ग्रामगीता अध्याय पहिला
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
ॐ नमोजी विश्वचालका ! जगदवंद्या ब्रह्मांडनायका !
एकचि असोनि अनेकां । भासशी विश्वरूपी ॥१॥
आपणचि झाला धराधर । उरला भरोनि महीवर ।
अणुरेणूंतूनी करशी संचार । विश्वनाटक नटावया ॥२॥
आपणचि मंदिर , मूर्ति , पूजारी । आपणचि पुष्पें होऊनि पूजा करी ।
आपणचि देवरूपें अंतरी । पावे भक्तां ॥३॥
गणेश , शारदा आणि सदगुरू । आपणचि भक्तकामकल्पतरू ।
देवदेवता नारद तुंबरू । आपणचि जाहला ॥४॥
नाना चातुर्यकला – व्यापें । आपणचि गाये नाचे आलापे ।
प्रसन्न होऊनि आपणचि सोपें । भक्तिफळ दावी ॥५॥
गुरूशिष्य एकाच स्थळीचे । भिन्न नाहीत पाहतां मुळींचे ।
सुखसंवाद चालती भिन्नतत्वाचे । रंग रंगणी आणावया ॥६॥
हें जयाचिया अनुभवा आलें । त्याचे जन्ममरणदुःख संपले ।
आत्मस्वरूप मूळचें भलें । ओळखलें म्हणोनिया ॥७॥
त्यासि नाही उरला भ्रम । विश्व आपणासह झाले ब्रह्म ।
तो जे जे करील तें तें कर्म । पूजाच तुझी ईश्वरा ! ॥८॥
तुझ्या शक्तीची ही पूर्णावलि । अजूनि नाही जीवाभावांत शिरली ।
म्हणोनीच अज्ञानदशा उरली । आम्हांपाशी ॥९॥
जेव्हां तुझे दर्शन घडे । उघडतीं विशाल ज्ञानाची कवडें ।
मग मी – तूं – पणाचे पोवाडे । कोठचे तेथे ? ॥१०॥
ज्यासि तुझें दर्शन घडलें । त्यास कैंचे परके राहिले ? ।
सर्व विश्वचि झालें आपुलें । दिव्यपणीं ॥११॥
परि आम्ही वंचित दर्शनासि । परसुखें आनंद कुठला आम्हांसि ?
आपुल्या स्वार्थे अल्पसंतोषी । मानतो स्वर्ग ॥१२॥
दुसर्याची उणीव पाहतां हसणें । दुसर्याची आपत्ति पाहून पळणें ।
दुसर्याचें वैभव देखोनि जळणें । होतें ऐसें ॥१३॥
कष्टासाठी कोणी मरो । प्रतिष्ठेसाठी आम्हीच उरों ।
लोभासाठी कुणाहि स्मरों । होतें ऐसें ॥१४॥
हें जेव्हां अनुभवा आलें । तेव्हाच अल्पज्ञ आम्ही कळलें ।
म्हणोनि तुझ्या नामी वेधलें । चित्त सर्वतोपरी ॥१५॥
दुजा कोणा शरण जावें । तरी सर्वांगीण शक्ति केंवि पावें ?
एकेकाचे चरण धरावे । तरी वेळ जीवा फावेना ॥१६॥
उजेडाकरितां काजवे धरावे । भुललिया मार्गी परतों जावें ।
तेथे स्वसंवेद्य कैसे व्हावें । निर्भयपणे ? ॥१७॥
तारकेवरि दृष्टि धरली । तीचि स्वयें क्षणांत उडाली ।
तैसी गति होईल आमुची भली । विशाल मार्गी ॥१८॥
तूंची खरा निश्चयी अविनाशी । कधीकाळांही न ढळशी ।
सर्व गुणज्ञान तुझेपाशी । हवे ते ते लाभती ॥१९॥
यासीच पाहिजे सूर्यकिरण । अनेक मार्ग दिसती दूरून ।
अनुभवया आपुलें चिंतन । ध्येय – प्राप्तिरूपाने ॥२०॥
सुर्य जैसा नभी उगवला । अंधकाराचा नाश झाला ।
तैसा तूं हृदयीं प्रकटला । जीव झाला विश्वव्यापी ॥२१॥
चंद्राचे किरण व्यापलें । चकोरचित्त प्रसन्न झालें ।
तैसे तू आपुलेंसें केलें । मग पळाले ताप सारे ॥२२॥
जोंवरि पंचानन नाही दिसला । तोंवरि अतिगर्व जंबुकाला ।
तैसा तुझा प्रकाश नाही पडला । तोंवरि ग्रासती विकारशत्रु ॥२३॥
सूर्ये जीवन देता आपुलें । कमल जैसें हसले फुललें ।
तैसें तुझ्या दर्शनानें झाले । कॄपापात्र जीवांचें ॥२४॥
राजहंसें चोंच पुरवितां । पाणीदुधाची होय भिन्नता ।
तैसें तुझें ज्ञान स्पर्शे चित्ता । दोष – निर्दोषता उमगे ॥२५॥
अति काळोखीं वीज कडाडे । दुरावला गडी दृष्टीस पडे ।
तैसी तुझ्या दर्शनप्रतापें घडे । शांतिप्राप्ति ॥२६॥
अज्ञानामुळे विकार माजती । अज्ञानेंचि लाभते कुसंगति ।
अज्ञानानेच दुरावते प्राप्ति । सत्यस्वरूप देवाची ॥२७॥
तुझे दर्शन म्हणजे ज्ञान । अंतरंगात आनंदभान ।
वस्तु भरोनी पूर्णपण । तुझ्या ठायी ॥२८॥
म्हणोनी हे ज्ञानसमुद्रा ! पूर्णकलात्मक आत्मचंद्रा !
सर्वांगविकासा स्वर्गमुनींद्रा ! कृपा करी आम्हांवरी ॥२९॥
जीवांचें दारिद्र्य द्याया निवारून । एक तूंचि आहेसि संपन्न ।
म्हणोनी आलों तुझ्या शरण । सर्वज्ञा आदिपुरूषा ॥३०॥
होतों तुझेचि परि दुरावलों । ठायींच असोनि भुललो ।
मृगजळास पाणी समजोनि धांवलों । हरिणापरी ॥३१॥
सुकलिया नदीसि पाहूनि । त्रस्त होती पिपासू प्राणी ।
भरतें येतां जाती आनंदूनि । तैसेंचि करी आम्हांसि ॥३२॥
कोवळे अंकुर भूमीवरि फुटले । जेथे मंदशीतल वर्षा चाले ।
त्यापरीच समाधान झालें । आर्त जीवांचें तवकृपें ॥३३॥
ऐसें व्हावयासि करतों प्रार्थना । तन्मय करोनी जीवप्राणा ।
भिन्न उरोंचि नये वाटे मना । व्हावें लवणा – समुद्रापरी ॥३४॥
यांत असती किती अडथळे । आकुंचित केलें अज्ञान – मळें ।
परि तुझ्या विशालतेचें चिंतन बळें । करील मोकळें आम्हांसि ॥३५॥
आम्ही कितीहि दडलों पडलों तरी । तुझें लक्ष उडत्या घारीपरी ।
निवडोनि काढी अज्ञानाबाहेरी । सुख सर्वतोपरीं द्यावयासि ॥३६॥
भुललिया वत्सा गाय हंबरे । पक्षिणी अंडांभवती फिरे ।
तान्हुल्या माय काम करितांहि सावरे । आपुलेंचि म्हणोनि ॥३७॥
भिंगोटी अळीसि गोंजारी । निज्यध्यासें आपणासमान करी ।
तैसा देव भक्तालागी घरी । साधनजाळें पसरोनि ॥३८॥
ऐसें हें प्रत्यक्षचि घडे । जीव आर्त होतां मार्ग सापडे ।
मार्गे चालतां साक्षात्कार जोडे । व्यापक देवदर्शनाचा ॥३९॥
हें जाणोनि करितों प्रार्थना । पूर्ण व्हावया मानवांची आरधाना ।
विश्वरूप पहाया देवदर्शना । आलों चरणां निर्धारें ॥४०॥
तूं व्यापक सर्वांतरात्मा । सत्यज्ञानानंद निष्कामा ।
तैसेंचि होणें ह्रदयें आम्हां । तरीच होय तुझी भक्ति ॥४१॥
म्हणोनि आमुची बुध्दि विशाल करी । कर्म करावया भूलोकावरि ।
आयुष्य दे शतक निर्धारीं । जीवों आम्ही विश्वसेवे ॥४२॥
पुण्यक्षेत्र पंढरपुरी । बैसलों असतां चंद्रभागेतिरीं ।
स्फुरूं लागली ऐसी अंतरी । विश्वाकार वॄत्ति ॥४३॥
तेथे दृष्टांत होई अदभूत । कासया करावी विश्वाची मात ?
प्रथम ग्रामगीताचि हातांत । घ्यावी म्हणे ॥४४॥
विश्व ओळखावें आपणावरून । आपणचि विश्वघटक जाण ।
व्यक्तिपासूनि कुटुंब निर्माण । कुटुंबापुढे समाज आपुला ॥४५॥
समाजापुढे ग्राम आहे । ग्रामापुढे देश राहे ।
देश मिळोनि ब्रह्मांड होय । गतीगतीने जवळ तें ॥४६॥
मानवमात्रांचे प्रथम माहेर । आपुलें गांव त्यांतील घर ।
यांतूनि प्रगति करीत सुंदर । पुढें जावे विश्वाच्या ॥४७॥
प्रथम पाया मानव – वर्तन । यास करावें उत्तम करावें जतन
गांव करावें सर्वांगपूर्ण । आदर्श चित्र विश्वाचें ॥४८॥
गांव हा विश्वाचा नकाशा । गांवावरून देशाची परीक्षा ।
गांवचि भंगतां अवदशा । येईल देशा ॥४९॥
आकारें पॄथ्वी असो विशाल । नद्यापर्वतांनी महाप्रबल ।
परि आमुचें गांवचि मूल । घटक विशाल पॄथ्वीचा ॥५०॥
गांवचि जरि उत्तम नसलें । तरि देशाचें भवितव्य ढासळलें ।
ऐसें मानावें जाणत्याने भलें । ह्रदयामाजीं ॥५१॥
गांवाच्या प्रसन्नतेंत संत प्रसन्न । विश्व प्रसन्न , देव प्रसन्न ।
सर्वाआधी मन प्रसन्न । करावयाचे आपुलें ॥५२॥
हें ओळखाया ज्ञान व्हावें । ज्ञान अनुभवासि आणावें
मगचि सुख संपादावें । विश्वरूप – दर्शनाचें ॥५३॥
जाणावें ग्राम हेंचि मंदिर । ग्रामांतील जन सर्वेश्वर ।
सेवा हेचि पूजा समग्र । हाचि विचार निवेदावा ॥५४॥
यासाठी करावा ग्रंथ प्रारंभ । आचरण – ज्ञान मूळारंभ ।
सक्रियतेचा मूळस्तंभ । उभारावा ॥५५॥
ऐसा ऐकिला मधुर आवाज । भीमेतरी असता सहज ।
तैसाचि वंदिला पंढरीराज । ध्यानरूपाने ॥५६॥
केलें साधुसंतांचें चिंतन । करावया ग्रामाचें पुनर्निर्माण ।
नवीन कांहीच न सांगेन । जुनेंचि देणें देवाचें ॥५७॥
संतमहंतांनी कथन केलें । परि तें पुढे विपर्यस्त झालें ।
मानवा – मानवांत खंड पाडले । पाखंडयांनी ॥५८॥
विशालता गेली मानवांची । रचना केली जातिपंथांची ।
कामाची होती ती कायमची । विभागणी माथीं बैसली ॥५९॥
सेवेसाठी पंथ – मंडळ । ते जनाशी वितंडायाचे झाले खेळ ।
असोनि एकचि गोपाळ । लढले जैसे यादवांपरी ॥६०॥
हें व्दैत जावें निघोन । म्हणूनि सेवा आरंभावी आपण ।
ऐसा संकल्प दृढ धरोन । ग्रंथ केला सदभावें ॥६१॥
आपुल्यापरी काम घ्यावे । जैसें जयासि साधेल बरवें ।
उत्तमचि करित जावें । ईश्वरगुरूसि स्मरोनी ॥६२॥
वाडःमयी सेवा सेवाचि जाण । जेणें मार्गी लागती जन ।
जन तितुका जनार्दन । जाणूनि कार्य करावें ॥६३॥
जें जें आपणासि कळतें । तें तें सांगावे सकळातें ।
आपुलेचि म्हणोनि जन ते । मायबाप ॥६४॥
सांगणाराचि हुशार झाला । ऐकणारा वाया गेला ।
ऐसा समज ज्याने केला। बुडाला तो अहंकारें ॥६५॥
सर्वचि ऐकतील ऐसें नाही। यासि आहे मागील ग्वाही ।
म्हणोनि सेवा खंडों द्यावी । ऐसें नाही उचित ॥६६॥
आत्मसंतोषाकारणें । विश्वसेवेच्या प्रेरणेने ।
ग्रंथ रचिले सहृदयपणें । थोर जनांनी ॥६७॥
कांही सांगती वेश्वाची कहाणी । कांही बोलती देश लक्षूनि ।
आपण सांगावी ग्रामावरूनि । ग्राम – गीता ॥६८॥
कृष्णगीता रामगीता । हंसगीता हनुमंतगीता ।
शिवगीता अवधूतगीता । कथिल्या कोणीं ॥६९॥
गुरूगीता गणेशगीता । पांडवगीता भगवदगीता ।
देवगीता देवीगीता । सर्व झाल्या ॥ ७०॥
सर्वांचा एकचि सार । शुध्द करावे हॄदय – मंदिर ।
सुखी करावें चराचर । तरिच पावे सदगति ॥७१॥
विश्वब्रम्ह बोलत गेला । सभोंवती समाज दुःखी बुडाला ।
ग्रामसेवाहि न कळे ज्याला । त्याचें ज्ञान व्यर्थचि ॥७२॥
वनीं तीर्थी फिरोनी आला । आपुला गांव नाही सुधारला ।
तो कैसा म्हणावा महाभला । एकटाचि ? ॥७३॥
संतांचें ऐसेंचि वचन । आपण तरला तें नव्हे उध्दरण ।
लोकांस लावी सन्मार्ग पूर्ण । तोचि तरला पूर्णपणें ॥७४॥
ठेवोनिया संतांवरि विश्वास । हाचि धरिला मनीं निजध्यास ।
आरंभ केला ग्रामगीतेस । आपुल्यापरी सेवाभावें ॥७५॥
माझी मला साक्ष आहे । मी ग्रंथकर्ता विध्दान नोहे ।
परि धान्यराशींत आपुले पोहे । टाकावे वाटती ॥७६॥
देव प्रेमाचा भुकेला । न पाही जातपात अथवा कला ।
साधाभोळाहि उध्दरिला । ऐसा लौकिक तयाचा ॥७७॥
देव सौंदर्याचा भोक्ता असता । तरि कुब्जेवरि कां प्रसन्न होता ?
देव जरि वैभवचि इच्छिता । तरि विदुराघरीं कां धावे ? ॥७८॥
देवा कलाकौशल्याचि रूचे । तरि कां वेड पेंध्यावाकुडयाचें ?
मीपण जिरवी ब्रम्हदेवाचें । तेथे पांडित्य काय करी ? ॥७९॥
ऐसे देवाचे गोडवे । सांगावे तें कमीच पडावें ।
म्हणोनि आपुल्यापरीं चिंतावे । कार्यं करावे भक्तीने ॥८०॥
आपुला विश्वास जैशापरी । तैसी करावी चाकरी ।
येथे बोलायची उरी । आहे सर्वांलागोनि ॥८१॥
आपणासि देवापायी समर्पावें । विश्वी विश्वाकार व्हावें ।
पहावें तैसे बोधीत जावें । जीवांलागी ॥८२॥
ऐसे धरोनी मानसीं । आरंभ केला ग्रामगीतेसि ।
प्रार्थूनिया संतमहंतासि । आशीर्वाद घेतला ॥८३॥
संतमहात्मांचें हृदगत । देवाला शुभ सृष्टिसंकेत ।
विशद कराया सरळभाषेंत सुखसंवाद आरंभिला ॥८४॥
येथे श्रोतीं विचारिलें । ग्रामगीतेप्रति लिहीणे झालें ।
त्यांत संतदेव कासया घातले । स्तुतिस्तोत्रें गौरवूनि ? ॥८५॥
आपुले गांव उन्नत करावे । सकल लोक हांती घ्यावें
यासि देवाचे गोडवे । गावेत कासयासि ? ॥८६॥
काय देव न म्हणतां काम नोहे ? संता न भजतां वाया जाय ?
आशीर्वाद न घेतां येतो क्षय । सत्कार्यासि ? ॥८७॥
कासयासि मध्यस्थता ? उगीच देवधर्मांची कथा ।
करवी सर्व आपण गाथा । मारावी माथां देवाच्या ॥८८॥
ऐसे देवावरि विश्वासूनि । लोक झालेत दुबळे मनीं ।
गांव भिके लागलें याच गुणीं । सोडा देव देव बोलणे ॥८९॥
तुमचें म्हणणे मीं ऐकलें । लोक पराधीन आळसी झाले ।
परि देवाने ऐसें सांगितले । कोठे आहे ? ॥९०॥
अहो ! देवचि ऐसा नाही झाला । मग सांगेल कैसा इतरांला
हा तों विपर्यास केला । भित्र्या आळसी लोकांनी ॥९१॥
ज्यासि करणें नको कांही । त्याने द्यावे देवाची ग्वाही ।
आपुलीं पापें लपवावीं सर्वही । पाठीमागे ॥९२॥
लोकांत वाढवावा भ्रम । आपुले चुकवावेत श्रम ।
देवाचिया नामें चालवावें कुकर्म । त्यांनीच समाज बुडविला ॥९३॥
म्हणोनि मी तैसे न सांगेन । येथे जें केलें देवस्मरण ।
तें भित्रे आळसी कराया जन ।नाही जाणा निर्धारें ॥९४॥
देव म्हणजे कर्तव्यशूर । न्यायनीतीचें माहेर ।
क्रांतीकार्याचे दिव्य निर्झर । अग्रसर जगामाजीं ॥९५॥
देव म्हणजे अतिमानव । मानवाचा आदर्श गौरव ।
त्यांचे कार्य ध्यानीं राहो । फूर्ति यावया पुढिलांसि ॥९६॥
येथे मुख्य देवाचें व्याख्यान । नाही केलें यथार्थ पूर्ण ।
देवासि पुरूषोत्तम समजून । वागा म्हणालों सर्वाना ॥९७॥
मुख्य देवाचें आरंभी स्मरण । त्यांतहि त्याचें एकेक लक्षण ।
तेंच साधकासि व्हावे साधन । म्हणोनिया आठविलें ॥९८॥
चला विशालतेच्या मार्गी । जे गेले ते तरले जगीं ।
भरोनि दिली अंतरंगीं । हीच कीर्ती भाविकांच्या ॥९९॥
मित्रहो ! गांव व्हावें स्वयंपूर्ण । सर्व प्रकारें आदर्शवान ।
म्हणोनीच घेतलें आशीर्वचन । पूर्वजांचें ॥१००॥
आशीर्वाद म्हणजे त्यांचें वचन । ऐकोनि घ्यावें देऊनि श्रवण ।
त्या फळवावें कार्य करोन । यासि आशीर्वाद बोलती ॥१०१॥
लोक थोर आशीर्वाद घेती । परि कार्य थोडेहि न करिती ।
तेणेंचि फजीत पावती । गुलाम दुर्बळ होऊनि ॥१०२॥
आमुचें आशीर्वादाचें लक्षण । थोरांनी करावें मार्गदर्शन ।
बोधमार्ग उमगावा आपण । सफल करावा संकल्प ॥१०३॥
एरव्ही थोंरानी म्हणावें शतं जीव । आम्हीं व्यसनें करावी मॄत्युठेव ।
अभ्यास न करितां बुध्दिमान भव । आशीर्वाद कैसे फळे ? ॥१०४॥
अंध दुबळा भाविकपणा । तो कधीहि न रूचे माझ्या मना ।
संतदेवाची निष्क्रिय गर्जना । करील तो अस्तिक नव्हे ॥१०५॥
आम्ही मुख्यतः कार्यप्रेरक । चालती आम्हां ऐसे नास्तिक ।
ज्यांचा भाव आहे सम्यक । सुखी व्हावे सर्व म्हणूनि ॥१०६॥
भलेही तो देव न माने । परि सर्वां सुख देऊं जाणे ।
मानवासि मानवाने । पूरक व्हावें म्हणूनिया ॥१०७॥
ग्रामांतील सर्वजन । होवोत सर्वसुख – संपन्न ।
घेऊं नये कुणाचा प्राण । समाजस्थिती टिकावी ॥१०८॥
आम्ही सर्वचि संतुष्ट राहूं । सर्व मिळोनि सर्व खांऊ ।
रांबू सर्व , सुखें सेवूं । जें जें असेल तें सगळें ॥१०९॥
आमची संपत्ति नसे आमची । आमची संतती नसे आमची ।
कर्तव्यशक्तीहि नसे आमची । व्यक्तिशः उपभोगार्थ ॥११०॥
हें सारें गांवाचें धन । असो काया वाचा बुध्दि प्राण ।
ऐसें असे जयाचे धोरण । तो नास्तिकहि प्रिय आम्हां ॥१११॥
तो तत्त्वतः नास्तिकचि नोहे । जो सर्वांसि सुखविताहे ।
तो देव देव जरी न गाये । तरी देवसेवाचि त्या घडे ॥११२॥
आम्ही देवाचें नांव मध्ये घातलें । परि सर्वांच्या सुखार्थ कार्य केलें
कर्तव्यतत्परतेसीच वर्णिलें । जिकडे तिकडे ॥११३॥
लोकांपुढे विशाल ज्ञान । ठेवाया अत्युच्च आदर्श कोण ।
म्हणोनि देवाचें नामाभिधान । घेतलें विशाल भावाने ॥११४॥
आम्ही आपुल्यासाठी मरतो । देव सकळांसाठी कार्य करतो ।
हाचि भाव त्याने स्फुरतो । म्हणोनि धरिला देव चित्तीं ॥११५॥
देव म्हणजे घेवचि नोहे । सर्व कांही देवचि आहे ।
ऐसा ज्याचा संप्रदाय । त्यासि भजूं जीवेंभावें ॥११६॥
अंतिम ध्येय अखंड शांति । अनुभवा यावी जीवाप्रति ।
याचलागी केली स्तुति । साध्यसाधनाची ॥११७॥
जे शांती आणि सत्य । अंगी मुरवोनि झाले कृतकॄत्य ।
तेचि सेवामुर्ति संत स्तुत्य । आदर्शरूपे ॥११८॥
उदारचरित संतसज्जन । मनोभावे तयांसि वंदन ।
जे उपदेशिती जनी जनार्दन ।
गांव संपन्न करावया ॥११९॥
साधुसंत देवधर्म । मानवोध्दारचि त्यांचें कर्म ।
तेंचि आठवूनि उध्दरूं ग्राम । तुकडया म्हणे ॥१२०॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरुशास्त्र – स्वानुभव संमत ।
देवसंत वंदोनि कथिले ह्रदगत । प्रथम अध्याय संपूर्ण ॥१२१॥ग्रंथ खरेदीगाथा प्रकाशन
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
*******************************
ग्रामगीता अध्याय दुसरा
॥ श्रीगुरूदेवाय नम : ॥
देवें निर्माण केली क्षिती । प्रजा वाढवी प्रजापति । मानवसमाज राहाया सुस्थितीं । धर्म सकळां निवेदिला ॥१॥
धर्म बोलावया शध्द एक । परि त्याचा विस्तार अलौकिक । लौकिक आणि पारमार्थिक । मिळोनिया ॥२॥
अनेक प्राणी जेथे राहती । त्या सर्वांची राहावी सुस्थिती । समान समाधानाची गति । त्यास धर्म म्हणावें ॥३॥
आत्मरूपाची धारणा । सर्वांठायी समभावना । विश्वकुटुंब ऐशा आचरणा । धर्म म्हणावे निश्चयें ॥४॥
आपुली साधावी उन्नति । सौख्य द्यावे इतरांप्रति । या उद्देशे जी जी संस्कृति । धर्म म्हणावे तिजलागी ॥५॥
परस्परांशी वागणूक । ज्यांत न्याय – नीति सम्यक । प्रत्येकांचे कर्तव्य चोख । धर्म ऐसें त्या नांव ॥६॥
कोणाचा द्रोह न करून । करावा ऐहिक उत्कर्ष पूर्ण । साधावे आत्मसमाधान । हाचि बाणा धर्माचा ॥७॥
सर्वांस असावा संतोष । दुःख न व्हावें प्राणीमात्रास । याचा सक्रिय कराया अभ्यास । धर्मनीति बोलली ॥८॥
भिन्न लोकांची भिन्न कामें । मिळोनी पुरती जीवनकर्मे । असोत भिन्न गुण भिन्न नामें । परि सुख सर्वांचे सहकारीं ॥९॥
नको सत्तेचा बडगा त्यासि । नको दंडभय सत्कर्मासि । आपापले कर्म सर्वासि । धर्म शिकवी सर्वांगें ॥१०॥
धार्मिक त्यासचि म्हणावें । सत्तेवाचूनि वागे बरवें । स्वयें आपुल्याचि स्वभावें । समरस होई सर्वांशी ॥११॥
नको वैद्य अथवा डॉक्टर । आपणचि राहे आरोग्यतत्पर । नको वकील न्यायाधीश दंडधर । न्यायव्यवहार सहजचि ॥१२॥
नको धाक तरवारीचा । चुकीस्तव तळमळे आत्मा साचा । साक्ष देतो अंकुश देवाचा । अंतरामाजीं ॥१३॥
ऐसें ज्याचे हृदयीं स्फुरण । तोचि खरा धर्मवान । बाह्य अवडंबर धर्मचिहन । तें तें गौण , धर्म नव्हे ॥१४॥
शुध्द सात्विकता प्रकट करावी । लौकिकीं तीच जागवावी । आपुल्या चारित्र्याने सांभाळावी । सुव्यवस्था जगाची ॥१५॥
व्यक्तिधर्म , कुटुंबधर्म । समाजधर्म , गांवधर्म । बळकट होई राष्ट्र्धर्म । प्रगतिपथाचा ॥१६॥
व्यक्ति व्हावी कुटुंबपूरक । कुटुंब व्हावें समाजपोषक । तैसेंचि ग्राम व्हावें राष्ट्रसहाय़क । राष्ट्र विश्वाशांतिदायी ॥१७॥
याकरितां जी जी रचना । तियेसि धर्म म्हणती जाणा । देशद्रोह अधार्मिकपणा । एकाच अर्थी ॥१८॥
मुख्य धर्माचें लक्षण । त्याग अहिंसा सत्य पूर्ण । अपरिग्रह ब्रम्हचर्य जाण । तारतम्ययुक्त ॥१९॥
निर्भयता शरीरश्रम । परस्परांशी अभेद प्रेम । पूरक व्हावया विद्या सत्कर्म । सकलांसाठी ॥२०॥
सर्व विश्वची व्हावें सुखी । ही धर्माची दृष्टी नेटकी । ती आणावी सर्व गांवलोकीं । तरीच लाभ ॥२१॥
विश्वाचा घटक देश । गांव हाचि देशाचा अंश । गांवाचा मूळपाया माणूस । त्यासि करावें धार्मिक ॥२२॥
व्यक्तिधर्म सर्वां कळावा । कुटुंबधर्म आचरणी यावा । ग्रामधर्म अंगी बाणावा । राष्ट्रधर्माच्या धारणेने ॥२३॥
व्यक्ति – व्यक्ति व्हावी धार्मिक । धर्म नव्हे एकांगी लटक । भौतिक आणि पारमार्थिक । विकास व्हावा सर्वांचा ॥२४॥
प्रत्येकासि शरीर , मन । वाणी , इंद्रियें , बुध्दि , प्राण । या सर्वांचें विकास साधन । तोचि धर्म ॥२५॥
ऐशा सदधर्माचें ज्ञान । आधी प्राप्त व्हावें सर्वांगीण । मगचि त्यासारिखे जीवन । जगतां येई या लोकीं ॥२६॥
यासाठीच आश्रमव्यवस्था । पूर्वजांची उत्तम प्रथा । आरंभी मिळे धर्माची संथा । पुढे जीवन धर्ममय ॥२७॥
मानव पशूयोनींतूनि आला । नराचा नारायण होणें त्याला । यासाठी संस्कार देऊनि सावरिला । क्रमाक्रमाने ॥२८॥
मानवाकडोनि जें जें घडतें । तें बरें – वाईट दोन्ही होतें । त्यांतूनि निवडावे लागतें । पापपुण्य ॥२९॥
त्यांचे सुधारोनि आचरण । द्यावें लागतें नवें वळण । जेणें आपलें करील उध्दरण । इतरां सहायक होऊनि ॥३०॥
यासाठी धर्मे नेमिले संस्कार । आश्रम गोविले जीवनीं चार । आयुष्य कल्पूनि वर्षे शंभर । विभागलें ते उन्नतिस्तव ॥३१॥
मानवजीवनीं करितां पर्दापण । ब्रम्हचर्याश्रम लागे जाण । जो सर्व आश्रमांचें मूलस्थान । पाया म्हणावा जीवनाचा ॥३२॥
ज्याचा ब्रह्मचर्याश्रम साधला । त्याचा पुढील काळ सुखी गेला । मग प्रत्येक आश्रम त्याला । उत्कर्षदायी होतसे ॥३३॥
या ब्रह्मचर्याश्रमचें साधन । चाले गर्भधारणेपासून । पोटांतचि असतां जीव पडोन । जतन करावा संस्कारें ॥३४॥
संस्कार दुष्परिणामकारी । न पडावे आंतील गर्भावरि । म्हणोनी मातापित्यांनी सदाचारी । राहावे सदभावें ॥३५॥
न करावें अश्लील भाषण । न बघावें दृष्य हीन । न राहावे व्यसनाधीन । दुर्गुणी अन्न न खावें ॥३६॥
आहारविहार सात्विक पूर्ण । उत्तमगुणी चिंतन वाचन । न ऐकावे शॄंगारगाय़न । गर्भवतीस घेवोनि ॥३७॥
येथोनि पाहिजे जतन केलें । पुढे मूल जन्मासि आलें । तेव्हापासूनि संस्कार घडले । पाहिजेत सत्कर्माचे ॥३८॥
घरीं पुत्ररत्न जन्मलें । कांही दिवस त्याचें कौतुक केलें । परि जन पुढे पाहूं लागले । कर्तव्य तयाचें ॥३९॥
मुलगा काय खेळणें खेळतो । काय बघतो कोठे जातो । कैसा बोलतो चालतो गातो । पाहती जन ॥४०॥
मुलास जैसें कळों लागलें । तैसें त्यास सांभाळणें अवश्य झालें । त्याचे समोर न पाहिजे बोलिले । दुर्विषय कोणीं ॥४१॥
त्यावरि उत्तम संस्कार घडावे । म्हणोनीच व्रतबंधादि बरवे । शिकवावे पाठ करोनि घ्यावे । उत्तम विषय ॥४२॥
मग जो तो त्यासि म्हणे । काय रे ! केलें की नाही वाचणे ? कैसा फिरतोसि रानेंवनें । वेडया – पिशांसारिखा ? ॥४३॥
तुज नाही का संस्कार । घडावया सदगुणी व्यवहार ? काय करिती पालक चतुर ? लक्ष नाही तुझ्यावरि ॥४४॥
सांगितली नाही का स्नानसंध्या । स्मरावयासि जगदवंद्या ? नमस्कारिलें नाहीस का प्रतिपाद्यां । सकाळींसायंकाळी जाऊनि ? ॥४५॥
मग का फिरतोसि रानावना ? कैसा होशील शहाणा ? उपदेश देती ऐसा , सदगुणा । वाढवाया जन थोर ॥४६॥
घडावया उत्तम संस्कार मायबाप शिकविती सदाचार । व्हावया उत्तम गुणी चतुर । मोठेपणी ॥४७॥
आठवर्षांचें आंतचि त्याला । पाहिजे उपनयन संस्कार केला । तोहि नको रूढीचा बांधला । नाटक नुसतें बटूचें ॥४८॥
उपनयन म्हणजे विद्येचें व्रत । ब्रह्मचर्याश्रमाची सुरुवात । गुरुजवळी करणें समर्पित । जीवन त्याचें घडवावय़ा ॥४९॥
तोहि गुरु असावा ब्रह्मचारी । अथवा वानप्रस्थ तरी । त्याने घ्यावी काळजी पुरी । मुलांचिया ब्रह्मचर्याची ॥५०॥
त्याचें राहणें खाणें पिणें । खेळ खेळणें ग्रंथ वाचणे । लक्ष ठेवावें आचार्याने । मनोरंजनादिकावरि ॥५१॥
जरा चुकलिया चुकतचि जातें । मग सावरेना कांही केल्य़ा तें । इंद्रियां वळण जैसे लागतें । तैसेंचि होतें जन्मभरि ॥५२॥
म्हणूनि गुरुआश्रमीं नियम । प्रत्येक आचरणी संयम । छात्रालयी हीच उत्तम । दॄष्टी असावी सर्वत्र ॥५३॥
मुलगा अभ्यासा लागला । कीं सात्विक खाणें असावें त्याला । खारट आंबट तिखट मसाला । देऊं नये भोजनीं ॥५४॥
चमचमीत चुरचुरीत । अति मधुर तळीव पदार्थ । अथवा रुक्ष कृत्रिम मिश्रित । भोजनासि न द्यावें ॥५५॥
साधें ताजे अन्न द्यावें । वेळेवरि झोपवावें जागवावें । झोपतां जागतां जवळी नसावें । स्पर्शणारें कोणी ॥५६॥
कराया लावावें प्रातर्ध्यान । सांयकाळीं प्रार्थना पूर्ण । झोपतां जागतां चिंतन । आदर्श महापुरूषांचें ॥५७॥
नित्य नियमें उषःपान । सुर्यनमस्कार आसन । पोहणें आणि निंबसेवन । आरोग्यदायी जें सोपें ॥५८॥
शीतजलें करवावें स्नान । सकाळीं रानींवनीं गमन । करवावें नेहमी पठणपाठण । चारित्र्यवंतांचें ॥५९॥
शौकिन राहणी वर्जावी । सुगंधी अत्तरें फुलेंहि त्यजावीं । कोणी बाल न ठेवी तेल न लावी । ऐसें करावें ॥६०॥
बघूं न द्यावें दर्पणीं तोंड । वाढूं न द्यावें पोषाखाचें बंड । पान बिडी चहाचे थोतांड । सर्वतोपरी वर्जावें ॥६१॥
कोणीहि न घ्यावे मादक द्रव्य । तोंडी नसावें नाटकीं काव्य । समजावूनि द्यावें सेव्यासेव्य । उपवासहि करवावा ॥६२॥
कराया सांगावें आपुलें काम । दुसर्यासाठीहि परिश्रम । शिकवावें बंधुभगिनी – प्रेम । सेवाधर्म शिकवावा ॥६३॥
बसवूं नये मुलींसह शिक्षणीं । तेथे संमिश्र नाटकें कोठोनि ? स्त्रैणांसंगती शृंगारगायनी । क्षणभरीहि बसों न द्यावें ॥६४॥
मुलाचें वय जसजसें वाढे । तोडावे स्त्रियाचें संबंध गाढे । नेहमी चरित्रवंतांचे धडे । द्यावेत तयासि ॥६५॥
विवाहादि कार्ये न दाखवावीं । शॄंगारकाव्यें न शिकवावीं । व्यायामदंगलीं खेळवावी । मुले निर्भयत्वें ॥६६॥
अश्लीलता कोठेहि न दिसावी । दिनचर्या आदर्श असावी । सकाळीं सायंकाळी द्यावीं । बौध्दिकें ब्रह्मचर्याची ॥६७॥
सांगावे ब्रह्मचर्याचें महिमान । ब्रह्मचर्याचा उद्देश कोण । काय सेविल्या होतें रक्षण । ब्रह्मचर्याचें ॥६८॥
ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्माचरण । ब्रह्मतेजाचें साधन । विद्याप्राप्तीचें वर्तन । वीर्यरक्षण ब्रह्मचर्य ॥६९॥
ब्रह्मचर्यासमान कोण । जगीं महत्त्वाचें साधन ? जो ब्रह्मचर्य करी पालन । तो देवासमान होतसे ॥७०॥
रिध्दिसिध्दी त्याच्या दासी । देव धांवती त्याच्या हांकेसि । सूर्यासमान कांति तयासि । लाभतसे निरोगी ॥७१॥
भीष्मचा व्रतनिश्चय । कार्तिकेयाचें चातुर्य । शुकाचा ज्ञानयोग निर्भय । लाभे ब्रह्मचर्याने ॥७२॥
अवधूताची दृष्टी विशाल । हनुमंताचे महाबल । ब्रह्मचारी पावे महाचपल । वज्रदेह ॥७३॥
सर्व बळांत वीर्यबळ । वीर्य नाही तो दरिद्री दुर्बळ । रोगांचिया मुखींचा कवळ । नेहमी होतो ॥७४॥
ज्याने वीर्य सांभाळलें । यश तयासि माळ घाले । वीर्य क्षीण होतां मॄत्युने केले । शिकार त्यासि ॥७५॥
वीर्यअंगी आहे ओज । वीर्याअंगी नवें तेज । वीर्याअंगी आरोग्यबीज । बुध्दिसामर्थ्यहि ॥७६॥
ऐका वीर्य कैसें बनतें । चाळीस शेर अन्न पचतें । त्याचें एक शेर रक्त होतें । वीर्य त्याचें दोन तोळे ॥७७॥
पुरुष रोज एक शेर जेवला । तरी एक महिना तीस शेरांला । त्यांत दीड तोळा उपजला । वीर्यरसबिंदु ॥७८॥
तो नष्ट होय एका क्षणीं । केवढी थोर केली हानि ! द्रव्य मिळविलें कष्ट करोनि । केली धुळधाणी हौसेने ॥७९॥
ब्रह्मचारी पतन पावला । महिन्याची कमाई खोवतो क्षणाला । केवढा हा तोटा झाला । आयुष्याचा ? ॥८०॥
सातां दिशा अन्नरस होई । तो साता दिसां रक्तपण घेई । रक्तामधूनि मांस होई । थोडें थोडें ॥८१॥
त्यांतूनि मेद आणि हाडें ।साता दिसां मज्जा वाढे । मग वीर्य निपजे थोडथोडें । सप्ताहानंतरी ॥८२॥
बेचाळीस दिवसानंतर । वीर्य शुक्रधातु शक्तिकर । त्यासि किती प्रयास दिवसरात्र । अन्नखर्च कितीतरी ॥८३॥
तें अमोल वीर्य देहातील रत्न । ज्यावरि देहाचें जीवन । ते आरोग्यदायी अमृतकण । तेज वाढे रोमरोमीं ॥८४॥
म्हणून यासि सांभाळावे । ओज सामर्थ्य वाढवावें । सूर्यचंद्रापरी शोभावें । ब्रह्मचर्याने ॥८५॥
ऐसें शिकवावें बाळां तरुणां । बौध्दिक द्यावें सर्व जना । बुध्दि बनतां वेळ लागेना । जीवन आदर्श व्हावया ॥८६॥
गुरुजनीं ऐसे द्यावेत धडे । आपुला आदर्श ठेवोनि पुढे । विद्यार्थी तयार होतां चहूकडे । राष्ट्र होई तेजस्वी ॥८७॥
चोवीस वर्षे ऐसीं गेलीं । त्याची जीवन – सफलता झाली । गृहस्थपणें गुढी उभारली । सत्कार्याची त्यापुढे ॥८८॥
ब्रह्मचारी घे गृहस्थपण । शंभर वर्षे जगे तयाचें संतान । रोगराई दुबळेपण । तया न बाधे सर्वथा ॥८९॥
यानेच गांव होईल आदर्श । बलवान बनेल सर्व देश । मानवासमाजाचा उत्कर्ष । होईल सर्वतोपरी ॥९०॥
हें साधाया पहिला उपक्रम । पाहिजे ब्रह्मचर्याश्रम । जेणें प्रजा होई कार्यक्षम । स्वतःसाठी तैसी राष्ट्रासाठी ॥९१॥
राष्ट्रासाठी जीवन बनविणें । त्यासि चारित्र्ययोग संपादणे । आरोग्यबल शरीरीं राखणें । ब्रह्मचर्यायोगें ॥९२॥
परस्परांत प्रेम राखणें । समाजाकरितां तत्पर होणें । त्यासाठीहि आधी जीवन बनविणे । हाचि पाया आवश्यक ॥९३॥
जे हे नियम मुलांसाठी । तीच मुलींकरितां रहाटी । वयाचीच मुख्य़ विषमता पोटी । राही तयांच्या ॥९४॥
भारतीं झाल्या ब्रह्मचारिणी । विद्यासंपन्न तेजस्विनी । त्यांचे आश्रम स्वतंत्र स्थानी । आदर्शरूप ॥९५॥
जोंवरि हे होते आश्रम । तोंवरि राष्ट्र बलवान उत्तम । वाढूनि व्यसनें विषयप्रेम । पतन झाले समाजाचें ॥९६॥
धर्माचा पाया विद्यार्थीधर्म । तयासाठी ब्रह्मचर्याश्रम । त्यानेच जीवन होईल उत्तम । व्यक्तीचें आणि राष्ट्राचें ॥९७॥
म्हणोनि साधा या व्रतनियमाला । असेचि आश्रम काढा गांवाला । शिकवा आपुल्या भावी पिढीला । लक्ष देऊनि मित्रहो ! ॥९८॥
मी हें जाणतो मागील वर्म । त्याकाळीं सुलभ श्रध्दा संयम । तैसे आज करितां आश्रम । कठीण जाईल गांवासि ॥९९॥
उपभोग सकलांचे वाढले । राहणीमाजीं अंतर पडलें । सभोवताली तार चढले । विषयसतारीचे ॥१००॥
मुलींचें विद्यालय अलग नाही । विधवाहि शृंगाराविण न राही । धाक कोणाचा कोणाहि । उरला दिसेना ॥१०१॥
नटवेष घुसले जीवनीं । भुलविलें चित्रपट – कादंबर्यांनी । अध्यापक तोचि विलासी व्यसनी । शॄंगारकाव्य शिकवितो ॥१०२॥
रस्तोरस्तीं खाद्य पेयें । वैभवशाली विद्यालयें । चैन हेंच जणू जीवन ध्येय । कोणीं सोय लावावी कोणा ? ॥१०३॥
ऐसे वातावरण जरी असलें । तरी ह्रदयवंताने पाहिजे सुधारलें । आपुलें गांव बिघडू दिलें । ऐसे न करावें सुज्ञाने ॥१०४॥
नियमित मुलांचें वर्तन । नियमित ठेवावें खानपान । नियमित ब्रह्मचर्याचें पालन । घडलेंच पाहिजे ॥१०५॥
सर्व भुक्तिमुक्तिसि कारण । असे ब्रह्मचर्य धर्मज्ञान । म्हणोनि विनवितों श्रोतेजन । इकडे दुर्लक्ष न व्हावें ॥१०६॥
ऐसे साधाल जेवढयापरीं । संतान बळकट होई संसारीं । गांवाचे स्वास्थ वाढेल निर्धारीं । तुकडया म्हणे ॥१०७॥
इति श्री ग्रामगीता ग्रंथ । गुरू – शास्त्र – स्वानुभव – समंत । धर्म ब्रह्मचर्य निवेदिले येथ । दुसरा अध्याय संपूर्ण ॥१०८॥
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥ग्रंथ खरेदी
*******************************
ग्रामगीता अध्याय तिसरा
श्रोतियांनी प्रश्न केला । मागे ब्रह्मचर्याश्रम निरूपला । जीवन -विकासाचा बोलिला। पाया धर्ममय ॥१॥
तेथे संशय उपन्न झाला । काय ब्रह्मचारी राहणें सर्वांला ? मग संसाराचा उलाढाला । कोणी करावा ? ॥२॥
यांचें उत्तर आहे सोपें । जग चाले कोणाच्या प्रतापें ? आपुलेंच रडें आपणा न संपे । म्हणे जगाचें कैसे होय ? ॥३॥
अरे ! तुम्हांस याची चिंता कशाला ? तें पाहूं द्या निर्मीत्याला । तुम्ही साधलिया साधा व्रताला । ब्रह्मचर्याच्या ॥४॥
नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळा । परंतु अधःपात टाळा । वृत्ति आठवे विषयचाळा । तरि सांभाळा गॄहधर्म ॥५॥
चोवीस वर्षे ब्रह्मचर्य । नियमें सांभाळिले वीर्य । तरि याने का खुंटेल कार्य । संसाराचे ? ॥६॥
मुलगा जरा वयांत आला । हवें तैसे वागूं लागला । बाळपणीच भोगी तारूण्याला । जन्म गेला दुःखीं मग ॥७॥
ऐसे क्षयी श्वानसूकर । दुबळे पाप्याचे पितर । यांनी होईल का संसार । कधी सुखाचा ? ॥८॥
त्याचें जीवन म्हणजे पाप । त्याचा संसार म्हणजे ताप । त्यांचें संतान म्हणजे शाप । संसारासि ॥९॥
संसार सर्व सुखी व्हावा । आपुलाहि उध्दार घडावा । यास्तव ब्रह्मचर्याचा ठेवा । साधलाचि पाहिजे ॥१०॥
संसारपंथ न मोडावा । प्रजातंतु न खंडावा । म्हणोनि ब्रह्मचार्याने साधावा । गॄहस्थाश्रम ॥११॥
ध्यानीं घेवोनि निसर्गनियम । धर्मे योजिला गृहस्थाश्रम । ज्याने व्यक्ति -गांव -राष्ट्र उत्तम । धारणेंत चाले ॥१२॥
इंद्रियांची दुर्धर गति । ती लागेना सहज हातीं । पुढे होऊ नये फजीती । म्हणोनि यावें या मार्गी ॥१३॥
येरव्ही लग्न केलेंचि पाहिजे । त्याविण कार्यचि न साजे । ऐसा आग्रह धरतील जे । ते व्यर्थवादी ॥१४॥
जयासि साधे इंद्रियदमन । वृत्ति सत्कार्यी रमे पूर्ण । त्याने केलेंचि पाहिजे लग्न । ऐसें नाही ॥१५॥
परि संसार न करितां विरागी होय । त्यासि आहे महाभय । सेवासाधनाहि कठिण जाय । बिकट आहे मार्ग तो ॥१६॥
मुक्याने वेद अभ्यासावे । लंगडयाने पर्वतीं चढावें । आधंळ्याने युध्द करावें । तैसे कठिण ब्रह्मचर्य ॥१७॥
हें साधणें सोपें नाही । तैसीच ही निसर्गाशीं लढाई । म्हणोनि त्याचा राजमार्ग तोहि । कथिला धर्मे ॥१८॥
मुलगा धर्मविद्या शिकला । अभ्यासाने सदगुणी झाला । शक्तियुक्तींनी उंबरठा गांठला । तारुण्याचा ॥१९॥
घडलें निष्ठावंत ब्रह्मचर्य । शरीरीं प्रगटलें ओजवीर्य । निसर्गेचि झालें अनिवार्य । लग्न करणें ॥२०॥
न जाणों लग्नासि झाला उशीर । घडेल झणी दुर्व्यवहार । म्हणोनि वडील होती चिंतातुर । मुलासाठी ॥२१॥
योग्य देती लग्नसंस्कार । बालपणाचा पाडोनि विसर । करिती तया जबाबदार । दीक्षा देवोनि संसाराची ॥२२॥
गृहस्थाचा काय धर्म । कोणतें आचरण काय वर्म । कैसें आचरावें कर्म । गृहस्थाश्रमा शिकविती ॥२३॥
आजवरि होता ब्रह्मचारी । आता वाढली जबाबदारी । पत्नी येंता आपुल्या घरी । घरचि लागे साधावें ॥२४॥
मागे विद्यार्जनाचा व्यवहार । पुढे पाऊल पडे कामावर । म्हणोनि सावध – सावधान सत्वर । बोलती ज्ञाते ॥२५॥
निधि घेऊनि ज्ञानाचा । मार्ग सुधारावा जीवनाचा । धर्म साधावा कुटुंब -राष्ट्राचा । याचसाठी सावधान ॥२६॥
प्रकृतीचा संयोग दिला । व्यक्तीने कुटुंबरूपें विकास केला । तेणें घराचा भाग पडला । अंगावरि ॥२७॥
कैसे घडेल उद्योग करणें । आपुला सर्वांचा निर्वाह साधणें । लग्नसंस्कारें लाविली बंधनें । समाजधर्माचीं ॥२८॥
एकपत्नीव्रता घ्यावें । वाईट कुणाकडे न बघावें । हेंच निश्चयाने शिकवावें । लागे तया ॥२९॥
काहीं घडतां दुर्व्यवहार । कलंक लागे घराण्यावर । म्हणतील मुलगा कुलांगार । जन्मा आला ॥३०॥
याच कारणासि जपावें । सात्विक मार्गां अवलंबावें । संती सांगितले जें बरवें । तेंचि करावें सर्वथा ॥३१॥
एकांतीं लोकांती स्त्री पाहोन । होऊं न द्यावें वृत्तीचें उत्थान । प्राण गेलियाहि अमोल जीवन । खोंवू नये कुमार्गीं ॥३२॥
एका पत्नीसि शास्त्रें नेमिलें । ऐशा गृहस्थाश्रमीं राहिलें । तरी तो ब्रह्मचारीच म्हणविलें । पाहिजे आम्हीं ॥३३॥
गृहस्थाश्रम जरी घेतला । पथ्याने विषयीं वागला । तरी तो ब्रह्मचारीच समजला । जातो गृहस्थ ॥३४॥
त्यासाठीं उभयतांनी पाळावा संयम । कारणाविण नको समागम । येरव्ही आपले व्रतनियम । दोघांनीहि आचरावें ॥३५॥
संतानाकरितांच वीर्य देणे । येरव्ही आपुलें ब्रीद रक्षिणें । ऐसें साधलें जीवन ज्याने । महान तपस्वी ॥३६॥
अहो ! लग्न जरी केलें । तरी विषय -दास्य नाही सांगितलें । जन्म निभवावयासि मिळविले । साथीदार लग्नाने ॥३७॥
जिंकावया कामवृत्ति । पत्नी , नव्हे वाढवाया ती । उत्तममार्गे मिळवावी संपत्ति । तीहि आसक्ति जिंकाया ॥३८॥
जीवन -शक्ति एक झाली । तेणें सुकीर्ति प्रकाश पावली । सतकार्य -कळी उमलों लागली । ऐसें व्हावें ॥३९॥
सुख व्हावें मातापित्यासि । बंधुभगिनी आणि इतरांसि । वागण्याची रीति ऐसी । मोह पाडी सर्वांना ॥४०॥
मोकळें बोलणें गोजिरवाणें । चाल चालणें चारित्र्याने । जीवन कंठणे उज्ज्वलतेने । थोरामोठयांचें पाहूनि ॥४१॥
संतॠषींनी कथिले ज्ञान । त्याचें करणें अध्ययन । यानेच फिटेल ॠषिॠण ।गृहस्थाचें ॥४२॥
संतान करावें आदर्श साचें । तरि ॠण फिटे मातापित्याचें । अथवा आपणचि नाम वाढवावें तयांचें । देशसेवेने ॥४३॥
विश्वीं देव जाणूनि सेवावा । तोचि वैश्वदेव बरवा । प्राणीमात्रासि वाटा द्यावा । हाचि यज्ञ पावन ॥४४॥
यानेचि फिटे देवॠण । गृहस्थाश्रमी सर्वांचें जीवन । संतोषवावे दीन दुःखी जन । सेवाभावें ॥४५॥
उचित करावी कुटुंबसेवा । जीवसेवा , ग्रामसेवा । ध्यानधारणेचा ठेवा । त्रिकाळ नेमिला सर्वांसि ॥४६॥
गृहस्थाश्रमीं ऐसें वर्तलें । अतिमहत्त्व जीवना आलें । साधुसंती गौरविलें । ऐशा गृहस्थाश्रम ॥४७॥
असो कोणताहि आश्रम । त्यांत मुख्य असे संयम । विकासाचा वाढता क्रम । त्यागबुध्दीच्या ॥४८॥
गृहस्थासि संतान झाले । उपभोगाचें पारणें फिटलें । पुढे संस्कार बळावले । त्यागवृत्तीचे ॥४९॥
आपुली असली -नसली हौस । वाहे मंद सावकाश । सुख व्हावें पुत्ररत्नास । वाटे पित्यासि ॥५०॥
आपणासि आवडे घास । तो राखून देई तयास । दुसर्याच्या सुखार्थ भोगी त्रास । हें शिक्षण गृहधर्मी ॥५१॥
त्याच्या गुणात आपुलें भुषण । त्याच्या कीर्तीत समाधान । तो वाईट होतां दुषण । लागेल आम्हां ॥५२॥
ऐसी धरोनि दूरदृष्टी । व्हावें लागे त्यासाठी कष्टी । प्रसंग पडतां उठाउठी । धांवूनि झेली स्वतःवरि ॥५३॥
परि आपुल्या पुत्राकारणें । कोणावरि अन्याय न करणें । आपुल्या ऐसींच समजणें । मुलें सर्वांचीं ॥५४॥
सर्वांकरितांच झटावें । ऐसें व्यापकपण साधावें। हेंच गृहस्थाश्रमीं शिकावें । लागे तत्व ॥५५॥
पुत्रावरि दया करी । तीच दासदासीवरि । पंक्ति प्रपंच नाही अंतरी । तोचि धन्य गृहधर्म ॥५६॥
पुत्र शिकून मोठा झाला । एक होता दुसराहि जन्मला । तिसरा होतांचि संसार संपला । पाहिजे पित्याचा ॥५७॥
न संपतां मग यातना । भोगाव्या लागताति नाना । वानप्रस्थाश्रम म्हणोनिच जाणा । योजिला धर्मसंस्कारें ॥५८॥
ऐसें जयाने साधलें । त्यासीच पुरूष म्हणणें शोभलें । येरव्ही ते विषयी झाले । गधे घोडे वानर ॥५९॥
मीं तों ऐसें नवल पाहिले । एकाने चाळीस विवाह केले । त्यास साठ पुत्र झाले । ते राहिले शेतावरि ॥६०॥
एका शेतावरि एक पत्नी । चिमण्या हाकली महाराणी । लग्न म्हणजे आमदानी । जंगलीजेठांची ॥६१॥
असा हा संसाराचा तमाशा । वारे संसाराची आशा । सगळया आयुष्याची दुर्दशा । वासनेपायीं ॥६२॥
काहीं दोनचार स्त्रिया करिती । आयुष्य सर्वांचे नागविती । ही तों आहे पशुवृत्ति । गृहस्थाश्रम म्हणों नये ॥६३॥
पुरुषा बहुपत्नींचा अधिकार । स्त्रियांनी कां न करावे चार ? हा दुर्गतीचाचि विचार । दोघांचाहि ॥६४॥
एका स्त्रियेसि दहा पति । अजूनहि कोठे असे ही रीति । त्या माऊलीची कोण गति । देव जाणे ॥६५॥
हा सर्व अज्ञानाचा पसारा । वाढवाल तेवढा वाढे भारा । म्हणोनि आळा या विकारा । घातलाचि पाहिजे ॥६६॥
एकदा एक पत्नी केली । पुढे पत्नीची भाषाचि संपली । तरीच दोघांनाहि लाभली । शांति संसारी ॥६७॥
संसार सदाचाच अपूर्ण । विकारी नसे समाधान । ऐसी गाठीं बांधोनि खूण । विचारें सुख साधावें ॥६८॥
दोघांचें व्हावें एक मन । तेथेचि नांदे स्वर्ग पूर्ण । होतां आदर्श संतान । पांग फेडील देशाचा ॥६९॥
यावरि श्रोतीं विचारलें । संतानासाठी लग्न नेमिलें । परि एका स्त्रियेसि संतान न झालें । म्हणूनि केलें दुजें लग्न ॥७०॥
त्यासि निषधिलें आपण । आता सांगा न होतां संतान । कैसें फिटूं शकेल ऋण । देशाचें आणि वडिलांचें ? ॥७१॥
लग्न केलियाहि वरि । पुत्र न होतां उदरीं । म्हणती त्यास अधोगति सारी । प्राप्त होते ॥७२॥
याचें उत्तर यथार्थ ऐका । हा समजचि वेडयासारखा । सेवेने ज्ञानाने मुक्तिसुखां । प्राप्त होतो कोणीहि ॥७३॥
पुत्र न होतांचि एक । संन्यासी ब्रह्मचारी कित्येक । तरले ऋषिमुनि संत देख । बुडालीं अनेक श्वानसूकरें ॥७४॥
निपुत्रिकास अधोगति । ऐसें जे ग्रंथवेत्ते म्हणती । त्यांच्या म्हणण्याची निष्पत्ति । दुसरी होती ॥७५॥
भारतीं ऐसा काळ आला । संन्यास देती ज्याला त्याला । महत्त्व न द्यावें लग्नकार्याला । ऐसें झाले ॥७६॥
ज्यानें त्याने तप करावें । ऐसें धरलें बहुतांच्या जीवें । म्हणोनि हें बंधन घालावें । लागलें ग्रंथकर्त्यां ॥७७॥
पुत्र व्हावा कुल -उध्दारी । येरव्ही ती वाझंचि बरी । ऐसेंहि बोलिलें निर्धारी । ग्रंथामाजीं ॥७८॥
यांतूनि हाच निघे सार । समाजधारणेसाठी संसार । पुत्र नसतांहि होतो उध्दार । प्रयत्नशील गृहस्थाचा ॥७९॥
समाजाच्या उनत्तीचें सुत्र । खंडूं न द्यावें सर्वत्र । यासि पूरक तोच योग्य पुत्र । बाधक तारि ती अधोगति ॥८०॥
पापपुण्य आपुलें आपणा । पुत्रबंधु न तारी कोणा । ही ग्रंथांची सत्य घोषणा । विसरूं नये कोणीहि ॥८१॥
एक पुत्र जरी नसला । सर्व पुत्र आपुलेचि म्हणाला । सर्वाच्याहि उपयोगा झाला । तरि झाला उध्दार त्याचा ॥८२॥
असेल मुलासाठी धन । करावें सत्कार्यासि अर्पण । यांत भावना ठेवूं नये भिन्न । तरीच पावे सदगति ॥८३॥
आपुलें घरचि नव्हे घर । विश्व आपुलें मकान सूंदर । हेंचि शिकावया असे संसार । उध्दार तो याच मार्गे ॥८४॥
ऐसा करावा पूर्ण विचार । दोघांनी आपुलें शोधोनि अंतर । दूरदृष्टीचा साधावा व्यवहार । पुत्र असले नसले तरी ॥८५॥
मन काढावें घरांतूनि । पुत्रास जबाबदारी समजावोनि । पुत्र नसतां गावांस अर्पूनि । देशाटनीं निघावें ॥८६॥
निघावें पत्नीस घेऊनि। जी धर्मअर्थकामीं सांगातिणी । ती जरि साथ न दे मोक्षसाधनीं । पुत्राजवळी राहूं द्यावें ॥८७॥
पत्नी जरी देई सहयोग । तरी जीवनीं वर्जावा भोग । दोघांनाहि अंगी बाणवावा त्याग । निश्चयाने त्यापुढे ॥८८॥
कार्य संपले संसाराचें । पुढील जीवन वानप्रस्थाचें । मिळोनी तपाचे सदवर्तनाचे । धडे पाळावे दोघांनी ॥८९॥
पाहावीं विशाल स्थानें मंदिरें । तीर्थें वनें मुनि -कुटीरें । अनासक्त व्हावया मनें शरीरें । चित्त लावावें सत्कार्यीं ॥९०॥
सर्वकार्यासि वाहून घ्यावें । अध्यात्मभावा अनुभवीत जावें । आणिकासहि धडे द्यावे । शिकवावा सेवाभाव ॥९१॥
सेवेसाठी घ्यावी दीक्षा । न्यावी लया गांवाची अवदशा । काम करावें भरूनि हर्षा । सर्वांसाठी अंतरी ॥९२॥
शिक्षणसंस्था , आश्रमसंस्था । सत्संगसंस्था परमार्थसंस्था । यांची करावी सर्व व्यवस्था । शांतीसाठी ॥९३॥
अंध पंगु महारोगी । अनाथ आणि वॄध्द जगीं । आश्रम चालवावे जागजागीं । त्यांच्या सेवेचे ॥९४॥
गृहस्थांना वेळ न फावे । म्हणोनि वानप्रस्थें लक्ष द्यावें । मुलाबाळांसि संगोपावें । ब्रह्मचारि रक्षूनि ॥९५॥
द्यावें जीवनाचें शिक्षण । जेणें कार्यकर्ते निघतील पूर्ण । सर्वांगीण उन्न्तीचें ज्ञान । द्यावें तयां आश्रमस्थानीं ॥९६॥
हें कार्य वानप्रस्थाने करावें । घरादारांचे बंध तोडावे । अनासक्तीने वागावें । सेवेसाठी सर्वांच्या ॥९७॥
नुरतां संसारात वासना । वैराग्य येतें सहज वर्तनां । उरले तें हेचि कार्य जाणा । शिक्षण द्यावें सर्वांसि ॥९८॥
ग्रामसेवाचि देशसेवा । देशसेवाचि ईश्वरसेवा । हेंचि अनुभवावया जीवभावा । वानप्रस्थ आश्रम ॥९९॥
तिसरा वानप्रस्थ आश्रम । हा संन्यासाचा उपक्रम । व्हावया वासनेचा उपशम । अंतरामाजीं ॥१००॥
पुढे आहे संन्यासधर्म । वानप्रस्थाचा तोडण्यासि भ्रम । अनुभवूनि आत्माराम । वृत्ति उपराम कराया ॥१०१॥
जेव्हां घरांतूनि मन निघालें । सर्वदेशी होऊनि सेवे लागलें । संन्यासवृत्तीने क्रमें साधलें । परमात्म्य अंगी ॥१०२॥
संन्यासी शिकवी वानप्रस्थासि । शेवटीं स्थितप्रज्ञता कैसी । प्राण गेल्याहि आसक्क्तीसि । स्पर्श मुळी होईना ॥१०३॥
वानप्रस्थीं संसार त्यागला । संन्यस्तीं स्वरूपं योग झाला । परम रस वृत्तीने चाखला । धागाचि खुंटला आसक्तीचा ॥१०४॥
कळला आत्मा -परमात्मा सकळ । जीव -ब्रह्म कैवल्य केवळ । प्रज्ञावॄत्ति होय निश्चळ । स्वरूपामाजीं ॥१०५॥
ही स्थितप्रज्ञता अंगी मुरली । त्यासि जीवन्मुक्ति लाभली । याचि देहीं त्याने साधली । पूर्ण सफलता जीवनाची ॥१०६॥
तो सकळां झाला स्फूर्तिदायक । निःस्पृहतेने मार्गदर्शक । जीवनदृष्टी देई सम्यक । सर्व जगाला ॥१०७॥
हेंचि सत्य -धर्माचें ध्येय । हेंचि सर्व कर्मांचें श्रेय । सर्व ग्रंथाचें हेंचि तात्पर्य । तुकडया म्हणे ॥१०८॥
इति श्री ग्रामगीता ग्रंथ । गुरुशास्त्र -स्वानुभव संमत । तिन्ही आश्रम निरूपिले येथ । तिसरा अध्याय संपूर्ण ॥१०९॥
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
********************************
ग्रामगीता अध्याय चौथा
॥ श्रीगुरूदेवाय नम : ॥
मागे झालें निरूपण ! चार आश्रमांचें वर्णन । त्यांतील तत्त्व आहे सनातन । सर्वांसाठी ॥१॥
त्यांची करूं जातां योजना । उत्तम चाले समाजधारणा । ऐहिक उत्कर्ष अधात्मसाधना । सर्वांसि साधे ॥२॥
व्यक्तीचीहि पूर्ण उन्नती । समाजाची उत्तम स्थिती । आश्रमधर्मीं साधे निश्चती । आजहि सर्व ॥३॥
लहानपणी ब्रह्मचर्य पाळावें । गुरुघरीं विद्यार्जन करावें । पुढे मग्न करोनि निभवावें । पुत्रपौत्रां ॥४॥
ब्रह्मचर्यें घ्यावी धर्मसंथा । गृहस्थें साधावी अर्थव्यवस्था । काम जिंकणें वानप्रस्था । मुक्त व्हावया ॥५॥
पुत्र कामाकाजीं लागलें । की वैराग्य घ्यावें आपण भलें । सेवासाधनार्थ सोडिलें । पाहिजे घर ॥६॥
करावी ग्रामसेवा ज्ञानसेवा । वानप्रस्थवृत्ति बाणवूनि जीवा । आणी मोक्षासाठी साधावा । संन्यासभाव ॥७॥
संन्यासी सर्वांसीच होणें आहे । त्याविण नाही मोक्षाची नाही सोय । मोक्षावांचूनि तरणोपाय । दुसरा कोठे ? ॥८॥
वासना हाचि भवसागर । आसक्ति हाच खरा संसार। ज्ञानें त्यांचा पावणें पार । हाचि मोक्ष ॥९॥
झाला वासनेचा नाश । त्यासीच नाम असे संन्यास । मग त्यांचें सर्व करणें निर्विष । आदर्श लोकीं ॥१०॥
मुक्त तो वासनेंतूनि मोकळा । कोठे नाही आसक्तीचा लळा । ओळखोनी आत्मस्वरूपी सकळा । विलीन होई ॥११॥
हीच जगाची अंतिम धारणा । कर्म कराया निर्मळ बाणा । यांतचि वसते उपासना । उध्दाराची ॥१२॥
ही भूमिका ज्यासी गवसली । त्यांची कर्मे योगरूप झालीं । ही संन्यासदशा साधिली । पाहिजे सर्वांनी ॥१३॥
चौथा आश्रम वृध्दपण । ऐसें असले जरी वचन । तरी या आत्मविकासासि बंधन । लागु नसेचि वयाचें ॥१४॥
हें सर्वकांहि वृत्तीवरि । वृत्तीच करावी लागें सुसंस्कारी । बाह्यदीक्षा सहायकारी । म्हणोनि वर्णिली धर्मग्रंथीं ॥१५॥
कल्पिले आयुष्याचे चार भाग । भोगांतूनि साधाया त्याग । परि शतवर्षाचें आयुष्य अव्यंग । कोणास लाभे ? ॥१६॥
म्हणोनि प्रथा न पाहतां दीक्षांची । तत्त्वें चारहि आश्रमाची । आचरावीं जीवनीं साची । तातडीने सर्वांनी ॥१७॥
मात्र ज्या क्षणी वैराग्य आलें । तेव्हांचि घर सोडुनि पळालें । ऐसेंहि नाही पाहिजे केले । वेडयापरी ॥१८॥
कोणी वैराग्य येतां घर सोडती । तीर्थाटनीं भटकाया जाती । जीवन दुसर्यावरि जगविती । भीक मागती दारोदारीं ॥१९॥
पुन्हा वाढती क्रोध कामभाव । भोगूनि दुःख पाहूनि गौरव । संसाराचा पुन्हा प्रभाव । पडे त्यांवरि ॥२०॥
यासाठी दीक्षा संस्कारें घेणें । उचित जीवाच्या प्रगतीकारणें । परि बहिरंग दीक्षेचें सोंग धरणें । व्यर्थचि आहे ॥२१॥
माझा विश्वास आहे संस्कारावरि । परि व्यवस्था लागते तैशापरीं । नाहीपेक्षा उपेक्षाचि बरी । ऐशा दीक्षेची ॥२२॥
मग तो असो आश्रमदीक्षा । संप्रदायदीक्षा गुरूदीक्षा । व्रत्तदीक्षा वा कार्यदीक्षा । धर्मदीक्षेसहित ॥२३॥
दीक्षेने मन तयार होतें । परि कर्म पाहिजे नित्य केलें तें । आचराविण फजीती होते । दीक्षितांची ॥२४॥
एकादशीची घेतली दीक्षा । भोजन करी मागोनि भिक्षा । लोक पाहूनि हा तमाशा । हासती वेडा म्हणोनिया ॥२५॥
दीक्षा घेतली व्रतबंधाची । नाही संध्या नित्यनेमाची । काय करावी संस्कारांची । व्यवस्था तेथे ? ॥२६॥
ब्रह्मचर्याची दीक्षा घेतली । संयमदृष्टीच बिघडली । तैसीच गृहस्थाश्रमाची झाली । उलटी रीति ॥२७॥
आश्रमपण निघोन गेलें । तमाशाचे भाव वाढले । तत्त्वाविण सामर्थ्य कुठलें । दीक्षेमाजी ? ॥२८॥
वानप्रस्थ म्हणोनि घर सोडलें । बाहेर व्यापार करूं लागले । संन्यासी मानासाठी झगडले । तरि ते व्यर्थ ॥२९॥
घातली भगवीं वस्त्रें अंगावरि । परि क्रोध भरला अंतरी बाहेरीं । लंगोटीसाठी झगडा करी । यजमानापाशीं ॥३०॥
चुंगी मागूनि धन जमवी । झोपडी बांधूनि वैभवें सजवी । राख फासूनि संन्यासी म्हणवी । दासचि तो संसाराचा ॥३१॥
न सुटे झोपडीचा अभिमान । मांजरी -श्वानावरि प्रेम पूर्ण । वेळ न फावे ब्रह्मज्ञान । सांगावया अनुभवावया ॥३२॥
ही कसली आहे दीक्षा । नाही सेवा नाही तितिक्षा । पशूजैसे शोधती भक्ष्या । मागती भिक्षा चैनीसाठी ॥३३॥
जी दीक्षा जयाने घ्यावी । त्याने ती पथ्थे सांभाळावीं । वृत्ति वाकडी होऊं न द्यावी । वाईट कर्मीं ॥३४॥
नाहीपेक्षा ऐसेंचि जगावें । काम करोनि न्यायें वागावें । नांव बदनाम होऊं न द्यावें । दीक्षा घेऊनि कोणती ॥३५॥
सुखें संसार करावा । साधेल तैसा परोपकार । चारहि आश्रमांचा सार । आचरणीं आणावा ॥३६॥
बायकामुलांची चिंता लागली । म्हणोनि वैराग्याची दीक्षा घेतली । तें वैराग्य नव्हे कुचराई केली । सोंग घेवोनि वैराग्याचें ॥३७॥
एका साधकास वैराग्य आलें । त्याने घरदार सोडूनि दिलें । लंगोटी लावून स्नान केलें । अरण्यामाजी ॥३८॥
रोज रोज स्नान करी । लंगोटी सुकवी झाडावरि । तेथे उंदीर जाऊनि कातरी । लंगोटी त्याची ॥३९॥
तो लंगोटी मागाया गांव जाय। म्हणे काय करावा उपाय ? लंगोटी आमुची खाऊनि जाय । उंदीरराजा ॥४०॥
लोकांनी बैराग्यास सुचविलें । तेथे पाळा मांजरीची पिलें । म्हणजे लंगोटी राखाया झाले । सेवकचि ते ॥४१॥
घेतले बैराग्याने मना । आणलें मांजरीच्या धना । मग त्याची खाण्याची विवंचना । लागली मागे ॥४२॥
लोक म्हणती गायी पाळा । म्हणजे त्यांचा निर्वाह सगळा । आपणांसहि मिळेल गोळा । दहीदूधलोण्याचा सात्विक ॥४३॥
तेंहि त्याच्या मना आलें । लोकांसि मागूनि गोधन केलें । पुढे चार्याची चिंता चाले । मनीं त्याच्या ॥४४॥
चार्या गवताची मागे भीक । लोक म्हणती बाबा ! हे दुःख । करा तेथेचि शेती आणिक । थोडीबहू ॥४५॥
तेंहि पटलें त्याचे चित्तीं । मिळविली मनमाने शेती । राबविलीं गडीमाणसें , पूर्ति । करावया तिची ॥४६॥
अधिकाधिक तेंचि केलें । धनधान्य जमा झालें । सांभाळायाचें कोडे पडले । मनामाजी ॥४७॥
कोण मिळेल इनामदार । नसावा ऐदी अथवा चोर । आपला म्हणोनि करील व्यवहार । ऐसा कोण शोधावा ? ॥४८॥
लोक म्हणती कोणीं ठरवावें ? बुवा म्हणे लग्नचि करावें । म्हणजे होईल आता बरवें । धना मना सांभाळाया ॥४९॥
बिचार्याचे वैराग्य गेलें । पुन्हा संसारबंधन गळीं पडलें । याचें कारण संस्कार पालटले । नव्हते पूर्वीहि ॥५०॥
म्हणोनि म्हणतों वैराग्यासाठी । घर सोडणें नको उठाउठी । त्यासाठी पाहिजे बुध्दि गोमटी । सेवाभावना त्यागवृत्ति ॥५१॥
आपुलें घर सोडूनि द्यावे । गांवचि घर समजोनि रहावें । सर्व गांवाचे काम करावें । देवसेवा म्हणूनि ॥५२॥
मनीं ठेवावें ईश्वरभजन । काम करावें गांवाचें पूर्ण । फुकाचें न करावें भोजन । वैराग्याने कधीहि ॥५३॥
वैराग्य अथवा संन्यासी बाह्य त्यागचि नको त्यासि । त्यागवृत्तीने गृहस्थासी । वैराग्य साधे संसारीं ॥५४॥
वैराग्य म्हणजे आसक्तित्याग । संग्रहत्याग उपभोगत्याग । लागावी अंगी कार्यास आग । ग्रामसेवा करावया ॥५५॥
आपुल्या मुलासारखींच सर्व मुलें । होवोत ऐसें मनी आणिलें । त्यांच्या जोपासनेचें व्रत घेतलें । तोचि विरागी म्हणावा ॥५६॥
आपल्या अंगी असो फाटकें । परि गांवलोक राहोत नेटके । हें साधावया जो कवतुकें । कार्य करी जोमाने ॥५७॥
त्यासी म्हणावे वैरागी । जो सर्व लोभांचा परित्यागी । सेवेसाठी कष्ट घे अंगी । नेहमीच लोकांच्या ॥५८॥
अनेक साधिती स्वावलंबन । दानी दुसर्यास पुरवी धन । जो सर्वस्व आपुलें दे अर्पोन । तोचि संन्यासी म्हणावा ॥५९॥
ऐसा संन्यास सर्वांनी घ्यावा । आधी आपुला प्रपंच सावरावा । मुरलिया फळापरी सुखवावा । समाज मग ॥६०॥
कांही मुलांनाच संन्यास देती । त्यांची असते कोवळी स्थिती । ते जंव भरवयांत येती । पापें करिती मनमाने ॥६१॥
संन्यास घेतलिया स्वयें । मग लग्नहि करितां नये । मग शोधती नाना उपाय । उपद्रव बनती गावांचा ॥६२॥
संन्याशाने संन्यास द्यावा । गांवकर्यांनी जाच सोसावा । ऐसा बुध्दिहीनपणा कां करावा । समाजाने ? ॥६३॥
म्हणोनि हें चूकचि आहे । तो संन्यास संन्यासचि नोहे । वानप्रस्थचि संन्यासी राहे । धोका न होय मुलांऐसा ॥६४॥
संन्यास म्हणजे थकता काळ । आत्मचिंतनी जीवा वेळ । आशीर्वाद मिळावा सकळ । जनलोकांसि ॥६५॥
परि ज्यांनी कष्टचि नाही केले । गृह्स्थी जीवन नाही अनुभविलें । ते संन्यासी म्हणती झाले । आश्चर्य वाटे ! ॥६६॥
ही घडी जेव्हांपासूनि चुकली । ग्रामाग्रामाची फजिती झाली । प्रजा सर्व भिके लागली । गृहस्थाश्रमाची ॥६७॥
झुंडच्या झुंड मुलें नेती । कोणी बैरागी संन्यासी करिती । आणि मग बोके होऊनि फिरती । लोकांमाजीं ॥६८॥
त्यांना नसतो सेवेचा आदर । नसतो कळला कांही व्यवहार । मनास येईल तो उपकार । करितीं लोकीं ॥६९॥
म्हणोनि हें पाहिजे बदललें । अल्पवयीं न पाहिजे मुंडलें । त्यास अभ्यासोनीच काढलें । पाहिजे आधी ॥७०॥
कोणी असती महासंस्कारी । कोणी उपजत अनुभव -थोरी । त्यांनी इच्छेप्रमाणे संसारी । व्हावें न व्हावें ॥७१॥
त्यांना नसे आडकाठी । परि हें सुत्र नव्हे सर्वांसाठी । याने मोडेल परिपाठी । उत्तम गुणांची ॥७२॥
हें संतजनांनी जाणलें । म्हणोनीच कळवळोनि सांगितले । रांडापोरें सोडू नका बोलिलें । परमार्थासाठी ॥७३॥
करावा सुखाने संसार । करावा अतिथींचा सत्कार । बांधा सोपे माडया घर । उत्तम व्यवहारे धन जोडा ॥७४॥
वैराग्य वाढवा त्यांतूनि । सेवा परोपकार साधूनि । रंगा सदाचारें भक्तिरगंणीं । हाचा राजमार्ग संतांचा ॥७५॥
ऐसेचि संती सांगितलें । कितीतरी संत ऐसेंचि वागलें । त्यानेच नांव अमर झालें । तयांचे लोकीं ॥७६॥
हें जाणूनि वागावें आपण । गृहस्थाश्रमचि उज्ज्वल करून । वैराग्याचें तत्त्व सांभाळून । लोकसेवा साधावी ॥७७॥
सवें घेवोनि आपुली पत्नी । सेवा करिती मिळोनी दोन्ही । हेचि आहे वैराग्याची निशाणी । संसारसंग सुटावया ॥७८॥
यांतूनचि प्रकटे खरा संन्यास । नाहीतरि अवघा त्रास । आपण न तरे , न तारी कोणास । आसक्त नर ॥७९॥
आणि कोणी निरासक्त असला । संन्यास घेवोनि वनीं गेला । तोहि नाही उपयोग आला । समाजाच्या ॥८०॥
गृहस्थाश्रमासि नाही जाणलें । ज्याने त्याने मनानेच केलें । यानेच कार्य विस्कळीत झालें । समाजाचें ॥८१॥
गीतेने यथार्थ ज्ञान दिलें । परि तें जनमनाने नाही घेतलें । रूढीच्या प्रवाहीं वाहूं लागले । विसरले सर्वभूतहित ॥८२॥
ब्रह्मचारी अभ्यासचि करी । वानप्रस्थ वनींच विचरी । संन्यासी निरासक्तीच्या भरी । विटाळ मानी जगाचा ॥८३॥
ऐसेचें झालें धोरण आजचें । त्यामुळे ओझें वाढलें गृहस्थाश्रमाचें । प्रत्येकाने प्रत्येकाचें । पूरकत्व सोडलें ॥८४॥
सर्वांनी सर्वचि सोडलें । परि गृहस्थाने अधिक जोडलें । कष्ट करितां करितां मोडलें । हाड त्याचें ॥८५॥
सर्वांनाचि मदत करावी । पुन्हा दीनताचि अंगी घ्यावी । वरोनि त्यासि म्हणे गोसावी । लटका संसार छोड दे ॥८६॥
हें सर्व सहन करोनी । आपुली हौस त्रास विसरोनि । जगाची राखी लाज देऊनि । धनमानादि ॥८७॥
स्वतः शरीराने राबावें । आपुलें जीवन आपण निभवावें । अधिकाधिक देतचि जावें । गांवासाठी ॥८८॥
साधु आला संत आला । राजा आला रंक आला । अतिथि पाहूणा भुकेला । सर्वांसाठी गृहस्थाश्रम ॥८९॥
करी आलेल्यांचा सत्कार । संतसाधूंचा सन्मान सुंदर । सार्वजनिक कामांचाहि बोझा वर । सांभाळीतसे प्रेमाने ॥९०॥
आला जातिदंड राजदंड । तोहि भरतसे उदंड । मुंगीपासूनि सर्व ब्रह्मांड । जीवजन त्याचेवरि ॥९१॥
हें सर्व गृहस्थाश्रम करी । मुलेंबाळें पोसोनि घरीं । काटकसरीने उरवूनि करी । अन्न्दान नम्रतेने ॥९२॥
गृहस्थधर्म म्हणजे जबाबदारी । स्त्रीपुत्रांपरीच सर्वतोपरीं । देश -भेष सांभाळणारी । वृत्ति असे त्याची ॥९३॥
येरव्ही असोत सर्व आश्रम । सर्वात मोठा गृहस्थधर्म । गृहस्थधर्मावरील योगक्षेम । चालतसे सर्वांचा ॥९४॥
ब्रह्मचर्याची शिक्षादीक्षा । वानप्रस्थांची तितिक्षा । संन्यासी ज्ञात्यांची समीक्षा । गृहस्थधर्माच्याचि योगें ॥९५॥
त्यासचि लोक फजूल म्हणती । आणि त्याचेवरीच जगती । ही कैसी आहे रीति संसाराची ! ॥९६॥
म्हणोनि संती गृहस्थ गौरविला । धन्य धन्य म्हणितलें त्याला । तोचि जगाचा मातापिता ठरला । पालनपोषण करणारा ॥९७॥
त्याचे उपकार येरव्ही फिटेना । एकचि आहे त्याची साधना । गृहस्थाचे पुत्र जाणा । शिकवोनि स्थानां बसवावे ॥९८॥
लहानपणींच आश्रमीं न्यावी मुलें । जैसे विश्वमित्रें रामलक्ष्मण नेले । सांदीपनी द्रोणांनी शिकविलें । तैसें विविध ज्ञान द्यावें ॥९९॥
माधुकरीपुरतेंचि गांवी न यावें । गांवाचें जीवन सुधारावें । घृणा करितां नरकी जावें । लागेल अहंकारें ॥१००॥
जोंवरि हवें आहे शरीर । आवश्यक वाटे अन्नवस्त्र । तोंवरि न म्हणावा मिथ्या संसार । सेवा करावी सर्वांची ॥१०१॥
गुरु म्हणोनि न गुरगुरांवें । आत्मवत सर्वांसि जाणावें । उठण्या बसण्यापासूनि शिकवावें । आईसारिखें अज्ञजना ॥१०२॥
आपापलें कार्य सर्वांनी करावें । परस्परांना पूरक व्हावें । म्हणजे जगाचें ओझें जावें । झेललें सहज ॥१०३॥
आश्रमांनी मुलें शिकवावी । गृहस्थांनी मदत पुरवावी । मुलें वाढतां पित्याने घ्यावी । परवानगी पुत्रांची ॥१०४॥
जावें देशपर्यटनीं । अथवा राहावें ग्रामसुधारणीं । पुढे संन्यासीहि होऊनी । सेवाभावेंचि वागावें ॥१०५॥
आपलें पोट सर्वांनी भरावें । वृत्तीसि कार्यें वाढवीत न्यावें । म्हणजे गृहस्थावरि अवलंबावें । ऐसें नव्हे ॥१०६॥
आपपलें कार्य सांभाळावें । जीवमात्रासि संतुष्ट करावें । कोणीच कोणावरि न राहावें । विसंबोनि ॥१०७॥
मग पुढे सर्वचि आहे सेवा । कार्य करावें जीवाभावां । उरला असेल तो सगळा ठेवा । वाटूनि द्यावा गांवासि ॥१०८॥
कोण कोण देतो सेवाधन । आपुलें कार्य सांभाळून । यावरीच खरें महिमान । लौकिकाचें आपुल्या ॥१०९॥
ऐसी आहे परंपरा । जेणें चाले जगाचा पसारा । वेगवेगळ्या कामांचा बटवारा । सारखाचि व्हावा ॥११०॥
जेथे सर्वांसीच काम करणें । कोणीच उत्तम कनिष्ट न म्हणे । सर्व मिळोनी जग साजविणें । आपुल्यापरीं ॥१११॥
मानावे सकलांचे आभार । करावा परस्परांसि पूरक व्यवहार । असो संन्यासी वा गृहस्थ नर । सारखा अधिकार सर्वाचा ॥११२॥
गृहस्थ तनुमनाने कष्ट करिती । संन्यासी त्यांना दिशा दाविती । मग कां उगेचि पायां पडती । एक -एकाच्या ? ॥११३॥
मला हें कांही उमजेना । कोणाचे उपकार आहेत कोणा ? सर्वचि आपापुल्या स्थांना । धन्य असती ॥११४॥
पुत्रधर्म पाळतां पुत्र श्रेष्ठ । पितृधर्म पाळतां पिता वरिष्ठ । तेथे म्हणावें श्रेष्ठ कनिष्ट कोणी कोणां ? ॥११५॥
पायां तयानेच पडावें । ज्याने आपुल्या कर्मासि चुकावें । नाहितरि प्रेम ठेवावें । परस्परांचे दोघांनी ॥११६॥
कोणी कोणासि न लेखावें हीन । तो असे सर्वेश्वराचा अपमान । अभिमानि संन्याशाहूनि महान । ठरे लीन पतिव्रता ॥११७॥
येरव्ही कोणाचाहि आदर । सर्वानी करावा होऊनि नम्र । हा तंव आश्रमधर्माचा सार । अहंकार नसावा ॥११८॥
हीनतेची भावनाहि नसावी । निष्ठेने सत्कार्यें करावी । सहकार्य द्यावें आपुल्या गांवी । गृहस्थाने ॥११९॥
आपुला साधावा गृहस्थाश्रम । पाळावा ग्रामसेवाधर्म । गांवाकरितांच आपुला नेम । सांभाळावा ॥१२०॥
कष्ट करोनि धन जोडावें । तें धन सत्कार्यींच लावावें । कधीहि निरर्थक न वेचावें । छंदी कुणाच्या लागूनि ॥१२१॥
याचें मिळावया शिक्षण । व्हावें गांवोगांवीं कथाप्रवचन । वाढवावा गृहस्थाश्रमाचा मान । नीटनेटका करावया ॥१२२॥
नेटका ऐसा प्रपंच झाला । तरि परमार्थ त्यांतचि साधला । हा समन्वय संतीं सांगितला । तोचि खरा ग्रामधर्म ॥१२३॥
आमुचा गॄहसंसारचि सार । आहे सहकार्याचें भांडार । सर्व मिळोनि उजळूं सुन्दर । ग्रामधर्म आपुला ॥१२४॥
ग्रामधर्माचें महत्त्व थोर । त्यांत गृहस्थधर्मांचा मोठा अधिकार । महातीर्थाचें तीर्थ सुन्दर । तुकडया म्हणे ॥१२५॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु -शास्त्र -स्वानुभव संमत । निरूपला संसारांत परमार्थ । चौथा अध्याय संपूर्ण ॥१२६॥
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
*************************
ग्रामगीता अध्याय पाचवा
॥ श्रीगुरूदेवाय नम : ॥
साधावया पुरूषार्थ परम । आचरावया मानवधर्म । निवेदले चार आश्रम | गृहस्थाश्रम मुख्य त्यांत ॥१॥
गृहस्थाश्रमीच समाज बहुतेक । त्याच्या गरजा असती अनेक । आणि प्रकृतीनेहि लोक । भिन्न भिन्न ॥२॥
जरी मानव दिसती समान । दोन हातपाय डोळे कान । तरी स्वभावाचें भिन्नपण । ओळखूं येतें ॥३॥
स्वरूपाची धारणा वेगळी । जी विचारें भरली सगळी । संस्कार खेळती चेंडूफळी । वेगळाले ॥४॥
एक शांत एक उग्र । एक चंचल एक एकाग्र । कोणें निवडावीं समग्र । गुणकर्में तीं ॥५॥
मग मानव कैसा म्हणावा एक । अधिकारहि न दिसे सम्यक । त्याचें जीवनहि भिन्नतेचें निदर्शक । स्वभावापरी ॥६॥
भिन्न वृत्ति भिन्न प्रकृति । भिन्न कुटुंबें भिन्न संगति । तीं आदळतीं परस्परांवरती । ज्ञान नाही म्हणोनि ॥७॥
त्यांत एक संधि ओळखूं येते । स्वभावसाम्य निवडलें जातें । राजस तामस सात्विक दिसते । प्रकृति वेगळाली ॥८॥
स्वभावाचे तीनचि प्रकार । त्यांत बसती सर्व प्राणीमात्र । जितुकें म्हणोनि विषयमंत्र । या जगीं जीवकोटीचें ॥९॥
ज्याचें अंगी जो मुख्य गुण । त्यापरीच त्याचें सारें वर्तन । प्रत्येकाचें कर्म भिन्न । एकमेकापासूनि ॥१०॥
प्रत्येक भिन्न दिशेस जाई । तरि समाज कैसा सुदृढ राहीं ? मग कैसी उन्नति होई । व्यक्तीची आणि देशाची ? ॥११॥
हें धर्मवेत्त्यांनी जाणलें । गुणकर्मविभाग ध्यानीं घेतले । परस्परांसि पूरक बनविले । समाजव्यवस्थेकारणें ॥१२॥
सत्त्वप्रधान रजप्रधान । मिश्रित आणि तमप्रधान । शुध्दाशुध्द लक्षूनि गुण । विभाग चार नेमिले ॥१३॥
निसर्गावरि केली रचना । म्हणोनि म्हणती ईश्वरी योजना । कल्पिलें बुध्दि – बाहु – उदर – चरणा । समाजपुरूषाच्या ॥१४॥
मुळांत सर्वचि एकसम आहे । परि अनंत गुणें व्यापलें राहे । गुण गुणासि पोषक होय । यासीच संसार बोलती ॥१५॥
धंदे असती अनेक गुणांचे । परि मुख्य भेद चारचि त्यांचे । म्हणोनि चातुर्वर्ण्य नांव याचें । ठेविलें ऋषिजनीं ॥१६॥
संरक्षण देती ते क्षत्रिय । व्यापार करिती ते वैश्य निर्भय । न्यायदर्शन योजनाकार्य । ब्राह्मणवर्णा नेमिलें ॥१७॥
या तिन्ही कामीं अनधिकारी। तया शूद्र नाम निर्धारीं । करी सर्वाची सेवाचाकरी । तोहि सर्वांसि पूरक ॥१८॥
सत्य न्याय अस्तेय संयम । सर्वांसि सारखाचि नियमधर्म । परि आपापलें भिन्न कर्म । वाहूनि पूजिती समाजदेवा ॥१९॥
जो ज्यापाशीं उत्तम गुण । त्यानेच त्याचें चालावें जीवन । व्हावें समाजाचेंहि धारणपोषण । हीच योजना चातुर्वर्ण्यीं ॥२०॥
भिन्न गुणांचा सहकार्य – संगम । त्यांत सर्वांचाचि योगक्षेम । मग कैसा चाले जीवनसंग्राम ? वर्गकलह न राहे ॥२१॥
सर्वकालीं सर्वदेशीं । नैसर्गिक गुणभिन्नता ऐसी । म्हणोनि वर्णाश्रमयोजना जगासि । शांतिदायी ॥२२॥
परि हें तत्त्व राहिलें मागे । आसक्तीचे जडतां धागे । आपुला पुत्र शूद्रापरी वागे । तरी त्या गणावें आपुल्यावर्णीं ॥२३॥
