Festival Posters

श्री रेणुका देवी माहात्म्य अध्याय १

Updated: सोमवार, 26 सप्टेंबर 2022 (15:22 IST)
 
’पुत्रदुःखश्च नारीणां अशस्त्रवधमुच्येत" या वाक्याप्रमाणे राकावती राणी दिवसेंदिवस अत्यंत कृश होऊ लागली, तिचे पूर्वीचे लावण्य लुप्त झाले; हंसपक्षाप्रमाणे असणारी तिची चालण्याची ढबही नाहीशी झाली. ही गोष्ट क्रतुराजास कळून येताच तोही चिंतातूर होऊन राज्यकारभाराकडे दुर्लक्श करू लागला. दिवसेंदिवस या राजदंपतीच्या चिंताग्नीची झळ गुरु शुक्राचार्यांपर्यंत जाऊन पोचली. त्यामुळे शुक्राचार्य तातडीने महिष्वतीस आले व त्यांनी राजदंपतीस-दर्शन दिले. राजा-राणींनी गुरुंना आपली चिंता निवेदन केली व भक्तिभावाने आणि वैभवोपचाराने गुरुची पाद्यपूजा करून अतिथि अभ्यासगतांना अन्नवस्त्रादि दाने देऊन त्यांची स्तुति केली. राजाच्या सत्काराने प्राप्त झालेल्या शुक्राचार्यांनी राजाराणीची पुत्रविषयक चिंता जाणून राकावती राणीस आपल्या सान्निध्य बोलावले व म्हणाले, "मुली तू गुरुदत्तात्रेयांच्या कृपेने वीरपुत्र प्रसवशील. तरी चिंता न करिता माझ्या श्रद्धावर विश्वास ठेवून सुखाने रहा. ही शुक्राचार्यांची अमृतवाणी ऐकून राणी राकावती आनंदित झाली व शुक्राचार्यांना म्हणाली, गुरुवर्य, आपण सांगितलेल्या पुत्रोत्पतीकरिता मी काही व्रत वगैरे आचरण करावयास हवे का?" यास शुक्राचार्य म्हणाले, "मुली, या करिता काही महान्‌ व्रत करणेची आवश्यकता नाही." तू उझ्या शरीर धर्माप्रमाणे प्रत्येक महिन्यास बाहेर बसतेसच. त्यावेळी ऋतूसूतक शुद्धीनंतर पाचवे दिवशी तू तुमच्या राजनियमाप्रमाणे दिवसा तुझ्या पतीशी पुत्रप्राप्तीकरीता समागम कर म्हणजे तुझी मनःकामना पूर्ण होईल, अशाप्रकारे गुप्त रीतीने सूचना देऊन व राजाराणीस आशीर्वाद देऊन गुरु शुक्राचार्य आपल्या शिष्यपरिवारासह आश्रमास परत आले.
 
