शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Modified: सोमवार, 4 एप्रिल 2022 (08:23 IST)

चैत्र गौरीचे गाणे Chaitra Gauri Song

गाई कोकीळ भूपाळी सखे तुझ्या स्वागताला
इंद्रधनूचे तोरण शोभे तुझ्या गाभार्‍यायाला
 
घाल रात्रीचे काजळ, माळ वेणीत चांदणे
चंद्रकोरीची काकणे, दंवबिंदूंची पैंजणे
 
सोनसळीचा पदर, सांजरंगाची पैठणी
गर्भरेशमी आभाळशेला पांघर साजणी
 
सूर्यकिरणांनी रेख भाळी कुंकवाची चिरी
गळा नक्षत्रमण्यांची माळ खुलू दे साजिरी
 
गो-या तळव्याला लाव चैत्रपालवीची मेंदी
कर आकाशगंगेला तुझ्या भांगातली बिंदी
 
रूपलावण्य हे तुझे, जशी मदनाची रती
ओठांवरी उगवती, गालांवरी मावळती
 
जाईजुईचा मांडव, त्यात चंदनाचा झूला
ये ग सये चैत्रगौरी, सख्या झुलविती तुला