शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. ऑलिंपिक 2024
Written By
Last Modified: शनिवार, 27 जुलै 2024 (13:17 IST)

पॅरिस 2024 : ऑलिंपिकचं दिमाखात उद्घाटन, आजचे महत्त्वाचे सामने कुठले आहेत?

Paris Olympics
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ऑलिंपिकचं मोठ्या दिमाखात उद्घाटन झालं आहे.
 
या स्पर्धेत 32 क्रीडाप्रकारांत 329 सुवर्णपदकांसाठी हजारो अ‍ॅथलीट्स शर्यतीत आहेत. भारतानं या क्रीडा स्पर्धेसाठी 110 जणांचं पथक पाठवलं असून 16 क्रीडाप्रकारांत भारतीय खेळाडू सहभागी होतील.
 
पहिल्या दिवशी कोणते खेळ?
27 जुलै हा पॅरिस ऑलिंपिकचा पहिला अधिकृत दिवस आहे. आज नेमबाजी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, रोईंग, हॉकी आणि बॉक्सिंगमध्ये भारतीय खेळाडू सहभागी होतील.
 
नेमबाजीच्या 10 मीटर एयर रायफल मिश्र प्रकारात संदीप सिंग आणि एलावेनील वेलारिवान तसंच अर्जुन बबुटा आणि रमिता जिंदाल या दोन भारतीय जोड्या सहभागी होतील.
 
मिश्र नेमबाजीची पात्रता फेरी भारतीय वेळेनुसार 12:30 वाजता सुरू होईल. यातून पात्र झालेल्या नेमबाजांमध्ये पदकासाठीची लढत 2 वाजता होणार आहे.
 
त्याशिवाय महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल नेमबाजीची पात्रता फेरी दुपारी 4 वाजता रंगेल.
 
बॅडमिंटनचे सामने भारतीय वेळेनुसार 12 वाजता सुरू होतील. टेनिसच्या सामन्यांना दुपारी 3:30 वाजता सुरुवात होईल तर हॉकीमध्ये भारताची न्यूझीलंडशी लढत 9 वाजता होईल.
 
शानदार उद्घाटन सोहळा
तब्बल 100 वर्षांनी पॅरिसमध्ये पुन्हा एकदा ऑलिंपिकचं आयोजन केलं जातंय. तसंच तिसऱ्यांदा पॅरिसनं ऑलिंपिकचं आयोजन केलं आहे.
 
ऑलिंपिकची सुरुवात जरी ग्रीसमध्ये झाली असली, तरी आधुनिक ऑलिंपिक पॅरिसमध्येच आकाराला आलं. साहजिकच या पॅरिसचं ऑलिंपिकशी खास नातं आहे. उदघाटन सोहळ्यातही त्याची झलक पाहायला मिळाली.
 
2024 चा उद्घाटन सोहळा न भूतो न भविष्यती असाच होता. या स्पर्धेत सहभागी झालेल्या 205 देशांच्या संघांची परेड यावेळी स्टेडियममध्ये नाही, तर सीन नदीत बोटींवरून निघाली. परेडच्या पूर्ण मार्गावर ठीकठीकाणी कलाविष्कार पाहायला मिळाले.
 
कार्यक्रमाच्या अखेरीस टॉर्च रिलेमध्ये फ्रान्सचा सुपरस्टार फुटबॉलर झिनेदिन झिदान सहभागी झाला. तर टेनिसस्टार राफेल नदाल, सेरेना विल्यम्स, अमेली मोरेस्मो तसंच अ‍ॅथलीट कार्ल लुईस आणि जिम्नॅस्ट नादिया कोमानेची यांच्यासह फ्रान्सचे अनेक दिग्गज खेळाडू रिलेच्या अखेरच्या टप्प्यात सहभागी झाले होते.
 
एका महिला आणि पुरुष अ‍ॅथलीटनं एकत्रितपणे ऑलिंपिक ज्योत प्रज्वलित केली आणि विविधतेत एकता आणि समानतेचा संदेश दिला. यंदा पहिल्यांदाच ऑलिंपिकमध्ये पुरुष आणि महिला खेळाडूंचं प्रमाण 50-50% एवढं समान आहे.
 
ऑलिंपिक ज्योत एका बलूनच्या रुपात हळू हळू वर उठली
लेडी गागा आणि सेलिन डियॉन सारख्या दिग्गज कलाकारांच्या सादरीकरणानं उद्घाटन सोहळ्यात रंगत आणली.
 
लेडी गागानं सुरुवातीला गाणं सादर केलं तर सेलिन डियॉननं आयफेल टॉवरच्या अर्ध्यावरील टेरेसावरून गात कार्यक्रमाची सांगता केली. दोन वर्षांपूर्वी एका दुर्धर आजारामुळे गाण्याचे कार्यक्रम सेलिन डियॉननं बंद केले होते. एक प्रकारे तिचं हे कमबॅक ठरलं.
 
फ्रान्समधल्या कला, संगीत, इतिहास आणि ऑलिंपिक चळवळीची वाटचाल अशा गोष्टींचं प्रतीक त्यात पाहायला मिळालं.