पुढे काही दिवस गेल्यानंतर राकावती राणीचे पापच जणू बाहेर पडले आहे असे वाटण्यासारखी ती ऋतुमति झाली सूतकाचे दिवस झाल्यावर, ते लाभ्यगदि स्नान करून, नित्यकर्माचे आचरण करून व पंचामृताचे भोजन करून राजाराणी तृप्त झाली व ऋतुवीर राजा राज्यकारभाराकरिता दरबारात गेला इकडे राकावती राणी आपल्या विश्रांतीगृहात गुरुध्यानात आपल्या पतीची मार्गप्रतीक्षा करीत विवश होऊन बसली. यावेळी क्रतुवीर राजास राजकारभाराचे काम फार पडल्यामुळे त्यास ते सर्व उरकून घेऊन राकावतीचे मंदिरात येण्यास उशीर झाला हे जाणून गर्भधारणेसाठी आतुर झालेली राकावती राणी बाहेर येऊन पाहते तो सूर्यास्ताचा समय होत आला. तेव्हा राणी तेथे न थांबता आपल्या विलास मंदिरात आली व तेथील दोर्‍यास तिने स्पर्श केला. त्या स्पर्शाने उत्पत झालेला घंटानाद क्रतुवीर राजाला बसल्या ठिकाणी ऐकू आला. तो नाद ऐकताच पुढील सर्व कामे मंत्र्यावर सोपवून क्रतुवीर राजा तातडीने राणीचे विलास मंदिरात आला. त्यास पाहून राणीस परमानंद झाला. राजाने तिची रतिविलास मुखमुद्रा पाहिली. तेव्हा राकावती राणी राजास म्हणाली, ’प्रणेशा, गुरु शुक्राचार्यांनीआजच्या या वेळेस आपणाकडून गर्भदान करून घ्यावे अशी आज्ञा केली आहे. या करिता मी अत्यंत उत्सुकतेने आपल्या आगमनाची मार्गप्रतीक्षा करीत बसले आहे. पण आपणास येणेस विलंब होत आहे हे जाणून मी शीघ्र येणेबद्दल आपणास सूचना केली." राजाराणीस आलिंगन देऊन म्हणाला, ’प्रिये आज दरबारात राजकारणाची कामे फार होती म्हणून मला येणेस विलंब झाला. मी तरी काय करणार ? सायंकाळची वेळ झाली. पहा राकावती हा काल समागमास उचित नव्हे हे तू जाणतेसच.’ यावर राकावती म्हणाली, ’प्राणप्रिया, गुरुवाक्याचा भंग येईल ना? यावेळी आपण विशेष विचार करण्यात वेळ न घालविता लवकर गर्भदान करावे.’ हे ऐकून राजाने गुरुचे ध्यान करून राणीची इच्छा तृप्त केली. या योगे दोघेही संतुष्ट झाले व स्नान, पूजा-भोजनाने तृप्त होऊन गुरुचे ध्यान करीत निद्रावश झाले.
 
चक्रच कार्तवीर्याजुन म्हणून जन्मले
 
ती रात्र निद्रानंदात घालविल्यावर अरुणोदयाचे वेळी पांढरा घोडा, शंख व पूर्णचंद्राचे दर्शन होऊन जाई, मल्लिका (मोगरा), पुन्नाग, सोनचाफा वगैरे सुगंधि पत्रि-पुष्पांनी व धूप, दीप, कर्पूर इत्यादि मंगलद्रव्यांनी गुरुपादपूजा केल्याचे राकावती राणीस स्वप्न पडले आणि त्याचवेळी आकाशातून वीज गर्जल्याप्रमाणे आवाज होऊन एक चक्र राकावती राणीने नेसलेल्या पीतांबराचे ओटीत येऊन पडले, हे पाहून राणी जागी झाली व सभोवार आश्चर्याने पाहू लागली. या विलक्षण घटनेने मिश्र अशा स्वप्नाचे काय फल मिळणार आहे कोण जाणे ! असो, पण त्यावेळी मी गुरुपूजा करीत होते म्हणून हे शुभ चिन्हच समजले पाहिजे. आता मी कसलीच चिंता करणेचे कारण नाही अशी राकावती राणीने आपल्या मनाची समजूत करून घेतली व गुरुध्यानासक्त होऊन तिने ही स्वप्नाची हकीकत आपल्या पतीस कळविली. हे ऐकताच राजा म्हणाला, ’हे स्वप्न आम्हा उभयतास शुभप्रद आहे. गुरुशुक्राचार्यांचे आशीर्वादाने तुला शूर पुत्रच होणार हे निश्चित. पतीचे बोलणे ऐकून राणी संतुष्ट झाली व राजा आपल्या राज्यकारभाराचे कामाकरिता दरबारात गेला.
 
