गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Updated : बुधवार, 25 मे 2022 (13:30 IST)

आर्यादुर्गा देवी - अध्याय २

Aryadurga Devi
श्री देवी दुर्गा होउनी उपजली । तिने अदभुत गर्जना केली । सर्व मण्डळी भयें थरारली । वृत्रासुर मनी दचकला ॥१॥
 
वृत्रासुर चालला गर्जना ऐकून । काय असें तें घ्यावया जाणून । देवीचें दिव्य रुप पाहून । चकित झाला ते समयी ॥२॥
 
सहस्त्र हात दिसले आकाशीं । व्यापिलें रुप दशदिशीं । जगीं प्रकाशलें दिव्य प्रकाशीं । ऐसें रुप पाहिलें वृत्रासुरें ॥३॥
 
युगांतर समयासी । अग्नी जैसा नाशकरी । तैशापरी वृत्रासुरे । चाल केली दुर्गेवरी ॥४॥
 
सांगता झाला शतनिका प्रति सूत । दुर्गादेवी वृत्तासुरे युद्ध अदभुत । सैन्य जहालें भयचकित । युद्ध समयीं तये स्थळीं ॥५॥
 
ऐशापरि युद्ध आरंभिले । दूर्गेने अति सैन्य संहारिलें ॥ शस्त्रास्त्रें युद्ध कडाडलें ॥ पर्जन्य पडला शस्त्रांचा ॥६॥
 
असुरास्त्रांचा चुरा करुन । अतिहर्षे हास्य करुन । तया हसें आकाश भरुन । सर्व भूमी गडाडली ॥७॥
 
तिच्या हसें मुखांतून । घोरमुखी बहुत देवी उदभवून । असुर सैन्या धरुन । खाऊं लागल्या चरचरां ॥८॥
 
सैन्य नाश झाल्याचें पाहून । सेनापती विहसें अवलोकून । मनी अती क्रुद्ध होऊन । तुटून पडला दुर्गादेवीवरी ॥९॥
 
भद्रकाली देवीने ऐसें जाणून । विहस्ताचें केश धरुन । सुदर्शन चक्र तयावरी चालवून । धडावेगळें केलें तया ॥१०॥
 
महापराक्रमी सेनापती मरतां । दुर्गादेवीने असें जाणतां । चतुरंग सैन्य हळु हळू कापतां । सर्व सैन्यासी मारिलें ॥११॥
 
सर्वा नंद कर्ती सर्व सैन्यातें मारुन । वृत्रासुरावरी गेली चाल करुन । ऐशा महादेवीला वृत्रासुरें पाहून । क्रुद्ध झाला तो ते समयीं ॥१२॥
 
ऐसें दृश्य तयें पाहिलें । वज्रा सम अस्त्र देवी वरी सोडिले । दुर्गेनेही तैसेंचि अस्त्र सोडिलें वर्षाव केला बाणांचा ॥१३॥
 
दुर्गादेवीचे वृत्रासुराबरोबर । युद्ध चाललें महा भयंकर । तैसेंची राहिलें वर्ष शंभर । हरलें नाहीं कोणी ही ॥१४॥
 
अंती सर्व शक्ती एक वटून वृत्रासुराच्या केशांसी धरुन । धरणीवरी तया पाडून । शूलें आणि खडगें मारिलें ॥१५॥
 
ऐशापरी वेत्रवती सुता मारिलें । शीर केलें धडावेगळें । तें वृत्त ब्रह्मादिदेवां कळलें । सर्व आले तये स्थळी ॥१६॥
 
तें दृश्य सर्वानी पाहिलें । आणि दुर्गा देवीची स्तुती करुं लागले । गुरु सम ब्रह्मदेवें सांगितलें । दुर्गादेवीसी तये वेळीं ॥१७॥
 
जय जय दुर्गे माय भवानी । तूचि अससी त्रिकाल ज्ञानी । तुझी निंदा न करी कोणी । रक्षणकर्ती तूं आम्हां ॥१८॥
 
आम्हां सर्वां हांके तूं आलीस धावून । राहे आतां हिमगिरी वरी जाऊन । शत श्रृंग पर्वतावरी वास करुन । मर्दन करी तिथलिया राक्षसांचें ॥१९॥
 
त्या हिमालय पर्वतावर । वास करतील क्रूर असूर । नाम तयाचें शुभ - निशुंभासुर । त्रास देतील सर्व लोकां ॥२०॥
 
महिषासुर नामक दैत्य । सर्वांसी दुःख देयील बहुत । तपोबलें होतील समर्थ । मदोन्मत्त दुरात्मे ॥२१॥
 
त्या सर्वांतें मृत्युरुपें । तूंचि वधिशील साक्षेपें । या कारणी सुखरुपें । राहे माते त्यास्थळीं ॥२२॥
 
ऐशा परी ब्रह्मदेवाची विनंती ऐकून । सांगती झाली दुर्गादेवी तिथें मी राहीन । ऐसें ब्रह्मदेवासीं सांगून । निघती झाली सर्व देवींसह ॥२३॥
 
मग तिथुनी शतश्रृंग पर्वती गेली । सर्व देवीं सह तिथें तप करुं लागली । ऐशापरी ती राहे ज्या स्थळीं । तयाचें नाम असे प्रसिद्ध अजश्रृंग ॥२४॥
 
पक्षराज गरुडें तेंचि अजश्रृंग शिखर । गोकर्णी न्यावया घेवुनी आपुल्या पाठीवर । उड्डाण करितां पक्ष राजेश्वर । शिखर पडलें सागरीं ॥२५॥
 
दुर्गा देवी अजश्रृंगावरी राहिल्यावरुन । नांव पडलें तियेसी आर्या जाण । मग म्हणूं लागले सर्वहिजन । श्री आर्या - दुर्गादेवी तियेसी ॥२६॥
 
इति श्री गोकर्ण पुराणे उत्तर खंडे श्री आर्यादुर्गा देवी महात्म्य
 
वृत्रासुर वधो नाम द्वितीयोध्यायः ।