नजरेआड केले कर्मगुण । जन्मावरोनि चालले वर्ण । धंद्यांवरोनी जाति भिन्न । वाढल्या लोकीं ॥२४॥
त्यांतहि ज्ञात्यांनी । ठेविलें धोरण । कर्मांतूनि गुण निर्माण । केले संस्कारांची देऊनि घडण । जन्मलेल्यासि त्या वर्णाचे ॥२५॥
पूर्वी त्यासाठी होते संस्कार । शिक्षणक्रम शिकवी व्यवहार । मागील ऋषी असती चतुर । समाजव्यवस्था चालवाया ॥२६॥
तयांनी कुटुंबेंच संस्थामय केलीं । बालपणापासून शिकवण दिली । परंपराचि तैसी बनविली । प्रयत्नांनी गुणकर्मांची ॥२७॥
शेतकर्याच्या मुलास शेती । तरवार क्षत्रियपुत्राहातीं । वैश्याचीं मुलें तराजू धरती । लहानपणापासूनि ॥२८॥
ब्राह्मणाच्या मुला मंत्रजप । शिकविला जाई आपोआप । ऐसा हा परंपरेचा व्याप । चालला होता ॥२९॥
जो जयाने धंदा केला । त्याचा स्वभावचि तो बनला । स्वभाव बनतां संस्कार जडला । अंगी तयाच्या ॥३०॥
तैसेचि मग त्याचें वर्तन । तैसेंचि खेळणे बोलणें भोजन । अंगे – अंगे जाती बनून । संस्कारसंगे ॥३१॥
परि ही परंपराहि मोडली । सत्तालोभें फूट पाडली । लहानथोरासि भावना वाढली । उपभोगाची ॥३२॥
कांही आपत्ति कांही संगति । कांही सत्ता कांही प्रकृति । यामुळे दुसर्यांचे धंदे हाती । घेतले सुखास्तव ॥३३॥
वैश्यधंदा एकाने धरला । व्याजभोगी व्यापारी बनला । आपुल्याहि मित्राचा घेतला । मुनाफा त्याने ॥३४॥
त्यांत तारतम्यचि न राही । भरमसाट वाढली मुनाफशाही । जनतेचें हित कोण पाही । मिसळून देई माल खोटा ॥३५॥
खोटें बोलणें सहजीं घडे । स्वार्थापायी पाप वाढे । यास कोण सांभाळील चोखडें । सत्ता नसतां जागरूक ॥३६॥
सहज कोणी त्यास म्हणावें । तरि शत्रुभाव अधिक बळावे । मग दोघांचेहि धंदे बरवे । एकाच मार्गीं ॥३७॥
गांवचे लोक विरुध्द होती । म्हणती आमुचीच कां धर्में फजीती ? तेहि पुढे कामचोर होती । अडवणूक करिती वैश्याची ॥३८॥
सर्वांमध्ये कलह माजे । त्यासि निवारावें क्षात्रतेजें । तरि तेहि बिचारे पोटाच्या काजें । धावती स्वैर ॥३९॥
जिकडे पैसा मान मिळे । तिकडे धावंती क्षत्रियबाळें । न्यायनीती कोण सांभाळे ? झुके पारडे पैशांनी ॥४०॥
चोरी पकडण्या चोर धावले । शिपायीबाणा घेऊनि भले । तेणें चोरांना अधिकचि फावले । चोरी करण्या गांवाची ॥४१॥
तेथे ब्राह्मणांनी करावे न्यायदान । सर्वांसि ठेवावें सेवापरायण । तरि तेहि पाहूनि दान मान । झाले त्यांचेंच साह्यकारी ॥४२॥
पुढे ऐसीच झाली रीति । दंडुकेशहासि क्षत्रिय म्हणती । चोरव्यापारी त्यासि बोलती । लोक वैश्याधिकारी ॥४३॥
बुध्दीने जो फाटाफूट करी । तो ब्राह्मण जाहला निर्धारीं । ऐसी बिघडली वर्णव्यवस्था पुरी । गांवोगांवीं ॥४४॥
त्यामाजीं जो कमजोर ठरला । तो शुद्र म्हणोनि बाहेर काढला । अन्नान्नदशा करोनि सोडला । जीवनकलही ॥४५॥
वर्णजातींचे गुणकर्म नाही । मोडून केली नोकरशाही । नागविली भावना सर्वहि । वर्णाश्रमाची ॥४६॥
अभिमान राहिला वर्माचा । चुराडा झाला गुणकर्मांचा । ऐसा घडविला संस्कार गांवाचा । घडी काही बसेना ॥४७॥
ऐसें मुळीच पूर्वी नव्हतें । परस्परपूरक धंदे सर्व ते । सर्वांचेच कल्याण त्यांत होतें । समभावाने ॥४८॥
परि तो सारा वर्णाश्रम । आज होऊनि बसला भ्रम । वर्णांश्रमांतील नेमिलें काम । बहुतेकांनी सोडलें ॥४९॥
ब्राह्मण जोडे शिवण्यासि लागला । चांभार तो पुजारी बनला । क्षत्रियें नोकरीपेशा धरिला । वैश्याघरीं ॥५०॥
वैश्य लढे सैन्यांत जाऊन । शुद्र करिती कथाकिर्तन । यासि वर्णसंकर म्हणती जन । करिती मात्र सर्वचि ॥५१॥
परि जाति मागचीच सांगती । कामे मात्र भलतींच करिती । तेणें होते अनिश्चिती । समजावया लोकांसि ॥५२॥
वडिलांचा धंदा भिन्न होता । तो मुलाच्या जंव नसे हातां । तरि वडिलांचा धंदा मुलाने सांगतां । अर्थ काही निघेना ॥५३॥
म्हणोनि जेणें जें काम करावें । त्याच वर्णजातीचें म्हणवावें । ऐसें तरी असावें बरवें । वर्णजाति मानलिया ॥५४॥
ऐसेंचि नामाभिधान चालतें । आणि सर्व लोक तैसेंचि वागते । तरि वर्णव्यवस्था भ्रष्ट झाली म्हणतें । कोण कैसें ? ॥५५॥
परि जन ऐसें म्हणवाया लाजती । कर्में मात्र विपरीत करिती । पूर्वजांचिया नावें जगती । आळशापरी ॥५६॥
जरी झालो कर्मभ्रष्ट । तरी आपण इतरांहूनि श्रेष्ठ । ऐसा प्रतिष्ठेसाठी बळकट । धरिली रूढि ॥५७॥
वास्तविक कामाकरितां वर्ण झाले । समाजासि सर्वचि लागलें । म्हणोनि सर्वांनाचि महत्त्व भले । ब्राह्मणापासोनि महारावरि ॥५८॥
त्यांत तूं नीच मी उच्च म्हणोन । वाढविलें आडंबर पूर्ण । त्यानेच जाहलें पतन । वर्णांचें आणि गांवाचें ॥५९॥
प्रत्येक धंद्याचें गम्य भिन्न । वेगळी खुराक वेगळें वळण । यासाठीच होतें वेगळेपण । रोटीबेटी – व्यवहाराचें ॥६०॥
तेथे अज्ञानाने भेद पाडले । हाती सत्ता ते मोठे ठरले । समाजाची स्वच्छता करीत मेले । ते ते बोलिले नीच ऐसे ॥६१॥
वास्तविक नीचता दुराचारें होते । खरी उच्चता तपाने लाभते । जातीमातीवरि कैसी ठरते । उच्चनीचता ? ॥६२॥
ज्याने कांही नीचता केली । समाजाने त्यास शिक्षा दिली । म्हणोनि अस्पृश्यता बोलली । कांही कारणें ॥६३॥
परि त्यांची पीढीच नीच समजावी । आपुली नीचता ती लपवावी । दुसर्याची उत्तमताहि न गौरवावी । प्रथाच पडली यापरी ॥६४॥
अरे ! हें कुठलें न्यायदान ? हें तों गुलामीचें लक्षण । याने कैसे होईल पुनर्निर्माण । गांवाचें आमुच्या ? ॥६५॥
म्हणोनि अस्पृश्यता क्रियेवरि मानावी । जाति सर्व एक जाणावी । आपापल्या परीने उचलावीं । कामें सकळांनी ॥६६॥
जाति सर्वांचि एकचि आहे । परि धंदा गुणकर्मांसम राहे । आपल्या उद्योगाच्या प्रवाहें । ओळखी द्यावी ॥६७॥
येरव्ही सर्वत्रचि सर्व वर्ण । सर्वांतचि दिसती सर्वगुण । परि कोणतें गुणप्राधान्य । तेंचि ओळखावें मुख्यतः ॥६८॥
शुद्राघरीं उत्तमवर्तनी जन्मला । तो शूद्रचि कैसा राहिला ? तैसा क्षत्रियाघरीं भ्रष्ट निपजला । तो क्षत्रिय कैसा ? ॥६९॥
एक ब्राह्मण दुकानीं बैसला । मांसमच्छी विकों लागला । त्याची पूजा कराया एक गेला । शोभा देईल काय तें ? ॥७०॥
ब्राह्मण म्हणवूनि विलास करी । नाना व्यसनें अंगीकारी । करी नोकरी सावकारी । तो ब्राह्मण कां मानावा ? ॥७१॥
परंपरेने गोसावी होणें । मग त्याने विवाहाचा थाट करणें । तें केवढें होय लाजिरवाणें । लोकांमाजी ? ॥७२॥
आचार्य आणि आचारी । एकाच जातीचे अधिकारी । म्हणोनि काय आदर एकाचपरी । करावा लोकीं निष्ठेने ? ॥७३॥
ऐसें कोणासहि ब्राह्मण म्हणावें । पूजूनि त्याचे पाय वंदावे । त्याने जोडयांच्या दुकानीं नोकर कां न व्हावें । पाय पुसाया ? ॥७४॥
वास्तविक जातिवंत जे ब्राह्मण । त्यांनी स्वतःच टाळावें हें पूजन । म्हणावें माणुसकीनेच नमन । करूंया सर्वां ॥७५॥
आपण वेगवेगळा धंदा करणारे । सर्व बरोबरीचे मित्र बरे । हें पूजेचें ढोंग सारें । आम्हीच कासया करावें ? ॥७६॥
ऐसें लोकासि शिकवावें । बिघडलें दिसेल तें सुधरावें । जनासि उद्योगि बनवावें । आपुल्यापरी ॥७७॥
जेथे दिसती ब्राह्मणाचे गुण । त्यासि आदरें म्हणावें ब्राह्मण । ऐसा स्थापिलाचि आहे सनातन । नियम वर्णाश्रमाचा ॥७८॥
म्हणोनि गुणांवरचि लक्ष द्यावें । जो ज्या गुणीं तो त्या वर्णीं म्हणावें । सर्व गुणांचा आदर स्वभावें । सर्वांकरितां असावा ॥७९॥
जो जैसा कर्म करूं लागला । तो त्याचि वर्णाचा अधिकारी झाला । सर्वत्र नियम हा चालला । तरीच होईल सुव्यवस्था ॥८०॥
येथे संशय उभा झाला । विविध कर्में करावी लागती एकाला । तरि काय वेळोवेळीं म्हणो त्याला । ब्राह्मण क्षत्रियादि गुणाऐसें ? ॥८१॥
एक वैश्यकर्मी असला । परि ध्यानासाठी मंदिरी बसला । तरि तो वैश्य कैसा ठरला । तया स्थानी ? ॥८२॥
एक भंगी – काम करी । वेळ मिळतांचि ये प्रार्थनामंदिरी । त्याचें भंगी नामचि उच्चारी । कोणत्या न्यायें ? ॥८३॥
त्यां क्षणी तो खराच ब्राह्मण । परि त्याचें नित्यकर्म अन्य । म्हणोनि प्रामुख्याने नामाभिधान । धंदे पाहूनि ठेविती ॥८४॥
एकाचें लक्ष्य मुख्यतः व्यापार । परि तो करितो कीर्तन सुंदर । म्हणोनि त्यास ब्राह्मण म्हणणे साचार । होईल कैसे ? ॥८५॥
सदब्राह्मण शेती करू लागला । म्हणोनि तो माळीच मानला । याने येईल क्षणाक्षणाला । अनवस्थाप्रसंग ॥८६॥
बहुरूपी कधी राजे बनती । म्हणोनि काय राज्य चालविती ? ज्याची कला त्याचे सांगाती । येरां काय वैभव तें ? ॥८७॥
म्हणोनि याची ऐसी आहे रीती । ज्यांत ज्याची मुख्य अंतरवृत्ति । त्याच्या जीवनाची निश्चिती । दाखवि तें विशेष कर्म ॥८८॥
त्याचें विशेष कर्म कोणतें । गुण कोणते विषय कोणते । अंग कोणते अंतरंग कोणतें । तें पाहूनि नाम ठेवावें ॥८९॥
ज्यामध्ये ज्याचें सर्व तनुमन । सर्वस्व ज्यांचें ज्यांत लवलीन । ऐशा प्रमुख गुणावरून । म्हणावा तो त्या वर्णाचा ॥९०॥
येथे म्हणण्याचेंचि नाही महत्त्व । जें जयाचें असेल सर्वस्व । त्यापरी त्याचा व्हावा गौरव । समाजामध्ये ॥९१॥
समाजाची रचना नेटकी । बसेल तैसें करावें कौतुकीं । दीक्षा घ्यावी समजोनि निकी । गुणकर्माची ॥९२॥
जाणत्यांनी तत्त्वें अभ्यासावी । रूपांतरें व्यवहारी आणावीं । बिघडली घडी दुरुस्त करावी । समाजाची ॥९३॥
सुखी व्हावा गृहस्थाश्रम । मिटावा जीवनाचा संग्राम । सहकार्याने नांदावे ग्राम । यासाठी बुध्दि सर्वां द्यावी ॥९४॥
जेव्हा गुण गुणांशी द्रोह करी । तेव्हां पडे बुध्दि अपुरी । हें सांभाळण्याचें कार्य करी । ब्राह्मण तें ॥९५॥
गुणासि गुणाचें सहकार्य । मिळोनि व्हावें सफल कार्य । हा सृष्टिक्रमाचा व्यवसाय़ । ब्राह्मण्याकडे ॥९६॥
हें करावया ऐक्य निर्माण । आज पाहिजेत गुणवंत ब्राह्मण । ब्राह्मण्यावाचूनि हें साधन । घडेचि ना ॥९७॥
सामुदायिक बुध्दीची शिकवण । सर्व जीवांत समत्वस्थापन । विषम पात्रांचें समाधान । करूण देणे ब्राह्मणकर्म ॥९८॥
ब्राह्मण तो दूरदृष्टि । त्याचें घरचि समष्टि । सुरळीत चालण्या होय कष्टी । ब्राह्मण तो ॥९९॥
ब्राह्मण ह्रदयाचा अति निर्मळ । दुष्टबुध्दीचा महाकाळ । हिंसेवाचूनि करी प्राजंळ । मन दुर्जनांचें ॥१००॥
शक्तियुक्तीचा उदार । भक्तिमुक्तीचा आधार । सर्वोदयाने संसार । नटवी जो ॥१०१॥
जो सर्वांसि प्रेमें सांभाळी । गांवसेवाचि मानी आगळी । उणें पडों नेदी कधीकाळी । कोण्या प्रकारें ॥१०२॥
त्याचें लक्ष नोहे येरव्ही । जें बिघडेल तें नीटचि करवी । जुळवाजुळवीची पैरवी । ब्राह्मणाकडे ॥१०३॥
सर्वांशी सर्वाचें जळवावें । कीर्तिस्फूर्तीने ग्राम भरावें । लौकिक पारमार्थिक पडों न द्यावें । उणें ग्रामवासियांचें ॥१०४॥
गांव करावें व्यवहारचतुर । त्यांत भरावे निर्मळ संस्कार । परस्परांत निर्मावा सहकार । न्यायनीतीने चालण्या ॥१०५॥
हें शिकवाया थोरांच्या कथा । सांगत जाव्या मिटाया व्यथा । त्याग वाढवावा उचित प्रथा । थोरामोठयांच्या दावूनि ॥१०६॥
त्यासाठी कृष्णकथा रामजन्म । चालवावा महात्म्यांचा पुण्यतिथिक्रम । ग्रंथांतरीचा न्यायसंग्राम । शिकवावा निर्भय व्हाया ॥१०७॥
प्रत्येकाचें कर्तव्य सांगोनि । आपुल्या उत्साहें उद्योगी लावोनि । करावी ग्रामाची मेळणी । विशाल मार्गे ब्राह्मणें ॥१०८॥
असोनिया गांवी ब्राह्मण । पडली तटे चाललें भांडण । तरि समजावें । तो पावला पतन । गांव मोकाट सुटलें हें ॥१०९॥
त्याने आपली निष्ठा सोडली । म्हणोनि लोकांनी हेळसांड केली । त्याचेकडे कां न आली । पुकार लोकांची ? ॥११०॥
जंव ब्राह्मणचि चुकों लागले । तंव गांवचि स्वैराचारी झालें । नाना तर्हेचे तमाशे माजले । गावांमाजीं ॥१११॥
लोकश्रध्देत व्हावया बदल । काय कारण घडलें प्रबल ? हें जाणेल तोचि निर्मल । त्यागी तपस्वी ॥११२॥
प्रभाव ऐसा अंगी यावया । त्याग यपनियमांची दीक्षा तया । पाहिजे , म्हणोनि तपश्चर्या । करावी लागे ब्रह्मकर्म्या ॥११३॥
आबालवृध्दा समजविण्यासाठी । ओज तेज असावें पाठी । म्हणोनि जपतप , सदग्रंथ कंठी । धारण करावे ब्राह्मणाने ॥११४॥
उपदेश देतां रागावूं नये । लोभें चुकवूं नये निर्णय । म्हणोनि सांभाळावा इंद्रियजय । अध्यात्मउपाय त्यासाठी ॥११५॥
आधी त्याग त्याने करावा । तरीच मग लोकांसि शिकवावा । याच मार्गे परिणाम पहावा । लोकांमाजीं आपैसा ॥११६॥
ही दीक्षा ज्याने घेतली । आपुली भोगवासनाचि निरसली । त्यासीच ब्राह्मण संज्ञा मिळाली । वर्णाश्रमाची ॥११७॥
ऐसे गुण जो धरण्यासि चुकला । तो ब्राह्मण म्हणोनि गौरविला । तरि व्यर्थचि आहे त्याला । पदवी अजागळापरी ॥११८॥
जातिवेषासि वंदणे । हें तों दुसर्याचेंचि सोने । फिटलें कोणाचें पारणे । रुईफळे खाऊनि ? ॥११९॥
ब्राह्मण मुळी जाति नोहे । ती विशालतेची पदवी आहे । हें समजोनि धरावी सोय । ग्रामवासियांनि ॥१२०॥
सर्वाघटीं ब्रह्म ईश्वर । पाहूनि होई सेवातत्पर । तोचि ब्राह्मण सर्वांवर । प्रभाव पाडी नम्रतेचा ॥१२१॥
त्याचें चारित्र्य बघूनि उज्ज्वल । लोभ करिती त्यावरि आबाल । सर्वांसीच सांगे विशाल । धर्म मानवजागृतीचा ॥१२२॥
ब्राह्मण असे अस्पृश्यांचा । क्षत्रियांचा वैश्यादिकांचा । कोणाशीच पारखा त्याचा । शब्द नाही ॥१२३॥
त्याने सर्वांचे भले पाहावें । भिन्न गुणांचे लोक जुळवावे । आणि गांव चालवूनि संतोषावें । बुध्दि देवोनि ॥१२४॥
उगीचचि लोक ना ऐकती । त्यांसि दंड देईल हा ब्रह्ममूर्ति । परि ग्रामी वाईट चालीरीती । प्राण गेल्या न ठेवी ॥१२५॥
ब्राह्मणाचें वचन ना ऐके । तो तिन्ही लोकीं न टिके । याचें कारण हेंचि इतुकें । ब्राह्मण अनर्थ करीना ॥१२६॥
त्याची हेचि साध्यमुद्रा । शांति लाभावो आब्रह्मशूद्रा । ग्रामसुखांत सुख लोकेंद्रा । तपस्वियासि ॥१२७॥
म्हणोनि ब्राह्मणवर्ण श्रेष्ठ बोलला । उगीच नाही डांगोरा पिटला । भृगूची लाथहि झेलता झाला । देव माझा ॥१२८॥
ऐसें ब्राह्मणत्व निर्माण करा । प्रचारक होऊनि घरोघरीं फिरा । तरीच सर्वांसि मिळे आसरा । सुखशांतीचा ॥१२९॥
हें ब्राह्मणत्व नव्हे जातीय । कुणीहि साधावें निर्भय । जो आदर्श प्रचारक होय । तोचि ब्राह्मण निर्धारें ॥१३०॥
ब्राह्मण सर्वांची सदबुध्दि । ती करील अन्य गुणांची वृध्दि । गांवी नांदतील ऋध्दिसिध्दि । गुणकर्मांच्या सहकारें ॥१३१॥
हरिकथानिरूपण राजकारण । सावधपण सेवाप्रयत्न । हा चारी वर्णांचा सार न्यूनपूर्ण । प्रत्येकाने आचरावा ॥१३२॥
लोकशिक्षण न्याय रक्षण । जनांचें पोषण आणि श्रमदान । यासाठी जे जे करितील प्रयत्न । त्यांना साधेल वर्णाश्रम ॥१३३॥
स्वभावें सर्वांनी कर्म करावें । गांव सौंदर्यें साजवावें । सर्वासह उध्दरोनि जावें । तुकडया म्हणे ॥१३४॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरुशास्त्र स्वानुभव संमत। वर्ण – धर्म निरूपला येथ । पांचवा अध्याय संपूर्ण ॥१३५॥
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
*****************************
ग्रामगीता अध्याय सहावा
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
ईश्वरें जग केलें निर्माण । त्याचें कार्य अजूनि अपूर्ण । तें आपल्यापरीं कराया पूर्ण । सदबुध्दि दिली मानवा ॥१॥
एकापासूनि अनेक व्हावे । अनेकासि एकत्वीं आणावें । हा आपुला मूळ संकल्प देवें । चित्तीं घातला सर्वांच्या ॥२॥
अनेक ईषणा प्रेरणा । त्या कारण होती आत्मविकसना । पुत्रपौत्रादि रूपें नाना । मानव आपणा प्रकटवी ॥३॥
कोणी शिष्यशाखा वाढवी । कोणी ग्रंथादिक उपजवी । जगीं आपुली परंपरा चालावी । ऐसी इच्छा स्वाभाविक ॥४॥
जगावरचि मानव जगला । समुदायांतचि उन्नत झाला । तो समुदायाचें कार्य विसरला । तरि तें उचित कैसें ? ॥५॥
पिंडब्रह्मांड हें निगडित । संस्कारहि जगाशीं संबंधित । आत्मज्ञानें राहो जीव अलिप्त । परि उपेक्षा न व्हावी जगाची ॥६॥
सत्य शिव सुखी सुंदर । ऐसा व्हावा हा संसार । हें सोपविलें कर्तव्य थोर । देवें मानवाप्रति ॥७॥
मानवें आपुला उध्दार करावा । तैसाचि समाज सुधारावा । यासाठीच दिला धर्म आघवा । नेमूनि सकळां ॥८॥
यासाठीच झाले अवतार । यासाठीच संतभक्तांचा व्यवहार । सुखी करीन अवघाचि संसार । ब्रीद तयांचें ॥९॥
न सुधारवे अखिल विश्व । तरि उन्नत करावें आपुलेंचि गांव । यानेच संतोषेल देवाधिदेव । लाभेल ठेव मोक्षाची ॥१०॥
हें ठीक म्हणती श्रोतेजन । परि गांवाप्रति आमुचें कर्तव्य कोण ? काय होईल आम्हीच झुरोन ? गांवी कोणी ऐकेना ॥११॥
सर्व करीती आपुल्यासाठी । स्त्रीपुत्रांसाठी चैनीसाठी । परि आठवचि नाही येरासाठी । कांही करावें म्हणूनि त्यां ॥१२॥
सर्वांस वाटे आमुचें ऐकावें । पण ऐकतील कैसे हें न ठावें । म्हणोनि यास्तव पुढे जावें । न वाटे कोणा ॥१३॥
कार्य करावया पुढे जावें । साथ न मिळतां फजीत व्हावें । संकटी कोणी जीव द्यावे ? । वाटे ऐसें बहुतेका ॥१४॥
आम्हांस वाटे गांव सुधारावें । परि सांगा त्यासाठी काय करावें ? कैसे वळतील आघवे । लोक सन्मार्गीं ? ॥१५॥
आपण पुसलिया प्रश्नाचें । मी उत्तर देईन साचें । परि लक्षीं ठेवोनि ह्रदयाचे । आचरा तैसें ॥१६॥
मी सांगेन म्हणूनि नव्हे । संती हेंचि कथिले बरवें । माझा विश्वास जेथे धांवें । तेंचि सांगेन तुम्हांला ॥१७॥
सर्वाआधी एक निश्चय । लोक असती अनुकरप्रिय । विशेष दिसे ती घेती सोय । न सांगतांहि ॥१८॥
मुख्य कार्यकर्त्याची राहणी । निरोक्षोनि बघतीं कोणी । लागती त्याच्याच मागे धावोनी । वत्स जैसे ॥१९॥
म्हणोनी कार्यकर्त्यांत असावें आकर्षण । सेवाचारित्र्यांचे ओजपूर्ण । सुधार नोहे त्यावांचून । गांवाच्या कोण्या ॥२०॥
या मार्गानेचि जनजागृती । हेंचि सूत्र घ्यावें हाती । आपण वागावें तैसे वागती । जनहि सारे ॥२१॥
यासाठी प्रथम करावी आपुली शुध्दि । शरीरशुध्दि ह्रदयशुध्दि । घरशुध्दि ग्रामशुध्दि । सर्वतोपरीं ॥२२॥
जैसें तुम्ही कराल आपुले घर । तें पाहतील जन सत्वर । करतील तैसेचि प्रकार । आपुल्या घरीं ॥२३॥
सुंदर दृश्य पाहतां डोळां । आवडे पाहणाराहि तसाच सोहळा । आपणहि वर्तावयाचा चाळा । करितो प्राणी ॥२४॥
फुललेली बाग पाहिली । अनंतरंगी फुलें फुललीं । सुरस फळांनी बहरली । सौंदर्यखाणि ॥२५॥
पाणी वाहे झरणापरी । वृक्षलतांच्या कुंजांतरी । आमोद दरवळे नानापरी । फळफुलांचा ॥२६॥
गर्द छायेतळीं हिरवळ । दुर्वांकुरांचे जाळे कोमळ । नाना रंगी फुलपाखरें सोज्वळ । मन मोहविती जीवांचें ॥२७॥
कोठे पाणी चमके आरशापरी । कोठे दगडांच्या कणांची कुसरी । कोठे कोमलरूप भूमि धरी । वाटे अंकीं लोळावें ॥२८॥
कोठे भूमिचेहि भिन्न वर्ण । कोठे काळे, पिंगटपण । कोठे पांढरे लाल मधून । सुवर्णापरी ॥२९॥
लतालतावरि झुलती पक्षी । सर्व फळाफुलांचे साक्षी । जरी फिरती अंतरीक्षीं । पिकलीं फळें त्या ठावी ॥३०॥
उडोनि तेथेचि मारिती झडप । रसाचा आस्वाद घेती अमूप । जैसा करील प्राणी संकल्प । तैसा भोग त्या पावे ॥३१॥
जिकडे तिकडे सुगंध उसळे । उल्हासित इंद्रियें भोगती सगळें । नाक कान जीभ डोळे । नाना विषयारसानंद ॥३२॥
ऐसें दृश्य पाहे प्राणी । तेव्हा आपणहि करावें वाटे मनीं । जातो घरासि परतोनि । सजवाया घर आपुलें ॥३३॥
लहान अंगणी बाग लावी । अथवा कुंडींतचि फुलें फुलवी । शृंगारी झोपडी आपुली बरवी । आपुल्यापरीं ॥३४॥
जरि त्या बागचि न दिसता । तरि तो कैसा प्रयत्न करता ? ऐसाचि आहे मानव तत्त्वता । जें देखें आपण करी ॥३५॥
विशेषतः ऐसें मुलांचे वागणें । त्यांचें कार्यंचि प्रतिध्वनि उठवणें । जें जें पाहतील डोळयाने । तेंचि आचरती उल्हासें ॥३६॥
म्हणूनि मुख्यांची ही जबाबदारी । ते जे करतील ग्रामभीतरी । मुलें आचरतील घरीं दारीं । मातापित्यासि वळवोनि ॥३७॥
एका प्रमुखाने कोंबडी पाळली । तिला सुंदर पिलीं झालीं । दुसर्यानेहि तीच घेतली । कला त्याची ॥३८॥
मग गांवासि तोच आनंद । चढला तयांना उन्माद । लढाई करण्याचा लागला नाद । कोंबडियांची ॥३९॥
एकादा कोंबडयांची झुंज पाहिली । सर्व गांवास धुंदी चढली । मग कोंबडयात्रा भरली । लढाईसाठी ॥४०॥
बांधतीं कोंबडयांच्या पायीं सुरा । लढविती मैदानीं भरभरा । रक्तबंबाळ खेळ सारा । क्रूरवृत्तीने वाढविला ॥४१॥
मग पाटील म्हणे कर लावा । पैदासीचा धंदा वाढवा । लोक चेतले गांवोगांवां । झुंज करण्या कोंबडयांची ॥४२॥
बिचार्या दीन जीवानें काय केलें । यांनीच त्यास निमित्त धरलें । त्यांचे प्राण लढतां गेले । धंदे वाढले पापांचे ॥४३॥
एका प्रमुखाने चालना दिली । ती रीती सर्व गांवाने उचलली । प्रौढ माणसेंहि करूं लागली । लढाई मग कोंबडयांची ॥४४॥
सारी शक्ति कोंबडयांमागे । प्रतिष्ठितहि झाले बेढंगे । म्हणोनि एकाने आपुल्या अंगे । नगर-आखाडा निर्मिला ॥४५॥
जमविलें बाल तरुण कांही । उल्हास ओतिला त्यांच्या देहीं । व्यायामाच्या नव्या उत्साहीं । लाविलें तयां ॥४६॥
प्रथम भरविला गांवी दंगल । इनामी कुस्त्यांचा जंगी मेळ । पाहतांचि मुलेंबाळें सकळ । लागले करण्या व्यायाम ॥४७॥
घरोघरीं मुले खेळती कुस्ती । गल्लीगलींत चंग बांधती । चढली व्यायामाची मस्ती । लहानथोरां ॥४८॥
कवायत करेला मल्लखांब । लाठीकाठी भाला लेजीम । तरवार छडीपट्टा मर्दानी काम । व्यायामाचें ॥४९॥
त्याने गांवांतील वाईट व्यसन । सर्वचि गेलें हारपोन । शरीर कमाविण्याची लागली धुन । लहानथोरां ॥५०॥
जो तो आपुली छाती पाही । दंड मोंढे फिरवीत राही । मांडियांचे पट वाढवी देहीं । सौंदर्य यावया मल्लाचें ॥५१॥
मैदानी मर्दानी खेळ चाले । सर्व गांव लाल मातीने रंगलें । कोंबडयांचे व्यसन कमी झालें । लढाई गेले विसरोनि ॥५२॥
दुसर्या एकास बुध्दि सुचली । त्याने जोडी चारूनि मस्त केली । दुसर्या बैलजोडीशीं लाविली । धावण्यासाठी ॥५३॥
जनलोकांचें लक्ष वेधलें । त्यांतचि मनोरंजन वाटलें । पुढे शंकरपट सुरू झाले । गांवोगांवीं ॥५४॥
त्यांत कांही उद्देश उत्तम असती । बैलांना खुराक देवोनि बनविती । स्पर्धेने वाढविती बैलांची शक्ति । शेतीसाठी ॥५५॥
पण त्यांतूनि प्रकटे दुष्परिणाम । राहतें मागे उत्तम काम । बैल पळविण्याचाहि हंगाम । पुढे येतो ॥५६॥
मग जो बैल पळेना । त्यास टोचती तुतारी-अणा । रक्ताळोनि दुखविती प्राणा । नंदीबैलाच्या ॥५७॥
राहिलें शेतीभातीचें काम । शंकरपटाचाचि उद्दम । माणसें करिती कसाबकर्म । नानापरी ॥५८॥
सहजचि गाडी जुंपती । पुराणी हातीं धरोनि टोचती । पळतां पळेना तरी मारिती । निर्दयपणें ॥५९॥
गांव पडले त्याच प्रवाहीं । उत्तम नाद घेणेंचि नाही । राक्षसी धंदे ग्रामीं सर्वहि । वाढूं लागती त्वरेने ॥६०॥
ऐसा धूमधडाका चालला । एकाने गांवी तमाशाचि आणला । सारा रागरंग बदलला । मागीलपैकी ॥६१॥
जो तो लावणी मुखें उच्चारी । घरींदारीं शेतीं मंदिरीं। ज्याच्या त्याच्या तोंडी सारीं । गाणीं विषयांचीं ॥६२॥
तमाशाचे प्रस्थ वाढलें । लहान मुलांत संस्कार बिंबले । मुलें तरुणहि नटूं लागले । तमाशागिरापरी ॥६३॥
जो तो चांगभांग करी । मुद्रा सुरू झाली लाजरी । हावभाव शरीरावरी । नाचती घरी मुलेंबाळें ॥६४॥
आईवडील कौतुक करिती । मुली मौज म्हणोनि हासती । कोणी ताटपाट बडविती । डफासारिखे आनंदे ॥६५॥
परंतु कोणी इकडे बघेना । काय होणार विंटबना । सारा गांव तमाशाच्या रंजना । राजी झाला ॥६६॥
डुबती म्हणे ढोलक ओरडून । तुणतुणें म्हणें कोणकोण । मंजिरा सांगे सर्वजन । परि कोणा न कळें हें ॥६७॥
मग कूठले कथाकीर्तन । भजन वा साधूंचें प्रवचन । टिंगल करिती मार्गी तरुण । सदभावांची ॥६८॥
ज्याने गांवी तमाशे आणले । त्याचे पुत्र नाचे निघाले । गांवोगांवी जाऊं लागले । तेथेहि झाले सुरू फड ॥६९॥
मुलींना मार्गी जायाची चोरी । मुलें छळती निलाजरीं । येणें जाणें वाढवूनि घरीं । नेल्या काढून कित्येक ॥७०॥
मग पाटलासि पडला उजेड । अरे काय वाढले थोतांड ? माझ्या घरांतहि शिरले बंड । तमाशाचें ॥७१॥
माझ्या भावाने तमाशा आणला । त्याचा तर वंशच बिघडला । मुलगी पळाली मुलगाहि गेला । घर दुसर्याचे बुडवोनि ॥७२॥
मग विचारी ज्याला त्याला । कैसें बंद करावें तमाशाला ? जो तो म्हणे तुम्हीच होऊं दिला । धिंगाणा या गांवाचा ॥७३॥
कुस्ती व्यायामाच्या नादांत । गांव सुंदर आदर्श अदभुत । परि हे भलभलते छंद नेत । लया सगळया गांवासि ॥७४॥
सुंदर होतें मुलांचें खेळणें । बरें होतें बैल तयार करणें । पण या पापाने औदासीन्य । आणले गांवी ॥७५॥
आता भोगा त्याची सजा । सारींच मुलें वाजविती वाजा । झाला तमाशाचाचि अगाजा । सर्व गांवी उत्सवीं ॥७६॥
या गांवांत जे जे येती । ते तमाशाचे रंगीच रंगले असती । ओघ न थांबवे पाटलाप्रति । कठीण झालें ॥७७॥
एकाने त्यांत छंद आणला । दारू पिऊन फिरूं लागला । तमाशाचे आनंदाचा लोकांला । कळस दिसे त्या ठायीं ॥७८॥
हळुहळू तीच वाढली प्रथा । दारूबाजांचा जमला जत्था । काय पुसतां गांवाची व्यथा । आता तुम्ही ॥७९॥
कोणी दंढारी तमाशे करी । कोणी दारु पिऊन शिव्या उच्चारी । कोणी कोणा न माने तिळभरी । लहान थोर स्वैर झाले ॥८०॥
व्यभिचार्यांची झाली दाटी । गंजिफा खेळती पैशांसाठी । मुलें करिती चोरीचपाटी । काढती भट्टी घरोघरीं ॥८१॥
मांस खाण्याचें वाढलें व्यसन । चैन न पडे मद्यावांचून । अनेक रोग मांसमद्यांतून । वाढले गांवी ॥८२॥
मुलें तेल लावूनि बाल फिरविती । पान चावूनि कोठेहि थुंकती । सिगारेट ओढूनि धुर सोडिती । धाकचि नाही कोणाचा ॥८३॥
मजूर कष्टाने पैसा मिळविती । तोहि दारूपायीं उधळती । मुलाबाळां उपवास पडती । होय दुर्गति जीवनाची ॥८४॥
दारू पिऊनि मारिती स्त्रीला । सगळया गांवीच चळ सुटला । पूर आला भांडाभांडीला । कोर्टकचेर्या गजबजल्या ॥८५॥
लोळे गटारांत अमीरहि । कोणीहि कोणास मारूनि देई । मुलीबाळी सुरक्षित नाही । ऐसा प्रसंग ओढवला ॥८६॥
पैसाआडका नष्ट झाला । ऐसा गांव उन्नती स चढला ! सगळ्या गांवाचाचि धिंगाणा केला । दारूबाजांनी ॥८७॥
गावांचा मुखंड दारू प्याला । म्हणोनि व्यसन लागले बहुतेकाला । मग सर्व गांवचि लागला । गटारगंगेमार्गी ॥८८॥
तैसेंचि आहे जुगाराचे । चोरीचें आणि व्यभिचाराचें । पहिले बिघडती मुखंड आमुचे । मग बिघडे गांव सारा ॥८९॥
आज जें जें लोकांचें बिघडले । तें तरी कुणाचें होतें पाहिलें । म्हणोनीच तैसे करूं लागले । लोक सर्व ॥९०॥
स्वतः प्रथम त्याने आचरिलें । मगचि लोकांना सांगितलें । म्हणोनीच जनलोक रंगले । रंगी त्याच्या ॥९१॥
सर्व गांवाचें वर्तन । कार्यकत्यावरचि जाण । कार्यकर्ते गांवाचें प्राण । समजों आम्ही ॥९२॥
गांवी चार भले वागती । तरीच गांवा होय उत्तमगति । मुख्य म्हणविणारे स्वार्थ साधती । तरि सर्व गांवचि तैसें ॥९३॥
गांव म्हणजे शुध्द आरसा । जें दाखवाल तें दिसेल सहसा । जें कराल तें करील खासा । गांव आमुचा ॥९४॥
मी जें प्रारंभी बोललो । बाग बघोनि प्रसन्न झालों । तैसाचि घरीं वर्तूं लागलों । ऐसें होते सकळांचें ॥९५॥
म्हणोनि मी आपणांसि विनवितों । योग्य जो वाटे आदर्श तो तो । निर्माण करूनि ठेवतां येतो । प्रभाव आपुल्या अंगीं ॥९६॥
अस्थिपंजर फकीर तो आज । भूमिदानयज्ञाचा उठवी आवाज । तरि तीच लाट उसळली सहज । गांवोगांवीं ॥९७॥
आपली झुगारूनि सुखचैन । किती लोक दान मागती फिरून । गरीब-अमीरहि स्वार्थ विसरून । देती भूदान उल्हासें ॥९८॥
पुढारी जें जें गांवी करी । लोक तैसेंचि वागती घरोघरीं । म्हणोनि याची आहे जबाबदारी । मुखंडावरती ॥९९॥
तेव्हा काय करावें आपुल्या गांवी । ती योजना आपण ठरवावी । तैसीच आपुली सर्व सुधारावी । टापटीप ॥१००॥
त्यांत नेहमी सावध असावें । जें जें करणें असेल बरवें । तें दूरदृष्टीने शोधूनि पाहावें । तेव्हा घ्यावे कार्य हातीं ॥१०१॥
नाहीतरि सहज केलें । परि तें प्राणावरीच आलें । सारें गांवचि बिघडलें । होईल ऐसें ॥१०२॥
म्हणोनि गांवी तेंच सुरू करावें । ज्याने गांव नांवलौकिक पावे । येरव्ही शिवेआंतहि येऊं न द्यावें । विडंबनकार्य ॥१०३॥
कदाचित केलें एखाद्याने । तेंहि सहन करू नये कोणे । लावावी उधळोनि समंजसपणें । वाईट रीति ॥१०४॥
कारण जैसी संगती घडे । तैसे अनुभवा येई रोकडे । म्हणोनि सावध असावें मागेपुढे । उत्तम गुण वाढवाया ॥१०५॥
उत्तम खेळ उत्तम कार्य । उत्तम कला उत्तम सौंदर्य । गांवास भूषण ज्याने होय । तें अगत्याने उचलावें ॥१०६॥
कोठे कांही व्यसन घुसलें । त्यास लगेच पाहिजे कमी केलें । त्यासाठी गांवचे मुखंड लागले । पाहिजेंत पाठीं ॥१०७॥
जरी कांही नाराजी झाली । मुलेंबाळें रुसूं लागलीं । तरी पाहिजे समज घातली । वडीलधार्यांनी ॥१०८॥
सर्वांमाजी उत्तम उपाय । तें वातावरणचि बदलूनि जाय । ऐशा नव्या छंदाची द्यावी सोय । कार्यकर्त्यांनी ॥१०९॥
कायकर्ता तोचि गांवचा । ज्यास लोभचि नाही कोणचा । आमुचा गांवचि मोक्ष, आमुचा । मानावा त्याने ॥११०॥
मग त्याचा आदर्श गांव पाही । सर्व गांवचि सुधरोनि जाई । मुखंडावरीच गांव राही । तुकडया म्हणे ॥१११॥
इति श्री ग्रामगीत ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभवसंमत । निवेदिलें ग्रामजीवनमर्म येथ । सहावा अध्याय संपूर्ण ॥११२॥
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
*************************
ग्रामगीता अध्याय सातवा
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
एका सज्जनें प्रश्न केला । लोकरहाटी कळली आम्हांला । पुढारी नेतेच सुधारती गांवाला । सत्य हें सारें ॥१॥
परि भल्यांनीच गोंधळ घातला । पुढारी पुढिलांचा अरि झाला । तयांच्या नगार्यापुढे कसला । आवाज आमचा ताण मारी ? ॥२॥
न्यायदेवता सिंहासनी बसविली । तीच अन्याय करून गेली । मग कैची सुव्यवस्था आली ? सांगा सांगा ॥३॥
सत्संगतीसि पंडित बोलाविला । त्यानेच गांवी कलह केला । शहाणा म्हणावा तोच निघाला । महामुर्ख जैसा ॥४॥
प्रसन्नतेकरिता ठेवलें गायन । तेथे ऐकावें लागलें रुदन । आपल्या पोटाची सोय व्हावी म्हणून । अडे ओरडे ॥५॥
घोडें शिकवाया आणला स्वार । तोचि पडला मोडोनि कंबर । कैसे बसतील मग इतर । घोडयावरि ? ॥६॥
इमानदार म्हणोनि पाहिला धनी । त्यानेच केली बेइमानी । आता विश्वास ठेवावा कोणीं । कोणावरि ? ॥७॥
मुलें शिकविण्या ठेविला मास्तर । त्यानेच केला दुर्व्यवहार । शिक्षकासीच शिक्षणाची जरूर । ऐसे झालें ॥८॥
औषधि द्याया आणिला डॉक्टर । त्याने रोग्यासि दिलें जहर । आतां कोणी करावा उपचार ? सांगा सांगा ॥९॥
ऐसें झालें आमुच्या गांवी । सांगा काय व्यवस्था करावी ? कोणांस हांक मारूनि घ्यावी । विश्वासाने ? ॥१०॥
जन मनांत येईल तें करिती । दारू पिती तमाशे नाचविती । पुढारीच पुढाकार घेती । ऐशा कामीं ॥११॥
गुंडास धरोनिया हातीं । करिती मनीं येईल त्याची फजीती । त्यावांचोनि पुढार्याची गति । म्हणती प्रगतिपथा येईना ॥१२॥
ऐसेंचि धरिलें त्यांनी मनीं । नाश केला गांवी फिरूनि । आता चोरचि झाले धनी । सज्जन मेले उपवासी ॥१३॥
गांव सगळेंचि बिघडलें । आपल्यापरीं स्वैर झालें । नाही कोणाचें वर्चस्व राहिलें । कोणावरि ॥१४॥
सांगा सांगा काय करावें ? तुम्ही म्हणतां गांव सुधारावें । कोण्या मार्गे आपण जावें । ऐशा स्थितीं ? ॥१५॥
आपण करावें कांही साधन । हसती टिंगल करोनि जन । म्हणती हा साधू आला कुठोन । पोट भरावया ॥१६॥
खराटा घेवोनि झाडझूड करावी । तेथेचि मलविसर्जना बसवी । म्हणती तुमची सेवा तुम्ही चालवावी । आम्ही करूं ऐसेंचि ॥१७॥
कांही सांगावें शहाणपण । म्हणती तुम्ही सांगणारे कोण ? खुशी वाटेल तैसें करोन । राहूं आम्ही ॥१८॥
ऐसी झाली गांवाची स्थिती । वाईट वाटतें हृदयाप्रति । सोडूनि जावें गांवा येई चित्तीं । परि जीवा आवडेना ॥१९॥
शेवटी आलों तुम्हांसि शरण । तुम्ही गांव केले आदर्श म्हणोन । कैसे वळविलें तेथील जन ? सांगा आम्हालागोनि ॥२०॥
मित्रा ! तूं विचारला प्रश्न बरवा । अति हर्ष झाला माझ्या जीवा । मी सांगेन धरोनि भावा । वर्म माझें ॥२१॥
प्रथम कळूं दे तुझी साधना । काय ठेवितोसि आपुली धारणा ? दिनचर्येंची कैसी रचना । आहे तुझ्या ? ॥२२॥
हेचि मुख्य खूण । जोंवरि वक्त्याचें न दिसे आचरण । तोंवरि लोक वागतील म्हणोन । समजूं नये ॥२३॥
लोकांसि जें जें शिकवावें । तें आधी आपणचि आचरावें । नुसतें पुढारी म्हणोनि मिरवावें । तेणें आदर न वाढे ॥२४॥
एकेक विषयाचें पुढारीपण । घेवोनि तैसें केलें आचरण । त्यांनीच बिघडवूं शकले गांव पूर्ण । गुंड व्यसनी व्यभिचारी ॥२५॥
तैसेचि गांव सुधाराया आपण । विशेष केलें पाहिजे आचरण । जेणें येईल अंगी आकर्षण । गावांस वेधून घेणारें ॥२६॥
येर पुढारी असोत सर्वहि । परंतु आपला मार्ग खुंटला नाही । लोक जणुं वाटचि पाहती सदाहि । कोण होतो पुढे म्हणोनि ॥२७॥
यासाठी निराशेचें नाही कारण । आचरणें साधावें पुढारीपण । सत्यचि प्रभावी सर्वांहून । ही अमोल खूण विसरूं नये ॥२८॥
ज्याने सत्याशीं नातें जोडलें । त्याचे अंगी गुरुत्वाकर्षण आलें । सांगण्याहूनिहि सामर्थ्य चाले । त्याच्या शुध्द जीवनाचें ॥२९॥
यासाठी प्रथम पाहिजे इंद्रियनिग्रह । खानापानादिकीं नियमाग्रह । सर्वचि विषयीं असंग्रह । आपुल्यासाठी म्हणोनि ॥३०॥
पवित्र मित आहार-विहार । निद्रा थोडी शांती फार । सदा प्रसन्नता मुखावर । बोलतां चालतां ॥३१॥
यमनियमादि तैसीं आसनें । साधोनिया आरोग्य राखणें । बुध्दि-बल-चातुर्यें वर्तनें । तेजोमय असावें ॥३२॥
आपुल्या कष्टावरीच जगावें । कुणाचे उपकार अंगी न घ्यावें । कमीत कमी खर्चाने रहावें । साध्या घरी ॥३३॥
अंग झाकण्यापुरते कपडे । शिवले असावेत साधे भाबडे । शौकपाणी न आवडे । राहावें ऐसें ॥३४॥
आपुलें परक्याचें हित । दोन्ही असावेत लक्षांत । जेणें परक्यासि वाटे पसंत । तैसा व्यवहार असावा ॥३५॥
आपुल्या कोणत्याहि कारभारीं । अन्याय न व्हावा कोणावरी । सावधानी असावी हृदयांतरी । सर्वकाळ सत्याची ॥३६॥
दयाक्षमा शांति नम्रता । प्रत्येक जागीं प्रामाणिकता । सरळपणा आणि प्रेमळता । ही दैवी संपत्ति साधावी ॥३७॥
सार्वजनिक कामीं जाऊनि । कष्टत जावें निःस्पृहपणीं । जाति-पक्ष-मित्रशत्रु म्हणूनि । पक्षपात कोठे नसावा ॥३८॥
असभ्य हेकट नसावें वर्तन । कर्कशता न दिसावी वागण्यांतून । कुणाचीहि निंदास्तुति ऐकोन । दुराग्रही मन न करावें ॥३९॥
प्रत्यक्ष दोष पाहिल्याविण । अथवा न समजतां विश्वसनीयांकडून । करूं नये न्यायदान । शोधल्यावाचून सर्व पक्ष ॥४०॥
सामुदायिक जबाबदारी । असेल जी जी नागरिकावरि । न चुकता पाळावी ती निर्धारी । स्वार्थ उरीं न ठेवितां ॥४१॥
न करावी कोणाची निंदास्तुति । आपण आदर्श करावी कृति । स्त्रियामुलेंवृध्दादि सर्वांसांगाती । वागावें प्रेमें विश्वासें ॥४२॥
राखावी शब्दांची किंमत । वेळेचें महत्त्व सदोदित । दुसर्याचें सुखदुःख आघातहित । आपणाइतुकेंचि जाणावें ॥४३॥
हें सर्व जंव पाहतील जन । म्हणतील हाचि आहे सज्जन । वाढेल तुमच्या कार्यांचें महिमान । हळूहळू ॥४४॥
लोकांसि कळेंल तुमचें वर्तन । अंतबार्ह्य सात्विक पूर्ण। मग पाहतील देवाप्रमाण । तुम्हांलागी ॥४५॥
मित्रा ! ऐसें जंव तूं करिशी । तंव लोक राहतील प्रसन्न तुजशीं । ऐकण्याची वाटेल खुशी । लोकांना तुझें ॥४६॥
म्हणतील तुम्हीं सांगावें । तैसेंचि आम्ही वागावें । तुमच्या बोलण्यांतून निघावें । तरि मरण होईल आमुचें ॥४७॥
तेव्हा प्रथम करावा विचार । आपण घ्यावा की नाही पुढाकार । एकदा पाऊल टाकतां समोर । मागे घेऊं नये कल्पांतीं ॥४८॥
ज्यासि वाटे जनसेवा करावी । त्याने प्रथम लोकलाज सोडावी । आपुल्या आत्माची ग्वाही घ्यावी । कार्य सत्य म्हणोनिया ॥४९॥
ज्यांत आहे सर्वांचें सुख । तें सत्कार्य न करितां राहावें विन्मुख । हें तों आहे घोर पातक । समजोनि घ्यावें ॥५०॥
साहेल तैसी करावी सुरवात । मुरवावया जनलोकांत । हृदयांत आणि इंद्रियांत । मेळ राहूं शके ऐसी ॥५१॥
क्रमाने पाऊल पुढे घ्यावें । कार्य करितां समाधान मानावें । विरोधकांसि उत्तर द्यावें । नम्रतेने ॥५२॥
लोकांसि बोलणें शिकवावें । तरि आपण उत्तमचि बोलावें । बोलण्यांत माधुर्य ओतावे । आपुल्या प्रेमें ॥५३॥
आपुल्या बोलण्याने उबगतील जन । ऐसें कधी न करावें भाषण । कोणचेंही पूर्ण ऐकल्याविण । न द्यावें मधून उत्तर ॥५४॥
आपुलें बोलणें प्रेमाचें । दुसर्याचें बोलणें क्रोधाचें । परि ते सहन करावे त्याचे । वार अंगीं ॥५५॥
दुसर्याने कितीही क्रोध केला । तरी हसोनि पाहिजे मावळिला । उत्तर देतां यावें शांतीनें त्याला । आपुल्यापरी ॥५६॥
शंका विचारावयाची दाटी । लागेल पदोपदीं पाठीं । सहन करोनि ही आटाआटी । पाय पुढे टाकावा ॥५७॥
एकदा झालिया निश्चय । मग लोकचि होती साहाय्य । कामें करावयाची सोय । सोपी होते ॥५८॥
आपोआपचि होतो निर्वाळा । तांडा जमतो भोंवती सगळा । निवडावा त्यांतूनि जिव्हाळा । आहे कोणा ॥५९॥
त्यांसचि साथी करावें । शक्तियुक्तीने मन भरावें । कार्य करावयासि सोपवावें । आपुल्या जैसें ॥६०॥
ऐसे मिळतां काही जन । आरंभ झाला सत्कार्या पूर्ण । मग सहजचि घ्यावें महत्पुण्य ।गांव-सेवेचें ॥६१॥
याहून नाही दुसरा उपाय । आपुल्या गांवाची लागया सोय । हाचि मंत्र आहे सिध्दांतमय ।गांव आपुलें सुधारावया ॥६२॥
हें ऐकोनिया माझे उत्तर । प्रश्नकर्ता बोलला चतुर । यासि लागतील दिवस फार । तोंवरि गांवाचे होईल कैसें ? ॥६३॥
आपण सांगितले जें साधन । तेंहि आहे महाकठिण । कोण साधील यमनियम आसन । ध्यानादि सर्व ? ॥६४॥
त्यासि वर्षेहि बरींच लोटतीं । तोंपर्यंत आमुची गात्रें शिथिल होतीं । मग कोण पाहील गांवाप्रति । उत्तम आहे की वाईट ? ॥६५॥
आम्हीं मध्येच गेलों मरून । मग इच्छा राहील अपूर्ण । काय सांगावें पुढे कोण । करील कार्य आमुचें ? ॥६६॥
यासाठी सांगा सोपा उपाय । ज्याने साधेल सर्व सोय । देऊं आम्ही खर्च जरी ये । त्यासाठी कांही ॥६७॥
मित्रा ! ऐक याचें उत्तर । तुज सोडोनि गांव व्हांवे सुंदर । ऐसी इच्छा धरिशील तीव्र । तरि ती वेडेपणाची ॥६८॥
माझें गांव सुंदर व्हावें । मी चोरजारचि राहावें । ऐसें विसंगत दिसतें आघवें । म्हणणें तुझें ॥६९॥
व्यक्तिशुध्दीविण दुसरा उपाय । काय आहे व्हाया साहाय्य ? । टिकविण्यास गांवीं उत्तम सोय । याविण मजला दिसेना ॥७०॥
तूं म्हणशील सत्तेने सुधारावें । तांबडतोब कायदे करावे । तुझ्यासारखे टाळतील आघवे । ते तैसेचि ठेवावे स्वार्थीजन ॥७१॥
हें म्हणणें कोण ऐकेल ? कितीहि उदार बोलले बोल । तरी जनमन ते ओळखील । छीथू करील आमुचीहि ॥७२॥
आणि तैसेंचि करूं जावें । तरि गांव कैसें सुधारावें ? । व्यक्ति मिळोनीच गांव आघवें । हें विसरतां सर्व फोल ॥७३॥
लोक सुधारणेच्या रेखा फाडती । पैसा देऊन करूं म्हणती । परि पैसा घेऊनि फसविती । ऐसें लोक उभेच तेथे ॥७४॥
करूं म्हणती व्याख्यानें देऊन । तरि लोकहि शिकती व्याख्यान । काय होय यांतूनि निष्पन्न ? जोंवरि मानव ना बदले ॥७५॥
त्यास मुख्य पाहिजे अंतःकरण । जिव्हाळ्याची सेवा पूर्ण । तरीच ग्राम होईल नंदनवन । अवडंबरावाचूनि ॥७६॥
वास्तविक त्यासि वेळहि नाहि । सवेंच चालेल सुधारणाहि । सुरू करोनि सांगत जाई । शिकवी मनासहित जना ॥७७॥
बोल बोल याचें उत्तर । तुझी तयारी आहे काय सत्त्वर ? नाहीतरि वेळ मात्र । गमावूं नकोस आमुचा ॥७८॥
तेव्हा तो निराशेने वदला । अपरिग्रह जरि आम्हीं केला । काय करील मुलाबाळाला ? मग काय झाला फायदा माझा ? ॥७९॥
कासया करावें एवढे कठीण ? चालूं द्या जैसे चालती जन ? आपणचि दुःखी होऊन । कां मरावें यासाठी ? ॥८०॥
ऐसें बोल ऐकतां प्रश्नकर्त्याचे । बोललों तुम्हीच गुंड गुंडाचे । पुन्हा त्यांतहि आमुचें । साहाय्य घेतां बुडवाया ॥८१॥
तुम्हीच गांव बुडविला । सांगायासि आले बोलबाला । ऐसाचि वाटे घात झाला । सर्व गांवदेशाचा ॥८२॥
तुमच्यावरूनि मज बोध झाला । देश अशांनीच गर्तेत घातला । शहाणे म्हणवून नाश केला । गांवाचा तुम्ही ॥८३॥
प्रथम जें तुम्ही ऐसें बोलले । जे जे जन सुधारण्यास आणले । त्यांनीच गांव बुडविलें । आमुचें सर्व ॥८४॥
हें म्हणणे सारें लटके । तुम्हांसीच द्यावे वाटे फटके । नाहीतरि करा आतां निकें । सांगतों तैसें ॥८५॥
तो भला कांही पाय घेईना । फसला मोह-कर्दमीं नाना । म्हणे आलों होतों आपुल्या दर्शना । लाभ होईल म्हणोनि ॥८६॥
गांवी येती साधु-महंत । कार्यकर्ते विद्वान पंडित । त्यांचे संगती तैसा तैसा शास्त्रार्थ । करावा हीच रुचि मज ॥८७॥
जैसे आम्हीं पोथीपुराण वाचतों । तैसीच त्याची चर्चा करतों । कोण शहाणा हें पाहतों । वरच्या वरि ॥८८॥
तैसा बोललों आपला ज्ञानचर्चा । नेहमीच चालती गप्पा आमुच्या । होतील कधीकाळीं मनाच्या । भावनाहि ऐशा ॥८९॥
तुम्हीं तर नेटचि लाविला । सांगतां सुरवातचि करावयाला । यास पाहिजे विचार केला । कांही वर्षें ॥९०॥
मी ऐकलें त्याचें म्हणणें । विव्हळ झालों जीवेंप्राणें । ऐसेहि जन निर्मिले भगवंताने ! वाटलें मना ॥९१॥
हात जोडले तयाप्रति । म्हणालों आता नको आपुली संगति । बहू ज्ञान दिलें तुम्हांप्रति । वस्तादाने ॥९२॥
परंतु यापेक्षा मूर्ख बरे । ते ऐकोनि घेती विचारे । आम्ही प्रयत्न करूं म्हणोनि सारे । घरी जाती सदभावें ॥९३॥
तुम्ही दिसतां पढतमूर्ख । दुसर्या दुखवोनि घेतां सुख । कळोनि न वळे याचें कौतुक । करावें तरि लाजिरवाणें ॥९४॥
परि आतां एक ध्यानी ठेवावें । याने आपुलें भलें कधीहि नव्हे । परि कुणातेंहि समाधान पावे । या चर्चेने क्रियायोगें ॥९५॥
असो मजसी जैसा प्रश्नकर्तां भेटला । तैसा का कोणी शहाणा उठला । तरि त्याने घातचि झाला । ग्रामसेवाकार्याचा ॥९६॥
बोलण्यांत ते अति शहाणे । परि कार्य त्यांचें ओंगळवाणें । कैसें गांव सुधारेल याने ? सांगा मज ॥९७॥
न सोडतांहि पेंढारीपण । त्यांना पाहिजे पुढारीपण । इच्छिती संन्याशाचा सन्मान । पत्नी घेऊनी खांद्यावरि ॥९८॥
साधूशी भाविकपणें बोलती । मूर्खापाशी महंत होती । व्यसनी लोकांमाजी मिळूनि जाती । व्यसनें भोगतां ॥९९॥
आपणा सर्वत्र मान मिळावा । धनाचाहि संग्रह व्हावा । आणि जरा न ताणहि न लागावा । ऐसा व्यापार हवा त्यांसि ॥१००॥
हेंचि ओळखावें धू्र्तपण । यासीच पढतमूर्ख म्हणती शास्त्रज्ञ । त्यालागी करूनहि प्रयत्न ।असाध्य त्यांचा खातारोग ॥१०१॥
त्यांपासोनि ग्राम वाचवावें । खरें सात्विकपण गांवी भरावें । सरळपणासाठीच प्रयत्न करावे । सुधारकांनी ॥१०२॥
यासि मज एक साधन सुचे । जे जे असतील गांवी ऐसे । आधी त्यांचेच लागावें कांसे । ससेमिरा घेऊनिया ॥१०३॥
जे जन बोलण्यांत जिंकती । आचरणांत मागे राहती । त्यांची घ्यावी चातुर्यें झडती । ग्राम हातीं घेवोनि ॥१०४॥
फुकी ज्ञानचर्चा नाही झाली । म्हणोनि ज्ञानशक्ति कमी पडली । ऐसी कधी न पडावी भुली । लोकांस माझ्या ॥१०५॥
अदंभ दया अभयादि गुण । त्यांसीच गीता म्हणे ज्ञानखूण । क्रियावान तोचि पंडित पूर्ण । सर्वभूतहितीं रत ॥१०६॥
लाख बोलक्यांहून थोर । एकचि माझा कर्तबगार । हें वचन पाळोनि सुंदर । गांव सुधारावें कार्याने ॥१०७॥
सुधारणेची करितां बोलणीं । म्हणावें, चला कामें करूं मिळोनि । घ्या हें टोपलें माती भरोनि । शिरावरि आपुल्या ॥१०८॥
सर्वांसीच लावावें काम । हाचि मार्ग सर्वात उत्तम । यानेच बनेल आदर्श ग्राम । सहाय्य देतां सत्कार्या ॥१०९॥
आदर्श न करितां जीवन । कैसा मिळेल आदर्शाचा मान ? कैसा जगीं आदर्श होय निर्माण ? तुकडया म्हणे ॥११०॥
इति श्री ग्राम-गीता ग्रंथ । गुरू शास्त्र स्वानुभव-संमत । कथिला ग्रामोन्नतीचा आचारपथ । सातवा अध्याय संपूर्ण ॥१११॥
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
*******************
ग्रामगीता अध्याय आठवा
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
एक साधुवेषी मजशीं बोले । आमुचे आचरण जरी भलें । परि लोक दुसर्यांनी दिपविले । न ऐकती ते ॥१॥
वाईटाकडे सहज प्रवृत्ति । अनेक प्रलोभनें दुष्टांचे हातीं । आम्रतरु मेहनतीनेहि न जगती । गवत वाढे न पेरतां ॥२॥
ऐसा अनुभव मज आला । सांगोनीहि न पटे जनतेला । वाटे काय करावें याला । ऐकती ना हे वेडे जन ॥३॥
म्हणोनि प्रार्थना करितों साहेबासि । त्यांनी करावें कायद्यासि । जनता उध्दारावी हवी तैसी । दंड कैद करोनि ॥४॥
ऐकतांचि त्याचें वचन । म्हणालों मग सरकारचि झाला भगवान । कासया करिशी देवाचें भजन ? पुजावे जोडे साहेबाचे ॥५॥
वास्तविक संताचे सांगणें प्रेमाचें । सरकारचें सांगणें दंडुक्याचें । जरी पर्यायाने दोघांचें । एकचि ध्येय पाहतां ॥६॥
यांत दमनाने लोक भिती । तेवढयापुरती नीट वागती । आणि मार्ग काढोनि पापें करिती । कोटयानुकोटी ॥७॥
तैसें नाही साधुसंतांचें । त्यांचें बोलणें आपुलकीचें । एकदा विचार पटले त्यांचे । लोक मरेतों न विसरती ॥८॥
साधूंनी देवासि प्रार्थावें । सकळ जनासि बोधीत जावें । ऐसें आहे साधन बरवें । साधुसंतांचें ॥९॥
पूर्वी प्रचारक साधु म्हणोन फिरती । गांवोगावी लोकां जागविती । आलख म्हणोन पाहरा देती । घरोघरीं अरुणोदयीं ॥१०॥
त्यांचें प्रेमचि कार्य करी । लोक उठती नित्यनेमावरि । राहणें टापटिपीचें बाहेरी । अंतरी निर्मळपणा ॥११॥
कथाकीर्तनादिकांच्या योगें । पापभीरुता अंगी वागे । तेणें कायद्याविणहि सुमार्गे । जाती बहुजन ॥१२॥
जगीं कांही लोक अज्ञानी । ते दुसर्याऐसी करिती करणी । थोरांचें आदर्श जीवन म्हणूनि । पाहिजे अनुकरणास्तव ॥१३॥
कांही लोक चिकित्सक । विचार पटतांचि वागती चोख । त्यासाठी उत्तम विवेचक । प्रचारक पाहिजे ॥१४॥
कांही लोक प्रलोभनीं पडले । लाभ असेल तेंचि घेती भलें । त्यांना स्वर्गसुख पाहिजे दाविलें । दुःखें निवारूनि सेवकांनी ॥१५॥
परंतु भयावांचोनि कांही लोक । न ऐकतीच बोध सम्यक । दंडाविण जैसे पशु देख । न चालतीच योग्य मार्गें ॥१६॥
त्यांना हित कोणीं शिकवावें ? कोणीं मूर्खांचें हृदय धरावें ? म्हणोनि सत्तेने सरळ करावें । ऐसा मार्ग वाढला ॥१७॥
साम दाम दंड भेद । राजनीति ही बहुविध । कायद्याच्या आधारें शुध्द । करूं पाहे जनलोकां ॥१८॥
कायद्यानुसार गांवरचना । कायद्यापरी करावें वर्तना । कायद्यानुसारचि जना । सहाय्य द्यावें परस्परें ॥१९॥
जो करील कायदाभंग । त्यासि दंड द्यावा लागवेग । यासाठी नेमावा लागे मग । राजा सत्ताधीश मुखंड ॥२०॥
परि राजा हा विष्णु-अंश बरवा । ऐसा लोकीं करावा गवगवा । तेव्हाचि कायदा त्याचा चालावा । यांतहि आले प्रचारतंत्र ॥२१॥
देश हा देवचि पवित्र । कायदा त्याचें व्यवस्थासूत्र । तें न पाळतां पातक थोर । प्रचारतंत्र आवश्यक ॥२२॥
सत्ता, कायदा, ध्वजावरि श्रध्दा । प्रचारेंचि निर्माण होई सदा । त्याविण नुसतें भय सर्वदा । नियमयुक्त न ठेवी ॥२३॥
उलट राजाभयादि नसून । लोकांत प्रचार होतां पूर्ण । आत्मसाक्षीने वागती जन । उत्तम हाही अनुभव ॥२४॥
तैसेंच कायद्याची चुकवोनि रेषा । किती करिती पापें नित्यशा । परि विचार भिनतां प्रचारें सहसा । पाऊल न पडे वाममार्गीं ॥२५॥
सारांश सत्तानामेंहि राज्य करी । प्रचारचि सर्व जीवनावरि । सत्ता देहासचि बंधनकारी । अंधभिकारी कायदा ॥२६॥
प्रचार मनावरि संस्कार करी । तो संस्कार अंतरी बाहेरी । राज्य करोनि मानवा सुधारी । गांव करी तीर्थचि तो ॥२७॥
हें सत्तेने कधीच नव्हे । उलट चुकारासि लाभ पावे । गरीब सज्जन उगीच मरावे ।ऐसेंहि होतें ॥२८॥
सत्तेने जे कायदे केले । त्यांचे फायदे मुजोरांनी घेतले । आणि दुबळे भोळे मागेच राहिले । ऐसें झाले आजवरि ॥२९॥
म्हणोनि कायदाचि नव्हे सर्वकांही । प्रचाराऐसें श्रेष्ठ नाही । सर्वांसि मानवतेचे पाठ देई । तो नियमन करी न करितां ॥३०॥
राजे किती आले गेले । त्यांचे कायदे नष्ट झाले । सत्तेचे दरबार उजाडले । परि राज्य चाले संतांचें ॥३१॥
संतांचा तो प्रचार अमर । अजूनिहि लोक-मनावर । राज्य चालवोनि निरंतर । लाखो जीवां उध्दरितो ॥३२॥
नलगे सत्तेचा बडगा । नको भयभीतीहि सन्मार्गा । आपापले कर्तव्य जगा । प्रचारसूर्याचि दाखवी ॥३३॥
जेव्हा जाणीव देणें अपूर्ण पडे । तेव्हांचि दंडभेदाचा अवलंब घडे । ऐसेचि वाढत गेले पोवाडे । विकृतीचे ॥३४॥
परि दंडे अन्याय जरि नाशते । लोक जरि सुधारले असते । तरि तुरूंग हे न वाढते । गुन्हे न होते अधिकाधिक ॥३५॥
हेंचि जाणोनि सज्जन म्हणती । जागवा हृदयांतील अंतर्ज्योती । तरीच सुधारेल मानववृत्ति । जग होईल आदर्श ॥३६॥
जे जे म्हणती सत्तेवांचून । गांव होईना आदर्शवान । त्यांचे हें म्हणणे नाही परिपूर्ण । ठेवावी खूण बांधोनि ॥३७॥
त्यासि पाहिजे सत्प्रचारक । प्रेमळ सरळ नम्र भाविक । सत्तेवाचूनिहि करी हांक । पूर्ण लोकांची सेवाप्रेमें ॥३८॥
अहो ! जनशक्ति केवढी महान । ती जो आणील संघटोन । तो स्वर्गावरीहि लावील निशाण । आपुल्या कार्यें ॥३९॥
हातीं न घेतां तरवार । बुध्द राज्य करी जगावर । त्यासि कारण एक प्रचार । प्रभावशाली ॥४०॥
जगीं आजवर जें कार्य घडलें । तें प्रचारकांच्याच करवीं झालें । प्रचारक नाही म्हणोनि अडलें । कार्य आपुलें ॥४१॥
ग्राम सुधारावयाचा मुलमंत्र । उत्तम पाहिजे प्रचारतंत्र । प्रचारकांवाचून सर्वत्र । नडतें आहे ॥४२॥
प्रचारकाची पाठ बळे । जिकडे तिकडे सूर्य मावळे । उदासीनतेचें अंधारजाळें । पसरोनि राही ॥४३॥
प्रचार जेथे धांवला दिसे । तेथील गांव स्वर्गचि भासे । जनलोक न्यायास साजेसे । वागती तेथे ॥४४॥
प्रचारक प्रेतांत प्राण आणी । दुबळयासि करी कार्याभिमानी । बिघडवी आणि सुधारवी दोन्ही । प्रचारक ॥४५॥
प्रचार ही कला आहे । प्रचार अंतःकरणहि राहे । पोट भरवयाचाहि उपाय । प्रचारतंत्र ॥४६॥
प्रचार खोटयास खपवी बाजारीं । प्रचार गोटयास देव करी । प्रचार युध्दाची वाजवी भेरी । वृष्टीहि करी अमृताची ॥४७॥
कांहीकांचा स्वभावचि असे । अपप्रचार करोनि भरावे खिसे । जना नागवितां आनंद दिसे । कांहीकांना ॥४८॥
परि तो प्रचारक दुराचारी । आपण मरूनि इतरां मारी । यानेच बिघडली गांवाची थोरी । अशांति संसारीं माजली ॥४९॥
त्यांच्या विषारी प्रचाराहून । झाला पाहिजे प्रबल पूर्ण । सत्यप्रचार आपुला महान । तरीच परिवर्तन सहज घडे ॥५०॥
जोंवरि अंतःकरण नाही गुंतले । तोंवरि प्रचार वरवर चाले । यासाठी पाहिजे जीवनचि रंगलें । प्रचारकांचे ॥५१॥
मित्रहो ! आदर्श कराया ग्राम । उत्तम प्रचारक पाहिजे प्रथम । तरी चाले उत्तम काम । गांवाचें आपुल्या ॥५२॥
राणीमाशी जाऊन बसली । तेथे मधमाशांची रीघ लागली । पाहतां पाहतां सृष्टी सजली । होईल ऐसें ॥५३॥
श्रोतियांनी विचारला प्रश्न । प्रचार करील गांवी पूर्ण । तया प्रचारकांचे लक्षण । कैसें असे ? ॥५४॥
प्रचारकांचें वर्तन कैसें ? राहणी, स्वभाव, भाषण कैसें ? ध्येय, धोरण, साधन कैसें । गांवासाठी ? ॥५५॥
याचीं उत्तरे श्रवणी ऐका । जे जे गुण व्हावेत प्रचारका । ते अंगी बाणतां सुधारील लोकां । कोणीहि सहज ॥५६॥
गांवाचे भवितव्य कराया उज्ज्वल । पाहिजे प्रचारक-शक्ति प्रबल । प्रचारकाअंगी पाहिजे शील । सत्य चारित्र्य नम्रता ॥५७॥
प्रचारकाचीं मुख्य लक्षणें । सत्तेवाचूनि कार्य करणें । आत्मशुध्दिने गांव सुधारणें । गवसे तया ॥५८॥
त्यासि सत्तेची नाही चाड । नसे धनाचा मोह द्वाड । आत्मप्रेमाचा झरा अखंड । वळवीं मना ॥५९॥
प्रचारक स्वभावाचा सरळ । वाईट मनोवृत्तीचा काळ । अंतःकरण पाण्याहूनि निर्मळ । अहिंसक ॥६०॥
बोलण्यांत राही निर्भय । कष्ट करण्यांतहि पुढेच पाय । वागणूक तरि आदर्श राहे । प्रचारकाची ॥६१॥
प्रचारकाची दिनचर्या । वेळ जराहि न घालावी वाया । जें जें शोभे सेवेच्या कार्या । तें तें करी सर्वचि ॥६२॥
नेत्री तयाच्या सात्विक तेज । बोलण्यांत भरले असे ओज । राहणींत वैराग्य त्याग सहज । प्रचारकाच्या ॥६३॥
पिकलिया फळाचें देठ तुटलें । तैसें प्रचारकाचे मन झालें । आसक्तिविषय सर्व गेले । इंद्रियांचे ॥६४॥
इंद्रियांसि नुरली ऊर्मि । सर्व उन्मुख सेवाकर्मीं । पावसाळा हिवाळा गर्मी । सारखीच त्यासि ॥६५॥
परि उदास नसे प्रचारकाची मति । नेहमी दिसेल हसरी मूर्ति । सदा कार्य करावयाची स्फूर्ति । स्फूरली दिसे ॥६६॥
कधी न करी चिडचीड । कोसळो का आपत्तीचा पहाड । श्रम करोनि जिवापाड । लोक लावी सन्मार्गीं ॥६७॥
प्रचारकासि उरले नाही घर । सर्वचि घरें त्याचें माहेर । सर्व जन हेंचि त्याचें गोत्र । विश्वमाजी ॥६८॥
नाही सत्तेचें प्रलोभन । प्रतिष्ठेचेंहि कुठलें भान ? आपणासाठी न मागे धन । रेंगाळोनि कोणा ॥६९॥
सत्कार्यासाठी पाठीं लागे । धन जमीन मान मागे । सर्वस्व मागे, प्राण मागे । न संकोचतां ॥७०॥
आपणासाठी कांहीच नाही । जें करील तें सर्वांचें पाही । प्राण तोहि अर्पावा ही । भावना सेवेसाठी ॥७१॥
सर्व करणें सर्वांसाठी । आत्म्यासाठी देवासाठी । बांधावया मनुष्यत्वाच्या गांठी । समाधानें ॥७२॥
त्यासि एकचि वासना उरली । जनता पाहिजे सुखें सुधरली । मानवांची दैना गेली । पाहिजे पळोनिया ॥७३॥
सर्वांची प्रार्थना व्हावी एक । मानवांचा व्यवहार मानवां पूरक । राहणी सर्वांची समान सात्विक । सर्वांसाठी ॥७४॥
याचसाठी आटाआटी । करावया पडतो संकष्टीं । प्राण तोहि अर्पावा शेवटी । वाटे त्यासि ॥७५॥
ही भूमिका साधुसंतांची । हींच साधनें प्रचारकांची । प्रचाराचा कळस सत्यचि । संतपण ॥७६॥
खरे प्रचारक साधुसंत । त्यांनीच कळविला जगाचा हेत । सत्य काय, काय असत्य । जगामाजीं ॥७७॥
तेथूनीच प्रचारकांची निर्मीती । प्रचारक सत्य समजावोनि घेती । शंकासमाधान ऐकती । मन लावोनि ॥७८॥
जया क्षणी बोध झाला । अंतःकरणीं स्फुरूं लागला । त्यासि अभ्यासाने चांगला । बळकट करिती सत्संगीं ॥७९॥
मनन करोनि आत्मसात करिती । मग पुढे तैसीच होय मति । एकदा वाणी रंगली सुमती । सरळ चाले माप तिचें ॥८०॥
उत्तम पुरुषाने कान फुंकले । समजा त्याने मंत्रचि घेतले । मग वारियापरी प्रचार चाले । प्रचारकाचा ॥८१॥
प्रचारक प्रचारानेच प्रचार करी । त्याचें माप चाले वार्यावरि । वाहन पोहोचण्याचे अगोदरी । प्रचार धावे तयाचा ॥८२॥
जो जो कोणी जिकडे भेटला । त्यास आपुलें सांगत सुटला । पाहणेंचि नाही मेघापरी त्याला । घेतो कोणी की नाही ॥८३॥
फाटका तुटका कोणी दिसो । गरीब-अमीर कोणी असो । विद्वान शिक्षित हसो रुसो । प्रचार त्याचा बंद नाही ॥८४॥
कोणी असो कोण्या पंथाचा । आधार देई त्यासीच त्याचा । ओघ चालला प्रचाराचा । खळगे भरीत दिसती ते ॥८५॥
जरा मुखवटा डोळयांनी पाहिला । वाचा फुटली प्रचारकाला । राघूपरी । बोलत सुटला । होय-नव्हे सर्व कांही ॥८६॥
लोकांनी जरी थांब म्हटलें । तरी याचें कार्य झालें । जरा वेळाने पुन्हा चाले । रस्ता करीत शब्द गंगा ॥८७॥
प्रचारकाचे बोल तत्त्ववादी । अचूक धरूनि संशया छेदी । टोचक नसतांहि मर्मभेदी । सरस हृदयाचे ॥८८॥
कोणी विरोधक शिव्या देई । हसूनि त्याचे शब्द साही । गोड बोलूनि समजावीत जाई । आपुलें म्हणणें ॥८९॥
सहनशीलताचि त्याचें ब्रीद । कधी तोंडी नये अपशब्द । जरी झाला वादविवाद । तरी गांभीर्यासि न सोडी ॥९०॥
कोणासि हट न बोलतां । अंगी ठेवोनि सहनशीलता । आपलें तत्त्व बोलतां चालतां । समजावोनि दे प्रचारक ॥९१॥
गोड बोलूनि मना वळवी । गांवाच्या सेवेलागी लावी । अनंत प्रकारें वृत्ति बरवी । करोनि सोडी ॥९२॥
बिघडलेलें घर सुधरवी । फाटाफूट तेथे संगति जुळवी । निर्दयासीहि दया उपजवी । नाना प्रयत्नें ॥९३॥
प्रचारकाची यत्नसाधना । सांगताचि नये एक कोणा । नाना प्रकार नाना योजना । प्रचारकापाशीं ॥९४॥
कोठे भजनांतून प्रचार करी । कोठे प्रार्थना करून कानीं भरीं । कोठे कथा सांगून मनासि सावरी । प्रचारक ॥९५॥
कोठे कीर्तन प्रवचन करी । तुंबडी पोवाडे नानापरी । यात्रा उत्सव हातीं धरी । प्रचारक ॥९६॥
कोठे उद्योगांतून हात घाली । कोठे कलारंजनाने जनता वेधली । मनोरंजनांतूनहि चाली । चालावी कोठे ॥९७॥
कोठे व्यायामांतूनहि स्फूर्ति भरली । कोठे पार्टीतहि सभा रंगली । कोठे लग्नांतून सुरवात केली । पाहिजे त्याने ॥९८॥
कोठे जन्मतिथि पुण्यतिथि । मौंजीबंधनेंहि न ठेवी रितीं । जैसी वेळ पडे प्रचारकप्रति । सर्व करी स्वभाचें ॥९९॥
कोठे शिंपियाचे दुकानीं । कोठे न्हावियाचे सलूनीं । ओटी चोहटीं चहूकोनीं । प्रचार चाले ॥१००॥
हाटीं बाजारीं तेंचि करी । तमाशींहि तेंच बोलें वैखरी । प्रचारकाची ऐसी बावरी । जिव्हा असे ॥१०१॥
कोठे आईबाईपाशी बैसे । त्याने घरांतील वळवी माणसें । काय मार्गाने प्रचारक घुसे । हें तों सांगतां नये कोणा ॥१०२॥
कामांतूनि गाण्यांतूनि । हसण्यांतूनि व्यवनांतूनि । चालतां बोलतां प्रचारवाणी । रंगे त्याची ॥१०३॥
प्रचारक असे बालकांत बालक । तरुणासि बोधया तरुण सम्यक । वृध्दासि द्यावया अनुभव तात्त्विक । त्याचेपाशीं ॥१०४॥
मुलांत जाऊनि सेवा वाढवी । मुलींमाजीं कला उपजवी । तरुण-तरुणी दोघांतहि लावी । गांव-सेवेसि ॥१०५॥
व्यसनाधीनाची धरी संगति । परि नीट करावया त्याची मति । डाव न चुके कल्पांर्ती । प्रचारकाचा ॥१०६॥
नाना कला त्याच्या अंगी । जैसी वेळ पडे प्रसंगी । रंगवी नाना साधन-रंगीं । प्रचार आपुला ॥१०७॥
तारतम्य ठेवोनि अंतरी । गोड बोलोनि प्रचार करी । वाटे टाकली मोहनी बरी । गांवावरि प्रचारकाने ॥१०८॥
तो प्रचारक आवडे सर्वांच्या मनीं । त्यासि बघतांचि पडे मोहनी । लोक धावती बोलतांक्षणीं । कार्य कराया गांवाचें ॥१०९॥
हां-हां म्हणतां गांवांत फिरला । सवें लोकांचा थवा घेऊन आला । सांगेल तैसे करूं लागला । प्रचारक त्यासि ॥११०॥
ऐसा प्रचारक जादुगार । त्याच्या मुठींत जनसागर । नव्या सृष्टीचा कारागीर । साधासुधा ॥१११॥
प्रचारक सर्वांशी बोलणीं पुरे । ज्ञान अंगी त्याच्या संचरे । रोमरोमांत-वैराग्य अंकुरें । दिसती तयाच्या ॥११२॥
म्हणोनि असे आकर्षण । लोक धावूनि येती पक्ष्यासमान । करावया गांव स्वयंपूर्ण । प्रचारकचि पाहिजे ॥११३॥
त्याचे अंगी महान निश्चय । जें संकल्पील घेईल ठाय । नाना करोनि उपाय । साधील त्यासि ॥११४॥
त्याचा प्रचार महाप्रबल । चालतसे सर्वस्पर्शी सर्वकाल । प्रचाराविण एकहि बोल । न निघे त्याचा ॥११५॥
काय करावें हेंचि बोलणें । न करावें तें तें कांहीच न जाणे । नाही हें बोलणेंचि उणें । त्यांच्या जीवनकोश ॥११६॥
काय नाही आमुच्या गांवी । त्यासि ही वदंताच कळावी । हातीं घेतां करोनि दावी । पूर्तींच त्याची ॥११७॥
नसलें तें तें उभें करी । लोकजीवनाची कलाकुसरी । चेतना जीवा-जीवांत भरी । सत्कार्याची ॥११८॥
ज्याचा प्रचार हाती धरला । समजोनि जावें पूर्ण केला । नाहीतरि आपणचि मेला । समजावा प्रचारक ॥११९॥
म्हणोनि बोललों गांवाचें अधिष्ठान । प्रथम पाहिजे प्रचारक महान । जी जी असेल ती उणीव भरोन । काढावया गांवाची ॥१२०॥
सारांश प्रचारक ज्या गांवी । तेथे दुसरी पंढरी जाणावी । जना मना पाषाणा नाचवी । आनंदाने ॥१२१॥
ऐसे प्रचारक निवडा गांवी । मग गांव नांदेल वैभवीं । सेवामंडळे स्थापूनि द्यावीं । सेवेसाठी ॥१२२॥
ऐसे गांव ज्यांनी केलें । तेचि कीर्तिवंत होती भले । म्हणोनि पाहिजे आरंभिले । प्रचारकार्य ॥१२३॥
त्यासाठी पुनः पुन्हा बोललों । प्रचारक करावयासि लागलों । प्रचारकांकरवी झालों । दास सर्व लोकांचा ॥१२४॥
निश्चयें ग्राम निर्मावया । प्रचारक हाचि मुख्य पाया । ग्रामगीताहि याच कार्या । निर्माण केली तुकडया म्हणे ॥१२५॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु शास्त्र स्वानुभव-संमत । कथिला प्रचारमहिमा येथ । आठवा अध्याय संपूर्ण ॥१२६॥
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
*****************
ग्रामगीता अध्याय नववा
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
श्रोतियांनी विचारिलें । प्रचारकार्याचें महत्त्व कळलें । परि हें सर्वांसीच साधेल भलें । ऐसे नाही ॥१॥
आदर्श प्रचारक मिळणें कठीण । मिळाले तरी टिकणें कठीण । आमुच्यासाठी दुजा मार्ग कोण । ग्रामोन्नतीचा ? ॥२॥
तरी ऐका याचें उत्तर । मीं एक गांव पाहिलें सुंदर । शिस्त शांतता व्यवस्था घरोघर । लोक निर्व्यसनी तेथीचे ॥३॥
पाहूनि वाटलें आश्चर्य । शोधिलें, कुणाचें हें कार्य ? कोणा प्रचारकाचें चातुर्य । फळा आलें ? ॥४॥
तंव तो नेता आला समोर । लोकांनी त्याची करितां पुकार । म्हणे मी आपुला सेवक साचार । होतों वर्गांत एकदा ॥५॥
त्यासि पाहतां नवल वाटलें । कैसें याने हें कार्य केलें ? ज्यासि बोलतांहि नये चांगले । कलाकुशलता नाही अंगी ॥६॥
दिसे बिचारा साधाभोळा । परि हृदयीं कार्याचा जिव्हाळा । हवा-हवाच वाटे सकळां । सेवागुणें ॥७॥
प्रचार न करितांहि सेवा । आकर्षित करूं शके गांवा । हाचि रहस्यबोध बरवा । मिळें याठायीं ॥८॥
सेवा शब्दाविणहि बोलकी । सर्व लोकां करोनि सुखी । त्यांचें हृदय सहज जिंकी । आत्मीयता वाढवी ॥९॥
नाना साधनी केला प्रचार । त्याने जरी होतो संस्कार । तरी सेवेविण निर्धार । न राहे टिकोनि जनांचा ॥१०॥
सेवेने मन हातीं घ्यावें । तरीच तें उकलोनि वळवितां यावें । नुसत्या उपदेशाच्या प्रभावें । कार्य न टिके जीवनीं ॥११॥
अहो उत्तम प्रचारक नाही बोलला । तरी आवडे त्याचें वर्तन लोकांला । मोह पाडी गांवकर्याला । सेवापप्रेमे त्याचें ॥१२॥
तो जंव जंव मार्गी चाले । कार्य करी पाउलापाउलें । लोक पाहतांचि नम्र झाले । दिसती त्यासि ॥१३॥
तो नसेल जरी बोलका । व्याख्याता उपदेशक नेटका । तरी वक्त्यापंडितांहूनि लोकां । वजन तयाचें ॥१४॥
ऐसेचि लोक गांव सुधारती । देशाचें नांव उज्ज्वल करिती । नसेना कोणा त्यांची माहिती । सुगंध उधळती वनपुष्पें ॥१५॥
मोठे महाल उभारिले । पाहावयास उंच दिसले । तरी ते दगडावरि ठाकले । पायाच्याचि ॥१६॥
पाईक दगड कांही दिसेना । परि महत्त्व त्यासचि असे जाणा । तैसें सेवेचें महत्त्व राष्ट्र-उत्थाना । सर्वतोपरी ॥१७॥
ज्याची सेवा करील प्राणी । त्याचें मन घेई मोहूनि । लंगोटीहि देईल सोडूनि । उदारपणें तो ॥१८॥
सुंदर गायन मृगा ऐकविले । त्याचें हृदय प्रसन्न झालें । मग नकळे त्या सर्वस्वहि घेतले । ऐसें होतें ॥१९॥
सेवेने अंगी सामर्थ्य येतें । जें जें बोलाल तेंचि घडतें । हस्तेंपरहस्तें सर्वचि होतें । काम त्याचें ॥२०॥
लोकांस एकदा भरंवसा आला । म्हणजे सेवा रूजूं झाली भगवंताला । मग काय उणे त्याला ? मागेल तें ये धावोनिया ॥२१॥
सेवकास संकल्प करणें पुरे । इच्छा होतां घरी अवतरे । वाटेल त्या मार्गें सारें । घडे मनासारिखें ॥२२॥