पुढे १-२ महिने जाताच राणीचे मुखावर गर्भधारणेचे चिन्हे दिसू लागली व जसे दिवस जाऊ लागले तशी गर्भधारणा स्पष्टच झाली. क्रतुराज, त्याचे मांडलिक व प्रजाजन आनंदित झाली. पुढे राकावती राणीस पूर्ण नवमासभरताच कार्तिक कृष्ण ६ रविवारी, सायंकाळचे सुमारास हस्तरहित असा पुत्र राणीचे उदरी जन्मास आला. लागलीच ही बातमी सेवक लोकांनी राजास कळविली. त्यावर राजा खिन्न होऊन राणीचे मंदिरात आला व पुत्रांचे रूप नीटपणे पाहून राणीस म्हणाला प्रिय, असा अंगवैकल्याने-युक्त पुत्र आपणास झाला यात माझी काहीच चूक नसून, चूक तुझीच आहे. तू सायंकाळचे सुमारास अत्याग्रहाने माझेकडून गर्भधारणा करून घेतलीस. आता यास काय करावे? आमच्या पुत्र प्राप्तीच्या आकांक्षेचाच हा असा परिणाम झाला. असो; परमेश्वर कोपला तर गुरुच रक्षण करणार हे तर सर्वश्रुत आहेच. आमच्या पुत्राच्या अंगशुद्धीस मुख्य गुरुकृपाच पाहिजे. आता तू जास्त चिंता करू नकोस असे सांगून राजाने राणीचे समाधान केले. पुढे मुलास १२ वा दिवस लागण्याचे सुमारास ऋतुवीर राजाने गुरु शुक्राचार्यांना बोलावून घेतले व रत्‍नखचित पाळण्यात मुलास निजवून सुवासिनी स्त्रिया गीत गात असता गुरु शुक्राचार्यांना आपल्या मुलाचे नाव ठेवण्यास विनंती केली. शुक्राचार्यांनी राकावती राणीस आपल्या जवळ बोलावले व ते तिला म्हणाले,
 
"महाराणी आपला पुत्र कार्तिक कृष्ण षष्ठी रविवार सूर्यास्ताचे सुमारास जन्मला आहे. म्हणून मी यास कार्तवीर्याजुन असे नाव ठेवणार आहे असे सांगून शुक्राचार्य पाळण्याजवळ आले व मनाने गुरु दत्तात्रेयांचे ध्यान करीत त्यांनी मुलास नाव ठेवून मुलाचे अंगावर आपला हात फिरवला आणि श्रीगुरु दत्तात्रयाचे अनुग्रहाने सर्वांग शुद्ध होऊन जगप्रसिद्ध हो असा त्यास आशीर्वद दिला. हे गुरु वाक्य ऐकून राजा-राणि व तेथे जमलेल्या सुवासिनींनी मंगल गीत गात जयजयकार केला. नंतर राजाने या मंगल कार्यास आलेल्या सर्व सुवासिनींना वस्त्राभरणे देवून पाठविले.
 
दुसरे दिवशी गुरु शुक्राचार्यांनी राजा-राणीचे इच्छेप्रमाणे स्नान-पूजादि कामे आटपून त्यांचे आतिथ्य स्वीकारले व ते त्यांना म्हणाले. "हे राजा-तुम्हास हस्त हीन पुत्र झाल्याबद्दल चिंता करणेचे कारण नाही. गुरु दत्तात्रेयाचे कृपेने तुमचे सर्व मनोरथ सिद्धीस जातील. या मुलास ३-४ वर्ष संपताच तुम्ही त्याला घेऊन गुरु दत्तात्रेयाचे आश्रमास जावे व त्यांची पादसेवा घ्यावी. या योगे तुमची मनःकामना पूर्ण होईल असे राकावतीस सांगून आपण आपल्या आश्रमास जातो असे म्हणाले व "आता तुम्ही संतोषाने रहा" असा आशीर्वाद देऊन गुरु शुक्राचार्य आपल्या आश्रमास गेले.
 
कार्तवोर्यार्जूनास घेऊन क्रतुवीर श्रीगुरु दत्तात्रेयाच्या आश्रमास गेले.
 
सूत - शौनकादि मुनिगणहो ! कार्तवीर्याजून दिवसेंदिवस वाढू लागला व त्यास ४ थे वर्ष संपून ५ वे वर्ष लागताच राजाराणी गुरु शुक्राचार्यांचे आज्ञेप्रमाणे राजवैभवासमवेत श्री दत्तात्रेयाचे आश्रमास आले आपल्या शिष्यांकडून राजाराणीच्या आगमनाची बातमी ऐकून गुरु दत्तात्रेयांनी त्यांना आपल्याजवळ बोलावून घेतले. राजाराणींनी आपल्या पुत्रास गुरु दत्तात्रेयाचे पायावर घातले व नमस्कार करून आपला आशय त्यांना कळविला. ते ऐकून व त्यांचा क्षेम समाचार व कार्तवीर्यार्जूनाचे अंगशुद्धीची हकिकत समजुन घेऊन गुरु दत्तात्रेय म्हणाले, हे राजाराणि तुम्ही तुमच्या पुत्राच्या अंगशुद्धीबद्दल बिलकुल चिंता करू नये. हे गुरुवाक्य सत्य असे समजा. राकावती तू पुत्रासमवेत काही दिवस गुरुजवळ राहून गुरुसेवा कर. क्रतुराजा तू आजचा दिवस येथे रहा, व गुरुप्रसाद स्वीकारून उदईक प्रातःकाळी तुझे राज्यास जाण्याकरिता नीघ आणि तेथे जाऊन राज्यकारभार यथोचित कर. असा आशीर्वाद दिला. क्रतुवीर राजा त्याप्रमाणे आपल्या लोकांसह मदिष्वती नगरीस परत येऊन राज्यकारभार पाहू लागला.
 
