मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 5 फेब्रुवारी 2022 (16:01 IST)

योगी आदित्यनाथ प्रतिज्ञापत्र : कानात 49 हजारांची सोन्याची कुंडलं, 1 लाख रुपयांची रिव्हॉल्व्हर आणि..

अनंत झणाणे
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी गोरखपूर शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
 
उमेदवारी अर्ज दाखल करताना सोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, योगी आदित्यनाथ यांचे सध्याचे वार्षिक उत्पन्न 13 लाख रुपये आहे, ते 2016-17 मध्ये 8.4 लाख रुपये होते.
 
पुढील वर्षी म्हणजे 2017-18 मध्ये त्यांचे उत्पन्न वाढून 14,38,670 रुपये झाले, तर 2019-20 मध्ये त्यांचे उत्पन्न वाढून 15.69 लाख रुपये झाले.
निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरताना प्रत्येक उमेदवाराला त्याचे उत्पन्न, स्थावर-जंगम मालमत्ता, फौजदारी खटल्याची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागते. ही माहिती निवडणूक आयोगाच्या KYC-EC अॅपवरही सार्वजनिकरीत्या उपलब्ध असते.
 
कोणताही गुन्हा दाखल नाही
निवडणूक आयोगाला सादर केलेल्या आपल्या प्रतिज्ञापत्रात योगी आदित्यनाथ यांनी आपल्याविरुद्ध कोणताही फौजदारी खटला प्रलंबित नाही किंवा त्यांना कोणत्याही प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेले नाही, असे जाहीर केले आहे.
 
2014 साली गोरखपूर लोकसभा निवडणुकीवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर पाच गुन्हेगारी खटले होते. त्यातील तीन खटले महाराजगंज येथील होते. ज्यामध्ये त्याच्यावर एका प्रकरणात दंगा भडकावणे, हत्येचा प्रयत्न आणि चिथावणीखोर भाषणाचा आरोप होता.
महाराजगंज मध्येच त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्यामध्ये दंगा भडकावणे आणि प्रक्षोभक भाषणे देण्याव्यतिरिक्त त्याच्यावर खुनाचाही आरोप होता.
 
महाराजगंजमध्ये दाखल झालेल्या तिसऱ्या गुन्ह्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप होता.
 
योगी आदित्यनाथ यांच्यावर गोरखपूरमध्ये दोन गुन्हे दाखल होते. यामध्ये त्यांच्यावर प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप करण्यात आला होता.
 
शुक्रवारी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार ही सर्व प्रकरणे संपली आहेत.
 
योगींच्या जंगम मालमत्तेचा तपशील काय आहे?
प्रतिज्ञापत्रात सादर केल्यानुसार योगी आदित्यनाथ यांच्याकडे एक लाख रुपये रोख आहेत.
 
दिल्ली येथील संसद मार्ग स्टेट बँकेत त्यांच्या खात्यात 25 लाख 99 हजार रुपये जमा आहेत. तर गोरखपूरच्या पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यात 4 लाख 32 हजार रुपये आहेत.
 
स्टेट बँकेमध्ये त्यांच्या तीन एफडी आहेत. ज्यांचे मूल्य 8 लाख 37 हजार आहे. गोरखपूरमधील पंजाब नॅशनल बँकेत चार एफडी आहेत, ज्यांची किंमत 7 लाख 12 हजार रुपये आहे.
 
गोरखपूरमध्ये स्टेट बँकेच्या खात्यात 7900 रुपये जमा आहेत. तर लखनऊ मधील स्टेट बँकेत 67 लाख 85 हजार रुपये जमा आहेत. दिल्लीच्या संसद मार्गावरील पोस्ट ऑफिसच्या खात्यात 35 लाख 24 हजार रुपये जमा आहेत. गोरखपूरच्या पोस्ट ऑफिस खात्यात 2 लाख 33 हजार रुपये जमा आहेत.
 
योगी आदित्यनाथ यांच्या कानात 20 ग्रॅम सोन्याची कुंडलं घालतात. ज्याची किंमत 49,000 रुपये आहे. त्यांच्याकडे सोन्याच्या चेनची रुद्राक्षाची माळ आहे, त्याची किंमत 20 हजार रुपये आहे आणि ते 12,000 रुपये किमतीचा सॅमसंग फोन वापरतात.
 
योगी यांच्याकडे शस्त्र आहे का?
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे एक रिव्हॉल्व्हर आहे, ज्याची एक लाख रुपये किंमत आहे. मुख्यमंत्र्यांकडे 80 हजार रुपयांची रायफलही आहे.
 
प्रतिज्ञापत्रानुसार सर्व स्थावर आणि जंगम मालमत्ता एक कोटी 54 लाख 94 हजार रुपयांची सांगण्यात आली आहे.
योगी आदित्यनाथ यांच्याकडे कोणतीही शेती किंवा बिगरशेती मालमत्ता नाही. तर त्यांच्यावर कोणतेही कर्ज नाही.
 
योगी आदित्यनाथ यांनी 1992 मध्ये पौडी गढवालच्या श्रीनगर येथील एचएन बहुगुणा विद्यापीठातून बीएससी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.