परि तें नसे उपभोगास्तव । ऐसें सेवक मानील सदैव । तोचि भोगिल सेवेचें वैभव । शेवटवरि ॥२३॥
ज्यासि उपभोग-वासना झाली । त्याची सेवाचि संपली । पुढे पुढे निंदा झाली । होईल ऐसें ॥२४॥
परि जो सेवाचि मानतो धन । कांही अपेक्षा न ठेवोन । तो झाला शेवटीं भगवान । पुजूं लागले घरोघरी ॥२५॥
लोक धनवानांना पुसेना । लोक सत्तेला ओळखीना । परि सेवाधार्याचे चरणा । पुजूं लागती जीवाने ॥२६॥
जगांत जेवढे पूज्यपुरूष झाले । ते सर्व सेवेनेचि गौरव पावले । सेवा सोडतांचि राक्षस ठरले । मारले गेले देवाकरवीं ॥२७॥
संत दामाजीने सेवा केली । प्रसंगीं धान्यकोठारें लुटविलीं । देवावेहि कदर केली । फेडलें ऋण येवोनि ॥२८॥
येथे देवाने फेडलें ऋण । म्हणजें मुखी थाटलें नारायण । पुरविलें बेदरी जाऊनि धन । भलतियाने ॥२९॥
कोणा मुखीं काय ठाकें । हें कोण सांगेल कौतुकें ? जरि कर्म असेल निकें । जनसेवेचें ॥३०॥
सर्व कर्में व्रतें करोनि । तीर्थाटनी वनीं फिरोनि । करावी लागते सेवाच जनी । सत्कीर्तीसाठी ॥३१॥
तीर्थीं दान सत्पात्रभोजन । यज्ञादिकीं खर्चावें अन्नधन । त्यांत सेवादृष्टीनेच सांगितले पुण्य । येरव्ही मिथ्या ॥३२॥
ज्यसि जरूरी त्यासि न द्यावें । पवित्र स्थान म्हणोनि उधळावें । तरि तेणें पुण्य कधी न पावे । जनसेवेचें ॥३३॥
तीर्थ समजती पुण्याची खाणी । आणि पापमय गांवींचे प्राणी । त्यांसि तीर्थींहि धोंडापाणी । सांगितलें संती ॥३४॥
काशीच्या गंगेची कावडी । ओतावी तहानेल्या जीवाचे तोंडीं । यांतचि तीर्थाहूनि पुण्यकोडी । सांगती नाथ ॥३५॥
आपण झिजोनि अंगे स्वता । जीवजंतूंसि द्यावी प्रसन्नता । सुखी करावी गांवींची जनता । हीच सेवा पुण्यकर ॥३६॥
ऐसी सेवा जया घडे । तुटे संसाराचे बिरडें । सखा भगवंत हृदयीं जोडे । अंतर पडेना यासि ॥३७॥
सेवा हीच धनसंपत्ति खरी । न सरे जन्मजन्मांतरीं । वाढवी विश्वभिमान अंतरी । ग्रामपूजन सेवामय ॥३८॥
म्हणोनि म्हणतों सेवा करा । उत्तम हाचि मार्ग बरा । आपुल्या जन्मासि उध्दरा । गांवासहित ॥३९॥
जरि कराल सेवा ऐसी । तरीच उध्दराल जीवासि । उन्नत कराल गांवासि । सर्वतोपरीं ॥४०॥
येरव्ही सर्वचि करिती सेवा । कोणी कुटुंबसेवा कोणी लोकसेवा । परि त्याने ग्रामोध्दार कां न व्हावा । तेंहि सांगों ॥४१॥
सेवेसाठी सर्वचि तत्पर । चालला सेवेनेच व्यवहार । या सेवेचे नाना प्रकार । परि वर्म वेगळेंचि ॥४२॥
आमुच्या गांवाचा मी पाटील । म्हणोनि करितों सेवा बहाल । म्हणवितो ऐसा सेवक खुशाल । परि राबवी गरिबाला ॥४३॥
ज्याची बैलजोडी उपाशी । आतावरि गेली होती कामासि । परि दया न येतां म्हणे त्यासि । जुंप गाडी साहेबासाठी ॥४४॥
दुपारवरि काम केलें । घरीं जेवावयासहि नाही गेले । तरी बोलावून घातलें । बिगारीसाठी ॥४५॥
जोडी माणसें मारूनि उपाशी । खूश करतो साहेबासि । याची आपुली सेवा ऐसी । साहेब म्हणे धन्य तया ॥४६॥
आमुच्या घरीं झालें लग्न । परि गांवकर्यासि भासलें विघ्न । खाती चोरपोर झपाटून । कष्ट करणारे मेले घरीं ॥४७॥
गांवीं मेजवानीच्या घातल्या पंगती । सेठ सावकार जमवोनि अति । केली गोरगरिबांची माती । कदर नाही तयांची ॥४८॥
चलबे साली म्हणोनिया । जमा केल्या आयाबाया । घरचें काम टाकूनिया । बिगार केली रात्रंदिनीं ॥४९॥
शेवटीं कामें सुंदर झालीं । शाबासकी जहागिरदारा मिळाली । कामें करणारीं उपाशीं पाठविलीं । हेहि एक सेवा असे ॥५०॥
साहेब येतो आमुच्या गांवीं । म्हणोनि रात्र जागवावी । मरे-मरेतों करावी । गांव-दुरुस्ती लोकांनी ॥५१॥
याने तोंडपाटिलकी करावी । कपडयास वळी पडों न द्यावी । शेवटी शाबासकी यानेच घ्यावी । जनता सगळी दूरचि ॥५२॥
गांव केले अति सुंदर । राबवोनि नारीनर । तेथे नांव एकल्याचें थोर । सेवाशील नेता म्हणोनि ॥५३॥
एकाने खूप धन लाविलें । गांवीं उत्तम देवूळ केलें । उदार म्हणोनि नांव गाजलें । परि नाही कळलें वर्म त्याचें ॥५४॥
आधी लुटलें जनलोकांसि । जमा केल्या धनाच्या राशी । मग बांधिलें देवुळासि । शीग कांही उतरेना ॥५५॥
चोरी करूनि धनी झाला । दान देण्यांत शूर ठरला । बिचारा गरीब तसाचि मेला । कळला नाही कष्ट करूनि ॥५६॥
म्हणती सेवकाचे फोटो लावा । आदर्श सामोरीच दिसावा । हीहि आहे उदंड सेवा । भिकारी म्हणती अन्नदाता ॥५७॥
कांहीं देवाचें भजन करती । मनीं प्रतिष्ठेची हाव धरिती । भोळया भाळया लुबाडिती । आम्ही सेवक म्हणोनिया ॥५८॥
मनांत येईल तेवढी वर्गणी । गोळा करावी चहूंबाजूंनी । सेवेसाठी बांधूं धर्मशाळा म्हणोनि । शेवटीं राहावें आपणचि ॥५९॥
जमा करावा आधी फंड । ज्ञान सांगोनिया उदंड । जनसेवेचे कार्य प्रचंड । तपशीलवार रेखाटूनि ॥६०॥
दावूनि त्याचे फायदे नाना । उत्तेजित करावें लोकांना । शेवटीं सेवेच्या नांवें धिंगाणा । स्वार्थाचाचि चालतसे ॥६१॥
कांहीजण यज्ञयागादि करिती । विश्वशांतीचें ध्येय बोलती । आपणचि मेजवानी झोडती । सेवक सगळे म्हणवोनि ॥६२॥
लोकांसि व्हावी मदत उत्तम । म्हणोनि करिती धर्मार्थ कार्यक्रम । त्यांत चैन करूनि वाढवावें नाम । ऐसेहि सेवक असती कांही ॥६३॥
सेवा आपुल्या हौसेसाठी । नाही तरि कोण करी आटाआटी ? प्रतिष्ठा होतांच समाधान पोटीं । मानती प्राणी ॥६४॥
कांहीं जनांनी सेवा केली । नांव न निघतां झुगारून दिली । उलटीं भांडणें माजविलीं । आपुलें काय ? म्हणोनि ॥६५॥
कांहींनी धंदा उभा केला । सेवेने दिपविलें थोरामोठयांना । आंतूनि नष्ट केलें लोकजीवनाला । भ्रष्ट वस्तु पुरवोनिया ॥६६॥
एक तमासगीर मजसी भेटला । त्याने वेश्या जमवोनि नाच केला । म्हणे मी सेवा अर्पावयाला । झटतों आहें जनतेसि ॥६७॥
कोणी काळाबाजार लाचलुचपती । यांचेंहि बुध्दीने समर्थन देती । लोकांची अडचण हातोहातीं । भागवूं म्हणती सेवाचि ही ॥६८॥
एकाने भिकारी जमा केले । गांवोगांवीं सोडूनि दिले । त्यांचे पैसे हिरावूनि घेतले । सेवा केली म्हणोनिया ॥६९॥
कोणी कोणी सेवा करी । तनमन लावोनि हवें तोंवरि । फोटो काढण्यापुरती चाकरी । पुढे फरारी होताति ॥७०॥
कांही सेवेस्तव प्रवासा गेले । चारीकडोनि फिरोनि आले । पुढे बिचारे घरीं बसले । मतलब झाला म्हणोनिया ॥७१॥
कांहींनी लोकां चेतविलें । सेवा म्हणोनि तट पाडले । आपण आंतूनि मिळोनि गेले । स्वार्थ साधला म्हणोनिया ॥७२॥
एकाने जनता घ्याया हातीं । सेवाव्रताची केली प्रगति । शेवटीं घेतली सत्ता हातीं । सेवा घडावी म्हणोनिया ॥७३॥
गेलीं सेवेंत वर्षे किती । आता अधिकार व्हावा म्हणती । शेवटीं लोकांस पिळूनि खाती । करूं प्रगति म्हणोनिया ॥७४॥
कांहींनी सेवा आरंभिली । सेवा घेण्यांतचि वेळ गेली । ज्याची सेवा हातीं घेतली । त्याचेंच मोडले कंबरडें ॥७५॥
सेवा करायासि साधू आले । नवरदेवापरी तोरा चाले । सेवेऐवजी जडचि झालें । पारडें यांचें ॥७६॥
आजवरि जन ऐसेचि फसले । म्हणोनि पाहिजे सावधान केलें । विचाराविणा जें सेवाकार्य चाले । घातुक झालें तें सर्व ॥७७॥
ऐसी नसावी सेवा कोणाची । सेवेने वृध्दि व्हावी सहकार्याची । गरज पुरवावी परस्परांची । लोभ न ठेवितां ॥७८॥
सर्वांस व्हावें समाधान । सेवक-सेवाभावियांसि पूर्ण । घेता देता दोघेजण । संतुष्ट व्हावेत सेवेने ॥७९॥
सेवा नसावी वरपंग दांभिक । आंत एक बाहेर एक । सेवा नसावी कृत्रिम सुरेख । कागदी फुलांपरी ॥८०॥
सेवा नसावी प्रतिष्ठेपुरती । सेवक नव्हे तो जो आपस्वार्थी । बिघडविल जनजीवनाची शांति । दुष्परिणामी सेवेने ॥८१॥
खरी सेवा म्हणजे निष्काम कर्म । परस्परांच्या सुखाचें वर्म । समजोनि करील जो त्याग-उद्यम । तोचि सेवाभावी समजावा ॥८२॥
ज्याने आपुलें घर विसरावें । त्यानेच गांव माझें म्हणावें । तोचि करील जीवें भावें । सेवा आपल्या गांवाची ॥८३॥
ज्यासि घरची आवडनिवड । तो घालूं न शके लोकहिताची सांगड । जरी बोलका असेल गोडधड । तरी लोक त्याचें न ऐकती ॥८४॥
ज्याचा घरचा स्वार्थ वाढला । त्यासि लोकसेवा व्यवसाय झाला । ऐसें दिसतां जनतेला । कोण मानील भावाने ? ॥८५॥
स्वार्थासाठी बुवा बने । स्वार्थासाठी नेता होणें । स्वार्थासाठी प्राणहि देणें घेणें । सर्वचि करिती बिचारे ॥८६॥
परि यांतून जो निघाला । निष्काम सेवा कराया लागला । तोचि सेवक म्हणोनि चमकला । सर्व लोकीं ॥८७॥
म्हणोनि कार्यकर्त्यांने हें ओळखावें । आपुले स्वार्थ आवरोनि घ्यावे । तरीच पाऊल पुढें टाकावें । सेवेसाठी ॥८८॥
सूर्य सकळांची सेवा करी । बदला न मागे तिळभरी । सातत्याने चाले तयाची चाकरी । सेवाभावें ॥८९॥
वृक्ष सर्वाची सेवा करितो । छाया पुष्पें फळें देतो । शेवटीं प्राण तोहि कार्या लावितो । सेवेसाठी ॥९०॥
मागे कांहींनी सेवा केली । धनधान्यराज्येहि अर्पिलीं । शेवटीं देह देवोनीहि पूर्ति केली । सेवेची त्यांनी ॥९१॥
त्यांच्या सेवेचीं पुराणें झालीं । त्यांची कीर्ति स्फूर्तिरूपा आली । ती आपणहि पाहिजे अंगीकारिली । सेवा कराया ॥९२॥
सेवेचे अनंत प्रकार । ते समजोनि करावी निरंतर । आपणासि साधेल तो व्यवहार । सेवाभावाने करावा ॥९३॥
अन्नसेवा धनसेवा । श्रमसेवा ज्ञानसेवा । शेवटीं ते प्राणसेवा । औषधादि रूपें ॥९४॥
व्यवहारसेवा सदधर्मसेवा । सर्वांत मोठी आत्मसेवा । आत्मसेवेंतचि सर्व सेवा । साधती सत्य ॥९५॥
आत्मसेवा नव्हें इंद्रियसेवा । तो आहे निर्मल ज्ञानठेवा । गांव तितुका उन्नत करावा । सत्संगतीने ॥९६॥
सेवा म्हणजे एक नव्हे । प्रत्येक कार्य सेवामय आहे । परि त्यांत व्यक्तिभावें न साहे । संग्रहवृत्ति ॥९७॥
अपरिग्रह सर्वतोपरी । हेचि सेवा आहे खरोखरी । त्याहिपेक्षा आणिक सरोबरी । आहे सेवेची ॥९८॥
आपण भूमिसमान राहावें । दीनहीनां वरि उचलावें । त्यांतचि समाधान मानीत जावें । सेवकाने ॥९९॥
आपण द्यावें आपण द्यावें । हेंचि अंतरीं जपत राहावें । आपुले कष्ट अर्पोनि सेवावें । यज्ञशेष जैसें ॥१००॥
कष्ट व्हावे सर्वा त्यापरी । यशहि वाटावें सर्वांचे घरीं । आपण कांहीच नाही, चतुरीं । मानावें ऐसें ॥१०१॥
प्रतिष्ठेसाठी सेवानोहे । ती स्वाभाविक हौसचि आहे । आत्मसमाधान हेचि राहे । पूर्ण फळ तियेचें ॥१०२॥
आम्हीं सर्व गांव साफ केलें । सर्वांच्या मनीं सुख वाटलें । सर्व लोक आनंदित झाले । हीच त्याची पूर्णता ॥१०३॥
आमुच्या गांवीं थोर आले । म्हणोनि गांव सुंदर सजविलें । परि करणारांचेंचि नांव पुढें केलें । तोचि खरा सेवक ॥१०४॥
नाहीतरि कष्टासि दडे मागे । नांव होतां पुढे धांव घे । लोक हासती नाना रंगें । टिंगल करोनि नेत्याची ॥१०५॥
ज्यासि आहे प्रलोभन । ईर्षा रागद्वेष जाण । त्याची सेवा विडंबन । समजा खर्या सेवेचें ॥१०६॥
जो दुसर्यासि उत्तम करितो । त्यांतचि आनंद मानतो । तोचि सेवक मी समजतों । येत्या युगाचा ॥१०७॥
प्रत्येक जीवाचा हाचि विकास । सर्वांभूतीं समजावें आपणास । तैसेंचि साधावें व्यवहारास । आपणासि नमवोनिया ॥१०८॥
सर्वांचा भार आपणावरि । तीच-समजावी सेवा खरी । हें कठिण व्रत न साधे जरी । आपलें ओझें तरी नसावें ॥१०९॥
आपल्या आल्याचा न पडो धाक । आपल्या गेल्याचा होवो शोक । ऐसा मोहनी-वृत्तीचा सेवक । पाहिजे गांवीं ॥११०॥
नाहीतरि सेवक आला घरां । धाक पडला रांडापोरा । आता कोठोनि याची व्यवस्था करा ? म्हणती आम्ही गरीब ॥१११॥
वास्तविक सेवक येतां घरां । मिळावा सर्व घरासि सहारा । आनंद वाटावा लहानथोरां । खेळींमेळीं तयाच्या ॥११२॥
सेवाभावी आला गांवीं । तेव्हा दसरा-दिवाळीच वाटावी । सर्वांचीं मनें संतोषावीं । सहकार्याने ॥११३॥
ऐसा सेवक असावा आदर्शवान । राहणीं बोलणीं, करील भजन । सदासर्वदा सत्कार्यीं मन । सेवकाचें ॥११४॥
अडीअडचणी लोक सांगे । सेवक पुरवोनि देई अंगें । ऐसें जीवजनांचें अनंत प्रसंगें । काम करी सेवक तो ॥११५॥
प्रयत्न करी नानापरी । दुर्गुण काढावया बाहेरी । तारतम्य ठेवोनि अंतरीं । तेंचि असे सेवाकार्य ॥११६॥
त्यास आपुलें ठावेंचि नाही । जें जें करील ती सेवाचि सर्वहि । कामें करोनिहि वाचा नाही । स्वार्थसुखाची ॥११७॥
घरीं दारीं सर्वदुरी । सेवकाचें प्रेम सर्वांवरि । तरीच तो प्रचार करी । आदर्शाचा कृतीने ॥११८॥
गांवीं असोत पक्ष पंथ । भिन्न जाती मतें अनंत । तीं सर्वचि गुंफिलीं जातील सूत्रांत । सेवेच्या एका ॥११९॥
ऐसाचि सेवक जनतेने पाळावा । त्याचि मार्गें गांव उत्तम करावा । सर्व लोकांत प्रेमभाव निर्मावा । सेवकाने ॥१२०॥
ऐशा सेवकाची अति जरूरी । सेवक पाहिजे घरोघरीं । सेवकावाचूनि कुटुंब, नगरी । उत्तम नव्हे ॥१२१॥
म्हणोनि बोलिलों बोल । सेवाकार्य महाप्रबल । सेवक मिळतां सुखी होईल । गांव सारें ॥१२२॥
श्रोतेहो ! समजा याचें महत्त्व । सर्वांत लोकसेवेचें श्रेष्ठत्व । हृदयीं पटवोनि घ्या तत्त्व । निघा सेवा करावया ॥१२३॥
त्यासि कला कुशलता नको कांही । प्रांजळ जिव्हाळाचि यशदायी । लागा लागा या मार्गी सर्वहि । तुकडया म्हणे ॥१२४॥
इति श्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव संमत । सेवासाधना वर्णिली येथ । नववा अध्याय संपूर्ण ॥१२५॥
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
**********************
ग्रामगीता अध्याय दहावा
॥ श्रीगुरुदेवाय नम: ॥
एक सेवानुभवी श्रोता । गहिवर दाटोनिया चित्तां । म्हणे माझी ऐका शोककथा । एकदा कानीं ॥१॥
सेवावृत्तीने वागतां । ग्रामोध्दाराचें फळ ये हातां । लोकवशीकरणाचा सेवेपरता । मंत्र नसे कोणी ॥२॥
हें आहे सर्वचि खरें । अनुभवासहि ये निर्धारें । परि काहीं लोक स्वार्थभरें । व्देषी होती सेवेचे ॥३॥
त्यांत कांही विद्वान कांही श्रीमान । राजदरबारींहि कांहींचें वजन । त्यांना गांवाचें हवें पुढारीपण । स्वार्थासाठी जेथे तेथे ॥४॥
लोक राहावेत पंखाखाली । म्हणजे आपुली पोळी पिकली । म्हणोनि खेळती अनेक चाली । सोंग घेवोनि सेवेचें ॥५॥
देती मिळवोनि दुर्मिळ सामान । कोणास कांही प्रलोभन । व्यसनी गुंडांस देती प्रोत्साहन । करिती संपादन प्रेम ऐसें ॥६॥
तेथे आमुची सेवा सगळी । प्रसंगीं होऊनि पडे दुबळी । जनता फसते भोळीभाळी । जाऊनि जाळीं तयांच्या ॥७॥
आमुच्या गांवीं हेंचि झालें । गांव सेवकांनी उत्तम केलें । परि पुढे दुर्भाग्य ओढवलें । याच मार्गे ॥८॥
सुंदर वेली लावल्या अंगणीं । घालोनिया परिश्रमाचें पाणी । फुलाफळांनी गेल्या बहरोनि । गगनभेदी ॥९॥
तैशांत सोसाटियाने आणावें वादळा । गळावा फळें फुलें पाचोळा । त्यांसवें वेलींचाहि चोळामेळा । व्हावा क्षणीं ॥१०॥
कैसें दु:खी न होईल मन । ज्याने वाढविलें करोनि जतन । गेलें घराचेंचि सुंदरपण । एकाएकीं ॥११॥
तैसें गांव नीतीने जतन केलें । मुलांबाळांसहि सांभाळिलें । परस्परांत प्रेम नांदलें । सेवागुणें खेळींमेळीं ॥१२॥
परि घुसले गांवचे भेदी । लाविली स्वार्थासाठी उपाधि । उगीदुगी करोनि भ्रमविली बुध्दि । पाडली फूट ॥१३॥
सेवेचें सोंग उभें केलें । आपले स्तुतिपाठक घुसविले । वाईट झालें तें तें माथीं मारलें । खर्या सेवकांच्या ॥१४॥
नथींतून जैसा मारावा तीर । तैसे असती बहादूर । परि गांव केला चकनाचूर । द्वैत पाडोनि ॥१५॥
नाना तर्हेचे वाद वितंड । नाना पक्षांचें माजविलें बंड । कधी आड कधी उघड । सुरू झालें कार्य त्यांचें ॥१६॥
गोंधळवोनि टाकिलें जनमना । झाला प्रेम-शक्तीचा धिंगाणा । जिकडे पाहावें तिकडे कल्पना । फुटीर वृत्तीच्या ॥१७॥
कांही सज्जनांनी गांव जमविलें । कांही गुंडानी गांव नाशविलें । नाना तर्हेचे तमाशे झाले । गांवीं आमुच्या ॥१८॥
व्यक्तिस्वार्थ बोकाळला । जो तो मनाचा राजा झाला । वेगवेगळया प्रलोभनीं गुंतला । समाज सारा ॥१९॥
आमिषामाजी लपला गळ । परि माशासि दिसे आमिषचि केवळ । तैसे भ्रमिष्ट झाले लोक सकळ । प्रलोभनापायीं ॥२०॥
कांही अतिनम्रता दाखविती । साहेबांचे जोडेहि पुसती । मनीं वासना वाईट धरती । अधिकारी व्हाया गांवाचा ॥२१॥
नाही कोणा सेवेचें भान । घालिती सत्तेसाठी थैमान । गांव केलें छिन्नभिन्न । निवडणुकी लढवोनि ॥२२॥
गांवीं होती निवडणुकी । माणसें होती परस्परांत साशंकी । कितीतरी पक्षोपक्षांनी दु:खी । व्यवहारामाजी ॥२३॥
तैसीच येथे गति झाली । कोणी जातीयतेची कास धरिली । कुचेष्टा करोनि प्रतिष्ठा मिळविली । वचनें दिलीं हवीं तैसीं ॥२४॥
कांहीकांनी मेजवानी दिली । दारू पाजूनि मतें घेतलीं । भोळी जनता फसवोनि आणिली । मोटारींत घालोनिया ॥२५॥
ऐसा सर्व प्रकार केला । गुंडगिरीने निवडून आला । म्हणे संधि मिळाली सेवकाला । सेवा करीन सर्वांहूनि ॥२६॥
साधन ज्याचें मुळांत अशुध्द । त्याचा परिपाक कोठूनि शुध्द ? लोकां पोळोनि व्हावें समृध्द । गांवीं दुफळी माजवोनि ॥२७॥
सत्तेसाठी हपापावें । वाटेल तैसें पाप करावें । जनशक्तीस पायीं तुडवावें । ऐसें चाले स्वार्थासाठी ॥२८॥
याने गांवाची होय दुर्दशा । मतमतांतराचा वाढे तमाशा । सज्जनांची होय निराशा । मरणापरी ॥२९॥
आतां सांगा काय करावें ? कासयाने गांव सुधारावें ? जें जें होईल तें तें पाहावें । ऐसें वाटे निराशपणें ॥३०॥
ऐसा श्रोतयाने प्रश्न केला । मीं तो मनापासोनि ऐकला । मित्रहो ! उपाययोजना तुम्हांला । सांगतों माझेपरीं ॥३१॥
परिस्थिती ही साचचि आहे । परि निराश होणें काम नोहे । दुर्जनांचें बळ वाढाया हे । कारण होई निराशा ॥३२॥
आपणांस काय करणें । ऐसे बोलती लोक शहाणे । तरि समजावें गांव या गुणाने । नष्ट होईल सर्वस्वीं ॥३३॥
मग तो मुखंडहि नव्हे । ऐसें कां न समजावें ? निर्धाराने प्रयत्न करावे । सर्व मिळोनि जाणत्यांनी ॥३४॥
ऐसें असावें धोरण । तेंचि कार्यकर्त्यांसि भूषण । गांव निर्मावया आपुले प्राण । पणा लावावे ॥३५॥
विरोध येतां बसावें घरांत । ऐसें नोहे सेवेचें व्रत । गंगा घाबरती पाहोनि पर्वत । तरी सागरा न मिळती ॥३६॥
कोरडया हौदामाजीं तरावें । याने गौरव कोणा पावे ? पुरांच्या लाटांतूनि पोहूनि जावें । यांतचि वैशिष्टय आपुलें ॥३७॥
म्हणोनि कर्तव्य सांभाळावें । गांवशील जतन करावें । सोसाटयाने झडपूं न द्यावें । गांवचें कोणी ॥३८॥
ग्रामसेवाचि ईश्वर-सेवा । ऐसें समजावोनि जीवा । गांव सेवेसि तत्पर करावा । सर्वतोपरीं ॥३९॥
नि:पक्षपणें बौध्दिकें द्यावीं । सर्वांची समजून पटवावी । बुध्दि गांवाची सांभाळावी । प्रचाराद्वारें ॥४०॥
जनजागृति झालियाविण । न संपेल गांवाचें दैन्य । दृष्टि येतां लोकांसि, दुर्जन । मेख गडवूं न शकती ॥४१॥
या कार्यासि मिळावी जोड । म्हणोनि हातीं कांही मुखंड । तेणें शक्ति लाभे तोडीस तोड । पटती फिके ग्रामशत्रु ॥४२॥
असो नसो साथ सत्तेचा । सहयोग मिळवावा सज्जनांचा । जनसेवकांनी ग्रामराज्याचा । पाया रचावा सत्यावरि ॥४३॥
ज्यांना ज्यांना न्यायाची चाड । आणि गांव-सेवेची आवड । त्यांचीच संघटना व्हावी दृढ । करावी वाढ दिसंदिस ॥४४॥
जाणता दिसेल तो निवडावा । जिव्हाळयाचा पुरुष वेचावा । थोरांचिया नेतृत्वें चालवावा । कारभार ग्रामोन्नतीचा ॥४५॥
श्रोता म्हणे तेंहि झालें । महाप्रयासें सज्जन जमविले । परंतु एकदा चुकलें । तें सुधरेचना की ॥४६॥
अहो ! एक कमेटी बसली । गांवीं सुंदरता आणाया भली । म्हणे पाहिजे निवडणूक केली । पुढार्यासाठी ॥४७॥
कोण गांवाचा पुढारी ठरवावा ? आधी मान कोणास द्यावा ? कोणाच्या हातें चालवावा । कारभार गांव-सेवेचा ? ॥४८॥
म्हणोनि निवडणूक ठरविली । ती जणुं आगींत बारूद पडली । अथवा राकेलाची टाकीच ओतली । अग्निमाजी ॥४९॥
तेणें जाहला अग्निबंबाळ । मतामतांचा हलकल्लोळ । एकमेकासि पाहती महाकाळ । शहाणे गडी ॥५०॥
जो तो म्हणे मीच शहाणा । कोणीच कोणाचें ऐकेना । अरे ! तोबातोबा ! आरडाओरडांना । सुमारचि नाही ॥५१॥
घरोघरीं मारामारी । बायको उठूनि नवर्यासि मारी । मुलें म्हणती आम्ही शहाणे भारी । पुस्तकें सारीं शिकलों की ॥५२॥
कोण पुढारी समजावा ? विचार झाला सगळया गांवा । एकएकाच्या न मिळे भावा । सांगा काय करावें ? ॥५३॥
श्रोतयाचा हा अनुभव । येत आहे गांवोगांव । परंतु येथे मुळांतचि ठेव । चुकली सारी ॥५४॥
गढूळ पाणी ढवळों जातां । घाणचि उफाळोनि ये हातां । जेथे सेवेची नाही आत्मीयता । तेथे गोंधळ सहजचि ॥५५॥
यासाठी आधी सेवाभावी । लोकांचीच संघटना व्हावी । तेथे रीघचि नसावी । अन्य कोणासि ॥५६॥
गांवांतील एकेक सज्जन । शोदूनि घ्यावे त्यासि जोडून । सेवाभावी मंडळचि संपूर्ण । तयार करावें प्रयत्नें ॥५७॥
त्याचें प्रामाणिक सत्कार्य । लोकांपुढे येतां निर्भय । आपोआपचि होईल निश्चय । लागेल सोय गांवासि ॥५८॥
सेवेची ही नैतिक सत्ता । वजन मिळवील गांवहिता मग कोणी विरोध तत्त्वता । न टिके तेथे ॥५९॥
टाकूनि दाब कोणावरि । लालुच दावूनि करिती फितुरी । विघ्नें आणिती सत्कार्यावरि । होतील दुरी ते सर्व ॥६०॥
सेवासंघटनेचा प्रमुख । तो निवडोनि देतां चोख । हळुहळू गांव होईल सुरेख । सर्वतोपरीं ॥६१॥
श्रोता म्हणे ठीक हें सारें । परि गांवीं आलें निवडणुकीचें वारें । तेणें गांव आमचें भरीं भरे । भलतैशाचि ॥६२॥
स्वार्थापायीं सेवा-विरोध । करणारे जे गांवचे मैंद । ते नाना मार्गे करिती बुध्दिभेद । जनतेचा तयेवेळीं ॥६३॥
तेथे आम्हीं काय करावें ? गांव कैसे सुधारावें ? याचें समाधान ऐकावें । श्रोतेजनीं ॥६४॥
सांगितलें ते साचचि आहे । गांवोगांवीं अनुभवा ये । यासाठी सरळ दावावी सोय । विचाराने गांवलोकां ॥६५॥
निवडणुकीची चालू प्रथा । हीच मुळीं सदोष पाहतां । म्हणोनि योग्य दृष्टि द्यावी समस्ता । गांववासियां ॥६६॥
जीवनाची जबाबदारी । किती आहे निवडणुकीवरि । हें पटवोनि निवडणूक खरी । करवावी न गोंधळता ॥६७॥
विचार केलिया हळूहळू । आपैसाचि मार्ग ये कळूं । निवडणुकीचें तत्त्व जातां आकळूं । मिटेल गोंधळ सहजचि ॥६८॥
अहो ! पुढारीपण कशाला ? सेवा गांवाची करावयाला । मग सेवेची कसोटी लावा कीं आपुला । समजेल पुढारी कोण तो ॥६९॥
कोण गांवासाठी झटे । कोण उठतो रोज पहाटे । घेऊनि हातामाजीं खराटे । झाडतो कोण ॥७०॥
साध्या राहणीने दिवसभरि । कोण गरीबाचें काम करी । कोण पायीं फिरोन करी वारी । गांवाची आमुच्या ॥७१॥
कोण नीतीने असे चांगला । पक्षपात न आवडे कोणाला । छदामासि नसे लाजीम झाला । गांव-निधीच्या ॥७२॥
कोण सर्वांचें पाहतो सुख:दुख । कोणाचें दिसे सेवेंसाठी मुख । हीच त्याची जाणावी ओळख । निवडावया ॥७३॥
किंवा सकळांना सांगा काम । सोडा हुकूम आपुला बेफाम । कोण पहा न करितां आराम । काम करी गांवाचें ॥७४॥
मग तोचि म्हणावा पुढारी । आंधळाहि त्याची निवड करी । येथे कासयास ही टिमकी भरजरी । जाहिरातींची ? ॥७५॥
गांवचा जो प्रत्येक घटक । त्यासि ठाऊक असावा माणूस एकेक । कोण चुकार, कोण सेवक । चालक कोण ? ॥७६॥
कोण गांवाची सेवा करतो । कोण प्रतिष्ठेसाठी मिरवितो । सांगावा प्रसंग येतां स्पष्ट तो । गांवामाजी ॥७७॥
तेथे नसावी लाजशरम । त्याने बिघडेल गांवाचें काम । म्हणोनि सर्वांनी द्यावें त्याचेंच नाम । न गोंधळतां ॥७८॥
ज्यासि गांवाचा जिव्हाळा । जो कार्यज्ञानाचा पुतळा । तोचि सुखी करील गांव सगळा । निवडोनि देतां ॥७९॥
ऐसें न करतां भांडणें माजती । गांवची होईल अनावर स्थिति । मग फावेल स्वार्थीजनाप्रति । सज्जन राहती वेगळेचि ॥८०॥
यासाठी उत्तम गुणी निवडावा । ज्याची सर्व करिती वाहवा ! गांवाचा बागडोर त्यासि द्यावा । आपुला पुढारी म्हणोनिया ॥८१॥
नाहीतरि गांवचे म्हणविती पुढारी । दांत बसला सवाई-दिढीवरि । आपण होऊनि वाघापरी । गांव मारिती उपवासी ॥८२॥
कांही लोक भाषणें करिती । बोलूनि पक्षभेद पाडिती । जुळल्यांची तोडूनि मति । भरती करिती झगडयांची ॥८३॥
ऐसा नकोच पुढारी । ज्याने नाही केली कर्तबगारी । तो मित्र नव्हे, वैरी । समजतों आम्ही ॥८४॥
ज्याने केलें असेल उन्नत ग्राम । अथवा समुदायाचें आदर्श काम । तोचि बोलण्याचा अधिकारी उत्तम । समजतों आम्ही ॥८५॥
एरव्ही पैशाचे मिळाले तीन । देती भरभरा भाषण । न बसावें कोणाचेंहि मन । तयांवरि ॥८६॥
ऐसे पुढारेपण जेथे दिसे । गांवाने लावूनि न घ्यावें पिसें । जो इमानदार सेवक असे । तोचि समजावा गांवधनी ॥८७॥
बोलणें एक चालणें एक । लपविणें एक दाखविणें एक । हें गांवासि होईल घातक । समजावें श्रोतीं ॥८८॥
भिडेखातरहि विष खादलें । किंवा चोरूनिहि सर्पा दूध पाजलें । वाघाशीं सोईरपणहि संपादलें । तरी नाश होईल निश्चयें ॥८९॥
ऐसें न करावें वर्तन । असतील जे इमानदार सेवकजन । तेचि द्यावेत निवडोन । एकमतें सर्वांनी ॥९०॥
सर्वांस असावी चिंता समाजीं । कोण आहे लायक जनामाजी । कोण घेई गांवाची काळजी । सर्वकाळ ॥९१॥
तोचि करावा पुढारी । एरव्ही पडों नये कुणाच्याहि आहारी । धन वेचतो म्हणोनि गांवाधिकारी । करूं नये कोणासि ॥९२॥
पुढारीपण सेवेनेच मिळे । हेंचि बोलावें मिळोनि सगळे । तेथे पक्षबाजीचे चाळे । वाढोंचि न द्यावे ॥९३॥
नातीं गोतीं पक्ष-पंथ । जातपात गरीब-श्रीमंत । देवघेव भीडमुर्वत । यासाठी मत देऊंचि नये ॥९४॥
भवितव्य गांव अथवा राष्ट्राचें । आपुल्या मतावरीच साचें । एकेक मत लाख मोलाचें । ओळखावें याचें महिमान ॥९५॥
मत हें दुधारी तलवार । उपयोग न केला बरोबर । तरि आपलाचि उलटतो वार । आपणावर शेवटीं ॥९६॥
दुर्जन होतील शिरजोर । आपुल्या मताचा मिळतां आधार । सर्व गांवास करितील जर्जर । न देतां सत्पात्रीं मतदान ॥९७॥
मतदान नव्हे करमणूक । निवडणूक नव्हे बाजार-चुणूक । निवडणूक ही संधि अचूक । भवितव्याची ॥९८॥
निवडणूक जणुं स्वयंवर । ज्या हातीं देणें जीवनाचे बागडोर । त्यासि लावावी कसोटी सुंदर । सावधपणें ॥९९॥
फोड चोखाया लावोनि जैसे । शिष्य निवडिले रामदासें । मृत्यूच्या कसोटीवरि पाहणें तैसें । गुरु गोविंदसिंहाचें ॥१००॥
गडी पळावयासि लागले । कोण थकले कोण बाद झाले । कोणाचे नंबर पुढे आले । सहजचि कळे या रीतीं ॥१०१॥
तैसेंचि आहे निवडणुकीचें । कामचि पाहावें सगळयांनी त्यांचें । ज्याचें काम अधिक मोलाचें । तोचि निवडावा मुख्य ऐसा ॥१०२॥
ऐसें सकळां पटवोनि द्यावें । तेणें गोंधळ मिटती आघवे । कार्यकर्त्यासीच संधि पावे । ऐसें होतें यायोगें ॥१०३॥
मग त्याचेंचि म्हणणें ऐकावें । सगळें गांव पुन्हा जमवावें । बाष्कळ बोले त्यास दाटोनि द्यावें । गांवकर्यांनी ॥१०४॥
ऐसें झालें की झाली संघटना । लागली सुरूं गांव-सुधारणा । झाला मुलामाणसांचा बाग पुन्हा । जिताजागता प्रेमळपणें ॥१०५॥
तेथे नवनवीं योजना-फुलें । विकसोनि देतील गोड फलें । ग्रामराज्याचें स्वप्नहि भलें । मूर्त होईल त्या गांवीं ॥१०६॥
कोणी उडवूं लागे धुरळा । तरि तो त्याचेचि जाईल डोळां । सुखें नांदेल गांव सगळा । तुकडया म्हणें ॥१०७॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । कथिला ग्रामराज्याचा निर्वाचन-पथ । दहावा अध्याय संपूर्ण ॥१०८॥
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
*********************
ग्रामगीता अध्याय अकरावा
॥ श्रीगुरुदेवाय नम: ॥
ईश्वरसेवाचि गांव-सेवा । तो सर्वांच्याचि सुखाचा ठेवा । परि कांही असुरहि असती गांवां । यज्ञभंग करावया ॥१॥
एका सज्जनें प्रश्न केला । गांवीं बाग फुलूं लागला । परि दुष्ट लाविती आग त्याला । काय उपाय नित्यासाठीं ? ॥२॥
आम्हीं केली संघटना । निवडोनि आणिलें सज्जना । परंतु दुर्जनापुढे बनेना । कांही केलें तरीहि ॥३॥
त्यांना दावा आदर्श जीवन । अथवा प्रचारें द्या पटवून । किंवा सेवा रात्रंदिन । करा त्यांची हवी ती ॥४॥
परंतु ते न जुमानिती । उपदेश देतां उलटे चिडती । कार्यकर्त्यांसि हाणूनि पाडिती । पदोपदीं अडवोनिया ॥५॥
चांगल्यातूनहि काढिती वाईट । हवा फैलाविती रोगट । सज्जनांवरि आणिती संकट । कारस्थानें करोनि ॥६॥
कमलकसाई बोलभांड । मुडदेफरास गांवगुंड । कज्जेदलाल धनाढय धेंड । हातीं तयांच्या ॥७॥
सत्तेचाहि पाठिंबा सतत । घेवोनि आणिती पेचांत । बसली लोकांना त्यांची दहशत । सांगा काय करावें ? ॥८॥
मित्रा ! जो जो जेयीचा रोग । तेथेचि त्याची औषधि सांग । योजकचि पाहिजे कराया उपयोग । कुशलपणाने ॥९॥
सत्य पडताहे कमजोर । म्हणोनीच असत्य होई शिरजोर । यास्तव सत्यासि करावें कठोर । सामर्थ्यशाली सेवेसाठी ॥१०॥
सत्याचें बळ वाढेल कैसें । तेंहि सांगतों ऐका शांतसे । सज्जनांनी न बसावें आळसें । अथवा हताश होवोनि ॥११॥
लोकांचिया मनीं जरी दहशत । तरी तुमच्यासारिखेचि कांही त्यांत । असतील हृदयीं तळमळत । चांगलें व्हावें म्हणोनि ॥१२॥
ऐसी ज्यांना ज्यांना आवडे सेवा । जे सत्याचा जपती ठेवा । त्या लोकांचा करोनि मेळावा । सक्रिय संघटन वाढवावें ॥१३॥
जनतंत्राचा हा काळ । शक्ति लोकांअंगींच सकळ । जनतेच्या निश्चयाचें बळ । साम्राज्यासहि नमवूं शके ॥१४॥
हत्तीस आवरी गवती दोर । मुंग्याहि सर्पासि करिती जर्जर । व्याघ्रसिंहासि फाडिती हुशार । रानकुत्रें संघटोनि ॥१५॥
संघटनेने काय नोहे ? । बिंदू मिळतां सिंधुपणा ये । गांवचा बाग बहरोनि जाय । फुलाफळांनी संघटनेच्या ॥१६॥
ग्रामसुधारणेचा मूलमंत्र । सज्जनांनी व्हावें एकत्र । संघटना हेंचि शक्तीचें सूत्र । ग्रामराज्य निर्माण करी ॥१७॥
गांव करी तें राव न करी । ऐसें सांगोनि ठेविलें चतुरीं । जरी दाद न घेतील अधिकारी । तरी गांव तय सुधारूं शके ॥१८॥
यासाठीच पाहिजे सशक्त संघटन । जें करी अन्याय-निर्मूलन । देवोनिया न्यायदान । करी रक्षण गांवाचें ॥१९॥
संघटन गांवीं मजबूत असावें । आपापलें दु:ख त्यासि सांगावे । कोणावरि अन्याय होऊं न द्यावे । कार्य संघटनेचें ॥२०॥
त्यासाठी मिळोनि लोक नेमावे । जे असतील इमानी बरवे । त्यागी निर्भय, चरित्र असावें । उज्जल ज्यांचें ॥२१॥
गांवाचे जे पवित्र सेवक । तेचि प्रसंगी होती सैनिक । ज्या गांवी ऐसे सावध पाईक । तेथ विघ्न न ठाके ॥२२॥
कांही अपराध घडतां गांवांत । त्वरित कळवावी खबरमात । सर्वांनी भाग घेवोनि त्यांत । ठीक करावें बिघडेल तें ॥२३॥
गांवचा प्रत्येक सज्ञान । यांचें असावें सहकार्य पूर्ण । हांक देतां सर्वजण । जमोनि यावेत एकत्र ॥२४॥
एकाने कोणी गुन्हा केला । शहाणपण सांगावें सकळांनी त्याला । गुन्हेगार ऐकेनासा झाला । शिक्षा द्यावी गांवाने ॥२५॥
जेथे समजदार प्रलोभनीं पडला । सोंग करोनि घोरूं लागला । चिमटे घेवोनीच त्याला । उठविलें पाहिजे ॥२६॥
कोळसा साबूने धुवा उगाळा । परि तो शेवटवरि काळा । अग्निसंस्कारी जळतां उजाळा । येई त्यालागी ॥२७॥
म्हणोनि बहिष्कार असहकार । करोनि त्याचे तोडावे आधार । नाक दाबतां तोंड सत्वर । उघडों लागे ॥२८॥
ऐसी सर्वांनी पाठ पुरवावी । जो कोणी गांवास बिघडवी । ऐकेनासा होतां सत्ताप्रभावीं । मुक्त करावा गांवांतूनि ॥२९॥
उत्तमांचाचि संग्रह बरवा । वाईटाचा निषेध करावा । जराहि पनपूं न द्यावा । वृक्ष वाईटाचा ॥३०॥
सर्वांनी झटावें यासाठी । करावी लागेल ती आटाआटी । प्राण गेला तरी संकष्टीं । सहन करावें सेवेस्तव ॥३१॥
ऐसी असावी गांवाची तयारी । तरीच गांव बनेल स्वर्गपुरी । नलगे सत्ताधीशांची तुतारी । पाठीमागे ॥३२॥
ऐसा होतां आचार-विचार । गांव होईल न्यायभांडार । जागृत असतां सज्जन चतुर । सेवेसाठी ॥३३॥
ऐसें जें जें गांव वागलें । त्या गांवाचें भाग्य उघडलें । नाहीतरि टक्केटोणपे आले । नशिबीं त्याच्या ॥३४॥
हें ऐकोनि एक बोलला । म्हणे तुम्ही शांतीचा पुरस्कार केला । आणि तुम्हीच ससेमिरा लाविला । दुराचार्यांपाठीं ॥३५॥
सज्जन आणि दुर्जन । सर्वांत सारखाचि भगवान । एकासि देतां दंड धावोन । तेव्हा सेवा कुठे राहे ? ॥३६॥
दया क्षमा आणि शांति । हीच सात्विकाची संपत्ति । निष्ठुरपणें दंडावें विरोधकांप्रति । हें सज्जनपण कशाचें ? ॥३७॥
ऐका ऐसी विचारसरणी । ऐकोनि भुलूं नये कोणी । तारतम्यचि ठेवोनि मनीं । गांव सुधारावें विचारें ॥३८॥
काय केलें म्हणजे होतो सज्जन । याचें आहे मोजमाप जाण । हें प्रथमक्षणींच ओळखोन । हुशार व्हावें गांवाने ॥३९॥
सेवा द्यावी कोणे ठायीं । हें तारतम्य असावें हृदयीं । याची दृष्टि ज्यांस नाही । होतील फजीत ते प्राणी ॥४०॥
ज्यासि करणें चोरबाजार । त्यासहि नोकर पाहिजे इमानदार । त्यासि देतां सेवा सुंदर । पुण्य लाभेल कोणासि ? ॥४१॥
साधुसंतें जनसेवा केली । परि सत्यासाठीच काया झिजविली । कधी आसचि नाही ठेविली । राजेरजवाडयांची ॥४२॥
जगीं अनंत राजे झाले । परि सर्वचि नाही पूजिले । संतसज्जनचि देव मानले । हृदयमंदिरीं तयांनी ॥४३॥
म्हणोनि कोणी कोणास सेवा द्यावी । हेचि प्रथम दृष्टी यावी । मग सेवेसाठी उडी घ्यावी । हाचि धर्म मानवाचा ॥४४॥
सदैव दया असावी चित्तीं । मनास परोपकाराची प्रीति । राहूं न द्यावी उणीव कोणती । दिसतां कोठे ॥४५॥
क्षमाशांतिमय हृदय । विश्वासूपणाचें वर्तन निर्भय । प्राण गेलियाहि निर्दय । न व्हावें आम्ही ॥४६॥
परि जेथे निर्दयपण हवें । तेथे दगडापेक्षाहि कठिण व्हावें । हेंहि सांगणें लक्षांत घ्यावें । तारतम्याने ॥४७॥
नाहीतरि दया केली । उलट आपुल्यासचि भोवली । जिने गांवाची नासाडी झाली । नव्हे ती दया ॥४८॥
भिकार्यास भीक दिली । त्याने दारू-गांजांत उडविली । सांगा काय दया घडली । ऐशियापरीं ? ॥४९॥
कांही चोरटे गांवीं फिरती । दिवसां साधुवेष घेती । रात्रौ तेचि डाका मारिती । वेषभूषा बदलोनि ॥५०॥
ते लोकांनी सहन करावें । साधु म्हणोनि सोडोनि द्यावें । ऐसे दयेचे वेडे गोडवे । गाऊं नयेत वीरांनी ॥५१॥
दयाधर्म दानधर्म । यांचें ओळखावें वर्म । वेडयापरी न करावें कर्म । पोषक आळसा विकारा ॥५२॥
एरव्ही संसार सोडोनि बुवा झाले । दारोदारीं भिकेसि लागले । सदाचार सर्व बुडविले । ऐसे झालें याच गुणें ॥५३॥
कष्ट नाही करणें अंगीं । नाही संग्रहाचे खरे त्यागी । वेष घेवोनि फिरती ढोंगी । नांव बुडवाया संतांचें ॥५४॥
यांना दानधर्म द्यावे । तरि सर्व पापांसि स्थान मिळावें । म्हणोनि तारतम्य ठेवावें । दानधर्मियाने ॥५५॥
गांवीं मागती माधुकरी । खुशाल खेळती फिचर जुगारीं । दारूगांजा भांग पोरी । गुप्त राखती मठामाजी ॥५६॥
ऐशा लोकां दान द्यावें । गांव बुडवावें, बदनाम व्हावें । ऐसा धर्म कोणत्या देवें । सांगितला सांगा ? ॥५७॥
दया हें मुख्य धर्मलक्षण । परि दया म्हणजे प्राण्यांचें पालन । आणि कंटकांचें निर्दालन । बोलिलें संतीं ॥५८॥
सज्जनांचें संरक्षण । आणि दुर्जनांचें दमन । हेंचि अवतारांचेंहि कार्यलक्षण । न्यायसंगत ॥५९॥
म्हणोनि गांवीं कोणी अन्याय केला । दु:ख दिलें कोणा गरिबाला । त्याचा प्रतिकारचि पाहिजे झाला । गांवामाजी ॥६०॥
नाहीतरि गुंडांस फावे । सुटती जैसीं स्वैर गाढवें । दुष्टासि दया करोनि सोडोनि द्यावें । नव्हे हा धर्म ॥६१॥
अन्याय होतां प्रतिकारचि करावा । प्रथम अन्याय समजूनि घ्यावा । निश्चित कळतां आवाज द्यावा । संघटनेचा ॥६२॥
अन्याय नाना तर्हेचे असती । कांही धनाचे मानाचे दिसती । कांहींनी वाढे व्यसन अनीति । लोकांमाजी ॥६३॥
त्या सर्वांतूनि मार्ग काढावा । गांवीं दुराचार होऊं न द्यावा । हाचि खरा धर्म ओळखावा । विचारवंताने ॥६४॥
न्यायाचा कांटेकोरपणा । भिनावा आपुल्या हृदयीं जाणा । एका बाजूने दयेचा बाणा । दुसर्या बाजूने न्यायदंड ॥६५॥
हेंचि खरें मानवाचें लेणें । उगीच आहे सोनें मिरविणें । अंगीं वीरता नसतां मरणें । चोराहातीं ॥६६॥
कांहीलोक भोळे असती । आपुलें मानव्यभूषण खोविती । लोक त्यांसीच सात्विक म्हणती । वेडयापरी ॥६७॥
ज्यास करवेना ब्रीदाचें रक्षण । नाही अंगीं न्यायाचें भूषण । तो कैसा सात्विकजन । म्हणावा आम्हीं ? ॥६८॥
जो चोरांनी नागवावा । गुंड लोकांनी फसवोनि द्यावा । परस्त्रियेने भोंदवावा । तो सात्विक कैसा ? ॥६९॥
तोंडावरची न उडवी माशी । दच्के पाहतांचि पोलिसासि । न कळे आपुला हक्कहि ज्यासि । सात्विक त्यासि म्हणों नये ॥७०॥
त्यास म्हणावें दुबळा प्राणी । भित्रा विकासहीन अज्ञानी । ज्यांत नाही पुरुषार्थाचें पाणी । रक्षणासाठी ॥७१॥
त्यास कोणीहि उचलोनि न्यावें । दारूगांजादिक पाजोनि द्यावें । त्याने भोळा म्हणोनि पिऊनि घ्यावें । वारे भोळा ऐसा ॥७२॥
हा तो निर्बुध्दसा पाषाण । उत्तम वागण्याचें नाही ज्ञान । गंभीर शांत म्हणती जन । मुकामैंद म्हणोनिया ॥७३॥
खरा शांत तोचि नेमाने । जो न फसे कोणाच्या फसविल्याने । कधीहि चकाटया पिटणें ज्याने । पाहिलें नाही ॥७४॥
परनिंदा नावडे ज्यासि । परदु:ख न पाहवे डोळयांसि । धांवोनि जाय अडल्या-पडल्यासि । सहकार्य द्याया ॥७५॥
उगीदुगी ऐकतां कानीं । लगेच जाय तेथोनि उठोनि । लोकां सांगे उगीच बोलणीं । बोलूं नयेत ॥७६॥
कोणाची लपोनि टीका न करी । बोलणें ज्याचें तोंडावरि । निर्भय निर्मळ अंतरीं । स्फटिक जैसा ॥७७॥
गंदेपणा मुळीच नावडे । सुजनांचे गातो सदा पवाडे । सत्संगतीसि जीव धडपडे । सदैव ज्याचा ॥७८॥
सर्वांशीं बंधुत्वाचें वागणें । मन-मिलाफ संपादणें । लोकसंग्रह कुशलतेने करणें । जागृतीसाठी ॥७९॥
सुखीं अहंकारें न चढावें । संकटीं घाबरोनि न जावें । न्यायाने वागावें वागवावें । सर्व जना ॥८०॥
हें ज्यांनी अंगीं बाणविलें । तेचि शांतसात्विक बोलिले । तयांनीच गांवाचें हित झालें । समजतों आम्ही ॥८१॥
याऐवजीं दुबळेपण आलें । तरि गांवचि मग विलया गेलें । सांभाळितां न जाय सांभाळिलें । कोणाकडोनि ॥८२॥
म्हणोनि पाहिजे न्यायनिष्ठुरता । दयेमाजींहि तारतम्यता । उन्नति करील तीच सेवा तत्त्वता । हरप्रकारें ॥८३॥
द्वेष न करितां दुर्जनदमन । हें त्यांच्याहि उन्नतीसचि कारण । डॉक्टरें करावें अवयवच्छेदन । ती दयाचि तयाची ॥८४॥
सर्वाभूतीं परमेश्वर । त्यासि बाधक नसे सत्यव्यवहार । करावें संघटनेने गांव सुंदर । ही पूजाचि तयाची ॥८५॥
सर्वाभूतीं प्रेमभाव । वाढवावा गुणगौरव । दूर सारोनि उपद्रव । गांवचे आपुल्या ॥८६॥
जग तरि आम्हां देव । परि हा निंदितों स्वभाव । म्हणोनि गुंडांसि आणिला खेव । संत तुकारामांनी ॥८७॥
हरिभक्त राहती जेथे । परचक्र यावें कैसें तेथे ? ऐसें म्हणोनि लाविला पणातें । जीव त्यांनी ॥८८॥
आपुले वारकरी भाविक । तेचि वारकर्ते पाईक । करोनि दुष्टांसि लाविला धाक । शिवाजीच जणुं सर्वहि ॥८९॥
तीच घेवोनि प्रेरणा । गांवी उभारावी न्यायसेना । जेणें कांही नुरे धिंगाणा । गांवीं आपुल्या ॥९०॥
दारू गांजा भांग अफीम । जुगार वेश्यादि वाईट काम । यांचें उरूं न द्यावें नाम । आपुल्या गांवीं ॥९१॥
त्यासाठी गांवच्या कांही सज्जनांनी । लागावें व्यसन-निर्मूंलनीं । उत्तम गुणांच्या अनेक श्रेणी । वाढवाव्या गांवीं ॥९२॥
गांवचे चार सज्जन मिळोनि । अनिष्टप्रथा बंद कराव्या त्यांनी । ज्याने गांवास पावे नुकसानी । न ठेवावें तें ॥९३॥
कांही उन्मत्त शेतकरी । टोचती बैलासि तुतारी । रक्त काढूनि वासना पुरी । करिती आपुली ॥९४॥
देवाचिया नांवाखाली । कांही देतात जीव बळी । बंद करावी प्रथा असली । भावना सुधारोनि लोकांची ॥९५॥
कोणी घुमारे लुबाडिती । बुवा लोकांस फसविती । भ्रमिष्ट मतें व्रतें शिकविती । सावध करावें त्याठायीं ॥९६॥
परस्परांना मदत करावी । अडीअडचण ती निभवावी । सर्वांकडोनि करोनि घ्यावी । योग्य सेवा ॥९७॥
गांवसेवेंत आली अडचण । तिला द्यावें अग्रस्थान । आपापली जागा-जमीनहि देऊन । सोय करावी सर्वांची ॥९८॥
सर्वांकडोनि ऐसी सेवा नव्हे । तरि गरजूंना सहकार्य द्यावें । होईल तेवढें तरी करावें । निष्कपटपणें ॥९९॥
मुलाबाळांचें असतां लग्न । सर्वांनी जावें धावोन । पडोंचि न द्यावें ओझें, न्यून । आईवडिलांसि तयांच्या ॥१००॥
थोडेंथोडें सर्वांनी आणावें । वरवधूंना साहित्य द्यावें । भोजनापासोनि उरकवावें । सर्वतोपरीं ॥१०१॥
मांडवावरी पांच डहाळे । टाकावे हा धर्म गांवकर्या कळे । तैसेचि निभवावे प्रसंग सगळे । सहकार्याने ॥१०२॥
जैसें जैसें सहकार्य वाढे । तैसें गांव उन्नतीस चढे । न पडे विपत्तीचें कोडें । गांवीं कोणा मानवासि ॥१०३॥
ऐसी सेवा बिंबतां जीवनीं । कांहीच गांवीं न पडे उणी । तरीहि असावा स्वतंत्रपणीं । सेवकांचा विभाग ॥१०४॥
सुसज्ज असावेत गांवचे तरुण । कोणतेंहि संकट येतां ऐकून । आपुलीं सर्व कामें सोडून । धांव घ्यावी तयांनी ॥१०५॥
आग लागणें, विहिरींत पडणें । कॉलरा होणें, मूर्च्छा येणें । प्रत्येक प्रसंगीं धांवून जाणें । कर्तव्य त्यांचें ॥१०६॥
ऐसी ग्रामसेवेची योजना । जागृत जेथे ग्राम-सेना । तेथे स्वर्गींच्या नंदनवना । बहर येई सहजचि ॥१०७॥
ऐसें संघटनांनी गांव । भोगूं लागेल दिव्य वैभव । ग्रामराज्यचि सुखाची ठेव । तुकडया म्हणे ॥१०८॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरुशास्त्रस्वानुभवसंमत । ग्रामरक्षणाचा वर्णिला पंथ । अकरावा अध्याय संपूर्ण ॥१०९॥
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
********************
ग्रामगीता अध्याय बारावा
॥ श्रीगुरुदेवाय नम: ॥
एका सज्जनें विचारिलें । म्हणे ग्रामराज्यांत काय ठेविलें ! जिकडे तिकडे गोंधळ चाले । अस्ताव्यस्तपणाचा ॥१॥
कागदीं पुस्तकांत, काव्यांत । खेडयाचें वर्णन दिव्य बहुत । परि वस्तुस्थिति पाहतां तेथ । क्षणभरीहि राहवेना ॥२॥
रस्ते सर्व घाणींनी भरले । आजूबाजूंस डबकें साचलें । एकहि काम न निभे तेथलें । शहराविण ॥३॥
खेडयाकडे चला म्हणतां । परि एकहि सोय नसे पाहतां । घरें कसलीं ? हुडेचि तत्त्वता । डुकरखोपडे खुराडे ॥४॥
नाही कसलें मनोरंजन । दंढारी-तमाशावांचून । उगेचि कां करावें वर्णन । खेडें उत्तम म्हणोनि ? ॥५॥
मित्रा ! तुझें म्हणणें ऐकिलें । माझ्या मनीं योग्य तें पटलें । त्याचें कारण तेंहि ऐकिलें । पाहिजे श्रोतीं ॥६॥
जेव्हा कार्यकर्ते होती आळसी । त्यांत उपभोगाची वाढे खुशी । तेव्हाच अंतर पडे कार्यासि । गांवशिवेच्या ॥७॥
एकदा चुकलें तरि चाले । पण नेहमी चुकतचि गेलें । त्यानेच राज्यांचेंहि मरण ओढवलें । गति काय गांवांची ? ॥८॥
कार्यकर्त्यांनीच घेतली निशा । काय पाहतां मग गांवाची अवदशा । सुरू झाला गुंडांचाचि तमाशा । लोक झाले भलतैसे ॥९॥
वतनदार इजारदार । ग्रामजोशी वेशकर । पूर्वी ज्यांना ज्यांना ग्रामाधिकार । चुकलें त्यांच्या हातूनिया ॥१०॥
चुकलियावरीहि कोणीच बघेना । मग लोक काढती वाटा नाना । जैसा ज्यास वाटे धिंगाणा । करूं लागती हौसेने ॥११॥
कोणी हौसेने घर बांधलें । मार्गावरीच ओटे वाढले । कोणाचें छप्पर पुढे आलें । गाडी कांही जाईना ॥१२॥
कोणी घाण नाली सोडूनि दिली । ती सर्व मार्गावरि आली । माणसें ढोरें सारीं फसलीं । घराभोंवती बिचार्याच्या ॥१३॥
कांहींनी सांडपाणी साचविलें । मच्छर जंतु अति वाढले । रोगराईनी बेजार झाले । शेजारी सगळे ॥१४॥
कांहींनी सडकेवरि गुरें बांधलीं । त्यांतहि मारकुंडींच निघालीं । मार्गस्थांची फजीती झाली । सांगतां येना ॥१५॥
कांहींनी दारीं दगड ठेविले । जाणाराचें गाडेंचि उलटलें । कांही ठोकर लागोनि पडले । अंधारामाजी ॥१६॥
कांहींनी टाकला पुंजाणा । केरकैचणीं कांचखिळे नाना । बोचती येणार्या-जाणार्यांना । बोलूंच नका ॥१७॥
साहेब चाले मोटारींनी । कांही जाती जोडे घालोनि । गरीबास विचारीना कोणी । पाय त्याचे फुटले तरी ॥१८॥
सडकीं फळें शेंग टरफलें । कुजके सोप मार्गीच टाकले । आजूबाजूस पाहोनि फेकलें । ढोबर त्यावरि माऊलीने ॥१९॥
गांवचे मार्ग विष्टेने व्यापले । आड कोने घाणींनी भरले । ठायींठायीं उकिरडे साचले । गांव वेढलें गोदरींनी ॥२०॥
घराघरांचे कुंप सडले । कांटे रस्त्यावरीच पडले । फास आणणारासहि न कळलें । साफ करावें म्हणोनिया ॥२१॥
गांवीं खंडार्यांत माजलें रान । विंचू-सर्प राहती लपोन । पडक्या गढीचे हूडे भयाण । तेथील घाण पुसूं नये ॥२२॥
विहिरी कोणी बांधून ठेविल्या । त्या पुन्हा नाही दुरुस्त केल्या । घुणार्या घाण करीतचि गेल्या । सडला पाण्यांत पाचोळा ॥२३॥
कोणी रस्त्यावर टाकिला गाळ । विहिरी मोर्या उपसोनि ओंगळ । टाकोले हीर, फुटके खपरेल । मेलेले उंदीरहि त्यावरि ॥२४॥
श्रीमंतांचे वाढले गोठे । रस्त्यावरीच आले ओटे । मार्गीच लाकडें विटा गोटे । कोण बोले तयांना ॥२५॥
गांवातील पंच झोपले । ” काय म्हणावें ? नातलग मित्र आपलें ! ” म्हणोनि त्यांनी डोळे लाविले । गांव झालें डोंगर हें ॥२६॥
ऐसीच विचित्र गांवाची स्थिति । हें आलें माझ्या अनुभवाप्रति । म्हणोनीच वाटे लावावी सुसंगति । गांवोगांवीं आतातरी ॥२७॥
हे सगळेंचि दुरुस्त कराया । शहाण्यांनी जावे खेडयांकडे या । आदर्श ग्राम हाचि पाया । राष्ट्राचा असे म्हणोनि ॥२८॥
जें जे गांवीं शहाणे झाले । शक्तियुक्तींनी पुढे निघाले । ते सर्व शहराकडे धावले । म्हणोनि माजलें रान येथे ॥२९॥
भंगी साफ करिती शहर । तैसे पूर्वी कामदार महार । झाडीत होते गांवगल्ली सुंदर । पुढे केवळ पाटलांची ॥३०॥
पवित्र ठेवावा देवाचा मार्ग । हा भाविकांचा जाणोनि ओघ । देव मांडिले होते जागोजाग । तेथेहि माजले उकिरडे ॥३१॥
नगरप्रदक्षिणेची प्रथा । ती प्रिय होती अनेक पंथा । तीहि गेली लयाला आता । उरलें सगळें करंटेपण ॥३२॥
दिंडया-मिरवणुकी होत्या मागे । उत्सव, दहीकाल्याच्या प्रसंगें । त्यांतहि शिरलें बेढंगें । नाचगाणें, दंढारी ॥३३॥
लोक दिंडया-मिरवणूकी काढती । परि त्याचें तत्त्वचि आतां न जाणती । म्हणोनि वाढली गलिच्छता अति । दारोदारीं घरोघरीं ॥३४॥
कधीकाळीं काढिती भजन । घरोघरीं बोलावया जाऊन । तुटका वीणा टाळ दोन । मृदंग गेला कामांतूनि ॥३५॥
मग राहिले वाजंत्रीबाजे । त्यांतहि तालस्वर अंदाजें । कसेंतरी लाविती, साजे । लग्नमौंज म्हणोनिया ॥३६॥
कर्णा शंख घंटया नगारे एकचि गोंधळ करिती सारे । बेताल होतां कोठूनि भरे । ताल जीवनीं गांवाच्या ॥३७॥
ऐसा झाला तालतितंबा । विस्कळित झाल्या कीर्तनें, सभा । म्हणती दयायावी रुक्मिणीवल्लभा । आपुली शुध्दचि नाही ॥३८॥
गांव-देवळाची पालखी निघे । जो तो तमाशा म्हणोनि बघे । कसली भावना ? खिदळती तुंगे । आयाबाया पाहोनि ॥३९॥
चालतांना शिस्त नाही । जनलोकांची अजीव घाई । कोणाचाहि पायपोस नाही । पायीं कोणाच्या ॥४०॥
कोणी कोणाचें ऐकेना । पुढे घासावयासि करी धिंगाणा । याचे शिक्षणचि नाही कोणा । कैसे चालावें मार्गाने ॥४१॥
नाही चालणारांसि शिस्त । चालती जैसीं जनावरें समस्त । माणसाचें चालणेंचि स्वस्थ । विसरले लोक ॥४२॥
मार्गीं लागती ठोकरा । कितीकांच्या बोटांचा झाला चुरा । रेटा बसे मागे-सामोरां । करितां प्रदक्षिणा ही सारी ॥४३॥
सध्याची ऐसीं प्रदक्षिणा । ही प्रदक्षिणेची विटंबना । मार्गाची घाण साफ होईना । प्रदक्षिणा काय कामाची ? ॥४४॥
म्हणोनीच काढली रामधून । व्हावयासि गांवाचें पुनर्निर्माण । सेवामंडळ संस्थेंतून । उदय केला कार्याचा ॥४५॥
मित्रहो ! रामधून नाही आजची । ही आहे परंपरा प्रदक्षिणेची । प्रदक्षिणेंत योजना होती कार्याची । तीच आहे रामधून ॥४६॥
मी समजतों गांवहि शरीर । त्यास राखावें नेहमी पवित्र । त्यानेच नांदेल सर्वत्र । आनंद गांवीं ॥४७॥
जैसें आपण स्नान करावें । तैसें गांवहि स्वच्छ ठेवीत जावें । सर्वचि लोकांनी झिजूनि घ्यावें । श्रेय गांवाच्या उन्नतीचें ॥४८॥
आपण तेवढें स्वच्छ राहावें । भोवती गलिच्छ वातावरणचि पाहावें । याने सुमंगलता कधी न पावे । तनमन होई दूषित ॥४९॥
म्हणोनि स्वच्छ ठेवावें दुकानघर । नाल्यामोर्या सडका चौफेर । मग रामधूनची फेरी सुंदर । काढावी आबालवृध्दांनी ॥५०॥
रामधूनपूर्वी गांव पूर्ण । व्हावें स्वच्छ सौंदर्यवान । कोणहि घरीं गलिच्छपण । न दिसावें कोठे ॥५१॥
त्यांत व्हावयासि मदत । घ्यावेत सेवाभावियांचे हात । ज्यांना सेवा हेंचि व्रत । पसंत आहे ॥५२॥
मिळोनि करावी ग्रामसफाई । नालीमोरी ठायींठायीं । हस्तेंपरहस्तें साफ सर्वहि । चहूकडे मार्ग ॥५३॥
त्यांत जी जी निघेल घाण । ती दूर न्यावी गांवापासून । अस्ताव्यस्त न देतां फेकून । नीट व्यवस्था लावावी ॥५४॥
त्यासाठी करावे खतखड्डे । गांवाबाहेर जागीं उजडे । जनावरांचें मलमूत्र सापडे । तेंहि त्यांतहि भरावें ॥५५॥
तैसेचि करावे चरसंडास । मळ दिसोंचि न द्यावा कोणास । आपुल्या मळाची आपणांस । व्यवस्था लावणें सोयीचें ॥५६॥
नदीकिनारीं वा बोरंगांत । शौचासि जाती स्त्रियादि समस्त । ती कुचंबणा आणि घाण निश्चित । दूर होईल चरसंडासे ॥५७॥
तेथे बसलिया शौचास । माती झोकावी सावकाश । मलमूत्र येवोनि खतरूपास । कारणीं लागो म्हणोनिया ॥५८॥
सर्व गांवाचि ऐसी रीति । जे जे सांगती करोनि घेती । त्यांवरीच प्रसन्न राहे क्षिति । खताने तृप्ति होवोनिया ॥५९॥
एरव्ही तो वांढाळ गडी । जो वाटेल तिकडे मळा सांडी । ते खतद्रव्यांची करिती नासाडी । वानर जैसे ॥६०॥
अहो ! ही निसर्गाची रचना । समजलीच पाहिजे सर्वजना । खाद्यचि होतें खत जाणा । खतापासोनि खाद्योत्पत्ति ॥६१॥
आपण जें जें कांही खातों । रसरक्तमांस तेणें जमवितों । त्यांतूनि वाचलें तें खत म्हणतो । भूमिवरि घालावया ॥६२॥
त्या खताची झाली जोपासना । तीच फळते काढाया उत्पन्ना । खत नसतां भूमिची दैना । होऊं लागे ॥६३॥
मूत्रविष्टाहड्डी मिसळली । त्याने भूमीस स्फूर्ति चढली । पुन्हा पेरणी करितां उदभवलीं । प्रचंड कणसें ॥६४॥
परि गांव हें समजेना । याचें ज्ञानचि नुरलें कोणा । करिती विष्टेचा धिंगाणा । आपणासहित गुरांच्या ॥६५॥
गोवर्या करोनि जाळिती । ते महालाभास आंचवती । शेणांत आहे लक्ष्मीची वसती । धर्मग्रंथींहि वचन ऐसें ॥६६॥
म्हणोनि सर्व गांवाचें मलमूत्र । जमवोनि झाकावें जाणोनि तंत्र । त्याने गांवाची जमीन सर्वत्र । खतवोनि द्यावी ॥६७॥
याने दूर होईल घाण । थांबेल रोगराईचें नुकसान । आणि पिकेल अधिक धान्य । अनेक लाभ एकामाजी ॥६८॥
हें समजाविण्याहि पाहिजे कमेटी । तिने करोनि नाना आटाआटी । जनता जागृत करोनि शेवटीं । उत्पन्न द्यावें वाढवोनि ॥६९॥
गोखरू तरोटा तालीमखाना । ज्यांनी भूमि विढिली जाणा । त्यांचेंहि खत कराया सर्वांना । लावोनि पीक वाढवावें ॥७०॥
मुबलक खत मुबलक पाणि । मुबलक श्रम मुबलक बी-भरणीं । मुबलक उत्पन्न गगनासि भेदूनि । दिसावें गांवीं ॥७१॥
हेचि खरी आहे सेवा । हेंचि आवडे देवाधिदेवा । उगीच मोठेपणाचा कांगावा । मिरवावा कासयासि ? ॥७२॥
सर्वांनी गांव स्वच्छ करावें । तेणें आरोग्य नांदेल बरवें । घाण-खतांतूनि नवनवें । वैभव येईल उदयासि ॥७३॥
ग्रामसफाई झालियावरि । रामधून काढावी नाम-गजरीं । स्वच्छतेसवेंच पावित्र्यहि भारी । वातावरणीं यावयासि ॥७४॥
प्रात:काळीं सामुदायिक नामगजर । सुखस्वराज्य तो टिकवी सुंदर । त्यासाठीच ब्राह्ममुहूर्त रामप्रहर । वेदहि म्हणे ॥७५॥
यावरि श्रोते विचारती प्रश्न । कैसी प्रदक्षिणेची रामधून ? जेणें घडेल ईश्वर-भजन । आरोग्य हेंहि संपादे ॥७६॥
रामधूनची ऐका रीति । आधी करा ग्रामशुध्दि ती । जेणें स्नान घडे गांवाप्रति । आरोग्यदायी ॥७७॥
निघण्यापूर्वी सूर्यनारायण । करावें सडासंमार्जन । सर्व गांवाने मार्ग झाडोन । आनंदभुवन निर्मावें ॥७८॥
जिकडे तिकडे पाणी शिंपावें । मार्ग रांगोळयांनी सजवावे । ठायीं ठायीं ठेवोनि द्यावे । फोटो संतां-थोरांचे ॥७९॥
सुंदर बांधावें आम्रतोरण । ठिकठिकाणीं शोभवावें मैदान । आपुलाल्या श्रमाचें प्रदर्शन । दारादारांत ठेवावें ॥८०॥
मग जमोनि सकल सेवकजनें । रामधून काढावी गांभीर्याने । प्रथम रांग चातुर्याने । सजवावी शोभे ऐसी ॥८१॥
लहान मुलें मुलांमाजी । तरुण युवक तरुणांमाजी । वयोवृध्द सहजासहजीं । वृध्दांमाजी योजावे ॥८२॥
स्वतंत्र चालवाव्या महिला मुली । मार्गीं आणावी शोभा चांगली । गीतें म्हणणारांची योजना केली । पाहिजे मधामधांतूनि ॥८३॥
बाजूनी चालवावे सेवकजन । सेवक-गणवेषांत परिपूर्ण । त्यांनी सांभाळावी सेवकांची लैन । दोन दोन चालवावे ॥८४॥
एकाने धरावी घंटा हातीं । दोन ठोके द्यावेत घाटेवरती । चालू लागेल ठरलिया पध्दतीं । रामधून जागेहूनि ॥८५॥
रघुपति राघव राजाराम । पतितपावन सीताराम । म्हणावें गायकाने प्रथम । मग म्हणावें सर्वांनी ॥८६॥
अतिधीराची चाल धरावी । ओळ शिस्त सांभाळावी । मग गीतें गायकांनी म्हणावीं । राष्ट्र-भक्ति-भावनेचीं ॥८७॥
कांही म्हणावीं ग्रामावर । कांही म्हणावीं भक्तिपर । कांही म्हणावीं निरंतर । चारित्र्यवान करणारीं ॥८८॥
चौकांतूनि दारांतूनि । जात असतां शांतपणीं । जयघोष गर्जवावे भेदूनि । गगन सारें ॥८९॥
गुरुदेवाच्या जयजयकारें । भारतमातेच्या नामोच्चारें । साधुसंतांच्या घोषें उदगारें । जागृति करावी आनंदें ॥९०॥
मार्गी थोरामोठयांचें चित्रदर्शन । वंदावें उभ्यानेचि हात जोडोन । थांबूं नये मार्गातून । रामधून सोडोनिया ॥९१॥
ऐसी फेरी पूर्ण करावी । गुरुदेव-चौकीं स्थिरावोनि घ्यावी । आधीच सेवकांनी लैन लावावी । लोकांपुढे येवोनि ॥९२॥
मग तैसेचि लोक उभे करावे । मोकळे मोकळे ओळींत बरवे । लहान लहानांत ठेवावे । तरुण वृध्द ऐसेचि ॥९३॥
महिलांची अलग रांग । करावी सुंदर यथासांग । ऐसा साजवावा लोकसंघ । चौकामाजी वा मैदानीं ॥९४॥
मग सूचकाने सूचना द्यावी । जीं सक्रियपाठीं लिहिली बरवी । प्रार्थना, भाषण, प्रणाम योजावीं । योजनेपरी ॥९५॥
भाषणीं हेंच सांगत जावें । जनतेने नीटनेटकें राहावें । सहकार्याने वागत असावें । गांवामाजी ॥९६॥
जेव्हा वाढेल मार्गी घाण । तेव्हा होईल मलीन मन । तयायोगें विकास पूर्ण । राहील अडोन जीवांचा ॥९७॥
सर्वांनी स्वच्छ शिस्तबध्द व्हावें । परस्परांशीं प्रेम करावें । तरीच गांव स्वर्ग व्हावें । सर्वतोपरीं ॥९८॥
भाषणानंतरि जयघोष करून । मार्गी वळवावे सकळ जन । शांतपणें चालाया सांगोन । रामधून संपवावी ॥९९॥
शेवटीं जावें सेवकजनें । अतिप्रसन्न होवोनि मनें । स्वर्ग उतरेल या योजनेने । ग्रामामाजीं ॥१००॥
लोकांना मार्गी चालतांहि नये । म्हणोनि काढला हा उपाय । गरीब-अमीर-अनपढ सर्व हे । शिकती चालणें यामाजीं ॥१०१॥
दोघादोघांच्या करिती रांगा । एकामागूनि एकाची जागा । गांव पवित्र करी भजनगंगा । वाढे संघटना गांवाची ॥१०२॥
सहजचि चालणें बोलणें येतें । शिस्तीने बसणें उठणें कळतें । गाणें वाजविणेंहि कळों लागतें । गांवच्या दरबारीं ॥१०३॥
घराघरांची होय दुरुस्ती । सौंदर्याची वाढे प्रीति । अस्वच्छतेची मिटे प्रवृत्ति । वाढे वृत्ति सहकार्याची ॥१०४॥
आपण एक ही वाढे भावना । दिगंतीं जाई आळसीपणा । कोणी न वाटे अधिक-उणा । गुणप्रदर्शना वाव मिळे ॥१०५॥
सर्वांचें सर्वांकरितां वाढे मन । लोक राहती अतिप्रसन्न । ऐशी आहे रामधून । सहकार्याची बोधशाळा ॥१०६॥
ऐशा योजना घेवोनि हातीं । करावी खेडयांची दुरुस्ती । तेणें आनंद लाभेल सकळांप्रति । तुकडया म्हणे ॥१०७॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभवसंमत । ग्रामस्नान-रामधून वर्णित । बारावा अध्याय संपूर्ण ॥१०८॥
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
***************
ग्रामगीता अध्याय तेरावा
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
हात फिरे तेथे लक्ष्मी शिरे । हें सूत्र ध्यानीं ठेवोनि खरें । आपुलें ग्रामचि करावें गोजिरें । शहराहूनि ॥१॥
हें गांवीचे लोक विसरले । आळसाद्वारें दुर्दैव शिरलें । दैन्य दारिद्रय सर्वत्र भरलें । गांवामाजीं ॥२॥
शहरीं यंत्रादिकें आलीं । गांवची उद्योगकला मेली । कुशल माणसें शहरीं गेलीं । उद्योगासाठी ॥३॥
शहरीं गेली गांवची बुध्दि । शहरीं गेली गांवची समृध्दि । कष्टाळू शक्ति, हस्तकलासिध्दि । तेहि गेली ॥४॥
गांवीं उरली मुख्यत: शेती । ती कशीबशी चालविती । विशेष बुध्दि, शक्ति, संपत्ति । यांचा ओघ दुसरीकडे ॥५॥
उत्तम शिक्षित, सामर्थ्यवान । ते नोकरीसाठी फिरती वणवण । उद्योगधंदे वा शेती कोठून । होईल उन्नत गांवची ? ॥६॥
हे सर्व जरि लक्ष पुरविती । तरि छोटे उद्योग आणि शेती । निश्चयें सर्वांसि पोषिती । बेकार दीन कोणी नुरे ॥७॥
कारण, गांवींच कच्चा माल । ज्यावरि जगतां येई खुशाल । तो गांवीं पक्का नोहे म्हणोनि हाल । गांवाचे आमुच्या ॥८॥
कच्चा माल मातीच्या भावें । तो पक्का होतां चौपटीने घ्यावें । मग ग्रामजन कैसे सुखी व्हावे ? पिकवोनीहि ते उपाशी ॥९॥
त्यांच्या सुखाचें मुख्य साधन । सर्वतोपरी स्वावलंबन । शहरावरि न राहतां अवलंबून । काम करावें सर्वांनी ॥१०॥
उत्तम बुध्दि कौशल्य ज्ञान । शक्ति सामर्थ्य इकडे योजून । गांवीं वाढवावें स्वावलंबन । आळस झाडून सर्वांचा ॥११॥
जिकडे तिकडे स्वावलंबनप्रेम । घरोघरीं चालावें कांही काम । आपुलें करोनि दुसर्यासि निष्काम । मदत करावी मानवांनी ॥१२॥
घरीं मुलाबाळांनीहि राबावे । शेतीं कामधंदे हस्तें करावे । बायकापोरांसहित सुखी व्हावें । कष्ट करोनिया ॥१३॥
हातीं उद्योगाचें साधन । मुखीं रामनामाचें चिंतन । हाचि धर्म आहे महान । गांवकरी लोकांचा ॥१४॥
गांवचा एकेक घटक । बनवावा कलावंत सेवक । जो आपुलें घर सुरेख । करोनि गांवा शोभवी ॥१५॥
कष्ट करणाराचें जीवन । शोभा देतें देवाप्रमाण । स्वत: स्वावलंबी होऊन । सहकार्य करी जो गांवाशीं ॥१६॥
पहिलें पाऊल घरचा धंदा । दुसरें पाऊल दारच्या प्रबंधा । पुढे ग्रामसफाईच्या छंदा । लावोनि घ्यावें आनंदें ॥१७॥
असें हें कष्टाचें स्वरूप । वाढवीत जावें आपोआप । नाना कलांचें देणें रूप । कष्टालागी शिकावें ॥१८॥
कला असे मानवासि भूषण । परि पाहिजे जीवनाचें त्यांत स्मरण । जगावें सुखसमाधान । धरोनिया अंतरीं ॥१९॥
ऐसी असावी सर्व कला । नाहीतरि वाया गेला । प्राणी जन्मला आणि मेला । नाहकचि ॥२०॥
कलेनेच माणसाची ओळख । एरव्ही कोण पुसतो आणिक ? तुम्ही आहांत रांव की रंक । आता कोणी पुसेना ॥२१॥
जरी असले कोणी धनवान । तरी व्हावें त्यांनी कलापूर्ण । यांतचि आहे शहाणपण । श्रीमंतांचें ॥२२॥
नाहीतरि घरचे सर्वचि बेताल । समजेना गाणें-वाजवणें समकाल । परि गाणारे आणोनि खुशाल । जागरण करविती प्रयासें ॥२३॥
म्हणती आमुचा उत्सव महान । करावें कांही नवरात्र म्हणोन । यासाठी आणिले गाणारे कलावान । देवापाशी ॥२४॥
आम्हांस कांहीच कळेना । म्हणोनि बोलाविलें ऐकणारांना । त्यांनी ऐकाव्या गाण्याच्या ताना । आम्ही हसावें पाहोनि ॥२५॥
काय करावी ऐसी रीति ? आपणासि नसे ज्याची मति । त्यापेक्षा आपणहि शिकावी कोणतीं । कला अंगीं ॥२६॥
दुसर्याचा राजहंसा बरवा । आपला असेनाका पारवा । परि स्वावलंबी कलेचा रावा । बोलवावा प्रत्येकाने ॥२७॥
अहो ! जीवनाची एक तरी कला । असावी लागते मानवाला । तरीच तो मानव शोभला । नाहीतरि कल्ला जीवनाचा ॥२८॥
गोड बोलण्याची कला । नेटकें राहण्याची कला । अंग-मेहनतीची कला । आवश्यक आहे जीवनासि ॥२९॥
सुंदर लिहिणें अक्षरओळी । स्पष्ट वाचणें पुस्तकें सगळीं । जरा न दिसे टाळाटाळी । कोठेहि कलावंताची ॥३०॥
जीवनांत यावा सरळपणा । साधा सात्विकतेचा बाणा । हृदय-निर्मळतेचा निशाणा । कलावंताचा धर्म हा ॥३१॥
एरव्ही कला सर्वांनाच येते । कलेवांचून नाही रिते । परि तारतम्य पाहिजे तेथे । लोकांपुढे न्यावया ॥३२॥
कष्ट करोनि आपुल्या हातें । आदर्श करावें घरातें । असेल जरी झोपडी ते । भासवावी नंदनवन ॥३३॥
माती मिळवोनि घरें बांधलीं । परि चुन्यापेक्षाहि सुंदरता आली । थोडके पैसे लावोनि केली । रचना सगळी घराची ॥३४॥
आपुल्या गांवींच विटा केल्या । मडकीं-सुरया ओतल्या भाजल्या । कवेलू-कुंडयांसहित निर्मिल्या । आपुल्या गांवीं ॥३५॥
लाकडें तासोनि सरळ केलीं । त्यांत सात्विकतेची प्रतिभा भरली । गांवाच्या सुताराला आली । कला आमुच्या ॥३६॥
गांवींच केले हातोडे-खिळे । ऐरणी-कुर्हाडी सापळे-विळे । पावडे-कुदळया शिंके आदि सगळें । सामान जीवनाचें ॥३७॥
दगड फोडोनि फाडी केली । सरळ चिरेदार टापोनि छाटली । इमारतीस बसवितां दिसली । सुंदर सगळी ॥३८॥
फडे झाडणी चटई नवार । पलंग पायपूस मोटसंदोर । सुंदर केले डवरे वखर । नव्या धर्तीचें ॥३९॥
कापूस पिंजोनि सूत कातलें । सुंदर वस्त्र स्वेटर विणलें । बेरडया मुसके दोर बनविले । जाळें उतारीसहित ॥४०॥
कोणी केली शेतीची रचना । धुरेबंधारे वाफे नाना । पाहतां दिसती सरळ लैना । शेतीमाजीं ॥४१॥
झाडें दिसती ओळींत बध्द । सरळ सुंदर हिरवीं शुध्द । घरमालकचि करी खुद्द । काम आपुल्या हातांनी ॥४२॥
घराभोंवती बाग केली । सांडपाण्यावरि झाडें वाढलीं । फळाफुलांचीं रोपें वेली । भाजीपाला नित्याचा ॥४३॥
घरांतूनि बाहेर दिसेना पाणी । प्रवाह करीतसे आंतूनि । धूर जातसे धुराडयांतूनि । गोठयांत गोमूत्र न साचे ॥४४॥
घरामाजीं निर्मळपण । टापटिपीचें वर्तन । प्रत्येक वस्तु ठेविल्याचें स्थान । सरळ दिसे पाहतांचि ॥४५॥
सर्व वस्तूंचीं लिहिलीं नांवें । सामान घेतां नलगे सांगावें । घरीं येताचि दिसतें बरवें । काय आहे ॥४६॥
दारासमोर जें जें दिसलें । तें तें कलेनेचि सुंदर सजलें । आपुल्याच गांवीं निर्मिलें । कलाकारांनी ॥४७॥
जरा न दिसते उसनी ऐट । परकीयांकडोन करविला थाट । सामान आणलें भरमसाट । परदेशींचें ॥४८॥
जें दिसलें तें आपुल्याच गांवींचें । अथवा प्रांतींचें देशींचें । तेणें कौतुकचि आमुचें । सर्व करिती ॥४९॥
ऐसी घरादारांची सुंदरता । आपणचि आणावी स्वता । कोणीहि डोळे भरोनि पाहतां । प्रसन्न होती अंतरीं ॥५०॥
ऐसी कला असावी कष्टार्जित । स्वावलंबी उद्योगें उन्नत । नखशिखान्त ओजहि त्यांत । जो जीवन जागवी देशाचें ॥५१॥
कुणाची कला शरीर भूषवी । कुणाची घरीं टापटीप दर्शवी । कुणाची कला गांवचि सजवी । हौसेने आपल्या ॥५२॥
मानवी कला गांव शोभवी । गांवाची कला प्रांत जागवी । प्रांताची कला देश भूषवी । वैशिष्टयाने ॥५३॥
ही सर्व कलाकुसरी । मानवासचि साधे बरी । परि योजकता असावी अंतरीं । कलावंताच्या ॥५४॥
नाहीतरि टोप शिरीं विदेशी । आणि खादीपंचा कटीसि । मारूतीचें तोंड लंबोदरासि । ऐसें होतें ॥५५॥
एकाने दिवाणखाना सुंदर केला । पाहतांना आनंद झाला । परि शौचकूपचि बिघडला । होता त्याचा ॥५६॥
परिचय घेणारा आला घरीं । प्रथमचि चढला शौचगृहाभीतरी । आंत पसरली घाणचि सारी । स्वच्छता खरी दिसेना ॥५७॥
मग पाहिलें स्वयंपाकघर । कांदे बटाटे यांचें फोतर । चुलीआंतचि राख-केर । झाडूनि नव्हता लागला ॥५८॥
पानाचा पीक कोपर्यांत । कपाटामागे घाण बहुत । दुमडूनि बघतां सुंदर बिछायत । कचराकागद त्याखाली ॥५९॥
म्हणे वा हो कलावंत ! बघा जरा जावोनि आंत । सारवण झालें नाही सात । दिवसापासोनि दिसतसे ॥६०॥
