सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Updated : सोमवार, 4 एप्रिल 2022 (08:27 IST)

Chaitra Gauri decoration ideas : चैत्रगौरी आरास

चैत्राच्या महिन्यात वसंत ऋतूची चाहूल लागते आणि आगमन होते चैत्रगौरीचे.या वसंत ऋतूत निसर्ग देखील बहरून नवे आयुष्य, नव्या उमेदीने जगण्याचा संकेत देते. चैत्र मासात शुक्ल पक्षातील तृतीयेला चैत्रगौरी म्हणजे अन्नपूर्णा देवीची  स्थापना केली जाते. या दिवशी चैत्रगौर आपल्या माहेरी येते आणि अवघ्या संपूर्ण महिनाभर म्हणजे अक्षय तृतीया पर्यंत माहेरी वास्तव्यास असते. 
 
गौर म्हणजे गौरी हे देवी पार्वतीचे रूप आहे. भारताच्या काही भागात उपवयीन मुली चांगला जोडीदार मिळावा या साठी चैत्र गौरीचे व्रत धरतात. राजस्थानात या चैत्र गौरीला गणगौर नावाने ओळखले जाते. तर आंध्रप्रदेशात 'सौभाग्य गौरी व्रत' या नावाने चैत्र गौरीची पूजा केली जाते.  
 
हा उत्सव सोहळा गुडीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी पासून सुरु होतो. संपूर्ण महिनाभर चालणाऱ्या या सोहळ्यात सुवासिनी स्त्रिया हळदी-कुंकू सोहळा साजरा करतात या मध्ये सवाष्णींना आपल्या घरात बोलावून त्यांना हळदी कुंकवाचं लेणं देतात. सुवासिनींना कैरीचे पन्हे आणि आंबेडाळ किंवा हरभऱ्याची वाटलेली आणि परतलेली डाळ खाण्यासाठी देतात. ओल्या हरभऱ्यानी सवाष्णींची ओटी भरतात.
 
गुडी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तीजेला चैत्रगौर म्हणजे अन्नपूर्णादेवीला माहेरी बोलावून छोट्या चांदीच्या किंवा पितळ्याच्या पाळण्यात बसवतात. त्यापूर्वी देवीला अंघोळ घालून तिची पूजा करून तिला स्थापिले जाते. नंतर तिला नैवेद्य दाखवतात. देवीपुढे छोट्या गडूमध्ये पाणी ठेवतात. हे पाणी दररोज बदलले जाते. 
 
नंतर महिन्याभरात एका दिवशी देवीचे हळदी-कुंकू केले जाते या साठी सवाष्णींना हळदी कुंकवासाठी बोलावतात. त्यासाठी चैत्र गौरीची आरास केली जाते. 
 
चैत्र गौरीची आरास पानांची, फुलांची, मोत्यांच्या माळांनी, आरास केली जाते. तीन व पाच अशा विषम संख्याच्या पायऱ्या रचून देवीची आरास केली जाते. या पायऱ्यांच्या सर्वात उंच पायरीवर देवीची पाळण्यात स्थापना केली जाते. देवीच्या भोवती सुंदर फुलांनी, झाडाच्या पानांनी, किंवा मोत्याच्या रांगोळ्यांनी सुंदर मांडणी केली जाते.
देवी समोर फळे, खिरापत, करंज्या, लाडू, शेव, चकली,  कैरीचे पन्हे, हरभरे, हरभऱ्याची वाटलेली डाळ ज्याला आंबेडाळ म्हणतात हे ठेवतात. 
 

देवीच्या समोर सुंदर रांगोळी काढली जाते. देवीच्या पुढे चैत्रांगण काढण्याची पद्धत देखील आहे. या चैत्रांगणामध्ये चैत्रगौरीचा पाळणा, गणपती, समई, नाभी, कमळ, कासव, सूर्य, शंख, गोपद्म, चंद्र, सर्प, त्रिशूल, गदा, स्वस्तिक, चक्र, नाग, गरुड, फणी, करंडा, आरसा,मंगळसूत्र, सुवासनीच्या ओटीचे ताट, दारापुढे असलेले तुळशी वृंदावन, ॐ, आंबा, श्रीफळ, उंबर, पिंपळ, असे हे पूजनीय वृक्ष ही हिंदू संस्कृतीची प्रतीके म्हणजे रंगीत रांगोळी भरून हे चैत्रांगण देवीच्या पुढे काढले जाते. या मध्ये प्रत्येक महिन्यात साजरा होणाऱ्या विविध सण व व्रतांचे अंकन रांगोळीच्या माध्यमातून केले जाते. 
 
चैत्रगौरीच्या उत्सवात महिन्याभरात एका दिवशी एका सवाष्णीला जेवायला बोलावतात आणि तिची यथाशक्ती खणानारळाने ओटी भरून तिला वाण देतात. आपल्या घरी किमान पाच बायकांना बोलावून त्यांना आंबेडाळ, करंजी आणि कैरीचे पन्हे खाण्यासाठी देतात. काही घरांमध्ये हळदी कुंकू समारंभाला आलेल्या सवाष्णींचे आणि कुमारिकेचे पाय धुण्याची पद्धत आहे. त्यांचे पाय धुवून त्यांच्या हातावर चंदनाचा लेप लावतात. हळदी कुंकू लावून त्यांची भिजवलेल्या हरभऱ्यानी ओटी भरतात. काही घरात आरास मधून काही शिकवण देण्याचा उपक्रम राबविला जातो. या आरासाच्या माध्यमातून समाजाला काही बोध दिले जाते. 
 
महिनाभर माहेरी पाहुणचार घेऊन अक्षय तृतीयेला गौर पुन्हा सासरी जाण्यासाठी निघते. तिला माहेरून सासरी पाठवताना खीर-कानोला, दहीभात, आंब्याचा रस असा नैवेद्य दाखवतात आणि तिची पाठवणी करतात.  
 
महिन्याभर चालणाऱ्या या हळदी-कुंकूंच्या सोहळ्याच्या माध्यमातून या प्रसंगी सवाष्णी एकमेकींच्या  सुखदुःखाची देवाणघेवाण या चैत्रगौरी पूजनाला सुफळ संपूर्ण करते. चैत्रपालवी प्रमाणे फुलून बहरून स्त्री मन या सोहळ्यानिमित्त आपल्या सौभाग्याचा उन्नतीसाठी हळदी कुंकवाचं लेणं देऊन हा सण आनंदाने आणि हौशीनी साजरा करतात.