बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Updated : बुधवार, 25 मे 2022 (13:31 IST)

आर्यादुर्गा देवी - अध्याय ३

Aryadurga Devi
म्हणे शतानिकाप्रति संवर्तक । महिषासुर नामें दैत्य एक । महा बलिष्ट असुनी प्रख्यात । राज्य करिता झाला शोणितपुरी ॥१॥
 
कैकवर्षे तपश्चर्या करुनी । ब्रह्म देवासि घेतला प्रसन्न करोनी । वर मिळविला तया कडूनी । देव गंधर्व मनुष्या हातीं मृत्यू न ये ॥२॥
 
घेउनी आपुल्या चतुरंग सैन्यासी । स्वारी करुनी तिन्ही लोकांसी । छळुनी देव गन्धर्व मनुष्यांसी । नाना परी त्रास देता झाला सर्वांसी ॥३॥
 
महिषासुर मन्त्री धूम्रकेतू नाम्नौ । फिरत असतां एकेदिनीं । तया भेटतां नारदमुनी । नमस्कार करिता झाला तयासी ॥४॥
 
विचारी नारदमुनीसी प्रश्न करुन । काय पाहिलें जगीं नवीन । सांगावें मजला आपण । सर्वज्ञानी नारदमुने ॥५॥
 
धूम्रकेतूसी सांगे नारदमुनी । महिषासुरासम जगीं नसे कोणी । तयाचे राज्यीं काय असे कमी । त्रैलोकीं शूर असे एक तोची ॥६॥
 
पुरुषार्थि महिषासुर असे जगतीं । त्रैलोक्य रक्षक तयासी म्हणती । इन्द्रादि लोकपाल त्याचे दासदासी । कोण विरोध करी तयासी ॥७॥
 
तया राज्यांतील नागरिक आम्हीं । म्हणोनी सांगतों तुज एक बातमी । पाहिलें असें रत्न एक मी । महिषा सुरासी योग्य तें ॥८॥
 
गोकर्ण क्षेत्राजवळी असती । आर्याद्विप नाम तया म्हणती । तया स्थळी जियेची वसती । तेंची स्त्री रत्न सुंदर असे ॥९॥
 
तियेचें आर्यादुर्गा नाम । वध केला वृत्रासुराचा जाण । ती म्हणे मजसम जगीं नसे कोण । ऐशा परी ती आहे जाण ॥१०॥
 
नारदाचें उत्तर ऐकून । गेला महिषासुराजवळी धांवून । धूम्रकेतूसी येतां पाहून । आनंद झाला महिषासुरासी ॥११॥
 
धुम्रकेतूचें वदन पाहून । तू काय पाहिलें असे नवीन । सांगावें मज कथन करुन । विचारता जाहला महिषासुर ॥१२॥
 
धूम्रकेतु सांगे कर जोडून असे एक सुन्दर रत्न । ह्या सिंहासनासि दिसेल शोभून । सांगितलें असे नारद ऋषींनीं ॥१३॥
 
तयाचे ते बोल ऐकून । महिषासुर म्हणे धूम्रकेतु लागून । सांगावें मज स्पष्ट करुन । कैसें रत्न कुठें असे तें ॥१४॥
 
ऐकतां वृत्त विस्तारुन । म्हणे धूम्रकेतु लागून । तुवां तेथें त्वरित जावून । आणावें येथें तये सुन्दरीसी ॥१५॥
 
मजसाठीं तिकडे जाऊन । सत्वर यावें दुर्गेसी घेऊन । तिजसवें विवाह करुन । मी आनंदित होऊं इच्छितों ॥१६॥
 
म्हणें धूम्रकेतूसि जाण । चतुरंग सेना सवें घेऊन । शीघ्रची जावें न लागतां क्षण । आर्याद्वीपासीजाणपां ॥१७॥
 
सैन्य मोठें सवें घेऊन । मन्त्री धूम्रकेतू नीतिज्ञ ॥ आर्याद्वीपावरी जाऊन सैन्य ठेविलें समुद्र तिरीं ॥१८॥
 
आर्या द्वीपीं मग जाऊन ॥ रत्न जडित नजराणा घेऊन । आर्यादुर्गा देवीसमोर ठेऊन । नमस्कार केला तियेषी ॥१९॥
 
धूम्रकेतूनें नमस्कार करितां । देवी सांगे तया बैस आतां । ऐसें तियेचें वचन ऐकतां । उठूनीं बसला धूम्रकेतू ॥२०॥
 
तये स्थळीं स्वस्थ बैसून । तिजसी पाहतां न्याहाळून । महिषासुरासी योग्य असे असें मानून । हलविता जाहला आपुलें शिर ॥३१॥
 
देवीने धूम्रकेतूचें मस्तक पाहिलें । विचारती झाली तूं कोण कां येणें झालें । आणि आतां शिर कां हलविलें । सांग मजला तूं आतां ॥२२॥
 
