शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. नवरात्रि 2022
  3. नवरात्रि उत्सव
Written By
Last Modified: बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (16:02 IST)

Navratrotsav : विंध्याचल धाम,मां विंध्यवासिनी मंदिर, मिर्झापूर येथील सिद्ध शक्तीपीठ

मां विंध्यवासिनी मंदिर उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील विंध्याचल शहरात असून विंध्याचल धाम म्हणूनही प्रसिद्ध आहे. माता विंध्यवासिनी ही विंध्याचल धाम , मिर्झापूरची आराध्य देवी आहे.माँ विंध्यवासिनी हे माँ दुर्गेचे रूप आहे. विंध्य पर्वत रांगेत वसलेले हे मंदिर भारतातील पूजनीय शक्तीपीठांपैकी एक आहे आणि एक सिद्ध शक्तीपीठ आहे . विंध्याचल धाममध्ये विंध्यवासिनी मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी मोठी गर्दी जमते. विंध्यवासिनी देवी काजळ देवी म्हणूनही ओळखली जाते .
 
विंध्याचल हे पवित्र शहर प्रयागराज आणि वाराणसी या दोन प्रसिद्ध शहरांमध्ये गंगा नदीच्या काठावर वसलेले आहे . विंध्याचलमधील विंध्य पर्वतराजीला पवित्र गंगा नदी स्पर्श करते , म्हणूनच विंध्यक्षेत्राला आध्यात्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व दिले आहे. एका आख्ययिकेनुसार, प्रभू रामाने आपल्या वनवासात पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मणासोबत या ठिकाणी आणि आसपासच्या क्षेत्रांना भेट दिली होती.
 
दुर्गा सप्तशतीत माता विंध्यवासिनीचे वर्णन महिषासुर मर्दिनी असे केले आहे. पौराणिक कथेनुसार, देवी दुर्गा आणि दैत्य महिषासुर यांच्यात युद्ध झाले. विंध्याचल हे जगातील एकमेव ठिकाण आहे जिथे देवीची तीन रूप लक्ष्मी, काली आणि सरस्वतींना समर्पित विशिष्ट मंदिरे आहे. विंध्यवासिनी मंदिरापासून 8 किमी अंतरावर विंध्य पर्वत रांगेतील एका टेकडीवर देवी सरस्वतीचे मंदिर आहे , जे अष्टभुजा मंदिराच्या नावाने ओळखतात. विंध्यवासिनी मंदिरापासून 6 किमी अंतरावर काली खोह नावाचे आई काली देवीचे मंदिर एका गुहेत आहे . राक्षस रक्तबीजला मारण्यासाठी दुर्गा मातेने माँ कालीचा अवतार घेतला. तिन्ही देवींच्या मंदिरांचे दर्शन आणि त्यांच्यापासून बनवलेल्या त्रिकोणाला  प्रदक्षिणा घालण्याचे  विशेष महत्त्व आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारे भाविक तिन्ही देवींच्या मंदिरांनी तयार झालेल्या त्रिकोणाची प्रदक्षिणा करतात .आणि देवीआईचा आशीर्वाद घेतात. 
 
कसे जावे- 
रस्त्याने  -
विंध्याचल हे राष्ट्रीय महामार्ग NH 2 म्हणजेच दिल्ली-कोलकाता मार्गाने रस्त्याने चांगले जोडलेले आहे . मां विंध्यवासिनी मंदिर वाराणसीपासून 63 किमी अंतरावर आहे. उत्तर प्रदेश राज्य परिवहनच्या नियमित बस सेवा विंध्याचलला अलाहाबाद , वाराणसी आणि जवळच्या शहरांशी जोडतात.
 
रेल्वेने -
दिल्ली-हावडा आणि मुंबई-हावडा मार्गावर असलेल्या मां विंध्यवासिनी मंदिरापासून सर्वात जवळचे ' विंध्याचल ' रेल्वे स्टेशन सुमारे 1 किमी अंतरावर आहे . विंध्याचल रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने गाड्या थांबतात. मिर्झापूर हे रेल्वे स्टेशन मां विंध्यवासिनी मंदिरापासून 9 किमी अंतरावर आहे .
 
विमानाने -
 सर्वात जवळचे लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ हे बाबतपूर , वाराणसी येथे आहे जे मां विंध्यवासिनी मंदिरापासून 72 किमी अंतरावर आहे.