बहुतांश स्वयंघोषित गुरू जीवनाविषयी सल्ला, उपचार किंवा समुपदेशन देतात. आपल्याकडे काही जादुई किंवा दैवी शक्ती असल्याचा दावा करतात.
 
यातले काहीजण एकीकडे सामाजिक कार्यही करतात, मग ते समाजातल्या असमानतेवर बोलणं असो वा दारुबंदीचा प्रसार किंवा वनीकरण. या गोष्टीही लोकांना आकर्षित करून घेतात.
 
महिला बुवा-बाबांना का बळी पडतात?
“महिला अशा बाबा आणि गुरूंना बळी पडण्याची शक्यता असते कारण हे बाबा बायकांना लक्ष्य करतात,” असं हरिश वानखेडे सांगतात. वानखेडे दिल्लीतच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात प्राध्यापक आहेत आणि धर्मनिरपेक्षता, राजकीय सिद्धांत आणि सामाजिक न्याय या विषयांतले तज्ज्ञ आहेत.
 
“एरवी सामाजिक आणि राजकीय बाबतीत पुरुषांचं वर्चस्व दिसून येतं, पण धार्मिक प्रथा आणि परंपरा सांभाळण्याची जबाबदारी प्रामुख्यानं महिलांवर येऊन पडते. बहुतांश कुटुंबात पुरुष बाहेर कामासाठी जातात, पैसे कमवतात पण घर चालवणं ही बायकांची जबाबदारी मानली जाते.”
 
भव्य श्रीवास्तव सांगतात, “उत्तर भारतात हे प्रामुख्यानं दिसून येतं, कारण तिथे पितृसत्ताक व्यवस्था अधिक बळकट आहे. अर्थात दक्षिण भारतातही अशा प्रथा आहेत.
 
“खरंतर बहुतांश धर्मांत महिलांना दुय्यम दर्जा दिला जातो. त्यामुळे काही महिला अशा कार्यक्रमांना जातात कारण त्यांना तिथे पुरुषांच्या बरोबरीची वागणूक मिळत असल्यासारखं वाटतं किंवा मानसिक त्रासातून सुटका झाल्यासारखं वाटतं.”
 
त्यामुळे महिला अशा बाबांच्या आहारी जायची शक्यता जास्त असेल. पण हे इतर शोषित गटांनाही लागू होतं,” असं ते अधोरेखित करतात.
खरंतर गेल्या एक दीड शतकात भारतात अनेक चळवळी झाल्या ज्यांना सामाजिक प्रबोधनाचे प्रयत्न केले. लोकांना चुकीच्या प्रथा, गैरसमज आणि चुकीच्या धार्मिक धारणांविषयी जाणीव करून दिली. सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणांनी विज्ञानवादी विचार आणला. मग अशी परिस्थिती का उद्भवली?
 
हरिश सांगतात, “आपण उपग्रह आकाशात सोडतो, पण त्याआधी त्याची पुजा करतो. हे भारतातच घडू शकतं. वैज्ञानिक प्रगती झाली तरी आपण काही प्रथा आणि भीतीखाली वावरतो. त्यातून अशा गोष्टी घडतात.”
 
अशी टोकाची धार्मिकता आणि बाबा-बुवा किंवा स्वयंघोषित गुरूंमागे धावणं जगभरातच वाढताना दिसत आहे. प्यू रिसर्चच्या अहवालानुसार अधिकाधिक लोक कुठल्या ना कुठल्या धर्माकडे वळण्याचं प्रमाण वाढलं आहे.
 
म्हणजे सगळं संपलं आहे, असंही नाही. भव्य श्रीवास्तव आठवण करून देतात, “धर्म ही सतत बदलत जाणारी गोष्ट आहे कारण लोक रोज त्याचं पालन करतात. त्यांच्याच हातात खरी ताकद असते. आसाराम बापू आणि बाबा राम रहीम यांना कोणी उघड केलं? अशा भक्तांनी ज्यांच्या विश्वासाला तडा गेला होता.”