करितां प्रश्न आर्यादुर्गेने । धूम्रकेतू सांगता झाला नम्रपणें । मी मंत्री धूम्रकेतू नामे । दानवेंद्र महिषासुराचा ॥२३॥
 
ज्याने भू लोक जिंकिलें । तैसेचि स्वर्गलोक जिंकिले । तयाने मज आज्ञापिलें । तुला घेउनी यायला ॥२४॥
 
तूंचि असे अती रुपवती । तुझी असे अती मनोहर दृष्टी । तुला पाहतां मम चित्ती । विचार आला तुजविषयीं ॥२५॥
 
तूंची सुंदर ऐसे पाहूनी । महिषासुरासी तूं योग्य असें मानूनी । तोचि तुजला योग्य असें येतां मनी । हललें मस्तक माझे ॥२६॥
 
तुझें नाम काय आणि कोण । तूंचि असे कुणा स्वाधिन । पुण्यराशी तूं वाटते जाण । सांग मजला सत्वर तूं ॥२७॥
 
महिषासुर जरी असे तेथें । तरी त्याचें मन असे येथें यास्तव तूं यावें मज सवें तेथें । तया राजा पहावया ॥२८॥
 
ज्याची सेवा केली देव पत्नीनीं । तयाचे राजधानीं येऊनी । तयांचे ऐश्वर्य भोगावें तुम्ही । ऐसें वदतां देवी हंसली ॥२९॥
 
दुर्गादेवी म्हणें धूम्रकेतूसी । मी येईन त्याचे राजधानीसी । परी अटी असे एक येण्यासी । तें मान्य करणें भाग असे ॥३०॥
 
देवासुरादिकांनी केली मला मागणी । ते असे सुंदर बलिष्ट आणि सदगुणी । परी मम अट पुरी करुं शकले नाही कोणी । म्हणोनियां गेले परतोनी ॥३१॥
 
अट असे जो मज सवें युद्ध करुनी । जिंकेल मजला युद्धांत जो कोणी । तयाची होईन मी धर्म पत्नी । त्याचे बरोबरी येईन मी ॥३२॥
 
जरी मी यावें महिषासुराचे घरीं । तरीं त्याने यावें लढण्यासी मजबरोबरी । बोलावून आणावें त्यासी येथ सत्वरी । जावून सांगावें तूंची लवकरी ॥३३॥
 
क्रोधें धूम्रकेतू म्हणे आर्यादुर्गेसी । ऐसें न शोभे तुज स्त्रियेसी । तो असे महापराक्रमी जगतासी । तूंची स्त्री अबला अससी ॥३४॥
 
त्रैलोकीं तोची शस्त्र धारी जाण । अस्त्र विद्येंत ही सर्वांत निपुण । दिसे सर्वांत सुंदर रुपवान । तरी तूं वरावें त्यासी सत्वरीं जाण ॥३५॥
 
जरी तूं येत नसशील मजबरोबर । तरी केशांसी धरुनी नेईन सत्वर । ऐसें म्हणोनी पुढें जहाला झरझर । तिला ओढूनी न्यावयासी ॥३५॥
 
धूम्रकेतू पुढें होऊन । न्यावया तिला केशांसी धरुन । ऐसें दृश्य जवळून । देवीच्या दासीने पाहिलें ॥३७॥
 
तांबूल दायिनी दासीने पाहतां । तलवार घेतली आपुल्या हातां । वार केला उचलोनी त्वरितां । धडावेगळें केलें तया ॥३८॥
 
धूम्रकेतूसी दासीनें मारिलें । तें दृश्य भूतनाथानें पाहिलें । आणि त्याच्या सैन्यासी घेरुनी । धरिलें फडशा केला सर्व सैन्याचा ॥३९॥
 
भूतनाथा हातून जे कोणी निसटले । ते महिषासुराजवळी आले । त्यानीं वर्तमान सांगितले । यथासांग सर्वही ॥४०॥
 
धूम्रकेतु दुर्गेसी आणील म्हणून । पण घडलें दुसरेंचि वर्तमान । धुम्रकेतूसी मारल्याचें वृत्त ऐकून महिषासुर संतप्त जहाला मनी ॥४१॥
 
मग विचार करुनी आपुल्या मानसी । तयाने चंड -मुंड सेनापतींसी । सैन्य देऊनी त्यांच्या पाठीशीं आर्याद्वीपीं पाठविलें ॥४२॥
 
शस्त्रास्त्रें घेऊनि आपुल्या बरोबर । जाउनि चंड -मूंड आर्या द्वीपावर । आव्हान केलें युद्धासी आपुल्याबरोबर । तया आर्यादुर्गा देवीसी ॥४३॥
 
बहुमुख अलंकृत देवीने ते पाहून । अनेक हस्तीं विपुल शस्त्रास्त्रें घेऊन । त्याजबरोबरी प्रचंड युद्ध करुन । सर्व सैन्यासह तया दोघां मारिलें ॥४४॥
 
