मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2023 (23:39 IST)

मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान भाजपसाठी पुन्हा हिरो ठरणार का?

मध्य प्रदेशच्या सिहोर जिल्ह्यातील सलकनपूर बुधनी विधानसभा मतदारसंघात येतं. याठिकाणी विंध्यवासिनी बीजासन देवी सिद्धपीठ आणि मंदिर आहे.
ह मंदिर डोंगरावर असून खाली एक हेलिपॅड तयार करण्यात आलं आहे. त्याठिकाणी पोलिस आणि सरकारी फौजफाटा तैनात आहे.
 
प्रचंड आवाज करत आणि धूळ उडवत एक हेलिकॉप्टर त्याठिकाणी पोहोचलं.
 
या हेलिकॉप्टरमधून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान कुटुंबासह आले होते. त्यांनी तिथूनच विंध्यवासिनी बीजासन देवीला नमस्कार केला.
 
हे त्यांच्या कुलदैवताचं मंदिर आहे. बुधनीमध्ये रोड शो असल्यानं हा दिवस त्यांच्यासाठी खास आहे. कारण बुधनी त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमीही राहिली आहे.
 
इथून जवळच रेहटी तहसील आहे. त्याठिकाणी दोन रथ त्यांची वाट पाहत आहेत. कुटुंबासह त्या रथावरून ते बुधनीकडं निघाले.
 
रस्त्यात ठिकठिकाणी लोक त्यांच्या स्वागतासाठी उभे आहेत. शिवराजसिंह चौहान सर्वात दीर्घकाळ राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. 2005 पासून ते चार वेळा मुख्यमंत्री बनले आहेत.
 
2018 मध्ये त्यांना बहुमत मिळालं नाही तर काँग्रेसच्या कमलनाथ यांनी सत्ता हाती घेतली. पण दोन वर्षांनी म्हणजे 2020 मध्ये चौहान पुन्हा मुख्यमंत्री बनले.
 
बुधनीमधून त्यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. ते पाच वेळा विदिशामधून खासदारही होते. पण 2006 पासून ते पुन्हा बुधनीमधून निवडणूक जिंकत आहेत.
 
सध्या बुधनीमध्ये पुन्हा प्रचाराची धूम आहे.
 
यावेळची लढाई वेगळी
यावेळची लढाई वेगळ्या अर्थानं रंजक आहे. कारण शिवराजसिंह चौहान सर्वात दीर्घकाळ मध्य प्रदेशचे मुख्यंत्री राहिलेले असूनही यावेळी भाजपनं त्यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार जाहीर केलेलं नाही.
 
मला त्यांची मुलाखत घेण्यासाठी रात्री आठच्या सुमारास रथामध्ये बोलावलं.
 
रोड शो संपवून रात्री एक वाजेपर्यंत इंदूरला जायचं असल्याचं त्यांनी सांगितलं. तिथं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर त्यांची बैठक होती. एवढ्या प्रचारानंतरही ते थकले नव्हते.
 
अमित शाहांचा विषय निघाला तर त्यांनी भोपाळमध्ये पत्रकारांना दिलेलं एक उत्तर आठवलं. भाजपचा विजय झाला तर मुख्यमंत्री कोण होणार, हे संघटना ठरवेल असं ते म्हणाले होते.
 
आम्ही शिवराज सिंह चौहान यांना याबाबत विचारलं. ते म्हणाले, "आम्ही एका मिशनवर आहोत. ते म्हणजे वैभवशाली, गौरवशाली, संपन्न, समृद्ध भारताची निर्मिती. त्यामुळं आम्ही काय करायचं हे आमची संघटना ठरवते. म्हणून कोण कुठं राहणार याची चिंता आम्हाला नसते. आमच्या मनातही तसं येत नाही. फक्त चांगलं काम करण्याचा विचार आम्ही करतो."
 
तेवढ्यात काही लोक आले तर शिवराजसिंह चौहान त्यांना भेटायला गेले.
 