श्री गुरु दत्तात्रेयाचा महिमा जगप्रसिद्ध झाला ही कथा
 
शौनकादि ऋषिगणहो ! भक्तश्रेष्ठ अशी राकावती राणी गुरु सेवेत काही वर्षे राहिल्यावर माघमासातील वाढत्या चंद्राचे वैभव पौर्णिमेस षोडश कलांनी युक्त होऊन अर्व जगास तेज देते त्याप्रमाणे कार्तवीर्यार्जूनास सहस्त्र बाहू उत्पन्न होऊन त्याच्या पराक्रमाचे तेज मुखावर झळकू लागले. हे पाहून राकावती राणी त्याचप्रमाणे तेथे असणारा शिष्यवर्ग या गुरु महिमेने आश्चर्यचकित झाला. अशा प्रकारे गुरुध्यानतत्पर असलेल्या राकावती राणीस कार्तवीर्य राजास बोलावणे पाठवून आपल्या राजधानीस परत जाण्याची इच्छा झाली. ही तिची इच्छा समजून घेऊन गुरु दत्तात्रेयांनी राकावतीस आपल्याजवळ येण्याची आज्ञा केली व ते तिला म्हणाले, "महाराणी, श्रीशंकराचे सुदर्शन चक्रच तुझा पुत्र अर्जुनी म्हणून तुझ्या उदरी आले आहे. त्याचे माहात्म्य मी काय वर्णन करू? हा अत्यंत बलाढ्य होऊन देवदानवांच्या शस्त्रास्त्रांना न भिता क्षत्रियकुल श्रेष्ठ होऊन आपल्या शौर्याने तिन्ही लोकात प्रख्यात ओईल. आता तु तुझ्या पुत्रासमवेत तुझ्या राजधानीस जा. तुझ्या पतीस या पूर्वीच येथे येण्याबद्दल आम्ही कळविले आहे, त्याप्रमाणे तोही आपल्या राजवैभवासहित थोड्याच कालात येथे येईल." हे गुरुचे वचन ऐकून राणी व कार्तवीर्याजुन काही वेळ तेथेच बसले. नंतर थोड्याच वेळात राजा अत्यंत वैभवाने गुरु दत्तात्रेयांचे सन्निध आला व त्यांना नमस्कार करून आणि आणलेली गुरुदक्षिणा पुढे ठेवून आपण तेथेच बसला. राकावती महाराणी पुत्रासह पुढे आली व गुरु दत्तात्रेयास व राजास नमस्कार करून बसली. सहस्त्र भुजांनीयुक्त व तेजस्वी अशा आपल्या अर्जुनी पुत्रास पाहून राजा आश्चर्यचकित झाला व मनामध्ये गुरुच्या माहात्म्याचे स्तवन करीत त्या दिवशी तेथेच राहिला. नंतर गुरुप्रसाद सेवन करून दुसरे दिवशी आपली राणी व पुत्र अर्जुनासह, परिवारासमवेत गुरुंना नमस्कार करून व गुरुचा निरोप घेऊन राजा नगरीस जाण्याकरिता निघाला.
 