जे कोणी असुर पळुनि गेले । ते महिषासुराजवळी आले । त्यांनी तेथील वृत्त सांगितलें । जैसें घडलें तैसेंचि ॥४५॥
 
वृत्त कळतां क्रुद्ध होउनी महिषासुर । रथी महारथी यज्ञघ्न शुंभ -निशुंभासुर । निशढ शढबाल चतुर्मुख सत्वर । निघाले हविर्भागीं जे पोशिले ॥४६॥
 
सैन्यासह सर्व रथी महारथी । देवीने पाठविले यमपंथी । जे कोणी पळले दुष्टमती । महिषासुराजवळी धावूनी आले ॥४७॥
 
मग पाठविला रक्तासुर । आरंभिलें त्याने युद्ध गंभीर । बसतां वार रक्तासुरावर । रक्त सांडलें अतिशय ॥४८॥
 
रक्तबिंदू पासूनि बनले राक्षस । पाहुनि हंसली आर्यादुर्गा त्यांस । मुखांतुनि प्रगटली करितां हास्य । लंबोदर महाकाली त्या समयीं ॥४९॥
 
प्रगटतां तियेसी आज्ञा केली । करितां आज्ञा अग्नि जिव्हा महाकाली । उदभवित राक्षसापासीं जाऊं लागली । आणि सर्व राक्षसां गिळंकृत केलें ॥५०॥
 
महाबली रक्तासुराला । तीक्ष्ण खडगीं मारुनी टाकिला । प्राशुनी तयाच्या रक्ताला । रक्तासुराचा नाश केला ॥५१॥
 
हें वृत्त महिषासुरासी कळल्यावर । संतप्त झालें त्याचें शिर । ती देवी माझ्या हातूनि मरणार । ऐसें म्हणोनि ऊठिला ॥५२॥
 
ऐशापरि योजुनी महिषासुर । घेऊनि सर्व सैन्य बरोबर । चाल करुनि आला आर्याद्वीपावर । लढण्यासि आर्यादुर्गा देवी बरोबर ॥५३॥
 
बसलीं होती देवी आपुल्या सिंहासनावर । अंगावरी घालुनी सर्वहि अलंकार । कमलनयना बहुत सुंदर । आर्यादुर्गा देवी तयावेळीं ॥५४॥
 
महिषासुरें केलें अंगी कवचालंकार धारण । एके हातीं धनुष्य दुसरे हाती बाण । घेउनी बसला होता आपुल्या रथावरी जाण । तये वेळीं दिसे महिषासुराचें वज्र ठाण ॥५५॥
 
ऐसे परि हातीं धनुष्य बाण घेऊनि । आकर्ण परियंत बाण ओढुनी । तीक्ष्ण बाण सोडितसे हें देवीने पाहूनी । आपुल्या प्रखर बाणे मध्येंचि टाकी छेदून ॥५६॥
 
देवीस पाहुनी महिषासुर । बाण वर्षाव करी भयंकर । तये परि देवीनेहि असुरावर । सोडियले बाणवर्षाव अपार ॥५७॥
 
युद्ध शुरु झालें अती घोर । सोडुं लागला बाण देवीवर । मोडूनी ठाकले बाण चरचर । आर्यादुर्गेने तत्समयीं ॥५८॥
 
जीं जीं शस्त्रास्त्रें महिषासुर सोडी । तीं तीं सर्वही आर्यादुर्गा मोडी । ऐशापरी जाणुन युद्ध नाडी । रथ त्याचा मोडियला ॥५९॥
 
मग बैसला ऐरावत सम हत्तीवर । सोडूं लागला अस्त्रें अपरंपार । तीं सर्वही मोडूनी सत्वर । हतबल केला तयासी ॥६०॥
 
उड्डाण करुनी सिंहे क्रुर । उडी घेतली तया हत्तीवर । तीक्ष्ण दाढें फाडुनी सत्वर । मारुनी टाकिला धरणीवरी ॥६१॥
 
मग महिषासुर पायींच येतां । देवीने घेउनी त्रिशूल हातां । मारुनी टाकिला महिषासुरासी तत्वतां । सैन्य सर्वही मारिलें ॥६२॥
 
त्रैलोकीं भयदाता महिषासुर । आर्यादुर्गेने मारुनी टाकिल्यावर । आकाशांतुनी पुष्पवृष्टी करुन तिजवर । सर्वहि देवानी केली स्तुती तियेची ॥६३॥
 
ज्या ज्या कारणी उदभवली आर्यादुर्गा देवता । तें तें सर्व ही कार्य संपलेंसे जाणतां । आशीर्वाद देउनी समस्तां । गुप्त झाली ती सर्व देवींसह ॥६४॥
 
इति श्री गोकर्ण पुराणे उत्तर खंडे श्री आर्यादुर्गा देवी महात्म्य