माझ्या मनात हा प्रश्न डोकावत राहिला, की मध्य प्रदेशात शिवराज यांच्या सारख्या नेत्याला भारतीय जनता पक्ष बाजूला का सारत आहे?
 
लाडली बहना योजनेचा परिणाम
तज्ज्ञांच्या मते, भाजप वेळोवेळी नेतृत्व बदलतं, त्यामुळं चौहान यांनीही मानसिकदृष्ट्या तयार राहावं.
 
ज्येष्ठ पत्रकार रमेश शर्मा यांनी राज्याचं राजकारण जवळून पाहिलंय. ते म्हणाले की,"शिवराज यांची राज्यावर पकड आहे यात शंका नाही. पण भाजपचं कॅडर काम करत आहे, हेही तेवढंच खरं."
 
एकेकाळी उमा भारती सर्वात मोठा चेहरा होत्या. तरी भाजपनं वेगळा निर्णय घेत चौहान यांना सीएम बनवलं तेव्हा कार्यकर्त्यांनी ते स्वीकारलं. यावेळीही तसंच काही झालं तर कार्यकर्ते स्वीकारतीलच," असंही ते म्हणाले.
 
महाराष्ट्रात फडणवीस आणि हरियाणात खट्टर यांचं उदाहरणही त्यांनी दिलं.
 
तज्ज्ञांच्या मते, चौहान त्यांच्या योजनांमुळं जास्त लोकप्रिय आहेत. विशेषतः महिलांसाठीच्या योजनांसाठी. मुख्यमंत्री असताना त्यांनी महिलांना केंद्रस्थानी ठेवत अनेक योजना सुरू केल्या. लाडली लक्ष्मी आणि लाडली बहना या त्या योजना. यामुळं महिलांमध्ये त्यांची लोकप्रियता आणखी वाढली.
 
लाडली लक्ष्मी योजना आधीपासून होती पण निवडणुकांपूर्वी लाडली बहना योजना सुरू केली. त्यामुळं विरोधकांनी त्यांच्यावर टीका सुरू केली.
 
काँग्रेस प्रवक्ते केके मिश्रा यांनी त्यांना निवडणुकीच्या वेळीच बहिणी का आठवल्या, असा सवाल उपस्थित केला.
 
लाडली बहना योजना किती उपयोगी ठरली याचा आढावा अद्याप घेण्यात आलेला नाही.
 
रेहटीमध्ये मुस्लीम वस्तीत आम्हाला सकिना बी भेटल्या. त्या पसमांदा समुदायाच्या आहेत. त्यांना आवास योजनेतून घर मिळालं आहे.
 
"मामांनी सर्वकाही दिलं आहे. घर दिलं लाडली बहनाचे पैसे दिले, लाडली लक्ष्मी योजनेतून शिक्षणासाठी मदत केली. नळ, मोफत धान्य असं सगळंकाही करत आहेत," असं त्या म्हणाल्या.
 
लांबून आमचं बोलणं लांबून ऐकणाऱ्या सज्जो बी देखील म्हणाल्या, "शिवराज चौहान आमचे भाऊ आहेत, आमच्या मुलांचे मामा आहेत."
 
अनेक दशकांपासून इथं काम करत असल्यानं लोकांशी त्यांची घट्ट नाळ जुळली आहे.
 
त्यांनी योजना सुरू केल्याच पण स्वतः त्यांच्या अंमलबजावणीकडं लक्ष दिलं. त्यामुळं महिलांचं जीवन बदललं असून या योजना 'गेम चेंजर' ठरतील असा त्यांचा दावा आहे.
 
'पाँव-पाँव वाले भय्या' नाव कसं पडलं?
शिवराजसिंह चौहान यांनी बालपणीच्या आठवणीही जागवल्या.
 
त्यांच्या जुन्या मित्रांपैकी एक मानसिंह पवार सिहोरमध्ये राहतात. त्यांनीही चौहान यांच्याबरोबरच्या आठवणी सांगितल्या.
 
बुधनीच्या शाहगंजमध्ये आम्हाला प्रचारात व्यस्त त्यांचे जुने सहकारी प्रकाश पाण्डेय भेटले.
 
"शिवराज यांनी बुधनीत बालपणापासून संघर्ष केला. आंदोलन केलं. संपूर्ण मतदारसंघ त्यांनी पायी चालत दौरा केला. पदयात्रा केल्या. सुरुवातीच्या बुधनी विधानसभेत तर ते 90 टक्के लोकांना प्रत्यक्ष ओळखत होते," असं ते म्हणाले.
 
शिवराज सिंह चौहान यांनी आमच्याशी बोलताना सांगितलं की, बुधनी आणि सिहोर आधी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. त्यांना सुरुवातीला याठिकाणी भाजपची शक्ती वाढवण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली.
 
"मी गावागावात पायी फिरलो होतो. त्यामुळं मला 'पाँव पाँव वाले भय्या'असं म्हटलं जाऊ लागलं," असं चौहान म्हणाले.
 
टीव्ही अभिनेत्याचे आव्हान
बुधनीत भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. इथं एकतर्फी लढत असल्याचं मत, अभिषेक भार्गव या कार्यकर्त्यानं व्यक्त केलं. शिवराज सिंह चौहान उमेदवारी दाखल करून इतर भागांत प्रचाराला जातात. इथली जबाबदारी कार्यकर्त्यांवरच असते, असंही अभिषेक म्हणाले.
 
काँग्रेसनं यावेळी बुधनीमधून एक टीव्ही अभिनेते पंडित विक्रम मस्ताल शर्मा यांना शिवराज सिंह चौहान यांच्या विरोधाच तिकिट दिलंय. त्यांनी नुकतीच रामायणावर आधारित एका मालिकेत हनुमानाची भूमिका केली आहे.
 
शर्मा बुधनीतीलच रहिवासी असून राजकारणात त्यांचं हे पहिलं पाऊल आहे.
 
शिवराजसिंह चौहान यांच्या रोड शोनंतर आम्ही लगेच शर्मा यांना भेटायला त्यांच्या घरी गेलो.
 
ते म्हणाले की, "शिवराजसिंह चौहान यांना सारख्या यात्रा काढाव्या लागत आहेत. दर 5-10 किलोमीटरवर त्यांना सभा घ्याव्या लागत आहेत.
 
“पूर्वी असं नव्हतं, गेल्या काही महिन्यांत असं होत आहे. चौहान यांनी प्रचाराला बुधनी येणार नाही असं म्हटलं होतं. पण सत्ताविरोधी लाटेमुळं त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत."
 
 
महिलांसाठी सुरू केलेल्या योजना प्रसिद्धीसाठीचा स्टंट असल्याचा आरोप शर्मा यांनी केला. "मोदी इथं येतात, सभा घेतात. मोदी या योजनांवर का बोलत नाहीत. ते लोकांच्या मनात मोदी आहेत, असं म्हणतात. मग चौहान कुठं आहेत,"असा सवाल त्यांनी केला.
 
काँग्रेस कार्यकर्ते संतोष वर्मा यावेळी बुधनीत अटीतटीचा सामना होईल असा दावा करत आहेत.
 
शिवराज सिंह चौहान यांच्यासमोर अनेक अडचणी आहेत. पण पक्षातील अंतर्गत कलह त्यापैकी सर्वात मोठी अडचण आहे.
 
यावर चौहान म्हणाले की,"हे सगळ्या पक्षात स्वाभाविकपणे असतं. पण भाजप कार्यकर्ते विचारासाठी काम करतात. त्यामुळं असे मतभेद फार काळ टिकत नाही."
 
पक्षाची भूमिका पाहता शिवराज यांच्यासाठीदेखील ही निवडणूक महत्त्वाची आहे. कारण नेतृत्व बदलाच्या चर्चांमध्ये सध्या तरी मध्यप्रदेशात ते एकमेव 'लोकनेते' आहेत. त्यामुळं निकालांचा परिणाम त्यांच्या राजकीय भवितव्यावरही होणार हे नक्की.
 
 





















Published By- Priya Dixit