त्यावेळी गुरु दत्तात्रेयांनी अर्जुनीस आपणाजवळ बोलावले व त्याचे मस्तकावर आपला हात ठेवून ते त्यास म्हणाले, "हे अर्जुना, तू आईबापाची सेवा हीच गुरु-सेवा समाज-सेवा हीच ईश्वर सेवा असे समजून त्याप्रमाणे आचरण करीत जा. पुढे तुझ्यावर राज्याची जबाबदारी पडल्यावर तू लोककंटक अशा दुष्ट व दुर्जन लोकांच्या उपदेशास भुलू नकोस व देव-दानव आणि सत्पुरुष यांना कष्ट देऊ नकोस. तुझा पिता ऋतूवीर यांच्याप्रमाणे धर्माने राज्य चालीव म्हणजे तुला देव-दानव अगर इतर राजे लोकांच्या शस्त्रास्त्रांचे बिलकूल भय राहणार नाही. तूच पुढे क्षत्रिय कुलश्रेष्ठ होऊन पुष्कळ दिवस राज्य करशील. या आमच्या सदुपदेशाकडे किंचितही दुर्लक्ष करून तू वागलास तर तुझे समग्र क्षत्रिय कुलच तू अधोगतीत नेशील व दुष्कीर्तीस पात्र होशील." हे ऐकून अर्जुनाने गुरु दत्तात्रेयास साष्टांग नमस्कार केला व त्यांच्या सदुपदेशाप्रमाणे वागण्याचे वचन दिले. गुरुंनी केलेला उपदेश राजा-राणी व मंत्री वगैरेनी श्रवण केला व ते गुरूची स्तुती करीत म्हणाले, "गुरुवर्य अर्जुनास केलेला सद्‌बोध यासही योग्य आहे. यापुढेही यांजवर अशीच गुरुकृपा रहावी असे म्हणून सर्वांनी गुरुस नमस्कार केला, व तेथून निघून पल्लवतोरणांनी अलंऋत अशा महिष्वती नगरीस आले. यांच्या मार्गाकडे डोळे लावून बसलेले नागरिक स्त्री-पुरुष समारंभाने त्यांना सामोरे गेले. राजाराणी अर्जुनीसहित राजधानीत येऊन सिंहासनावर विराजमान झाले. जमलेल्या सर्व प्रजाजनांनी राजाराणीचे त्याचप्रमाणे सहस्त्रबाहूंनी शोभणार्‍या अर्जुनाचे दर्शन घेतले. अर्जुनास आशीर्वाद दिलेल्या गुरु दत्तात्रेयाचे ध्यान करीत सर्वजण आपापल्या स्नानास निघून गेले.
 
पुढे काही दिवस लोटल्यावर अर्जुनाचा प्रभाव जिकडे तिकडे पसरू लागला हे पाहून क्रतुवीर राजाने सर्व लोकांना विदित होण्यासारखा आपला राज्यकारभार अर्जुनी पुत्रावर सोपविला आणि आपण गुरुसेवा-रत होऊन तीर्थाटनास निघाला. इकडे कार्तवीर्यार्जुन गुरु दत्तात्रेयांच्या अनुग्रहाने "अष्टदश महाद्वीप साम्राज्यमति" या नावाने प्रसिद्ध पावला, व कैदेत ठेवलेल्या दशकंठ रावणास पौलस्त्य ब्रह्मदेवाच्या आज्ञेने सोडून देवून माझ्यापेक्षा शूर वीर या त्रैलोक्यात कोणीच नाही. या दुरहंकाराने राज्यकारभार पाहू लागला; त्याच्यापुढे सर्व राजे सामर्थ्यहीन झाले." अशा प्रकारची कथा सूत मुनींनी शौनकादि ऋषीस सांगितली.
 
पहिला अध्याय समाप्त

सर्व पहा

Guru Purnima 2026 Wishes In Marathi गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

गुरुपौर्णिमेला गुरुपादुकाष्टकाचे पठण करा; जाणून घ्या त्याचे महत्त्व, पठणाची योग्य पद्धत आणि लाभ

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पहिले गुरु आई-वडिलांना शुभेच्छा द्या Guru Purnima 2026 Quotes In Marathi For Parents

गुरुपौर्णिमा विशेष श्री गोंदवलेकर महाराज पाद्यपूजा: स्वरूप, महत्त्व आणि नामस्मरण

गुरुपौर्णिमेला उपवासाचे महत्व; शरीर, मन आणि बुद्धी शुद्ध करण्यासोबत आत्मसाधनेचा दिवस

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments