रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. ऑलिंपिक 2024
Written By
Last Modified: शनिवार, 27 जुलै 2024 (09:19 IST)

पॅरिस ऑलिंपिक : सीन नदीपात्रात रंगला अभूतपूर्व उद्घाटन सोहळा, 'या' भारतीय खेळाडूंवर असेल नजर

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये सीन नदीत पॅरिस ऑलिंपिक 2024 स्पर्धेचा अभूतपूर्व असा उद्घाटन सोहळा रंगला.
 
बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू हिनं भारतीय तिरंगा ध्वज हाती घेत स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय पथकाचं नेतृत्व केलं.
 
ऑलिंपिकसाठीच्या यंदाच्या भारतीय पथकात 117 खेळाडूंचा समावेश आहे.
 
प्रथमच ऑलिंपिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा एखाद्या मैदानाऐवजी नदीत झाला. सीन नदीत झालेल्या या सोहळ्यात प्रत्येक देशाच्या पथकानं एका जहाजातून सहभाग नोंदवला.
 
पॅरिसबरोबरच फ्रान्समधील आणखी 16 शहरांमध्येही स्पर्धेतील विविध इव्हेंट होणार आहेत.
 
भारताची ऑलिंपिकमधील सर्वोत्तम कामगिरी गेल्यावेळी झालेल्या टोकियो ऑलिंपिकमध्ये पाहायला मिळाली होती. या स्पर्धेत भारतानं 7 पदकं मिळवली होती.
 
यावेळी पदकसंख्येचा आकडा दुहेरी व्हावा यासाठी भारतीय खेळाडूंचे प्रयत्न असणार आहे.
 
त्यात काही भारतीयांच्या कामगिरीवर क्रीडा चाहत्यांची खास नजर असणार आहे. ते क्रीडापटू आणि त्यांचे सामने कोणत्या दिवशी होणार आहेत हे आपण पाहुयात.
 
भालाफेक
नीरज चोप्रानं टोकियो ऑलिम्पिकमध्ये 2021 साली भालाफेकमध्ये सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला होता. त्याने 87.58 मीटर अंतरावर भाला फेकत पदकावर नाव कोरले होते.
 
भालाफेक या क्रीडा प्रकारात भारताला मिळालेले हे पहिलं पदक होतं. तर वैयक्तिक स्पर्धेत देशाला मिळालेले हे दुसरेच सुवर्णपदक होते.
 
याआधी 2008 साली पार पडलेल्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्रा यांनी शुटिंगमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं.
 
यावेळी सर्व भारतीयांच्या नजरा नीरज चोप्रावर असणार आहे. तसंच किशोर जेना आणि अन्नू राणी हे दोन खेळाडूही भालाफेकमध्ये सहभागी होणार आहेत.
 
भालाफेकसाठी 6 ऑगस्ट रोजी पुरुषांची पात्रता फेरी असणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 7 ऑगस्ट रोजी महिलांची पात्रता फेरी असेल.
 
दरम्यान पुरुषांची भालाफेक अंतिम फेरी म्हणजेच फायनल 8 ऑगस्ट रोजी आहे. तर महिलांची फायनल 10 ऑगस्ट रोजी असणार आहे.
 
पायी चालणे
या क्रीडाप्रकारात महिलांमधून प्रियांका गोस्वामी तर पुरुषांमधून अक्षदीप सिंह, विकास सिंह, परमजित बिष्ट आणि राम बाबू या चार खेळाडूंनी भाग घेतला आहे.
 
20 किलोमीटर चालण्याची ही स्पर्धा असेल. 1 ऑगस्ट रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल.
 
4 X 400 रिले
4 X 400 मीटर रिले शर्यतीसाठी महिला आणि पुरुषांच्या पात्रता फेरी 9 ऑगस्ट रोजी पार पडतील.
 
या प्रकारात पुरुषांच्या टीममध्ये मुहम्मद अनस, मुहम्मद अजमल, राजीव अरोकिया आणि अमोज जॅकब आदी खेळाडू सहभागी असतील.
 
तर महिलांच्या संघात ज्योतिका श्री दांडी, रुपल सुभा वेंकटेशन आणि पूवम्मा एमआर या असतील.
 
स्पर्धेचा अंतिम सामना 10 ऑगस्ट रोजी खेळला जाईल.
 
3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात महाराष्ट्राच्या अविनाश साबळेवरही नजरा असणार आहेत.
 
वेटलिफ्टिंग
वेटलिफ्टिंग या क्रीडाप्रकारात 49 किलो वजनगटात मीराबाई चानू या भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
 
मीराबाईकडून भारतीयांना मोठ्या अपेक्षा आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये मीराबाईने एकून 201 किलो वजन उचलत रौप्यपदक पटकावले होते.
 
तिच्या सामन्याचे आयोजन 7 ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे.
 
बॅडमिंटन
बॅडमिंटन या क्रीडाप्रकारात महिला एकेरीमध्ये भारताची स्टार खेळाडू पी.व्ही. सिंधू हिच्याकडून देशाला पदकाची अपेक्षा आहे.
 
सिंधूने 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक तर 2021 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावलं होतं.
 
दरम्यान, पुरुष सिंगल्समध्ये एस. एस. प्रनॉय आणि लक्ष्य सेन भारताचे प्रतिनिधित्व करतील.
 
कुस्ती
कुस्तीमध्ये भारताच्या महिला कुस्तीपटूंमधील अंतिम पंघाल ( 53 किलो), विनेश फोगाट (50 किलो) अंशू मलिक (57 किलो) रितिका हुड्डा ( 76 किलो) आणि निशा दहिया (68 किलो) या सहभागी असतील.
 
तर पुरुषांमध्ये अमन सहरावत 57 किलो फ्रीस्टाईलमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करेल.
 
हे सर्व सामने 5 ते 11 ऑगस्टदरम्यान खेळवले जातील.
 
हॉकी
भारतीय महिला हॉकी संघ यंदा ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र ठरू शकला नाही. तर पुरुष हॉकी संघ पूल बी मध्ये आहे.
 
27 जुलैला भारताचा पहिला सामना न्यूझिलंडविरुद्ध असणार आहे. तर 29 जुलैला अर्जेंटीनासोबत, 30 जुलै रोजी आयर्लंड, 1 ऑगस्ट रोजी बेल्जियम आणि 2 ऑगस्टला ऑस्ट्रेलियासोबत भारताचा सामना होणार आहे.
 
4 ऑगस्ट रोजी हॉकीची उपांत्यपूर्व फेरी तर 6 ऑगस्टला उपांत्य फेरी असणार आहे.
 
8 ऑगस्टला हॉकीचा अंतिम सामना पार पडेल.
 
बॉक्सिंग
बॉक्सिंगमध्ये महिला विभागात भारताकडून निकहत जरीन (50 किलो), प्रीती पवार ( 54 किलो), जास्मिन लंबोरिया ( 57 किलो) व लोवलिना बोरगहेन (75 किलो) या खेळाडू भाग घेतील.
 
पुरुष गटात निशांत देव (71 किलो) आणि अमित पंघाल ( 51 किलो) हे सहभागी असतील.
 
बॉक्सिंगचे सामने 27 जुलैपासून खेळवले जातील.
 
गोल्फ
गोल्फमध्ये भारतातर्फे महिला गटात आदिती अशोक आणि दीक्षा डागर या भाग घेणार आहेत.
 
तर पुरुष गटात शुभांकर शर्मा आणि गगनजीत भुल्लर सहभागी असतील.
 
पुरुषांचे सामने 1 ऑगस्ट तर महिलांचे सामने 7 ऑगस्ट रोजी खेळवले जातील.
 
भारतीय चाहत्यांच्या नजरा आदिती अशोककडे लागून आहेत.
 
तिरंदाजी
या क्रीडाप्रकारत पुरुष एकेरीमध्ये धीरज बोम्मादेवरा, तरूणदीप राय, प्रवीण जाधव सहभागी
 
तर महिला एकेरीमध्ये भजन कौर, दीपिका कुमारी, अंकिता भकत या प्रतिस्पर्ध्यांसमोर आव्हान निर्माण करतील.
 
हे सामने 25 जुलै रोजी होणार आहेत.
 
नेमबाजी (शूटिंग)
10 मीटर एयर रायफल शुटिंगमध्ये पुरुष गटातून संदीप सिंह, अर्जून बबुता आणि महिला गटातून एलवेनिल वालारिवन आणि रमिता जिंदल भाग घेतील.
 
हे सामने 27, 28, 29 जुलैला सकाळी 9 वाजतापासून सुरू होतील.
 
ट्रॅप शुटिंग या प्रकारात पुरुष गटातून पृथ्वीराज तोंडाइमान आणि महिला गटातून राजेश्वरी कुमारी व श्रेयसी सिंह या भाग घेतील.
 
त्यांचे सामने 29, 30 आणि 31 जुलै रोजी पार पडतील.
 
10 मीटर एअर पिस्टल शुटिंगमध्ये भारताचे सरबज्योत सिंह, मनू भाकर, अर्जुन चीमा आणि रिदम सांगवान हे खेळाडू सहभागी असतील.
 
त्यांचे सामने 27, 28 आणि 29 जुलै रोजी पार पडतील.
 
50 मीटर रायफल शूटिंगमध्ये भारताकडून स्वप्निल कुशले, ऐश्वर्या प्रताप सिंह तोमर, सिफ्त कौर सामरा आणि अंजुम मौदगिल हे खेळाडू भाग घेतील.
 
त्यांचे सामने 31 जुलै, 1 ऑगस्ट आणि 2 ऑगस्टच्या सकाळी 9 वाजेपासून सुरू होतील.
 
25 मीटर रॅपिड फायर पिस्टल शूटिंग या क्रीडाप्रकारात भारताकडून अनिश भानवाला आणि विजयवीर सिधू देशाचे प्रतिनिधित्व करतील. त्यांचे सामेने 4 आणि 5 ऑगस्टला सकाळी 9 वाजेपासून खेळवले जातील.
 
25 मीटर पिस्टल प्रकारात भारताच्या वतीने ईशा सिंह भाग घेणार आहे.
 
त्यांचे सामने 2 आणि 3 ऑगस्टला सकाळी 9 वाजता सुरू होतील.