बाकी सगळें केलें सुंदर । परि एवढेंचि गालबोट त्यावर । ऐसें असों नये अंतर । कलेमाजीं ॥६१॥
कला असावी सर्वनिपुण । आंतबाहेर निर्मळ पूर्ण । हात फिरे तेथे लक्ष्मी धांवोन । येते मग ॥६२॥
यापरी कलेने घर सजविलें । आपुलें जीवन सुंदर केलें । परि गांव असेल बिघडलें । तरि तें सौंदर्य टिकेना ॥६३॥
काळया शरीरावरि कोड । तैसें दिसेल तें एकटें धेंड । म्हणोनि गांव करावें आदर्श सुघड । कलांनी आपुल्या ॥६४॥
गांवीं असावीं सेवकमंडळें । ज्यांना मुखीं राम हातीं काम हें कळे । अखंड चालविती कामाचें सोहळे । ग्रामसेवेसाठी ॥६५॥
श्रमदानाचे सप्ताह घेवोनि । रस्ते दुरुस्त करावे सर्वांनी । शोषक खड्डे मोर्या करोनि । सांडपाणी थांबवावें ॥६६॥
रस्त्यामाजीं एकार्या असती । पांदण झाली निमुळती । गोखरू कांटे झुडपें वाढती । सर्व व्यवस्था लावावी ॥६७॥
डोब साचते पडती डेरे । ठीक करावें मार्गी सारें । शौचगृहेंहि नव्या प्रकारें । निर्मावी सर्वांसाठी ॥६८॥
नदी तळयाकांठची स्वच्छता । तेथे पार घाट आदींची व्यवस्था । उत्पादन वाढवाया तत्त्वता । उपयोग घ्यावा जलाचा ॥६९॥
गांवांतील मार्ग विहिरी घरें । सुंदर सजवावीं पशूंचीं कुटीरें । ठायीं ठायीं मुत्रीघरें । नाल्या करणें निर्माण ॥७०॥
सडकांचिया दुतर्फा छान । सर्वांनी करावें वृक्षारोपण । ढोले ठेवावे मधामधांतून । कचरा त्यांत टाकावया ॥७१॥
चहूं दिशांनी गांव सुंदर । वारे करोत जीवनसंचार । कोठेहि घाण घर । पाहतांना न दिसावें ॥७२॥
घरें मोडकीं असतील कोठे । सर्वांनीं जावें तया वाटें । मिळोनि करावें चोखटें । हाहि आमुचा म्हणोनिया ॥७३॥
घरें खिडक्यावीण अंधारीं । कोंदट दमट बसकीं सारीं । गुरांचा गोठा घराभीतरी । ऐसें राहूं न द्यावें ॥७४॥
गोटे ओटे करावे दुरुस्त । कोपरे खंडारे गैरशिस्त । राहूं न द्यावे अस्ताव्यस्त । वाकडे तिकडे ॥७५॥
हे सर्व खणोनि काढावे । दोरीलैन धरोनि नवे । मोकळेचाकळे मार्ग करावे । उल्हासवावें जनलोकां ॥७६॥
मार्गी असावा लाकूडगोटा । साफ दिसाव्या चारी वाटा । कोणी अडला असेल करंटा । त्यास वळवावें गांवाने ॥७७॥
कुंपकाटी गवती शाकार । गांवीं नसावा शक्यतोंवर । उडवे-हुडे पुंजा-केर । भलतैसा न राहूं द्यावा ॥७८॥
फास गवतगंजी कडबागूड । भूस उपणणें अथवा खळवाड । कुंभार-आवा अग्निकुंड । सुरक्षित जागा नेमाव्या त्यांच्या ॥७९॥
मेलीं जनावरें कोठेहि नेलीं । गांवभरी घाण मांसहाडें आलीं । ऐसें न व्हाया पाहिजे नेमिली । जागा उघडण्या-गाडण्याची ॥८०॥
जेथे तेथे सूचनाफलक । लाविले पाहिजेत मार्गदर्शक । शोभवावेत रस्ते चौक । थोरांचिया नांवांनी ॥८१॥
मार्गावरि अंधार पडे । तेथे प्रकाशाची व्यवस्था घडे । ऐसें करावें चहूकडे । कार्यकर्त्यांनी ॥८२॥
गांवीं शाळा निर्माण करावी । कोंडवाडयाचीहि व्यवस्था व्हावी । बाजारगुजरी अवश्य असावी । सोयीसाठी व्यवस्थित ॥८३॥
नाहीतरि गांवीं बाजार भरला । शिस्त नाही दुकानाला । कोणताहि माल कोठे ठेवला । झाला सगळा कल्लोळ ॥८४॥
लोक एकमेकांस खेटती । कांहीकांचे खिसे कांपती । नाही समजली चालरीती । माणुसकीची ॥८५॥
तरुण पाहती भलतीकडे । बोल बोलती वेडेवाकडे । चालती इकडे पाहती तिकडे । तेणें धक्के बसती लोकां ॥८६॥
कोणी मधेच माल उपणती । खुंटया गाडती गाडया सोडती । बकर्या-गायी मोकाट फिरती । मधेच मांडती मिरच्याहि ॥८७॥
लैन नाही दुकानांप्रति । कोणीहि कोठे माल मांडती । या सर्वांमुळे होते फजीती । घेणारा आणि देणारांची ॥८८॥
त्यांत माशांचा अवघा घोळका । कोणी म्हणेना कोणा एका । सर्वत्र पैसा कमावण्याचा झोका । चालतसे हौसेने ॥८९॥
कोणी म्हणेल ऐसें कां करतो ? दुकानदार म्हणे आम्ही कर देतो । मग आम्हांला कोण काय म्हणतो । सांगा सांगा ! ॥९०॥
ऐसें जेथे जेथे होतें । दुरुस्त करावें सगळें तेथे । प्रेमाने सांगून पाहतां सर्वानुमतें । कोणी हट्ट करीना ॥९१॥
आपुलें जेव्हा जन न ऐकती । तेव्हा सभाद्वारें करावी दुरुस्ती । सांगून पाहावें सरकारप्रति । दुरुस्त कराया गांव सारें ॥९२॥
मुख्य आपुली असावी समिति । जी सुंदर ठेवील बाजाराप्रति । वजनें, मापें, माल, जागा, पध्दति । सर्व चोख करावया ॥९३॥
सर्वांच्या पिकांचिया रक्षणा । गांवीं येऊं न द्याया वानरसेना । ऐशाहि कराव्या समित्या संघटना । नाना कार्यास्तव ॥९४॥
सर्वांगीण असावी ग्रामरचना । मनोरंजनासहित पुरावाव्यात भावना । जेणें करून ग्रामवासीयांना । आठव ना ये शहराचा ॥९५॥
व्याख्यानें कीर्तनें कलापथक । वादविवाद पोवाडे नाटकें सात्विक । ऐसी नित्य नवनवी करमणूक । गांवीं चालवावी सर्वांनी ॥९६॥
एक असावा सुंदर बाग । त्यांत मनस्वाथ्याचेंचि असावें अंग । प्रसन्नता वाढाया नाना रंग । वृक्षवेली लताकुंज ॥९७॥
त्यांत क्रीडांगणें पाळणें । बालक-युवकांचीं प्रसन्नविती मनें । जातीपातीचें विसरोनि रडगाणें । सहजभावें चालवावीं ॥९८॥
गांवीं विश्रामगृह असावें । ज्यांत पाहुणे उत्साही बरवे । सर्वांस मुक्तद्वार ठेवावें । उतरविण्यासाठी ॥९९॥
तेथे असावी सुंदर विहीर । पाणी पिण्यासि थंडगार । वचनें असावीं उदबोधक सुंदर । भिंतीवरि सर्व ॥१००॥
सुंदर करावा आखाडा । मुलें बागडती उल्हासें तडतडा । आदर्श मल्ल-खेळाडूंचा धडा । गिरवावया ॥१०१॥
सुंदर मुलांचीं शरीरें । दिसती गुलाब जैसे गोजिरे । बागचि फुलले हरेभरे । सुपुत्रांचें ॥१०२॥
सुंदर असावें वाचनालय । नाना ग्रंथ ज्ञानमय । करावया सुबुध्दीचा उदय । गांव-लोकीं ॥१०३॥
काय चाललें जगामाजी । कळावें गांवीं सहजासहजीं । म्हणोनि वृत्तपत्रें असावीं ताजीं । आकाशवाणीहि त्याठायीं ॥१०४॥
तैसेंचि असावें हस्तलिखित मासिक । अक्षर गांवाचें व्हाया सुरेख । लेखनचित्रादि कलांचें कौतुक । वाढेल गांवीं ॥१०५॥
सहज कळावे विचार आणि वृत्त । म्हणोनि फळा असावा चौकांत । ती जणूं ज्ञानेश्वराची भिंत । ज्ञान देई सर्वांसि ॥१०६॥
अक्षरशत्रूंना सामर्थ्य यावें । म्हणोनि प्रौढशिक्षण चालवावें । घराघरावरि नंबर द्यावे । नामपाटी लावोनिया ॥१०७॥
गुराढोरांचीं औषधें जाणती । साह्य द्यावें त्या ग्रामीणांप्रति । अनुभूत नुसखे लोकगीतादि किती । संग्रह त्यांचा करावा ॥१०८॥
गांवचें आरोग्य असावें उत्तम । सर्व प्राणीमात्रासि लाभावें क्षेम । म्हणोनि चालवावें आरोग्यधाम । गांवामाजी ॥१०९॥
आपुल्याच गांवची वृक्षवल्ली । कंदमुळें आणोनि औषधें केलीं । निसर्ग-उपचारासहित दिलीं । पाहिजेत वैद्यें ॥११०॥
चालवावें ऐसा वैद्यांप्रति । सर्पादि विषें उतरविती । घाव बुजविती हाड जुळविती । औषधें ऐसीं अनुभवोनि ॥१११॥
जेथे पुरुषांचा दवाखाना । तेथे हवी सूतिकागृहाचीहि योजना । दोहोंचीहि आवश्यकता ग्रामजना । भासतसे अत्यंत ॥११२॥
गांवचे वैद्य गांवच्या सुईणी । गांवें घ्याव्या तयार करोनि । नवनवीं ज्ञानसाधनें देवोनि । सर्वतोपरीं ॥११३॥
गांवीं असावें पोस्टस्थान । त्वरित कळावया वर्तमान । परस्परांचा व्यवहार पूर्ण । पत्रोपत्रीं चालावया ॥११४॥
ऐशा सर्वचि सुखसोयी । लोक करूं शकतील निश्ययी । स्वावलंबी राहूनि सर्वहि । देतील जेव्हा सहकार्य ॥११५॥
प्रत्येकाचा कितीतरि वेळ । श्रमशक्ति आणि बुध्दीचें बळ । व्यर्थ जातसे तें उपयोगी सकळ । लावितां गांव सुखी होई ॥११६॥
ऐसें गांव होतां आदर्शपूर्ण । शहराहूनीहि नंदनवन । सर्वांचें करील आकर्षण । सुंदर जीवन तुकडया म्हणे ॥११७॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव संमत । स्वावलंबी ग्रामनिर्माणकला-कथित । तेरावा अध्याय संपूर्ण ॥११८॥ग्रंथ खरेदी
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
******************
ग्रामगीता अध्याय चवदावा
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
एक श्रोता महाभाविक । म्हणे गांवहि केलें ठीक । तरी देवाने मारली मेख । ती निघूं शकेना ॥१॥
प्रत्यक्ष शहर जरी झालें । तरी देवापुढे ताब न चाले । तेथे खेडें शहरापरी केलें । तरी काय होतें ? ॥२॥
देवीदेवतांचा कोप झाला । कॉलरापटकीचा झटका आला । म्हणजे सुधारूंच न शके कोणाला । बाप वैद्याचा ॥३॥
म्हणोनि देवता राहती प्रसन्न । ऐसें करावें पूजन । गांव असो की शहर संपन्न । सुखी त्याविण न राहे ॥४॥
मित्रा ! ऐक याचें उत्तर । देवदेवता किंवा परमेश्वर । हे कृपेचेचि अवतार । कोपचि नाही त्याठायीं ॥५॥
कोप करिती ते दुष्टावरि । त्यांतहि उध्दार भावचि अंतरीं । तेथे निरपराध्यांस छळती जरि । तरि त्या देव न म्हणावें ॥६॥
सर्व लोक लेकरें त्याचीं । छळणा कां करील कोणाची ? कृति आपुलीच आपणा जाची । शत्रु आपणचि आपुले ॥७॥
चहूबाजूंनी केली घाण । त्यांत जंतु झाले निर्माण । त्यांतूनि रोगांच्या सांथी भिन्न भिन्न । वाढ घेती ॥८॥
नाही नेमाचा आचार । शुध्द नाही आहारविहार । अशुध्द हवापाणी, संहार । करिती जनांचा ॥९॥
कांही केव्हा कुठेहि खाणें । कधी झोपणें कधी जागणें । सप्तहि धातु कोपती याने । रोगरूपाने फळा येती ॥१०॥
हाटेलीं खाणें मसणा जाणें । ऐसें बोलती शहाणे । त्यावरि नाना तिखट व्यसनें । आग्यावेताळासारिखीं ॥११॥
कशास कांही नियम नुरला । कोण रोगी कोठे थुंकला । कोठे जेवला संसर्गी आला । गोंधळ झाला सर्वत्र ॥१२॥
त्याने रोगप्रचार झाला । लागट रोग वाढतचि गेला । बळी घेतलें हजारो लोकांला । वाढोनि सांथ ॥१३॥
मग कोणी म्हणे कोपली देवी । कोणी मांत्रिकांसि बोलावी । बाहेरभितरचें समजोनि गांवीं । काढती आरत्या अंधारीं ॥१४॥
कोणी करणी कौटाळ म्हणती । कोणी पिशाच्चास भारती । औषधेंहि न देतां रोगी मारती । मूर्खपणाने ॥१५॥
भगत मांत्रिक अरबाडी जाणते । घुमारे बघती भाविक कोणते । पोटासाठी नाना मतें । फैलाविती लोकांमाजी ॥१६॥
करविती नवस सायास थोर । देवीपूजेचा जोरसोर । रेडे बकरे कोंबडे पामर । कापिताति अज्ञानें ॥१७॥
देवानेचि केले जीव । त्यास कैची मारण्याची हाव ? मधले दलाल करिती ठेव । आपुली हौस पुरवावया ॥१८॥
संतें देवास केलें प्रसन्न । तेव्हा बळी दिले कोण ? चोखोबा, श्रीचक्रधर, रामकृष्ण । म्हणती प्रसन्न देव भावें ॥१९॥
देवासि पाहिजे बलिदान । तो पशु आपुला भ्रम अभिमान । गांवचें गेल्याविण अज्ञान । सुखी जीवन न होई ॥२०॥
गांव असो अथवा शहर । तेथील बिघडले आचारविचार । म्हणोनीच रोगराईने बेजांर । जाहले सारे जन लोक ॥२१॥
गांव व्हावया निरोगी सुंदर । सुधारावें लागेल एकेक घर । आणि त्याहूनहि घरांत राहणार । करावा लागेल आदर्श ॥२२॥
व्यक्ति व्हाया आदर्श सम्यक । पाहिजे दिनचर्याच सात्विक । सारें जीवन निरोगी सुरेख । तरीच होईल गांवाचें ॥२३॥
नियमीं बांधला एकेक दिन । त्यानेच सुधरे जीवन संपूर्ण । गांवहि होय आरोग्यसंपन्न । सारे प्रसन्न देवीदेव ॥२४॥
नियमांचा मुख्य आधार । मजबूत पाहिजे निर्धार । त्यावरीच उत्कर्षाची मदार । ऐहिक आणि आध्यात्मिक ॥२५॥
नाहीतरि मानवाने नियम केले । सर्व जीवन सुरळीत चाले । परि एकदा दुर्लक्ष झाले । की चुकतचि जातें ॥२६॥
एकदा रात्रभरि जागला । मग सकाळीं उठणेंच कशाला ? आळसांत सर्व दिवस गेला । नियम मोडोनि ॥२७॥
त्यास धाक नाही काळजी नाही । घरचे लोक बोललेच नाही । हा उठला दुसरे दिवशींहि । दहा वाजतां दिवसाचे ॥२८॥
कांही दिवस अलक्ष झालें । उशीरां उठणें अंगवळणीं पडलें । मग बदलेना, कांही केले । उपचार जरी ॥२९॥
ऐसें कासया घडूं द्यावें । रोज सकाळींच उठावें । न उठतां घरच्यांनी जागवावें । झोपणारासि निश्चयें ॥३०॥
कांही म्हणती उशीरां उठणें । हें तों भाग्यवंताचें लक्षणें । त्यास काय आहे उणें । पोट भराया धनवंता ? ॥३१॥
ऐसें समजोनि आळशी केला । अरे ! हा भाग्यवान कसला ? निजण्यावरि भाग्यवान ठरला । तरि बीमार महाभागी कां नव्हे ? ॥३२॥
तो तर निजलाचि राहतो । झोपूनचि खातों-पितों ॥ काय अधिक भाग्यवान म्हणवितो ? सांगा सांगा ॥३३॥
भाग्यवंताची उलटी व्याख्या । करणें शोभतें का शहाण्यासारख्या । अरे ! सकाळीं उठणारासचि सख्या । भाग्यवंत म्हणावें ॥३४॥
श्रमांतूनचि उपजे भाग्यसंपत्ति । निजणारे तिची हानि करिती । इतरां श्रम अधिक पडती । उत्साह घटे आपलाहि ॥३५॥
झोपी गेला घरचा धनी । सुर्य चालला डोक्यावरोनि । उन्ह पडले तरी निजूनि । कड फेरितो झोपेचा ॥३६॥
नोकरचाकर आळस करिती । म्हणती घरधनीच झोपती । मग आपणचि कैशा रीतीं । काम करावें जावोनि ? ॥३७॥
ऐसा सारा अंधार पडे । वाजती श्वानांचे चौघडे । मूलबाळ रडेओरडे । झोप काढिती आयाबाया ॥३८॥
घरदार कोठूनि पवित्र ? जागल्यावरीहि आळसलें गात्र । अव्यवस्था माजे सर्वत्र । बध्दकोष्ठता वाढ घे ॥३९॥
यांतूनचि वाढती सर्व रोग । वैद्य डॉक्टरांचा लागला भोग । तिकडे बिघडत गेले उद्योग । शिरलें दुर्भाग्य त्या घरीं ॥४०॥
प्रात:काळची आरोग्यदायी हवा । सदासर्वदा मानवते जीवा । प्रसन्नता देई ऋतु तेधवा । सर्व प्राणीमात्रासि ॥४१॥
सर्व वनेंरानें जागीं होतीं । पुष्पें सारी विकास पावतीं । पशुपक्षीहि नेहमी उठती । प्रात:काळीं ॥४२॥
पहाटे दोहतां गाय-म्हैस । त्यांत अधिकचि सार-अंश । पहाटवारा चढवी रक्तास । लाली रोगप्रतिकारक ॥४३॥
म्हणोनि प्रात:काळीं उठावें । ब्राह्ममुहूर्ता डोळयांनी बघावें । उठतांच प्रात:स्मरण करावें । आसनस्थानीं ॥४४॥
प्रात:स्मरण म्हणजे नवीन स्फूर्ति । उगवल्या दिवशीं व्हाया प्रगति । उत्तम कार्य घडावें पूर्ण गतीं । म्हणोनि प्रार्थना देवाची ॥४५॥
त्यावेळीं जो संकल्प करतो । वाईट न घडो ऐसें चिंतितो । तो सुसंस्कारें वाढत जातो । उन्नतिमार्गे वेगाने ॥४६॥
म्हणोनि प्रात:स्मरण करावें । नैसर्गिक उत्साहभरें भरावें । मग प्रातर्विधी आटोपावे । नित्यनेम हा अमोलिक ॥४७॥
पहाटेस शौचमुखमार्जन । त्याने वायुदोषांचें होय शमन । शरीरीं नवा जोम निर्माण । होय निर्मळपण लाभोनि ॥४८॥
सकाळीं करावें उष:पान । त्याने अंतरींद्रियांचें शांतवन । नंतर करावें शीतजलस्नान । अति प्रसन्न चित्त राहे ॥४९॥
शीतजलस्नानाचें महिमान थोर । तेणें त्वचाशक्ति जागे सुंदर । शरीर राहे सदा तरतर । उत्साहाने ॥५०॥
मेंदूचा भाग थंड राहिला । तरीच बुध्दीचा उत्कर्ष झाला । ऐसा थोरांना अनुभव आला । कितीतरी ॥५१॥
उष्ण पाण्याने स्नान करणें । म्हणजे बीमारचि तो समजणें । ऐसी संवय नेहमी लावणें । हानिकारक देहासि ॥५२॥
स्नानोत्तर अरुणोदयापूर्वी । सामुदायिक ध्यान-उपासना करावी । प्रार्थनामंदिर अथवा पडवी । ध्यानास्तव पहावी निर्मळ ॥५३॥
अरुणोदयाची सुवर्णप्रभा । दिसे लावण्याची शोभा । निसर्ग वाढवी शांति प्रतिभा । अलभ्यलाभा पावती योगी ॥५४॥
जन म्हणती योग्यांनी ध्यान करावें । आपण कासया उठावें स्मरावें ? हें म्हणणें कदापि नोहे बरवें । कोणाचेंहि ॥५५॥
योगी आपली समाधि घरी । साधक सन्मार्गाचा योग करी । जीवन-उज्ज्वलतेचा योग संसारीं । प्रात:काळीं साधतसे ॥५६॥
ध्यानापरीच सहल प्रात:काळची । जरूर करावी संवय रोजचि । त्याने देह मन राहे निर्मल शुचि । प्राणवायुस्पर्शाने ॥५७॥
कोणी धावती कोणी चालती । कोणी आसनें सूर्यनमस्कार घालती । कोणी गाती चिंतन करिती । हें दृश्य दिसो प्रभातीं ॥५८॥
कांही पठण-पाठण करावें । शरीरमनासि वळण लावावें । आयुष्य सुंदर होतें आघवें । ऐशा क्रमें ॥५९॥
घरीं असो वा आश्रमी । प्रवासीं असो वा तीर्थधामीं । प्रात:काळीं नित्यनियमीं । अभ्यासक्रम उरकवावा ॥६०॥
घरा-आश्रमाची करावी सफाई । स्वच्छता मार्गी ठायीं ठायीं । गायीम्हशींचे गोठे सर्वहि । आरशासारखे करावे ॥६१॥
गडीमाणसांनी सहाय्य द्यावें । परि प्रत्येकाने काम करावें । आईबाई मिळोनि उरकवावे । कामधंदे चटचट ॥६२॥
कोणीहि बघे अरुणोदयीं । सडासंमार्जन रांगोळी रई । आंतबाहेर गलिच्छता नाही । कामें झालीं सकळांचीं ॥६३॥
ऐसें ज्या गांवीं झालें । समजावें लक्ष्मीचें मन मोहिलें । आरोग्याचें राज्य आलें । तया गांवीं ॥६४॥
तेथे उदंड आयुष्य वाढतें । जेथे प्रात:काळीं स्वच्छता होते । कोणीहि न दिसे झोपला जेथे । प्राणीमात्र ॥६५॥
म्हणोनि ऐसे नियम करावे । चुकलियाहि चुकों न द्यावे । पुन:पुन्हा सावरावें । वर्तन आपुलें ॥६६॥
ऐसा अभ्यास जडल्यावरी । आरोग्य भाग्य नांदे संसारीं । औषधांची गरजचि नुरे शरीरीं । वाढे अभ्यंतरीं नवें तेज ॥६७॥
पूर्वी प्रात:काळीं माध्यान्हा । आणि सायंकाळीं जाणा । होती त्रिकाळ संध्याप्रार्थना । संस्कारास्तव लाविली ॥६८॥
तें सर्वकाळचि उचित । म्हणोनि प्रातर्ध्यान नियमित । आणि सायंप्रार्थनाहि नेमस्त । करीत जावी सर्वांनी ॥६९॥
निद्रेचिया आदिअंतीं । दिवस-रात्रीच्या संधीप्रति । आणि भोजनसमयीं संकल्प होती । ते बनती दृढ संस्कार ॥७०॥
जनींभोजनीं हरि आळवणें । गीतापाठादि उच्चारणें । सात्विक भाव हृदयीं भरणें । शुध्द करी जीवनासि ॥७१॥
श्रोतयांनी प्रश्न केला । भोजनीं आळवावें भगवंताला । याचें फळ सांगा आम्हांला । काय कैसे ? ॥७२॥
भोजन म्हणजे आहार घेणें । तेथे कशाला देवाचें गाणें ? हास्यविनोद कां न करणें । उल्हासास्तव ? ॥७३॥
ऐका याचेंहि उत्तर । भोजन म्हणजे पिंडसंस्कार । यज्ञहि यासि म्हणती थोर । वैश्वानर अग्निमाजी ॥७४॥
भोजनाचे वेळीं प्रसन्न । केलिया विचार शुभचिंतन । तैसेचि भिनती निर्मळ गुण । अन्नासवें ॥७५॥
पवित्र धूप सुगंध सात्विक । तेणें वातावरण रोगनाशक । रांगोळया आदि प्रसन्नकारक । स्वच्छ असावी जागा तरी ॥७६॥
स्वच्छतेविणा जें भोजन । समजावें तें मलीनपण । अग्नि वाढाया हातपाय धुवोन । पुसोनि भोजन करावें ॥७७॥
कांही करावें भोजनापूर्वी काम । जेणें मिळे सकळांसि आराम । कार्य होतसे सुगम । सर्व जनां मिळोनि ॥७८॥
कोणी आसने, पाट टाकावे । कोणी वाढावे, पाणी ठेवावें । कोणी उदबत्ती, धूप लावावे । सुगंधासाठी ॥७९॥
प्रथम बसोनि पाठ म्हणावा । गंभीर सुरें रंग भरावा । वाढणें संपता शांतिमंत्र गावा । गांभीर्याने ॥८०॥
मग करावें ब्रह्मार्पण । आदराने करावें अन्नसेवन । भोजनींहि श्लोक, मधुरवचन । उल्हासाने बोलावें ॥८१॥
भोजनापूर्वी आचमन । त्याचा उद्देश अग्निदीपन । चित्राहूति जलआवर्तन । समर्पण हाचि भाव त्याचा ॥८२॥
ईश्वरें उपजविलें अन्न । तें अन्न ईश्वरी कृपादान । ज्यावरि सर्वांचें असे जीवन । त्याचें ऋण आठवावें ॥८३॥
त्याचीं लेकरें जीवजन । त्यांना आधी लाभावें अन्न । यासाठी विश्वदेवाचें संतर्पण । यज्ञमय भोजन या भावें ॥८४॥
भोजन म्हणजे भूमातेचा प्रसाद । समजोनि सुखें घ्यावा आस्वाद । ज्यांत शेतकर्यांचे कष्ट विशद । तें अन्न सेवावें सेवेस्तव ॥८५॥
ऐशा सदभावें आदरें सेवावें । उत्तम श्लोक भोजनीं गावे । वेडेंवाकुडें न बोलावें । क्रोधा न यावें भोजनसमयीं ॥८६॥
हास्यविनोद जरी असला । तरी अश्लीलता न यावी प्रसंगाला । उच्छिष्ट कण न पाहिजे टाकला । भोजनप्रसंगीं ॥८७॥
राजस तामस सात्विक । भोजनाचे प्रकार अनेक । त्यांत आपली शक्ति पाहूनि सम्यक । पचेल तैसें करावें ॥८८॥
कोणी सज्जन म्हणती भले । पचनासाठी सर्वचि खाद्य निर्मिलें । परंतु पचनाचें तारतम्य पाहिलें । पाहिजे जुळवोनि ॥८९॥
कोणी खाद्य रोग करी । कोणी खाद्य भोग भरी । कोणी खाद्य वाईट संस्कारी । करितें प्राण्या ॥९०॥
कांही जीव चुनखडीहि खाती । कांही मांसकिडे भक्षिती । परंतु त्यांची स्वभाव-प्रकृति । त्याचि परी राहे ॥९१॥
मानवाने काय खावें । म्हणजे मानवपणेंचि शोभावें । हेंचि येथे पाहावें । लागतें सज्जनांसि ॥९२॥
शुध्द सात्विक अन्न घेतलें । त्याने सात्विक विचार प्रवर्तले । तामस राजस खाद्य सेविलें । तैसें झालें आचरण ॥९३॥
मद्यमांसाहार करिती कोणी । विकारबुध्दि वाढे मनमानी । भलतेचि रोग जाती लागोनि । सांसर्गिक आदि ॥९४॥
हें तों निश्चितचि आहे । खाद्यें रसरक्त उत्पन्न होय । रक्तापासूनि मांस मेद वीर्य । नि:संशय होती शरीरीं ॥९५॥
जैसे ज्याचे रक्तरसगुण । तैसे विचार होती स्फुरण । क्रूर-शूर मंद-बुध्दिमान । रक्तमिश्रणें दिसताति ॥९६॥
कांही आनुवंशिक गुण येती । रक्तरेताचिया मिश्रस्थितीं । कांही खाण्यापिण्याचेहि होती । संस्कार अंगीं ॥९७॥
कांही संगतीने वळण लागे । भूमिपात्रें कांही परिणाम जागे । कांही प्रयत्नशीलतेचे धागे । वळविती जीवा ॥९८॥
हें सर्व जरी खरें असलें । तरी मुख्य अंग खाद्यपेयचि झालें । कारण त्यानेच बनलें-घटलें । रक्तमांस जीवांचें ॥९९॥
उत्तम रक्ताचें असावें शरीर । तरि अन्नहि उत्तमचि खावें सुंदर । बाष्कळ खातां मेंदू-इंद्रियांवर । बाष्कळताचि येईल ॥१००॥
मग विषय-वासना नावरे । लागेल बहिरंगाचें वारें । झगडती जैसीं जनावरें । तैसे अनावर मानवहि ॥१०१॥
ज्यासि क्रूरकर्मचि करणें आहे । त्याने तेंचि खावें नि:संशय । तैसेचि भोगावेत अपाय । झालिया अंगीं ॥१०२॥
ज्यासि मनुष्यपण लाभावें । ऐसें वाटे जीवेंभावें । त्याने सात्विक अन्नचि सेवावें । सर्वतोपरीं ॥१०३॥
एकाने ऐसा प्रश्न केला । सात्विक अन्न कुठलें गरीबाला ? त्याने काय करावें बोला । जीवनासाठी ? ॥१०४॥
मित्रहो ! सात्विक अन्नचि सहज मिळतें । जें श्रमाने शेतींत पिकतें । भाजीभाकरी भातपोळी लाभते । अल्प प्रयासें ॥१०५॥
सूर्यकिरणांनी तयार झालीं । कंद भाज्याफळें बागेंत पिकलीं । सत्वांशयुक्त सर्व तीं भलीं । आरोग्यदायी ॥१०६॥
साधें सहज ताजें पावन । तेंचि असे सात्विक अन्न । नाना विकृतींचें मिष्टान्न । तें सात्विक नव्हे ॥१०७॥
कळणाकोंडाहि सात्विक । ज्या सत्त्वें तगती गरीब लोक । सात्विक म्हणजे शरीरपोषक । आरोग्यदायी सुसंस्कारी ॥१०८॥
तळलें विटलें खाऊं नये । आंबट खारट सेवूं नये । तैसें अति गोडहि जेवूं नये । भोजनीं कोणी ॥१०९॥
मिष्टान्न नेहमीं सेवूं नये । तंळण मसाले खाऊं नये । मिरचीवरि सोकावूं नये । सर्वांनीच ॥११०॥
स्वच्छ असावें सात्विक अन्न । ताजें रुचिकर आणि रसपूर्ण । पालेभाजी फळभाजी विभिन्न । स्वाद संपन्न मुळांतचि ॥१११॥
उगीच आटवून आटवून रबडी खाणें । वाटून वाटून पुरणपोळी करणें । तळून तळून भजेपुर्या जेवणें । उन्मत्तांचें भोजन हें ॥११२॥
चाळून गाळून केला रवा । पिसून किसून भरला खवा । खातांना जीभ करी वाहवा ! पोट जाई कामांतूनि ॥११३॥
कांहींनी खाण्याचीच वाढविली कला । भात खाती टोपला-टोपला । वरोनि चिंचपाणी पेला पेला । भातावरि घेती ॥११४॥
कांही लाडूपेढे खूपचि खाती । रबडी हलवा तंडोनि घेती । पैसे ठरवोनि माप लाविती । खावयाचें ॥११५॥
मग त्याने पचन होईना । सारा शरीराचा होय धिंगाणा । नाना रोग जडती, यातना । द्यावयासि ॥११६॥
कोणी स्वादासाठी भोजन करिती । नको असलें तरी पोटांत कोंबती । मग बिमारी घेऊन उठती । कॉलरा, अपचन, संग्रहणी ॥११७॥
कांहींना होते उदर-कुंदी । चाले अपानांतून दुर्गधी । लोक हसती खाणेंपिणें स्वच्छंदी । कां करतो म्हणोनिया ॥११८॥
प्रकृतीच्या विरुध्द आहार । नाही काळवेळाचा सुमार । आंबट तेलकट आदि विषम मिश्र । ऐसा आहार विषारी ॥११९॥
कांही लोक ऐसेंचि खाती । प्रकृति बिघडलिया औषध घेती । गरीबास कुठली इतकी संपत्ति ? वैद्य होती घरोघरीं ॥१२०॥
डॉक्टर म्हणती पथ्यचि नाही । तेणें रोगाचें मूळ तैसेंचि राही । रोगी पाहती तेंच नित्यहि । मृत्यूची घाई झाल्यापरी ॥१२१॥
पहिलें खावोनि मस्त व्हावें । मग औषधि घेवोनि पचवावें । ऐसे उपद्रव कासयासि करावे । उन्मत्तपणें ? ॥१२२॥
उगीच आहे ऐसें खाणें । पचविण्यासाठी चूर्ण घेणें । अन्नरसाची नासाडी करणें । कशासाठी ? ॥१२३॥
आंत वाढत जातां विकृति । धन्वंतरीहि काय करिती ? नष्ट करोनि औषधें, संपत्ति । मुखी माती पडतसे ॥१२४॥
परंतु लोक आग्रहीं पडती । हितचिंतक म्हणवोनि खाया देती । ते समजावे घातक श्रोतीं । ठेवावी निश्चिती आहाराची ॥१२५॥
नियमित सात्विक अन्नचि खावें । साधें ताजें, भाजीपाले बरवे । दूधदही आपुल्यापरी सेवावें । भोजना करावें औषधचि ॥१२६॥
सर्व भोजनीं उत्तम भोजन । ज्यांत गोघृतदुग्धतक्रपान । समजावें अमृताचें सेवन । शरीरासाठी ॥१२७॥
गोदूध नित्य सेवन करितां । कायाकल्पदि होय तत्त्वता । शक्ति चपलता बुध्दिमत्ता । आरोग्य हातां नित्य राही ॥१२८॥
निरोगी आयुष्य लाभेल बहुत । अल्पमृत्यु अथवा रोगांची सांथ । हे पाऊल न ठेवितील गांवात । तुकडया म्हणे ॥१२९॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव संमत । व्यक्ति-आचारें ग्रामारोग्य वर्णित । चौदावा अध्याय संपूर्ण ॥१३०॥
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
******************
ग्रामगीता अध्याय पंधरावा
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
एका श्रोतियाने प्रश्न केला । दुधाचा तर दुष्काळचि पडला । कुठलें ताकलोणी सकळांला । गोमातेचें ? ॥१॥
दूध देणारे लबाडी करिती । म्हशीच्या दुधांत पाणी घालती । गायीचें म्हणोन विकती । अधिक भाव घेवोनि ॥२॥
कोठे गायी राहिल्या आता ? तुरळक दिसती विकतां वाचतां । वधती चपलाजोडयांकरिता । वासरेंहि करोडो ॥३॥
गोपालांचा देश भारत । आला गायीगुरें पूजीत । परंतु गायी झाल्या खात । लक्षचि नाही तयांकडे ॥४॥
त्यांतील कांही कसाब घेती । कांही दुसरीकडे नेती । उरल्या त्या कचरा असती । गायी सार्या ॥५॥
चारापाणी अति महाग । नाही व्यवस्थेसाठी मार्ग । मानवचि अर्धपोटी, मग । गायी कैशा पाळाव्या ? ॥६॥
ऐकोनि त्याचें विशद विवरण । म्हणालों तुमचें म्हणणें मान्य । परि यांत आपुलाचि संपूर्ण । दोष आहे ॥७॥
भारत कृषिप्रधान देश । शेतीसाठी हवा गोवंश । गोरसा इतुका नसे सत्वांश । अन्यत्र शुध्द ॥८॥
म्हणोनि गोवंश सुखी होता । तोंवरि नव्हती दरिद्रता । नव्हती ऐसी विपुलता । रोगराईची ॥९॥
गोमय गोमूत्र मिळोनि रात्रंदिस । कायम होता भूमीचा कस । पेवें भरती गांवागांवास । धान्याचीं तेव्हा ॥१०॥
भूमि आणि जनावरें । हींच उत्पत्तीचीं कोठारें । एकाचीं अनेक होतीं खिल्लारें । जोडधंदा हा घरोघरीं ॥११॥
घरोघरीं दूधदुभतें । अन्नधान्यासि सहायक तें । आबालवृध्द राहत होते । सशक्त आणि निरोगी ॥१२॥
म्हणोनि गायीगुरां गोधन । ऐसें सत्य नामाभिधान । सुखी होता भारत संपूर्ण । गोवंशा सुखवोनिया ॥१३॥
परि पुढे झालें दुर्लक्ष । कांही भोवला राज्यपक्ष । गायी होऊनि बसल्या भक्ष्य । वाढलें दुर्भिक्ष त्यागुणें ॥१४॥
आपण दुधाळ म्हशीकडे गेलों । चहाकॉफी आदि पिऊं लागलों । म्हणोनि गायीसमेत मुकलों । सर्वस्वासि ॥१५॥
प्राणी खावोन एकदा तोषला । तो नित्यासाठी त्यास मुकला । मग कुठलें दुभतें, संतान, खतादि त्याला ? ऐसें केलें वेडयापरी ॥१६॥
गायी विकोनि पोट भरलें । मग नित्यासाठी खाईल कुठलें ? पोट बांधोनि गायीस पोषिलें । त्यासि लाभलें सौख्य पुढे ॥१७॥
गोरक्षणीं स्वरक्षण । ऐसें पूर्वजांचें कथन । म्हणोनीच गायींकरितां प्राण । दिले अनेक शूरांनी ॥१८॥
श्रीकृष्ण आणि शिवशंकर । वसिष्ठ आणि दत्तदिगंबर । दिलीप, शिवाजी गोसेवा-तत्पर । संत अपार गोभक्त ॥१९॥
ज्यांनी त्यागिलें सर्वस्वास । करतलीं भिक्षा तरुतलीं वास । ऐसे निष्काम गुरुहि गोसेवेस । न विसंबती कदापि ॥२०॥
गायीच्या शरीरांत सर्व । कल्पिले जे देवीदेव । तयांचा हाचि असे भाव । गाय अधिष्ठान देशाचें ॥२१॥
तिच्या शेणाने पिके शेती । शेती देई सुखसंपत्ति । म्हणोनिच शेणामाजी लक्ष्मीची वसती । वर्णिली असे ॥२२॥
गोरसाने आरोग्य शरीरीं । मग कोठे राहिला धन्वंतरी ? सत्वांश मिळतां बुध्दि गोजिरी । सरस्वती ही गोदुग्धीं ॥२३॥
उदररोगांचें नाशक । सत्वांश देई गायीचें ताक । तुपाने शांत डोळे मस्तक । चंद्रसूर्य जणूं नेत्रीं ॥२४॥
गाय जिवंत आरोग्यधाम । तिचे पुत्र प्रत्यक्ष परिश्रम । राष्ट्रसुखाचा मार्ग सुगम । गोसेवेयोगें ॥२५॥
म्हणोनि सकलांचें कर्तव्य आहे । जेणें गोवंश सुधारणा होय । ऐसा करावा कांही उपाय । सर्वतोपरीं ॥२६॥
कसाब आपुल्या गांवांतूनि । गायी नेती बघतां नयनीं । दु:ख व्हावें सकलांच्या मनीं । परतवाव्या त्या गायी ॥२७॥
ऐसे दलाल हाकोनि द्यावे । अथवा अन्य कामीं लावावे । परोपरीने सुमार्गी वळवावे । घेते-देते सर्वचि ॥२८॥
विकणारासि समजावावें । एवढयाने का श्रीमंती पावे ? मरे तों घरीं खतमूत घ्यावें । तरी फळे सेवा गायीची ॥२९॥
द्वारीं सकाळीं गाय हंबरली । गोमूत्र देवोनिया उठली । म्हणजे समजावी पवित्रता झाली । जागेमाजी ॥३०॥
ज्याचे घरीं शेती आहे । त्याने अवश्यचि पाळावी गाय । मळमूत्र सर्व उपयोगी राहे । ऐसी गाय माऊली ती ॥३१॥
गाय माऊली आईसमान । तिची निगा असावी पूर्ण । न करावी गोमाशांची खाण । अथवा सांपळा हाडांचा ॥३२॥
घालोनि चारा पेंड चुरी । गाय करावी हत्तीपरी । प्रेमें गोंजारोनि घरोघरीं । गाय प्रसन्न ठेवावी ॥३३॥
गांवीं असावा आदर्श सांड । बैल निपजावया धिप्पाड । सुंदर होईल शेतीसि जोड । वाहावया बैलांची ॥३४॥
उत्तम गायी सुंदर सांड । पाहतां आनंद वाटे उदंड । दूध पिवोनि मुलें प्रचंड । शक्ति दाविती ॥३५॥
तेंचि खरें सात्विक सौंदर्य । मुलें गोंजारिती वत्स गाय । दूध पूवोनि राहती तन्मय । खेळींमेळीं ॥३६॥
गोवंशाचें दूध वाढे । तरीच संतान उन्नतीस चढे । खाऊं घालोनि लाडू पेढें । उगीच पोटें वाढती ॥३७॥
कृत्रिम दूध-लोणी कांही । गोरसतुल्य ठरणार नाही । नाना रोग वाढती देहीं । न कळतां कृत्रिमतेने ॥३८॥
सर्वथैव यंत्रांनीच कांही । शेती सुखकर होणार नाही । गांवची संपत्ति गांवीं राही । सुगम तो मार्ग उत्तम ॥३९॥
यासाठी गायीगुरांची जोपासना । घरोघरीं ठेवावा गोवत्सठाणा । प्रसन्न दिसावे पशू नाना । उत्तम लाभावें दूधदही ॥४०॥
दुधादह्याची योग्य पूर्ति । व्हावी आपुल्या गांवाप्रति । घरोघरीं गायीवासरें असती । तेंचि गांव भाग्यशाली ॥४१॥
जो आपुल्या घरीं गाय न ठेवी । तयासाठी गोरक्षणें असावीं । गरीबांची तेथे सोय व्हावी । उत्तम लाभावा गोरस ॥४२॥
कांही ठिकाणीं गोरक्षणें करिती । मरतुकडया गायी जमविती । त्यांच्या नांवाने पैसे खाती । गायी मारती उपवासी ॥४३॥
ऐसें नको गोरक्षण । जें दुखवी मानवी मन । राहावी गायी-सांड पाहोन । प्रसन्न जनता सर्वदा ॥४४॥
गोरक्षणें दहीदुधाची सोय व्हावी । लोकीं सुखसंपन्नता यावी । कोरडी गोपूजाच न करावी । घरोघरीं अथवा गांवीं ॥४५॥
उत्तम चारापेंड देऊन । वाढवावें गायींचें वजन । आदर्श गायी वळू ठेवोन । उत्तम गोधन वाढवावें ॥४६॥
गांवीं सुंदर गायींचा तांडा । चराया गोचरभूमि उदंडा । नदी तळें विहिरीचा आखाडा । भव्य जैसा ॥४७॥
उत्तम ऐसा देवसांड । मुबलक चरावा चारा-बिवड । बीजारोपणीं दूधकावड । देती गायी ॥४८॥
हेंचि खरें गोरक्षण । नाहीतरि कसाबभुवन । उगीच गायी वाडयांत कोंडून । गोरक्षण का होई ? ॥४९॥
गायीस नसे चराऊ जमीन । तरि मोकळी पाडावी सरकाराकडोन । अथवा गांवीं करावी अर्पण । जमीनदारांनी ॥५०॥
गोरक्षणाचा व्हावा अभ्यास । नाना प्रयोग सावकाश । कैसे पुढे गेले अन्य देश । ती माहिती द्यावी सर्वां ॥५१॥
गोवंशाच्या रोगनिवारणा । गांवीं ठेवावा दवाखाना । लाभ मिळावा सर्वांना । प्रतिबंधकता समजावी ॥५२॥
गांवोगांवीं व्हावी गो-उपासना । गोसेवा गोदुग्धमंदिर स्थापना । रुचि लावावी थोरांलहानां । गोदुग्धाची परोपरीं ॥५३॥
सर्व करावें जें जें करणें । परि सुधारावें सात्विक खाणें । त्यावांचोनि सदबुध्दि येणें । कठिणचि वाटे ॥५४॥
सात्विक खाद्यपेयांविण कांही । गांवीं आरोग्य येणार नाही । उत्तम शक्ति नसतां देहीं । संपत्तिहि कैची ? ॥५५॥
उत्तम दूध उत्तम सांड । उत्तम शेती उत्तम बिवड । उत्तम कामगार प्रचंड । शक्तिशाली ॥५६॥
ऐसें ज्यांनी गांव केलें । तेचि आज प्रतिष्ठा पावले । एरव्ही तोरा करोनि मेले । निकामी ते ॥५७॥
निकामियाची व्यर्थ संपत्ति । निकामियाची व्यर्थ शक्ति । नाना मार्गे संपोनि अंतीं । दु:ख देई जीवासि ॥५८॥
खूप सत्वमय खावोनि अन्न । मेद घेतला वाढवोन । तेथे रोगांची फौज निर्माण । होतसे दु:ख द्यावया ॥५९॥
म्हणोनि केलें पाहिजे काम । आरोग्यदायी कुणी व्यायाम । अंगांतोनि निघतां घाम । नष्ट होती रोगजंतु ॥६०॥
व्यायाम आरोग्यदायी मित्र । हें ध्यानीं ठेवावें सूत्र । आळस वैरी मानिला सर्वत्र । सर्वतोपरीं ॥६१॥
व्यायामाविण सात्विक भोजन । तेंहि मारी विकारी होऊन । व्यायामें होय अग्निदीपन । अन्नपचन सहजचि ॥६२॥
व्यायामें जडत्व जाई दुरी । व्यायामें अंगीं राहे तरतरी । रक्तव्यवस्था उत्तम शरीरीं । वाढे विचारीं सजीवपण ॥६३॥
व्यायामाने सशक्त स्नायु । व्यायामें मानव होय दीर्घायु । व्यायामहीना पित्त कफ वायु । जर्जर करिती अत्यंत ॥६४॥
व्यायामें वाढे प्रतिकारशक्ति । स्वावलंबनाची प्रवृत्ति । व्यायामें अंगीं वाढे स्फूर्ति । कार्य करण्याची ॥६५॥
ऐसा व्यायाम सर्वांकरितां । असे उपयुक्त पाहतां । ही नव्हे केवळ एकांगी संथा । पहिलवानांची ॥६६॥
कोणी व्यायामामागेच लागले । ते मल्ल-पहिलवान झाले । लोकां दिपवोनि सामर्थ्य दाविलें । देह-शक्तीचें ॥६७॥
त्यांत कोणी बक्षिसासाठी । करिती जीवनाची आटाआटी । पैशांसाठीं मारापिटी । करिती कोणी ॥६८॥
देह झिजवावा सेवेस्तव । सत्यमार्गे रक्षावें गांव । दुर्बळासि उचलावें हेंचि वैभव । मल्लविद्येचें ॥६९॥
परि इकडे नाही ध्यान । नष्ट करोनिया मिष्टान्न । शक्ति खर्चिती दुष्कर्मी पूर्ण । ऐसे व्यायामी कितीतरी ॥७०॥
कोणाच्या भरदार देहावरि । कपडे मुलायम जरतारी । आपुल्याच खाद्य खुराकीची करी । सर्वदा चिंता ॥७१॥
गांवसेवेचें काम आलें । तेथे पुढारीपण दिलें । तरि तोंडचि त्याचें चाले । स्वयें न करी एकहि ॥७२॥
कपडयास न पडावी वळी । म्हणोनि दुरुनीच सांभाळी । कामें करिती माणसें सगळी । परि तो जागचा हालेना ॥७३॥
असेल कुस्तीमाजी बरवा । परि जो प्रसंगीं कामीं न यावा । तो मल्ल म्हणोनि गौरवावा । कोणत्या न्यायें ? ॥७४॥
तोचि खरा पहिलवान । जो देह-उन्नति साधूनि पूर्ण । सेवेसाठी अर्पितो जीवन । हनुमंतापरी ॥७५॥
नुसतें दंडमोंढे मारणें । कुस्ती जिंकणें, चणे पचविणें । थोरालहानांस तंबी देणें । नव्हती लक्षणें व्यायामाचीं ॥७६॥
साधाया सेवेचा उपक्रम । कराया जीवनाचें काम । जो शक्ति दे तोच व्यायाम । आवश्यक सर्वां ॥७७॥
व्यायाममंदिरांतचि कांही । व्यायाम होतो ऐसें नाही । उत्पादनासि सहायक होई । तो व्यायाम श्रेष्ठ ऐसा ॥७८॥
हाते घेवोनि दंड मारणें । त्याहूनि उत्तम पाणी ओढणें । दळणें, फोडणें, जमीन खोदणें । आरोग्यदायी ॥७९॥
जीवनाचा अमोल वेळ । घालवोनि खेळती तकलादी खेळ । त्यापेक्षा परिश्रमाचें फळ । उत्तम सर्वतोपरीं ॥८०॥
दळणकांडणादिकें उत्तम । मिळे आरोग्यकारी व्यायाम । देह विशेष राही कार्यक्षम । ऐसा सत्वांशहि लाभे ॥८१॥
वाचेल बरीचशीं संपत्ति । देशांत वाढेल श्रमाची शक्ति । सर्व कार्यांचीं होईल पूर्ति । गांवींच या मार्गाने ॥८२॥
होवोनिया लोकसेवा । आरोग्याचा लाभेल मेवा । गांवास लाभे सुखाचा ठेवा । अडचण कोठे कशाची ? ॥८३॥
आपुली शेती आपुल्या कष्टें । शेणमूत्रादि घालोनि गोमटे । करिता ऐसी आदर्श नेटे । उत्पन्नासी वाण नुरे ॥८४॥
आबालवृध्द नरनारी । यासाठी झटतील घरोघरीं । तरि सर्व सुखें संसारीं । लाभतील त्यांना ॥८५॥
लाभेल व्यायामाचें फळ कामामाजींच सकळ । निसर्गचि देईल आरोग्यबळ । सर्व लोकां ॥८६॥
वनस्पति आदींचा सहवास । सूर्यकिरणांतील सत्वांश । शुध्द हवेंतील श्रम सर्वांस । अमृतापरी लाभदायी ॥८७॥
मग गांव असो की शहर । तेथे रोगांचा न राहे संचार । एक-एक व्यक्ति करील आचार । ऐसा जरी ॥८८॥
व्यसनें आळस दुराचार । यांपासोनि राहिला दूर । ऐसा एकेक घटक सुंदर । पाहिजे गांवीं ॥८९॥
सदगुण जेथे जेथे दिसती । ते उचलोनि आणावे अनुभवाप्रति । यानेच उन्नत होईल व्यक्ति । जीवन सुधारेल गांवाचें ॥९०॥
जीवन लाभावें उज्जवलतेचें । तरि सर्व कामधाम असावें सोयीचें । जें जें कराल तें चालावें साचें । त्याच मार्गी ॥९१॥
भोजनस्थानीं निद्रास्थानीं । सभास्थानीं उधोगस्थानीं । विशेष प्रसंगीं सहजस्थानीं । सदविचारेंचि वर्तावें ॥९२॥
संस्कार आणि शुध्दबुध्दता । आरोग्य आणि पवित्रता । यांवरि लक्ष ठेवोनि सात्विकता । बिंबवावी जीवनीं ॥९३॥
यांकरितां बोललों कांही दिनचर्या । आहारविहारादि कार्या । ग्रामस्थांनी अनुभवोनिया । उध्दार करावा जीवनाचा ॥९४॥
ऐसें करावें एकेक कार्य । जेणें गांवीं नांदेल सात्विक सौंदर्य । यांतचि स्वर्गीय सुखाचें माधुर्य । तुकडया म्हणे ॥९५॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव संमत । गोरसव्यायामसेवन कथित । पंधरावा अध्याय संपूर्ण ॥९६॥
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
*************************
ग्रामगीता अध्याय सोळावा
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
ईश्वरास मान्य जें सत्कार्य । जें सांगोनि गेले संतवर्य । तें आचरणें यांतचि सौंदर्य । खर्या जीवनाचें ॥१॥
सात्विक आहार सात्विक विहार । सात्विक संगति, व्यवहार । सात्विक वाचन-दर्शनादि साचार । प्रिय सज्जनांसि ॥२॥
ऐसें सात्विक करणें जीवन । ही नव्हे अंधश्रध्देची खूण । सात्विकता निसर्गनियमांस धरून । ऐसा अनुभव जाणत्यांचा ॥३॥
सात्विकतेनें आरोग्य लाभे । शांतिसुख दास होऊनि राबे । जीवन सर्वप्रकारें शोभे । प्रभावीं सौंदर्याने ॥४॥
स्वैराचार हीन विचार । राजस-तामस आहार-विहार । दिनचर्येंत नाही ताळतंत्र । त्याचें इह-पर सुख नाशे ॥५॥
चहा-चिवडा-चिरूटांचे दास । आपल्या तनुमनधनाचा नाश । करोनि बिघडविती जीवनास । गांवच्याहि ॥६॥
सात्विक सरळ ठेवितां जीवन । तें होय सुंदर आरोग्यपूर्ण । सात्विकचि असावी वेषभूषाहि जाण । मानवाची ॥७॥
कांही भडक वेषभूषा करिती । कपडयावरि किती कपडे घालती । आंत लुकडे परि वरोनि शृंगारिती । शरीरें आपुलीं ॥८॥
तोंडाचें खोडकें दिसती हाडें । छातीची खोली दाखवी लांकडें । काय होतें घालोनी कपडे । गर्भरेशमीहि ? ॥९॥
उगीच करिती थाटमाट । कपाळीं अत्तराचा मळवट । पावडर कंगवा आरसा चिरूट । खिशामाजी ॥१०॥
व्यसन तोंडाचें खोडकें करी । तेल लाविती वरचेवरी । केश फिरवोनि म्हणती साजरीं । दिसतों आम्ही ॥११॥
अंग निस्तेज जीर्ण झालें । खरूज गजकर्णादिकें भरलें । भारी कपडे घालोनि झांकिलें । सौंदर्यासाठी ॥१२॥
कशाचें हें सौंदर्य पण । ज्यांतूनि न जाय सूर्यकिरण । ब्रह्मचर्याचेहि नाहीत कण । शरीरामाजी ॥१३॥
चालतांना पढती आढया । बोट लावतां खाती तनघडया । बाता करिती बडया बडया । आम्ही शौकीन म्हणोनि ॥१४॥
रडयासारिखी निघते वाचा । औषधावाचूनि न होय शौच्या । बोटांत आंगठया हिरकणीच्या । मिरवोनि काय ? ॥१५॥
निस्तेज शृंगारिलें प्रेत । की भुजाण उभें केलें शेतांत । एकटाचि विचित्र दिसे चारचौघांत । ऐसी नको वेषभूषा ॥१६॥
अथवा भरजरी कपडे घातले । परि ते स्वच्छचि नाही केले । सोवळे म्हणवोनि पुन:पुन्हा नेसले । तेच ते पीतांबर ॥१७॥
ऐसी कला कासया करावी । जी हास्यास्पद आणि बाधकहि व्हावी । आपुली साधीच राहणी ठेवावी । ऐपतीपरी ॥१८॥
अंगीं गुणसौंदर्य भरावें । सुंदर सात्विक कपडे करावे । खादी-ग्रामोद्यागाचेंचि ल्यावें । लेणें आपुल्यापरीं ॥१९॥
नेहमी स्वच्छ धुतलेलें असावें । एकाचि वस्त्रें अंग झाकावें । निसर्गाचें हवा किरण लागावें । शरीरालागी ॥२०॥
एकावरि एक आच्छादन । तें थंड देशांचें अंधानुरण । शरीरा लागतां सूर्यकिरण । औषधिगुण अंगीं येती ॥२१॥
सोनेमोतीं रेशीम-जरी । सौंदर्यप्रसाधनें बहुपरी । त्या सर्वांहूनि शतपटीने बरी । आरोग्याची टवटवी ॥२२॥
सौंदर्य असावें रक्तशुध्दीचें । ओजपूर्ण ब्रह्मचर्याचें । नीटनेटकें वागण्याचें । घरींदारीं उत्तम ॥२३॥
कला दाखवावी बळकट स्नायूंची । उंच छातींची ताठ शरीराचीं । आरोग्याची बाणेदारपणाची । सर्वांगांनी आदर्श ॥२४॥
वेषभूषेची चढाओढ । आज जीवनास झाली अत्यंत जड । गरजा, चिंता, रोगांची वाढ । यांत कसलें मोठेंपण ? ॥२५॥
बाह्य वस्तूंचें भडकपण । हें आंतल्या उणीवेचें प्रदर्शन । महत्त्वास चढतां बाह्य आवरण । मोल घटे मानवतेचें ॥२६॥
मानव मानवतेने शोभावा । गांधीवेष लाजवी वैभवा । श्रीकृष्णाचा मोरमुकुट पावा । वेड लावी विश्वाला ॥२७॥
हें जाणोनिया अंतरीं । सात्विक व्हावें आहार-विहारीं । तेणें घर-गांव-देशसेवाहि बरी । साधतसे सहजचि ॥२८॥
लोकांपुढे राही आदर्श । समानतेचा उसळे हर्ष । ग्रामोद्योगांचाहि उत्कर्ष । आपैसाचि होय गांवीं ॥२९॥
येथे श्रोता करी शंका सादर । साधी राहणी उच्च विचार । हें जरी ऋषिजीवनाचें सूत्र । तरी तें आज ना चाले ॥३०॥
किंमती कपडे भडक राहणी । छाप पाडिती आज जनीं । साधा सात्विक राहे पडोनि । मागच्या मागे ॥३१॥
विष्णूचा पीतांबर पाहून । सागरें लक्ष्मी केली अर्पण । शंकराचीं चिरगुटें बघून । दिलें हलाहल तैसें होय ॥३२॥
आज पैसे खर्चतां सर्व मिळते । न्याय मिळतो सत्ताहि मिळते । कीर्तिसन्मान थोरपण मिळते । ऐसा अनुभव सर्वांचा ॥३३॥
मित्रा ! हाचि भ्रमिष्ट अनुभव । लोकांना सांगतो धनचि देव । या सूत्रानेचि दु:खें सर्व । आज वाढलीं जीवनांत ॥३४॥
सर्व हेंचि चालती समजोनि । जैसी स्पर्धाचि लागली जनीं । तोरा दाविती एक-एकाहूनि । जाती पतनीं अधिकाधिक ॥३५॥
कापसाहूनि सफेद वसनें । सोन्याहूनिहि पिवळे दागिने । शिखर गांठलें कृत्रिमतेने । नित्य नव्या हौसेसाठी ॥३६॥
स्वच्छता आणि पवित्रता । शुध्दता आणि नैसर्गिकता । याहूनि प्रिय झाली कृत्रिमता । सुशिक्षितता तीच वाटे ॥३७॥
स्नान न करतां फवारा घ्यावा । कपडयावरि अत्तरांचा शिडकावा । मळ सांचो परि सुंदर दिसावा । कपडा नवा घडोघडीं ॥३८॥
नवी फॅशन थाटमाट । यांची वाढतचि गेली चट । शिवतां पन्नासाचा कोट । लागे पँटहि तोलाचा ॥३९॥
ह्या गरजा वाढतचि जाती । तेथे न पुरे कुबेर-संपत्ति । मग बापुढे कामगार करिती । काय तेथे ? ॥४०॥
कोणी खाती लाचलुचपती । कोणी उघडचि डाके देती । अन्याय अत्याचार वाढती । पैशासाठी ॥४१॥
कोणी सरळपणें चालती । ते यांमाजी रगडले जाती । मग त्यांचीहि भांबावे वृत्ति । वाढे अशांति चहूंकडे ॥४२॥
कोणी घरीं उपास काढिती । मुलाबाळां दूध न देती । परि बाह्य डौल उत्तम ठेविती । मोठेपणा मिरवाया ॥४३॥
कोणी म्हणती यावाचून । न चाले धंदा न मिळे धन । परि हें सर्वांसीच गेलें समजोन । वर्म एकमेकांचें ॥४४॥
मग कां अट्टाहास करावा ? जाणोनि सन्मार्ग कां न धरावा ? परि तो मार्गहि नाही ठावा । वेड लागलें धनाचें ॥४५॥
म्हणती पैशांनीच सर्व होतें । मोक्ष मिळतो, राज्य मिळतें । संत मिळती, कीर्ति मिळते । देवाचें होतें पूजनहि ॥४६॥
परि हें म्हणणें वेडयासारखें । पैशांनीच सखे होती पारखे । पैशासाठीच जगीं वाखे । घाली नरकीं पैसाचि ॥४७॥
पैसा नियमांनी मिळविला । तारतम्याने खर्चीं घातला । तरीच सौख्य देतो जीवाला । जीवनामाजीं ॥४८॥
नाहीतरि पैसा जहर । शांति न लाभूं दे क्षणभर । माणसासि बनवितो वानर । चंचल चित्त करोनिया ॥४९॥
चिंता लावितो कमावितांना । पशूसारिखे कष्ट नाना । जाळतो तनुमना जीवना । सर्वकाळ मानवाच्या ॥५०॥
चिंता थोर रक्षणाची । चोरभय अग्निभयादिकांची । लालसा वाढे उपभोगाची । माणूस होय पशुजैसा ॥५१॥
असला दिसला त्यासि पैसा । जीव होतो कासाविसा । वाटे खर्च करावा कैसा । झोप त्यासि लागेना ॥५२॥
आला पगार खर्च झाला । सिनेमा तमाशे पाहण्यांत गेला । त्यांतूनि उरला कांही, त्याला । उत्तम मार्ग लागेना ॥५३॥
दारू, गांज्यादिक पितो । कांही पैसा सट्टयांत जातो । कांही विभागणीस लागतो । व्यभिचाराच्या ॥५४॥
कांही उन्मादाच्या भरीं । झगडा करतां मार्गावरि । वकिलांचीं घरें भरी । शाहजोग आम्ही म्हणावया ॥५५॥
कांही खाण्यांत आलें बाष्कळ । मग उठलें पोट, कपाळ । डॉक्टर-वैद्यांची झाली धावपळ । पैसा गेला त्यासाठी ॥५६॥
कांही दाखवाया मोठेपण । देती पार्टी, बिदागी, दान । हसतां हसतां फसती घेवोन । बेगर्जी वस्तु ॥५७॥
कांही लोक कमाई करिती । त्यांची त्यांनाच न पुरे पुरती । खर्च वाढतां कर्ज घेती । धोका भोगती जाणोनिया ॥५८॥
जैसा कर्ज घेवोनि खर्च करी । तैसा कमाईस लक्ष न घरी । तेणें संकटें येती घरींदारीं । मग विचारी काय करूं ? ॥५९॥
पुढे जीवा लागली हळहळ । लोटतां न लोटे पुढचा काळ । म्हणोनि बुध्दि झाली चंचळ । चोरीचहाडी करावया ॥६०॥
अक्कल नाही आमदानीची । समज नाही मोजमापाची । जीभ चटकली खाण्यापिण्याची । धरला मार्ग चोरीचा ॥६१॥
कलंक लागला घराण्यावरि । आईबापाची बदनामी पुरी । पुत्र निघाले ऐसे वैरी । उत्तम कोणी म्हणेना ॥६२॥
हौसेसाठी सोडला धर्म । किळसवाणे करिती उद्यम । नाना प्रकारें व्यभिचारकर्म । करिती आणि करविती ॥६३॥
कोणी धनिक राक्षसचि असती । पैसा देवोनि गुलाम करिती । पाप करिती करवोनि घेती । आपणासाठी ॥६४॥
कोणी फसवोनि धन कमाविती । आपणचि उपभोग भोगती । त्यांचीहि शेवटीं होते फजीती । ऐकिली कीर्ति बहुतांची ॥६५॥
कांहींना जवानीचा चढे तोरा । लग्नें करिती दहाबारा । सरला पैसा आणि बोजवारा । कोणी थारा देईना ॥६६॥
मग खाती बायका तोडोनि । म्हणती पैसा आणा कोठोनि । काय खावें घरीं बसोनि ? लग्न केलें कासया ? ॥६७॥
कांही चढले चढवितां मनीं । विचार दिला सगळा सोडोनि । घरेंदारें बसले समर्पोनि । वेश्या ठेवोनि घरामाजी ॥६८॥
हा झाला वानरासमान । लोक न पाहती याचें वदन । आप्त हासती दुरून-दुरून । करणी याची पाहोनिया ॥६९॥
कांही धनासाठी दत्तक घेती । परि भांडतां कवडी न उरे हातीं । उरली तरि दत्तक-मित्र उडविती । संपत्ति सारी ॥७०॥
कोणी टोलेजंग नवसचि केला । जरि देवा ! पुत्र झाला । पुत्राभारंभार देईन तुला । सोनेचांदी, म्हणोनिया ॥७१॥
कांहींना प्रथमचि मुलें झालीं । त्यांनी गांवोगांवीं मिठाई वाटली । इस्टेट सारी गमविली । हर्ष होतां पोराचा ॥७२॥
जेव्हा पुत्र झाले खंडोखंडी । तेव्हा हात कपाळीं देवोनि रडी । आता उरली नाही कवडी । भीक मागे लोकांसि ॥७३॥
कांही सज्जन यांतूनि वांचले । परि घरींच पैसे उधळोनि दिले । मुलामुलींचें लग्न केलें । धन खोविलें बारूदखानीं ॥७४॥
टोलेजंग दिला मंडप । नाही पाहिलें मोजमाप । पंगती बसल्या आपोआप । लाडूजिलेबी बासुंदीच्या ॥७५॥
कांही देखीसेखीं करूं लागले । व्रतबंध संस्कारादि भले । होते पैसे सर्व खोविले । वाढदिवशीं पुत्रांच्या ॥७६॥
कांहींनी वडिलांची पुण्यतिथी केली । पुंजी सारी गमाविली । शेवटीं रोटीहि देईल कुठली । नांव घेवोनि वडिलांचें ? ॥७७॥
कांही सज्जन यांतूनि वाचले । परि घरीं सणवारादि केले । होते-नव्हते पैसे घातले । दिवाळी-दसरा-होळीमाजी ॥७८॥
कांही मानव ऐसे असती । जे वाईट कामीं पैसा न घालिती । परि प्रतिष्ठेसाठी मरमरती । पैसा देवोनि गांठींचा ॥७९॥
शेतांत खटा असोत नव्वद । परि एका तासासाठी करिती फिर्याद । सारी इस्टेट होवो बरबाद । परि लढती एका शिवीसाठी ॥८०॥
कोणी नांव व्हावें लोकांतरी । म्हणोनि साहेबांस मेजवानी करी । नाना पक्वान्नें नजराणे परीपरी । पाहिजे तें तें पुरवावें ॥८१॥
कांहींनी घरेंदारेंहि विकलीं । प्रतिष्ठा स्थापावयासि आपुली । पुढे भिकारी होवोनि मेलीं । मुलेंबाळें त्यांचीं ॥८२॥
कांही लढले निवडणूक । पैसा गमावोनि झाले खाक । नाही उरलें लौकिकीं नाक । घेतला शोक विकतचा ॥८३॥
कांहींनी विकली शेतीभाती । बंगले बांधले सडकेवरती । शहरीं मौज भोगली, अंतीं । पोटा अन्न मिळेना ॥८४॥
कोणी व्यापारासाठी घर बांधिलें । पैसे त्यांतचि संपोनि गेले । पुढे खाण्याचे फजीते झाले । व्यापार कांही सुचेना ॥८५॥
कोणी देश-विदेश पाहती । नाना वस्तूंचा संग्रह करिती । शेवटीं त्यांचीहि झाली फजीती । गोष्टी उरल्या बडयाबडया ॥८६॥
कोणा साधूची लागली झळ । घरीं बुवांची चाले वर्दळ । चमत्कार करिती म्हणे सकळ । पैसे उधळी त्यालागी ॥८७॥
करी सेवा देई दक्षणा । मिष्टान्नें खाऊं घाली नाना । भरजरी वस्त्रपात्रादि दाना । करोनि झाला भिकारी ॥८८॥
मग बुवासीच म्हणे धन सांगा । लागला मागे करोनि त्रागा । गांठ पडली ठगा-ठगा । झाला शेवटीं निराश ॥८९॥
बुवा दक्षिणेपुरता गोड बोलला । ती संपतांच घर विसरला । कोण पुसतो धनहीनाला ? नाश झाला शेवटीं ॥९०॥
भक्ति चमत्कारादिसाठी । म्हणोनि झाली फजीती मोठी । घरदारहि लावोनि नेलें पाठीं । लुबाडलें ढोंगी बुवांनी ॥९१॥
कांही तीर्थधामावरि गेले । घरचें डबोलें जवळचि आणिलें । चोरागुंडादिकांनीं ठोकलें । पैसे नेले लुटोनि ॥९२॥
झाले बिचारे केविलवाणी । भीक मागत आले परतोनि । ऐसी केली पैशाधेल्यांनी । स्थिति अनेकांची ॥९३॥
सुविचारावांचोनि कांही । पैसा सत्कारणीं लागत नाही । धन वाढतां मन वाढत जाई । घटतां संवयी न घटती ॥९४॥
जीवनासि आवश्यक धन । सर्व कार्यांचें प्रारंभसाधन । प्रपंचीं पदोपदीं पाहिजे सुवर्ण । परि विचारधन आधी हवे ॥९५॥
नाहीतरि माणुसकीचें पडे विस्मरण । अंगीं वाढती हीन गुण । लोक तोंडापुरते म्हणती सज्जन । पाठ फिरवितां धिक्कातिरी ॥९६॥
शेवटीं मनुष्याचा निर्मळ व्यवहार । हाचि ठेवतो हृदयीं आदर । जो परस्परांच्या हिताचा विचार । आत्मत्वाने चालवी ॥९७॥
मनुष्यधर्म म्हणोनि सर्व करावें । परि भिकारीच न व्हावें । जीवन कर्तव्यशील राहावें । ऐसेंचि करावें सत्कर्म ॥९८॥
जें टिकेल तें करणें बरें । ज्यासि सज्जन म्हणती साजिरें । कंजूषीहि न करणें बरे ! उधळपट्टीहि न व्हावी ॥९९॥
ऐपत पाहोनि प्रसंग करावे । प्रसंगीं कदर्यु न बनावें । परि पैसेहि न उधळावे । भीक लागेल ऐशापरी ॥१००॥
लौकिकासाठी भिकारी न व्हावें । अंथरूण पाहून पाय पसरावे । प्रसंग शोभे ऐसे करावे । टिकाऊ परिणाम लक्षूनि ॥१०१॥
मनुष्य भावनेच्या आहारीं जातो । तेव्हा तारतम्यचि सोडतो । कांहीहि विचित्र करीत सुटतो । हौसेला मोल नाही म्हणोनि ॥१०२॥
परिणामांची पर्वा न करितां । व्यर्थचि दाखवितो उदारता । घरीं धनसंपत्ति नसतां । कर्ज काढोनि हौस करी ॥१०३॥
पुढे आपुला करोनि नाश । भिकेस लावी मुलाबाळांस । नाही कोणाचाचि विकास । ऐसें कासया करावें ? ॥१०४॥
रोज न्यायाने मिळवावें धन । थोडें थोडें करावें जतन । कांही खर्चावें त्यांतून । प्रसंगासाठी संसारीं ॥१०५॥
योग्य अतिथींचा करावा आदर । त्यांसहि द्यावी भाकरींत भाकर । आपुल्यापरीने करावा सत्कार । आलियाचा ॥१०६॥
दुसर्याच्या दु:खांत दु:खी व्हावें । त्याच्या आनंदीं सुख मानावें । प्रसंगीं आपणासि वगळितां यावें । न्यायी बुध्दीने ॥१०७॥
आपण कमवावें आपण खावें । परि उरलें तें गांव-कार्यीं लावावें । कमींत कमी खर्चात जावें । नेटकेपणें ॥१०८॥
कमावणें ती नव्हे श्रीमंती । बचत केली तीच संपत्ति । यानेच संपन्न होई व्यक्ति । वाढे श्रीमंती गांवाची ॥१०९॥
थोडया थोडयांतचि अधिक खर्चे । काटकसरीने रोज वाचे । थेंबें थेंबें तळें साचें । मग तें मना शांति देई ॥११०॥
तिळातिळांतचि तेल पूर्ण । क्षणाक्षणाने बनलें जीवन । कणाकणाने सांचे धनधान्य । कामीं येई प्रसंगीं ॥१११॥
अधिक न घ्यावा एकहि घांस । तेणें नशीबीं नये उपास । थोडा त्रास अधिक विकास । शेवट गोड याचि मार्गे ॥११२॥
ऐसें वर्तन व्हावें गांवी । गरजांची धांव कमी करावी । अनासक्ति वाढवावी । प्रत्येकाने अनुक्रमें ॥११३॥
काटकसरीचें करितां वर्तन । अपार वांचेल गांवी धन । त्याने गांव होईल नंदनवन । सर्वतोपरीं ॥११४॥
गांवासि सत्ययुग आणावा । त्याच्या सुखें स्वर्ग मानावा । आपुल्या इंद्रियांच्या चवा । सोडूनि द्याव्या थोडथोडया ॥११५॥
मग जाणोनिया आत्मरंग । राहावें नित्यानंदस्वरूपीं दंग । तेव्हाचि जीव होय अभंग । अमर स्थानीं शेवटच्या ॥११६॥
सम्यक आचार सम्यक विचार । संग्रामाचा आदर्श थोर । साधु-संत महावीर । जगज्जेते झाले या मार्गे ॥११७॥
शुध्द आचार-विचारांचें फळ । व्यक्तिसवेंचि गांव सोज्ज्वळ । गांवीं सुखें नांदतील सकळ । तुकडया म्हणे ॥११८॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव संमत । कथिली साधी राहणी संयमयुक्त । सोळावा अध्याय संपूर्ण ॥११९॥
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
*************************
ग्रामगीता अध्याय सतरावा
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
श्रोतेजन प्रश्न करिती । आमुच्या गांवीं आहे संपत्ति । परि सुख न मिळे लोकांप्रति । ऐसें झालें ॥१॥
विकास कार्याचा कोठला ? गांवीं वाद बळावला । धनिक-गरीबांचा लागला । वर्ग-कलह ॥२॥
समाज या दोहोंभागीं विभागला । एक न मानी एकाला । परस्परांवरोनि विश्वास गेला । उडोनि त्यांचा ॥३॥
आता काय करावी योजना ? कोणाची थोरवी पटवावी जना ! कैसेनि होईल ग्रामरचना । सुंदर आमुची ? ॥४॥
ऐका प्रश्न हा महत्वाचा । आवश्यकचि निर्णय याचा । त्यावांचूनि गांवाचा । मूळपायाचि ढासळे ॥५॥
श्रीमंत-गरीबांचा वाद । गांवास करील बरबाद । म्हणोनि ही दूर करावी ब्याद । जाणत्यांनी ॥६॥
देवाघरीं एकचि प्राणी । ना श्रीमंत ना भिकारी कोणी । ही आहे समाजरचनेची उणी । मानवनिर्मित ॥७॥
मूलसिध्दांतीं भेदचि नाही । हा प्रलोभनांचा खेळ सर्वहि । समज येतां दोघांसहि । भेद कांही दिसेना ॥८॥
खेळाकरितां दोन पक्ष केले । परि खेळ विसरोनि लढूं लागले । आपसांत वैमनस्य आले । अज्ञानाने ॥९॥
एकाकडे आले अधिक कंचे । तो म्हणे माझ्याचि मालकीचे । मग खेळणेंहि थांबलें इतरांचें । एकाचिया लोभामुळे ॥१०॥
ऐसेंचि आहे संसाराचें । घरचें आणि समाजाचें । तितंबे झाले कुटूंबांचे । अज्ञानें आणि लोभाने ॥११॥
कामाकरितां जाति केली । काम विसरून जातचि धरली । जन्मजात थोरवी मिरविली । वर्णधर्माच्या नांवाने ॥१२॥
ऐसेंचि झालें अर्थव्यवस्थेचें । हिस्सेदार सर्वचि धनाचे । पण कांहीच राहिले मानाचे । बाकी मेले भुकेने ॥१३॥
एक राहिला गरीब गडी । एकाची वाढली श्रीमंती बडी । ही सर्व अज्ञानाची बेडी । भोवली सगळया ॥१४॥
एकापाशीं ठेव ठेवली । त्याने अविचाराने उपभोगिली । कुणाची ठेव ही बोलीच गेली । कालांतराने ॥१५॥
देवळामाजी पुजारी ठेवला । तो देवूळचि ग्रासूनि बसला । बायकापोरंसाठीहि केला । उपयोग त्याने देवळाचा ॥१६॥
कोणी तीर्थी सदभक्त झाले । त्यांची देवळावरि सत्ता चाले । पुढे व्यापाराचें साधनचि केलें । हक्क दावूनि मुलांनी ॥१७॥
एकाकडे दिली खूप जमीन । गांवें वसवोनि त्यांना द्याया वाटून । परि तोचि बसला गबर होऊन । राबणारांसि पिळोनि ॥१८॥
धनासाठी राखणदार आणला । त्याने कमजोर मालक पाहिला । आपणचि बळकावून बसला । पैसा शक्तियुक्तीने ॥१९॥
ऐसेंचि झालें गरीबी-श्रीमंतीचें । कष्ट करणारे झाले दूरचे । पैसे घेणारे झाले कायमचे । मालक येथे ॥२०॥
श्रमणारापदरीं मोजकें माप । उरला गल्ला आपोआप । तो स्वयें उपभोगणें हें महापाप । परि ठरविला न्याय्य हक्क ॥२१॥
खोटयासि दिलें खरें नांव । पैशांनी पैशांचें वाढलें वैभव । म्हणती ही पूर्वजांची ठेव । हक्क कुठला श्रमिकांचा ? ॥२२॥
आता कांही केल्या समजेना । कोण पुसतो उपदेश-कीर्तना ? । फार तर मुंगियासि साखरकणा । देवोनि म्हणे दान केलें ॥२३॥
हजारोंचें जीवन पिळावें । तेणें त्यांच्यांत रोग वाढावे । मग दवाखाने धर्मार्थ घालावे । धर्मशील म्हणवोनिया ॥२४॥
पाहतां आजचा मजूर । न मिळे पोटासि भाकर । तैसेंचि काम करवी अहोरात्र । वारे मालक धर्मशील ! ॥२५॥
हा तों राहतो महालीं शहरीं । मुलें गाडी नेती सिनेमादारीं । शिकती व्यभिचार व्यसनें चोरी । लुटती कारभारी खेडुतां ॥२६॥
कांहींनी खूप बुध्दि लढविली । संपत्ति अतोनात वाढविली । काढोनि कवडीहि नाही दिली । प्राण जातां श्रमिकांचा ॥२७॥
गांवांतील लोक उपाशी मरे । म्हणती मरती ते मरोत बिचारे । आयुष्य सरल्या कोण तारे ? पैसा-दवा सब झूट ! ॥२८॥
ऐसें अधिक धन जमविलें । समाजीं कामीं नाही आलें । ते चोरचि म्हणावे ठरले । एकलकोंडे आपगर्जी ॥२९॥
ज्याचे पाशी अधिक जमीन । न देई मजुरां पोट भरून । तो कशाचा भाग्यवान ? महाकदर्यु म्हणावा ॥३०॥
भव्य वाडा पडला सुनसान । एकचि पत्नी एक संतान । परि न देई शेजारपण । वा रे भूषण कृपणाचें ! ॥३१॥
कित्येकांचें जनावरी वागणें । सरंजामशाहीने वजन टाकणें । धाकदडपणाने कामें घेणें । घातक होईल यापुढे ॥३२॥
गरीब सारेच ओरडती । श्रीमंत हे गुंड आहेत म्हणती । परि यांची लागली नेत्रपाती । कांहीं केल्या उघडेना ॥३३॥
यासि उपाय करावा कांही । त्यासाठी मार्ग दोनचि पाही । कायदा अथवा धर्ममार्ग राही । सेवाभावें समज द्याया ॥३४॥
यासहि कोणी न घालती भीक । त्याने पुढे चिडती लोक । मग रक्तक्रांतीची ऐकूं ये हांक । वाढे धाक मनस्वी ॥३५॥
कोणी घर फोडोनि चोरी करिती । कोणी डाके मारूनि लुटती । कोणी भरदिवसां कापिती । मुलाबाळांसहीत ॥३६॥
ही पाळीच कां येऊं द्यावी ? म्हणोनि कांही योजना शोधावी । गरीब-श्रीमंत दोन्हीहि बरवीं । राहतील ऐसी ॥३७॥
परस्परांचा विचार घ्यावा । आपला समतोल हिस्सा ठेवावा । कोणासहि राग न उदभवावा । ऐसें करावें गांवाने ॥३८॥
तुमचा पैसा आमचे श्रम । तुमची बुध्दि आमुचा उद्यम । एकाचा घोडा एकाचा सरंजाम । असावा जैसा ॥३९॥
मुळीं जीवनाची तैसीच रचना । एकास हात लागती नाना । सर्वां मिळोनीच हा आपुल्या स्थानां । बनतो सन्माना घ्यावया ॥४०॥
कोणाचे निभेना वगळूनि ग्राम । प्रत्येकासि प्रत्येकाचें काम । काम झालिया पुन्हा भ्रम । वाढतो याचा ॥४१॥
सुतार याचे खांब करी । बेलदार याची भिंत उभारी । कुंभार याचे कवेलू उतारी । छावणीसाठी ॥४२॥
लोहार खिळेफासे घडवी । मजूर बांधी घरें-पडवी । ऐसें न करितां हा गोसावी । राहता कोठे ? ॥४३॥
चांभार याचे जोडे बनवी । विणकर याला वस्त्रें पुरवी । नीटनेटके कपडे शिवी । शिंपी यासाठी ॥४४॥
शेतकरी याला पिकवोनि दे । धान्य मिरची भाजी कांदे । सर्वांच्या श्रमें घर आनंदें । साजवी हा आपुल्यासाठी ॥४५॥
सर्वांचे हात सर्वासि लागे । सर्वांस जगविती गुंतले धागे । हें समजोनि जो गांवीं वागे । तोचि खरा बुध्दिमान ॥४६॥
परि यांत भाव वाईट शिरला । कोणी न मानीच कोणाला । म्हणे पैसे देतों आम्हीं सकलां । म्हणोनि कामें करिती हे ॥४७॥
खरे महत्त्व आहे परिश्रमाला । परि हा मानतो पैशाला । काम न करितां, पैसा असला । तरी काय भागतसे ? ॥४८॥
खोदूनि आणली गोटेमाती । तासली फाडी रचल्या भिंती । तेव्हाच बनली ती संपत्ति । परिश्रमाच्या स्पर्शाने ॥४९॥
रानीं असोत लांकडे काडया । त्या श्रमाविण न होती गाडयामाडया । श्रमाविण संपत्ति म्हणजे कवडया । त्याहि वेचल्या श्रमाने ॥५०॥
खरें याचें तारतम्यज्ञान । सर्वांनी असावें समजोन । वाहावा सर्वांचा योगक्षेम पूर्ण । हाचि धर्म धनिकांचा ॥५१॥
गांवीं जे जे श्रीमंत असती । तयांचें धन गांवची संपत्ति । समजोनि वागावें या रीतीं । मदत द्यायासि प्रसंगीं ॥५२॥
आपणापाशी अधिक असे । शेजार्यासि पुरवावें हर्षें । सर्व मिळोनि राहावें सरिसें । गांवधर्म म्हणोनिया ॥५३॥
धन हें गरीबांचें रक्त । समजोनि वागोत श्रीमंत । श्रम ही गांवाची दौलत । म्हणोनि व्हावा मान तिचा ॥५४॥
ऐसें केलिया सकळ जनांनी । वर्गभेद मिटतील गांवचे दोन्ही । यास बुध्दि द्यावया उपजोनि । साधुसंतांनी काम घ्यावें ॥५५॥
आणि सावध असावें सरकार । नीटनेटका घडवाया व्यवहार । जनतेमाजी भराभर । वारें शिरवावें शिक्षणाचें ॥५६॥
लहान मुलीमुलांपासोनि । मिटवावी गरीब-श्रीमंत श्रेणी । सर्वांस पाहाया समानपणीं । लावावें प्रत्यक्ष कृतीने ॥५७॥
शब्दांत नको समसमान । प्रत्यक्ष पाहिजे धनमानशिक्षण । फूट पाडिती ते द्यावेत हांकोन । गांवचे भेदी ॥५८॥
नसतील ऐकत जे जे कोणी । त्यांना कायद्याने घ्यावें आटपोनि । मग रचना करावी समानगुणीं । इमान जागीं ठेवोनिया ॥५९॥
जैसे बापास पुत्र सारिखे । तैसे गरीब श्रीमंत राजाचे सखे । हा भेद मिटविणें काम निकें । त्याचेंचि असे राजधर्में ॥६०॥
पण जेथे सरकार मिंधा झाला । तेथे आग लागली प्रजेला । मग कोण पुसे कोणाला ? धिंगाणा झाला पहा सर्व ॥६१॥
संतसाधूहि मिंधे झाले । दक्षणेवरील मोहून गेले । मग पर्वताचे कडेचि लोटले । समाजावरि ॥६२॥
जनतेचा मग वालीच नाही । ती चेततां मग आगचि सर्वहि । भस्म होईल सगळी मही । हाहा:कारें ॥६३॥
सगळी जनता बंदिस्त केली अथवा मारोनि टाकिली । तरी श्रमाविण पैदास कुठली ? कष्टावें लागेल सर्वांसि ॥६४॥
मग हें ऐसें कां होऊं द्यावें ? सकळांनी आधीच जागृत व्हावें । आपुल्या परीने सावरावें । कार्य नीट गांवाचें ॥६५॥
उत्तम व्यवहारें धन घ्यावें । उत्तम कार्यासाठी लावीत जावें । जेणें परस्परांचें कल्याण व्हावें । तैसेचि करावे व्यवहार ॥६६॥
ऐसा कदर्युपणा नसावा । की ज्याने गांवचि व्याजें बुडवावा । प्रसंग पडतांहि न द्यावा । साथ लोकां ॥६७॥
अविचाराने न उधळावें धन । फसवोनि न घ्यावें गरीबांपासून । दोन्ही मार्ग समसमान । ठेवावे देवघेवीचे ॥६८॥
न व्हावा शेवटचा कळस । म्हणोनि सहानुभूतीचा वाढो हव्यास । विरोधचि करूं नये यास । कोणी कोणा ॥६९॥
सगळयांनी मिळोनि वागावें । सर्वांचें समजोनि कार्य करावें । श्रीमंत-गरीब दिसोंचि न द्यावे । बहिरंग जीवनीं ॥७०॥
ते दिसावेत गुणावरि । बुध्दीवरि, कार्यावरि । ऐसे असले प्रकार जरी । समताभाव तरी न सोडावा ॥७१॥
याचें समाजासि मिळे शिक्षण । तोचि खरा भाग्याचा दिन । त्यासि नाही मग भंग जाण । कल्पकाळीं ॥७२॥
समाजांत जेव्हा धुरीण वाढती । तेव्हाचि ऐसी होय क्रांति । आपोआपचि मिटेल भ्रांति । पक्षभेदांची ॥७३॥
तेचि करितील परिवर्तन । समाजांत उत्तम ज्ञानकण । पेरूनि करितील परम पावन । भारतमाता ॥७४॥
ऐसी सुबुध्दता सगळयांत यावी । तरी श्रीमंती-गरीबी मिटावी । नाहीतरि गति बरवी । नाही आता समाजीं ॥७५॥
हें समजणेंचि जरूर आहे । काळ याचीच वाट पाहे । तो ऐसा थांबलाचि न राहे । स्वारी करील वेगाने ॥७६॥
म्हणोनि माझें एवढेंचि सांगणें । वाढवा सामाजिक वृत्तीचें लेणें । मिरवा सामुदायिकतेचीं भूषणें । लोकांमाजी ॥७७॥
नुसतें श्रीमंत सहकार्य देती । खर्चूनि लक्षावधि संपत्ति । तरी तेवढयाने ही भेदवृत्ति । जाणार नाही ॥७८॥
ओळखोनि श्रमाची प्रतिष्ठा । त्यांनी दावावी कार्यनिष्ठा । श्रमणारांच्या निवारावें कष्टा । स्वत: श्रम करोनिया ॥७९॥
सर्वांनी सर्वांसि पूरक व्हावें । ऐसें धर्माचें सूत्र बरवें । हें काय तुम्हांसि सांगावें ? शहाणे जनहो ! ॥८०॥
त्याअभावीं बिघडली गांव-स्थिति । कोणी जनावरासम राबती । कोणी नाजुक होवोनि फिरती । टोळभैरव ॥८१॥
कोणी म्हणती धनी आम्ही । काय आहे आम्हां कमी ? कमाई केली वडिलें नामी । घरबसल्याचि आमुच्या ॥८२॥
हें तयांचें महाअज्ञान । कळली नाही त्यांना खूण । यापुढे जाईल धन-जमीन । निकष्टिकांची ॥८३॥
न करितां काजकाम । पावेल कोणा जीवा आराम ? सर्व धांवतील होवोनि बेफाम । निकष्टिकांमागे ॥८४॥
म्हणोनि सांगणें उद्योगा शिका । पराधीन राहूं नका । आपुल्या हक्काचा हा पैका । गोडी चाखा तयाची ॥८५॥
आज निकष्टिकांची चालती । उद्या विचारूं नका फजीती । म्हणोनि समजोनि घ्यावी युक्ति । उद्योगाची ॥८६॥
सर्व तर्हेच्या कलाकुसरी । शिकूनि वागावें शहाण्यापरी । पोट भरावयाची उजागरी । तेव्हा लाभे ॥८७॥
हें जंव करितील शिक्षितजन । तेव्हा बंद होतील मजुरांचे वाग्बाण । नाहीतरी ते बेईमान । ठरवितील आपणां ॥८८॥
म्हणतील आम्हीं कष्ट करावे । तुम्ही आरामांत राहावें । सांगतां समानतेने ठेवावें । कोण म्हणेल पुढारी ? ॥८९॥
सर्वांवरि सारखेंच प्रेम । मग सर्वांकरितां एकचि नियम । सर्वांनी करावेत परिश्रम । अपापल्या परींनी ॥९०॥
एकाने करावें काम । दुसर्याने करावा आराम । हें तों आहे हराम । देश-हिताच्या दृष्टीने ॥९१॥
दुनिया आहे कष्टिकांची । जो जो कसेल शेती त्याची । जो काम करील लक्ष्मी तयाची । दासी व्हावी नियमाने ॥९२॥
ऐसी आहे आजची प्रवृत्ति । पाहिजे हेंचि समाजा प्रति । त्यांत थोरांनी तरी खंती । काय म्हणोनि मानावी ? ॥९३॥
विद्वानाने शिक्षिताने । महंताने श्रीमंताने । कष्ट कराया मुद्दाम लागणें । हेंचि मोठेपणाचें ॥९४॥
तेणें सर्वांस होईल सुकर । कामें करितील जन भराभर । लाज जाईल निघोनि पार । वैभवाने निर्मिलेली ॥९५॥
कामांत पडले बुध्दिमान । तेणें प्रत्यक्षांत येईल ज्ञान । शेतीभातीची उन्नति पूर्ण । विकास होईल देशाचा ॥९६॥
एरव्ही उद्योगाविण जें भोगणें । तें मानवासि लाजिरवाणें । आळशासि खाणेंपिणें । देणें असे महापाप ॥९७॥
श्रमाने अंगीं हीनता येते । ऐसें बोलती कोणी एक ते । समजावे देशघातकी पुरते । उपद्रवी पापभक्षी ॥९८॥
आपुलें करावयासि काम । कां वाटावी लाजशरम ? उलट गर्व असावा निस्सीम । कामाचा आपुल्या ॥९९॥
जयास जैसी अभ्यासरीति मानवेल जैसी कार्यपध्दति । घेऊनि तेंचि शिक्षण सुमति । यावें पुढती तयाने ॥१००॥
कामें सर्वचि मूल्यवान । त्यांची योग्यता समसमान । श्रीकृष्णें सिध्द केलें उच्छिष्टें काढून । ओढिलीं ढोरें विठ्ठलें ॥१०१॥
कोणाचीच योग्यता कमी नाही । सर्वचि कामें आवश्यक हीं । म्हणोनि कामाचा बदला सर्वांहि । सारखा असे सामान्यत: ॥१०२॥
एक शेतीकामाचा कामगार । एक बेलदार सुतार लोहार । शिंपी धोबी कुंभार चांभार । सारिखेची उपयुक्त ॥१०३॥
कोणी भंगी-काम करी । कोणी वैद्य नाम घरी । कोणी देवालयीं सक्रिय पुजारी । सारिखेचि उपयुक्त ॥१०४॥
कोणी बुध्दिवंत पुराण सांगे । कोणी चुकलिया लावी मार्गे । जैसी ज्याची योजना निसर्गे । सहजचि केली त्यापरीं ॥१०५॥
परि सर्वांना सर्वांचा आदर । ऐसा असावा जगाचा व्यवहार । कोण ब्राह्मण कोण महार ? कामामाजीं सारिखे ॥१०६॥
येथे कामांत उच्च-नीचता । कोणें ठरवावी व्यवहारत: ? प्रत्येक काम महत्त्वपूर्णता । आपुल्या स्थानीं ठेवितसे ॥१०७॥
आहे सर्वांचीच गरज । सर्वकाळ सहजासहज । एक नसतां जग-जहाज । अपूर्णता दावीतसे ॥१०८॥
दोर घेवोनि साखळीचा । बोझा बांधावा लाकडांचा । एक तुटतां तार कडीचा । सर्व पडे विस्कटोनि ॥१०९॥
तैसी आहे कामांची गति । काम असावें सर्वांप्रति । तरीच जगेल ही क्षिती । सारखेपणीं राबतां ॥११०॥
ज्याचा असेल जो जो बाणा । तो लावावा देश-कारणा । जो असेल ज्या कार्यी शहाणा । तेंचि पुरवावें तयाने ॥१११॥
ज्यासि पुरेल जैशापरी । तैसी भरपूर द्यावी सामुग्री । श्रम करावे आपापल्यापरी । जैसी बळबुध्दि ज्यापाशीं ॥११२॥
ऐसें गांवीं कराल काम । तेणेंच पावेल आत्माराम । लाभेल संतोषाचें निजधाम । नाहीतरि संकट ना टळे ॥११३॥
अरे ! उठा उठा श्रीमंतांनो ! । अधिकार्यांनो ! पंडितांनो ! । सुशिक्षितांनो ! साधुजनांनो ! । हांक आली क्रांतीची ॥११४॥
गांवागांवासि जागवा । भेदभाव हा समूळ मिटवा । उजळा ग्रामोन्नतीचा दिवा । तुकडया म्हणे ॥११५॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरुशास्त्र-स्वानुभव संमत । श्रमसंपत्तिमहत्त्व कथित । सतरावा अध्याय संपूर्ण ॥११६॥
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
**********************
ग्रामगीता अध्याय अठरावा
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
एक श्रोता प्रश्न विचारी । आम्हीं ऐकिलें गीतेमाझारीं । कर्ममय असे सृष्टि सारी । न करतांहि कर्म घडे ॥१॥
सर्वांसचि लागलें कर्म । कर्म हाचि देहाचा धर्म । तेथे काम करावें मुद्दाम । हें बोलणें विपरीत ॥२॥
आपण म्हणतां परिश्रम करा । येणें पोषण होईल अहंकारा । सहज चालेल तोचि बरा । व्यवहार लोकीं ॥३॥
ही श्रोतियाची शंका । भ्रमवीत आली नित्य लोकां । परि ही नव्हे गीतेची भूमिका । निर्भेळ ऐसी ॥४॥
कर्ममय विश्व आहे । कोण रिकामा बसला राहे ? प्रत्येक जण करीतचि जाय । कांहीतरि कर्म ॥५॥
परि त्या कर्माचे अनेक प्रकार । कांही शुध्द निषिध्द मिश्र । कांही विधियुक्त कांही पवित्र । निष्काम कर्म ॥६॥
कांही देहेंद्रियांसाठी । कांही निपजती मनाच्या पोटीं । कांही विवेकबुध्दीने गोमटीं । निपजती कर्मे ॥७॥
कांही कर्मे स्वत:करिता कांही कुटुंबाचीया हिता । कांही कर्मे गांवा लोकांकरितां । सेवाधर्मरूप ॥८॥
आपल्या देहाचें करणें काम । हा कसला आला महाधर्म ? । हें आहे नित्यकर्म । सहजचि घडणारें ॥९॥
तैसेंचि प्रसंगाविशेषें कांही । करणें सणोत्सवादि सर्वहि । त्यांतहि विशेष ऐसें नाही । नैमित्तिक कर्मी ॥१०॥
नित्यनैमित्तिक कर्मे सहज । तीं करणें आवश्यक काज । न करितां विस्कटेल समाज । परि करणें नव्हे महाधर्म ॥११॥
तैसेंचि पोटासाठी करणें काम । हे नव्हेत पुण्यपरिश्रम । उरल्या वेळीं जें सेवाकर्म । त्यासि धर्म बोलती ॥१२॥
तेंचि माणुसकीचें कर्म । जें दुसर्यांसाठी केले श्रम । एरव्ही पशुपक्षीहि करिती उद्यम । आपुलाले ॥१३॥
निषिध्द आणि सकाम कर्म । तैसेचि त्यागूनि अहं-मम । जगासाठी करावेत श्रम । ईश्वरार्पण बुध्दीने ॥१४॥
हेचि गीतेची शिकवणूक । वारंवार निश्चयात्मक । जेणें सर्वेश्वराचें पूजन सम्यक । तेंचि कर्म गीतामान्य ॥१५॥
एरव्ही कामाविण कोणी नाही । हें मजसीहि कळे नि:संशयीं । परि त्यासि काम आज न म्हणों कांही । जें न उत्पादन वाढवी ॥१६॥
जनतारूप जनार्दनाची । ज्यांत सेवा न होई साची । त्यास गीताप्रिय कर्माची । पदवी आम्हीं न देऊं ॥१७॥
आज भरपूर उत्पादन । हेंचि जनसेवेचें साधन । त्यासाठी झटेल जो जो जन । गीता कळली तयासि ॥१८॥
मंदिरीं बैसोनि नाक दाबावें । त्यापेक्षा मार्गींचे कांटे उचलावे । दु:खितासि प्रेमें पाणी पाजावें । हें श्रेष्ठ तीर्थस्नानाहूनि ॥१९॥
एक हात खोदावी जमीन । हें पूजनाहूनि पूजन । परिणाम शेकडों व्याख्यानांहून । अधिक तयाचा ॥२०॥
श्रमिकांस जेणें लाभेल अन्न । तें कर्म श्रेष्ठ यज्ञाहून । एरव्ही गीतेचें नांव सांगून । भलतें समर्थन करूं नये ॥२१॥
एक नौजवान आळसें निजला । म्हणे हेंहि पाहिजे शरीराला । म्हणोनि तो सारखाचि झोपला । फक्त उठला भोजनासि ॥२२॥
भोजन झाल्यावरि पुन्हा पडला । कैसा आवडेल घरच्या लोकांला ? कोणी थट्टामस्करी करूं लागला । म्हणे हेंहि कामचि आहे की ॥२३॥
एक सावकारीचें घाशी लिखाण । एक झगडयाचें चालवी प्रकरण । कोणी उपद्रव करी हातीं धरोन । लोक हरप्रकारें ॥२४॥
असलें काम जरी बंद पडलें । तरी माझ्यामतें कांही न अडलें । परि निर्वाहाचें उत्पादनचि शांतलें । कैसें चालेल जीवन ? ॥२५॥
म्हणोनि सर्वांनी काम करावें । ग्रामाचें धन वाढवावें । येथे गरीब-श्रीमंत न पाहावें । कामासाठी ॥२६॥
श्रीसंत गोरा राबे अंगें । देवहि माती तुडवूं लागे । तेथे श्रीमंत आळसें वागे । हें महापाप ॥२७॥
यावरि बोले एक श्रोता । नाही गरीब मजुरासीच काम पाहतां । बेकारांचा वाढतो जत्था । तेथे श्रीमंतां काम कोठे ॥२८॥
श्रोतियाची ही विचारसरणी । आहे भ्रमाची पोसणी । सारा देश दीन-दरिद्री अज्ञानी । तेथे काम न दिसे तया ॥२९॥
पुन:पुन्हा जन्मा यावें । मातृभूमीसि सुखी करावें । ऐसें थोर म्हणती जीवेंभावें । तेथे काम न दिसे तया ॥३०॥
देशांत कामांचा उभा डोंगर । दारिद्रयदु:खाचा वाहतो पूर । अर्धनग्न अर्धपोटी लोक अपार । त्यांचें दु:ख कां न दिसे ? ॥३१॥
येथे विश्रांतीसि नाही वेळ । निरंतर कार्यकर्ते प्रबळ । पाहिजेत ठायींठायीं सकळ । काम ऐसें देशापुढे ॥३२॥
परि ज्यांना होणें आहे साहेब । लोकांवरि कसावया रुबाब । न कष्टतां इच्छिती आराम खूब । तेचि राहती बेकार ॥३३॥
शिक्षणाचा द्यावा उपयोग । करोनि प्रचार आणि प्रयोग । तंव ते स्वत:चि बनती रोग । समाजाच्या जीवनीं ॥३४॥
एका बाजूने शिक्षित-श्रीमंतांचें । तैसेंचि झालें मजूर-गरिबांचें । शिथिलता आळस दोघांचे । घरीं थाटला दिसताहे ॥३५॥
जेव्हा पोटासि भूक लागे । तेव्हाचि घरोघरीं काम मागे । नाहीतरि आळसा घेवोनि संगें । खुशाल पडे झोपडीमाजी ॥३६॥
सकाळीं आठ वाजतांचें काम पूर्ण । दहा वाजतां उठे घरांतून । नाही कामावरि मन । चुथडा करी कामाचा ॥३७॥
म्हणे श्रीमंतासि काय झालें ? ते काय भिकेसि लागले ? काय होतें काम न केलें । तरी आमुचें नुकसान ? ॥३८॥
कामासाठी हात उचलेना । तोंडीं सारखा वाचाळपणा । मजूरी न देतां धिंगाणा । घालितसे लोकांपाशी ॥३९॥
ऐसें करणें आहे चुकीचें । पैसे कसून घ्यावेत कामाचे । परि कामचुकार होणें हें आमुचें । ब्रीद नव्हे सर्वथा ॥४०॥
मजूर सकाळीं पाहिजे उठला । नित्यविधिकर्मांतून निपटला । घरकाम करोनि निघाला । पाहिजे तत्काळ कामासि ॥४१॥
जेव्हा कामाची वाजेल घंटा । मजूर चालला चारी वाटां । उद्योगांचा चालला सपाटा । ऐसें व्हावें ॥४२॥
मजुरावरीच आहे उत्पादन । उत्पादनचि मुख्य ग्रामाचें धन । तयामाजी करणें कुचरपण । वेडेपणाचें ॥४३॥
मजूर इकडे कार्यनिष्ठा न जाणे । श्रीमंत तिकडे आळशी बने । म्हणोनि झालें कंटाळवाणें । जीवन आता देशाचें ॥४४॥
उत्पादनाची गति खुंटली । उपभोगाची भावना वाढली । काय करील भूमाता भली । मशागत नसतां जमिनीची ? ॥४५॥
यासि सर्वचि असती जबाबदार । शक्ति संपत्ति विचार प्रचार । हें एकहि नाही ताळयावर । म्हणोनि ग्राम ओसाडलें ॥४६॥
श्रीमंतां आपुलें न वाटे काम । गरीबा उत्पादनाचें नाही प्रेम । शिक्षितां हीन वाटतो परिश्रम । यानेच आली शिथिलता ॥४७॥
ऐसें न व्हावें आता पुढती । सर्वांनी सुधारावयास पाहिजे मति । म्हणोनि आहे माझी विनंति । सकळांप्रति आग्रहाची ॥४८॥
जें जें ज्याचेनि काम बने । त्याने तें सेवा म्हणोनि साधणें । आपुलेंहि बरें करणें । गांवासि होणें भूषणावह ॥४९॥
जो जो पोटापाण्याचें काम न करी । उत्पादनासि ना सुधारी । त्यास विरोध करावा, विचारी । माणसाने गांवाच्या ॥५०॥
श्रमनिष्ठेचा करावा प्रचार । सर्वांस आपुलकी वाटे पुरेपूर । ऐसी व्यवस्था करावी सुंदर । गांवचें उत्पादन वाढवोनि ॥५१॥
गांवचें वाढवाया उत्पन्न । गांवीं कराया नवनिर्माण । काय करावें ऐसा प्रश्न । वारंवार ऐकूं येई ॥५२॥
त्यासि उपाय हाचि प्रथम । कामगार करिती जे श्रम । त्यांची शक्ति वांचे तिला काम । द्यावें सहायक दुसरेंहि ॥५३॥
आणि इतरांचा वेळ कितीतरी । जाई व्यर्थचि गांवीं घरीं । कामीं लावितां तो निर्धारीं । काया पालटेल गांवाची ॥५४॥
कच्ची सामुग्री गांवच्या भागीं । ती पुरेपूर आणावी उपयोगी । शोध करोनि नाना प्रयोगीं । माती करावी सोन्यासम ॥५५॥
अन्य देशींच्या तरुणांसि वेड । नित्य नवें संशोधन प्रचंड । तैसी धुंद चढावी अखंड । गांवच्या शिक्षित तरुणां ॥५६॥
गांवचे कलावंत निपुण । त्यांना द्यावें उत्तेजन । नवनव्या वस्तु कराव्या निर्माण । उपयोगाच्या जीवनासि ॥५७॥
उद्योगें यंत्रेंहि निर्मावी । परदेशा भीक न मागावी । आपणचि करोनि भोगावीं । वैभवें सारीं ॥५८॥
चरखाटकळी पासून उद्योग । अन्न धान्यादिकांचे प्रयोग । घरेदारें सर्व सुयोग । आपणचि निर्मावे ॥५९॥
प्रत्येक घरीं जोडधंदा । सर्व स्त्रीपुरुष याचि छंदा । दूर करावया आपदा । जीवनाच्या लागावे ॥६०॥
कोणी पिशव्या कोणी नवारी । कोणी खादी विणतो घरीं । कोणी चपला चामडियाच्या करी । मेल्या जनावरांच्या ॥६१॥
कोणी चटया कोणी आसनें । कोणी खुर्च्या कोणी खेळणें । कोणी बादल्या पलंग गोणे । साबणहि घरीं करीं ॥६२॥
कोणी सुंदर मडकें घडवी । कुंडया फुल-पात्रें बरवीं । कोणी कवेलू मजबूत दावी । करोनिया सुंदरसें ॥६३॥
कोणी सुंदर विटा करी । कोणी फाडी फोडी बरी । सर्व हे आपापल्या परीं । घरोघरीं कार्यरत ॥६४॥
कोणी बैलांचा साज करी । कोणी रंग शोधी परोपरी । प्रत्येकजण कांहीतरी । करितचि आहे ॥६५॥
ऐसें हें सर्व गांव । जोडधंद्यांनी भरीव । जराहि नाही उणीव । कोणेपरी कोठे ॥६६॥
ऐसी असावी कलाकुसरी । उद्योगधंदे घरोघरीं । जराहि न दिसेल बेकारी । वाढली कोठे ॥६७॥
त्यासचि म्हणावी सुंदर कला । एरव्ही अवकळेची धर्मशाला । उसणें आणोनि सजविला । आपुला नवरदेव ॥६८॥
जो जो धंदा गांवीं नसला । प्रोत्साहन मिळावें त्या कार्याला । परि तो पाहिजे योग्य ठरला । गांवाच्यासाठी ॥६९॥
गांवचे उद्योग मागासले । त्यांस शिक्षणाने पुन्हा उजळिलें । ऐसें असावें सुधारलें । गांव आमुचें ॥७०॥
नसतील त्या वस्तु निर्माव्या । येत नसतां शिकोनि घ्याव्या । घरोघरीं त्याच दिसाव्या । गांवच्या वस्तु ॥७१॥
आपुल्या गांवीं जे जे होते । आपणचि वस्तु वापरावी ते । तेणें गांवींचें धन गांवींच राहतें । शक्ति वाढते गांवाची ॥७२॥
चांभार गांवीं उपाशी मरे । जोडयासाठी शिक्षित शहरीं फिरे । केवढी गांवाची कदर करणारे । बुध्दिमंत हे ! ॥७३॥
गांवीं विणकर फुटाने फाकती । यासि हवी मलमलची घोती । वा रे यांची देशभक्ति ! गांव मारिती शौकासाठी ॥७४॥
कोणी म्हणती आमुचा पैसा । आम्ही खर्चू हवा तैसा । गांव-द्रोही समजावा ऐसा । आपस्वार्थी मानव ॥७५॥
गांवचे कलावान मागासले । म्हणोनि न पाहिजे उपाशी मारिले । बाह्य वस्तूंनी आपणचि सजले । भूषण नव्हे दूषण तें ॥७६॥
देशांत एकटा ताजमहाल । त्यावरूनि न ठरे देशाचा हाल । घरोघरीं लोक जरि कंगाल । तरि तें मोजमाप कशाचें ? ॥७७॥
गांवीं एक कुस्तीगीर महान । आणि बाकीचे लकडी पहेलवान । तरी तें गांव शरीरबलाने पूर्ण । म्हणतां नये कधीहि ॥७८॥
मोजके थोरपुरुष होऊनि जाती । इतरांची पातळी नयेचि वरती । तंव ती समाजाची प्रगति । कैसी म्हणावी जाणत्याने ? ॥७९॥
यासाठी प्रत्येक घटक सज्ञान । पाहिजे निरोगी उद्योगी संपन्न । तरीच तें गांव आदर्शाचें भूषण । मिरवूं शके ॥८०॥
म्हणोनि प्रत्येकाने आपुल्या गांवीं । ग्रामीण वस्तूंना चालना द्यावी । त्यांत सुधारणाहि घडवावी । उन्नति व्हाया कलावंतांची ॥८१॥
ऐसे सर्वचि उद्योगधंदे । चालवावेत गांवींच आनंदें । नांदावेत सकळ लोक स्वच्छदें । सुखसमाधानें ॥८२॥
गांवीं असावें वस्तुप्रदर्शन । आपुल्याच गांवीं झालें निर्माण । बीं बियाणें, शेती-उद्योग-सामान । तयामाजीं ठेवावे ॥८३॥
खेळणीं लेणीं जीवनोद्यमें । लाकडी लोहारी बेलदारी कामें । कुंभारी, विणकरी, उत्तम चर्मे । असावीं तेथे ॥८४॥
असावें सुंदर एक घर । त्यामाजीं वस्तू विविध सुंदर । आम्हींच निर्मिलेल्यांचा भर । असावा तेथे ॥८५॥
गांवीं जें मालधन निर्माण होतें । बघावया लोकांनी यावें तेथे । योग्य किंमती देवोनि तें तें । घ्यावें सामान तयांनी ॥८६॥
गांवीं असावी उद्योग-समिति । जी सतत करील उद्योग-उन्नति । गांवाचें आर्थिक जीवन हातीं । घेवोनि लावील सोय जी ॥८७॥
गांवचिया धनिकांकडोनि । संपत्तीचा वांटा मिळवोनि । सर्वांच्या हितासाठी रात्रंदिनीं । उपयोग करावा तयाचा ॥८८॥
कांही असती जमीनदार । तेचि गांवचे अर्थभांडार । त्यांना सर्व कारभार । सोपवाया लावावा मजूरांवरि ॥८९॥
किंवा धनिक जरी ना वळे । शेतकरी-मजुरांच्याचि बळें । थेंबें थेंबें साचवावें तळें । त्यांच्या अल्प ठेवींचें ॥९०॥
त्यांतूनि निर्माण करावा वस्तुसंग्रह । सर्वांना उपयोगी भांडारगृह । सर्वां मिळोनि चालवावें नि:संदेह । दुकान सर्व वस्तूंचें ॥९१॥
त्यांत असावी सर्वांची मालकी । हुशार किसानांची ठेवावी चालकी । सर्वांच्या अनुमतीने व्यापार-एकी । करावी गांवीं ॥९२॥
एक असावें धान्यभांडार । चालावया गांवचे व्यवहार । त्यांत असावे सर्व जनतेचे शेअर । सोयीसारखे ॥९३॥
प्रसंगीं त्यांतूनचि धान्य न्यावें । सर्वांमिळोनि कर ठरवावे । प्रसंगीं सर्वांनी वाटून घ्यावें । उत्तम रीतीं ॥९४॥
त्यांतूनचि करावी गांवची सेवा । उणीव पडेल ज्या कष्टी जीवां । अथवा ग्रामसुधारणेस लावावा । वाढवा त्याचा ॥९५॥
गांवीं चालते सवाई-दिढी । त्यास याने बसेल अढी । ग्रामनिधीची उघडतां पेढी । थंडावेल व्यापारी-सावकारी ॥९६॥
गांवीं आवश्यक तेलघाणी । शुध्द तेलादिकांची निशाणी । गांवचीं कामें सर्व मिळोनि । गांवींच करावीं उपयुक्तशीं ॥९७॥
उद्योगहीनांना उद्योग द्यावे । कामें देवोनि सुखी करावें । आपणासमान पाहिजे बरवें । केलें त्यांसि सुखवस्तु ॥९८॥
काम ज्याने ज्याने करावें । त्याने हक्कानें पोटभरि खावें । लागेल तेवढें मागावें । हें तों आहे प्रामाणिक ॥९९॥
जयास न मिळे कामधाम । त्याने समितीस सुचवावें नाम । ग्रामसेवाधिकारी उद्यम । देईल त्यासि ॥१००॥
काम देणें कर्तव्यचि त्याचें । जमा असतील फंड गांवाचे । त्यांतूनि पुरवावें मोल कामाचें । उपयोगी ऐशा ॥१०१॥
मजुरा मजुरी पूर्ण द्यावी । जेणें मुलेंबाळें सुखें जगवी । तैसींच उत्पन्ने वाढवोनि घ्यावीं । गांवामाजीं ॥१०२॥
याने सर्वांस मिळेल सुख मिटेल जीवनाची भूक । ग्रामराज्य होईल सुरेख । आर्थिकतेने समृध्द ॥१०३॥
यास्तव श्रीमंत शिक्षित हुद्देदार । कलावंत शेतकरी कामगार । सर्वांनी मिळोनि ग्रामोध्दार । करावा ग्रामोद्योगांनी ॥१०४॥
शहराकडे चालला प्रवाह । तो थांबवाया नि:संदेह । सर्वांचा गांवींच होईल निर्वाह । ऐसी योजना करावी ॥१०५॥
खेडेंचि शहराचें जनक । शहर भोवतें खेडें उत्पादक । शहराकडे न जातां लोक । धावावे उलट खेडयाकडे ॥१०६॥
ऐसी करावी ग्रामसेवा । हेंचि कर्म आवडे देवा । संशय कांही मनीं न धरावा । तुकडया म्हणे ॥१०७॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरुशास्त्र-स्वानुभव संमत । ग्रामोद्योगांचा कथिला तत्त्वार्थ । अठरावा अध्याय संपूर्ण ॥१०८॥
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
********************
ग्रामगीता अध्याय एकोणीसावा
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
श्रोतियाने केला प्रश्न । खेडें शहराहूनि महान । ऐसें म्हणतों आपण जन । परि एक खूण न विसरावी ॥१॥
शहरांत आहे उच्च शिक्षण । तें खेडयांत पावेल कोण ? कोणी आला जरी शिकोन । तरी येथे होतो गावंढळ ॥२॥
नगरामाजीं नागरचि होइजे । यासाठी शहरचि विद्यार्थ्यां पाहिजे । खेडयामाजीं नांगरचि वाहिजे । ऐसें होतें ॥३॥
ऐका ऐसी जयांची भावना । लक्ष द्यावें त्यांनी या वचना । येथे शिक्षणाची मूळ कल्पना । तीच चुकली आपुली ॥४॥
दिखाऊ कपडे कोरडी ऐट । नोकरपेशी थाटमाट । हें शिक्षणाचें नव्हे उद्दिष्ट । ध्यानीं घ्यावें नीट हें आधी ॥५॥
अजब ऐसी शिक्षणाची प्रथा । जेथे कामीं नये बापाची संथा । बाप करी शेतीची व्यवस्था । मुलगा मागे नोकरी ॥६॥
व्हावें मोठे बाबूसाहेब । काम जुजबी पैसा खूब । मोठी पदवी दिखाऊ ढब । ही उच्चता म्हणोंचि नये ॥७॥
हें सर्व मागील विसरोन । मुलामुलींना द्यावें शिक्षण । जेणें गांवाचें वाढेल भूषण । सर्वतोपरीं ॥८॥
नुसतें नको उच्च शिक्षण । हें तों गेलें मागील युगीं लपोन । आता व्हावा कष्टिक बलवान । सुपुत्र भारताचा ॥९॥
शिक्षणांतचि जीवनाचें काम । दोन्हींची सांगड व्हावी उत्तम । चिंता नसावी भोजनासाठी दाम । मागण्याची भीक जैसी ॥१०॥
मुलांत एखादा तरी असावा गुण । ज्याने पोट भरेल त्यांत निपुण । नये संसारामाजी अडचण । कोणत्याहि परी ॥११॥
जीवनाच्या गरजा संपूर्ण । निर्वाहाचें एकेक साधन । संबंधित विषयांचें समग्र ज्ञान । यांचा अंतर्भाव शिक्षणीं ॥१२॥
नदी तलाव आणि विहिरी । यांत पोहणें नानापरी । आपत्ति येतां धावोनि तारी । ऐसें शिक्षण असावें ॥१३॥
गांवीं भोजनाचे असती प्रसंग । स्वयंपाक करतां यावा यथासांग । हेहि कला शिकवावी सप्रयोग । मुलांमुलींसि ॥१४॥
असलें शिक्षण वाटतें साधारण । परि याचें जीवनांत अग्रस्थान । नाहीतरि जगावें जनावरासमान । होईल स्वयंपाक न येतां ॥१५॥
मुलगी बहु शिकली शाळेमाझारीं । परि स्वयंपाक करतां नये घरीं । काय करावी विद्याचातुरी ? कामाविण लंगडी ती ॥१६॥
अशिक्षित स्वयंपाक करोनि खाई । सुशिक्षित चणे फाकीत राही । दोरास घालता नये वंधाहि । जेथे तेथे पराधीन ॥१७॥
मुलास पंगत वाढतां नये । घरचें पाणी भरतां नये । आपुल्याच तोर्यामध्ये राहे । तरि तें व्यर्थ ज्ञान त्याचें ॥१८॥
घरीं ज्याची उणीव पडे । मुलगा धावोनि पुरवी कोडें । धडाडीने कर्म करण्या धडपडे । तरीच शिक्षण कामाचें ॥१९॥
विद्येअंगीं व्हावा विनय । विद्या करी स्वतंत्र निर्भय । शिक्षणाने वाढावा निश्चय । जीवन-जय करावया ॥२०॥
याचसाठी शिक्षण घेणें । कीं जीवन जगतां यावें सुंदरपणें । दुबळेपण घेतलें आंदणें । शिक्षण त्यासि म्हणों नये ॥२१॥
गांवावर आली गुंडांची धाड । विद्यार्थी दारें लाविती धडाधड । वाडवडिलांच्या अब्रूची धिंड । काय शिक्षण कामाचें ? ॥२२॥
म्हणोनि पाहिजेत बलवान मुलें । कुस्ती मल्लखांब खेळणारे भले । धडाडीने प्रतिकारार्थ धजले । तरीच शिक्षण उपयोगी ॥२३॥
ऋषिकालीन ऐसी प्रथा । शिक्षणांत होती जीवन-संथा । याकरितां आश्रमांची व्यवस्था । होती पूर्वी ॥२४॥
धनुर्विद्या मल्लविद्या । आयुर्वेद आणि शस्त्रास्त्रविद्या । उत्तमोत्तम चौदा विद्या । शिकवीत होते आचार्य ॥२५॥
चित्रकला चर्मकला । रांगोळियांचीहि उत्तम कला । बुरडकाम कुंभारकामादि सकला । चौसष्ट कला नानापरी ॥२६॥
संगीतशास्त्र स्वयंपाकशास्त्र । गृह स्थापनेचें सुंदर तंत्र । अश्वपरीक्षा रत्नपरीक्षादि समग्र । जीवनविद्या शिक्षणीं ॥२७॥
ऐसी प्रथा पूर्वी होती । आता उच्च ज्ञान घेवोनि येती । परि गांवची न सुधारवे शेती । गांवच्या उपलब्ध साधनांनी ॥२८॥
शिक्षण झालें वैभवस्थानीं । मग गांवचें जीवन न बसे मनीं । उच्च ज्ञान आणावें साध्या जीवनीं । कैसें तेंहि कळेना ॥२९॥
त्यापेक्षा उच्च ज्ञानाचीं विद्यालयें । गांवींच आणावीं निश्चयें । जीं ग्रामजीवन सजवितील चातुर्ये । शिकवोनि जना ॥३०॥
मुलांना शिकवाव्या नाना कला । चापल्य ध्येयनिष्ठादि सकला । गांवचि सांभाळूं शकेल आपुला । ऐसें द्यावें शिक्षण ॥३१॥
गांवासि कैसें आदर्श करावें । याचेंचि शिक्षण प्रामुख्यें द्यावें । सक्रियतेने करावयासि लावावें । विद्यार्जनीं ॥३२॥
सहकार्याची प्रबल भावना । हेंचि शिक्षणाचें मुख्य सूत्र जाणा । सहकार्यावाचोनि शिक्षणा । महत्त्व नाही ॥३३॥
व्हावें परस्पराशीं पूरक । हेंचि आहे शिक्षणाचें कौतुक । व्यक्तिनिष्ठतेने भयाण दु:ख । मानव-जीवनीं ॥३४॥
जनसेवेचें प्रमाणपत्र । त्यासि महत्त्व यावें सर्वत्र । उद्याचें राष्ट्र आजचे कन्यापुत्र । समजोनि त्यांना सुधारावें ॥३५॥
गांवचें सर्वांत मुख्य पुत्रधन । त्याचें संरक्षावें चरित्रधन । तेणें गांवाचें वाढेल महिमान । चारित्र्यापरी उज्ज्वल ॥३६॥
आपणांसि वाटे जैसें गांव व्हावें । तैसेंचि बालकांना शिकवावें । शहाणे करोनि सोडावे । विद्याशिक्षणें सर्वचि ॥३७॥
बाळपणींच शिक्षण होई । वय झालिया त्रास जाई । वळविल्याहि न वळती कांही । इंद्रियें त्यांचीं ॥३८॥
मग तो राही आंगठाछाप । कोणीहि त्याला द्यावी थाप । आयुष्यभरी कष्ट-संताप । भोगीतसे आंधळयापरी ॥३९॥
त्यासि बंद उन्नतीचीं द्वारें । आयुष्य जाय हमालींत सारें । किसान परि कळेना गोजिरें । शेतीचेंहि नवें ज्ञान ॥४०॥
नाही अवजारांत सुधारणा । सुधारूं न शके पिकें नाना । घाण्याच्या बैलापरी धिंगाणा । जीवनाचा त्याच्या ॥४१॥
वडिलाने मुलगा नाही शिकविला । तोहि पापांचा भागीदार झाला । जैसें जन्म देणें कर्तव्य त्याला । तैसेंचि शिक्षण देणें अगत्याचें ॥४२॥
जरि आपुल्याने व्यवस्था नव्हे । तरि देशोध्दारक संस्थेसि सोपवावें । परि मुलास पतित न ठेवावें । अशिक्षितपणें कधीहि ॥४३॥
आईबापांनी अंगावरि । मुलें ठेवूं नयेत निरंतरी । सोपवावीं बालकांच्या विद्यामंदिरीं । रक्षक असतील जे त्यांना ॥४४॥
जन्म देण्याचें काम मातापित्यांचें । शिक्षणाचें काम विद्यागुरूंचें । तेथे आसक्तीने पुत्रधन देशाचें । बिघडवूं नये लाडवोनि ॥४५॥
आईबापांचा प्रेमळ चाळा । पुरवी लहान मुलांचा आळा । मुलगा होतो ठोंब्या-भोपळा । अतिलाडाने निकामी ॥४६॥
हें तों विद्यागुरु साहेना । अथवा शिक्षिका चालूं देईना । मुलांस वळवावें कैसें त्यांना । माहीत असतें मानसशास्त्र ॥४७॥
म्हणोनि सर्व गांवाने मिळून । काढावें शिशुसंगोपन । बाईबुवास शिक्षण देऊन । नेमावें त्या कार्यासि ॥४८॥
असावें गांवींच विद्याभुवन । बालोद्यान शिशुसंगोपन । मुलें बाळपणींच त्यांत ठेवोनि । वळण द्यावें साजेसें ॥४९॥
आईबापांस फुरसत नाही । कामास जातां अडचण येई । मुलाबाळांची आबाळ होई । हें सर्व मिटे विद्याश्रमें ॥५०॥
याचेंचि त्यांना असावें शिक्षण । कैसें करावें बालसंगोपन । आपलें काम द्यावें नेमून । मुलामुलींना कैशापरी ॥५१॥
कोठेहि मुलांना लहानपणीं । व्यसनें लागूं न द्यावीं कोणी । लागतांचि घ्यावी झाडणी । शिक्षकां-पालकांची ॥५२॥
नाहीतरि एककल्ली । शिक्षण घेवोनि वृत्ति केली । आपण फसोनि दुसर्यांचीं फसविलीं । मुलेंबालें, ऐसें न हो ॥५३॥
म्हणे मी शिक्षणकार्यी लागलों । पवित्र गुरुजी मुलांचा झालों । परि व्यसनांचा अवतार बनलों । म्हणोनि मना धिक्कारीना ॥५४॥
मुलांस म्हणे सद्वर्तनी राहा । आपण बिडी पिण्यांत वाजवी दहा । मग उष्णतेने बोलतो पहा । साजरा रेलगाडीपरी ॥५५॥
ओळखोनि गांवाची जबाबदारी । शिक्षक जिव्हाळयाने काम करी । तरीच गांव होय स्वर्गपुरी । न पडे जरूरी कोणाची ॥५६॥
घरींदारीं उत्तम पाठ मिळे । जें जें पाहिजे तें तें कळे । तरीच गुरुजनांचा आशीर्वाद फळे । काम केल्या विकासाचें ॥५७॥
जीवन-विकासाचें शिक्षण । गांवींच असावें सर्वसंपन्न । आपुल्याचि ग्रामरचनेचें आयोजन । शोभवाया शिकवावें ॥५८॥
पाठशाळा असावी सुंदर । जेथे मुलीमुलें होती साक्षर । काम करावयासि तत्पर । शिकती जेथे प्रत्यक्ष ॥५९॥
सुंदर गाणें बोलणें वागणें । टापटिपीने घरीं राहणें । आपलें काम आपण करणें । शिकवावें तयां ॥६०॥
ऐसें करितां होईल प्रगति । मुलें उत्तम विद्यार्थी बनती । थोरथोर उद्योगधंदेहि शिकती । पुढे पुढे ॥६१॥
विद्यार्थी कार्याने सुरवात करी । त्यांतचि गणितशास्त्रादि सांवरी । नाहीतरी वाचनपठणचि परोपरी । कांही करवेना अंगाने ॥६२॥
म्हणोनि अभ्यासाबरोबरी । सक्रिय करूं द्यावी तयारी । मुलगा सर्व कामें करी । जीवनाचीं आपुल्या ॥६३॥
तो पुढे ज्यांत दिसे निष्णात । त्या विद्येचा घेऊं द्यावा अंत । होऊं द्यावें अभ्यासें संशोधनांत । गर्क त्याला ॥६४॥
ऐसें जीवन आणि शिक्षण । यांचें साधावें गठबंधन । प्रथमपासूनचि सर्वांगीण । शिक्षण द्यावें तारतम्यें ॥६५॥
जीवनाचें प्रत्येक अंग । शिकवावा महत्त्वपूर्ण उद्योग । काम करावायची चांग । लाज नसावी विद्यार्थ्या ॥६६॥
मुलगा वरोनि दिसे शिक्षित । काम करतांहि दिसे निष्णात । कामाची लाजचि नाही ज्यांत । जन्मास आली ॥६७॥
करितो शेताचें निंदण । उपणणें, उतारी, नांगरण । शेण काढावयासहि उत्सुक मन । दिसे जयाचें ॥६८॥
सर्व तर्हेचा उद्योगधंदा । कराया लागला मुलगा छंदा । वाढला अभिमान गांवचा बंदा । तयार झाला म्हणोनिया ॥६९॥
ऐसी घ्यावी गांवें काळजी । मुलांच्या अज्ञानपणामाजीं । तरीच गांवाचा उत्कर्ष सहजीं । होईल तेणें ॥७०॥
अवधी धरला अठरा वर्षांचा । पांग फेडील हजारो पिढयांचा । नमुना बनेल उत्तम गांवाचा । विद्यार्जनें ॥७१॥
जीवनाचें उज्ज्वल अंग । मुलें शिकतील होवोनि दंग । वाढेल गांवाचा रागरंग । म्हणाल तैसा ॥७२॥
आजचे सान सान बाल । उद्या तरुण कार्यकर्ते होतील । गांवाचा पांग फेडतील । उत्तमोत्तम गुणांनी ॥७३॥
म्हणोनि म्हणतों बालधन । ठेवा गांवकर्यांनो ! जपून । कोण सांगेल निघतील रत्न । किती गांवीं ॥७४॥
ईश्वराचें जन्म देणें । आईबापासि निमित्त करणें । विद्यागुरूंचें शिकवणें । भाग्य बने गांवाचें ॥७५॥
या कोवळया कळयांमाजीं । लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी । विकसतां प्रकटतील समाजीं । शेकडो महापुरुष ॥७६॥
कितीक होतील सेवाभावी । कित्येक चतुर कलावैभवी । उद्योगधंद्यांनी रंगवी । ग्रामासि आपुल्या ॥७७॥
कित्येक निर्मितील यंत्रागार । कित्येक होतील इतिहासकार । कित्येक होतील सल्लाचतुर । गांवीं आपुल्या ॥७८॥
कित्येक होतील राजकारणी । कित्येक होतील तत्त्वज्ञानी । कित्येक देतील भूषण मिळवोनि । क्रीडांगणीं गांवासाठी ॥८०॥
कित्येक संत-उपदेशक । कित्येक वीर-संरक्षक । कित्येक व्यापारनिपुण, सेवक । हरकामी ऐसे ॥८१॥
ऐसा हा साजेल गांव-संच । सर्व गुणांचा आदर्श उच्च । कोणी न दिसेल जीव नीच । आपुल्या गांवीं संस्कारें ॥८२॥
गांवचें राज्य गांवचि करी । कोणाचीच न चाले हुशारी । आमुचे आम्हीच सर्वतोपरीं । नांदूं गांवीं ॥८३॥
प्रेमें सर्वचि करूं सेवा । जेणें सर्व गांवासि लाभ बरवा । मग ऐसा कोण उरेल ठेवा । जो न लाभे खेडयामाजीं ? ॥८४॥
खेडयांत उपजले ज्ञानेश्वरादि । काय उणी त्यांची बळबुध्दि ? श्रीकृष्ण आणि महात्मा गांधी । हालवी सूत्रें खेडयांतूनि ॥८५॥
म्हणोनि मित्रहो ! ऐका निश्चिती । गांवींच मुलांचें शिक्षण घ्या हातीं । पांग फिटेल जन्मजातीं । सुखी होतील सकळ जन ॥८६॥
कोणी म्हणती जातचि मूर्ख । मुलें कैसी निघतील चलाख ? कांही जाती मुळांतचि चोख । हुशार असती शिक्षणीं ॥८७॥
ही कल्पनाहि चूक असे । भेद मुळामाजीं नसे । तो परंपरागुणें भासे । वातावरणाच्या योगें ॥८८॥
एकाचा बाप न्यायाधिकारी । काका करतो प्रोफेसरी । मामा कथाकीर्तन करी । मग तो हुशार कां नोहे ? ॥८९॥
भोवती बुध्दिवंतांचा मेळावा । खावया सत्त्वशील मेवा । घरींदारीं सहवास बरवा । त्याची उन्नति सहजचि ॥९०॥
बाप गुराखी आणतो मोळी । चुलता विकतो बांगडयाचोळी । मामा सरकारी नोकरी सांभाळी । परि तो शिपाई-चपराशी ॥९१॥
खावयासि कळणाकोंडा । संगतीस ढोरांचा तांडा । परि तो अभ्यासें पुढे जाय थोडा । तरी कौतुक कां न करावें ? ॥९२॥
त्याला सहवास उत्तम द्यावा । दर्जा जीवनाचा वाढवावा । त्याने समाज होईल नवा । ज्ञानवंतांचा निर्माण ॥९३॥
हें होण्यास पाहिजे शिक्षण । शिक्षणाशिवाय व्यर्थचि भाषण । हें कळेल तेव्हाचि जन । सुशिक्षित होतील ॥९४॥
नाहीतरि पूर्वजांनी मूर्खपण केलें । तें मुलाबाळांस भोगणें आलें । लौकरि सुधारेना एकदा चुकलें । दोष चाले कुळीं सार्या ॥९५॥
घराण्यांत एकाने पाप करावें । पिढीजात पुढेहि तेंचि भोवे । ऐसें चालू आहे हें स्वभावें । लोकांमाजीं ॥९६॥
मागील कलंक धुण्यासाठी । पुढे घडावें पुण्य गांठीं । तरीच सुटते बदनामी पाठी । लागलेली सारी ॥९७॥
एकाने सदगुण आचरिले । नांव त्याचें दिगंतरीं गेलें । पुढे पुत्र वांढाळ झाले । तरी कीर्ति मुरेना ॥९८॥
खपती सारे मागील नांवें । जो तो म्हणे वडिलांस बघावें । कीर्तिवंत झाले पूर्वज बरवे । घराण्यामाजीं ॥९९॥
परि त्याहूनि घडलें पाप अधिक । नांवाचा वाजा झाला आणिक । मग न विचारी मागील कौतुक । काय झालें कोणीहि ॥१००॥
चाले तीच परंपरा । जोंवरि विशेष न घडे पुत्रपौत्रां । ऐसीच आहे नामयात्रा । इहलोकींची ॥१०१॥
एक एकवीस कुळें उध्दरितो । एक बेचाळीस कुळें बदनाम करतो । सारांश, विशेष घडल्यावरीच होतो । पालट नांवा ॥१०२॥
रावण पवित्र ब्रह्मकुळींचा । राक्षस ठरे वंशचि त्याचा । विश्वमित्र राजर्षीचा । ब्रह्मर्षि होय विशेषत्वें ॥१०३॥
ऐसा विशेष कृतीचा महिमा । जाणोनि करावें परिश्रमा । उध्दरावें आपल्या कुळा ग्रामा । शिक्षण देवोनि नेटाने ॥१०४॥
गोरगरीबांचीं मुलें असती । ज्यांसि नाही शिक्षणाची शक्ति । त्यांसि सरकार वा जनपदाहातीं । देवोनि शिक्षण पुरवावें ॥१०५॥
असतील भिकार्यांचीं मुलें । शिक्षण देवोनि करावे चांगले । पुण्य लाभेल पांग फेडले । त्यांचे म्हणोनि गांवासि ॥१०६॥
असोत गरीब किंवा धनिक । मुलांस विद्या शिकवाव्या अनेक । गांवाने संपत्ति पुरवावी अधिक । याच मार्गी ॥१०७॥
यांतचि वेचावें खूप धन । करावें पूर्वजांचिया नांवाने दान । विद्यालयें झालिया पवित्र संपन्न । गांव होईल स्वर्गपुरी ॥१०८॥
आदर्श होतील विद्यार्थीगण । गांवाचें पालटेल जीवन । कोठेच न उरेल गावंढळपण । टिकाऊ परिवर्तन या मार्गे ॥१०९॥
विद्यामोलें ऐसें चढतां । येईल भाग्य गांवाचे हातां । तुकडयादास म्हणे तत्त्वता । विसरूं नका हा मूळमंत्र ॥११०॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । कथिला सर्वोन्नतीचा विद्यार्जनपथ । एकोणिसावा अध्याय संपूर्ण ॥१११॥
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
*************************
ग्रामगीता अध्याय विसावा
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
ग्रामोन्नतीचा पाया शिक्षण । उद्याचें राष्ट्र आजचें संतान । यासाठी आदर्श पाहिजेत गुरुजन । राष्ट्रनिर्माते ॥१॥
विद्यागुरुहूनि थोर । आदर्श मातेचे उपकार । गर्भापासोनि तिचे संस्कार । बालकांवरि ॥२॥
जिच्या हातीं पाळण्याची दोरी । तीच जगातें उध्दरी । ऐसी वर्णिली मातेची थोरी । शेकडो गुरुहूनिही ॥३॥
मातेच्या स्वभावें पुत्राची घडण । त्यास उज्ज्वल ठेवी तिचें वर्तन । स्त्रीच्या तेजावरीच पुरूषाचें मोठेपण । ऐसें आहे ॥४॥
म्हणती जरी बाप तैसा लेक । परि माऊलीचें महत्त्व अधिक । मातृशक्तीनेचि वाढती सकळीक । मुलें चारित्र्याने ॥५॥
पुरूष सर्वकाहीं करी । परि बांधला राहे घराबाहेरी । सर्व विचार घेवोनि आचरी । तरीच शांति त्यासहि लाभे ॥६॥
उत्तम महिला हेंचि करी । आपुलें घर ब्रीदासह सावरी । मूलबाळ आदर्श करी । वरि प्रेमळपण सर्वांशीं ॥७॥
याच गुणें मातृदेवो भव । वेदाने आरंभीच केला गौरव । नररत्नांची खाण अपूर्व । मातृजाति म्हणोनिया ॥८॥
प्रल्हादाची कयाधु आई । छत्रपतींची जिजाबाई । कौसल्या देवकी आदि सर्वहि । वंदिल्या ग्रंथीं ॥९॥
कांही पुराणीं सांगितली दीक्षा । करावी स्त्रीजातीची उपेक्षा । ती होती साधनाची शिक्षा । सर्वतोपरीं ॥१०॥
वियोगाने वैराग्य दृढ करावें । मन इंद्रियसुखांतूनि परतवावें । म्हणोनि विषयप्रवृत्तीचे गोडवे । निषेधिले त्यांत ॥११॥
वैराग्यांत न कथिलें दोषविरोधा । नसली साधनांत आपदा । कीर्तीत नसली कांही निंदा । तरि पूर्ण नोहे साधन ॥१२॥
म्हणोनि इंद्रिय-विषय-दोषदर्शन । देहाचें नश्वरत्व ओंगळपण । हें वैराग्यार्थ केलें कथन । व्यक्तिनिंदा नव्हे ती ॥१३॥
जेथे जेथे मन मोहूनि धावे । तेथूनि त्यास परतवोनि लावावें । लहान मुलापरी सांगावे । छीः छीः ऐसें म्हणोनि ॥१४॥
हें पुरुषास कथिलें स्त्रियेसाठी । तोच भाव पुरुषाविषयीं तिचें पोटीं । तेथे कवणाची तुच्छता मोठी ? छीः छीः विषयांसि शास्त्र म्हणे ॥१५॥
परि छीः छीः नेहमीच म्हटलें । तरि पालनपोषणचि बिघडलें । संसारचक्रचि थांबोनि गेलें । त्यांतूनिहि फुटती हीन मार्ग ॥१६॥
म्हणोनि विधीने सेवन उचित बोलिंलें । महिलेविण विश्व न चाले । काय होतें पुरुषाने केलें ? अभद्र झालें घर सारें ॥१७॥
घरचा उत्तम कामधंदा । हें महिलेचेंचि लक्षण सदा । आलिया-गेलियासि आपदा । महिला असतां न वाटे ॥१८॥
खस्ता सोसूनि परिचर्या । प्रेमळपणें बारीक कार्या । करूं जाणती उत्तम भार्या । न कंटाळतां काळजीने ॥१९॥
पुरुष-हृदया नाकळे जेवढें । स्त्रियेचें समजणें तितुकें गाढें । तियेच्या भावनागंगेचे पवाडे । वर्णिले न जाती माझ्याने ॥२०॥
सर्वांगीण एकतानता । तिजसीच घडे एकात्मता । जें जें ठरवील तें सर्वथा । करोनि सोडिल माऊली ती ॥२१॥
जगांत असती नाना जीव । सकळांस जाहीर त्यांचा भाव । परि मायाळुपणाचा गौरव । माऊलीसरिसा नाही ॥२२॥
देवाने निर्मिली ही क्षिति । तिचे उदरी खाणी किती । परि माऊलीजैसी प्रेमळ दीप्ति । कोठेच नाही ॥२३॥
माऊलीचें स्वभावकर्म । तोचि जगी म्हणविला मानवधर्म । माऊलीचें उत्कट प्रेम । म्हणोनीच देव प्रिय लोकां ॥२४॥
संती माऊलीचें रूप धरिलें । तरीच ते देवपणासि पावले । नाना साधनें करोनि फिरले । त्यांना न गवसलें देवरूप ॥२५॥
तें हें स्वतःसिध्द माऊलीपण । स्त्रियेअंगी सहजचि घडण । त्याचा विकास करावया पूर्ण । उत्तम शिक्षण पाहिजे ॥२६॥
स्त्री-दक्षता विचित्रचि आहे । तेथे माणसाचें लक्षचि न जाय । तेवढें शिक्षण मुलाबाळांस ये । तरीच सोय संसाराची ॥२७॥
पुरुष आहे पिंडवर्णी । स्त्री आहे दक्ष कारुणी । दोघांचे स्वभाव मिळतांक्षणीं । होय मेदिनी वैकुंठचि ॥२८॥
उत्तम पुरुषासवें उत्तम नारी । तरि त्यांचा संसार स्वर्गापरि । पुरुषाहूनि काकणभरि । महिला वरीच राहतसे ॥२९॥
जेव्हा पुरुष होय चिंतातुर । तेव्हा घरची लक्ष्मी सांगे विचार । हें मी पाहिलें घरीं अपार । प्रसंग येतां जाण्याचे ॥३०॥
निरीक्षोनि जीं जीं घरें पाहिलीं । तेथे सरसता अनुभवा आली । चातुर्य-लक्षणें अधिक दिसलीं । महिलांमाजीं ॥३१॥
मानवी स्वभावांचें अनुमान । प्रसंग पाहोनि अवधान । पुढील काळाचें अनुसंधान । स्त्रियांचे ठायीं ॥३२॥
स्त्रीलाच भक्ति स्त्रीलाच ज्ञान । तिलाच संयम शहाणपण । तिच्यानेच हालतीं वाटे संपूर्ण । संसारचक्रें ॥३३॥
म्हणजे पुरुषाचें कांहीच नाही । ऐसें म्हणणें नोहे कांही । सहज स्वभावाची रचनाचि ही । विशद करोनि सांगितली ॥३४॥
हें सर्व जरी सांगितलें । तरी त्यांत भावनेनेचि रंग भरले । कारण, मी नाही अनुभवलें । सुखदुःख संसाराचें ॥३५॥
माझा संसार विश्व आहे । सर्व स्त्री-पुरुष मायबाप । व्यवहारदृष्टीने समजून काय । पाहिजें तें तें बोललों ॥३६॥
परि यांतूनि एकचि घ्यावें । स्त्रियेसि कोठे अव्हेरावें । कोठे माऊली म्हणोनि पाय धरावे । ओळखावें हें तारतम्यें ॥३७॥
कोठे वागवावें मित्रभावें । कोठे देवी म्हणोनि पुजावें । कोठे वैरिणीसारखे बघावें । स्थलकालपात्रभेदाने ॥३८॥
हें ज्या पुरुषांना नाही कळलें । ते जरी रानीवनी पळालें । तरी काय होतें केलें । सोंग ऐसें वरपंगी ? ॥३९॥
ते जिकडे जातील तिकडे । स्त्रीचि आहे मागेपुढे । अंतरी-बाहेरी प्रकृतीचे वेढे । जीवापाडें पडले हे ॥४०॥
केवळ आपुल्या वृत्तीकरितां । केली स्त्रीनिंदा तत्त्वता । तेथे माऊलीपणाचिया माथां । दोष देतां पाप लागे ॥४१॥
म्हणोनि वैराग्यें स्त्री अव्हेरली । त्यांनी विवेकें साधना केली । त्यापुढे त्यांनीच संबोधिली वंदिली । माऊली तीस म्हणोनि ॥४२॥
परि हें एकांगीपणें नोळखती । स्त्रियांची अनास्था करिती । यानेच झाली घोर दुर्गति । समाज-जीवनाची ॥४३॥
हीन-दुबळें केलें स्त्री-समाजा । तैसीच पुढे वाढली प्रजा । म्हणती स्त्रीजात तेवढी पशूच समजा । पाशवी झालें जग सारें ॥४४॥
कोणी भोगवस्तु समजोनि भली । सजवोनि ठेवती नुसती बाहुली । त्याने घरोघरीं शिरला कली । अबला बनली मायभूमि ॥४५॥
म्हणती स्त्री ही गुलामचि असते । तिला हक्क नाहीत उध्दरायापुरते । हें म्हणणें शोभेना शहाण्यातें । स्वार्थांधतेचे ॥४६॥
म्हणती स्त्री ही कार्यांत धोंड । म्हणोनि तिच्या प्रगतींत पाडावा खंड । ऐशापरी जाणोनि वाढविती दगड । मार्गी आपुल्या ॥४७॥
वास्तविक दोन्ही संस्कारें जन्मती । अपुल्या प्रयत्नेंच उन्नत होती । शेवटी उध्दारही तिच्याच हातीं । असे तियेचा ॥४८॥
काय देवें देवता भिन्न केल्या ? ऋषि-पत्न्या नव्हत्या सांभाळिल्या ? काय महिलात साध्वी नाही झाल्या ? पहा पुराणी मागच्या ॥४९॥
काय स्त्रियांनी नाही लिहिले वेद ? नाही केला ब्रह्मवाद ? नाना विद्याकला भेद । यांत प्रवीण कितीतरी ॥५०॥
काय स्त्रियांनी युध्द नाही केलें ? पतिपुत्रां नाही प्रोत्साहन दिलें ? काय स्त्रियांनी प्राण नाही अर्पिले । ब्रीदासाठी ? ॥५१॥
हजारो स्त्रिया फुलांहूनि नाजूक । ब्रीदासाठी जाहल्या राख । त्यांचें करावें तेवढें कौतुक । थोडेंचि आहे ॥५२॥
स्त्रियेसारिखी मोहिनी नाही । स्त्रियेसारिखी वैरागिणी नाही । स्त्रियेसारिखी मुलायम नाही । आणि कठोर रणचंडिका ॥५३॥
परि तिचें लक्ष कोणीकडे न्यावें । काय संस्कार तिच्यांत भरावे । काय शिकवोनि तयार करावें । हें आहे संगतीहातीं ॥५४॥
संगती विषयासक्तीची असली । तरि वेडीबावरी स्त्री बनली । तिच्यांत वैराग्यऊर्मी भरली । तरि न गवसे गुंडांसहि ॥५५॥
प्राण देईल आपुल्या हातें । परि भ्रष्ट न होईल लोभें-भयें ते । ऐसे विचारचि पाहिजे तेथे । बिंबविले धीरपुरुषें ॥५६॥
त्यासाठी तिला तैसेंचि ठेवावें । सुसंगति द्यावी आणि शिकवावें । नातेंगोतें सर्व तैसेंचि राखावें । स्त्रीचेप्रति ॥५७॥
अगदी मूलवयापासोनि । उत्तम चालीरीतींची राहणी । कार्यी चपल, सावध जीवनीं । शिक्षण देवोनि करावी ॥५८॥
कांही मुली शक्ति-शिक्षण घेती । मुलांपेक्षाहि धीट असती । नाही गुंडाचीहि छाती । हात घालील त्यांचेवरि ॥५९॥
तेथे कासयासि पडदा । परावलंबनाची आपदा । आत्मसामर्थ्यानेच सदा । स्त्रिया मर्दिती असुरांना ॥६०॥
परि इकडे करोनि दुर्लक्ष । आपुला राखोनि वरपक्ष । लोक स्त्रियांचें जीवन रुक्ष । करोनि ठेविती स्वार्थाने ॥६१॥
कांही लग्न होतां गुंतविती घरीं । नसे बोलण्याचीहि उजागरी । चूल आणि मूल हीच चाकरी । सांगती तिज ॥६२॥
कांही घरांतचि कोंडून ठेविती । बिचारीला जगचि नसे जन्मजातीं । जरा दिसली सूर्याप्रति । मारूनि करिती सरळ तिला ॥६३॥
मुलीने सदा लपोनि राहावें । मुलाने गांवीं रागरंग पाहावे । ऐसे हे दुष्ट रिवाज ठेवावे । न वाटती आम्हां ॥६४॥
अरे ! तुझ्याहूनि ती उत्तम वागते । समाजीं उत्तम भाषण देते । तुलाहि शहाणपण शिकवूं जाणते । मग ती मागे कशाने ? ॥६५॥
ऐसें असतां दाबून ठेवावें । आजच्या युगीं शोभा न पावे । जेथे समान हक्क असती बरवे । वर-वधूंना ॥६६॥
ईश्वरानेचि निर्मिलें हें सूत्र । दोन्ही ठेवावेत समान पवित्र । मुलांनीच काय केलें सर्वत्र । राहाया पुढे जगामाजीं ? ॥६७॥
वेगळे नियम प्रतिष्ठेसंबंधीं । विधवा होतां विवाह-बंदी । निर्वाहाचीहि नाही संधि । ही भेदबुध्दि कशासाठी ? ॥६८॥
कांही स्त्रिया विधवा होती । केश काढूनि विद्रुप करिती । त्याने कैसी साधे संन्यासवृत्ति । मला नसे ठावें हें ॥६९॥
आपुला झांकोनि दुबळेपणा । करावी दुसर्याची विटंबना । हा तों आहे दुष्टपणा । अमानुष जैसा ॥७०॥
संन्यास घेणें असेल विधवेला । तरि वनीं आश्रमीं ठेवावें तिला । सेवाशिबिरीं अभ्यास केला । पाहिजे तिने स्वइच्छें ॥७१॥
आपण खावें ल्यावें साजिरें । तिला जन्मवरि दु:खांचे भारे । त्याहूनि तिचें मरणें बरें । होतें पति-चितेमाजी ॥७२॥
तिने वृत्तीने राहावें उदास । करावा परमार्थाचा अभ्यास । विद्रूप करूनि आपणास । काय फायदा समजेना ॥७३॥
विधवेसि मानावें अभद्र । मुलगी जन्मतां ती दळभद्र । वय वाढतां समजावी क्षुद्र । हा तो दुष्टपणा समाजाचा ॥७४॥
जैसा पुरुष राहे ब्रम्हचारी । तैसी स्त्रीहि असूं शकते कुमारी । अधिकाराची उणीव सारी । घालविली पाहिजे ॥७५॥
स्त्रीजातीस संततिनियमन-बेडी । परि पुरुषास नाही कांही बेरडी । हें म्हणणें नव्हे अविचारी खोडी । वाटते मज ॥७६॥
नियमन असावें तें सर्वासि । अभ्यास द्यावा तो दोघांसि । विशाल करावें विचारशक्तीसि । देशक्लेश समजावोनि ॥७७॥
समाजीं जो पुरुषासि आदर । तैसाचि महिलांशि असावा व्यवहार । किंबहुना अधिक त्यांचा विचार । झाला पाहिजे समाजीं ॥७८॥
येथेच समाजाचें चुकलें । एकास उचलोनि दुसर्यास दाबलें । याचें कटुफळ भोगणें आलें । कितीतरी स्थानीं ॥७९॥
परि लक्ष नाही आज तिकडे । नाहीत मुलीबाळींना उत्तम धडे । कुरण वाढूं द्यावें ढोरांसाठी पुढे । तैसें झालें समाजाचें ॥८०॥
यास पाहिजे आता वळविलें । ठिकठिकाणीं शिक्षण दिलें । मुलीमहिलांचें जीवन जागविलें । तरीच जगलें गांवराज्य ॥८१॥
शहाण्यांनी हें विसरूं नये । गांवीं सर्वांची करावी सोय । जेणें पुरुषांचें तैसेंचि स्त्रियांचें होय । उत्थान आता ॥८२॥
तरीच ग्राम शोभूं लागे । पुरुष-नारी दोन्ही विभागें । जेणें स्वर्गचि उतरेल कार्यायोगें । विकासाच्या ॥८३॥
महिलांच्या आंतरिक गुणांचा विकास । करील ऐसें शिक्षण खास । जरि दिलें जाईल त्यांस । तरीच भावी जग पालटे ॥८४॥
महिलांचें उच्चतम शिक्षण । शिक्षणांत असावें जीवनाचें स्थान । जीवनांत असावें स्वारस्य पूर्ण । शांतिदयादि भावनांचें ॥८५॥
समाजविकास ज्यास आवडे । त्याने शिकवावे मुलींना धडे । लिहितां-वाचतां येईल एवढें । तरी शिक्षण आवश्यक ॥८६॥
तैसीच शिकवावी टापटीप । गाणें बोलणें वागणें अनुरूप । घर पाहतांचि कळावें आपोआप । कैसी येथील महिला तें ॥८७॥
मुलीबाळीस उत्तम ठेवणें । हें तों मातापित्यांचें कर्तव्य प्रमुखपणें । त्यानेच राष्ट्राचें फेडील पारणें । घर संतानें आपुलिया ॥८८॥
मीं पाहिलें मुलें फार शिकती । यंत्रविद कारागीर होती । परि मुलींसाठी योजना अति । मंद आहे शिक्षणांची ॥८९॥
ऐसें समाजीं न व्हावें । मुलांपरीच मुलींना शिकवावें । त्यांचें स्थानमान नेहमी असावें । सहकारितेचें ॥९०॥
मुलांस विविध उच्च ज्ञान द्यावें । तैसेंचि मुलींनाहि शिकवावें । हेळसांड करूं नये हें जाणावें । समाजाने ॥९१॥
परि स्वतंत्र असावें मुलीचें शिक्षण । स्त्रीपुरुषांचे उद्योगहि भिन्न । जेथे होतें दोघांचें मिलन । प्रसंग कठिण ओढवती ॥९२॥
विचारें जें जें कांही होतें । त्यांत योजनाबध्दता राहते । अविचाराने जातां मोहपंथें । धोका मागुतां पावती ॥९३॥
म्हणोनि समजोनि शिक्षण द्यावें । दोन्ही रथचक्रां सारखें करावें । शक्तियुक्तींनी भरावें । गांव सारें आपुलें ॥९४॥
परंतु नेहमी भयभीत करावें । प्रत्येकाचें स्थान भिन्न ठेवावें । मग स्वभावास वळण कोणीं द्यावें । संसर्ग येतां ? ॥९५॥
स्त्रीपुरुषांच्या विकृत कल्पना । भ्रमविती परस्परांच्या मना । यासाठी वाढवावा बंधुभिगिनीपणा । योग्य संबंधें ॥९६॥
शिक्षणांत अशीच करावी व्यवस्था । न होईल परस्परांची अनास्था । या दृष्टीने शिकवोनि समस्तां । वळण द्यावें नैतिकतेचें ॥९७॥
दोघांनाहि आपुलें ब्रीद कळे । तरीच सगळा अनर्थ टळे । एरव्ही पिंजर्यांत जरी वेगळे । तरी गोधळे वृत्ति त्यांची ॥९८॥
म्हणोनि सहशिक्षणहि नाही वाउगें । जरि नैतिकभाव राहती जागे । शिक्षणीं जागृति ठेवणें सर्वांगें । काम नेत्या वडिलांचें ॥९९॥
शिक्षणीं सांभाळोनि तनुमन । करावें मुळीबाळीस विद्वान । अंगीं असावें शौर्य पूर्ण । ब्रीद आपुलें रक्षाया ॥१००॥
जेव्हा पुरुष पावतो पतना । त्यास स्त्रीप्रकृति सहन होईना । तेव्हां महिलांत असावी संघटना । त्याची सुधारणा करावया ॥१०१॥
जैसी मुलांची संघटित सेना । तैसी स्त्रियांची असावी संघटना । आपुल्या सुखदु:खांच्या भावना । प्रकटवाव्या सभासंमेलनीं ॥१०२॥
पुरुषांचें जैसें स्फूर्तिस्थान । तैसेंचि महिलांचें असावें उन्नतिभुवन । त्यांत सभा प्रार्थना कथाकीर्तन । उपक्रम पूर्ण महिलांचे ॥१०३॥
दूर सारोनि जातीय आदि भाव । जमवोनि महिलासमुदाय सर्व । तिळगूळ हळदीकुंकू शारदोत्सव । सहभोजनादि करावे ॥१०४॥
उत्सव साध्वीपतिव्रतांचे । जयंति-पुण्यतिथी पर्व तयांचे । वाचनालयादिक महिलाविभागाचें । जेथे तेथे आवश्यक ॥१०५॥
स्त्रियांचे स्वतंत्र मेळे-समुदाव । त्यांच्या उन्नतीचा कला-गौरव । प्रतिकाराचीहि त्यांना जाणीव । अवश्य असावी ॥१०६॥
माझें म्हणणें श्रोतयांतें । जें जें सुख असेल पुरुषातें । महिलांसीहि असावें अभिन्नपणें तें । स्वातंत्र्य सुखसाधन ॥१०७॥
सर्व सोयी पुरुषांकरितां । स्त्रियांसाठी सर्व व्यथा । हें कोण बोलतें शास्त्र आता ? द्यावें हातां झुगारोनि ॥१०८॥
पुरुष उन्नतीस चढला । परि कांहीच न कळे महिलेला । तरि तो गांवहि एक कल्ली झाला । नशीबीं आला र्हास त्रास ॥१०९॥
म्हणोनि रथाचीं दोन्ही चाकें । मजबूत करावी कांतोनि सारखें । तरीच संसारगाडी सुखें । सुखावेल ग्रामजीवनाची ॥११०॥
आदर्श ऐसे मातापिता । जन्म देतील आदर्श सुतां । ते वैकुंठ बनवितील भारता । तुकडया म्हणे ॥१११॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । ग्रामोद्वार कथिला महिलोन्नतींत । विसावा अध्याय संपूर्ण ॥११२॥
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
********************
ग्रामगीता अध्याय एकविसावा
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
ईश्वराच्या इच्छेचे पूरक । समाजाचे दोनचि घटक । पुरुष आणि महिला देख । सृष्टिचक्र चालविती ॥१॥
चालावा जगाचा प्रवाह । व्हावा निसर्गगुणांचा निर्वाह । यासाठीच योजिला विवाह । धर्मज्ञांनी तयांचा ॥२॥
स्त्रीपुरुष हीं दोन चाकें । जरि परस्पर सहायकें । तरीच संसाररथ चाले कौतुकें । ग्राम होई आदर्श ॥३॥
परि याची हेळसांड झाली । विवाहाची रूढीच बनली । मग यांतूनचि उदया आलीं । हजारों दु:खें समाजाचीं ॥४॥
पुरुषार्थासाठी वैवाहिक जीवन । विवाह समाजस्थैर्याचें साधन । परि वाढोनि अज्ञान प्रलोभन । झाली धुळधाण समाजाची ॥५॥
कितीतरी मुली असती सुंदर । परि हुंडयासाठी राहती कुवार । तैसाचि मुलांचा व्यवहार । जातींत भासे कित्येक ॥६॥
ऐसी वाईट पडली प्रथा । तेणें व्यभिचार वाढले सर्वथा । हें महापाप असे माथां । समाजाच्या ॥७॥
कुणाचे पिते लग्न करोनि देती । घराणें, पैसा, प्रतिष्ठा बघती । विवाहाआधी न पुसती । दोघांसहि ॥८॥
भिन्न स्वभावांचे प्राणी । जमवोनि आणावेत दुसर्यांनी । कैसी रुचेल जिंदगानी । दोघांसहि ? ॥९॥
वडिलांचा मान राखावा । म्हणोनि का संसार नागवावा ? ऐसातरी हेतु कां धरावा । वरिष्ठांनी ? ॥१०॥
विवाहाआधी परस्पराने । पाहावें दोघांनाहि निश्चयाने । विचारस्वातंत्र्य दोघांसहि देणें । अगत्याचें ॥११॥
वडिलांनी पहावी एक खूण । लग्न करिती काय आंधळे होऊन । पश्चात्तापाचें कारण । न पडावें म्हणोनिया ॥१२॥
एरव्ही दोघांच्याही मतें । लग्न जुळवूनि आणावें सु-मतें । नांदोत दोघेंहि एकसुतें । संसार सुखी करावया ॥१३॥
जुळतां दोघांचेहि विचार । विकास पावेल कारभार । दोघांची उत्साहशक्ति अपार । कार्य करील सेवेचें ॥१४॥
उत्तम राहणें उत्तम बोलणें । उत्तम सौंदर्य सात्विक लेणें । घरामाजी शोभून उठती तेणें । देवता जणूं समविचारें ॥१५॥
विचाराविण जें जें करणें । तें सर्वचि होतें लाजिरवाणें । ऐसेंचि मागील गार्हाणें । ऐकतों आम्ही ॥१६॥
भोगासाठी लग्न केलें । आंधळेपणीं संसार चाले । वर्ष लोटतांचि गोंधळले । दोन्ही प्राणी ॥१७॥
एक एकाशीं बोलेना । संशय वाढले दोन्हीजणां । कशाचा संसार ? यमयातना । वाटे पतिपत्नीसि ॥१८॥
विषय-विकारें लग्न केलें । पूर्वीच परस्परांसि नाही ओळखलें । तेणें सर्वाचि वाया गेलें । जीवन दोघांचें ॥१९॥
केवळ भोगासाठी लग्न । हें तों दिसे विचित्रपण । काय होतें पशु जमवोन । एके ठायीं ? ॥२०॥
मानवांचें एक होणें । स्वर्गसुखहि त्यांना ठेंगणें । त्यांच्या संयोगें उत्त्कर्ष पावणें । लावण्यासि ॥२१॥
श्वानांचिया पशुत्वसंयोगें । जन्मती जीव कर्मभोगें । टाकिलीं जाती सर्व मार्गें । श्वान-पिलीं ॥२२॥
तैसें नोहे मानवांचें । त्यांचें राहणें जबाबदारीचें । एक संतानहि थोर कामाचें । दिगंतरीं ॥२३॥
देशीं पाहिजे सर्वचि धन । रानधन, लेणीं आदि मानधन । द्रव्यधन, खाणी आणि गोधन । सर्वकांही ॥२४॥
सर्व धनांमाजी सुपुत्रधन । वाढवी राष्ट्राचें गौरवस्थान । म्हणोनिच वधुवरांनी शोधून । लग्न करावें विचारें ॥२५॥
नाहीतरि मरतुकडे पुत्र व्हावे । तेणें घराणें बुडोन जावें । देशासहि कलंकित करावें । न होवो ऐसें ॥२६॥
उत्तम बीजसि उत्तम जमीन । तेणें वृक्ष वाढतो भेदूनि गगन । ऐसेंचि असावें सन्तान । बलभीमासारिखें ॥२७॥
ऐसें सन्तान घराणें शोभवी । एकवीस कुळांचें नांव जागवी । स्वकर्तव्याने चमकवी । देश आपुला ॥२८॥
परि पुत्रांचीहि असावी मर्यादा । देशीं न वाढवी आपदा । शरीर संरक्षणाचीहि संपदा । गमावूं नये संसारीं ॥२९॥
निरोगी रक्त उत्तम गुण । सुस्वभावी ऐसें सन्तान । हें नाही सर्वस्वीं अवलंबून । जाति-कुळ-गोत्रावरि ॥३०॥
दोघें प्राणी उपवर असती । भिन्नजाति लग्न करूं म्हणती । विचारें करितां, त्यांसि संमति । अवश्य द्यावी ॥३१॥
गुण गुणाकडे धांव घेतो । आपण शास्त्रींपुराणींहि ऐकतों । मिश्र विवाहाने बिघाड होतो । म्हणणें व्यर्थ ॥३२॥
मिश्र विवाह ऐसा नसावा । इच्छा नसतां बळी पाडावा । विचार करण्यास अवकाश द्यावा । प्रसन्न चित्तें ॥३३॥
विचारें जीवनाच्या संग्रामीं । हाचि विवाह करूं आम्ही । म्हणती दोन्ही विवेकी प्रेमी । आड कोणी कां यावें ? ॥३४॥
मागे गुणविवाह बहुत झाले । श्रीकृष्णें अर्जुनादिकें केले । समाजीं अनेक प्रयोग घडले । विवाहांचे भिन्न भिन्न ॥३५॥
गुणसाम्याचे मिश्रविवाह । वीरश्रीच्या कसोटीचे विवाह । राष्ट्रांतील भेद मिटविण्याचे विवाह । नाना जमातींमधूनि ॥३६॥
ऐसे अनेक तात्विक विवाह । त्यांत कांही राक्षस-विवाह । बळजबरीने बांधले देह । अनेक हेतूंसाठी ॥३७॥
ऐशा गोष्टीस मात्र जपावें । बाळपणींहि लग्न नसावें । समजूतदारीने करूनि द्यावे । लग्नप्रसंग ॥३८॥
कांही पित्यांची असते हौस । मुलींचें वय तीन वर्ष । अथवा असतां तीन मास । करिती लग्न ॥३९॥
वयांत येती वधुवर । माहीत नसतो मानवी व्यवहार । बळी पडती रूढीसि पामर । दोन्ही प्राणी ॥४०॥
पुढे एक एकाशीं न मिळे । सर्प-मुंगुसापरी सगळें । मग पंचायती-नोटिसांचे सोहळे । जीवन गारद यांतचि ॥४१॥
कांही मुली विधवा होती । बालवयींच पति वारती । पुढे त्याची होते फजीती । लग्नावांचोनि ॥४२॥
रूढि सांगते लग्न न करावें । मन बावरे कोणीं आवरावें ? चोरूनि पापाचरणी व्हावें । तरि तें दु:खदायी ॥४३॥
ऐशा ज्या ज्या वाईट रीती । झुगारोनि द्याव्या हातोहातीं । करावी पुन्हा नवीन निर्मिती । समाजनियमांची ॥४४॥
ज्या विधवेस वाटे लग्न करावें । तिने वडीलधार्यांसि सांगावें । त्यांनी सहृदयपणें लग्न योजावें । जीवधर्म म्हणोनिया ॥४५॥
ज्या विधवेची इच्छा नाही । तिला छळूं नये कोणी कदाहि । ती सती संन्यासिनी समजोनि देहीं । राखावी समाजाने ॥४६॥
ऐसेंचि हें घडूं द्यावें । मानवांच्या प्रकृतिस्वभावें । तरीच मानव म्हणविणें बरवें । शोभा देतें ॥४७॥
कांहींचे वडील लग्न करोनि देती । मनास वाटेल तो हुंडा घेती । जोड-विजोड कांही न पाहती । धनापायीं ॥४८॥
वृध्द वा रोगी असोनि वर । वधु देती बालिका सुंदर । धनासाठी दुर्व्यवहार । परोपरीचे ॥४९॥
मुलामुलींचा घेवोनि पैसा । जीवनांत वाढविती निराशा । मोलाने का प्रेम-फासा । पडे गळीं कोणाच्या ? ॥५०॥
बालक-बालिकेसि वाचा नसते । तोंड फोडोनि बोलेना ते । परि हे कसाब म्हणावेत पुरते । जे विजोड लग्न योजिती ॥५१॥
ऐशा असतील ज्या वेडया रीती । त्या काढोनि टाकाव्या प्रवृत्ती । जीवनाचें प्रेम चित्तीं । तेंचि धन समजावें ॥५२॥
ज्याने मुलामुलींचे पैसे घेतले । त्यासि समाजाने पाहिजे निषेधिलें । तरीच हे दुराग्रह मोडले । जातील आता ॥५३॥
नाहीतरि हुंडयापांडयासाठी । जीवन होईल मसणवटी । अनेक मुलेंमुली करिती शेवटीं । आत्मघात ॥५४॥
कित्येक हात धरोनि जाती । समाजजीवनीं कालविती माती । परि लोभ न सोडवे शहाणियांप्रति । पैशांचा अजुनि ॥५५॥
हें गांवाने दुरुस्त नाही केलें । तोंवरि पापांचें डोंगर वाढले । सगळे गांवचि भागीदार झालें । समजावें त्यांचें ॥५६॥
कांही घरीं मुली उपवर । मुलेंहि लग्नासाठी तयार । तेथे आटयासाटयाचा व्यवहार । करिती कोणी ॥५७॥
मुलामुलींची नसतां जोड । आपुलिया सोयीसाठी उघड । लादिती मानेवरि जोखड । मायबाप ॥५८॥
मग तेथे भांडाभांडी । मुलगी माहेरींच न धाडी । अथवा टाकोनि करिती नासाडी । जीवनाची तिच्या ॥५९॥
कांही आपुल्या मानाकरितां । मुलींच्या दैवीं आणिती व्यथा । ऐशा वाढल्या वाईट प्रथा । कितीतरी गांवीं ॥६०॥
कांही जातींत ठेविती पडदा । जणूं कोंडवाडयाचाचि धंदा । त्याने लग्न झालियाहि आपदा । येते केव्हा ॥६१॥
मुलगी पडद्याने बघितली नव्हती । आता कळलें तिरळी होती । कांही म्हणती लग्नप्रति । मागे घ्यावें काडीमोडीने ॥६२॥
पडद्याचिया प्रस्थामुळे । शहाणे तेहि होती खुळे । गर्दीत पति चुकतां गोंधळें । पडे बापडी गुंडाहातीं ॥६३॥
दुर्जन बुरख्याआड लपविती । ऐशा स्त्रिया नेल्या किती । अजूनिहि नेत्र न उघडती । समाजाचे ॥६४॥
पडदापध्दति बहुपरी भोवे । थोरांपुढे कधी न यावें । परिशुश्रुषाहि अंतरल्या याभावें । कितीतरी मुली ॥६५॥
ऐशा विचित्र कांही प्रथा । मोडोनि टाकाव्या समाजीं व्यथा । लावूं नये दोष माथां । कोणा एकाच्याचि ॥६६॥
कांही मायबाप पोरा चढविती । पुरुषें कैसेंहि वागावें म्हणती । मुलीस गांजिती, मार देवविती । ऐसी वृत्ति आसुरी ॥६७॥
कांही मायबाप मुलींचे कैवारी । हूं म्हणतां जावोनि पडती द्वारीं । ऐसें कु-शिक्षण नानापरी । दु:ख संसारीं वाढवी ॥६८॥
कांही पतिपत्नींचें संघटन । परि आड येई थोरांचा मान । काडीमोड, विरोध अथवा भांडण । करी वैराण जीवन त्यांचें ॥६९॥
कांही लपवालपवी करिती । मुली नांदायासि न धाडिती । कांही मुलींना ओढूनि नेती । तमाशा करिती जीवनाचा ॥७०॥
कांही लग्नाआधी लपविती उणीव । त्याची पुढे होतां जाणीव । जन्मभरि भोगावा लागे उपद्रव । सकळांसि मग ॥७१॥
कांही बढाई दाविती खोटी । कांही रुसती आंदणासाठी । सोय न पाहतां करिती कष्टी । परस्परांसि सोयरे ॥७२॥
कोणास दागिन्यांची हाव । सदगुणांचा नकळे भाव । त्यांस फसवी नकली वैभव । जीवन गारद मुलींचें ॥७३॥
मुलीमुलांचा लग्नाबाजार । शिक्षण, सौंदर्य, नोकरीवर । भाव न्यूनाधिक ठरविती साचार । जीवनमूल्यें न जाणतां ॥७४॥
कांही लग्नांचे दलाल । उधळीत जाती रंग गुलाल । मुलामुलींचें जीवन हलाल । करिती स्वार्थास्तव ॥७५॥
कांही मुलींना खपवूं पाहती । ध्यानीं न घेतां नीति-अनीति । ऐसी लाचार केली स्थिति । नाना रूढयांनी ॥७६॥
ज्योतिषासि देऊन-घेऊन । मनासारिखे काढविती गुण । प्रसंगीं नावंहि सांगती बदलून । दंभ दारूण वाढला ॥७७॥
आकाशांतील पाहती ग्रह । इकडे स्वभावीं वेगळे दुराग्रह । जीवनांत वाढे जयांनी द्रोह । ऐसे त्यांना न दिसती ॥७८॥
म्हणती वधुवरें सुलक्षण । जुळले त्यांचे छत्तीसगुण । इकडे छत्तीसी अथवा खडाष्टक पूर्ण । करी जीवन बरबाद ॥७९॥
वधुवरांचे उत्तम गुण हेंचि परस्परांचें महाभूषण । त्यावांचोनि विवाह केला वैभवपूर्ण । तरि तो सर्व अमंगल ॥८०॥
कांही ठिकाणीं विवाह करिती । वेडयासारखा पैसा उधळिती । उपयोग नाही ऐसी रीति । कासयास आचरावी ? ॥८१॥
लग्नाचे अपार सोहळे । विहीण-व्याही-मामे सगळे । वर्हाडांचे गोंधळ सावळे यासि विवाह म्हणों नये ॥८२॥
अस्ताव्यस्त तारांबळ । उधळपट्टी आणि धांवपळ । यासि म्हणावें कार्य अमंगळ । खर्च निष्फळ पैशांचा ॥८३॥
लग्नाकरितां कर्ज करावें । जन्मभरि व्याज भरीत जावें । लग्नासाठी कफल्लक व्हावें । कोण्या देवें सांगितलें ? ॥८४॥
चार-पांच दिवस लग्न । लग्नांत होती नाना विघ्नं । मोठेंपणाचें विडंबन । कासयासि करावें ? ॥८५॥
असोत अडी-अडचणी किती । साधिलीच पाहिजे तिथि । ऐसी कां ठेवावी प्रवृत्ति । रूढिबध्द ? ॥८६॥
प्रसन्न हवापाणी ऋतु । हाचि विवाहाचा मुहूर्त । बाकीचें झंजट फालतू । समजतों आम्ही ॥८७॥
दिवस पाहावा सुंदर । हावापाणी सोयीस्कर । सर्वांसि होईल सुखकर । म्हणोनिया ॥८८॥
खर्च नको भव्य मंडपाचा । देखावा असवा निसर्गाचा । अथवा सभामंडप मंदिराचा । योजावा या कार्यासि ॥८९॥
वेळ पैसा आणि श्रम । वाचवावेत करोनि नेम । गुणांस द्यावें महत्त्व परम । जाति-धन-भ्रम सोडोनि ॥९०॥
सुंदर करावें सभास्थान । बैसवावे साजेलसे जन । वरवधूंना समोर बसवून । सूचना द्यावी सूचकें ॥९१॥
द्यावा वरवधूंचा परिचय । प्रकट करावा सत्कार्य-निश्चय । मग साधावें कार्य मंगलमय । मंगलाष्टकें म्हणोनिया ॥९२॥
मंगलाष्टकीं विवाह-उद्देश । सज्जनें करावा उचित उपदेश । येऊं न द्यावा नाटकी अंश । अपवित्र त्यांत ॥९३॥
सभा असावी आदरपूर्ण । देऊं नये धूम्रपान । धर्मसंस्कार वाटावें लग्न । अग्निदेवते स्मरोनिया ॥९४॥
वडील जनांचे आशीश घ्यावे । सर्वांशी प्रेमादरें वागावें । गोडं बोलोनिं उरकवावें । लग्नप्रसंगा ॥९५॥
वरवधूंना ग्रामीण खादी । असो जुनी वा नवी साधी । ऐशा वस्त्रींच लग्नाक्षदी । पडाव्या शिरीं उभयतांच्या ॥९६॥
कपडे असती ते घालावे । नसतां धुवोन स्वच्छ करावे । अहेरादि नको लग्नप्रसंगीं यावें । सर्वजनें आदरें ॥९७॥
लग्नानिमित्त भेटीच देणें । तरि उभयतांचा संसार सुरू व्हावा तेणें । अथवा गांवाचें फिटावे उणें । ऐशी योजना करावी ॥९८॥
सारांश, लग्नाचा प्रसंग । विचाराने करावा यथासांग । समजोनि परिस्थिति वेळप्रसंग । सर्वकांही ॥९९॥
ऐसा हा मंगल प्रसंग । देशाचें भूषवी अंग । समाजजीवन करील अभंग । वाढेल कीर्ति गांवाची ॥१००॥
विवाहाचा जो संस्कार । त्याचें महत्त्व सर्वांत थोर । त्या पायावरीलच समाजमंदिर । म्हणोनि सुंदर करा यासि ॥१०१॥
यासाठीच वधुवरांसंबंधीं बोललों । नवनिर्माण ओघानें पुढे चाललों । सांगोनि एकदा मुक्त झालों । सुखदु:ख समाजाचें ॥१०२॥
स्त्रीपुरुष हीं दोन चाकें । परस्परपोषक होतां निके । गांव नांदेल स्वर्गीय सुखें । तुकडया म्हणे ॥१०३॥
इतिश्री ग्रामगीत ग्रंथ । गुरुशास्त्र-स्वानुभव संमत । विवाहसंस्कारें ग्रामोद्वार कथित । एकविसावा अध्याय संपूर्ण ॥१०४॥
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
*****************
ग्रामगीता अध्याय बाविसावा
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
विवाहादि संस्कार आवश्यक । परि खर्च न व्हावा अधिक । त्यांचें स्वरूप जाणोनि तात्विक । आचरावे सर्वदा ॥१॥
ओटीफळें, मौंजीबंधन । जावळें उतरणें तीर्थी जाऊन । वास्तु, बारसें, वाढदिवस जाण । अवडंबर नको तेथे ॥२॥
तैसेंचि मृत्युसंस्काराचें । स्तोम नसावें अंत्यविधीचें । जेणें मृताचिया नांवें सजीवांचें । दु:खी होय जीवन ॥३॥
मृत्युसंस्काराचा ऐका खुलासा । लोक मृत्युसि समजती भलतिसा । मी म्हणतों मृत्युजैसा । उत्तम नाही कोणीहि ॥४॥
जैसी नदी सागरासि मिळे । सोडोनि भेदभाव कष्टबळें । तिचें कार्यचि होतें सगळें । मिळण्यासाठी सागरीं ॥५॥
वाहत राही आपुल्या रंगें । लोक शांत होती सहज संगें । तिच्या पाण्यासि घेवोनि निजांगें । तृप्ति पावती जीवनीं ॥६॥
परि तिजसि महत्त्व सागराचें । तैसेंचि आहे मानवाचें । मोहपाश तुटतां आसक्तीचें । धांव घेई निजरूपीं ॥७॥
परि कार्याची जी वासना राहते । तीच जीवासि साथ देते । तिचेंचि आविष्करण पुन्हा होतें । पुढच्या जन्मीं ॥८॥
शरीरमात्र नष्ट झालें । परि संस्कार वासनेअंगीं भरले । पुन्हा जन्म घेतां प्रगटले । ऐसें होतें ॥९॥
ज्याने याच जन्मीं मोह मिटविले । उत्तम संस्कार प्राप्त केले । त्याचें पारणेंचि फिटलें । जन्ममरणांचें ॥१०॥
परि ऐसे क्वचितचि होती । अढळ परमधाम पावती । येर ते प्राणी येती जाती । आसक्तियोगें ॥११॥
आसक्तीने इंद्रियीं बांधला । मना येई तसा करूं लागला । तो जन लोकांसहि आवडला । स्वार्थ त्यांनाहि म्हणोनि ॥१२॥
जन्मला वाढला मोठा झाला । अवस्था अनेक त्या देहाला । षडऋतूंनी फळाफुला आला । जीर्ण झाला वृक्ष जैसा ॥१३॥
त्याची विकृति शिगेस लागली । शरीरगात्रें विस्कळून गेलीं । मग वाट पाहे आपुली । मूळच्या घराची ॥१४॥
त्यास मोहपाशें बांधूं पाहती । औषधें वाटेल तैसीं देती । वाचवा वाचवा कळवळोनि म्हणती । कमीं येईल म्हणोनि ॥१५॥
मरणोन्मुखासि जीवन द्यावें । पुनरपि उत्तम बनवावें । हें मानवाचें कर्तव्यहि बरवें । समजों आम्ही ॥१६॥
परि प्रयत्न करोनि नाही जगला । शेवटीं शरीर सोडोनि गेला । समजावा देवाच्या स्वरूपीं मिळाला । प्राणी आपुल्या ॥१७॥
मग ईश्वरास करावी प्रार्थना । त्यास शांति लाभो देवसदनां । आमुच्या सुखदु:खाच्या भावना । न बाधोत तया ॥१८॥
येथे रडण्याचें नाही काम । आपणांसहि तेंचह घाम । पाहावें लागेल परम । झाल्या उपशम देहाचा ॥१९॥
म्हणोनि मृत्युनंतर रोदन । हें आहे अज्ञानाचें प्रदर्शन । कासया दावावें सर्व समजोन । उदास होवोनि मानसीं ? ॥२०॥
हें ज्याचें त्यासचि प्राप्त होतें । मग रडावें कासयासि लागतें ? कांही करोनि तरी दाखवावें तें । कीर्तीसाठी ॥२१॥
आपण उरलें तें कर्तव्य करावें । तेणें त्याचें नांव भूषवावें । आपल्या कुळांत गौरव पावोनि जावें । तेणें भूषण वडिलांसि ॥२२॥
असो ऐसा प्राणी निवर्तला । सर्वामिळोनि न्यावें त्याला । पाहों नये जात-परजात भला । कोण होता ॥२३॥
सन्मान द्यावा जाणाराप्रति । अभद्र ऐसी नको अर्थी । गंभीरपणें जावें सांगातीं । आत्मीयतेने ॥२४॥
सर्वांनी प्रसंग नीट करावा । हातभार लावोनि द्यावा । आपलाहि संस्कार आठवावा । उत्तम होईल म्हणोनि ॥२५॥
मृत्यूहि सुमंगल समजावा । स्मशानयात्रेस सहयोग द्यावा । दिंडीघोषें मार्ग सुधारावा । जाणाराचा ॥२६॥
अभद्र विद्रूप किळसवाणी । न ठेवावी रीत कुणी । श्रध्दांजलीच्या भाषणीं । भूषवावें प्रसंगीं ॥२७॥
स्मशानीं असावी सुव्यवस्था । पाऊसकालासाठीहि तत्त्वता । संस्कारमंडप सर्वांकरिता । पवित्रता वातावरणीं ॥२८॥
मृतशरीराचें करोनि दहन । पवित्र करावें वातावरण । गांवें लावोनि ठेवावें सामान । योग्य ठायीं ॥२९॥
मृत शरीरास पीतांबर । घरीं नसल्यास विका घर । दु:ख भोगा जन्मभर । ऐसें कोणीं न करावें ॥३०॥
असेल तैसेंचि वागावें । जुनेंहि वस्त्र स्वच्छ करावें । खुशाल अंगीं बांधोनि न्यावें । मृताचिया गरिबांनी ॥३१॥
नवेंचि वस्त्र पाहिजे आणिलें । ऐसें शास्त्राने जरी सांगितलें । तरी आमुच्या घरचें कैसें चाले । नाही ठाउकें शास्त्रासि ॥३२॥
तुपावाचोनि नको भोजन । हें शास्त्रवचन पाळतो कोण ? मग मृतासीच तुप चोळाया जाण शास्त्रवचन कां सांगावें ? ॥३३॥
मृत्यु झाला एकाचिया घरी । खावयास नाही एक दिवस ज्वारी । सुतक धरोनि कैसियापरिं । बसावें तेणें ? ॥३४॥
एक दिवस खाली गेला । तरी उपास पडती गरिबाला । त्याने दहा दिवस उपास भला । कैसा करावा सांगा तुम्ही ॥३५॥
म्हणोनि प्रेत नेवोनि कार्य उरकलें । घरीं येवोनि स्नान केलें । मृत्युस्थळ पवित्र करोनि ठेविलें । आटोपले मृत्युसंस्कार ॥३६॥
मग त्याने खुशाल कामासि जावें । मोलमजूरी करीत राहावें । उत्तम विचारांचें करावें । मनन ध्यान एकांतीं ॥३७॥
सुतक धरण्याची प्रथा लाविली । ही तर शोकवृत्तीच दाविली । आड येतील तीं काढून टाकिलीं । पाहिजेत ऐसीं बंधनें ॥३८॥
याचा मूळ उद्देश ऐसा होता । मृत देहाचा संसर्ग घडतां । रोगजंतु चढती शुश्रुषा करितां । म्हणोनि दूर राहावें ॥३९॥
परि बाप शंभर कोसांवरि मेला । मुलगा सुतक पाळी मुंबईला । हा विपर्यास पाहिजे दूर केला । मूळ चित्तीं धरोनि ॥४०॥
गोमूत्र शिंपडणें निंब खाणें । प्रेतासि अग्निसंस्कार देणें । सुतक अस्पर्शता पाळणें । आरोग्यासाठी सर्व हें ॥४१॥
म्हणोनि शुध्द जलाने स्नान करावें । शुध्द कपडे परिधान करावे । असेल तें वस्त्रपात्र धुवावें । रोगियाचें ॥४२॥
हें करणें आहे आवश्यक । यासीच बोलती सुतक । परि दहा दिवस करावा शोक । हें तों मना पटेना ॥४३॥
शोकवार्ता सकळांसि कळावी । म्हणोनि एकदा पत्रे टाकावी । यापरि सुधारणा करावी समाजाची ॥४४॥
विचारांची दृढता व्हावी । म्हणोनि सदग्रंथांची कास धरावी । परि सहामासवरी रडभूक करावी । पाहुण्यांसवें कासया ? ॥४५॥
विवेकें सांवरोनि भावना । करावी तेराव्या दिवशीं प्रार्थना । सर्व लोकांसह जाणा । भजनानंद चाखावा ॥४६॥
सांगावी स्मृति म्हणोनि कहाणी । असेल तरि दान देवोनि । सेवा करावी त्या निमित्तानी । नसल्यास मनीं खेद नको ॥४७॥
मोकळेपणीं नमन करावें । मी उत्तम वागेन संकल्पावें । सेवेचें कार्य चालवावें । गतात्म्याचिया प्रित्यर्थ ॥४८॥
परि पाहावी आपुली परिस्थिति । जित्यांची होऊं नये फजीती । कोणी दान-दक्षिणेंत दिवाळें काढती । ऐसें नको ॥४९॥
कोणी रूढिबंधनांत पडती । मृतासाठी कर्ज काढती । त्यांचे नांवाने पंगती उठविती । जातभाई जमवोनि ॥५०॥
बुवा, पंच अथवा ब्राह्मण । यांसि धन देती भूर्दंड म्हणोन । कोणी घेती गोडजेवण । कमर मोडे गरिबाची ॥५१॥
कोणी घरीं धनाढय असती । परि पुत्राअभावीं नर्काची भीति । म्हणोनि मरते वेळीं दत्तक घेती । होय फजीती राहिल्यांची ॥५२॥
दत्तक करी उधळेपणा । किंवा पूर येई भांडणा । अपव्ययाची वाट लागे धना । तेणें नर्क चुके कैसा ? ॥५३॥
जीव स्वककर्मांचीं फळें भोगतो । त्यासि कोण कैसा तारितो ? सत्कीर्तीनेच स्वर्ग मिळतो । पुत्रपौत्रें कदा नोहे ॥५४॥
स्वर्ग अथवा मुक्ति कांही । सदगतिवेगळी अन्य नाही । मन:प्रवृत्ति सत्याकडे जाई । हीच उध्दारगति जीवाची ॥५५॥
यासाठी धन असल्या मालकीचें । करावें कार्य गांव-सोयीचें । विहीर, शाळा, छात्रालयादि कोणचें । सत्कार्य भावें ॥५६॥
अथवा बांधवावा एकादा मार्ग । जेणें जनतेचे चुकती कष्टभोग । आसक्ति सोडण्यानेच स्वर्ग । लाभेल त्यासि ॥५७॥
किंवा त्याचे जे नातलग । त्यांनी सत्कार्यांचा आणावा योग । उत्तम कार्यीं करावा उपयोग । धनाचा त्याच्या ॥५८॥
तयायोगें जी होईल कीर्ति । तिलाच सज्जन स्वर्ग म्हणती । लोक हृदयें गुण वाखाणती । याविण स्वर्ग असेना ॥५९॥
ज्याची पसरेल अपकीर्ति । त्यासि कैसी मिळेल मुक्ति ? लोक मृत्यूवरीहि वाखाणती । ऐसें व्हावें जीवन ॥६०॥
याचसाठी उत्तम शिकावें । उत्तम राहावें वागावें । सर्वांस उत्तम करोनि सोडावें । कीर्तीसाठी ॥६१॥
कीर्ति तोचि स्वर्ग खरा । अपकीर्ति नरकाचा पसारा । याच जगीं यांचा व्याप सारा । पाहती प्राणी ॥६२॥
एरव्ही स्वर्गस्थळींहि गेला । तरी कुकर्में दु:खाचि देवेंद्राला । नव्याण्णव यज्ञें करोनि झाला । सर्प नहुष अहंकारें ॥६३॥
म्हणोनि कार्यांतचि स्वर्गनर्क । सकाम ग्रंथांचें फोल कौतुक । मिथ्या कल्पनांत भुलले लोक । स्वार्थियांच्या ॥६४॥
म्हणती कावळयाने पिंड नेला । तरीच तो स्वर्गाला गेला । नाहीतरि आत्मा अटकला । त्याचा कोठे ॥६५॥
हें म्हणणें कसेसेंचि वाटतें । पिंडाचें नाही महत्त्व येथे । महत्त्वाचें असे काय केलें तें । जन्मा येवोनि मानवाच्या ॥६६॥
मेल्यावरि दहा दिवस भ्रमतो । जीव पिंड देतां स्वर्गी जातो । नाहीतरि तो नर्की पडतो । ऐसें म्हणणें व्यर्थ असे ॥६७॥
त्याने केलें असेल उत्तम कर्म । तरीच पावेल उत्तम धाम । नाहीतरि पुन्हा अधम । योनींत जाणें स्वाभाविक ॥६८॥
प्राणी आपुल्याच कर्म-स्वभावें । भोगी उत्तम-अधम फळ बरवें । हें पिंडदानाने बदलोनि जावें । ऐसें नाही ॥६९॥
ज्याने सुकृतचि नाही केलें । त्याचे कितीहि पिंड उचलले । म्हणोनि काय उन्नत झालें । जीवन त्याचें ? ॥७०॥
भिक्षुकाघरीं दिली गाय । तिचें शेपूट धरोनि काय । वैतरणी नदी तरोनि जाय । गेलेला जीव ? ॥७१॥
हा तों आहे कर्मठ सोहळा । सग्यासोयर्यांचा विरंगुळा । पुत्रपौत्रांचा पुरवावया लळा । दिला निर्वाळा समाधाना ॥७२॥
टीका न करणें मृत्युग्रंथांची । तीहि असे साधना भावनातृप्तीची । परि यांतचि सार्थकता जीवाची । ऐसें आम्ही मानूं ना ॥७३॥
मृत्यु पावे त्यांचे नांव राहावें । म्हणोनि समाजसेवेस कांही द्यावें । त्याच्या सदगुणांचे गोडवे गावे । आपणहि तैसें व्हावया ॥७४॥
खरा पिंड आपणचि उचलावा । कर्तव्य करोनि जीव भूषवावा । त्यानेच पावेल कीर्ति जीवा । उज्ज्वल साची ॥७५॥
नाहीतरि मेला की रडावें । जिवंतपणीं लक्ष न द्यावें । ऐसें ढोंग कासायासि करावें । समाजाने ? ॥७६॥
जिवंत असतां रोटी ना दे । मेलियावरि वाजवी वाद्यें । कावळयासि पिंड, इतरां दक्षणा दे । म्हणोनि साधे काय त्यानें ? ॥७७॥
श्राध्दासाठी धन उधळावें । लोकलाजेस्तव मरावें । ऐसें कासया करावें । मूर्खपणें ? ॥७८॥
गेला जीव न राहे थांबून । वर्षमासाअंतीं घ्यावया भोजन । आपुलें घेवोनि पापपुण्य । फळ भोगाया पुन्हा जन्मे ॥७९॥
जीव पुन्हा जीवनीं यावा । कांही सत्संगतीस लागावा । मागील केलेला दोष चुकावा । म्हणोनि करावा सुसंकल्प ॥८०॥
किंवा त्याचें गुणवैभव । श्रध्देने आठवावें सर्व । हेंचि श्राध्द असे अपूर्व । श्रध्दांजलीरूप ॥८१॥
त्याची कीर्ति राहावी लोकीं । म्हणोनि करावीं दानपुण्यें निकीं । आपुल्याच गांवीं कौतुकीं । स्मरण राहील म्हणोनि ॥८२॥
जो कोणी ज्या रोगें मेला । तैसे होऊं नये इतरांला । म्हणोनि गांवीं औषधालयाला । मदत द्यावी त्या निमित्तें ॥८३॥
परि हें जनासि न कळे धर्मगुज । जाती तीर्थीं करोनि कर्ज । त्याने फावतें व्यापारा सहज । तीर्थियांच्या ॥८४॥
कांही सज्जन तीर्थासि जाती । अस्थि-राख भरोनि नेती । म्हणे गंगोदकें नाहीशीं होतीं । पापें त्याचीं ॥८५॥
काश्यां तु मरणान्मुक्ति । ऐसी लोकीं वाढली भ्रांति । गंगाजळीं किडेहि मरती । तरि ते काय मुक्त झाले ? ॥८६॥
काशीवासी भक्त कबीर । समाधीसि निवडती गांव मगहर । ज्यास लोक म्हणती नर्कद्वार । तीच उध्दारभूमि झाली ॥८७॥
जन्मभरि सूत विणोन । प्रकट देखिला जनीं जनार्दन । त्या भक्त कबीराचें महिमान । गंगेंतील पाषाण जाणती कैसे ॥८८॥
जन्मवरि दोषकृत्यें केलीं । त्यावेळीं नाही गंगेंत ठरविलीं । आता हाडें टाकोनि झाली । सदगति म्हणे जीवाची ॥८९॥
हें सांगणारे आणि करणारे । यांना पोटापाण्याचें भरलें वारें । म्हणोनि मेल्यावरि करिती सारे । जिवंतपणीं न सांगती ॥९०॥
अहो ! ज्यांत मनचि नसतें । तें करोनिहि वाया जातें । मन देह मन दोन्ही नाहीत जेथे । तेथे काय घडवावें ? ॥९१॥
परि पंडेपुजारी सांगती गौरवें । तुमच्या वडिला स्वर्गीं पाठवावें । तरि बोला दक्षणा काय द्याल भावें । आम्हांलागी ? ॥९२॥
बिचारा भोळाभाळा शेतकरी । मजूर अथवा भाविक व्यवहारी । म्हणे कर्ज करोनि देतों पुरी । दक्षणा तुम्हां ॥९३॥
परि आमचे वाडवडील । स्वर्गाला कधी पाठवाल ? म्हणूनि रडतो टेकवूनि भाल । पंडयापुढे ॥९४॥
ऐशा अंधश्रध्देसि वाढवोनि । धूर्त घेती स्वार्थ साधूनि । हें महापाप असे जनीं । निकष्टिकांचें ॥९५॥
वास्तविक ऐसी वेळ आली । त्यास पाहिजे संधी साधली । सांगावी पंडयाभिक्षुकांनी भली । युक्ति त्यासि ॥९६॥
” तुझे पितर स्वर्गांत जावे । ऐसें घेतलें तुझ्या जीवें । तरि त्यास संकल्प लागती करावे । गंगेमाजी ॥९७॥
मी पितर स्वर्गी जाण्यासाठी । संकल्प करितों जीवें पोटीं । दारू गांजा भांग आदि ओठीं । नाही लावणार जन्मभरि ॥९८॥
नाही करणार दुर्व्यवहार । नाही फसविणार दीनपामर । देईन सर्वांसि सहकार । सत्सेवेसाठी ” ॥९९॥
ऐसें जरि पंडयांनी करविलें । तरि त्यांचेहि उदर भरलें । आणि लोकांचेंहि कल्याण झालें । ऐसें होय ॥१००॥
परि पंडयाचि व्यसनी दुराचारी । फुकट लुटाया खटपट करी । तरि तो कैसेनि उध्दरी । समाजासि ? ॥१०१॥
म्हणोनि आंधळा कर्मठपणा । हा वाढवूंच न द्यावा कोणा । गांवगंगा म्हणोनि जाणा । तिलाच सर्व अर्पावें ॥१०२॥
गांवचा तलाव अथवा नदी । सुंदर पहावी विहीर आदि । स्नान करोनि साधावी शुध्दि । प्रभूला आठव द्यावा त्याचा ॥१०३॥
त्याचे निमित्ताने करावें सत्कार्य । कासया बघावें तीर्थ बाह्य । देव सर्वांठायींच आहे । सदासर्वकाळ ॥१०४॥
म्हणोनि हें साधन बदलावें । गांवीच सर्वकांही करावें । जें जें करणें असेल सदभावें । वळण द्यावें हें सर्वां ॥१०५॥
कोणी प्रेताची समाधी करिती । उगीच जागा गुंतवोनि धरिती । ऐसें करितां सारीच क्षिति । गुंतूनि जाइल त्यायोगें ॥१०६॥
मेला त्याची एक समाधि । जन्मला त्याच्या घरांची गर्दी । मग उरेल काय भूमि कधी । जगण्यासाठी इतरांना ? ॥१०७॥
जिवंत मानवां नाही घर । कष्टाळूंना नाही वावर । तेथे समाधीचें अवडंबर । मृतासाठी कासयासि ? ॥१०८॥
म्हणोनि सरळचि ऐसें करावें । मृतदेहाचे लोभी न व्हावें । पंचतत्त्वांशीं त्यास मिळवावें । अग्निसंस्कार देवोनि ॥१०९॥
स्मरण म्हणोनि घरीं वा गांवीं । योग्यशी तसबीर लावावी । वेळोवेळीं आठवण करावी । सदगुणी पुरुष म्हणोनि ॥११०॥
कुणाचीहि समाधि करोनि ठेवणें । हीं तंव आसक्तीचीं लक्षणें । समाधि करोनि काय होणें-जाणें । सांगा मज ॥१११॥
समाधि करोनि दर्शन होतें । तेंचि चित्र पाहोनि मनांत येतें । मनांत येण्याचेंचि महत्त्व येथे । सर्वात मुख्य ॥११२॥
वाटल्यास उत्तम स्थान करावें । ज्यात लोकशिक्षण चालेल बरवें । स्मरणार्थ म्हणोनि अर्पोनि द्यावें । गांवलोकांसि ॥११३॥
ऐसी आहे सहजस्थिति । त्यासि कासया करावी विकृति ? जेणें समाज राहे सुस्थितीं । तीच महती वाढवावी ॥११४॥
मानव असो वा पशुपक्षी । न कराव्या त्यांच्या समाधि साक्षी । जिवंत समाज ठेवोनि लक्षीं । करावें कार्य सुस्थितीचें ॥११५॥
त्या दृष्टीनेचि भिन्न संस्कार । भिन्न वेळांचें महत्त्व थोर । लक्षूनि करावें सर्वांनी सुंदर । साजे तैसें ग्रामराज्या ॥११६॥
मृत्यु असो वा जन्मादि उत्सव । यांचा नुसता नको गौरव । गांवाचें वाढवावें वैभव । बचत करोनि, तुकडया म्हणे ॥११७॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरुशास्त्र-स्वानुभव संमत । कथिला अन्त्यसंस्कार उचित । बाविसावा अध्याय संपूर्ण ॥११८॥
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
*******************
ग्रामगीता अध्याय तेविसावा
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
श्रोतियांनी प्रश्न केला । आपण विवाह आणि मृत्युसंस्कार कथिला । तो आमुच्याहि मनीं वाटला । उत्तम ऐसा ॥१॥
परि जन्मादि उत्सव बरवे । आनंद लाभे सणोत्सवें । तेणें ग्रामजीवन चेतना पावे । विरंगुळा हाचि सर्वांसि ॥२॥
तयांसि आपण गौण ठरविलें । याचें कारण पाहिजे बोलिलें । तरि आता उत्तर ऐकिलें । पाहिजे श्रोतीं ॥३॥
आजचे करूं जातां सणवार । दिवस न पुरती वर्षभर । त्यांत जयंत्या-पुण्यतिथ्या येती फार । वाढदिवस निराळे ॥४॥
हे सर्वचि पाहिजेत केले । तरि कामधंदे सर्व गेले । एवढेंच करोनि सर्व भागलें । होईल कैसें ? ॥५॥
म्हणोनि त्यांत सानथोर निवडावे । तारतम्याने करीत जावे । प्रसंगमान पाहोनि वर्तावें । सर्वकाळ ॥६॥
जें जें करावें तें समजोन । सांगतां यावें त्याचें कारण । उगीच लाडूपेढे खाया जयंतिदिन । पाळूं नये ॥७॥
पूर्वजांनी जो हेतु योजिला । तो पाहिजे समजोनि घेतला । त्याचि उद्देशाप्रमाणे झाला । पाहिजे सणवार ॥८॥
भारतवर्षाची चालीरीति । अत्यंत योजनाबध्द होती । त्याने सहज चाले सुस्थिति । समाजाची ॥९॥
तेंचि पुन्हा उजळावें । म्हणोनि बोलिलों सहजभावें । तत्त्वता उत्सवासि गौणत्व द्यावें । ऐसें नाही ॥१०॥
उत्सवप्रिय मानवाचा स्वभाव । सणवारमुहूर्ताचा त्यासि गौरव । विशेष कार्यासाठी धाव । नेहमी त्याची ॥११॥
विशेष कांही कार्य व्हावें । ऐसें घेतलें त्याच्या जीवें । न घे आढेवेढे, मनोभावें । खर्च करी मनमाने ॥१२॥
ऐसें उत्सवाचें नांव घेवोनि । धन व्यर्थ उधळूं नये कोणी । तें लागावें सत्कारणीं । बोलिलों म्हणोनि बचत करा ॥१३॥
नाहीतरि घरीं दिवाळी केली । दिवाळें निघावयाची सोय झाली । जनता हसेल गांवांतली । हौसी नटराज म्हणोनि ॥१४॥
तैसी होऊं न द्यावी फजीती । बसावें तरि सर्वांचे पंगतीं । परि होऊं न द्यावी जीवनाची माती । कधीहि आपुत्या ॥१५॥
एके दिवशीं सण केला । तें भोगणें आलें दुसर्या दिवसाला । ऐसा कोणीच नाही सांगितला । गृहस्थ-धर्म ॥१६॥
पुढेहि आहेत सणवार । समजोनि करावा विचार । प्रसंग येती पुढे थोर । त्यासहि देणें सहकार्य ॥१७॥
कांही प्रसंगमानासाठी । पैसा ठेविला पाहिजे गांठीं । सण येतांचि उठाउठी । खर्चूं नये सर्व शक्ति ॥१८॥
कोणीहि करितां सणोत्सव । पाहावी आपुली आधी उणीव । मग पुढे टाकावा पाय रेखीव । हर्षासाठी ॥१९॥
चार जणांसि मिळवावें । आनंदीआनंद करीत राहावें । त्यांतूनि नेहमीचे धडे घ्यावे । वागण्यासाठी ॥२०॥
वाढवितां यावें जीवनज्ञान । कधीहि न वाढावेत दुर्गुण । मग करावें निर्भय मन । प्रसंगासाठी ॥२१॥
कांही सण घरीं करावे । कांही सार्वजनिक जागीं ठरवावे । सर्व मिळोनि उचलीत जावे । ओझे कांही ॥२२॥
उत्सवाच्या निमित्ताने । सुंदर करावीं सहभोजनें । बंधुप्रेम वाढेल जेणें । आचरावें तैसेंचि ॥२३॥
घरोघरच्या शिदोर्या आणून । अथवा स्वयंपाक सर्वांमिळून । तेणें प्रेमानंद ये उचंबळून । एकत्र खातां ॥२४॥
असला नसला प्रसादचि द्यावा । प्रसंग गोड करोनि घ्यावा । परि खाण्यांतचि वेळ न जावा । समाजाचा ॥२५॥
सुंदर करावें कथाकीर्तन । दिंडया खेळ मनोरंजन । परि लागावी उत्तम चालचलन । समाजासि ॥२६॥
खरा उत्सव रोजचें कर्म । विचारें सांभाळावा धर्म । परि नैमित्तिक सणांचेंहि वर्म । जाणोनिया आचरावें ॥२७॥
दत्तजयंति रामनवमी । हनुमानजयंति गोकुळाष्टमी । शिवरात्रि आषाढी ऋषिपंचमी । विविध कार्यांनी पाळावी ॥२८॥
वटसावित्री शारदोत्सव । रक्षाबंधन संक्रांतिपर्व । गौरीपूजनादि महिलांचे उत्सव । सामुदायिक करावे ॥२९॥
उद्योगदिन स्नेहसंमेलन । बलोत्कर्ष आणि प्रार्थनादिन । गीताजयंतीस बुध्दिविकासदिन । पंचमहोत्सव आवश्यक ॥३०॥
सर्व जाती-जमाती मिळून । हळदकुंकू तिळगूळ सुवर्णदान । चढाओढी ग्रामशुध्दि रामधून । भाषणें आदि करावीं ॥३१॥
तैसाचि आला पोळा सण । हाहि आहे महत्त्वपूर्ण । यांत ठेवावें बैलांचें प्रदर्शन । शेती-सामानासहित ॥३२॥
उत्तम रांगेंत बैल ठेवावा । साजेल तैसा अंगीं भूषवावा । त्यांत ज्याची सफल सेवा । त्याचा गौरव त्या दिवशीं ॥३३॥
कोणीं जोडी उत्तम ठेवली । कोण बैलास खुराग घाली । इनामें द्यावीं त्यांस भलीं । सर्व गांवकर्यांनी ॥३४॥
कोणाचें उत्तम शेतीसाधन । कोणीं ठेवले नोकर प्रसन्न । त्याचें वाढवावें उच्च स्थान । पोळयाचिया शुभदिनीं ॥३५॥
घरोघरीं जोडी फिरवावी । मिरवीत मिरवीत घरीं न्यावी । इनामपोळी माणसांनी घ्यावी । प्रसन्न ठेवावी वृत्ति त्यांची ॥३६॥
कांही पाडवां जुगार खेळती । ही आहे समाजाची अधोगती । कांही लोक जिंकोनि जाती । कांही हरती वस्त्रेंहि ॥३७॥
ऐसी रीति बंद करावी । हवीं तर दंगलेंहि भरवावीं । कामगारासि इनामें द्यावीं । काटक चपल म्हणोनिया ॥३८॥
ऐसाचि आहे दशहरादिन । विजयादशमी उत्साहपूर्ण । त्याने वाढे स्नेहसंघटन । उत्तम गांवीं ॥३९॥
सगळयांनी मिळोनि मिरवीत जावें । थोर पुरुषांचे गोडवे गावे । पूर्वऋषींचें कौतुक करावें । गौरवावें राष्ट्रासि ॥४०॥
ते दिनीं उत्तम संकल्प करावा । आपुलें तें सर्वांचें हा बोध घ्यावा । मतभेद समूळचि विसरावा । सोनें देवोनि एकमेकां ॥४१॥
पुढे वितंडणेंचि नसावें । सकळांनी सकळांसि वंदावें । परस्परांचे आशीश घ्यावे । बंधु-बंधु म्हणोनि ॥४२॥
मिरवीत मिरवीत यावें घरीं । संतदेवासि वंदोनि अंतरीं । वाडवडिलांचे वरदहस्त शिरीं । धारण करावे कौतुकाने ॥४३॥
नवीन कार्यसंकल्प करावा । मग वर्षभरि तो टिकवावा । ऐसा सोहळा सगळयांनी साधावा । एकात्मतेने ॥४४॥
दिवाळीचा सण आला । सर्वांनीच पाहिजे केला । परि पाहावा कोण राहिला । भुकेला घरीं ॥४५॥
त्यास आमंत्रित करावें । गोडधड भोजन द्यावें । परस्परांनी मिळून चालवावें । वैभव सर्वांचें ॥४६॥
गांवचें एकचि असावें लक्ष्मीपूजन । प्रचंड मंडपीं करोनि स्थान । सर्वांस द्यावें फराळ भोजन । सर्वांमिळोनि ॥४७॥
आनंद उसळावा घरोघरीं । सुखी गायीवासरें नरनारी । भाऊबहिणीचें परोपरीं । नातें वाढे ऐसें व्हावें ॥४८॥
बंधुभाव भगिनीपण । हें नातें ओसरलें समाजांतून । तें वाढाया नव्या पीढींत पूर्ण । योजना भाऊबीजेची ॥४९॥
तैसेंचि भरवावें गोप्रदर्शन । कोणत्या गायी दुधाळ पूर्ण । कोणता वळू गुणसंपन्न । उंचपुरा पहावा ॥५०॥
तो सगळयांनी गौरवावा । सर्वांमिळोनि इनाम द्यावा । गायीगुरांचा महिमा पटवावा । सर्व जना ॥५१॥
आपापली गाय प्रभावी । पुढे करावयासि सांगावी । पुढची गुढी उभारावी । इनाम देऊं म्हणोनि ॥५२॥
तैसेंचि वाढवावें खताचें महिमान । नर्कासुरास निमित्त करून । शेणखतादिकांचें वर्णन । विशद करून सांगावें ॥५३॥
याच खतामुताच्या संयोगें । शेती उत्तम राहोनि पिके । म्हणोनि सर्वांनी योग्य खळगे । करोनि खत सांभाळावें ॥५४॥
शेतीमाजीच शेणदि जावें । तरीच भूमिमाता पावे । हें घरोघरीं सांगावें । हाचि खरा दिवाळसण ॥५५॥
गांवीं ज्याने लक्ष्मी नांदे । लोक जगतील आनंदें । ऐशा प्रयत्नांनीच साधे । खरी दिवाळी ॥५६॥
बारा महिन्यानी दिवाळी आली । घरेंदारें स्वच्छ झालीं । भिंत-ओसरी सारवोनि ठेविली । रंगरंगोटी लावोनि ॥५७॥
दुसरे दिवशीं सडा नाही । झाडझूड तीहि नाही । घाण पसरली सर्वहि । जिकडे तिकडे ॥५८॥
ऐसी करितां दसरादिवाळी । अवदशाचि येई कपाळीं । त्यापेक्षा रोज सकाळीं । उठणें हाचि दिवाळसण ॥५९॥
सण म्हणोनि करावें अभ्यंगस्नान । नाहीतरि फासावें वंगण । हें कोठचें शहाणपण । शिकलों आम्ही ? ॥६०॥
रोजचि थोडें करीत जावें । स्नानध्यान पाठादि बरवें । श्रम करोनि सौंदर्य वाढवावें । घरींदारीं ॥६१॥
दिवाळींचें निमित्त करोनि । स्वच्छता पवित्रता शिकावी सर्वांनी । उकिरडाहि नीट करोनि । दिवा लावावा स्वच्छतेचा ॥६२॥
नेहमी स्वच्छ ठेवावें घर । श्रम करावेत अंगभर । हाचि खरा सणवार । नित्य सुंदर वर्तणूक ॥६३॥
जो नेहमीच स्वच्छता करी । त्याने उत्सव पाळले सर्वतोपरीं । उत्तम जेवावी भाजीभाकरी । देवादिकां अर्पोनि ॥६४॥
ऐसें व्रत जो सांभाळी । त्याची खरी दसरादिवाळी । नाहीतरि समजा होळी । आपुल्या सार्या जीवनाची ॥६५॥
होळीचा आला शिमगासण । त्यांत मोठी मारहाण । लोक इभ्रतमान सोडोन । पळती मार्गी वेडेसे ॥६६॥
हा वाढला विचित्रपणा । ऐसा नोहे शिमगा जाणा । त्यांतहि आहे तात्विकपणा । घेण्यासारिखा समाजा ॥६७॥
याच दिवशीं प्रल्हादाची छळणा । केली होती होळीने जाणा । परि दु:ख न झालें प्रल्हादप्राणा । हरिभक्त म्हणोनि ॥६८॥
शेवटीं छळणारेचि जळले । हें गांवासि कौतुक झालें । म्हणोनि जन ओरडले । उपहास त्यांच करोनि ॥६९॥
त्याच दिवशीं शंकराने । काम जाळिला तिसर्या नयनें । म्हणोनि कामास धिक्कारिलें भूतसेनेने । हलकल्लोळ करोनि ॥७०॥
त्याच दिवशीं सज्जनांनी । वार्षिक यज्ञाची केली आखणी । संपूर्ण गांव साफ करोनि । द्यावें पेटवोनि कैचण तें ॥७१॥
त्याच्या प्रकाशीं सर्वांनी जमावें । आपलें दुष्कृत्य निवेदावें । पुढे तैसें न करण्याचें योजावें । अनुतापाने ॥७२॥
हें मनोधैर्य कमी पडलें । म्हणोनि दुसरे जन ओरडले । गांवाचें पाप धुवोनि काढले । ऐसियापरीं ॥७३॥
पुढे याचा विपर्यास झाला । शिवीगाळ देती परस्पराला । पोथ्याहि सांगती अभद्र बोला । मूळ त्याचें न जाणतां ॥७४॥
म्हणती कोणी वर्षातून । शिव्यासाठीच एक दिन । परि सज्जनासि याचें काय कारण ? ये उत्तेजन दुर्जना ॥७५॥
या सणीं मुख्य धूलिवंदन । जें ग्रामसफाईचें प्राचीन चिन्ह । अस्पृश्यांनाहि स्पर्शावें म्हणून । सांगितलें ग्रंथीं त्या दिवशीं ॥७६॥
आधी सार्वजनिक अग्निपूजन । त्यांत वाईट वृत्तींचें दहन । मग राख न्यावी उकिरडीं पूर्ण । करावें स्नान समुदायें ॥७७॥
ऐसा ग्रामसेवेचा आनंद । त्याने परस्परां लाविला सुगंध । प्रसन्नता दाखवाया विशद । योजिला प्रसंग रंजनाचा ॥७८॥
ठिकठिकाणीं गाणें वाजवणें । रंगगुलाल आदि उधळणें । प्रसन्न ठेवावया मानवी मनें । शिमगा सण योजिला ॥७९॥
राजेरजवाडयांचिया दरबारीं । त्यास रूप आलें शृंगारी । श्रीकृष्णाचिया नांवें रंगपिचकारी । उघविण्याचें ॥८०॥
गांवीं वेगळाचि विपर्यास झाला । ग्रामशुध्दीचा उद्देश गेला । नालीमोरींचा उडवोनि मैला । दु:ख देती जनतेसि ॥८१॥
कुणाचीं लाकडें चोरूनि नेती । घरच्या वस्तूहि होळींत टाकती । गाडी घोडयांचें सामान जाळती । खाट नेती स्मशानीं ॥८२॥
या सणाने होतें सणसण । गांव दिसूं लागतें भणभण । ऐसा हा प्रसंग वाईट म्हणोन । करिती टिका धीर प्राणी ॥८३॥
परि यासि वळण लावावें । ऐसें वेडेपण होऊं न द्यावें । त्यांत सौंदर्य पावित्र्य भरावें । गाणें वाजवणें ठेवोनि ॥८४॥
होळी निमित्तें जमवोनि नरनारी । घ्याव्या कवायती मोहल्ल्यावरि । ग्रामसुधारक नाटिका बरी । मनोरंजनासि योजावी ॥८५॥
होळी म्हणजे ग्रामशुध्दिजन । तैसेचि मातृदिन बालकदिन । श्रमिकदिन मानवतादिन । स्वातंत्र्यदिनादि कितीतरी ॥८६॥
तैसेचि अनेक लहान सण । सर्वांत असावें तत्त्वानुसंधान । उदरपूर्तीचें दिखाऊ साधन । ऐसें झालें तरि व्यर्थ ॥८७॥
प्रगतीसाठी सणवार करावे । कांही सण एके ठायींच घडवावे । सर्वांमिळोनि आचरावें । सहकार्याने ॥८८॥
पूर्वी घरोघरीं गणेशोत्सव । नाना रूढयांचे उपद्रव । लोकमान्यांनी आणिलें महत्त्व । राष्ट्रीय रूपें तयासि ॥८९॥
गांवाचा एकचि गणपति । सर्वांसाठी कार्यक्रम होती । जेणें वाढेल राष्ट्रीय वृत्ति ऐसी असावी धारणा ॥९०॥
तोचि उत्तम सण, उत्सव , दिन । जो राष्ट्रीय वृत्तीने पूर्ण । हेंचि घडावया महाकारण । संतीं बोधिलें समाजा ॥९१॥
जनता असते उत्सवप्रिय । म्हणोनि त्या मार्गेचि लावावी सोय । राष्ट्रीय भावना जागे निर्भय । तोचि करावा उत्सव ॥९२॥
विशेष निमित्तें संघटित व्हावें । सर्वांमिळोनि कार्य करावें । जेणें बोझ न पडावा जीवें । कोणावरि ॥९३॥
नाहीतरि आपुलें मनोरंजन । त्यासाठी जावे दुसर्यांचे प्राण । ऐसें करील जो उत्सव सण । तो तो हीन या लोकीं ॥९४॥
परका सुखी आपणहि सुखी । तत्पर परस्परांचे कौतुकीं । वागणूक सर्वांची सारखी । सर्वांसाठी असावी ॥९५॥
ही मानव्यबुध्दि उपजावया । गांवोगांवीं बदलावी उत्सवप्रक्रिया । जेणें धडा मिळे लोकांसि या । नेहमी वागणुकीसाठी ॥९६॥
सकल धर्मामाजी सणवार । याचिसाठी केले सानथोर । जेणें मनुष्याची कदर । मनुष्य करील सर्वदा ॥९७॥
सामुदायिकता वाढे सर्वत्र । हेंचि सणवारांचें मूळसूत्र । सामुदायिकपणाचा प्रकार । तोंचि खरा उत्सव ॥९८॥
ज्या दिवशीं गांव झालें एक । तोचि उत्सवदिन अलौकिक । ओळखूं न येती रावरंक । उत्सवामाजी ॥९९॥
ज्यासि नाही त्यासि देणें । जो बिघडला त्या सरळ करणें । आप्त समजोनि उचलोनि घेणें । पडला त्या सर्वतोपरीं ॥१००॥
हेंचिं खरें औदर्य आहे । गांवाच्या सुखांत उत्सव पाहे । तेणें सदाचा सणवार राहे । आपुल्या गांवीं ॥१०१॥
पूर्वी गांवीं बारा बलुते । अठरापगड जातीचे जत्थे । परस्परांवरि अवलंबून होतें । सहकारी जीवन ॥१०२॥
कोळी जाळें घेवोनि येई । सोनार जिवती लावोनि देई । न्हावी धोबी गोवळी नेई । धान्यादिक सणावारीं ॥१०३॥
परि तो आता नुरला कायदा । उत्सवास येणें हा नव्हे फायदा । सणवार सांगणें हा नव्हे धंदा । कोणाच्याहि पोटाचा ॥१०४॥
ही आहे निर्मळ सेवा । उजळावया अंतरींचा दिवा । पोट भरण्याचा प्रश्न उत्सवां । आणोंचि नये ॥१०५॥
सकळांनी कामधाम करावें । उरल्यावेळीं सणवार सांगावे । मंडपादि करण्यास लागावें । सेवाभावें सर्वांनी ॥१०६॥
ऐसें सांगणें हें निराळें । परि त्या निमित्ताने भुलवावे भोळे । तेणें घोटाळोनि लोक सगळे । नास्तिक जैसे बोलती ॥१०७॥
श्रम-विभागणी होती पूर्वी । त्यांतूनि ही वाढली स्वार्थचवी । त्याच कामीं लागले भिक्षुकगोसावी । नांव बुडवाया पूर्वजांचें ॥१०८॥
जो कोणी एवढेंचि करी । त्यासि गांवाने द्यावी चाकरी । उदर भरण्याची व्यवस्था पुरी । परिश्रमाने सर्वकाळ ॥१०९॥
बेकारी न ठेवावी ग्रामाप्रति । उधळपट्टी न करावी कोणेरीतीं । उत्सवाने उत्तम गति । लागे तैसेंचि करावें ॥११०॥
उत्तमगति तोचि उत्सव । एरव्ही मोलें घेतले उपद्रव । तैसें न व्हाया करावें गांव । संघटित आणि क्रियाशील ॥१११॥
साधावा कार्याचा उसाह । तोचि उत्सव नि:संदेह । तुकडया म्हणे गांवीं प्रवाह । वाहूं द्या शांतिसुखाचा ॥११२॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुणशास्त्र-स्वानुभव-संमत । कथिला सणोत्सवांचा मुख्यार्थ । तेविसावा अध्याय संपूर्ण ॥११३॥
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
*********************
ग्रामगीता अध्याय चोविसावा
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
श्रोतयाने केला प्रश्न । गांवीं संप्रदाय असती भिन्न । वेगवेगळे त्यांचे एकूण । देवधर्म उत्सवादि ॥१॥
ते सार्वजनिक उत्सवींहि येती । तरी आपणांसि वेगळे समजती । आपापली भिन्न मानूनि संस्कृति । चालती सर्व ॥२॥
त्यांचे फड निरनिराळे । साजविती भिन्न देवळें । कोठे प्रतिमापूजेचे सोहळे । कोणी मूर्तिविरोधक ॥३॥
कित्येकांची तीर्थी धाव । ते इतरांसहि देती उठाव । इकडे ओस पडलें गांव । तरी पर्वा नाही ॥४॥
या सर्वांचीं मतें वेगळीं । भिन्न त्यांची संतमंडळी । एकएकाची करितो टवाळी । आपाआपुल्या गोटांत ॥५॥
वेगवेगळया शिष्यशाखा । वेगवेगळे गुरु देखा । कोणी न मिळती एक-एका । करिती उत्सव आपुले ॥६॥
खरें-खोटें ज्ञान कांही । अंधरूढया शिकविती पाही । गट पडले भिन्न भाविकांचेहि । मिरविती द्वाही आपुलाली ॥७॥
हे जोंवरी एक न होती । तोंवरी संघटनेची फजीती । यासि उपाय करावा कोणेरीतीं । तेंचि आम्हां सांगावें ॥८॥
श्रोतयांचा प्रश्न मार्मिक । उत्तर ऐका आवश्यक । गांवापासोनि विश्वापर्यंत देख । जरूरी याची ॥९॥
भिन्न भिन्न झाले गट । वेगवेगळे पडले तट । आकुंचित मतें शिकविती रोगट । समाजासि ॥१०॥
अंधश्रध्देस आणोनि पूर । लोकीं रुजविती मिथ्याचार । त्यांच्या उत्सवांचे प्रकार । विचित्रचि असती ॥११॥
अपार धनाची धुळधाणी । अनिष्ट प्रथांची पेरणी । फुटीर वृत्ति वाढेल जनीं । ऐसी करणी कितीकांची ॥१२॥
कित्येक बुवा वेषधारी । जगती ऐशा गटांवरि । खरें ज्ञान न देती स्वार्थभरीं । जनतेलागी ॥१३॥
ऐसें हें जोंवरि चाले । तोंवरि गांव भ्रमीं बुडालें । सुधारणेच्या मार्गी आले । दरी-दरकुटे ॥१४॥
यासाठी एकचि उपाय । आपण न ठेवावे अलग ठाय । त्यांच्यांत जावें मिळोनि निर्भय । समुदाय साधाया ॥१५॥
असो कोणाचा कोणता पंथ । असो कोणीहि बुवा महंत । सर्वा आपुलेचि मानोनि सतत । जावें मिळोनि सर्वांशीं ॥१६॥
पंच महोत्सवचि आपुले । येर ते तुच्छ मानतां चुकलें । आपण अलग पडतां कसलें । साधेल ऐक्य ? ॥१७॥
म्हणोनि निर्वाळा सांगतो । जेव्हा संतजयंति पुण्यदिन येतो । तेव्हा सगळयांमिळोनि करावा तो । सार्वजनिक स्थानीं ॥१८॥
मग तो असो कोण्या पंथाचा । वेगळी न ठेवावी वाचा । संतसज्जन सखा विश्वाचा । म्हणोनिया ॥१९॥
सर्व पंथांचे उत्सव । ज्यांत दिसेल सत्यगौरव । त्यांतूनि विशालतेचे भाव । भरावे लोकीं ॥२०॥
एकलकोंडे राहूं नये । घरींच उत्सव करूं नये । सर्वांचें सहकार्य घ्यावें । हेंचि मर्म संघटनेचें ॥२१॥
उत्सवाचा व्हावा परिणाम । म्हणोनि प्रभावी ठेवावे कार्यक्रम । थोरांचें भाषण भजन उत्तम । करावें तेथे ॥२२॥
करितां संतांचा गुणगौरव । सांगूं नये चमत्कारलाघव । पाडवा उत्तम वागणुकीचा प्रभाव । समाजावरि ॥२३॥
संत ज्ञानेश्वर, तुकाराम । नामदेव, सांवता, चोखा अनुपम । एकनाथ, दामाजी भागवतोत्तम । वर्णावे लोकीं ॥२४॥
सजन कसाई, रविदास चांभार । सेना, संताजी, गोराकुंभार । कृष्णदयार्णव, वामन, श्रीधर । संतकवीहि ॥२५॥
रामदास, तुलसीदास । केशवदास, कबीरदास । सुंदरदास, विष्णुदास । सूरदासादि ॥२६॥
शंकराचार्य, रामानुजाचार्य । मध्वाचार्य, वल्लाभाचार्य । राधास्वामी, बसवाचार्य । रमणमहर्षि, श्रीचक्रधर ॥२७॥
शहादत्त, गोरखनाथ । गोविंदनाथ, दयाळनाथ । नरसी मेहता, रामतीर्थ । श्रीसमर्थ आडकोजी ॥२८॥
महात्मा मंसूर, महंमद । कवेंरराम, शेखफरीद । झरतुष्ट्र आणि गौतमबुध्द । विवेकानंद प्रभावी ॥२९॥
गुरु गोविंदसिंह, नानकदेव । महाचैतन्य गौरांगदेव । रामकृष्ण परमहंसदेव । जैन महावीर स्वामी ॥३०॥
महात्मा येशु, टालस्टाय । मार्क्स, साक्रेटीस निर्भय । महात्मागांधी, राममोहनराय । दयानंदादि महाज्ञानी ॥३१॥
भक्त मीराबाई, मुक्ताबाई । कान्होपात्रा, जनाबाई । रंगनायकी, बहिणाबाई । एनिबेझंट, निवेदिता ॥३२॥
ऐसे जे जे योग्य प्रभावें । त्यांचें चारित्र्य समजोनि द्यावें । त्यांनी समाजकार्या गौरवें । काय दाविलें जनतेसि ॥३३॥
ऐसियांची पुण्यतिथि आदि करावी । सर्वांची प्रार्थना घ्यावी । उत्तम वक्त्यांनी चरित्रें बोलावीं । परिणाम होईल त्या शब्दीं ॥३४॥
त्यांची विशालता समजोनि द्यावी । समान भावना अनुसरवावी । समाजानेहि तैशीच करावी । प्रगति आपुली म्हणोनि ॥३५॥
संत देहांनी भिन्न असती । परि ध्येयधोरणानें अभिन्न स्थिति । साधनें जरी नाना दिसती । तरी सिध्दान्तमति सारिखी ॥३६॥
ऐसें सांगतां अभ्यासें वर्णूंन । भिन्न संप्रदायांचें होईल मिलन । होईल बुवाबाजीचेंहि खंडन । सर्वतोपरीं ॥३७॥
नाहीतरि पंथांचे पडती गट । सहकार्याचा भंगे तट । पोटभरू दांभिकांचे पोट । चालतसे तयावरि ॥३८॥
आपापल्या भाविक जना । भुलविती उत्सवादिकीं नाना । अंधश्रध्देने होय धिंगाणा । ग्रामजीवनाचा ॥३९॥
म्हणोनि आणावे मैदानावरी । आकुंचितपण सारोनि दुरी । मग सत्यचि बोलेल वैखरी । सर्वामुखीं मंगल ॥४०॥
गांवीं येवोत संत कोणी । बोध करवावा प्रार्थनीं । अथवा सार्वजनिक स्थानीं । सर्वांसाठीं उत्सवादिकीं ॥४१॥
तेथे न सांगवेल भाकडकथा । न पाळवेल अनिष्टप्रथा । मार्ग लाभेल आइता । लोकां सत्य ज्ञानाचा ॥४२॥
ज्ञानाचिया भूमिकेवरि । फारशा भेदासि न उरे उरी । मिळते जुळते बोल बहुपरी । निघती सर्वांचे ॥४३॥
तेणें निरसेल भेद-कल्पना । तात्त्विकताचि कळेल जना । पंथबाजीच्या उच्चाटना । उपाय हा अमोलिक ॥४४॥
जेथे लोक समभावनेने बैसले । तेथे यथार्थचि चर्चा चाले । देव-संत-धर्म-ऐक्य साधे भलें । हळुहळू तेणें ॥४५॥
म्हणोनि ऐसे वारंवार । प्रसंग आणावे गांवीं सुंदर । साधुसज्जन जुळवावे अपार । भिन्न भिन्न पंथांचे ॥४६॥
ऐक्य दृष्टीने संतोत्सव । करावे उत्साहें गांवोगांव । जेणें तीर्थाचा गौरव । लाभेल गांवा ॥४७॥
तीर्थी निर्मल साधुवृंद । तेथे तत्त्वचिंतानुवाद । जनास होईल तत्त्वबोध । म्हणूनीच महत्त्व तीर्थाचें ॥४८॥
एरव्ही तीर्थी धोंडापाणी । देव रोकडा सज्जनीं । ऐसीच वदली संतवाणी । गर्जोनिया ॥४९॥
तैसें आज मार्गदर्शन । जया तीर्थी न होय पूर्ण । तेथे धाव घेवोनि कोण । लाभ या जना ? ॥५०॥
यात्रेस जावें तरि सेवेसाठी । विचारस्फूर्ति आणाया गांठीं । तेणें गांव करावें उठाउठीं । यात्रारूप आपुलें ॥५१॥
परंतु यात्रा करिती चारोधाम । लोकां मागती न करितां काम । यांत न घडे पुण्यकर्म । वाउगा भ्रम अहंकार ॥५२॥
गांवीं उपाशी ठेवोनि बाळां । जावें कासया कुंभमेळां ? देव गांवीं थोडा तीर्थी निराळा । ऐसें नाही ॥५३॥
परि लोक सती पडाया जाती । पंडयादिकांच्यां जाळीं गुंतती । मेंढरापरी धांवोनि मरती । रूढीमागे ॥५४॥
पंढरीपासून सहा कोसांवरि । सांवता राहिला जन्मभरि । देव मिळविला न करितां वारी । गांवींच त्याने ॥५५॥
जनता-जनार्दनाच्या सेवेचें । काम करितां इमानें साचें । गांवींच पुण्य पंढरीचें । धांव घेंई आपैसें ॥५६॥
वसती जेथे ऐसे संत सेवक । तें गांवचि तीर्थ होय सुरेख । स्फूर्ति घेवोनि जाती लोक । कराया गांवें भूवैकुंठ ॥५७॥
जेथे प्रेम आणि पावित्र्य । त्यासीच नाम तीर्थक्षेत्र । कासया जावें गोंधळ विचित्र । बघाया तीर्थी ? ॥५८॥
गांवाचें सार्वजनिक स्थान । तेंचि समजावें तीर्थ महान । तेथेचि लागावें तन-मन-धन । दानशूरांचें ॥५९॥
तीर्थी कोणी खर्च न करावा । आधी गांवमार्ग सुधारावा । तरीच तीर्थाचा पुण्यठेवा । गांवीं मिळेल सेवेने ॥६०॥
वांचवूनि ग्रामसंपत्ति । गांवाची पवित्र घडवावी मूर्ति । मग न जातांहि क्षेत्रीं तीर्थी । पुण्य लाभे ग्रामोध्दारें ॥६१॥
सप्ताह, एक्के, यज्ञ, उत्सव । यासाठी वर्गणी होते ती सर्व । कांही वर्षें सुधाराया गांव । याच कामीं लावावी ॥६२॥
जयंति असो वा पुण्यतिथि । सप्ताह असो वा हवनें, पंगती । पाहावी गांवाची राष्ट्राची स्थिति । तैसेंचि करावें पुण्यकर्म ॥६३॥
सर्व पंथीयांनी मिळावें । सर्वांच्या हिताचें कार्य उभारावें । हेकटपणें भरी न भरावें । भलतियाचि ॥६४॥
नाहीतरि महानुभाव पळे रानीं । देवीभक्त सज्ज होती बलिदानीं । कोणी द्रव्य उधळती शिगर रचोनि । एकलकोंडे ॥६५॥
कोणी वर्गणी गोळा करून । देवीसि देती पशूंची दावण । परि रोग न जाती ग्रामसफाईविण । ऐसे उत्सव केलियाने ॥६६॥
कोणी गांवच्या यात्रेमाजीं । नाना अनिष्ट कामकाजीं । पैसा उधळोनि पेरती समाजीं । जहरचि जैसें ॥६७॥
त्यासाठी करावी यात्रा-कमेटी । यात्रा-मेळा-उत्सव-पर्वणी-हाटीं । करावया सुधारणा उठाउठीं । राष्ट्रीयतेच्या ॥६८॥
ग्रामोन्नतीचीं आयोजनें करावीं । शक्तिबुध्दीने राष्ट्रीयता भरावी । आपुल्या गांवाची कीर्ति जावी । दिगंतरीं तीर्थाऐसी ॥६९॥
गांवीं अथवा गांवाजवळी । यात्रा-मेळा असे ज्या काळीं । तेथे सेवा करावी सगळी । स्वयंसेवक होऊनि ॥७०॥
तैसेंचि आपुल्या गांवचें वैशिष्टय । तें जगापुढे मांडाया स्पष्ट । प्रदर्शन, संमेलन, यात्रादि इष्ट । सुरू करणें आपुल्या गांवीं ॥७१॥
सुंदर मार्ग सरळ निर्मळ । स्वच्छ आरोग्यदायी जळ । ग्रामरचनेंतील आदर्श सकळ । वर्तावेत तेथे ॥७२॥
शौचकूप मुत्र्या चहूं बाजूंनी । नाना वस्तूंच्या ठेवाव्या श्रेणी । जेणें देश चढे उच्च स्थानीं । वैभवाच्या ॥७३॥
नाना मनोरंजनें चालवावीं । परि व्यसनें तमाशे येऊं न द्यावीं । लोकांस हळुहळु लावीत जावी । रुचि राष्ट्रीयतेची ॥७४॥
उद्योगाच्या सुंदर कला । वाद्यकलादि व्यवहारकला । माणुसकीच्या आचारकला । योजाव्या तेथे ॥७५॥
माणसाने मार्गी कैसें चालावें । कैसें बसावें कैसें बोलावें । आपुलें वर्तन कैसें ठेवावें । घरांत आणि समुदायांत ॥७६॥
याचा सुंदर पाठ द्यावा । सर्वांचें ऐक्य शिकवावें गांवा । यात्रा-उत्सवें संचार व्हावा । नवतेजाचा सर्वांमाजीं ॥७७॥
अनिष्ट प्रथा बंद कराया । सेवकें झिजवावी काया । यात्राशुध्दीच्या नाना उपाया । अवलंबावें ॥७८॥
स्वामी दयानंद महाराज । तैसा त्यांचा आर्यसमाज । यांनीहि केलें झटूनि काज । सुधारणेचें यात्रिकांच्या ॥७९॥
गाडगे बाबा वैराग्यमूर्ति । तैसीच सेवामंडळ-समिति । यात्राशुध्दीसाठी उत्तम रीतीं । प्रयत्नशील सर्वदा ॥८०॥
त्या प्रकारें गांवचे सज्जन । मिळवोनि करावें यात्रा-नियोजन । यात्रा म्हणतां या तरा ही खूण । पटावी लोकां ॥८१॥
प्रचंड समुदाय जमवावा । उत्तम सदुपदेश करावा । संत-नेत्यांनी लौकिक वाढवावा । लोक-जीवनाचा ॥८२॥
हजारो लोक जरी जमले । तरी आरोग्य जराहि नाही भंगलें । लोक सहजपणें आले-गेले । ऐसी व्हावी व्यवस्था ॥८३॥
गेले ऐकोनि कथा-कीर्तन । घेतलें जीवनाचें सामान । भेटले परस्परांशीं आदरें पूर्ण । देवाण-घेवाण उत्तम ॥८४॥
याची असावी रूपरेषा । कराव्या नाना समित्या ऐशा । जनतेमाजीं सुधारणा आपैशा । घडोनि यावया ॥८५॥
नाना प्रदर्शनें उपयुक्त । नाना चढाओढीहि त्यांत । तैसेचि लोकशिक्षणाचे समस्त । कार्यक्रम योजावे ॥८६॥
यात्रादिकांच्या निमित्ताने । घ्यावीं भिन्न पंथीयांचींहि संमेलनें । संत-विद्वानांचीं ठेवावीं भाषणें । निर्भेळ विचारांचीं ॥८७॥
न दुखवितां कोणाचा भाव । त्यांच्या सत्तत्त्वाचा करावा गौरव । समारोप करावा लक्षूनि एकत्व । मूळचें सत्य ॥८८॥
तेथे भिन्नपण विरोन जाय । दांभिकतेचा न चले उपाय । विचित्रपणें वेगळा राहे । वाहोनि जाय प्रवाहीं तो ॥८९॥
हिरा आणि कांचवटी । कळों लागेल खरीखोटी । जाहीरपणें विचार-कसोटी । लागतां ऐसी ॥९०॥
कोण संत कोण असंत । काय मिथ्या काय सत्य । तें जाणोनि धरितील पंथ । समन्वयाचा सर्व जन ॥९१॥
हत्ती दिसों लागतां सगळा । मग कोणीहि एकांगी आंधळा । भुलवूं न शके वेगवेगळा । भागचि हत्ति म्हणवोनि ॥९२॥
ज्या संत-देवांच्या नांवांवरि । पंथ वाढले परोपरी । त्यांचे सत्य संदेश घरोघरीं । पोहोचतांचि सर्व साधे ॥९३॥
जैसा गुरु गोविंदसिंहानी । ग्रंथसाहेब रचिला जनीं । भिन्न संतांची एकत्र वाणी । झाली संघटनीं पोषक ॥९४॥
महिपतींनी संत-चरित्र । मांडोनि सदभावें एकत्र । भाविकजनीं ओविलें सूत्र । एकपणाचें जयापरी ॥९५॥
ज्ञानेश्वरादि संतीं केला । पंढरपुरीं गोपालकाला । सर्व पंथांच्या संतांचा झेला । गुंफियेला ज्या भावें ॥९६॥
तैसें संतांचें संमेलन । आणि सर्व संत-स्मृतिदिन । पाळतां गांवीं जन-ऐक्य पूर्ण । सहजचि साधतसे ॥९७॥
सर्व नद्या सागरीं मिळोन । पावती महान तीर्थपण । तैसे सर्व पंथ ऐक्य साधून । करिती गांवा तीर्थरूप ॥९८॥
कोणत्याहि संतांचा करावा उत्सव । परि चमत्कारांचा नको गौरव । द्यावा कर्तव्यमार्गासि उठाव । त्यांच्या जीवना स्मरोनि ॥९९॥
ऐसे कार्योत्सव चालतां गांवीं । तीच भू पंढरी समजावी । जेथे नरनारी प्रसन्न बरवीं । दु:खी कोणी असेना ॥१००॥
ऐसें न करितां आपुल्या गांवीं । तीर्थी घडलीं जरी आघवीं । तरी मुक्ति न पावे जीवीं । तुकडया म्हणे ॥१०१॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । यात्रा-मेळयांचा शुध्द संकेत । चोविसावा अध्याय संपूर्ण ॥१०२॥
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
**********************
ग्रामगीता अध्याय पंचविसावा
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
विचारांनी असती उदार । साधुसंत थोरथोर । तेथे नाही भेद-संचार । कोण्याहि प्रकारें ॥१॥
परंतु त्यांचे पंथानुयायी । आपुलालीच लाविती घाई । भिन्न भिन्न त्यांचे देवहि । एक न मिळती एकाशीं ॥२॥
वेगळे देव वेगळे धर्म । वेगळालें त्यांचें उपासनाकर्म । सांगा होईल कैसा संगम । भावनांचा त्यांच्या ? ॥३॥
संतांचें घेतलें संमेलन । तेवढयापुरतें झालें मिलन । परंतु नित्याच्या उपासनेने । वाढे अंतर सर्व जनीं ॥४॥
ज्याचा विशेष बोलबाला । जेथे संपत्तीचा पेल झाला । लोक भजती त्याचि दैवताला । कोणी दूजाला कवटाळिती ॥५॥
यासि नित्यासाठी उपाय । सांगा सहजप्रभावी काय ? जेणें संस्कारचि होतील एकमय । आत्मीयतेचे ॥६॥
श्रोतियाचा प्रश्न मार्मिक । गांव-हितासि आवश्यक । संतांऐसेंचि देवांचें ऐक्य । साधलें पाहिजे ॥७॥
आपापले धर्म-कर्म-देव । भिन्न समजती मानव । तेणें असोनि एकचि गांव । झाले भाव वेगळें ॥८॥
आपुलालें चिन्ह ठेवावें । त्यावरोनि संप्रदाय ओळखावे । म्हणोनि मांडिलें दुकान बरवें । आपापलें या पंथांनी ॥९॥
एक म्हणे राम मोठा । दुसरा म्हणे कृष्ण मोठा । तिसरा म्हणे शंकरचि मोठा । सर्वांहूनि आमुचा ॥१०॥
कोणी म्हणती देवी मोठया । कोणी पूजिती मानविणी नरोटया । कोणी म्हसोबा-बहिरम-सोटया । थोर म्हणोनि तंडती ॥११॥
कोणी म्हणती हरिहर । कोणी वंदिती नाल्याहैदर । कोणी पूजिती सर्पव्याघ्र । कोंबडी-बकरी देवोनि ॥१२॥
कांही सोनियाचे देव करिती । वेळ पडल्या विकोनि खाती । ऐसी आहे देवाची फजीती । पूजकांमागे ॥१३॥
कांही देवासि बलिदान देती । देवीच्या मिसें मांस खाती । तीर्थ म्हणोनि मद्य पिती । पिसाळलेले ॥१४॥
देव देवळीं दगडाचा । देवपाट करिती सोनियाचा । धाक पडे चोरटयांचा । म्हणोनि पहारे देवुळीं ॥१५॥
आपापल्या हौसेचे शृंगार । चढवोनि देती देवावर । मग शृंगारावरीच टपती नेत्र । देव कांही दिसेना ॥१६॥
एक म्हणती गळां सुंदर माळ । एक म्हणती रत्नमुकुट झळाळ । एक म्हणती सोनियाची प्रभावळ । देवाभवती शोभली ॥१७॥
एक म्हणती सुवर्ण-सिंहासन । एक म्हणती भरजरी शालू पूर्ण । एक म्हणती केशर कस्तुरीलेपन । कंठीं नवरत्न देवाच्या ॥१८॥
कांही म्हणती देव उठला । आता बसला आता जेवला । विश्रांति आता करूं लागला । विडा घेवोनि एकांतीं ॥१९॥
देवासि झोपवा मखमलीवरि । दारें लावूनि घ्या बाहेरि । पाउलें न चुरतां कोमल करीं । झोप त्यांना लागेना ॥२०॥
सारांश आपणांसि जें आवडे । तेंचि देवादिकासि पुरवावें लाडें । मगचि देवाची प्रसन्नता घडे । ऐसें कांही मानिती ॥२१॥
मग ते असोत दुर्गुण सदगुण । याचा विचार करतो कोण ? अंधश्रध्देच्या प्रवाहीं लागून । तैसेचि चालती पुढे पुढे ॥२२॥
पदसेवन, अर्चन, वंदन । दास्य, सख्य, आत्मनिवेदन । यांचा बहिरंग अर्थ घेवोन । भक्ति करिती सोंगाऐसी ॥२३॥
कोणी विरहभक्तींत रंगती । कोणी संगभक्ति अवलंबिती । कोणी आत्मभक्तीची करिती स्तुति । वाटेल तैसी ॥२४॥
कोणी अल्ला बडा की राम बडा । हेंचि वितंडितां धरिती नरडा । फोडिताति कडाकडा । मूर्ति हातीं धरोनिया ॥२५॥
येशूभक्त निंदा करी । म्हणे हिंदूचा देव व्यभिचारी । सोळा हजार करी नारी । कसला देव ? ॥२६॥
करावयाचें तें कोणी न करी । भांडणें करिती घरोघरीं । वा रे ! मूर्तिपूजेची थोरी । कळली लोकां ॥२७॥
देवाकरितां करोनि भांडणें । कोर्ट-कचेरीमाजीं जाणें । सत्य बोलतों म्हणोनि शपथ घेणें । देवादिकांची ॥२८॥
ऐसें ज्याने त्याने असत्य केलें । म्हणोनि जन नास्तिक झाले । म्हणती काय होतें देव पूजिले । कितीहि तरी ? ॥२९॥
समजण्याची दृष्टीच गेली । म्हणे देवाची प्रतिष्ठा काय उरली ? वरि बैसोनि लघवी केली । उंदिराने ॥३०॥
उलट कोणी म्हणे देव जागृत । भाव धरिल्या पावे त्वरित । मी म्हणेन भाव तेंचि दैवत । कां न म्हणावें ? ॥३१॥
एके ठिकाणीं देव जागृत । बाकी ठिकाणीं काय भूत ? । कैसी झाली समजूत । उलटी आमची ! ॥३२॥
लोकीं जो हा दुजाभाव झाला । तो पुजारी-पंडेगिरीने केला । शास्त्रेंहि लावोनि आधाराला । समाज नेला अधोगतीं ॥३३॥
यासीच म्हणविलें देवपूजन । पुजारी सांगतील जें जें कथून । भाविक ठेवोनि बुध्दि गहाण । करिती, कळे देव कैसा ? ॥३४॥
जैसी ज्याची भावना । तैसाचि देव त्याचा जाणा । तेथे भावनेसि प्रमुखपणा । सहजचि येतो ॥३५॥
आणखी एक मुख्य खूण । ज्या संताने केलें देवस्थान । त्याच्या थोरपणावर मोठेपण । मानिलें लोकीं देवाचें ॥३६॥
सज्जनाने दगड पूजिला । इतरांना तो मोठा देव झाला । वाढला त्याचा लौकिक भला । यात्रा भरली त्यापरी ॥३७॥
पंढरीसि ज्ञानदेव न जाता । संतांचा मेळा न भरता । कोण तेथीचा देव पूजिता ? सांगा मज ॥३८॥
देव सर्वांठायीं सारखा । परि संगतीने भासे प्रियसखा । उत्तम असोनिहि होतो पारखा । लोभीलबाड पुजार्यामुळे ॥३९॥
ऐसें झालें आम्हांमाजी । म्हणोनि भावना वाढली दुजी । चुकली देवभजनाची अर्जी । वाढली मर्जी धनाची ॥४०॥
जें धनसंपन्न देवस्थान । त्यासि आलें मोठेंपण । उपासनेसाठी खर्चावें धन । देव प्रसन्न म्हणती तेणें ॥४१॥
परि देव मोठा नव्हे श्रृंगाराने । देव मोठा नव्हे भव्य देवळाने । देव मोठा नव्हे घंटे वाजविल्याने । अहोरात्र ॥४२॥
देव मोठा नव्हे नंदादीपाने । देव मोठा नव्हे होम-हवनाने । देव मोठा नव्हे साळुंकेने । पर्वता एवढया ॥४३॥
देव मोठा नव्हे निसर्गशोभेने । देव मोठा नव्हे महायात्रेने । देव मोठा नव्हे वैभवप्रतिष्ठेने । पूजकांच्या ॥४४॥
देव मोठा भावनेने । भावनेच्या उच्चतेने । अंतरींच्या उपासनेने । सर्वांसि सारिखा ॥४५॥
मग तो असो कोणीहि देव । तेथे वाया भेदभाव । एकाचि चैतन्याचे ओतीव । अलंकार ते ॥४६॥
देव एक असोनि अनंत झाला । नाना रूपें धरोनि नटला । परि तो पाहतां एकचि दिसला । कार्यरूपाने ॥४७॥
हरिहरा भेद नाही । एक एकाचे हृदयीं । रामरहीम एकचि पाही । देवी-देवहि एकात्मक ॥४८॥
धनुर्धारी झाला राम । मुरली धरतां मेघश्याम । कटीं कर ठेवितां सगुणब्रह्म । विठ्ठल म्हणवी ॥४९॥
सर्व देव एकचि असती । भिन्न साधना करोनि स्मरती । भिन्न रूपें धरिलीं किती । तरी तत्त्वत: एकी तयांची ॥५०॥
एकचि व्याप्ति एकचि दीप्ति । प्रसंगें नानारूपें धरिती । एकाच ध्येयासाठी लाविती । प्राण पणीं देव सर्व ॥५१॥
कोणा सज्जना दु:ख न व्हावें । कोणी दीन भुकेले न राहावे । यासाठी प्राण समर्पावे । प्रसंग पडतां ॥५२॥
ऐसें ज्यांनी अंगें केलें । त्याच कारणीं धारातीर्थी पडले । ते सर्व देवदेवता झाले । मृत्युलोकीं ॥५३॥
सज्जनांचें परित्राण । कंटकांचें निर्दालन । सत्य न्याय सदगुणांचें रक्षण । कार्य हें सर्व देवांचें ॥५४॥
ऐसें असतां वितंडणें । देवादेवांचीं करावीं भांडणें । आपुल्या हौसेसाठी कां बुडविणें । चरित्र दैवतांचें ? ॥५५॥
सज्जनें टाळावी ही वृत्ति । आदर द्यावा सर्वाप्रति । भिन्न न ठेवावे कोणी पंथी । एकचि असती म्हणोनिया ॥५६॥
सर्वांना मंदिराचें मूळतत्त्व । आणि उपासनेचें महत्त्व । समजावोनि द्यावें देवत्व । कवण्या कार्यी असे तें ॥५७॥
तेणें निरसूं लागेल भेद कल्पना । आकळेल यथार्थ उपासना । साधेल आपापल्या देवस्थानां । मूळतत्त्वीं सार्थक ॥५८॥
यावरि एकाने केला प्रश्न । देवस्थानांचें मूळतत्त्व कोण ? हीं मंदिरेंचि भिन्न भिन्न । झालीं कारण पंथभेदा ॥५९॥
यांच्यावरोनि फिरवावा ट्रॅक्टर । म्हणजे सर्वचि होतील एकाकार । काय मंदिरांवांचूनि पडेल अंतर । भक्तींत कांही ? ॥६०॥
याचें ऐका समाधान । ऐक्य न साधे भावना दुखवून । त्यासाठी मंदिराचें तत्त्वज्ञान । उजळणें हेंचि उचित ॥६१॥
सुंदर निसर्गरम्य स्थान । तेथेहि साधे देवाचें भजन । मठमंदिर नसतांहि मोहून । मन पाही देवाकडे ॥६२॥
परि समाधिस्थानें मठमंदिरें । देवदेवळें देव्हारे । यांच्या स्थानप्रभावें स्फुरे । सदभाव मनीं सकळांच्या ॥६३॥
म्हणोनि संतीं घातला पाया । लोकीं चारित्र्यनीति वाढाया । अभ्यासियांसि एकान्त द्याया । मंदिरायोगें ॥६४॥
पुरुष व्यवहारीं भांबावती । कोठे पुत्रपौत्रामाजीं कलह होती । क्षणभरीहि न मिळे शांति । विचारासाठी ॥६५॥
ऐशावेळीं उपासनास्थळीं जावें । महापुरुषांचें स्मरण करावें । त्यांचें धारिष्टय चिंतोनि घ्यावें । समाधान ॥६६॥
वेळोवेळीं विसरे वृत्ति । विचारांचा आठव मंदिरें देती । सतकर्तव्य-भावना जागविती । स्थळें ऐसीं ॥६७॥
वार्षिकोत्सव, पुण्यतिथि । चातुर्मास्य आणि जयंति । सामुदायिकपणें होतीं । मंदिरस्थानीं ॥६८॥
सामुदायिकतेचें साधन । गांवाच्या आनंदाचें स्थान । पावित्र्याचा उगम पूर्ण । स्थानीं ऐशा ॥६९॥
मंदिरें म्हणजे पाठशाळा । चाले शिक्षणाचा सोहळा । झाला निधि सर्व गोळा । याच कार्यी लावावा ॥७०॥
जागवावी गांव-संस्कृति । वाढवावी सर्वांत प्रीतिनीति । यांचीं केंद्रें म्हणोनि होतीं । मठमंदिरें सर्वहि ॥७१॥
सर्वांभूतीं प्रेमभाव । वाढवावा गुणगौरव । यासाठीच गांवोगांव । मंदिरें केलीं निर्माण ॥७२॥
ऐसी उच्च धरोनि भावना । झाली मंदिरांची स्थापना । परि आज तयांची रचना । विपरीत दिसे ॥७३॥
मंदिरें क्षेत्रें दुकानें झालीं । पूजा कमाई करूं लागली । दक्षणापात्रें पुढें आलीं । पोटासाठी ॥७४॥
मंदिरीं बांधती म्हशीगायी । घाण दिसे ठायीं ठायीं । कसली पूजा धूपदीपहि ? सारा धुव्वा तंबाखूचा ॥७५॥
पुजारी खेळती चौसरी । वेश्यादिकांचें गाणें मंदिरीं । होती तमाशे-दंढारी । परोपरीं देवळामाजी ॥७६॥
मंदिराचा भव्य वाडा । झाला गुंडांचा आखाडा । धाक पडे घालाया मोडा । सज्जनासि ॥७७॥
स्त्रिया बापडया मंदिरीं जाती । अंधानुकरणें ऐकती पोथी । सर्व लक्ष रंजनाप्रति । स्थिरत्वें कोणी ऐकेना ॥७८॥
पदोपदीं भांडणें होतीं । भोळया भक्तांची फजीतीं । धनासाठी ओढाताण करती । पंडेपुजारी ॥७९॥
ऐशा स्थितीला बसाया आळा । सर्व लोकांनी करावा निर्वाळा । मंदिराचा निधि सगळा । समाज-कार्या लावावा ॥८०॥
पुजारी असतील बेढंगे । सांगोनियाहि सरळ न वागे । तें बदलावे संघटनेयोगें । सर्व गांव मिळोनि ॥८१॥
पुन्हा सुधारावी मंदिर-योजना । सुरू करावें लोकशिक्षणा । गांभीर्य आणावें तया स्थानां । सदविचार वाढावया ॥८२॥
नवें मंदिर न बांधावें । जुनें तें स्वच्छ सुंदर करावें । आहे त्यासचि लावावें । पुन्हा सत्कार्यीं ॥८३॥
सांवरोनि गलिच्छ पसारा । निर्मळ करावें देवद्वारा । प्रसन्न फुलें झाडें वारा । शांति द्याया उपासकां ॥८४॥
उघडावीं त्यांत वाचनालयें । औषधालयें, योगविद्यालयें । उपासनेची ठेवोनि सोय । सर्वांकरितां ॥८५॥
आपुले आपुले देवुळींच जावें । इतरांनी दुरूनीच पहावें । देव वाटेल ऐसें बरळावें । हें तों असे वेडेपण ॥८६॥
एकाचा देव दुसर्यासि शिवे । तरि पाप वाढेल गाडे पेवें । म्हणोनि ज्याचे देव त्यानेच पुजावे । म्हणती न मानावे येरांनी ॥८७॥
हें तों म्हणणें सांप्रदायिकांचें । अल्पज्ञानी व्यापारियांचें । माझ्या मतें हें विकासाचें । धोरण नव्हे ॥८८॥
ऐसें करणें सोडोनि द्यावें । असतील त्या देवळां निर्मल ठेवावें । सर्व लोकांसि खुलें असावें । दर्शनासाठी स्थान तें ॥८९॥
देव असे पतितपावन । तो न पळे पतिताला भिऊन । सर्वचि त्याचीं लेकरें समान । तयालागी ॥९०॥
देवासि नाही जातपात । देव भक्ताचाचि जातिवंत । तेथे नसावा अभक्ताचा पंथ । देवळामाजीं ॥९१॥
देव महार मांग चांभार । देव भंगी लभाणी वडर । देव माळी ब्राम्हण कुंभार । सर्व जाती ॥९२॥
देव क्षत्रिय वैश्य गोवळी । देवें सृष्टि व्यापली सगळी । देवचि देव भूमंडळीं । संचला आहे ॥९३॥
म्हणोनि असावें सर्वांचें मंदिर । ब्राह्मण असो वा महार । शुध्द करील जो आचार । त्यासि अधिकार मंदिराचा ॥९४॥
देवळाचे पंच गांव । गांवचा प्रत्येक मानव । मानवांचा वाढेल गौरव । प्रचार व्हावा ऐसाचि ॥९५॥
सर्वांनी एक वेळ ठरवावी । मिळोनिया प्रार्थना करावी । प्रार्थनीं उत्सवीं भाषणें द्यावीं । योग्य ऐसीं ॥९६॥
प्रत्येकाला बोलतां यावें । सर्वांनी हें अभ्यासावें । आपुलें सुखदु:खहि मांडावें । भाषणायोगें ॥९७॥
तैसींच ठेवावीं प्रवचनें । राष्ट्रीय वृत्ति वाढे जेणें । माणसासि माणसाने । पूरक व्हावें म्हणोनिया ॥९८॥
प्रमाणें द्यावीं ऋषिजनांचीं । आठवण मागच्या इतिहासाची । तैसीच बांधावी धारणा पुढची । भाषणायोगें ॥९९॥
कीर्तन, उत्सव, प्रवचन । नुसतें नसावें मनोरंजन । गांवकर्यांचें उजळेल जीवन । ऐसे कार्यक्रम करावे ॥१००॥
ऐसें हें मंदिर सजवावें । उपद्रवी लोक बाहेर करावें । सत्कीर्ति सुबुध्दीने भरावें । देवस्थानांसि ॥१०१॥
मानवता-विकासाचें केंद्र । सात्विक संपत्तीचें आगर । ऐसें ठेवावें गांवीं मंदिर । ग्रामसंस्कृति राखाया ॥१०२॥
शुध्द प्रेम वाढावया । मंदिरांची उपासना या । उपासनेसि सक्रियता द्याया । लागा सर्व गांवकरी ॥१०३॥
नका पाहूं पंथ-भेद । नका उकरूं नसते वाद । मंदिरादिकांचा हेतु हाचि शुध्द । जवळ यावा मानव ॥१०४॥
म्हणोनीच देवाची मध्यस्थी । एरव्ही देवाचीच सर्व क्षिति । परि जाणिवेने जन लाभ घेती । एरव्ही नाडती प्राणी सारे ॥१०५॥
ती जाणीव द्याया देवस्थान । साधुसंतीं केलें निर्माण । तेथे शिकावें जनीं जनार्दन । हेंचि सूत्र ॥१०६॥
कोणत्याहि देवुळीं जावें । तेथे आपुलें उपास्यचि पाहावें । सर्व रूपीं अवलोकावें । एक तत्त्व, हीच निष्ठा ॥१०७॥
सर्व देवांसि आदरावें । जेथे सात्विक पूजेचे गोडवे । दिव्य गुणकर्मानेचि देवत्व पावे । प्रत्येक व्यक्ति ॥१०८॥
तेथे भेद कां मानावा ? कोणीहि भजो कोणत्या देवा । भावचि देव कळतां ठेवा । एकचि लाभे सर्वांसि ॥१०९॥
शंकराचार्ये देव-पंचायतन । मांडोनि साधिलें भक्तसंघटन । इष्टदेवासह इतरांचें पूजन । कुठलें स्थान विरोधासि ? ॥११०॥
विरोध देवांचा तर काय । परि जीवांचाहि येथे न साहे । सर्व जीवीं देवचि आहे । म्हणोनि प्रेम द्यावें तयां ॥१११॥
सुखी-समृध्द करावें गांवा । यासाठीच मंदिर-निधि योजावा । ही सेवाचि आवडे देवा । आपुलिया जीवांची ॥११२॥
जीवांचिया सेवेचें तत्त्व । तैसेंच कार्याचें महत्त्व । आणि स्वरूपाचें दिव्यत्व । सर्वचि देवांचें समान ॥११३॥
ऐसी समान धारणा मनीं । धरोनि वागतां सर्वांनी । मठमंदिरें पंथभेद कोणी । आड न येती विकासाच्या ॥११४॥
ऐक्य वाढवाया कारण । होईल प्रत्येक देवस्थान । करितां शुध्द तत्त्वें पुनरुज्जीवन । तुकडया महणे ॥११५॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-सानुभव संमत । मंदिर-मर्म कथिलें येथ। पंचविसावा अध्याय संपूर्ण ॥११६॥
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
**********************
ग्रामगीता अध्याय सव्वीसावा
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
ईश्वर सर्वांठायीं व्यापला । तो पंथीं नाही विभागला । मग उणें-अधिक कोणाला । कां म्हणावें ? ॥१॥
ऐसें ऐकोनि निरूपण । एक श्रोता करी प्रश्न । देव विशाल व्यापक पूर्ण । मग कां समर्थन मूर्तीचें ? ॥२॥
असो कोणाहि धर्माची खूण । परि मूर्ति मानवांनी केली निर्माण । तिथे कोठलें देवपण ? तिचें पूजन कशाला ? ॥३॥
देव कुणाची पूजा नेघे । त्यास नको हें वाउगें । स्वयें बोलला भक्तासंगें । मज हवें शुध्द प्रेम ॥४॥
याचें ऐकावें उत्तर । प्रेम निर्मावें एका मूर्तीवर । तेंचि क्रमाने करावें विश्वाकार । हाच हेतु पूजनाचा ॥५॥
देवाची स्मरणमूर्ति बघतां । त्याचें जीवनकार्य ध्यानीं आणतां । शक्ति येते मनासि तत्त्वता । मानसिक संयोगें ॥६॥
मनासि लावावया चिंतन । लागावया मार्गाचें आकर्षण । नेमिलें असे प्रतिमापूजन । साधुसंतीं ॥७॥
मनास पाहिजे कांही आधार । म्हणोनि आरंभीं मानिले साकार । देवें व्यापिलें चराचर । तेथे मूर्ति तद्रुपचि ॥८॥
परि जो सिध्दान्ताचा पुरस्कर्ता झाला । त्यासहि जन देव बोलला । त्याचीहि प्रतिमा पूजूं लागला । भोळेपणाने ॥९॥
जरी पूजिली व्यक्तिमूर्ति । तरी चुकलें मी न म्हणे चित्तीं । परि सिध्दांत वाउगे राखिती । हें तों आहे अज्ञानपण ॥१०॥
सुखासाठी आखिली दिशा । रेखिला घराचा नकाशा । परि लाभली शेवटीं निराशा । नकाशाचि राखतां ॥११॥
घर राहाया नाही मिळालें । नकाशे नकाशेच राहिले । तेणें समाधान भंगलें । जाणीव होतां पुढे पुढे ॥१२॥
तैसेंचि झालें मूर्तिपूजेचें । जे जे पंथ दिसती आजचे । तेथील साधक मूर्तिपूजेपुढचें । कांहीच नेणे ॥१३॥
तो मूर्ति धरोनीच बसला । मूर्खचि समजतो पुढचियाला । म्हणतो भ्रष्टाचार झाला । मूर्तिपूजेवांचोनि ॥१४॥
त्यासि कळला नाही धर्म । मूर्तिपूजेचें काय वर्म । उगीच वाढवूनि घेतला भ्रम । बिचार्याने अंतरीं ॥१५॥
घरीं देवाचा कट्टर पुजारी । असत्य करीत असे बाजारीं । व्यवहार करितां झाला वैरी । ज्याचा त्याचा ॥१६॥
देवळामाजीं कान घरी । नाक धरोनि प्राणायाम करी । बाहेर येतां शिवी दे, कावरी । ज्यासि त्यासि ॥१७॥
देवाद्वारीं हवन करी । बाहेर भिकार्यासि मारी । पोटा न दे चूनभाकरी । उपाशीयाच्या कधीहि ॥१८॥
आमचा देव सत्यचि बोले । परि आम्हीं पाहिजे खोटें केलें । ऐसें असोनि भक्त झाले । म्हणती आम्ही ॥१९॥
स्वयें म्हणवी रामभक्त । नाही एकपत्नीव्रत । नित्य पूजितो हनुमंत । व्यसनें झाला प्रेताऐसा ॥२०॥
देव दुर्जनासि संहारी । कष्ट करितो भक्तांघरीं । भक्त बघा हा व्यभिचारी । आळसे घरीं झोपतसे ॥२१॥
देव म्हणे मी सर्वत्र । दीनरंक माझे पुत्र । उपासक त्यांसि दिवसरात्र । पिळोनि चैन भोगितसे ॥२२॥
प्रभु आमुचा पतितपावन । म्हणोनि कंठरवें करी गायन । मानवासि अस्पृश्य हीन । मानून डौल मिरवितो ॥२३॥
देवाचिया मूर्तीसाठी । सोने हिरे बैसवी मुकुटीं । न दे श्रमिकासि लंगोटी । मंदिर बांधतां मेला तरी ॥२४॥
कसलें हें देवपूजन ? मूर्तिपूजेचें विडंबन । केवढें शिरलें आहे अज्ञान । आपणांमाजीं ! ॥२५॥
देवळामाजीं करी भजन । बाहेर येतां खोटें भाषण । ऐशा पुजार्या पुसेल कोण ? सांगा तरी ॥२६॥
म्हणोनि हें वाईट विसरावें । पूजेने पूज्यासि ओळखीत जावें । अभ्यासाने पाऊल टाकावें । पुढे पुढे ॥२७॥
जैसी ज्याची भावना । त्याने तैसीच मानावी देवता मनां । परि न चुकावी उपासना । सत्कर्मांची ॥२८॥
मूर्तिपूजेचा अर्थ एक । आपण मूर्तीच व्हावें सम्यक । म्हणजे करावी तैसी वागणूक । अभ्यासाने ॥२९॥
जयाची मूर्ति उपासावी । तयाची चरित्रकथा वाचावी । पुढे कामेंहि करीत जावीं । आपणहि तैसीं ॥३०॥
काय केलें माझिया देवें । मजसी मुळीच नाही ठावें । फक्त मूर्तीच धरोनि बसावें । हें वेडेपणाचें ॥३१॥
ऐसी असावी उपासना । उपासनीं वाढवावें कर्तव्यगुणा । कर्तव्यपूर्तीने मोठेपणा । अंगीं घ्यावा मिळवोनि ॥३२॥
संकटें येतां कार्यामाझारीं । चिंतनीं घ्यावें चारित्र्य अंतरीं । अभ्यासाचें तेज वृत्तीवरि । वाढवावें सर्वकाळ ॥३३॥
चुकलिया संतां विचारावें । पुढे कार्य करावयासि धजावें । आपुल्या परीने सुख देत जावें । जीवांलागीं ॥३४॥
यासाठीच मूर्तिस्थापना । ठायींठायीं केली जाणा । आठवण राहावी साधकांना । म्हणोनिया ॥३५॥
पदोपदीं हो पवित्र वृत्ति । म्हणोनि स्थळोस्थळीं स्थापिली मूर्ति । वृक्षपशुपक्षी ठरविल्या विभूति । सदभावासाठी ॥३६॥
मनोभावें मूर्तीसि पुजावें । श्रवण, कथन, स्मरणादि करावें । मूर्तीप्रमाणे सत्कर्म घडावें । आपुलिया अंगें ॥३७॥
सर्व सोडोनि भिन्न भावना । हृदयीं धरावी उपसना । जेणें प्रसन्नता येई मना । तेंचि उत्तम समजावें ॥३८॥
मन जेथे समाधान पावे । तेथूनि शक्तीचें तेज घ्यावें । मग कार्यासि लागावें । सदगुणी ऐशा ॥३९॥
सदभावें करावें पूजन । विनम्र करोनिया देहमन । निर्मळ असावें वातावरण । ध्यान धराया देवाचें ॥४०॥
येथे मानसिक पूजेचेंच महत्त्व । विचारसामर्थ्य हें मूलतत्त्व । तेणेंचि पावे ईश्वरत्व । जीवालागी प्रयत्नें ॥४१॥
जीवासि मूळतत्त्व कळावें । सर्वांभूतीं आत्मरूप समजावें । ऐसेचि पूजनाचे गोडवे । वर्णिले संतीं ॥४२॥
संतीं बोलिलें हरिनांम घ्यावें । हेंहि वाटे साधन बरवें । परि अर्थ समजोनि जपावें । तरीच सार्थक जीवाचें ॥४३॥
नाम ईश्वराची शब्दमूर्ति । मुखीं नाम हातीं मोक्ष म्हणती । यज्ञाहूनि थोर जपावी महती । ठाऊक हें सर्वां ॥४४॥
परि कासयासि जपावें नाम । साधावयाचें तें कोण काम । या ध्येज्ञानावांचोनि सर्व कर्म । निरर्थक ॥४५॥
कितीतरी जन नाम घेती । माळा-मणी ओढीत राहती । परि क्षणहि त्यांची मति । रामीं न रंगे ॥४६॥
मुखें नाम उच्चारिती । व्यवहार अधोगामी करिती । पापें करोनि शपथ घेती । देवधर्मांची ॥४७॥
कसलें हें नाम जपणें ? स्वार्थें विश्वासघात करणें । आशातृष्णा न सोडणें । इंद्रियविषायांची ॥४८॥
येथे तारतम्यचि पाहिजे । नामजपीं व्रतस्थ होइजे । तरी जीवास सुखाचें साजे । स्थान जीवनीं ॥४९॥
मुखीं नामाचें चिंतन । हातीं सेवाकर्य पूर्ण । करील चारित्र्य संपादन । तोचि भक्त ॥५०॥
नामें शक्ति येते अंगीं । संकटें निवारण्याची प्रसंगीं । परि पुरुषार्थ असावा जंगी । तरीच फळे ॥५१॥
दुराचार सज्जन-विरोध । ऐसे दोष आणिती बाध । काया-वाचा-मनें टाळिले अपराध । तरीच फळे ॥५२॥
मग तें नाम मंदिरीं जपावें । अथवा शेतीमाजीं घ्यावें । चालतां बोलतांहि गावें । तरी तो यज्ञ ॥५३॥
मुख्य नामाचें अधिष्ठान । कर्तव्य करावें संपादन । हेंचि साधावया संतजन । नामजप सांगती ॥५४॥
जे पुरुषार्थ सोडोनि जपती नाम । त्यांसि कैसा पावेल आराम ? हें तों झालें आंधळें काम । देवाद्वारीं ॥५५॥
आमुचा राम कामें करी । आम्ही मागावी भाकरी । होवोनि फिरावें भिकारी । ही भक्ति कैची ? ॥५६॥
रामें असुरांसि मर्दावें । आम्हीं पूजापात्र अवलंबावें । निर्बल होवोनि शरण जावें । ही भक्ति कैची ? ॥५७॥
भक्त म्हणजे विभक्त नव्हे । एकरूपचि होवोनि जावें । देवें लोकांचें दु:ख हरावें । आम्हीं का करावें देवदेव ? ॥५८॥
ऐसा जप जयाने केला । तो शेवटीं मूर्खचि राहिला । बोल देवोनिया देवाला । काय होतें ? ॥५९॥
पापक्षालनासि नाम घ्यावें । पुढती पाप करीतचि जावें । ऐसें कोण वदलें बरवें । सांगा मज ॥६०॥
ऐसी आहे ज्यांची स्थिति । त्यांसि नामजपी म्हणती । मी म्हणेन कलंक लाविती । नामादिकासि ते ॥६१॥
याहूनि न जपे तो पुरवला । उत्तम राहणी ठेवी जो भला । दु:ख न देईच कोणाला । कोण्या प्रसंगीं ॥६२॥
व्यवहार करीतसे कष्टून । जोडोनिया उद्योगें धन । सदा राहतो प्रसन्न । खेळींमेळीं प्रेमभावें ॥६३॥
असेल तें गरजूंना देणें । कोणा उत्तम-वाईट न म्हणे । आपणा ऐसें सर्वांचें जाणे । सुखदु:ख सज्जन ॥६४॥
हेंचि शिकावयासाठी । नामजप सांगितला उठाउठी । सदा राहणी गोमटी । प्रेमळपणाची सर्वांशीं ॥६५॥
प्रथम नाम दुजें चिंतन । तिजें निश्चयीं लावावें मन । मग होवोनि सत्कार्यप्रवण । समाजसेवा साधावी ॥६६॥
ऐसें सत्कर्म जरी नाचरवें । सदगुण विसरोनि नामचि गावें । तरी तें पूर्णतेस न पावे । आत्मोन्नतीच्या ॥६७॥
म्हणोनि संतांचिया वचना । निरीक्षोनि ठेवावी धारणा । तरीच ग्रंथीं कथिल्या त्या खुणा । पावती रामनामाच्या ॥६८॥
देव बोलला कामें करा । निर्भय होवोनि देशीं विचरा । सकळ देवाचाचि पसारा । सेवाभाव साधा ॥६९॥
जनता ज्याला देवरूप कळली । त्याचीच भक्ति देवा पावली । साक्षात्कारें वृत्ति वळली । विश्वात्मभावीं ॥७०॥
तें साधाया बोलिलें नाम । लाभावया जीवास आराम । तुटावया अज्ञानभ्रम । दु:खमूळ जो ॥७१॥
आपण तरूनि जग तारावें । शक्तियुक्तीने विश्व भरावें । नामें लोकांसि जागवावें । ऐसा आदेश संतांचा ॥७२॥
संतमुकुटमणि तुकाराम । त्यांनी अभंग कथिले अति सुगम । मार्ग केला व्यवहारक्षम । भोळयाभाळया जनांसाठी ॥७३॥
अत्यंत साधी गर्जली वाणी । गेली वेदादिकांस भेदोनि । भ्रमचि निवारिला तत्क्षणीं । अज्ञानी जडजीवांचा ॥७४॥
हजारो मुखांतूनि गरजला । वेदान्त आम्हांसीच कळला । ज्याने पंढरीराज वंदिला । सर्व पावला शास्त्रगुह्य ॥७५॥
म्हणे नको ब्रह्मज्ञानादि भाव । आत्मस्थितीचा गौरव । आम्ही भक्त तूं चहूकडे देव । ऐसें करी आम्हांसि ॥७६॥
कोठोनि आणावी विद्वत्ता ? सेवेंचें काम आमुच्या हातां । नाम गाऊं कष्ट करितां । पंढरीनाथा पावाया ॥७७॥
प्रभूने ऐकिली त्यांची सेवा । संकटीं आला ऐकोनि धांवा । त्यांच्या शब्देंहि लोक तरावा । ऐसा केला चमत्कार ॥७८॥
ऐसे झाले संत अनेक । मूर्तिभक्त बहु नामधारक । जे सेव्यचि झाले असोनि सेवक । हनुमंतापरी ॥७९॥
सर्वचि पंथांचे भक्तिप्रकार । तत्त्व साधतां असती सार । हा आचरोनि दाविला समन्वय सुंदर । रामकृष्ण परमहंसें ॥८०॥
नाम जपोनि मूर्ति पूजितां । देवचि झाले देवा भजतां । पूजूं लागले विश्वा समस्ता । स्त्रीपुरुष-भेद विसरोनि ॥८१॥
मूर्तिपूजा जपतप कांही । तत्त्व साधतां बाधक नाही । हें सिध्दचि केलें अनुभवें पाही । संतजनांनी ॥८२॥
उत्तम भाकरी करितां यावी । म्हणोनि मुलीने मातीची करावी । तैसी अमूर्त देवाचा मार्ग दावी । मूर्तिपूजा ही ॥८३॥
देव आहे मूळचा अंतरीं । त्याची साधना करावी लागे बाहेरी । ओळख पटतां विचारें पुरी । भिन्नपणा राहीना ॥८४॥
सत्कर्मांचें ज्ञान झालें । सत्कर्म करणें अंगीं आलें । मूर्तिपूजेचें साधन संपलें । साधकाचें ॥८५॥
राहिलें जीवनांत तैसे वागणें । देव भजतां देवचि होणें । देव होण्याचीं कारणें । अनुभवोनिया ॥८६॥
माझा देव दयावंत । पुरवी हीनदीनांचे मनोगत । मजसी पाहिजे निष्ठावंत । तेंचि केलें ॥८७॥
ऐसा जप जाले अंतरीं । हातीं व्यवस्थेची चाकरी । लागला रंग याचिपरीं । अहोरात्रीं देहाला ॥८८॥
आता परोपकारचि उरला । देव अंतरी-बाहेरी भरला । पाहणेंचि नाही दुसर्या कोणाला । कोणे ठायीं ॥८९॥
विसरोनि गेले व्यक्तिपण । झाले कार्यरूपचि आपण । ऐसें होतां देवपण । अंगीं आलें धांवोनि ॥९०॥
नाना विरोधकांस तोंड दिलें । नाना कष्ट सहन केले । शेवटी सर्वांनी ठरविलें । हेंचि खरें म्हणोनि ॥९१॥
पूर्वी मूर्तीस शृंगार करी । तैसेंचि मानवांसि शृंगारी । कष्ट नसो कोण तिळभरी । गांवीं माझ्या म्हणोनि ॥९२॥
हीच खरी देवपूजा । याविण नाही मार्ग दुजा । संतदेव बोलिले माझ्या । हृदयामाजीं येवोनि ॥९३॥
देव जैसा जैसा आकळला । तैसा देह-अंहकार मावळला । लवणकण सागरीं मिळाला । सागर झाला एकत्वें ॥९४॥
यापरी पुढची आहे पायरी । जैसी वृत्ति धरोनि चढाल वरी । तैसा जीव ब्रह्म होवोनि अंतरीं । अनुभव घेई आपणचि ॥९५॥
म्हणे मीचि सर्व आता झालों । विश्वीं विश्वाकार होवोनि ठेलों । सर्वचि कार्ये करूं लागलों । आपणाचि साठी ॥९६॥
माझ्याविरहित कोणी नुरला । अणुरेणूमाजीं मीचि संचला । ऐसा अनुभव येतां झाला । पूर्ण योगी ॥९७॥
प्रथम पाहिली देवुळीं मूर्ति । पुढे पाहिलें जीवजनाप्रति । पूर्णता होतां सर्वत्र व्याप्ति । आपुल्याचि रूपाची ॥९८॥
ऐसी लाभावया आनंद-ठेव । पूजावयासि मांडिला देव । द्रष्टा-दृश्य-दर्शनभाव । एकतत्त्वी दिसावया ॥९९॥
हाचि धरोनि निर्धार । केलिया नवविध पूजाप्रकार । पावेल सर्वोत्तम सार । ईश्वरभक्तीचा ॥१००॥
एरव्ही कितीहि पूजिली मूर्ति । तरी वाढचि घेईल भ्रांति । न मिळेल कदाकाळीं शांति । जनामनासि ॥१०१॥
नसता वाढेल अहंकार । आमची प्रतिमा अधिक थोर । न मिटेल पंथद्वेष साचार । व्यापक ईश्वर जाणल्याविण ॥१०२॥
म्हणोनि प्रतिमा धरोनीच न बसावें । पायरीने वाढत जावें । क्रियाशीलपणें विश्वीं पाहावें । विश्वंभरासि ॥१०३॥
सर्व लोकचि आमुचा ईश्वर । सर्व गांवचि आमुचें मंदिर । सेवा करणें निरंतर । पूजा आमुची ॥१०४॥
प्रामाणिकतेने करणें काम । हेंचि आमुचें ईश्वरनाम । सर्व जीवमात्राशीं ऐक्यप्रेम । धर्म हा आमुचा ॥१०५॥
हाचि दृढ धरितां निर्धार । परमार्थ याहूनि नाही थोर । किंबहुना हाचि परमार्थ-सार । अनुभवियांचा ॥१०६॥
अंगीकारोनि या तत्वांसि । एक करावें सर्व भक्तांसि । लावावें पूजाया ग्राममंदिरासि । तुकडया म्हणे ॥१०७॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव संमत । पूजनस्मरण-रहस्य कथित । सहविसावा अध्याय संपूर्ण ॥१०८॥
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
************************
ग्रामगीता अध्याय सत्ताविसावा
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
मूर्तिपूजा नामजप । यांचीं मूळतत्त्वें उज्जवलरूप । परंतु त्यांचा विपर्यास खूप । जाहला लोकीं ॥१॥
देवीदेव दिसती जिकडे तिकडे । सांदी-बिदींचे गोटे खडे । कोणी न बघती तयांकडे । आवडीने ॥२॥
नेमकी प्रभावशाली मूर्ति । जी बघतांचि देई स्फूर्ति । होईल तात्त्विकतेची पूर्ति । ऐसी दिसे क्वचितचि ॥३॥
तेथेहि भाविकतेचा अतिरेक । जेणें बुध्दिमान होती नास्तिक । म्हणती हा गोंधळ असे घातक । भक्तीच्या नांवें ॥४॥
मूर्ति जयाचें स्मारक । त्याच्या गुणाकर्मांची नाही भूक । मूर्तीच देव ठरवोनि लोक । करिती अति वेडेचार ॥५॥
कोठे काकडआरती शेजारती । चाले पंचपदी पूजा पोथी । नाही शिस्त गांभीर्य शांति । सात्विक वृत्ति स्फुरेचि ना ॥६॥
एक जाती एक येती । मधेच वाकडे उभे राहती । फुलें अक्षता कशाहि फेकती । मंत्रपुष्पांजलीच्या ॥७॥
नगारा जातो एकीकडे । टाळ-घंटयांचा गोंधळ उडे । टाळया कसल्या, गारपीट पडे । ऐसेंचि वाटे ॥८॥
असल्या बाजाराने कांही । उपासनातत्त्व साधत नाही । तेथे शिस्त शांति सात्विकता येई । तरीच लाभ सर्वांसि ॥९॥
याचसाठी सामुदायिक प्रार्थना । हा मार्ग दाविला जना । हीच आजची उपासना । सर्वांचिया हिताची ॥१०॥
श्रोतीं विचारिला होता प्रश्न । पंथ भेद मिटाया उपाय कोण ? कैसें राहील ग्रामजीवन । एकजुटीचें ? ॥११॥
नाना पंथ असती गांवीं । भिन्न देव-पूजक वैष्णव-गोसावी । नाना जाती-जमाती एकत्वीं । कैशापरीं वागतील ? ॥१२॥
त्यासीहि सामुदायिक प्रार्थना । हाचि उपाय असे जाणा । जेथे धर्म-पंथ-संत-देव नाना । एकासनीं विराजती ॥१३॥
हा झरा राहिला नित्य शुध्द । तरि गांव होईल सदा सुबुध्द । आणि सामुदायिकतेने समृध्द । सर्व प्रकारें ॥१४॥
यावरि श्रोतीं प्रश्न केला । कैसें करावें सामुदायिक प्रार्थनेला ? जेणें सामुदायिकता गांवाला । प्राप्त होय ॥१५॥
सदभावें गांवांतील जन । करोनिया एक मन । कैसे करितील कार्य पूर्ण । सामुदायिक प्रार्थनेचें ? ॥१६॥
प्रार्थनीं कोणता देव योजावा । जो सर्वांसीच मान्य बरवा ? गांवाचा जेणें समन्वय व्हावा । कैसा ठेवावा पाठ तेथे ? ॥१७॥
मित्रा ! ऐकिले तुझे प्रश्न । तूं बोललासि विचार करून । वेगळेपणाची आहे अडचण । गांवोगांवीं सर्वांच्या ॥१८॥
वस्तुत: छोटीं देव-देवळें । वगळोनि सर्वांनी एके वेळे । एकाच देवुळीं जमावें भावबळें । प्रशांत ऐशा ॥१९॥
विसरोनि आपुला वेगळेपणा । करावी तेथे उपासना । परि हें नये बहुतांच्या मना । म्हणती आमुचें तेंचि थोर ॥२०॥
अनेक मंदिरें अनेक देवता । विचारें लोकां न पटे एकता । त्यांतूनि एक निवडाल कोणता । प्रश्नचि पडे ॥२१॥
हाचि प्रश्न संतांपुढती । पूर्वीहि होता जंव पंथ लढती । म्हणोनीच विठ्ठल ब्रह्ममूर्ति । ठेविला त्यांनी सर्वांपुढे ॥२२॥
सर्व पंथांच्या संतसज्जनीं । केली एकी तये स्थानीं । ज्ञानप्रेमज्योति पेटविली भुवनीं । महाराष्ट्राच्या ॥२३॥
बंगालीं तामस भक्तिप्रथा । सुधाराया उजळिली कृष्णकथा । चैतन्यप्रभूने भाविकां-पंडितां । विविध पंथां एक केलें ॥२४॥
धकाधकीचा काळ पाहिला । संतीं उपास्यांत बदल केला । तुलसीदासें रामदासें दाविला । राम कोदंडधारी ॥२५॥
यापरी देश-कालप्रसंगें । संघटनकेंद्र निवडावें लागे । आजच्या काळीं जुळवाया धागे । कोणतें रूप निवडावें ? ॥२६॥
याचा मागे मीं विचार केला । अधिकाधिक अनुभव घेतला । शेवटीं निश्चयाने निवडला । गुरुदेव माझा ॥२७॥
मीं जरी गुरुदेव माझा म्हटला । तरी तो नव्हे माझाचि भला । तो सर्व प्राणिमात्राचा झाला । कल्याणकारी ॥२८॥
त्यास नाही पंथपक्ष । सर्वदेशी तो सर्वसाक्ष । सर्व देवादिकांचा अध्यक्ष । सदगुरुराजा ॥२९॥
त्यासि सर्वचि मानव सखे । देश-विदेशींचे एकसारखे । नाही धर्म भिन्न त्यांचे निके । एकचि सत्य सर्वांमाजीं ॥३०॥
जैसा आत्मा नाही भिन्न झाला । तैसाचि गुरुदेव संचला । कोणी आकाशाचा तुकडा पाडिला । ऐसें नाही ॥३१॥
सत्य सर्वांचेंचि सत्य असतें । असत्य तें असत्यचि होतें । तैसेचि गुरुदेव सर्वांचे ते । एकचि राहती सर्वस्वी ॥३२॥
वैदिक असो वा त्याहूनि इतर । सर्वचि पंथीं गुरुदेवाचा आदर । इस्लाम, ख्रिस्तादि धर्मींहि थोर । गुरुदेव-भक्ति ॥३३॥
पंथ-प्रचारक गुरु वेगळे । त्यांत असतें द्वैताचें काळें । स्वतंत्र अनुभवी गुरु निराळे । ते पावती ज्ञानयोगें ॥३४॥
गुरु हाडामासांचा नोहे । गुरु नव्हे जाति-संप्रदाय । गुरु शुध्द ज्ञानतत्त्वचि आहे । अनुभवियाचें ॥३५॥
हें ज्ञान ज्यासि लाभलें । ज्याचें मन विश्वाकार झालें । पंथ-पक्ष-धर्म संपले । ज्याच्या ठायीं सर्वचि ॥३६॥
तो सर्वाचा झाला सखा । मानवमात्राचा पाठीराखा । कोणत्याहि भाषेने पारखा । तरी पावे तयासि ॥३७॥
करी सदभावना उत्पन्न । दीनदु:खितांचें पालन । मलीन मार्गाचे करी खंडण । कायावाचामनाने ॥३८॥
म्हणोनीच थोरांनी कथिलें । गुरुचि ब्रह्मा विष्णु झाले । महेश्वरहि गुरुचि बोलिले । याच सामर्थ्यें ॥३९॥
गुरुचि साक्षात ब्रह्म कथिला । सर्वांस व्यापोनि गुरुचि उरला । ऐसा देव म्हणोनि प्रार्थिला । गुरुदेव माझा ॥४०॥
महापुरुष वेगळाले । परि गुरुत्वीं मिळोनि गुरुचि झाले । व्यक्तिपण धर्मपणहि मुरालें । गुरु-स्वरुपीं ॥४१॥
त्याचें पूजन गंधाने नोहे । त्याचें मंदिर विशाल आहे । विशालतेला मर्यादा राहे । परि गुरु त्याहुनि अमर्याद ॥४२॥
भूमंडळ ज्याचें क्षेत्र पूर्ण । सर्व पृथ्वी जयाचें आसन । चंद्रसूर्य नंदादीप जाण । गुरुदेवाचे ॥४३॥
त्यांतचि धर्म-पंथ सामावती । तोचि वेष्टिला सर्वांभवती । त्याचेवांचूनि नाही रिती । जागा कोणी ॥४४॥
त्याचें ज्ञान झालिया जीवा । कोठे द्वेष-कलह-हेवा ? सुखशांतीचा लाभे विसावा । सर्वांठायीं ॥४५॥
म्हणोनि हेंचि व्हावया ज्ञान । विशाल मनें रचिलें साधन । सामुदायिक प्रार्थनेचें स्थान । सामुदायिकपणास्तव ॥४६॥
तेथे सामुदायिक देव कल्पावा । पुढे कार्यातचि अनुभवीत जावा । मग विश्वाकार पहावा । गुरुदेव माझा ॥४७॥
हें झालें गुरुदेवांचें वर्णन । आता ऐका प्रार्थना-साधन । गांव व्हावया उन्नत पूर्ण । तैसेंचि स्थान शोधावें ॥४८॥
विशाल मंदिर या गुरुदेवचौक । जेथे बसतील जन सकळीक । महिला, पुरुष, मुले भाविक । सदभावाने सायंकाळीं ॥४९॥
प्रथम अधिकारी सेवकाने । घेवोनि हातामाजीं झाडणें । त्वरित करावें मैदान निर्दळवाणें । प्रार्थनेसाठी ॥५०॥
येतां प्रत्येक गुरुवार । जाऊनि फिरावें घरोघर । बोलवावी प्रार्थनास्थानीं सत्वर । जनता सारी ॥५१॥
आईबाई सकळ सज्जन । मुलेबाळें वृध्द-तरुण । देवोनिया निमंत्रण । बोलवावे प्रार्थनेसि ॥५२॥
गांवीं सर्वांसि निरोप द्यावा । परस्परें समाज सारा जुळवा । येतांना घोंगडी गोणपाट आणावा । आपापला म्हणोनि ॥५३॥
सकळांनी करावी बिछायत । सर्वांना रांगेंत बसवावें शांत । सदभावना वाढे सकळांच्या मनांत । प्रार्थनेची ॥५४॥
सात्विक असावें वातावरण । अतिशांत ऐसें गंभीरपण । सर्वांनी करावें बंद संभाषण । तया स्थानीं ॥५५॥
आधी पुढे मांडावें अधिष्ठान । त्यावरि आच्छादावें सुंदर आसन । आपुल्याच गांवीं केलेलें पूर्ण । कलाकुसरीने खादीचें ॥५६॥
वरि ठेवावा तकिया साजिरा । जैसा कोणी बसतोच आसनीं बरा । दिसावा ऐसा मोहक पसारा । सात्विकतेचा ॥५७॥
जवळचि बसावे सूचक, गायक । तिसरे भाषण देणारे भाविक । दुसर्या बाजूने पुजारी, पाठक । नामधून म्हणावया ॥५८॥
ऐसा प्रार्थनेचा संच झाला । चहुबाजूंनी सेवकगण बसला । पाठीमागे संरक्षक दिसला । उभा तेथे ॥५९॥
तयाचें काम शांतता राखणें । भोवताली गलबला थांबवणें । सर्वांना शिस्तीमाजीं बसवणें । हळुवारपणाने ॥६०॥
जे कोणी येतील मागाहून । त्यांना बसवावें क्रमाने पूर्ण । मग करावें घंटीवादन । दोनचि ठोके ॥६१॥
उभा राही अधिष्ठानापुढे पुजारी । लावी शांतिने धूपदीपिका बरी । मग सूचक उभा राहतो सामोरी । सूचना द्याया प्रार्थनेची ॥६२॥
सर्वामिळोनि पाठ करवी । एकस्वरें शांतता भरवी । ऐसी प्रार्थना लावील चवी । अंत:करण मोहावया ॥६३॥
सहज लागेल तिकडे ध्यान । ऐसें चालावें प्रार्थनीं गायन । पुढे होईल नामस्मरण । गुरुदेवाचें ॥६४॥
ज्यांत असेल कुणीहि नाम । निवारोनि भेदभ्रम । सर्व धर्मी भाव सम । राखावया सर्वांचा ॥६५॥
हें संपतां भाषणासाठी । देईल सूचक सूचना ओठीं । मग भाषणाधिकारी शेवटीं । देईल भाषण सदभावें ॥६६॥
” आपण सर्व एकचि आहों । मग भिन्नपण कासया पाहों ? सर्वांशीं सहकार्य करा हो ! कुटुंबापरी ॥६७॥
मानव विश्वकुटुंबाचा घटक । ऐसें समजोनि वर्तावें सम्यक । शक्ति द्यावया प्रार्थावी भाक । शक्तिवंतापुढे ॥६८॥
सर्व संत एकचि असती । सर्व देव एकचि निश्चितीं । सर्वांचे संदेश ऐकतां पावती । एकचि तत्त्व सर्वहि ॥६९॥
म्हणोनि सर्वांनी सहकार्य करावें । जैसें ज्याकडोनि बनेल बरवें । संसारा स्वर्गासमान बनवावें । आपुल्यापरीं ॥७०॥
हेंचि सांगावें प्रार्थनेवरि । यांतचि आहे सेवा ईश्वरी । याहूनि भिन्न नाही कुसरी । परमार्थाची ” ॥७१॥
हें भाषण झालिया पूर्ण । मग शान्तिपाठ सर्वांनी करोन । करावें एकनिष्ठेने नमन । एकाच पध्दतीने ॥७२॥
सूचकाने सूचना द्यावी । सर्व मंडळी उभी करावी । जयजयघोषें दूमदुमवावी । ऊर्वि अवघी ॥७३॥
गुरुदेवाचा जयजयकार । त्यांत ये सर्वदेवनमस्कार । ऐसें प्रार्थनेचें तत्त्व सुंदर । बोलिलों तुम्हां ॥७४॥
चौकीं प्रार्थना संपल्यावरि । आपापली घोंगडी पासोडी बरी । उचलूनि न्यावी आपुल्या घरीं । सेवा पुरी करोनिया ॥७५॥
येथे प्रार्थनापाठ नाही बोलिला । तो विषय अन्य ग्रंथीं आला । म्हणोनि येथे नाही विवरिला । पहावा सक्रियपाठीं ॥७६॥
मित्रहो ! ऐका माझें वचन । जरि व्हावें वाटे गांवाचें कल्याण । तरि सामुदायिक प्रार्थना-साधन । सोडूं नका कधीहि ॥७७॥
एवढें अनुभवें सांगोनि ठेवितों । प्रार्थनाच मी गांवाचें धन समजतों । यानेच स्वर्ग मोक्षहि पावतो । समाज अपुला ॥७८॥
आमचा देव समाजीं वसतो । समाजाकरितां सर्व करतो । सर्वांस व्यापूनि राहतो । प्रार्थनेच्या आसनीं ॥७९॥
तो भेटतो जनकार्यांनी । आम्ही केली प्रार्थना म्हणोनि । भरली भावना आत्मा ओतोनि । प्रार्थनीं या ॥८०॥
आपण होता प्रश्न पुसला । म्हणोनि ऐसा विस्तार केला । प्रार्थनीं तल्लीन होतांचि देव कळला । विशाल स्वरूपी ॥८१॥
त्या मूलतत्त्वाचा जो अनुभव । ज्ञानगम्य विश्वात्मक देव । तोचि मानिला गुरुदेव । प्रार्थनीं आम्ही ॥८२॥
त्या गुरुदेवाच्या अधिष्ठानावरि । मूर्तीच हवी असेल जरि । कल्पावी आपापल्या इच्छेपरी । कोणत्याहि देवाची ॥८३॥
देव गुरुदेवांत सामावले । भक्त तेवढे प्रार्थनीं एक झाले । मानवतेचें मंदिर उघडलें । विश्वामाजीं या रूपें ॥८४॥
एकाची प्रार्थना अनेक मिळाया । अनेकांची प्रार्थना अनंत कळाया । अनंत तत्त्वीं एकत्व पावावया । प्रार्थना आहे ॥८५॥
हें समजोनीच हा मार्ग धरिला । आदर द्याया भिन्नधर्मपंथांला । पूज्य मानावया सर्व संतांला । प्रार्थनेमाजीं ॥८६॥
यासाठी व्यापक प्रार्थना मांडली । उपासकांची वेली गुंफली । कळावया सर्व धर्मांची खोली । मूळरूपें ॥८७॥
वेदउपनिषदांची प्रार्थना । सुख हो सर्वचि प्राणीजना । सर्वांची उन्नति हीच धारणा । प्रार्थनेमाजीं ऋषींची ॥८८॥
येशूख्रिस्ताने प्रार्थना केली । सर्वांसाठी शांति मागितली । सहनशक्तीची देवता पावली । तयालागी ॥८९॥
महंमदाने केली प्रार्थना । विखुरला इस्लाम कराया शहाणा । संघटित केलें त्याने स्वजना । तया काळीं ॥९०॥
पावित्र्य शिकविलें झरतुष्ट्राने । संयम शिकविला महावीराने । अहिंसक संघ वाढविला बुध्दाने । प्रार्थनेद्वारें ॥९१॥
संतांचें नामसंकीर्तन । तें सामुदायिक प्रार्थनेचेंचि रूप जाण । सर्व देव-स्मरणें करोनि संघटन । दिलें ज्ञान सर्व जना ॥९२॥
कलियुगीं भक्ति-महिमान । भजन आणि नामसंकीर्तन । यज्ञांत श्रेष्ठ नामजपयज्ञ । प्रार्थनेंते आलें तें सारें ॥९३॥
मूर्तिउपासना आणि ध्यान । नवविधा भक्तीचा सार पूर्ण । प्रार्थनीं सर्वचि साधे साधन । सर्व जनांसि ॥९४॥
शिस्त, शांति, गांभीर्यादि गण । उठण्या-बसण्या-बोलण्याचें ज्ञान । लाभे मानव्याचें शिक्षण । प्रार्थनेमाजीं ॥९५॥
प्रार्थना मानव्यशिक्षणाची शाळा । ग्रामसंस्कृतीचा मुख्य जिव्हाळा । भेदकल्पना जाती रसातळा । प्रार्थनेच्या मुशीमाजीं ॥९६॥
सर्वचि आपण बंधुजन हा भाव वाढ घे मनोमन । गांवाची स्वर्गीयता असे अवलंबून । याचवरि ॥९७॥
सकळांस कळाया ही संस्कृति । उपदेश द्यावा प्रार्थनेअंतीं । ही नित्य ठेवावी चालीरीति । गांवीं आपुल्या ॥९८॥
ही प्रार्थना गांवीं राही जागती । तरि जिवंत राहील गांवसंस्कृति । सामुदायिकतेची दीपज्योति । प्रकाशेल सर्वकाळ ॥९९॥
विश्वीं होऊं शकेल शांतता । तेथे गांवाची कोण कथा ? सामुदायिक प्रार्थनाच करील एकता । नित्यासाठी, तुकडया म्हणे ॥१००॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव संमत । कथिलीं प्रार्थना ग्रामोध्दारार्थ । सत्ताविसावा अध्याय संपूर्ण ॥१०१॥
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
**************
ग्रामगीता अध्याय अठ्ठाविसावा
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
सर्व धर्माचा समन्वय । विश्वशान्तीचा उपाय । लोकसुधारणेचें विद्यालय । सामुदायिक प्रार्थना ॥१॥
ऐसें झालें प्रतिपादन । परि आमुचां ऐका प्रश्न । सर्व धर्मांची प्रार्थनापध्दति भिन्न । ते होतील एक कैसे ? ॥२॥
कैसा रुचेल एक पाठ ? प्रत्येकाची वेगळीच वाट । कैसे बसतील एकवट । भक्त भिन्न देवांचे ? ॥३॥
दुसर्या धर्मीयांमाजीं बसतां । झाली वाटे धर्मभ्रष्टता । यासाठी उपाय सांगा कोणता । सामुदायिकतेसि ? ॥४॥
श्रोतियांचा ऐकोनि प्रश्न । संक्षेपें करितों उपाय कथन । लोकां पटवावें तत्त्वज्ञान । सदधर्माचें नानापरी ॥५॥
जगीं दिसती विभिन्न धर्म । परि सर्वांचें एकचि वर्म । विश्वधारणेचा मार्ग उत्तम । सदधर्म तोचि ॥६॥
व्हावी विश्वाची उत्तम धारणा । शांति लाभावी सर्वजना । या एकाच उद्देशाने प्रयत्न नाना । केले धर्मप्रवर्तकांनी ॥७॥
सर्व विश्व आर्य करीन । तिन्ही लोक आनंदें भरीन । हें संतऋषींचें विशाल बंधुपण । नव्हतें स्वार्थासाठी ॥८॥
लोक प्रतिमापूजक नसावे । त्यांनी एका ईश्वरासि प्रार्थावें । हा महंमदाचा उपदेश नव्हे । एकाच देशासाठी ॥९॥
येशू ख्रिस्ताने प्रेमपाठ दिला । प्राणहि पणास लावला । तेथे अन्य मानव नाही वगळला । कळपांतूनि देवाच्या ॥१०॥
बुध्द आणि महावीर । श्रीकृष्ण आणि झरतुष्ट्र । यांनाहि सर्वांचीच फिकीर । विश्व सुखी होवो म्हणोनि ॥११॥
त्या त्या देशधर्माच्या संतीं । हीच व्यापक धरोनि वृत्ति । विशाल मानवसमाजाप्रति । सेवा दिली आपुली ॥१२॥
अन्य देशांचे आणि भाषांचे । झालेले आणि होणारे साचे । थोर पुरुष गौरविले त्यांनी वाचें । आपुल्या ग्रंथीं ॥१३॥
धर्मभ्रष्टतेची कल्पना । ही मान्यचि नव्हती धर्माचार्यांना । सर्व विश्वाचीच त्यांना । काळजी होती समान ॥१४॥
सर्व विश्वाचा एकचि देव । त्याचीं मुलें सर्वचि जीव । जरी वेगवेगळें दिलें नांव । तरी भाव हाचि त्यांचा ॥१५॥
हिंदूंचा देव हिंदुत्व धरी । मुसलमानांचा मुस्लिम करी । ख्रिश्चनाचा ख्रिस्त्यांनाचि तारी । ऐसें म्हणणें आकुंचित ॥१६॥
सर्वांत उच्च ऐसी भावना । जगच्चालकाची कल्पना । तेथे कैचा उरे भिन्नपणा ? आप-पर कोण ? ॥१७॥
भिन्न मार्ग-मार्गी असती । परि देव नाही भिन्नस्थिती । मूळ धर्माचीहि नाही गति । भिन्नत्वाची ॥१८॥
सर्वचि म्हणती जगत सारें । केलें आमच्या ईश्वरें । धर्माचा आदेश श्रेष्ठाद्वारें । दिला आम्हां ॥१९॥
ऐसे सर्वाधिपति ईश्वर । काय जगीं असती शंभर ? एकचि जगच्चालक परमेश्वर । तोचि सर्वांचा ॥२०॥
अल्ला, गॉड, अर्हत, देव । अहूरमज्द, निर्वाण, शिव । परमेश्वरासि ठेवा नांव । एक गुरुदेव तोचि माझा ॥२१॥
जगासि सुखी उन्नत करावें । हेंचि त्या जगन्नियंत्या रुचावें । मग धर्माचें रूप याहूनि असावें । भिन्न कैसें ? ॥२२॥
आपणाऐसें सर्वांचें सुखदु:ख । जाणोनि वागावें उपकारक । सर्व धर्मी हाचि आदेश एक । दुमदुमताहे ॥२३॥
यांचा करूं जातां विचार । सर्व पंथधर्म भक्तिप्रकार । एकतत्त्वी कळती साचार । भेद भक्तांनी कां घ्यावा ? ॥२४॥
ज्याची बुध्दि अल्पबल । ते घरांत करिती घरकुल । परि हें विश्व एकचि दल । मानवांचें ॥२५॥
एकचि भूमि सर्वांकरितां । एकचि हवापाणी, सुख-व्यथा । पंचभूतांचीच सर्वथा । शरीरें सर्वांची ॥२६॥
एकचि जीवनाचें मूळ । एकचि शेवटचें स्थळ । एकचि सेवाधर्म निर्मळ । नाना रूपीं ॥२७॥
सर्वांच्या नेत्रीं एकचि ज्योति । सर्वांच्या अंगीं एकचि शक्ति । सर्वांठायीं एकाचीच व्याप्ति । तेथे भिन्न कोण आले ? ॥२८॥
मुस्लिम ख्रिस्ती जमात कांही । आकाशांतून आली नाही । त्यांचे पूर्वीहि होती मही । मानवांनी नटलेली ॥२९॥
एकाचें जग देवाने केलें । आणि एकासि भुतांनी जीवन दिलें । ऐसें मानतां जग वेगळालें । दिसेना पंथधर्मांचें ॥३०॥
धर्मात नाही हिंदु मुसलमान । धर्मांत नाही पारशी-खिश्चन । धर्मांत नाही शिख-जैन । पाहतां मुळीं ॥३१॥
लोक धर्मांची व्याख्याच विसरले । धर्में हिंदु मुसलमान झाले । मूळचें मानवपणहि आपुले । हरविलें त्यांनी ॥३२॥
देशभाषेचे बुरखे घातले । हवापाण्याने रिवाज बदलले । त्या बहिरंगासीच धर्म म्हणों लागले । अल्पज्ञानी ॥३३॥
देशाचारी राहणी झाली । हवापाण्यापरी विशेषता आली । उत्पादनापरी आरंभिली । भोजन-व्यवस्था ॥३४॥
म्हणोनि काय मानवत्वहि बदललें ? सत्यसिध्दान्ती अंतर पडलें ? पाप-दु:खहि उचित वाटलें । उलटें कोणा ? ॥३५॥
हें म्हणणें मला आवडेना । मी एकचि मानतों सर्वांना । आधी मानवता सर्वांचा बाणा । पंथभेदांना स्थान मग ॥३६॥
भिन्न राहणी भिन्न उपासना । म्हणोनि का पारखा मानवपणा ? जरी भिन्न पध्दतींनी केली प्रार्थना । तरी काय झालें ? ॥३७॥
एकाचि सागराची वाफ । होऊनि आली पाणीरूप । थेंब कामें करोनि खूप । जातील शेवटीं एका स्थळीं ॥३८॥
तैसेचि आहे मानवांचें । मानव कोणत्याहि धर्माचें । परंतु समाजरचनेसाठी त्यांचे । महत्त्व सारिखें ॥३९॥
आदि-अंतीं सर्वचि एक । मध्ये समाजसेवेचें कौतुक । त्याचेंहि मूल्य समान देख । मानवधर्म-दृष्टीने ॥४०॥
धर्म सांगे पुजारी व्हावें । धर्मचि सांगे भंगी व्हावें । धर्म म्हणतो गावें-नाचावें । सर्वांसाठी ॥४१॥
ऐसें वेगवेगळें कर्म केलें । तरी परकेपण नाही ठेविलें । सर्व मिळोनि एक झाले । तोचि धर्म ॥४२॥
धर्मामाजीं सर्व येतें । परंतु तारतम्य पाहिजे तेथे । मानवाशीं होय विद्रोह ते । न करावें धर्म म्हणे ॥४३॥
धर्माची आखणी मानवता । मानवतेसाठी करावी व्यवस्था । कोठेहि होतां अव्यवस्था । धावोनि जावें ॥४४॥
ही व्यवस्था जेव्हा अपुरी पडली । तेव्हाचि गट वृत्ति निर्माण झाली । व्यक्तिमत्वाचीं प्रलोभनें वाढलीं । भिन्न मार्गांनी ॥४५॥
विश्वाचे ऐसे झाले तुकडे । कोणीहि गेला कोणीकडे । नांवरूप धरोनि वेडेंवाकडें । फुटला धर्म ॥४६॥
देशकालादिकासि बघून । केलीं साधनें निर्माण । त्या फांद्यांनाचि धर्मवृक्ष मानून । आखणी झाली गटांची ॥४७॥
म्हणोनि पडलें विभिन्न नाम । हिंदु-मुसलमान-ख्रिश्चन धर्म । जैन-शिख-महानुभाव-ब्राह्म । नामें धर्मामाजीं ॥४८॥
अजोनि खुंटली नाही संख्या । जेवढी पंथसंप्रदाय-व्याख्या । सर्वांसीच धर्मनामाअख्या । पुढे लागे ॥४९॥
घराघराचा अलग धर्म । धर्म एकेक व्यवहारकर्म । आपलें जगणें हेंचि सत्याचें वर्म । ऐसा भ्रम जाहला ॥५०॥
ऐसी जंव वाढली प्रथा । तंव झाली सर्वांसीच व्यथा । मग म्हणती विरोधी धर्मपंथां । केलें पाहिजे शासन ॥५१॥
हें आवराया निर्मिली सत्ता । सामदामदंडभेद-प्रथा । हा राजधर्महि लावण्यासि व्यवस्था । मानवांची ॥५२॥
जे धर्ममार्गी संघटित झाले । त्यांनी न्यायसत्र आरंभिलें । आपापल्या परींनी केलें । स्थापन राज्य ॥५३॥
राज्य केलें धर्मासाठी । परि उपभोगचि लागला पाठीं । लागली अहंतेची आटाआटी । आसक्तीमुळे ॥५४॥
मग धर्मचि वगळून गेला । राजकारण धर्म झाला । त्यासाठी गलबला वाढला । सर्व देशीं ॥५५॥
विसरोनि सेवाधर्माचें अधिष्ठान । राज्य करावें हेंचि मोठेपण । राबवावें मानवां पूर्ण । ऐसें झालें ॥५६॥
मग मानवाच्या सुखासाठी । मानव द्यावेत बळी संकटी । पडली ऐसीच राहटी । लोकांमाजीं ॥५७॥
गेलें प्रेमाचें समजावणें । लागलें तलवारीस धार देणें । जो करील हिंसा अधिकतेने । तो विजयी ठरला धर्मवान ॥५८॥
सत्ताबळ संख्याबळ । त्यावरि धर्म ठरला प्रबळ । तेथे सत्याचें फुटलें कपाळ । शक्तियोगें ठरतां धर्म ॥५९॥
मग धर्मचि झालें हतियार । धर्माकरितां युध्द संहार । धर्मयुध्दाचें बंड थोर । वाढलें लोकीं ॥६०॥
सत्य त्याग सेवेसि कोणी पुसेना । आपुलींच मतें मिरविती नाना । ऐसा हा झाला धिंगाणा । पृथ्वीवरि ॥६१॥
बिघडोनि गेली धर्माची रीति । ती सुधारावया अपुरी शक्ति । म्हणोनि देवादिकांनाहि हातीं । शस्त्रें धरावीं लागली ॥६२॥
तें धर्मयुध्द न्यायाचें होतें । उन्मत्तता मुळीच नसे जेथे । बळी तो कान पिळी हें तेथे । लावणें हा अधर्म ॥६३॥
न्यायदानांत द्वेषपाप नसतें । परि जेव्हा आसक्ति देशाची घेरते । तेव्हा माणसाची बुध्दि जाते । विनाशाप्रति ॥६४॥
मग युध्द राष्ट्राची अरेरावी । घमेंड कुटिलतेच्या उठाठेवी । अधर्म तो जरि असेल युध्दचवी । कोणाचीहि अन्यायी ॥६५॥
माणूस माणसासि मारी । अपराध नसतां दमन करी । तें युध्दहि परि दुराचारी । बोलिलें शास्त्रीं धर्मांचेंहि ॥६६॥
हा न्याय जेव्हा सकळांना कळे । तेव्हा थांबे युध्दाचें वारें सगळें । मानवसमाज माणुसकीशीं मिळे । न्यायदेवतेपुढे ॥६७॥
जें युध्दांचें तेंचि लहान झगडयांचें । तैसेंचि कुटुंबांमधील कलहांचें । हें सारें प्रदर्शन अज्ञानाचें । वेगळाल्यापरीं ॥६८॥
धर्म, पंथ आणि पक्ष, देश । यांच्या नशेचा अभिनिवेश । धर्मवेडें करोनि मानवास । न्यायमार्गें जाऊं नेदी ॥६९॥
जेव्हा मुसलमान राज्य करी । तेव्हा देवळें पाडोनि मशिदी उभारी । आपण शहाणे म्हणोनि वाजवी भेरी । लौकिकामाजीं ॥७०॥
त्याची सत्ता विलया गेली । तेव्हा हिंदूने मसजिद पाडली । आपलीशी करोनि सोडली । दुसर्या पंथीं ॥७१॥
जेव्हा ख्रिश्चनाचें बंड आलें । तेव्हा त्याने चर्च वाढवले । आपुलें जाळें पसरोनि दिलें । मनमाने त्यांनी ॥७२॥
रागद्वेषांचें समाधान । अभिलाषापूर्तीचें साधन । म्हणोनि केलें युध्द वा दमन । सूडबुध्दीने ॥७३॥
हा तो नव्हे धर्मविचार । हा आहे शक्तीचा व्यवहार । धर्मात मान्य नाहीच संहार । निरपराध मानवांचा ॥७४॥
धर्मांत आहे सुव्यवस्था । शांति, बुध्दि, न्यायप्रियता । अहिंसेने समजावितां । होतो धर्म श्रेष्ठ ऐसा ॥७५॥
मानव मानवासाठी कष्टतो । दुसर्याच्या सुखीं सुखावे, श्रेष्ठ तो । परि मानवास मानव संहारतो । अधर्म याहूनि कोणता ? ॥७६॥
हेंचि जयांना अंतरीं कळलें । तेचि महामानव समजले गेले । मग कोणतेहि पंथ धर्म जरी असले । सर्व चांगले आम्हांलागी ॥७७॥
सर्वचि धर्मपंथांचे देव । धर्मप्रवर्तक महामानव । यांचा ऐसाचि असे भाव । व्हावे मानव सर्व सुखी ॥७८॥
जगीं नांदावी सुखशांति । सर्वांनी आचरावी बंधुप्रीति । यासाठीच झटले असती । महापुरुष अभेदत्वें ॥७९॥
धरोनि हाचि विशाल हेत । कालानुसार काढिले पंथ । केला उपदेश लिहिले ग्रंथ । परोपरीं त्यांनी ॥८०॥
याचसाठी आजवरि झालीं । कुराणें पुराणें धर्ममतेंहि भलीं । परि अहूनिहि नाही आकळली । खोली याची सर्वांना ॥८१॥
पूर्वीपासूनि प्रयत्न झाले । न कळणारांनी विरोधिलें । अजूनहि प्रयत्न चालले । याचि मार्गाचे ॥८२॥
आम्ही आहोंत प्रयत्नवादी । देवादिकांचे विशाल संवादी । जगासि तैसी लाभो सदबुध्दि । म्हणोनि प्रार्थना आरंभिली ॥८३॥
यांत नवीन नाही गोविलें । पूर्वीच्या धर्माचें हृदगत भलें । तेंचि एकत्र करोनि ठेविलें । वेगळया स्वरूपें ॥८४॥
सर्वचि थोरांचे थोर विचार । सर्वाच्या पध्दतींचा सार । करोनि ठेविला गुच्छाकार । समाजापुढे ॥८५॥
ज्यांत परस्परांचें समाधान । जेणें सकलांचें सुंदर जीवन । तेंचि साधावया अनुसंधान । प्रार्थना केली ॥८६॥
समन्वयकारी प्रार्थनापाठ । ही नव्हे पोलादी चौकट । येथे प्रत्येकासि वाव असे स्पष्ट । आपुलें गोवाया ॥८७॥
तात्त्विकता कुठूनहि घ्यावी । आपुलीच एक टांग नसावी । सर्वांच्या समाधानाची ठेवावी । सहनशील बुध्दि ॥८८॥
ऐसी प्रार्थनाच शान्ति-प्रभावी । शान्तीसाठी विशालता हवी । विशालतेसाठी सोय व्हावी । परस्परांची ॥८९॥
परस्परांच्या हृदयांसि स्पर्शता । जवळ येईल आत्मीयता । तेणेंचि विश्वासि प्रेमें जिंकतां । होईल प्राप्ति सुखशांतीची ॥९०॥
धर्म-पंथ-देशांचें भांडण । न मिटे ऐक्य-प्रेमाविण । तें प्रेम साधाया प्रार्थनेसमान । पातळी नाही उत्तम ॥९१॥
सर्वचि धर्मीं प्रार्थनातत्व । सात्विकतेंतचि टिकाऊ एकत्व । याचें जाणोनिया महत्त्व । आणावें सर्वां एके ठायीं ॥९२॥
परस्परांचा संबंध नव्हता । म्हणोनि पध्दतींत बदल होता । त्यांस आतां जवळ आणतां । पाप कैसें ? ॥९३॥
सर्व विश्वाची एकचि प्रार्थना । सर्व विश्वाचा एकचि बाणा । सर्व विश्वांतचि एकपणा । कां न यावा ? ॥९४॥
न येण्याचें एकचि कारण । आकुंचित आमुचें ज्ञान । म्हणोनि आपापल्या परीने मंडण । केलें असे धर्मांचेंहि ॥९५॥
देवापासूनि एक होती । तेचि विशाल मन करिती । अल्प ज्ञानियापाशी फजीती । मानवधर्माची ॥९६॥
ते समजती भ्रष्टाकार । इतर तुच्छ आपण थोर । त्यांना स्वत:चाहि धर्म-विचार । कळला नाही ॥९७॥
प्रार्थनीं सर्वांनी फड मांडावे । प्रार्थना संपतांचि वितंडावें । ते प्रार्थी नव्हेत पेंढारी म्हणावे । स्वार्थी ऐसे ॥९८॥
लोक स्वार्थांनी दुरावले । आपसांत लढूं लागले । ते उपासनेने जवळ आले । होईल ऐसें ॥९९॥
त्यासाठी त्यांना ज्ञान द्यावें । धर्मसमानत्व शिकवावें । न पटे तोंवरि प्रार्थनेसि लावावें । स्वधर्माच्याचि ॥१००॥
भिन्न धर्मांनी भिन्न प्रार्थना केली । परि प्रार्थनातत्त्वें प्रतिपादिलीं । तरी आदरभावना सर्वत्र वाढली । होईल ऐसें ॥१०१॥
याने तयार होईल भूमिका । प्रत्येक धर्म आपणासारिखा । तेणें विश्व शान्तिसुखा । पावेल एक होऊनि ॥१०२॥
म्हणोनि धरिली ही साधना । साधा सामुदायिक प्रार्थना । सामुदायिक होण्याचीच धारणा । आरंभिली सात्विक ॥१०३॥
ईश्वराची जी मनोकामना । एकापसोनि अनेकपणा । अनेकान्तरीं एकत्व भावना । उपभोगावी या द्वारें ॥१०४॥
सर्वांनी चहूकडोनि यत्न करावे । आपल्यापरीने जवळ यावें । सिध्दान्तांचें गोडवे गावे । म्हणजे वेळ न लागे ॥१०५॥
सिध्दान्तरूप तत्त्वज्ञान । लोकांमाजीं रुजविल्याविण । न होय पंथद्वेषादिकांचें उच्चाटन । नेहमीकरितां ॥१०६॥
सामुदायिक प्रार्थनारूपें । हें तत्त्व रुजविणें असे सोपें । म्हणोनि लागा खटाटोपें । कार्यासि या गांवोगांव ॥१०७॥
गांवोगांवीं धर्मसमभाव । मग आपैसेंचि सुखावे विश्व । पृथ्वीसि लाभेल स्वर्ग-गौरव । तुकडया म्हणे ॥१०८॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । धर्मसमन्वय कथिला येथ । अठ्ठाविसावा अध्याय संपूर्ण ॥१०९॥
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
**********************
ग्रामगीता अध्याय एकोणतिसावा
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
श्रोतीं शंका विचारिली । आपण सर्वधर्मी समानता केली । परंतु परधर्म भयावह बोली । गर्जविली गीतेने ॥१॥
स्वधर्मी मरण्यांतहि श्रेय । परि परधर्मीं आहे भय । मग धर्मांचा समन्वय । करिता कैसा ? ॥२॥
ऐका ग्रंथींचा दाखला । परधर्म भयावह जरी ठरला । तरी त्याचा अर्थ पाहिजे जाणला । श्रोतयांनी ॥३॥
हिंदु बुध्द मुसलमान । ख्रिस्ती पारशी अथवा जैन । ऐसें नव्हतें नामाभिधान । धर्मासि तेव्हा ॥४॥
भिन्न धर्मांचा जन्महि नव्हता । मग परधर्म कां सांगे गीता ? तेथे कर्तव्याचीच भिन्नता । ध्यानीं तियेच्या ॥५॥
एकाची प्रकृति ज्या कार्याची । ज्या गुणांची स्वभावेंचि । त्यासि गुणकर्में दुसर्याचीं । साधती केंवि ? ॥६॥
कोणात शक्ति कोणांत युक्ति । कोणांत ज्ञान, सेवावृत्ति । साधे त्याचि साधनें करावी भक्ति । जनताजनार्दनाची ॥७॥
त्याने आपल्या प्रकृतिपरी । करावी राष्ट्राची चाकरी । दुसर्याचें कर्तव्य घेतां शिरीं । विनाश त्याचा ॥८॥
म्हणोनि परधर्म भयावह । ऐसें कथिलें नि:संदेह । तुपांत नोहे मत्स्याचा निर्वाह । पाण्याहूनि उत्तम जरी ॥९॥
स्वधर्म म्हणजे आत्मधर्म । आत्म्याचा स्वभाव सत्य ज्ञान प्रेम । यासाठीच करणें जीवनाचा होम । श्रेयस्कर हें सर्वां ॥१०॥
असत्य, अज्ञान, भेद-वैर । अन्याय, अत्याचार, दुराचार । हा अनात्मधर्म दु:खकर । परधर्म हा भयावह ॥११॥
आत्मवश तें तें सुख । परवश परतंत्र तें दु:ख । ऐसेंहि धर्मग्रंथीं अनेक । कथिलें थोरांनी ॥१२॥
परधर्म म्हणजे विकरांधता । स्वधर्म म्हणजे न्यायसिध्दता । हें समजण्याचें तत्त्व हातां । दिलें तयांनी ॥१३॥
आपुला म्हणोनि हृदयीं धरावा । परका म्हणोनि दूर लोटावा । ऐसा ऋषिमुनींचा गवगवा । कोठेचि नाही ॥१४॥
मुसलमान म्हणतां मारावा । ख्रिश्चन म्हणतां हाकूनि द्यावा । आपला पापीहि छातीशीं धरावा । हा नव्हे अर्थ स्वधर्माचा ॥१५॥
कोणी म्हणती आम्ही हिंदु । मुसलमानांचा अतिविरोधु । ख्रिश्चनासि कधी न वंदूं । भाऊ म्हणोनि आपुला ॥१६॥
मी म्हणतों वंदन गुणासि आहे । जातिधर्मावरि काय ? हिंदु उघड पाप करिताहे । त्यासि मान कां द्यावा ? ॥१७॥
मुसलमानाचें उत्तम वर्तन । तरी तो निंद्य मुसलमान म्हणोन । हें कोणीं दिलें न्यायदान ? सांगा सांगा श्रोतेहो ! ॥१८॥
ख्रिश्चन दूरदेशाहुनि आला । सेवा करतां करतां मेला । त्याने जरि धर्म नाही बिघडविला । तुमचा कांही ॥१९॥
तरी त्यासि तुम्हीं अव्हेरावा । हें म्हणणें नाही पसंत जीवा । तो आपुलाचि म्हणोनि राखावा । बंधुसखा ॥२०॥
जो कोणी सत्य सिध्दांती । ज्याची विश्वव्यापी प्रीति मति । तो असो कोणत्याहि धर्मजमातीं । समजावा चित्तीं आपुलाचि ॥२१॥
धर्म माणुसकीसि म्हणती । माणुसकी न्यायावरि शोधिती । न्याय कोणाच्याहि प्रति । एकचि राहतो सर्वदा ॥२२॥
परि ही दृष्टि मंद झाली । आप-पर भावना बळावली । तेणें धर्मपंथांत फूट पडली । आत्मीयता दिसेना ॥२३॥
मूळतत्त्वें विलया गेलीं । महंती-बुवागिरी वाढली । सांप्रदायिक वृत्ति फोफावली । अज्ञानयोगें ॥२४॥
ऐसा प्रकार होत आला । म्हणोनि खरा धर्म मातींत मिळाला । आतां उठणेंचि त्या धर्माला । कठीण झालें ॥२५॥
गुणकर्मांचा लोप झाला । स्वधर्म-परधर्म ठरेल कोठला ? गोंधळोनि समाज गेला । गर्तेमाजीं भेदभ्रमें ॥२६॥
विष्णुमय जग हाच स्वधर्म । ऐसें संतीं कथिलें वर्म । तरीहि आमुचा न जाय भेदभ्रम । अमंगळ ऐसा ॥२७॥
मानव हेंचि आपुलें नाम । मग स्वधर्म म्हणजे मानवधर्म । हें तरी ध्यानीं घ्या सत्य वर्म । साध्या बोलीं ॥२८॥
आपण आहोंत मानव । मानव्याचा वाढवावा गौरव । सुखी राहावेत आबालवृध्द सर्व । हेंचि कार्य आपुलें ॥२९॥
मज मान्य धर्म न्यायनीति । शुध्द चारित्र्य, प्रेमस्फूर्ति । करी जो समाजाची धारणास्थिति । समान भावें ॥३०॥
हें जोंवरि वर्म नेणें । तोवरि धर्म हो कोणी म्हणे । ती अपूर्णतेचीं धर्मलक्षणें । समजों आम्ही ॥३१॥
मग घ्या कोणत्याहि ग्रंथाचें वचन । परि वर्म याहूनि नाही भिन्न । मानवता हीच आहे खूण । सर्व धर्म-समन्वयाची ॥३२॥
ज्या ज्या धर्मी मानवता । ते सर्व धर्म एकचि तत्त्वता । यासि विरुध्द नाही गीता । समतावादी कृष्णाची ॥।३३॥
कृष्ण म्हणे समं हि ब्रम्ह । समता हाचि ईश्वरी धर्म । समदर्शी तोचि पंडित उत्तम । योगाचें मर्म समत्वचि ॥३४॥
सर्वठायीं वासुदेव । ऐसा भाव नव्हे अनुभव । दुर्लक्ष तो महात्मा, देव । बोलूनि गेला गीतेमाजीं ॥३५॥
सर्व धर्म सोडोनिया । शरण जावें एका देवराया । सर्वव्यापक जाणोनि तया । हेंचि वर्म उध्दाराचें ॥३६॥
सर्वांविषयीं समभाव । सर्वांभूती वासुदेव । हे जाणे तोचि खरा मानव । सत्य धर्म हाचि त्याचा ॥३७॥
या दृष्टीने करी जें जें कांही । ती सर्वेश्वराची पूजाच होई । जेथे आप-पर भेद नाही । समन्वयीं चित्त आलें ॥३८॥
मग तो असो कोणत्या जातीचा । पंथाचा वा धर्मजमातीचा । तो खरा स्वधर्मी सखाचि आमुचा । मानूं आम्ही ॥३९॥
यावरि श्रोतीं विचारिलें । आपण सर्व धर्मी समत्व कथिलें । परि याचे फायदे घेतले । कुटिल जनांनी आजवरि ॥४०॥
कोणीं युध्द करोनि लोकां जिंकिलें । बळेंचि आपुल्या धर्मी ओढिलें । कोणीं प्रलोभनांनी मोहविलें । वाटे का हें योग्य तुम्हां ? ॥४१॥
कांही दूरदेशींचें लोक येती । सेवा करोनि प्रवेश मिळविती । भोळया जना नागविती । धर्मान्तरा करवोनिया ॥४२॥
वाढवोनि आपुलें संख्याबळ । करावी सत्तेसाठी चळवळ । ऐसा डाव साधती सकळ । विधर्मी हे सेवेंतूनि ॥४३॥
सर्व धर्मीं समभाव । म्हणतां धर्मान्तरासि मिळे वाव । येणें बुडेल राष्ट्राची नाव । सांगा उपाव यासि कांही ॥४४॥
यावरि ऐकावें उत्तर । धर्म-समभाव आणि धर्मान्तर । ह्या गोष्टींत असे बहु अंतर । खरोखर नव्हे हे ॥४५॥
धर्मान्तराचा करितां विचार । ज्ञात्याचेंचि योग्य धर्मान्तर । परि ज्यासि कळलें सारासार । त्यासि धर्मान्तर कशासाठी ? ॥४६॥
ज्यासि कळलें धर्मसमत्व । त्यासि बाह्य भेदांचें नुरे महत्त्व । मग तो स्वधर्मीच आचरील तत्त्व । पाहिजे तें तें ॥४७॥
न करील कोणावरि आक्रमण । न होईल कोणाच्या आधीन । लोभें भयें परधर्मग्रहण । हें अध:पतन वाटे तया ॥४८॥
दुसर्या धर्मासि युध्दें छळिलें । त्यासि धर्मसेवा नाम दिलें । हें महापातक असे बोलिलें । यापूर्वीहि निश्चयाने ॥४९॥
तैसाचि जो समान अज्ञानी । त्यासि विधर्मी नेलें मोहवूनि । त्यायोगेंहि उन्नति कोठूनि ? तें तों सोंग बहुरूप्याचें ॥५०॥
मानवी स्वभाव प्रेमाचा भुकेला । कांही गरजांमुळे वश झाला । तरी त्याचा फायदा असला । घेऊं नये दुसर्यांनी ॥५१॥
कोणींहि सेवा करायासि यावें । परि धर्मान्तर मोहाने करवावें । आपले जनगण वाढवावे । हें तों दुष्ट राजकारण ॥५२॥
धर्मवर्में एकचि असती । परि हे राजकारण त्यांत गोविती । संख्याबल वाढवोनि करिती । परस्परांचा वैरभाव ॥५३॥
धर्मप्रचाराचे नांवाखाली । राज्यसाधना आंतूनि घाली । त्याची जातचि समजावी भ्रष्ट झाली । धर्मातूनि ॥५४॥
तो नव्हे कोणत्याहि धर्माचा । स्वार्थ साधणेंचि धर्म त्याचा । अव्हेरूनि द्यावा जिवाभावाचा । असला तरी ॥५५॥
तैसाचि न ओळखतां स्वत्व । दुसर्यांचें मानोनि महत्त्व । उगीच परधर्मीं घे धाव । नाही ठाव त्यासि कोठे ॥५६॥
समजोनि तत्त्व सर्वांत मिळावें । परि पोटाकरितां धर्मा न सोडावें । आत्ममार्ग न समजतांचि करावें । कासयासि हें सारें ? ॥५७॥
ऐसें जेथे जेथे झालें । त्यांना कलंकचि लागले । पाहतांना आजहि दिसलें । अनुभवियासि ॥५८॥
येथे आपणहि आहों कारण । याचें असूं द्यावें स्मरण । खर्या धर्माचें सक्रिय ज्ञान । कोण देतो दीन जनां ? ॥५९॥
लोक धर्म-धर्म ओरडती । प्रसंग पडल्या कामीं न येती । संग्रह असोनि चित्त पाहती । आपुलियांचें ॥६०॥
धर्माचा बाळगती अभिमान । परि धर्मबांधवां नाही स्थान । कुत्र्यामांजराइतुकाहि मान । न देती तयां धर्मलंड ॥६१॥
मानवाचा स्पर्शहि पाप । मानूनि त्यासि करिती दु:खरूप । विधर्मी जातां मानिती बाप । त्यासीच मग ॥६२॥
दीनदलितांची तहानभूक । दीनदलितांचें सुखदु:ख । कांहीच नेणती अभिमानी मूर्ख । स्वधर्म-घोक चालविती ॥६३॥
सर्वांठायीं म्हणती ब्रह्म । परि भ्रमासारिखें करिती कर्म । ऐसें नाही धर्माचें वर्म । बोलिलें संतीं कोठेहि ॥६४॥
परि हे शिकवाया उपदेशक कुठले ? कोण लोकांस समजावी भलें ? हे तों सर्वाचि लागले । पोटापाण्यासि धर्मनावें ॥६५॥
पोटपुजार्यांनी केला प्रचार । आपुल्या लाभाचा व्यवहार । मानवांमाजीं पाडलें अंतर । व्यक्तिसुखासाठी ॥६६॥
हें सर्व आडाणपण । जोंवरि जाणार नाही मानवांतून । तोंवरि जगाची उन्नति पूर्ण । होणें कठिण समजावें ॥६७॥
त्यासाठी एकचि करावें । आपापलें धर्मक्षेत्र सुधारावें । सकळांसीच सकळांचें द्यावें । तत्त्वज्ञान समजावोनि ॥६८॥
हें ज्या धर्मास जातीस फावे । तेणेंचि सुखसोहळे बघावे । यासाठी अनेक प्रयत्न करावे । जाणत्या जनांनी ॥६९॥
कांहींनी करावा आदिवासी-सुधार । जावोनि रानीं खेडयांवर । पाहावें गरीब लोकांचें कुटीर । कैसें आहे ॥७०॥
गरीब जंगली आदिवासी जाती । झाडपालेचि नेसोनि राहती । झाडाखालीच असते वसती । कित्येकांची ॥७१॥
त्यांसि बोलणें चालणें समजेना । भिवोन पळती बघतांचि आपणा । प्रेम लावोनि त्या कुटुंबांना । करावें आपण आपलेंसें ॥७२॥
त्यांना औषधपाणी पुरवावें । लिहिणें वाचणेंहि शिकवावें । उत्सवीं सहभोजनीं मिसळावें । कार्यकर्त्यांनी ॥७३॥
जनीं भोजनीं मंदिरीं । अस्पृश्यतेचीहि न उरावी उरी । स्थान-मान सर्वतोपरीं । एक करावें सर्वांचें ॥७४॥
स्वच्छ राहणी निर्व्यसनी । शिकवावी स्वयें त्यांत मिसळोनि । तुच्छ न मानावें दुरोनि । उणीव दावोनि परभारें ॥७५॥
दूर कराव्या अडी-अडचणी । सुविचारांची करावी पेरणी । सर्वचि समाज समानगुणी । करावा नाना प्रयत्नें ॥७६॥
आजवरि यांची केली उपेक्षा । प्रायश्चित्त म्हणोनि सेवादीक्षा । घेवोनि त्यांची वाढवावी कक्षा । संधि देवोनि सदभावें ॥७७॥
जे कोणी असती अडले-नडले । रंजले-गांजले रोगें पिडले । त्यांसाठी पाहिजे धाम निर्मिलें । सुखशांतीचें, आरोग्याचें ॥७८॥
क्षय अथवा कुष्टरोग । हे न मानितां दैवाचे भोग । त्यांच्या निवारणाचे प्रयोग । केले पाहिजे गांवोगांवीं ॥७९॥
भंगलेल्या मानवी मूर्ति । यांच्या सेवेंतचि ईश्वरभक्ति । आर्तासि दिल्यावांचूनि शांति । मागतां मुक्ति मिळे कैसी ? ॥८०॥
जीवनांतूनि जे जे उठले । त्यांशी सहृदयपणें पाहिजे भेटलें । अनाथांचिया सुखास्तव झटले । तेचि आवडले देवधर्मा ॥८१॥
अंध पंगु मूक बधीर । अशक्त अपंग निराधार । या ईश्वरी चित्रां रंगविती सुंदर । ते ते थोर धर्मशील ॥८२॥
विधर्मी लोक हें कार्य करिती । म्हणोनि जनांची जडते प्रीति । किळस आळस आमुच्या चित्तीं । अधोगति आमुची ही ॥८३॥
सोडोनिया ऐसा स्वभाव । आपण सेवेसि अर्पावा जीवभाव । दलितसमाजा मानोनि देव । सेवा करावी हाचि धर्म ॥८४॥
हाचि धर्म संतीं आचरिला । जनीं जनार्दन ओळखिला । निर्लोभ प्रेमें सजविला । विश्वबगीचा ॥८५॥
धर्मावतार रामकृष्ण । जटेने झाडी अस्पृश्यांचें अंगण । एकनाथ केलें भोजन । कडे मिरवोन बाळ त्यांचें ॥८६॥
चैतन्य महाप्रभूने हृदयीं । आलिंगिले दलित, रोगीहि । गांधी येशूने तोषविले कुष्टदेही । सेवा करोनि ॥८७॥
विधवा अनाथ-अपंगसेवा । पैगंबरें मानिला पुण्यठेवा । जातिभेदाचा झुगारिला गवगवा । बुध्द गौतमाने ॥८८॥
श्रीरामें शबरीचीं खादलीं बोरें । गुहका आलिंगिलें प्रेमभरें । मित्र केलीं आदिवासी वानरें । अहिल्येसि उध्दरिलें ॥८९॥
श्रीकृष्ण गोवळयांत नांदला । स्त्रीशूद्रांचा कैवारी झाला । जोबवतीशीं विवाह केला । आदिवासी जमातीच्या ॥९०॥
भीष्माचिया वडिलाने । वरिलें कोळियाच्या कन्ये । ऐसीं शेकडो प्रमाणें । सापडती पूर्व ग्रंथीं ॥९१॥
सीता शकुंतला कर्ण कबीर । ऐसे अनाथ कन्यापुत्र । समाजें सांभाळितां झाले थोर । तैसेचि अपार ऋषिजन ॥९२॥
ज्ञानदेव नामदेवादि संतीं । आलिंगिलें दलित समाजाप्रति । किती प्रगटल्या भक्तमूर्ति । मागासलेल्यांत त्याकाळीं ॥९३॥
संत चोखोबाचें सारें घर । झालें भक्तीचें मंदिर । उपेक्षिल्या समाजीं देवत्व थोर । देतां संस्कार प्रगटे तें ॥९४॥
सजन कसाई, रविदास चांभार । दादू पिंजारी, गोरा कुंभार । कान्होपात्रा, जनी, वंका महार । उदया अपार आले ऐसे ॥९५॥
तैसेचि आजहि उदया येती । घरोघरीं नामांकित पुरुष-युवती । त्यासाठी केली पाहिजे उन्नति । गादलेल्या समाजांची ॥९६॥
महात्मा गांधी, ज्योतिबा फुले । यांनी मर्म हें ओळखलें । दलितोन्नतीचें कार्य केलें । कर्तव्य आपुलें तेंचि असे ॥९७॥
मानवें मानवा समान समजणें । परस्परां उन्नत करणें । संसारासि या आनंदें भरणें । हीच खरी धर्मसेवा ॥९८॥
कोणी कोणास त्रासवूं नये । कोणी कोणास फसवूं नये । कोणी कोणास दुरावूं नये । आपुले म्हणावे सगळेचि ॥९९॥
पाहाव्या त्यांच्या सुखसोयी । वागणूक सर्वांशी ठेवावी न्यायी । भेदभावना समूळ जाई । जीवन ऐसें निर्मावें ॥१००॥
मग त्यांचा विश्वास जडे । त्यांना आपला स्वभाव आवडे । वळेल तुम्ही म्हणाल तिकडे । मन तयांचें ॥१०१॥
हेचि आहे धर्मसेवा । करावी आपण धरोनि सदभावा । मागासल्या सर्वचि बांधवां । बंधु समजोनि शिकवावें ॥१०२॥
पडित रान हें उठवावें । फुलाफळांनी बहरूं द्यावें । आहारीं जाऊंच न द्यावें । कोणाचिया कोणा ॥१०३॥
परि अन्य धर्मांशीं वितंडावें । कोणी कोणाचे दोष मांडावे । हे स्वार्थबुध्दीचे वणवे । चेतवूं नयेत सेवकांनी ॥१०४॥
आपुला पिता जरी वंद्य । तरी इतरांचा तो न होय निंद्य । हेंचि धर्माचें सूत्र आद्य । सर्व धर्मी समभावनेचें ॥१०५॥
ही दृष्टि सर्वांसीच द्यावी । समाजीं मानवता वाढवावी । म्हणजे धर्म-भेदांची भ्रांति गांवीं । उरणार नाही ॥१०६॥
साधनांमाजीं उत्तम साधन । संस्कारें तयार करावें मन । सेवामार्गे मनीं घुसोन । सर्व लोकांच्या ॥१०७॥
कलापथक प्रवचन कीर्तन । तुंबडया पोवाडे पुराण । नाटकादि प्रत्येक साधन । याच कार्यीं योजावें ॥१०८॥
जें जें ज्यासि असेल ठावें । तें तें समाजा शिकवीत जावें । जीवजनास फायदे द्यावे । मानवधर्म म्हणोनि ॥१०९॥
खरा धर्म जाणतील लोक । तरि अनेकांतहि पाहतील एक । मग न गडेल परकीयांची मेख । स्वार्थभावनेची ॥११०॥
यासाठी भजन-संकीर्तन । उत्तम लोकशिक्षणाचें साधन । प्रपंच-परमार्थ धर्म-ज्ञान । शिकवावें संपूर्ण त्यांतूनि ॥१११॥
आपुल्या गांवचा कोणीं प्राणी । मुळीच न ठेवावा अज्ञानी । हीच खरी गांवाची बाणी । पुरवा झटूनि सेवकांनो ! ॥११२॥
हेलावतां सदधर्माचा सागर । धर्मनद्या होतील एकाकार । मग कोठे धर्म धर्मान्तर ? द्या संस्कार ऐसे सर्वां ॥११३॥
भ्रामक रूढयांच्या कल्पनांतून । वर येऊं द्या धर्मनिधान । त्यासाठी योजा भजनादि साधन । जागवा जन तुकडया म्हणे ॥११४॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । दलित सेवा कथिली येथ । एकोणतिसावा अध्याय संपूर्ण ॥११५॥
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
****************
ग्रामगीता अध्याय तिसावा
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
एक श्रोता करी प्रश्न । भजनीं देवाचें गुणगान । त्यासि बनवितां प्रचाराचें साधन । पावित्र्य मग कैसें उरे ? ॥१॥
भजनासि हें ऐसें वळण । देवोनि चुकवितां आपण । साध्या गोष्टीहि शिकविता त्यांतून । हें तों न पटे धार्मिकां ॥२॥
याचें ऐकावें उत्तर । धर्म म्हणजे धारणा सुंदर । त्यांत सर्वचि अंगांचा विचार । जीवनाच्या ॥३॥
कलीयुगीं भजन कीर्तनभक्ति । यामाजीं बोलिली विशेष शक्ति । ती नव्हे एकांगी संतउक्ति । केवळ मुक्ति मिळवाया ॥४॥
आमुचें संपूर्णचि जीवन । सुधारूं शके कीर्तनभजन । वेदशास्त्रस्मृति संपूर्ण । याच काजा जन्मल्या ॥५॥
समाजरचना गांवरचना । विवाहादि संस्कार राज्ययोजना । औषधि, शेती, कलादि नाना । वेदस्मृतींत वर्णिल्या ॥६॥
पुरातन संस्कृत वेदकाळ । त्यांतूनि जन्मला पुराणकाळ । पुढे प्राकृतजना कळावया सरळ । संत-भजनें अवतरलीं ॥७॥
साधुसंतीं लिहिलें नामभजन । भावभक्ति हृदयीं धरून । बोध कळावया जनतेलागून । सहजासहजीं सर्वचि ॥८॥
कांही वेदान्तरूपकें कथिलीं । कांही वैराग्यभावें बोलिलीं । कांही सलगीचीं भजनें केलीं । साधुसंतीं विनोदें ॥९॥
कांही रचिलें भजन-भारूड । बहुरूपी, गोंधळी, जोहार, गारूड । पाईक, मातंग, गांवगुंड । रूपकें समाज-जीवनाचीं ॥१०॥
कांही केलें लीला-लाघव । गौळणी, गोपाळ, देवीदेव । समाजसुधारणेचा गौरव । वर्णिला कांही ॥११॥
जैसा प्रसंग आला सामोरी । तैसींच भजनें केलीं बहुपरी । हें कळावया वर्म अपुरी । बुध्दि झाली लोकांची ॥१२॥
वाईट भावना नाशावया । लोकीं कर्तव्यशीलता यावया । समाज सुस्थितींत नांदावया । भजनें केलीं संतांनी ॥१३॥
सौरी विराण्याहि गाऊनि । लोकांवरि पाडिली मोहिनी । बिघडल्या जना आपुलेंसें करोनि । जागृत केलें समाजा ॥१४॥
गाऊनि नाचूनि नाना रीतीं । भावभक्ति भरोनि गीतीं । त्यांतूनि केली जनजागृति । शहाणें केलें संतांनी ॥१५॥
संत तुकाराम, नामदेव । शेखमहंमद, ज्ञानदेव । चैतन्य प्रभु, नानकदेव । जना, मीरा, मुक्ताबाई ॥१६॥
कबीर, तुलसीदास, रामानंद । सूरदास, दादू, ब्रह्मानंद । नरसी, देवनाथ, परमानंद । संत झाले असंख्य ॥१७॥
ऐसे कितीतरी संत झाले । ज्यांनी अभंग-भजनादि कथिले । कित्येक जन उध्दरोनि गेले । नामभजनें तयांच्या ॥१८॥
ज्यांची ऐकतां भजन-वाणी । जाय गगनमंडळ भेदोनि । झाले, आहेत, होतील अजूनि । संत-सज्जन यापरी ॥१९॥
म्हणोनि बोलिले सकळ लोकां । भजन-मार्ग सोडूं नका । परि भजनीं तारतम्य शिका । म्हणायाचें हेंचि असे ॥२०॥
राम झाले कृष्ण झाले । संत, पुढारी, सर्वचि झाले । परि आज काय पाहिजे केलें । हेंचि कथिलें तयांनी ॥२१॥
जगाची नित्य बदलती गति । आज कोणती उद्या कोणती । कोणते बोल कोणाप्रति । सांगावे कधी कळावें हें ॥२२॥
मुडदा स्मशानीं चालला । तेथे काय करावें शृंगाररसाला ? पाहिजे वैराग्यभाव वाढविला । भजनमार्गे ॥२३॥
भजनी लग्नकार्यासि बोलाविला । त्याने स्मशानींचा रस वर्णिला । लोक म्हणतील काढा याला । काय बरळतो या स्थानीं ? ॥२४॥
तैसेंचि देवुळीं केलें भजन । गायिलें स्त्रीसौंदर्य शृंगारपूर्ण । जन पाहतील हसून । वेडयापरी समजोनिया ॥२५॥
रणांगणीं भजनी नेला । वीरांस म्हणे सोडा शत्रूला । काय करितां मिथ्या गलबला । ऐसें बोलिल्या कोण ऐके ? ॥२६॥
हें सर्व जयाने जाणावें । तेणेंचि भजनभाव वर्णावे । शहाणे करूनि सोडावे । भोळेजन सर्व ॥२७॥
समाज झाला रूढिबध्द । तेथे सांगावे सिध्दांत शुध्द । समाजकार्याहि करावें विशद । वेळ पडेल त्यापरी ॥२८॥
प्रसंग पाहोनि उपदेशावें । सत्य तत्त्व तें न सोडावें । सत्यचि गोड करोनि सांगावें । वेळकाळादि पाहोनि ॥२९॥
ऐसेंचि समजोनि संतजनें । केले ग्रंथ गीतें भजनें । तैसेंचि आज पाहिजे नव्याने । वर्णिलें सारें ॥३०॥
सर्व पंथांचा समन्वय । सर्व जातींचा मेळ होय । ऐशाचि भजनांनी लागेल सोय । आमुच्या गांवाची ॥३१॥
हें जरी मागे संतांनी कथिलें । परि आज पाहिजे पुढे वर्णिलें । वर्णन करणारेच भ्रमांत पडले । मग ते मेले जनलोक ॥३२॥
कोणी ब्रह्मज्ञानाचीं भजनें गाती । अर्थाविणेच वाचती म्हणती । उगीच दंभ अंगीं आणती । आपण ज्ञानी म्हणोनिया ॥३३॥
घेऊनि संतांचें पाठांतर । आपणचि बनती महात्मा सुंदर । निभवाया पोटाचा व्यवहार । आयुष्यभरी ॥३४॥
कोणी गौळणींत रंगोनि नाचती । वेष धरोनि दंढार करिती । अर्थ सोडोनि मजा मारिती । विषयांधभावें ॥३५॥
ऐसी ऐकतां कृष्णलीला । जनमनीं भाव वेगळा झाला । वाटे हा तमाशाचि बनविला । देवादिकांचा ॥३६॥
कोणी रागरागिणी गाती । शब्द तोडोनि अर्थाची माती । पाहिजे तसे बनवोनि घेती । शब्द भजनाचे ॥३७॥
कोणी पाठांतर खूप करिती । ताल-बेताल करोनि गाती । चीड येते ऐकतां चित्तीं । अर्थ अनर्थ सगळाचि ॥३८॥
कांही गाती अति सुंदर । ताल कुशल आलाप मधुर । तेथे अर्थाचा नसे अंकुर । भजनभाव जागेना ॥३९॥
कोणी भजन करावया आधी । गांजा-तंबाकूची पाहती संधि । चहाप्रसादाविण न होई गर्दी । भजनकर्यांची ॥४०॥
कांही म्हणती आमुचें भजन वेगळें । तें तुम्हांसि कैसें कळे ? त्यासि पाहिजे गुरुदेव-हस्तकमळें । डोक्यावरि ॥४१॥
कांही सांप्रदायिक भजनी असती । ते आपुलीच शेखी मिरविती । माळ-तंदुरीसाठी भांडती । शत्रु जैसे जन्मांतरीचे ॥४२॥
कांही खंजरीसाठी रागें भरती । कांही स्पर्धेने पुढे येती । परि समाधान नाही चित्तीं । तिळभरी कोणाचिया ॥४३॥
कांही म्हणती दुसर्या संताचें । भजन नका बोलूं मंडपीं आमुचे । आमुचें भजन संप्रदायाचें । आमुच्याच साठी ॥४४॥
मित्रहो ! आता ऐसें करणें । सोडोनि द्यावें जीवेंप्राणें । कोणत्याहि संतांचीं सदवचनें । म्हणावीं प्रेम धरोनि ॥४५॥
ज्या भजनाचा अर्थ न कळे । तें भजन न म्हणावें आपुल्या बळें । ज्याने समाजांत परिणाम सगळे । व्यर्थ होती ॥४६॥
भजनें करावी गांव-जागृति । हृदयजागृति कार्यजागृति । सर्वांनी लागावें सत्कर्माप्रति । ऐसें लोकां सांगावें ॥४७॥
भजन म्हणणाराचि आळसी । काय सांगेल जनतेसि ? करोनि घेईल आपुली हसी । ऐसें कोणा न करावें ॥४८॥
जें जें करावें तें समजोनि । पाऊल न टाकावें विचारावांचोनि । विचारचि नेतो मोक्षभुवनीं । ऐसी साक्ष थोरांची ॥४९॥
विचाराविण देवभक्ति केली । तेथेहि दिसे फजीती झाली । लोक म्हणती लोभें फैलाविली । देवपूजा दांभिकाने ॥५०॥
रात्रभरि केलें भजन । पडला खाटलीं बिमार होऊन । मग कोठलें नामस्मरण । अरे बापा ओरडतो ॥५१॥
अभ्यासावांचूनि उपास केला । दोनदिवसां पित्तवात उमळला । मग सहा महिने खातचि गेला । दवापाणी मोसंबी ॥५२॥
ऐसें कासयासि करावें ? तारतम्य सोडोनि द्यावें । मग तो भोग भोगीत राहावें । आयुष्यभरि ? ॥५३॥
मनुष्याने बुध्दि वापरावी । अनुभवियाची सल्ला घ्यावी । अति सर्वत्रचि वर्जावी । अभ्यासें करावी आत्मोन्नति ॥५४॥
समाजीं जेणें हानि घडे । तें सुधारावयाचे पोवाडे । वाजवावे संतांचे चौघडे । विचाराने गर्जोनि ॥५५॥
त्यांचेहि करूं अनंत प्रकार । रुचिभेदाचा जाणूनि व्यवहार । परि मूळचे सिध्दान्त थोर । सोडूं नेदूं कोणासि ॥५६॥
आधुनिक बसवूं चाली । जेणें लक्ष वेधेल आसुच्या बोलीं । परि दाखवूं संतांनी केली । तेचि वाणी या काळीं ॥५७॥
भजनांचे असोत अनंत प्रकार । मागचे पुढचे कांही विचार । परि संतांचें काव्य अति थोर । उमटोनि निघे बाहेरी ॥५८॥
परि संतांचीं भजनें दुकान थोर । तेथे अमोलिक वस्तु अपार । त्यांतूनि निवडोनि सारासार । देऊं पात्र पाहोनि ॥५९॥
संतभजनीं देवभक्तीच नाही । जीवनाचे सर्व दृष्टान्तहि । प्रसंगीं शिव्या देवोनीहि । समजाविलें त्यांनी ॥६०॥
मीराबाईचीं प्रेमभजनें । सूरदासाचीं लीलाकवनें । तैसींच गोस्वामींचीं जीवनदर्शनें । उपदेशगाणें कबीराचें ॥६१॥
तें सर्वचि प्रिय देवा । जेणें घडे जीवांची सेवा । हें जाणोनि समाज जागवावा । भजनप्रकारें या काळीं ॥६२॥
कांहींनी राममंत्र सांगितला । त्यांतूनि समाज जागविला । कांहींनी दत्तमंत्र शिकविला । लोक केले सेवाभावी ॥६३॥
कृष्णरंगीं रंगली मीरा । राज्यवैभव वाटे कचरा । छंद लागला घराघरां । तिच्या प्रभावें भक्तीचा ॥६४॥
चैतन्याची गर्जतां वाणी । अनिष्ट रूढया गेल्या पळोनि । पावन झाली श्रीकृष्ण-भजनीं । बंगालभूमि त्याकाळीं ॥६५॥
कबीर, नानकदेवादिकांनी । भजनें केलीं विदेशीं फिरूनि । विवेकानंद-रामतीर्थांनी । केलें प्रभावित जग जैसें ॥६६॥
ऐसे अनेक मार्गी झाले । परि ते आज अपुरेच पडले । देशापुरतेहि नाही व्यापले । समाजा सुमार्गी लावाया ॥६७॥
त्यांची पडली आज उणी । मानव राहिले मागासल्यापणीं । याची कराया भरपाई अजूनि । प्रचारक पाहिजे सेवाभावी ॥६८॥
तोचि उत्तम प्रचारक । ओळखे वेळप्रसंग सम्यक । मार्ग सांगतो लायक । लोकां हांक देवोनिया ॥६९॥
म्हणे आमुचें कांही नव्हे । संतीं कथिलें जैसें बरवें । तेंचि विशद करोनि सांगावें । हाचि धर्म भजनियांचा ॥७०॥
भजनासनीं भजनी बैसला । जनलोकांच्या दृष्टीस आला । पाहती लोक सदभावें त्याला । गंभीर दिसला पाहिजे तो ॥७१॥
साधी राहणी सात्विक लेणीं । विनम्र हावभाव-निशाणी । शुध्द बोल प्रेमळ वाणी । पाहिजे भजनी लोकांची ॥७२॥
कपाळावरि आठया पडल्या । वेडयावाकडया बाहुल्या फिरल्या । हेकडें तोंड मुद्रा फाकल्या । ऐसें कधी न व्हावें ॥७३॥
मनांत असावा नितांत आदर । वृत्तींत असावा भाविक गहिवर । रोमांच उठावेत अंगावर । भजनियाच्या ॥७४॥
असावी कोमल रसाळ वाणी । उच्चारितां जावी हृदय भेदोनि । जागृत व्हावे ऐकतांच प्राणी । लागावे ध्यानीं सुजनांच्या ॥७५॥
भजनें म्हणावीं सरळ सात्विक । गोड आवाज ओजस्वी रसिक । तालबध्द मधुर नि:शंक । अर्थपूर्ण निर्भयपणें ॥७६॥
ऐशाचि पावन प्रचारासाठी । संतीं केली आटाआटी । जना कळावी ओठाओठीं । भाषा त्यांची म्हणोनि ॥७७॥
आमुचा देशचि भाविकभक्त । त्याचा विश्वास भजनासक्त । देवधर्म म्हणतांचि चढतें रक्त । अंगीं त्याच्या ॥७८॥
हिरण्यकश्यपूसि नामाची चीड । परि नारदाचिया भजनीं ओढ । ऐसेंच आहे भजनाचें गूढ । नागहि होई शांत तेथे ॥७९॥
म्हणोनि भजनाचें महत्त्व । भाषणासि येतें गौणत्व । हें समजोनि संतांनी तत्त्व । भजन केलें प्रेमाने ॥८०॥
भाषणांत भरलें समाजकारण । धर्मकारण राजकारण । लोककारण विज्ञानकारण । रुक्ष वाटे तें सर्वां ॥८१॥
लोक समजती भजनाची भावना । अर्थ सांगतां सुगंध सुवर्णा । चमत्कारें बदलावा जमाना । तैसें होतें भजनाने ॥८२॥
भजनाची वाजली खंजरी । थाप पडली मृदंगावरि । झाली जनता वेडीबावरी । ऐकावया भजनासि ॥८३॥
लोक पाहती चातकावाणी । कधी निघेल दुसरी वाणी । ऐसा समाज जातां मोहूनि । गांव होई जागृत ॥८४॥
आपुल्या गांवीं व्हावें भजन । जेणें जागृत होती वृध्द-तरुण । स्त्रियामुली सकळ सज्जन । कार्य करिती ग्रामाचें ॥८५॥
प्रत्येकाच्या तोंडीं गीतें । आपुलें गांवचि सुधारूं पुरतें । हेंचि सांगितलें भगवंतें । ग्रंथामाजीं म्हणती सारे ॥८६॥
गुराखी ढोरकी शेत-मजूर । दुकानदार शिंपी सुतार लोहार । दळणीं कांडणीं घरोघर । गाती भजनें उल्हासें ॥८७॥
म्हणती या रे सगळयांनो ! या । एकेक काम हातीं घ्या । गांवची सुधारणा करूंया । आपुल्यापरीं ॥८८॥
हेचि स्फूर्ति जागवाया संतीं । केली भजनमालिकेची प्रगति । समाधान लाभावया लोकांप्रति । सेवागुणें सुसंस्कारें ॥८९॥
आज सेवेची नोकरी झाली । भजनावरीच जिंदगी चालविली । याने साधनांची किंमतचि उडाली । जाहला तो पोटधर्म ॥९०॥
वीणा चिपळया झाल्या भिकारी । पोटास्तव फिरती दारोदारीं । त्या मागची संत-तपस्या सारी । लुप्त झाली वाटे जणूं ॥९१॥
यासि फिरूनि दुरुस्त करावें । सुसंस्कारें लोक भरावे । घरोघरीं रोपटें पेरावें । सेवावृत्तीचें ॥९२॥
एक सेवक सेवेसि लागला । हजारो लोकांसि मार्ग दिसला । मानवजातीचा पांग फेडला । ऐसें व्हावें निश्चयें ॥९३॥
हनुमंत जेव्हा भावनेने चेतला । राममंत्र घेवोनि निघाला । कार्य सिध्दचि करोनि आला । उल्हासें श्रीरामाचें ॥९४॥
तैसेंचि आपण आज करावें । भजनादि साधनां सुधारावें । गांवोगांवींच्या लोकीं भरावें । बंधुप्रेम त्याद्वारें ॥९५॥
सर्वांभूतीं प्रेमभाव । यांतूनचि सेवेचा उदभव । चारित्र्याचा वाढे गौरव । संस्कार होतां भजनांचे ॥९६॥
भजनांची चालतां परंपरा । जना मिळे सत्प्रवृत्तींचा झरा । लोकशिक्षणाचा यापरी दुसरा । उपाय नाही सात्विक ॥९७॥
म्हणोनि विनवितों गांवकर्यांनो ! तरुण मुलांनो ! वृध्दजनांनो ! सगळेचि प्रेमळ गीतें म्हणो । करा ऐसा प्रचार ॥९८॥
वाणी रंगूं द्या हरिनामाची । चटक लागूं द्या सत्कर्मांची । चीड येऊं द्या दुर्व्यसनांची । सर्व जना या द्वारें ॥९९॥
जतन करा गांवसंस्कृति । होऊं द्या भजनें जनजागृति । जनता-विद्यापीठ हें निश्चिती । तुकडया म्हणे ॥१००॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव संमत । भजनसाधना ग्रामहितार्थ । तिसावा अध्याय संपूर्ण ॥१०१॥ग्रंथ खरेदी
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
****************
ग्रामगीता अध्याय एकतिसावा
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
ईश्वर-भजनाचा करितां प्रचार । होईल आमुचा उध्दार । परंतु जगासि ताराया अपार । सामर्थ्य पाहिजे अंगीं तें ॥१॥
तें कार्य संतचि करूं जाणे । जे देवचि झाले जीवेंप्राणें । येरा गबाळांनी केलीं भजनें । तरी काय होतें ? ॥२॥
रामनामें तरले पाषाण । परि तें लिहिणारेहि तैसेचि पूर्ण । इतरांनी खडा टाकतांहि बुडोन । जाईल आता ॥३॥
निर्जीव चालविली भिंत । केले सोन्याचे पर्वत । विषासहि बनविलें अमृत । तेचि खरे शक्तिशाली ॥४॥
रेडयामुखीं वदविले वेद । डोहीं कोरडे ठेविले कागद । ऐसे थोर संत प्रसिध्द । विश्व-तारक ॥५॥
तेचि आपुल्या भजनें वचनें । जगासि उध्दरितील दयेने । आमुच्या भजनाचें तुणतुणें । फुकेंच सारें ॥६॥
संत मायबाप कृपाळ । आपणासारिखे करिती तत्काळ । कृपा करितां न लागे वेळ । पतितहि तरावया ॥७॥
त्यांचा मंत्र पडतां कानीं । होय पातकांची हानि । जडजीवहि जाती उध्दरोनि । अन्य भजनी हें करूं न शके ॥८॥
ऐसा श्रोतियाचा विचार । म्हणे संत करितील चमत्कार । तरीच तरेल हा संसार । साधन येर वाउगें ॥९॥
याचें उत्तर ऐका श्रोते ? संत जरि चमत्कारें तारिते । तरि कोणीच न उरते । आजवरि बध्द जनीं ॥१०॥
कारण संत अपार झाले । ज्यांची देशावरीहि सत्ता चाले । त्या संतांसि सर्वचि आपुले । कां न तारिले दयेने ? ॥११॥
संतांसि सर्वाचेंच बरें व्हावें । ऐसें वाटे जीवेंभावें । परि ज्यांनी कर्तव्य करावें । तेचि होती अधिकारी ॥१२॥
जनीं कर्तव्य न करितां । संत लाभ न देती आइता । नुसता त्यांचा मंत्र घेतां । मोक्ष होतो म्हणूं नये ॥१३॥
संत आपणासारिखे करिती । परिसें सोने केलें लोहाप्रति । परंतु खापर सोने नोहे निश्चिती । जाणावें हें तारतम्य ॥१४॥
उध्दार करणें हें संतांचें कर्म । परि त्यांत आहे निराळें वर्म । समजोनि घ्यावा शिष्यधर्म । कोणता आपुला ॥१५॥
संत जें ज्या कोणां सांगती । तैसेचि जरि ते जन वागती । त्यांचाचि उध्दार होतो जगतीं । ऐसें आहे ॥१६॥
उध्दार संत न करिती । मार्ग सांगती जनाप्रति । त्यांच्या बोधवचनें प्रगति । केली पाहिजे साधकें ॥१७॥
चोरासि वाटे चतुर निघावे । विषयी म्हणे शौकीन व्हावे । तैसे साधूसि वाटे सज्जन बनावे । लोक आपुले ॥१८॥
सर्वचि करिती आपुला प्रचार । तैसाचि साधूचा व्यवहार । कोणता उत्तम कोण अपवित्र । मार्ग जाणावा साधकें ॥१९॥
मागे कोणत्या मार्गे जन गेले ? कोणाच्या प्रचारें कल्याण झालें ? कोणें जीवनासि पुढारिलें । कीर्तिरूपें ? ॥२०॥
एक गेला जुगारापायीं । एक मेला बुडोनि विषयीं । एक झाला चोर अन्यायी । गांवगुंड ॥२१॥
एक संतापाशी गेला । तोच सन्मार्गी लागोनि तरला । तयाचा उत्तम प्रचार झाला । सर्व लोकीं ॥२२॥
ऐसी आहे संतांची संगति । आपण ऐकिल्या होते गति । पण कर्तव्य केल्यासचि उन्नति । दिसों लागे ॥२३॥
संत म्हणती सत्य बोलावें । आपण नेमकें खोटें करावें । बोल शेवटीं संतांवरि ठेवावे । कोण्या न्यायाने ? ॥२४॥
संतांनी सांगावें दुर्गुण सोडा । आपण पापांनी भरावा गाडा । कासया सांगावा संत-पोवाडा । उध्दार होतों म्हणोनि ? ॥२५॥
ज्याने संतवचन पाळावें । आपुले दुर्गुण आवरावे । त्यानेच कृपापात्र व्हावें । संताठायीं ॥२६॥
कृपा हा संतांचा स्वभाव । वेगळी नाही कृपेची ठेव । करावयासि देवघेव । प्रयत्नाविण ॥२७॥
एकचि आहे विशेष खूण । संतांच्या वाणींत प्रेमळपण । मनासि लागे आकर्षण । सत्कर्मांचें ॥२८॥
त्यांची वागणूक पाहोन । प्रसन्न होतें पाहणाराचें मन । तैसेंचि कर्म करावें आपण । वाटे लोकां ॥२९॥
परि ज्याचे वाईट संस्कार । वृत्ति असे बहिरंग फार । त्यासि बोध होणें अति दुर्धर । समजा लोकीं ॥३०॥
वृत्ति उत्तम कार्यीं वळे । त्यावरि संताचा बोध मिळे । निश्चय होतां भाग्य उजळे । थोरपणाने ॥३१॥
मनुष्य दु:खानें होरपळला । विचारें वैराग्यभावीं वळला । त्यावरि गुरुचा बोध उजळला । मार्ग कळलां भाग्याचा ॥३२॥
कोणी समजोनि पाऊल टाकलें । आपुलें सत्कर्मातचि आहे भले । त्याने संतांचे चरण धरिले । तेहि तरले भाग्यशाली ॥३३॥
ऐसें ज्याने साधन केलें । संतवचनासि प्रतिपाळिलें । त्याचें कौतुक कितीहि वानिलें । तरी तें अपुरें ॥३४॥
संताचा शुध्द संकल्प । त्यासि कळला प्रगटला दीप । धरोनि निश्चायाचा प्रताप । उन्नत झाला सतशिष्य ॥३५॥
शेतीची जमीन झाली उत्तम । त्यावरि बीं पडलें सक्षम । वाढलें कुटुंबियांचेहि प्रेम । वाढतां पीक ॥३६॥
तैसेंचि साधकाचें होतें । प्रथम शुध्दाचरण शुध्दचित्तें । वरि संतबोध होतां तेथे । पीक वाढे भक्तीचें ॥३७॥
ऐसें ज्याने सिंचन केलें । अंकुर फुटले वाढों लागले । अनुभवाचें फळ आलें । संतकृपाकटाक्षें ॥३८॥
परंतु ऐसी सांडोनि रीति । उगीच बुवांच्या पायां पडती । त्यानेच सर्व होतें समजती । अंतरीं लोक आपुल्या ॥३९॥
पायां पडल्याने सर्व होतें । मग काम कासया करावें तें ? पोटासि मिळेल आइतें । मोक्ष लाभेल बुवापायीं ॥४०॥
चुकीची ही धारणा अति । ऐसी नव्हती याची रीति । नम्र व्हावें सर्वांभूतीं । ऐसा सिध्दान्त आहे याचा ॥४१॥
सर्वांनीं सर्वांसि नम्र व्हावें । आपलें हितगुज विचारावें । थोरांनी लहानांसि सांगावें । कर्तव्य म्हणोनि ॥४२॥
परि लाखो लोकांनी पयांवरि पडावें । थोर सांगती तें न करावें । हें अजबचि घेतलें स्वभावें । भाविकांच्या ॥४३॥
ही प्रथाचि बंद करावी । श्रवणीं रुचि वाढवावी । मनन करोनि आचरावी । वाणीं संता-थोरांची ॥४४॥
यानेच संतपण वाढ घेई । संतसंगें संतचि होई । परि संत म्हणतां संसार सोडूनि जाई । ऐसें नव्हे ॥४५॥
संसारीं असोनि संत असती । व्यवहारीं राहोनि आदर्श होती । बुवा न म्हणवितांहि अधिकार ठेविती । सदगुरुचा ॥४६॥
ऐसें आहे संतपण । तें मिळे सत्संगें करोनि साधन । नसे अंगीं विचित्रपण । कोणतेंहि तयांच्या ॥४७॥
पावडीमाजी पाय ठेवितां । दावा म्हणे ब्रह्मसत्ता । त्या जयत्पालराजासि तारिलें तत्त्वता । शेवटीं ग्रंथचि बोधूनि ॥४८॥
करोनिया चमत्कार । संत न करिती उध्दार । हाचि मनीं राखा निर्धार । बोधचि सार तयांचा ॥४९॥
चमत्काराच्या भरीं भरोनि । झाली अनेकांची धुळधाणी । संतचमत्कार यापुढे कोणी । नका वर्णू सज्जन हो ! ॥५०॥
यावरि श्रोता प्रश्न करी । काय संत नव्हती चमत्कारी ? आम्हीं प्रत्यक्ष पाहिलें तरी । कां न लोकां सांगावें ? ॥५१॥
एकाने नालींतील घाण फेकली । ती अत्तरसुगंधें घमघमाटली । एकाने मुठीमधूनि काढिली । खडीसाखर प्रत्यक्ष ॥५२॥
एकाने कटोरींतूनि पंगती वाढल्या । श्रोतियानेत्रीं धारा काढल्या एकाने घडयाळीच बंद केल्या । सर्व गांवाच्या ॥५३॥
मित्रा ! त्वां पाहिलें साच । परि हा आभास मिथ्याच । संताचें हें लक्षण नव्हेच । कोणत्याहि, कदाकाळीं ॥५४॥
हे सर्व संतांघरचे क्षुद्र खेळ । कोणी मानितील यांस सबळ । तरि ते मुकतील प्रांजळ । सेवाव्रत महत्त्वाचें ॥५५॥
लटिकें अदृश्य तें आणावें । कांही लोकांस जेवूं घालावें । आणि आणिलें तेथे खळगे पाडावे । हें दिसे त्या नवल कैसें ? ॥५६॥
कोणी कीर्तिस्तव दान करी । पैसे मिळवोनि काळयाबाजारीं । तैसे दुसरीकडोनि आणोनि भरी । वस्तु अदृश्य ॥५७॥
एकाचे खिसे कापावे । दुसर्यास म्हणे दान घ्यावें । तैसेंच चमत्कारलाघव आघवें । समजावें हें ॥५८॥
कोणी गुरुची सेवा करी । जीवन वाही चमत्कारावरि । अडक्याचें साधन साधूनि झुगारी । आयुष्यरत्न ॥५९॥
पैसा देवोनि नांवेंतूनि जावें । तेथे तपाने पाण्यावरि चालावें । शेवटीं अहंकारें भ्रष्ट व्हावें । यांत थोरवी कशाची ? ॥६०॥
परि हें जनासि कळेना । संतांपासूनि इच्छा नाना । करिती देवोनि दानदक्षिणा । लोभासाठी ॥६१॥
लोकांचिया या ओळखोनि भावा । अनेक दांभिक येती गांवां । लुटती जनासि ढोंगी बुवा । मागे लावोनिया ॥६२॥
ही बुवाबाजी भुलवी जना । भ्रष्ट करी ग्रामजीवना । फसवोनि भोळया-बापडयांना । भलत्या छंदा लाविती ॥६३॥
कांही देती शेतीधन । मग पाहती मागे फिरोन । हें तंव आहे वेडेपण । आपुल्या स्वार्थांधतेचें ॥६४॥
कांही वर्गणी करोनि गोळा । गांवीं करिती भक्ति-सोहळा । भिकारी करोनि स्त्रियाबाळां । ठेविती कोणी ॥६५॥
प्रयत्नांचा मार्ग सोडिती । अल्पायासें लाभ इच्छिती । चमत्कारांच्या थापेंत जाती । गारूडियांच्या ॥६६॥
लोक चमत्कारावरि भुलती । मागाहूनि पश्चात्ताप करिती । कांही भुरळ पाडली म्हणती । आम्हांवरि ॥६७॥
वास्तविक संत नव्हे जादुगार । करावया चमत्कार । हा तों चालत आहे व्यवहार । पोटभर्यांचा ॥६८॥
चमत्कार तेथे नमस्कार । तेणें जादुगिरीस चढे पूर । खर्या संतांस ओळखीना नर । चमत्काराअभावीं ॥६९॥
याच भ्रांतीने भुलोनि । संत आले गांवीं भुवनीं । परि पाप न गेलें धुवोनि । म्हणती जन यापरी ॥७०॥
कोणी म्हणती घेतलें दर्शन । परि न झालें रोग-निवारण । कोणी म्हणती नाही संतान । दिलें संतांनी आम्हांसि ॥७१॥
कोणी म्हणती मंत्र घेतला । परि उध्दारचि नाही झाला । दु:खचि जाळी अजूनि मनाला । अहोरात्र आमुच्या ॥७२॥
कोणी म्हणती घेतलें दर्शन । परि नाही मिळालें आम्हां धन । कोणी म्हणती नोकरी लावून । द्यावी संतीं आम्हांसि ॥७३॥
कोणी म्हणती मुलगी वाढली । संताने सोयरीक नाही जुळवली । कोणी म्हणती गेलों पायवणी घेतली । परि ताप न गेला आमुचा ॥७४॥
कोणी म्हणती गेलों दर्शनासि । परि आठ दिवसांचा आहे उपाशी । सट्टा नाही दिला आम्हांसि । साधुसंताने एकहि ॥७५॥
कोणी म्हणे दर्शन घेतलें । परि चोर तुरुंगांतूनि नाही सुटले । चोरी केली म्हणोनि काय झालें । दर्शन घेतां मुक्त व्हावें ॥७६॥
कोणी म्हणती संत घरीं आले । आमुचें पाहिजे भाग्य उघडलें । कर्तव्य न करितांहि राज्य भेटलें । पाहिजे आम्हां ॥७७॥
कर्तव्य करितां सर्व होतें । मग संतदर्शन काय करावें तें ? संताने कर्महीनासि द्यावें आइतें । आणूनिया ॥७८॥
तुम्ही म्हणतां संत दयाळ । आमुचें वेडें झालें बाळ । त्याने कृपा करोनि तत्काळ । बरें करावें ॥७९॥
आम्ही जरी असलों पापी । त्याने संकल्प करावा सुखरूपी । आम्हांस न कळतां उपदव्यापी । मिटवाव्या तेणें ॥८०॥
संताने मंत्र देताक्षणीं । आम्हांसि न्यावें उध्दरोनि । पाहूं नये अधिकार पडताळोनि । आमुचा त्यानें ॥८१॥
तरीच त्यास संत म्हणावें । नाहीतरि त्या ढोंगी गणावें । आम्ही बोलतों हे चूक मानावें । कोण्या कारणें ? ॥८२॥
ऐसें जनाचें म्हणणें चाले । परि सांगा ऐसें कोठे झालें ? कोणत्या संताने केलें । सुखी समृध्द सर्वांलागी ? ॥८३॥
याचा विचार न करिती । चमत्कारासाठी मरमरती । काय संतांपाशी आहे भेदवृत्ति । इतरां शांति न द्याया ? ॥८४॥
साधुसंतचि मूल देती । तरि कां वांझ जगीं राहती ? संत धनवैभव अर्पिती । तरि भिकारी न दिसावे ॥८५॥
संत बिमारी बसविती । मग बुवांचेहि कां प्राण जाती ? जगीं कोणीच ना मरती । ऐसें कां होऊं नये ? ॥८६॥
संतांचा मंत्र कानीं पडे । उघडती मोक्षाचीं कवाडें । मग ऐसें कां न घडे । सर्व लोकीं सर्रास ? ॥८७॥
त्यांच्या संकल्पेंचि सर्व होतें । तरि दु:खी कोणीहि न राहतें । काय तुम्हांविषयींच दुजाभाव ते । करिते कांही ? ॥८८॥
जरि म्हणाला आमुच्या नशिबीं नाही । तरि प्रारब्धचि प्रधान होई । मग संतचमत्काराची राही । महिमा कोठे ? ॥८९॥
संत आपुल्यापरी झटोनि । सौख्य देती सर्वजनीं । सफलता त्यांच्या कार्यी बहुगुणी । परि तो नव्हे चमत्कार ॥९०॥
संतांच्या शुध्द हृदयांतूनि । अनुभवा येई निघाली वाणी । परि त्याचीहि कल्पना त्यांनी । केली नाही चमत्कारें ॥९१॥
मुंगीसि हत्तीचे ओझें जैसें । वाटे नवलाचें भलतिसें । परि तें सहज घडे शक्तिविकासें । संतकार्य तैसें वाटे जना ॥९२॥
त्यासि चमत्कार मानलिया । लोक विसरती कर्तव्यपाया । भजों लागती सकामपणें तयां । आंधळया भावें निष्क्रिय ॥९३॥
म्हणोनि महत्त्व नको चमत्कारा । शोधावी सत्कार्य-परंपरा । ज्ञान आणि कार्यस्फूर्तीचा झरा । घ्यावा संत-जीवनांतूनि ॥९४॥
वस्तुत: मार्गदर्शनचि कार्य संतांचें । पुत्रधन देणें नव्हे साचें । बिमारी बसविणें हें वैद्याचें । काम आहे सर्वथा ॥९५॥
संत अज्ञानरोगाचे वैद्य । जीवनविकासाचे सर्वाद्य । शुध्द कर्मांनी असती वंद्य । तिन्ही लोकीं ॥९६॥
त्यांचा एकचि चमत्कार । अल्पज्ञ जीव केला । विश्वाकार । सर्वांभूतीं देखिला ईश्वर । ठायीं ठीयीं याच डोळां ॥९७॥
त्यांचें तेंवढें करणें जाणणें । या चमत्कारापुढे आकाश ठेंगणे । तेथे कोण पुसतो तुणतुणें । क्षुद्र सिध्दीचें वाजतांहि ॥९८॥
संत सेवेचे अवतार । सर्वांभूतीं नम्र, सत्य व्यवहार । तयांसि देवहि मानी थोर । अन्य चमत्कार कासया ? ॥९९॥
साधूचा सरळ प्रेमळपणा । हा या जगीं चमत्कारचि जाणा । त्याने अन्यहि मीच म्हणावें आपणा । हा चमत्कार केवढा ! ॥१००॥
अहो ! सर्वांत मोठा चमत्कार । तो मानी विश्वचि माझें घर । त्यासाठी कष्टतो अहोरात्र । जीवें फार उल्हासें ॥१०१॥
उणें दिसे तें पूर्ण करी । जगाचा तोल बोधें सावरी । परंतु केल्याचा स्पर्शचि नसे अंतरीं । चमत्कारी संत ऐसे ॥१०२॥
मात्र संतचि सर्व कांही करी । आणि कर्तव्यचि नाही माणसावरि । ऐसी संतांची एकांगी थोरी । गाती तें नोहे उचित ॥१०३॥
ऐसें गांवीं होऊं न द्यावें । जनासि सत्य ज्ञान कळावें । खर्या संतांसि ओळखावें । कर्तव्यासाठी ॥१०४॥
संतांचे विचित्र व्यवहार । तैसेचि त्यांचे चमत्कार । हें वगळोनि दावावा सत्य सार । ग्रामीण जनासि ॥१०५॥
आपुला आपण उध्दार करावा । संतदेवांचा सहारा घ्यावा । हाचि संतग्रंथांचा गवगवा । चित्तीं धरावा सर्वांनी ॥१०६॥
यांतचि गांवाचें कल्याण । निघोनि जाईल दुबळेपण । कर्तव्य आपुलें जाणतील जन । तुकडया म्हणे करा ऐसें ॥१०७॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । संत-सामर्थ्य कथिलें येथ । एकतिसावा अध्याय संपूर्ण ॥१०८॥
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
*********************
ग्रामगीता अध्याय बत्तिसावा
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
श्रोता सदभावें करी प्रश्न । चमत्कार नव्हे संत-खूण । मग संतांची ओळखण । समजावी कोण्या प्रकारें ? ॥१॥
साधू दिसती जेथे तेथे । कैसे जाणावे खरे-खोटे ते ? त्यांचें तात्त्विक रूप कोणतें ? सांगावें आम्हां ॥२॥
श्रोतियांचा ऐकोनि प्रश्न । करोनि सकळांसि नमन । कथितों संतांची ओळखण । ग्रामहितासाठी ॥३॥
श्रोतियांत साधु नसे बैसला । म्हणतां लागेल काळें तोंडाला । म्हणोनि प्रथमचि नमस्कार केला । ग्राम-श्रोतेजना मीं ॥४॥
साधु सर्वत्रचि आहे । साधुत्वाविण स्थिर काय राहे ? जें असेल तें विलया जाय । साधुत्व नसतां ॥५॥
सती आणि साधुवृत्ति । हीच गांवाची महासंपत्ति । साधुत्वाविण कोणे रीतीं । टिकेल जीवन जगाचें ? ॥६॥
सर्व परस्परां खाऊं बघती । त्यांना सांभाळी संतवृत्ति । आघात सोसूनि देई शांति । सर्वजना अन्य कोण ? ॥७॥
दया क्षमा शांति विवेक । यांचें केंद्रस्थान साधु देख । प्रत्येक कार्यी आवश्यक । पुरुष ऐसा सर्वहिता ॥८॥
परि तयाची ओळखण । बहिरंगावरोनि करील कोण ? संत ओळखावा वृत्तीवरून । अथवा सदगुण पाहोनिया ॥९॥
नाहीतरि ओळखतां नये । नाना सांप्रदायिक संत दिसताहे । नाना रंगांनी सजला राहे । वरोनिया संत कोणी ॥१०॥
कोणीं भववींच वस्त्रें घालिती । कोणी काळा रंग पसंत करिती । कोणी पांढरें फटफटीत वापरती । वस्त्र अंगीं ॥११॥
कोणी माथां भार ठेविती । कोणी माळा, टिळे लाविती । कोणी लंगोटीच परिधान करिती । नारळाची ॥१२॥
कोणी अंगासि फासती भस्म । कोणी धुनी लावूनि घेती नाम । कोणी साधिती पंचाग्निकर्म । बहिरंगाने ॥१३॥
चिरकुटचिंध्या अंगा बांधती । घोगडी भोपळेच कोणी मिरविती । कोणी ओंजळीनेच पाणी पिती । सर्वकाळ ॥१४॥
कोणी अखंड उभे राहती । कोणी दिवसभरि पहारा देती । कोणी गुप्तचि वावरती । लोकामाजीं ॥१५॥
कोणीं एकाने समाधी साधली । खळगा करोनि मान पुरविली । चोवीस तासांनी काढली । शेवटीं घेतली शिफारस ॥१६॥
कोणी म्हणवी दीन सेवक । कोणी अवतार म्हणवी अलौकिक । योगीराज म्हणवोनि वाजवी शंख । ऐसे अनेक खरे-खोटे ॥१७॥
नाना मतांचे नाना संत । नाना संतांचे नाना पंथ । कोण निवडावा उत्तम त्यांत । वेषादिकांनी कळेना ॥१८॥
म्हणोनि संतांच्या ऊणखुणे । कोणी न पावे बहिरंगाने । त्यास पाहिजे सहवास करणें । अथवा ओळखणें कार्यावर ॥१९॥
कार्य कधी दांभिकहि करी । आंतलें न जाणवे लौकरी । ज्ञानध्यानहि बोले वैखरी । ओळखूं ये ना सहजीं तो ॥२०॥
त्याला कारण आपलाहि स्वभाव । भिन्न प्रकृतींचें भिन्न भाव । परि बाह्य वेषावरि संत-असंत गौरव । देतां नोहे हिताचें ॥२१॥
बाह्य सतकार्य सदाचार ज्ञान । यांसि मानिलें श्रध्दास्थान । तेणें मात्र अध:पतन । नव्हे आपुलें सदभावें ॥२२॥
उत्तम गुण, सदाचरण । अभेदवृत्ति, विशाल ज्ञान । हें दिसे तोंवरिच तेथे गुरुपण । मानितां कोणी फसेना ॥२३॥
मानव्याचा उत्तम आदर्श । नाही विषाद नाही हर्ष । सरळ विवेक सत्कार्य-संतोष । संतापाशीं पाहावा ॥२४॥
ज्याचें गेलें संकुचितपण । झालें विशाल अंत:करण । ज्याचा व्यवहार आदर्श पूर्ण । त्यासीच नम्र असावें ॥२५॥
एरव्ही संत म्हणतां हात जोडावे । जवळ जातां निरखीत जावें । ऐसें करितां फजीत न व्हावें । लागेल कधी ॥२६॥
आसक्तीने लोभी न व्हावें । मुमुक्षुत्व अंगीं बाणवावें । म्हणजे ऐशातैशा गुरूसि न फावे । भुरळ घालणें ॥२७॥
जो स्वयें उत्तम शिष्य झाला । त्यासि गुरूहि लाभे भला । परि सात्विकतेचाचि आदर केला । पाहिजे निश्चयें ॥२८॥
अहो ! सत्वशील तोचि साधु भला । जो रिकामा कधीच न पाहिला । तो काम करितांचि ओळखला । पाहिजे सत्य ॥२९॥
समजा तो जेथे उभा असे । कांही कराया स्मरे उल्हासें । तो जेथे बैसला दिसे । तेथे लोक तैसे बसावे म्हणोनि ॥३०॥
जेथे तो सभास्थानीं जाय । लोकांचे जोडे रांगेत ठेविताहे । अथवा लोकां बैसवी नीट उपायें । समाजसौंदर्य कळावया ॥३१॥
तो जेथे भोजनास बैसे । उणें पडोंचि न देतसे । उणें दिसतां कामीं लागतसे । व्यवस्थेच्या आपणचि ॥३२॥
तो जेथे जेथे काम करी । तें ग्राम बनवी स्वर्गपुरी । त्याची सेवा महाक्रांतिकारी । ग्रामोध्दारक ॥३३॥
बोले तैसा चाले उत्तम । लोकसंग्रही त्याचें प्रेम । आपणचि करी आपुलें काम । नरवदेव न होतां ॥३४॥
जगणें परिश्रमावांचून । हें नव्हे संताचें लक्षण । झटूनि करावें लोक-कल्याण । निष्कामपणें ॥३५॥
आपुल्या देहीं अनासक्त । परि हीनदीनांचा झाला भक्त । अहोरात्र सेवानुरक्त । नम्रभावें, संत तो ॥३६॥
जनता तयासि वाटे देव । सेवेंत नाही लपंडाव । परि अधिकार तैसी देई ठेव । उपदेशाची सर्वजना ॥३७॥
मूर्खासि करावें शहाणे । हेंचि त्याचें नेहमी पाहणें । जडाज्ञानासि बोध देणें । कामचि संताचें ॥३८॥
हा तों संताचा सहजस्वभाव । न पहावा भेद-भाव । बोध करावा सदैव । सत्कार्मांचा सर्वांसि ॥३९॥
ओज असे तयांचिया वाणीं । सहज बोलतां घेई वेधोनि । नम्र होती ऐकतां प्राणी । संत-वचना ॥४०॥
संतांचे सदा प्रेमळ बोल । वाक्य-बोध अति विशाल । कर्तव्यतत्परता प्रबल । संतांपाशी ॥४१॥
संतवचनांचा महाप्रताप । ऐकतां श्रवणीं होय अनुताप । दुष्ट आपोआप । निरसोनि जाय सत्संगें ॥४२॥
संतांची नजर कृपेने पडे । त्यासि तीर्थाटन ठायींच घडे । संत प्रसन्नतेने धडे । पदोपदीं देताति ॥४३॥
संत मातेहूनि मायावी । संत वैभव असोनि गोसावी । राज्य करोनि फकीरी दावी । आपुल्या अंगीं ॥४४॥
संत सत्तेविण राज्य करी । धनावांचूनि वैभव भरी । स्त्रीपुत्र नसतांहि संसारी । विश्वव्यापी ॥४५॥
संत गंगेहूनि पवित्र । शीतल निर्मल सूर्यचंद्र । संत कल्पतरूहूनि थोर । मोक्षदानी ॥४६॥
संत हृदयें असती कोवळे । दया द्रवोनि ह्रुदय उफाळे । मनुष्य-कल्याणाचे निर्वाळे । संतापाशी ॥४७॥
संत ह्रुदयें जरी दयाळ । कठिण काळाचेहि काळ । न्यायनीतीने अति निर्मळ । निर्भय वृत्ति ॥४८॥
संतापाशी एकचि धर्म । सकल जीवांचें कल्याणकर्म । मानवता हेंचि मुख्य वर्म । सर्वकाळ ॥४९॥
संतास नाही जात-परजात । विश्वकुटुंब संतांचें गोत । जे जे भेटतील ते आप्त । सुह्रद त्यांचे ॥५०॥
कोणा कधीहि न होवो दु:ख । संतुष्ट राहावेत सकळीक । असोत राव अथवा रंक । समान त्यांना ॥५१॥
विश्वसुखें संत संतोषे । जनदु:खें दु:खी भासे । सदा सत्कर्मी उल्हासें । लागती संत ॥५२॥
संतांचा तो मूळस्वभाव । सर्वांत वाढवावा प्रेमभाव । करावा सज्जनांचा गौरव । कौतुकाने ॥५३॥
कोठे सज्जनांवरि नाराजी । कोठे दुर्जनासीहि पूजी । परि ध्येय एकचि, समाजीं । वाढ करणें उत्तमाची ॥५४॥
दुर्जनावरीहि प्रेम करावें । दुर्जनतेसि निवारावें । सज्जन करोनि सोडावें । प्रेमबळें ॥५५॥
आपुलें अंगहि अर्पोनि । उणें करावें पूर्ण जनीं । शांति दे चंदनापरी झिजोनि । संत तोचि ॥५६॥
अंध रूढयांचें उच्चाटन । मानवधर्माचें संस्थापन । यासाठी करी प्राणहि अर्पण । प्रसंगीं संत ॥५७॥
ऐसें सुंदर बहिरंग । याहूनि थोर अंतरंग । संपादिल्या संतसंग । फिटे पांग जीवाचा ॥५८॥
संतसंगति ज्यास लाभली । त्याची दुर्दशाच पळाली । कर्तव्यफळें उमगूं लागलीं । जीवनाचीं ॥५९॥
संतांचिया सहज संगतीं । सदबोधाचीं फळें लाभती । प्रवृत्ति ते होय निवृत्ति । अंतरंगीं ॥६०॥
अंतरंग आणि बहिरंग । उन्नत करील सर्व अंग । ऐसा आहे संतसंग । सर्वोदयकर्ता ॥६१॥
उज्ज्वल संतांचें जीवन । भक्तिभाव-वैराग्यपूर्ण । आत्मानात्मविवेक ज्ञान । संतापाशी ॥६२॥
आत्मशक्ति कर्मशक्ति । ज्ञानशक्ति प्रेमशक्ति । सात्विक कला प्रमाणशक्ति । वास करी संतांठायीं ॥६३॥
मानसिक शक्तीचे सागर । संत करितील जो निर्धार । निश्चयें होईल तो व्यवहार । सर्वांगपूर्ण ॥६४॥
परि प्रत्येक साधु सर्वोदयी नव्हे । कांही तत्त्वीं अपूर्णता राहे । त्यांतहि अधिकारभेद आहे । अवस्थापरत्वें ॥६५॥
जीवलोक आणि देवकोटी । परलोक तैसी परात्परकोटी । चढती वाढती संतदृष्टी । परि केंद्रबिंदु एकचि ॥६६॥
जो ऐहिक दृष्टीने जन । मानी सेव्य, एक समजोन । करितो सेवा रात्रंदिन । मानिती धन्य लोक तया ॥६७॥
परि त्यास नाही खंती महंती । रागद्वेष नाही कोणाप्रति । मान-अपमानहि नये चित्तीं । कार्यीच वृत्ति समाधानी ॥६८॥
हा जीवसृष्टीचा साधुसंत । ईशसृष्टीचा साधूहि तद्वत । तो देव-देवी म्हणोनीच ओळखीत । जनलोकां भक्तिभावें ॥६९॥
न मानी देशवेष धर्मपंथ । नाठवे नीच-उंच जातपात । देवाचें कुटुंब मानी जग समस्त । व्यवहार उन्नत तयाचा ॥७०॥
ओळखी एकाच स्थानावरूनि । त्यास न दिसे रावरंक कोणी । राजा-प्रजा भेद न मानी । साधु देवकोटीचा ॥७१॥
ज्याने परसृष्टि अनुभवली । त्यासि परमात्मता साधली । आप-पर बोलीच निघोनि गेली । एकात्मता झाली सर्वभूतीं ॥७२॥
अखिल ब्रह्मांडीं जें जें दिसे रूप । तें तें झालें ब्रह्मस्वरूप । जन मिथ्याभ्रमें सोशिती ताप । तो निवारी नानापरी ॥७३॥
स्वप्न मिथ्या परि ओसणे कोणी । त्यास जागवी हालवोनि । तैसा दयाळुपणें करी जनीं । सर्व सुखकार्य ॥७४॥
सर्वांसि समत्वाकडे न्यावें । एकत्व व्यवहारीं नांदवावें । अवघें विश्वचि ब्रह्मसुखीं डोलावें । वाटे तया संता ॥७५॥
परात्पर स्थितीं विश्वचि नाही । सर्व स्वानंद कोंदला पाही । त्याची राहणीच सहजीं ब्रह्ममयी । सहज बोलहि वेदोत्तम ॥७६॥
ऐसे असती भिन्न प्रकार । साधुसंतांचे विविध संसार । तेथे आम्ही पडतों पामर । जाणावयासि ॥७७॥
म्हणोनि संतांच्या अगम्य खुणा । संतचि जाणतील संतजना । परि आपुल्या जाणिवेने त्यांना । ओळखीत जावें ॥७८॥
जितकें संतरूप जाणूं आपण । तितकें अंगीं येईल संतपण । गंगेसि मिळतां गंगाचि होऊन । राही नाला ॥७९॥
गंगा नेहमीच झुळझुळ वाहे । परि पाणी घ्यावयासि जो जाये । त्याच्या पात्राइतुकेंचि राहे । पाणी जवळी ॥८०॥
गंगा जरी मोठी असली । तरी घरीं कैसी न्यावी भली ? ज्याने नेण्याची व्यवस्था केली । प्राप्त झाली शांति त्यासि ॥८१॥
तैसे संत सदा कृपाळू । दयाळू स्नेहाळू प्रेमळ मायाळू । जीवजनांचे नित्य कनवाळू । सुसंकल्पी ॥८२॥
उकलोनि दाविती ग्रंथवर्म । आपुल्या अनुभवें नाशिती भ्रम । सकळां दाविती वाट सुगम । संत मार्ग झाडोनिया ॥८३॥
त्यांसि शरण लागे जावें । बोलतां वचन श्रवणीं भरावें । भरलें तैसेंचि करावें । निश्चयाने जीवनांत ॥८४॥
मग जीवन होय उन्नत । हाचि उध्दाराचा पंथ । संत दाविती मार्ग सतत । जडजीवांसि सदभावें ॥८५॥
तयांचा बोध ऐकतां स्वभावें । जडजीवहि उध्दरोनि जावे । या मार्गेंचि सर्व सुख पावे । जनतेलागी ॥८६॥
संत जनतेशीं समरस होती । म्हणोनीच जडली त्यांवरि भक्ति । संत चालती बोलती मूर्ति । भगवंताची ॥८७॥
मित्रहो ! जें जें देवाने केलें । तेंचि संतांनी हातीं धरलें । प्रचाराद्वारें गाजविलें । देव-वाक्यां सर्वत्र ॥८८॥
ईश्वरी अवताराचें कार्य । तेंच संतांचे अंगीं चातुर्य । सर्वांठायीं आणोनि माधुर्य । वळण देती जनाला ॥८९॥
विसरोनि आपुलें मोठेपण । वाढविती सत्याचें महिमान । न जाती प्रतिष्ठावैभवा भुलोन । आडमार्गें कधीहि ॥९०॥
जुनींच साधनें घेवोनि हातीं । करिती जनांची जागृति । समयानुरूप स्वरूप देती । सर्व उत्तम प्रथांसि ॥९१॥
असो दगडाचाहि उत्सव । परि त्यांत भरोनि दिव्य भाव । त्याद्वारें उन्नत करिती मानव । साधुसंत ॥९२॥
सर्व संस्था पक्ष पंथ । यांच्यामध्ये जें जें उचित । त्यासि करिती प्रोत्साहित । संतजन समभावें ॥९३॥
जनांचिया चालीं चालतो । जनांचिया बोलीं बोलती । परि आपुलें उद्दिष्ट घालती । कुशलपणें त्यामाजी ॥९४॥
सर्वांस वाटती आपुल्यासारखे । नव्हती कोणासि पारखे । आबालवृध्दांसि करिती कौतुकें । आकर्षित प्रेमाने ॥९५॥
सर्वांपासूनि पुढेच असती । परि दूर न वाटे कोणाप्रति । तेणें करूं लागली प्रगति । लोक निराश न होतां ॥९६॥
लहान मुलासि शिकवावें । त्यासाठी पांडित्य दूर ठेवावें । तैसे वर्तती स्वभावें । साधुसंत जनासाठी ॥९७॥
आंधळयांचे होती नेत्र । चैतन्य ओतिती सर्वत्र । घुसती होऊनि ऐक्यसूत्र । संत विरोधांअंतरीं ॥९८॥
सर्व मानवांसि उन्नत करावें । सर्वत्र समाधान पोंचवावें । प्रत्येकाने प्रत्येकास व्हावें । पूरक, ऐसें उपदेशिती ॥९९॥
मेघवर्षावासारिखा उपदेश । तेथे नाही गुरु-शिष्य । आत्मवत पाहती सर्वास । संतसज्जन ॥१००॥
त्यांचा उपदेश म्हणजे अमृत । शांति लाभे होतां प्राप्त । त्रिविध तापें जीव जे तप्त । होती तृप्त सत्संगें ॥१०१॥
म्हणोनि ग्रंथीं वर्णिलें सकळ । संत उध्दरील आपुलें कूळ । ऐसेंचि नव्हे, प्रेमाचा सुकाळ । करील गांवीं ॥१०२॥
जया गांवीं वसेल संत । तेथे पुण्य करील पापांचा अंत । उध्दरोनि जाय प्रांतचा प्रांत । दु:खें होत देशोधडी ॥१०३॥
संत करिती आपणासमान । संतसंगें संतपण । प्रयत्नें उन्नत होय जीवन । संतबोध लाभतां ॥१०४॥
ऐसा संतांचा महिमा । आवडतो पुरुषोत्तमा । सर्व जीवांच्या येतो कामा । मायबाप म्हणोनिया ॥१०५॥
ऐसे क्रियाशील संतजन । त्यांचीच गांवीं असावी चलन । तरीच उध्दरेल गांव पूर्ण । नांदती सदगुण तुकडया म्हणे ॥१०६॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । सत्संग कथिला ग्रामोध्दारार्थ । बत्तिसावा अध्याय संपूर्ण ॥१०७॥
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
*****************
ग्रामगीता अध्याय तेहतिसावा
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
श्रोतियांनी केला प्रश्न । संतसंगें मिळे संतपण । ऐसें झालें निरूपण । हें तों जीवा पटेना ॥१॥
संत देवाचे अवतार । आम्ही गांवचे गवार । कैसें त्यांच्या बरोबर । व्हावें आम्ही ? अशक्य हें ! ॥२॥
याचें ऐका समाधान । जग झालें ईश्वरापासोन । नर तोचि नारायण । दाविली खूण संतांनी ॥३॥
जन्मासि आला तोचि अवतार । अवतार सर्वचि प्राणिमात्र । त्या अवताराचे अनंत प्रकार । प्रकट होती सत्कर्मे ॥४॥
कोणी आपुलें पोटचि भरी । कोणी कुटुंबाचें पोषण करी । कोणी गांवाची काळजी निवारी । आपुल्यापरीने ॥५॥
कोणी होती प्रांतव्यापी । प्रांताकरितां कष्टी-तपी । जनाकरितां वाट सोपी । करोनि द्याया हौसेने ॥६॥
हे अवतार साधारण । यापुढे विशेष अवताराचें लक्षण । जो मिरवी देशाचें भूषण । शरीरीं स्वयें ॥७॥
” माझा देशचि माझें घर । देश दु:खी जणुं माझेंचि शरीर । त्यासाठी मी निरतर । कष्टी होईन सांभाळाया ” ॥८॥
ऐसें ज्याने मनीं धरिलें । किंबहुना कार्यें अनुभवा आलें । अनेक आपत्तींनी उजळलें । सत्कार्य ज्याचें ॥९॥
त्यासि म्हणावा अवतार । जो करी सज्जन-चिंता निरंतर । दुष्ट बुध्दीचा तरस्कार । सदा जयासि सक्रिय ॥१०॥
जगाचें उद्दिष्ट आहे सत्य । तिकडे जग करावें प्रवृत्त । ऐसें ज्याचें ज्याचें कृत्य । तोचि अवतार निश्चयें ॥११॥
षडगुण ऐश्वर्याच्या प्रमाणांत । अंश, पूर्ण आदि प्रकार त्यांत । ज्ञानी कर्तबगार निरासक्त । उदार श्री-यशसंपन्न ॥१२॥
या अवताराचे पंथ दोन । एक हृदयपरिवर्तन दुसरा दमन । एका क्रांति करी सशस्त्र पूर्ण । दुसरा भावभक्तीने वळवी ॥१३॥
धर्मनीति सेवामार्गे गवसिली । त्यासि संत-अवतार संज्ञा लाभली । सामदामदंडभेदाने क्रांति केली । त्यासि म्हणती देवावतार ॥१४॥
देव-अवतार नित्य नसती । ते महाप्रसंगीं पुढे येती । संत-अवतार नेहमी चालती । लोकीं सुनीति वाढवाया ॥१५॥
कांही अवतारांची महिमा । विश्वव्यापक त्यांचा आत्मा । प्रकट करण्या मानवतेची सीमा । प्रचार त्यांचा ॥१६॥
ज्यांचा जैसा अधिकार । त्यांचा चाले तैसा व्यवहार । मार्ग एकचि परि मागे-समोर । पाय अनुभवें पडताति ॥१७॥
कोणी भक्ति शिकवोनि सुधारी । मंत्र शिकवोनि जनता तारी । कोणी ज्ञानमार्ग सांगोनि समर्थ करी । मानवता लोकीं ॥१८॥
अखेर मानवांची उन्नति करणें । तयां राष्ट्रधर्म निजधर्म शिकविणें । हेंचि संतांचें असतें लेणें । सर्वतोपरी ॥१९॥
वाउगा संकल्पचि नाही उठला । स्फुरला तो अनुभवचि ठरला । त्या दिव्यदृष्टीच्या पुरुषाला । संत-अवतार म्हणों आम्हीं ॥२०॥
कोणी कुटुंबासि त्रस्त करी । कोणी गांवाचे होती वैरी । कोणी देशांत उपद्रव करी । पाखांडपंथीं ॥२१॥
जो देशद्रोही धर्मद्रोही ठरला । प्रेमाने सांगतां न समजला । सर्व प्राण्यांना त्रास झाला । ज्याच्या योगें ॥२२॥
कांही केल्या न सुधारें । शिरलें क्रूरवृत्तींचें वारें । सज्जनांचें मनहि थरारे । ज्याच्या धाकें ॥२३॥
त्याची झाली परिसीमा । तेव्हा देवावतार येतो कामा । पाठवावयासि विरामा । देहा त्याच्या निरुपायें ॥२४॥
ते दुर्जन राक्षस-अवतार । जे जनतेसि दु:ख देती फार । त्यांना दंड द्याया देव-अवतार । प्रकट होती ॥२५॥
ऐसें हें नेहमीच चालतें । जैसें जन्ममरण-रहाट फिरतें । तैसेचि संत-देव येताति ते । भूमीवरि ॥२६॥
राक्षसी आणि देववृत्ति । रूपांतरें खेळते जगतीं । संतदेव स्थापूं पाहती । शांति प्रेमशक्तीने ॥२७॥
येथे श्रोत्यांनी प्रश्न केला । जरि दुष्ट तोचि राक्षस ठरला । तरि त्याने वरदहस्त कैसा मिळविला । दैवतांचा ? ॥२८॥
काय ठावे नव्हते त्याचे गुण ? कां दिले शक्तीचें वरदान ? आम्हां न कळे हें पुराण । कैसें आहे सांगा की ॥२९॥
याचें ऐकावें उत्तर । हा राक्षसहि आधी भक्त फार । त्याच्या तपानेचि देवता निरंतर । प्रसन्न त्यासि ॥३०॥
त्याचिया गुणकर्मे मिळालें वरदान । तें सहन न झालें मागाहून । त्याचा दुरुपयोग दारुण । केला त्याने मनमाने ॥३१॥
प्रथम हाती आली सत्ता । मग भुलला तो भगवंता । लागला उपभोगाच्या पंथा । नीतिप्रवृत्ति सोडोनि ॥३२॥
त्याची राखती संत मर्जी । तंव तो अधिकचि चढे समाजीं । जनतेमनीं वाढतांहि नाराजी । पर्वा न करी अहंकारें ॥३३॥
भरावया पापांचा रांजण । त्यासि देती प्रोत्साहन । जेणें त्वरित होय निकाल पूर्ण । पंख फुतलिया उधळीपरी ॥३४॥
कितीहि साधुसंत समजाविती । परि न वळे त्याची मति । म्हणोनि देवावताराहातीं । कार्य आलें तयाचें ॥३५॥
देव-अवतार समजाविती । नाना योजना करूनि पाहती । शेवटीं शस्त्र धारण करिती । दुष्टासाठी ॥३६॥
त्याच्या मोक्षाने सुटती जन । मुक्त होती दु:खापासून । म्हणोनि करावा लागे प्रयत्न । अवतारासि निर्वाणींचा ॥३७॥
ऐसें ज्याने ज्याने केलें । दु:ख जगाचें निवारिलें । ते सर्व अवतारचि ठरले । पुराणें झालीं तयांचीं ॥३८॥
तैसें कोणी करी अजून । त्यांचीं गुणकर्मे पाहून । पूर्वीच्या थोरांचे अवतार जन । मानिती तयां ॥३९॥
तुलसीदास आधी आसक्त । ते वैराग्यें झाले महाभक्त । रामकथा गावोनि तारिलें जगत । म्हणोनि वाल्मीकि-अवतार ॥४०॥
कोणी भिन्न देवां अवतार मानिती । हेहि आहे आपुलीच भक्ति । पुढे पुढे कळेल तयांप्रति । पायर्या अवतार-कार्याच्या ॥४१॥
कोणा म्हसोबा खंडोबा मान्य । कोणी शक्तिअवताराचें करी पूजन । कोणी अवतार राम-कृष्ण । म्हणती महाविष्णूचे ॥४२॥
कोणी दश अवतार मानिती । कोणी गुरुनानक-परंपरा वानिती । कोणी तीर्थकरचि अवतार म्हणती । कोणी गणती चोवीस ॥४३॥
कोणी बुध्द-अवतार पूजती । कोणी दत-अवतारा भजती । कोणी येशु ईशपुत्रावतार समजती । जगतीं झाला ॥४४॥
कोणी म्हणे महंमद प्रेषित-अवतार । कोणी म्हणे संत अंशावतार । लोक मानिती अनंत प्रकर । किती सांगों ? ॥४५॥
याचें एकचि कारण । जो जो उन्नतीसि लागला न्यूनपूर्ण । तोचि अवतार मानिला वेगळा समजोन । सज्जनांनी ॥४६॥
कोणी ब्राह्मा-विष्णु-हर । यांसि मानिती खरे अवतार । कोणी म्हणती देवचि भूमीवर । कधी नाही प्रकट झाला ॥४७॥
देव आहे आत्मशक्ति । तो देह धारण न करी कल्पान्तीं । त्यासि जाणणें यांतचि उन्नति । मानवाची ॥४८॥
ऐसीं भिन्न लोकांचीं भिन्न मतें । सत्य सर्वांतचि उणेंपुरें तें । परि संगति कैसी लावावी यातें । विसरोनि गेले ॥४९॥
जे जे पुरुष थोर झाले । त्यांसि अवतारचि संबोधिलें । ज्यांचें ज्यांना चारित्र्य पटलें । त्यांनी मानलें त्यांलागी ॥५०॥
जुने ते सोनें विशेष ठरले । येथे कोणाचेंचि नाही चुकलें । परि ज्यांनी सत्य अनुभवलें । तेचि पावले देव-पदा ॥५१॥
कोणी म्हणती देवता अयोनिसंभव । अवतार करी चमत्कारचि सर्व । हें म्हणणें आहे अर्थगौरव । भाविकपणाचा ॥५२॥
गर्भ, नर्क, वैकुंठपुरी । यांचें महत्त्व काय देवाअंतरीं ? हें पाहोनि भांति-मोह धरी । तरि तो देव कैसेनि ? ॥५३॥
देवास वैकुंठ गर्भ सारिखे । येणें-जाणें स्वाभाविकें । सुखदु:खें एकाचि कौतुकें । राहती तयापुढे ॥५४॥
योनीद्वारें जरी प्रकटला । तरी दु:ख न वाटे त्याच्या हृदयाला । म्हणोनीच तो अयोनिसंभव मानिला । ज्ञानियांनी ॥५५॥
एरव्ही जन्ममरण सकला सारिखें । सहनशक्ति अधिकारभेद राखे । जैसें जयाचें स्थानमान देखे । तैसें निकें नाम तया ॥५६॥
सर्व अवतार मानवीच असती । परि अधिकाराऐसें कार्य करिती । त्यांची धारणा जीवन्मुक्ति । तैसीच असते सर्वदा ॥५७॥
अनेक जन्मांची संस्कार-संगति । घेवोनि येताति सांगातीं । उध्दराया जड जीवांप्रति । मार्ग दाविती अवतार ॥५८॥
परि मानवीच कार्य करणें । मानवी मार्गानेचि येणें-जाणें । मानवांच्या भूषणापरी मिरविणें । अवताराचें ॥५९॥
मानवें सर्व प्राणिमात्रा सुखवावें । सर्व कार्य सुरळीत चालवावें । एक असोनि अनंत व्हावें । उल्हास हाचि अंतरीं ॥६०॥
हें समजोनि जो वर्तला । तोचि अवतार शेवटीं ठरला । ज्याने पृथ्वीचा संबंध जोडला । एकसूत्रीं प्रयत्नें ॥६१॥
ज्यांनी सर्व विश्व सूत्रांत गोविलें । सन्मार्ग मानवमात्रा शिकविले । तेचि थोर अवतार झाले । पुढेहि होतील निश्चयें ॥६२॥
म्हणोनि अवतार हा उन्नतिवाद । अधिकार तैसा प्रकटे विशद । विश्वात्मभावें स्वयंपूर्ण सिध्द । अवतार आम्ही मानतों ॥६३॥
तोचि सर्वांसि एक करी । एक करोनि अनेकत्वीं वावरी । त्यासीच पावली पूर्णता खरी । विश्वात्म्याची ॥६४॥
एवढी विशाल ज्याची धारणा । एवढा कार्याचा व्याप जाणा । विश्वाचिया मतभेदांना । मिटवूं शके जो ॥६५॥
तोचि शेवटचा अवतार । महामानव विकासकेंद्र । आपण तयाचे अंश अंकुर । मानवधर्मी ॥६६॥
निश्चय व्हावा श्रोतियाजना । अवतार म्हणजे अतिमानव जाणा । मानवाची पूर्णता म्हणा । अवतारकार्य ॥६७॥
देवताची करावी उपासना । उपासकासीच ये अवतारपणा । ऐसाचि आहे अवताराचा बाणा । आजवरीचा ॥६८॥
यांत एकचि तारतम्य पहावें । मानवा कोणाचेनि सुख पावे । कोण समाजकार्य करी बरवें । जनमानस रंगवोनि ॥६९॥
तोचि समजावा महाभला । जो जनहितार्थी लागला । दैवी शक्तीचा सागर भरला । अंगीं ज्याच्या ॥७०॥
अवतारासि सामर्थ्य पाहिजे । आत्मबल प्रखर तयासि साजे । बोलिजे तैसेंचि कार्य कीजे । अवतार तो या जनीं ॥७१॥
ऐशा शांति-अवतारांची कीर्ति । मानवांसि संत सांगती । देव-अवतार प्रकट होती । क्रांति कराया देशामाजीं ॥७२॥
शांति-अवतार क्रांति-अवतार । या दोघांचें कार्य भिन्न सर्वत्र । एक करी सदबोध मात्र । एक करी निर्णय ॥७३॥
दोघांचीहि असे जरूरी । म्हणोनि ही योजना मानिली चतुरीं । आपणहि व्हावें अवतारी । त्यांचिया ऐसें निर्धारें ॥७४॥
नाहीतरि अरत्र ना परत्र । हेंहि म्हणतां ये अवतार-वैचित्र्य । परंतु अवतार तो अवतारकार्य । करावयासि ॥७५॥
मानवधर्मासि उजळोन । दुष्कृतिनाशा सज्जनरक्षण । करणें हेंचि अवतारलक्षण । सर्वमान्य सेवात्मक ॥७६॥
ज्यांनी जगाची सेवा केली । त्यांसीच अवतार पदवी लाभली । त्यावांचूनि अवतार बोली । ही तों आपुल्या भावनेची ॥७७॥
सेवेएवढें महत्त्व नाही । ज्ञान ध्यान वैराग्यासहि । ह्या सर्व साधनीं सफलता ही । सेवेनेचि होतसे ॥७८॥
देव-देवता जगीं आली । जपतपें करूं लागली । परि पूर्णता नाही झाली । सेवा नाही तोंवरि ॥७९॥
जेव्हा सेवाकार्य प्रकट केलें । अनंत जीव संतुष्ट झाले । तेव्हाचि अवतार तयां मानिलें । भूलोकीं या ॥८०॥
रामचंद्रें राज्य त्यागिलें । रावणा संहारूनि सज्जन रक्षिले । म्हणोनीच अवतार ठरले । सर्वतोमुखीं ॥८१॥
श्रीकृष्णें कंस मर्दिला । दुर्योधनाचा नाश घडविला । सुख देवोनि गोरगरीबांला । मगचि ठरला अवतार तो ॥८२॥
ऐसें सेवाकार्य केलें ज्याने । त्यासीच जन अवतार म्हणे । त्या कार्यलीला आठवती जीवेंप्राणें । सर्वतोपरी ॥८३॥
आठवती तेहि अवतार होती । तैसी करितां सेवाकृति । परि कोरडी सहानुभूति । ही तों नव्हें उध्दारक ॥८४॥
ज्यांनी सेवाकार्यासि जीवन दिलें । स्वानंदीं बुडोनि जगा तारिलें । तेचि संत आणि अवतार झाले । कर्तव्यशील मानव ॥८५॥
साधुसंतें सेवा केली । अनंत हृदयें संतोषविलीं । व्यवहार-उपासनेने दाविली । सिडी मोक्षमार्गाची ॥८६॥
साधुसंतें सेवा केली । जीवासि ब्रह्मप्राप्तीची ओळख दिली । तैसी सेवा पाहिजे घडली । आपणांसीहि ॥८७॥
एक संत जन्मास आला । त्याने प्रांताचा प्रांत कीर्तीने व्यापला । परि काम जनसुधारणेला । अपुरा पडला व्याप त्याचा ? ॥८८॥
याचें कारण आम्ही लोक । संदेश ऐकतांना डोळेझांक । नमस्कार करायाचें कौतुक । आमुच्यापाशी ॥८९॥
लोक करिती त्यांचा उत्सव । गाती मनोभावें गौरव । परन्तु तैसा सेवाभाव । अंगीं न आणिती आपुल्या ॥९०॥
देव घेतील अवतार । म्हणोनि वाट पाहती उतराया भार । हा दुबळेपणाचा विचार । शिरला थोर या लोकीं ॥९१॥
अरे ! हें सर्व आता विसरावें । संतीं सांगितलें तेंचि करावें । मानवाने मानवां सुधारावें । याहूनि पुण्य कोणतें ? ॥९२॥
हें पवित्र अवतारकार्य । आपणचि होऊनिया निर्भय । कां न करावें टाकोनि पाय ? लाभेल जय निश्चयाने ॥९३॥
कोणी रोगराईने मरे । त्यास कोण पुसतो सांगा बरें ? परि सेवा करितां प्राण अंतरे । लोक श्रध्दाभरें कीर्ति गाती ॥९४॥
म्हणोनि बोललों सेवक बना । ओळखा मानव म्हणोनि आपणा । घेवोनि अवतार-तत्त्वाचय खुणा । उजळा भुवना कीर्तीने ॥९५॥
नका अज्ञानामाजी दडूं । नका बायकापोरांसाठी रडूं । नका स्वार्थासाठी अडूं । निघा मानवसेवा साधाया ॥९६॥
जो आपुल्या स्वार्थासि मुकला । विश्वस्वार्थ मानितो आपुला । तोचि अवतारकार्यी लागला । मानतों आम्ही ॥९७॥
यासाठी करा आपुली उन्नति । सेवा देवोनि गांवाप्रति । गांवापासोनि विश्वाप्रति । पोहचोनि जावें ॥९८॥
आपली समज वाढवावी । पैस तेवढीं कामें करावीं । म्हणजे लाभेल अवतारपदवी । क्रमाने आपणा ॥९९॥
सेवेंतचि आहे देवभक्ति । कार्य करण्यांतचि राष्ट्रशक्ति । यानेच मिळे शेवटीं मुक्ति । अवतारदीप्ति अंगीं येई ॥१००॥
कोणालाहि न वाटावें अवघड । कैसें अवतारकार्य प्रचंड । पावतां नये ऐसें उदंड । नाहीच कांही ग्रामजनहो ! ॥१०१॥
तैसें भयचि वगळावें । म्हणोनि बोलिलों साध्या भावें । तुकडया म्हणे समजोनि घ्यावें । तारतम्याने मर्म याचें ॥१०२॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । कथिला अवतारकार्याचा पथ । तेहतिसावा अध्याय संपूर्ण ॥१०३॥
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
*******************
ग्रामगीता अध्याय चौतिसावा
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
जीव ईश्वराचा अंश । तो जितुका करी आपुला विकास । तितुका उच्च अवतारपदास । याच लोकीं जातसे ॥१॥
करितां सेवाप्रयत्न थोर । जीव होई देवावतार । आपण आपुला करी उध्दार । शांति देई जगासहि ॥२॥
सोडूनि दुबळा निराशावाद । साधावा सत्य अवतार-बोध । म्हणोनि केलें असे विशद । अवतारतत्त्व हें सारें ॥३॥
लोक करूं लागतील सत्कार्य । तरि गांवीं नांदेल सर्व ऐश्वर्य । त्यासाठी वाढविलें पाहिजे मनोधैर्य । सर्व लोकीं ॥४॥
परि श्रोते बोलती त्यावरि वाचें । अहो ! भाग्यचि हीन आमुचें । म्हणोनि आमुच्याने कोणचें । सत्कार्य नोहे ॥५॥
मनांत असतें कांही करावें । परि वेळचि जरा ना फावे । सांगा यास काय करावें । आम्हीं तरी ? ॥६॥
मित्रहो ! ज्याची जयासि आवड । त्यासाठी त्या मिळे सवड । कोणी नये इच्छेआड । प्रयत्न करितां ॥७॥
गरजेपोटीं जन्मे युक्ति । प्रसंग आणितां वाढे शक्ति । प्रयत्न पेरतां फळें येती । आवडी ऐसीं ॥८॥
श्रोते म्हणती कितीहि प्रयत्न केले । तरि काय सर्वचि राजे झाले ? यास पाहिजे भाग्य उघडलें । आम्हां वाटे ॥९॥
इच्छेंत जरी राज्य जडलें । तरी रोजचेंचि कार्य नडलें । तेथे उदंड मनांत आलें । तरी काय होतें ? ॥१०॥
इच्छेप्रमाणें सर्वांस घडतें । तरि काय भिकारी बनावें वाटतें ? इच्छा करणारे कितीतरी येथे । फिरती बेकार सडकेने ॥११॥
कोणास सहजमार्गी चालतां । धनाचा हांडा सापडे आइता । त्यांना बघा इच्छा न करितां । मिळालें धन ॥१२॥
कोणी दरिद्रयाच्या घरीं जन्मले । मेंढयाबकर्या चारूं लागले । अचानकचि भाग्य उघडलें । गेले दत्तक राजवाडीं ॥१३॥
ऐसें कोण्या उपायें होतें । हेंचि विचारावें वाटे आपणातें । प्रयत्न केल्यानेच फळ येतें । हें तों येथे शोभेना ॥१४॥
गांवीं आमुच्या एक सज्जन । अति कुशल प्रयत्नवान । नाना कलांनी निपुण । परि पोटाचेंहि भागेना ॥१५॥
सांगा याहूनि काय करावें ? इच्छेने फल कैसें पावे ? कोण्या परीने योजावें । कार्य आम्हीं आपुलें ? ॥१६॥
मित्रहो ! तुमचें सर्व म्हणणें । ऐकलें मीं जीवेंप्राणें । म्हणोनीच आपल्या परीने । देतों उत्तर तुम्हांसि ॥१७॥
भाग्याचा हा प्रारब्धवाद । उन्नतीचा करी विरोध । गांवोगांवच्या जीवनासि बाध । आणला याने ॥१८॥
ही दुबळी निराशा घालवून । केलाच पाहिजे प्रयत्न । तरीच भाग्य येईल जाण । उदया आपुलें ॥१९॥
एरव्ही हें भाग्य कोणी देईना । प्रयत्नाशिवाय भोग येईना । त्यासि प्रयत्नचि प्रधान जाणा । लागे केव्हाचा तरी ॥२०॥
कांही संस्कार असती पूर्वीचे । कांही प्रयत्न या जन्मींचे । मिळोनि येई फळ भाग्याचें । उदया लोकीं ॥२१॥
संत गुलाबराव बालान्ध । त्यांच्या जिव्हाग्रीं शास्त्रवेद । हें पूर्व जन्मींचें संचितचि सिध्द । नव्हे प्रारब्ध फुकाचें ॥२२॥
कांही पूर्वसंस्कारगति । कांही करणी कांही संगति । कांही संकल्प इच्छाशक्ति । योग्य काळीं येती भाग्यफळें ॥२३॥
पाहणार्यास अचानक दिसती । याचें भाग्य उघडलें म्हणती । धनवैभव लाभतां ठरविती । भाग्यवंत लोकीं ॥२४॥
येथे एक प्रश्न उठतो । भाग्यवंत कोण असतो ? ऐका त्याचेंहि सांगतों । उत्तर आता ॥२५॥
असेल कोणी धनवंत । परि तो नव्हे भाग्यवंत । भाग्य असे सुखसंतोषांत । अवडंबरांत तें नाही ॥२६॥
भाग्यवंत त्यासचि म्हणावें । ज्याने ईश्वरास समर्पण व्हावें । अनन्यगतीने राहावें । शरण देवासि ॥२७॥
आणि सत्कार्यी असावें तत्पर । सर्व सोडोनि दुर्व्यवहार । सहजकर्म मिळे पोटभाकर । त्यांतचि सुखें नांदावें ॥२८॥
आपणासीच सुख व्हावें । आणि दुसरे ते ओसरून जावे । ऐसें कधी न मानी जीवें । तोचि भाग्यवंत म्हणावा ॥२९॥
कांही चोरी करोनि भाग्यवंत होती । सर्व लोक तुच्छ भावें हसती । म्हणती भाग्यवंताची गति । त्वरित पडेल दृष्टीला ॥३०॥
मग पाप आणोनि पाडी संकटा । धनभाग्य जातें भलतिया वाटां । पुन्हा राहतो करंटा । कैसा भाग्यवान म्हणावा ? ॥३१॥
कुणाचें भाग्य रात्रींतून येतें । जुगारीं कधी द्रव्य लाभतें । दुसर्या दिनीं पुन्हा धांव घेतें । दरिद्रपण त्याच वाटें ॥३२॥
हा आहे पापाचा आविष्कार । नव्हे नव्हे हे भाग्य थोर । भाग्य तेंचि निरंतर । लोक कीर्ति गाती मागेहि ॥३३॥
भाग्यवंत धनाने नव्हे । भाग्य सत्तेसीहि न म्हणावें । भाग्य सत्कार्यानेच पावे । जीवालागी ॥३४॥
भाग्यवंत श्रीमंत न होय । ऐसे माझें म्हणणें नोहे । परि उत्तम व्यवहारी धनिक राहे । तोचि खरा भाग्यवंत ॥३५॥
एकाची श्रीमंती दुसर्या भूषवी । एकाची श्रीमंती रक्तचि शोषवी । त्यास कैसी द्यावी पदवी । भाग्यवंताची ? ॥३६॥
माती धरितां सोनें होतें । चालत्या काळीं भाग्यचि तें । परि अहंकारें व्यसनें मुकले सेवेतें । झाली शेवटीं दुर्दशा ॥३७॥
म्हणोनि म्हणतों प्रयत्न करा । आपापलें जीवन सुधारा । भाग्यहीन म्हणण्याचा प्रसंग सारा । टाळा मागे ॥३८॥
भाग्यकरितां संकल्प करावे । दृढनिश्चया वाढवीत जावें । तैसेचि प्रयत्न करीत राहावें । आळस सांडोनि ॥३९॥
जेवढा करावा उच्च विचार । तेवढाचि उच्च ठेवावा व्यवहार । त्यानेंच पावतें भाग्य थोर । सकळ योजना साधतां ॥४०॥
केल्यानेच भाग्य फळतें । केल्यानेच स्वर्गसुख मिळतें । केल्यानेच सर्वकांही होतें । मानवाचें ॥४१॥
माणूस बसतां भाग्य झोपतें । चालतां पुढेचि घेई झेप तें । प्रयत्नांचेंचि रूपांतर होतें । भाग्यामाजीं निश्चयाने ॥४२॥
ऐसें बोलले ऋषिजन । संत कवीश्वर अवतार महान । धर्मग्रंथ हेंचि प्रमाण । बोलले लोकीं ॥४३॥
ज्याचें अचानक भाग्य उघडले । त्याचें सुकृत साचत आलें । म्हणोनीच एकाएकी लाभलें । भूषण तया ॥४४॥
जरि त्याने केलेंचि नसतें । तरि तें आज कैसें लाभतें ? देवाने द्वैतभाव केला येथे । ऐसें म्हणणें शोभेना ॥४५॥
एकाएकीच भाग्य लाभतें । म्हणोनि धुंडाळाल कोठे कोणतें । तरि आहे हेंहि जातें । मनुष्यपण हातचें ॥४६॥
तुम्ही म्हणाल मग काय करावें ? आपणहि आता प्रयत्नशील व्हावें । प्रबल इच्छेसि वाढवावें । सदभाग्याच्या ॥४७॥
काळ असेल प्रतिकूल । तरि हळू पडेल पाऊल । परि सत्कार्य वाया न जाईल । केलें तें तें ॥४८॥
तीव्र इच्छेने कार्य केलें । तें आज जरी नाही फळलें । तरी अचानकचि भाग्य उघडलें । वाटेल ऐसें फळ येतां ॥४९॥
श्रोते साशंक झाले हृदयीं । प्रयत्न इच्छिलें फळ देई । ऐसें कथिलें जें जें कांही । म्हणती अजुनीहि पटेना ॥५०॥
प्रयत्नें साधती सर्व उपाय । ऐसा केला जरी निश्चय । तरी कां उपाय करितां अपाय । अनुभवा येती ? ॥५१॥
सर्वचि जगण्याचे करिती प्रयत्न । कोणास वाटे घडावें मरण । येथे पूर्वी तरी केलें साधन । मरणाचें कोणी ? ॥५२॥
लोक जगण्याचाचि प्रयत्न करिती । वैद्य डॉक्टर बोलाविती । तरी कय होते त्यांची स्थिति ? प्राण जाती कितीकांचे ॥५३॥
कोणी बिमार राहे वर्षोगणती । काय बिचार्याची फजीती । नाही करणाराची संगति । अंतकाळीं हाल त्याचे ॥५४॥
त्याने काय बिमार पडावें इच्छिलें । म्हणोनि देवाने तसें केलें ? यांत काय प्रयत्न नाही झाले । त्याच्या हातें स्वहिताचे ? ॥५५॥
तैसेचि कोणी मरण इच्छिती । परि मृत्यु नये वर्षोगणती । सांगा यांत मानवी इच्छेला किती । मान्यता आहे ? ॥५६॥
आम्ही म्हणतों सूत्रधार हरि । त्याच्या हातीं दैवाची दोरी । मानव बाहुलीं कळसूत्री । इच्छाप्रयत्न फोल त्यांचे ॥५७॥
मित्रांनो ! सुंदर तुमचे प्रश्न । यांत मज न वाटे विचित्रपण । हें तों आहे सहज अज्ञान । रुजलें लोकीं ॥५८॥
सुखासाठी करिती धडपड । दु:खीं देव घालिती आड । मूळ न शोधितां बोलती बोजड । सिध्दान्तवाक्यें ॥५९॥
आम्ही पाषाण फेकला वरि । तो चुकोनि पडला मस्तकावरि । येथे गुरुत्वाकर्षण काय करी । आपुल्याकडोनि ? ॥६०॥
वाफ्यांत मिरची-ऊस लाविले । तिखट-गोड फळ नशिबीं आलें । येथे पाण्याने काय केलें ? दिलें फळ जैसें तैसें ॥६१॥
देवभक्ति ऐसी सर्वत्र । परि ती स्वयें न चालवी सूत्र । कर्में फळती पवित्रापवित्र । आपुलींच आपणा ॥६२॥
देवाचेंच हें असतें करणें । तरि लोक कां निर्मिता केविलवाणे ? कशासि लाविता अल्पकाळीं मरणें । जीवप्राण्यासि ? ॥६३॥
हें तों आहे आपुल्याच आधीन । जन्मा येणें आणि मरण । यांत शंका घेण्याचें कारण । मुळीच नाही ॥६४॥
आपणचि इच्छा करितों । म्हणोनिया जन्माला येतों । यांत कोणी कशाला पाठवितो । दुनियेवरी ? ॥६५॥
तैसेंचि आहे मरणाचें । आम्हीं कारण व्हावें बिघडविण्याचें । जेव्हा असह्य होय भोगणें साचें । तेव्हा म्हणावे वाचवा ॥६६॥
चोर चोरीसाठी गेला । आधी विचार नाही केला । संकटीं सापडतां म्हणे बोला । कैसें केलें देवाने ? ॥६७॥
कितीकांचें दुखवावें मन । हिरावूनिया आणावें धन । मग भोग येतां दैवावरून । बोल द्यावा देवासि ॥६८॥
माणसाला मरावें ऐसें न वाटे । परि मरणाऐसें केलें ओखटें । पुढे आसक्तीने म्हणे मोठें । देवा ! संकट ओढवलें ॥६९॥
मरणाऐसें करावें आचरण । सोडोनिया तारतम्यज्ञान । मग भोग येतां म्हणावें नको मरण । कैसें कोण मानील ? ॥७०॥
हें म्हणणें कांही इच्छा नोहे । इच्छेसाठी मार्ग आहे । तो वेळेवरीच करतां नये । त्यासि पाहिजे अभ्यास ॥७१॥
जन्मणेंहि इच्छेने होतें । परि त्यासि गर्भधारणा लागते । अंतरीचें प्रगट करावया तेथे । वेळ लागे तैसाच ॥७२॥
अग्नि देवोनि लोखंड तापवावें । आणि लगेच म्हणे थंड व्हावें । ऐसें कैसें घडेल स्वभावें । एकाएकी ? ॥७३॥
जीव कर्म करितां स्वतंत्र । त्याचा भोग भोगतां परतंत्र । केलें त्याचें फळ येणार । इच्छेचाचि परिपाक तो ॥७४॥
सर्वासचि वाटे कधी न मरावें । सर्वांसचि वाटे राजे व्हावे । परि इच्छा क्रियामार्गे न धावे । अचूकतेने तीव्रपणें ॥७५॥
तेणें भोगावा लागे नको तो भोग । जो पूर्वी घडला कार्य भाग । इच्छेनि व्यसनी होतां झाला क्षयरोग । जगणें मग साधेना ॥७६॥
म्हणोनि सांगतों जें जें होतें । तें इच्छाबळेंच प्रत्यया येतें । यासि कर्महि पाहिजे इच्छेपुरतें । तरीच साधतें कार्य पुढे ॥७७॥
एक इच्छा असते चंचल । तींत होतो नेहमी बदल । एक इच्छा असे निश्चल । जी कर्म करोनीच प्रकट होय ॥७८॥
कधी इच्छा इच्छेने प्रकट नोहे । ती कर्मानेच दिसों पाहे । नाही म्हणोनिया काय होय ? प्रत्यक्ष दिसे कार्यावरि ॥७९॥
बादशहा मी गरीब बोलला । तरी ओळखती लोकचि त्याला । तो लपल्याने न जाय लपाला । ढगाआड सूर्य जैसा ॥८०॥
तैसी इच्छा परिपाकासि आली । आतां वृत्ति फळासि भ्याली । मग ऐनवेळीं दुजी इच्छा केली । न टळे फळ मृत्यूचें ॥८१॥
कित्येकांची प्रमाणें दिसती । मृत्यु आपणचि प्रकट करिती । दिवस क्षण वेळा सांगती । येणार्या फळाची ॥८२॥
त्यांची आसक्ति देहांतूनि सुटली । म्हणोनि स्थिति प्रकट झाली । कित्येकांनी दुसर्यांचींहि कथिलीं । परिपक्व फळें ॥८३॥
विचारी पुरुष जे जाणते । फळ भोगाया होती सज्ज ते । आधीच वृत्ति अविचारपंथें । जाऊं न देती ॥८४॥
अविचारी ते कुमार्गे जाती । फळ भोगतां तळमळती । अति होतां भलतीच घेती । विकृति मनीं वेडयाऐसी ॥८५॥
आसक्तिकांची विकृति वाढली । देहबध्द वृत्ति भांबावली । दु:ख न सोसूनि धांव घाली । इच्छा त्याची मृत्यूकडे ॥८६॥
मागील कुकर्म असह्य झालें । म्हणोनि जीव द्याया धावले । आतां मृत्यु येईल तरीच भलें । वाटे तयांसि ॥८७॥
खरोखर मरणें एक स्वप्न । शरीरपरिवर्तनाचें विरामस्थान । परि केलेल्या पापपुण्याचें निवारण । तेणें नव्हे ॥८८॥
जैसा कपडा अंगींचा बदलावा । नवीन अंगावरि ओढोनि घ्यावा । तैसाचि जीव मरणीं समजावा । शरीर बदली इच्छेने ॥८९॥
कधी ती इच्छा प्रकट ना कळे । प्रकट इच्छा त्वरित ना फळे । येथेचि विचारीहि गोंधळे । निवाडा करितां ॥९०॥
इच्छेने घेतलें तलम वस्त्र । मग तें टिको म्हणे वर्ष सहस्त्र । ऐशा इच्छा होवोत मिश्र । परि भोगणें लागे आधीचें ॥९१॥
एकदा इच्छेने बसल्या घोडयावरि । चाबुक मारतां हौस पुरी । मग घाबरोनि म्हणे देवा ! आवरी । सत्वरि आता ॥९२॥
एकदा हातूनि गेला बाण । मग इच्छेऐसा नये परतून । पहिलें इच्छाकर्म गतिमान । भोगावेंचि लागे ॥९३॥
नुसती इच्छा उपयोगी नाही । ती संस्कार बनूनि कर्मपण घेई । नवी इच्छाहि याच क्रमें येई । फळासि पुढे ॥९४॥
मन बुध्दि चित्त अहंकार । पांचवें अंत:करण आधार । यांत दृढ होय इच्छासंस्कार । चाले व्यवहार त्यायोगें ॥९५॥
यांचे पालटतील संस्कार । तरीच सुखाचा होय व्यापार । एरव्ही इच्छा क्षणभंगुर । उपयोगी नये तत्काळ ॥९६॥
इच्छासंस्कार कर्तव्यसंस्कार । यांचा संग्रह पूर्वापार । तेंचि संचित असे थोर । पापपुण्यरूप ॥९७॥
त्यांतून जें भोगायासि आलें । तेंचि प्रारब्ध बोललें । तें भोगणें प्राप्तचि झालें । न चुके सहजीं ॥९८॥
तें भोगतां केली नवी धडपड । इच्छा आणि यत्न प्रचंड । तें क्रियमाण देई संचिता जोड । लाभेल पुढे फळ त्याचें ॥९९॥
ऐसें चाललें रहाटचक्र । या नांव जीवनाचा व्यापार । जन्ममरण, सुखदु:ख, व्यवहार । खेळ इच्छा-प्रयत्नाचा ॥१००॥
हें जाणोनि प्रयत्नासि लागा । याविण भाग्याचा भ्रम वाउगा । संत उपदेश देती जगा । क्रियमाण सुधारा म्हणोनि ॥१०१॥
क्रियेवीण मार्गचि नाही । कर्तव्य नरा देवपद देई । तुकडया म्हणे बना निश्चयी । प्रयत्नवादी ॥१०२॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । प्रारब्ध-विचार कथिला येथ । चौतिसावा अध्याय संपूर्ण ॥१०३॥
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
********************
ग्रामगीता अध्याय पस्तिसावा
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
मागील अध्यायीं निरुपण । इच्छा-प्रयत्नें गुंफलें जीवन । हानि लाभ जन्ममरण । त्यावाचून नसे कांही ॥१॥
आजची असो वा पूर्वीची । आपुलीच इच्छा बर्यावाईटाची । आपणा सुख दे अथवा जाची । हें निर्विवाद ॥२॥
जें झालें तें होऊनि गेलें । आता पुढे पाहिजे सूधारलें । इच्छा-कर्तव्यें लाभती फलें । सर्व कांही ॥३॥
यावरि श्रोत्याने प्रश्न केला । आपण इच्छा-कर्तव्याला मान दिला । परि अचानक मृत्यु घडतो त्याला । कोणती इच्छा सांगाना ? ॥४॥
कोणी अकस्मातचि मेले । थोडेहि बिमार नाही पडले । छातीमाजीं कळ आली वाटलें । तैसेचि गेले मृत्युमुखीं ॥५॥
कोणीं एकाएकी विहिरींत पडला । अथवा रानीं व्याघ्राने भक्षिला । तो काय त्या प्रसंगाला । इच्छीत होता त्या पूर्वी ? ॥६॥
कोणास मार्गात मारोनि टाकिती । कोणी ठोकर लागतां मरती । त्यांची काय ती इच्छा होती ? अथवा कर्तव्य ? ॥७॥
अहो ! हो देवा-दैवाची लीला । ठावी असोनि आपणाला । आम्हांसि लावाया कार्याला । सांगतां भलतें ॥८॥
मित्रा ! ऐसा न धरी भ्रम । सत्यचि आहे कथिलें तें वर्म । इच्छा-प्रयत्नेंचि देव-काल-कर्म । देती फळें ॥९॥
मीं तर आधीच सांगितलें । अचानक कर्तृत्व नाही दिसलें । परि पूर्वी तेंचि कार्य असेल घडलें । आघाताचें ॥१०॥
करतेवेळीं कळलें नाही । प्रसंग येतां वाटलें कांही । परि दैवावरि भार देवोनि राही । मोकळा बिचारा ॥११॥
जैसें, धन संग्रहीं न करता । तरि चोर कासयासि मारता ? पाहोनिया वाट चालता । तरि ठोकर कैसी लागती ? ॥१२॥
देह, स्थान, संग निवडोनि । आधीच घेता उत्तमपणीं । आहारविहार करिता समजोनि । तरि दु:खी होता कैसा तो ? ॥१३॥
अविवेक, क्रूरता, गर्व, बेहोशी । लागलीं मृत्यूच्या मार्गासि । निमित्त केलें व्याघ्रादिकांसि । परि तो प्रयत्न आपुलाचि ॥१४॥
आणि अचानक दिसे घडलें । तें तरी देहावरीच पडलें । जन्मचि न घेतां कोठलें । संकट त्यासि ? ॥१५॥
जन्म हाचि इच्छेचा खेळ । जगीं अनेक इच्छांचा मेळ । तेथे संघर्ष असे अटळ । सुखदु:खफळ कर्माचें ॥१६॥
येथे दैव मारतें, देव मारितो । काय म्हणून आम्हीं म्हणतों ? आम्हीं काय कुणाचें खातों ? सांगा मज ॥१७॥
देवदैव आपुल्याने करी । तरि दोष लागेल देवावरि । तैसी नाहीच देवाची कामगिरी । दु:ख देणें मानवासि ॥१८॥
आपणचि मार्ग चुकतों । इच्छेने संगतीने वाया जातों । मग कैसें झालें म्हणतों । एकाएकी फळ येतां ॥१९॥
तेथे जबाबदार धरतों दैव । अथवा म्हणतों देवाची माव । नाहीतरि ग्रहगोलांचा प्रभाव । समजतों शुभाशुभ ॥२०॥
कोणी करिती ग्रहशांति । वाचती पोथी गिर्हे बांधती । परंतु दुराग्रह बसला चित्तीं । तो न काढिती भ्रांतीचा ॥२१॥
नक्षत्रांचा सृष्टीवरि प्रभाव । परि ते निमित्तमात्रचि सर्व । आपुल्याचि शुभाशुभ कर्मांची ठेव । फळा येई त्या त्या वेळीं ॥२२॥
आपण बरें-वाईट बीं पेरलें । तें त्या त्या ऋतूंत उदया आलें । येथे कालाने काय केलें ? साह्य दिलें उदय होण्या ॥२३॥
परि नारळीस न येती रुई-फळें । पेरिलें तेंचि उगवतें बळें । त्यासि फक्त साह्यचि दिलें जळें । तैसा देव साह्यकारी ॥२४॥
तो स्वत: कांही न करी । ज्याचें त्यास देई निर्धारी । प्राप्त काळघडी सारी । निमित्तमात्र करोनि ॥२५॥
काळ चाले आपुल्या गतीं । ईश्वर व्यापक सम स्थितीं । कर्मे आपचि फळा येती । सृष्टिनियमें आपुलीं ॥२६॥
कर्म करायाची स्वतंत्रता । ही जीवाहातीं महान सत्ता । आपुल्या दैवाचा विधाता । आपणचि आहे ॥२७॥
ग्रहगोलांचा अनिष्ट प्रभाव । न पडावा म्हणोनि शोधिले उपाव । यांतहि कर्तबगार मानव । सिध्दिचि असे ॥२८॥
उपासनेद्वारें मानसिक शक्ति । वाढतां दु:खींहि सुखाची प्राप्ति । ही ईश्वरी कृपाहि असे हातीं । जीवाच्याचि ॥२९॥
मित्रा ! हें विसरूं नको आता । आपणचि सर्व कर्ताहर्ता । यांत देव-दैवाची वार्ता । आपणचि केली ॥३०॥
ऐसें धरूनि राहा जीवीं । शुध्द कर्मे करीत जावीं । तरीच गति पावे बरवी । पुढे पुढे ॥३१॥
असो निसर्ग वा योगायोग । असो प्रारब्धाचाहि भोग । उत्तम प्रयत्नें त्यांचाहि ओघ । वळवितां येई ॥३२॥
तैसी नसती जरि शक्यता । जीव सर्वस्वीं पराधीन असता । तरि शास्त्र कोण देते हातां । नाना उपाय सांगोनि ? ॥३३॥
धर्मे वाग, सत्य वद । ऐसा कां सांगता वेद ? । सारेचि होतील विधिनिषेध । अनाठायीं मग ॥३४॥
पडोनि दैवादिकांच्या प्रवाहीं । जीव अधिकचि बुडेल डोहीं । निघायासि मार्गचि नाही । उरला मग, ऐसें होतां ॥३५॥
परंतु मिथ्या हा विचार । जीवास असे कर्मस्वातंत्र्य । प्रयत्न करतां होतो उध्दार । आपुला शत्रुमित्र आपणचि ॥३६॥
वाईट चिंतितां वाईट होतें । जें जें साधूं तें साधतें । मग कां न घ्यावें थोरपण येथे । सदगुण सारे शिकोनि ? ॥३७॥
यावरि श्रोता म्हणे ऐका । माझी अजूनि आहे शंका । जगीं धडपडती सर्वचि सर्वचि सुखा । परि एक एका न मिळे ॥३८॥
बरें करतांहि ब्रह्महत्त्या । लागे कित्येकांच्या माथां । कित्येकां जन्मभरि टाळ कुटतां । ताल तोहि न साधे ॥३९॥
याचें काय आहे कारण ? काय नाही केला प्रयत्न ? उलट सुखी असती पापें करून । कित्येक लोक ॥४०॥
याचें ऐका समाधान । लोक दिसती भिन्न भिन्न । परि त्यासि कारण त्यांचेच प्रयत्न । वेगळाले ॥४१॥
भिन्न संस्कारें भरले लोक । म्हणोनि न मिळती एकासि एक । कोणी जन्मतांचि गुणी सुरेख । ताल न जन्मीं साधे कोणा ॥४२॥
संस्कारचि हे नान तर्हांचे । कांही गायनाचे कांही विद्वत्तेचे । कांही चित्रकलेचे, धाडसाचे । चातुर्याचे कित्येक ॥४३॥
कांही धनाचे कांही मानाचे । कांही अध्यात्म आणि भक्तीचे । कांही असती कार्यशक्तीचे । संस्कार नाना ॥४४॥
ज्या प्राण्याने जो यत्न केला । तो संस्कार त्याच्या वाटयासि आला । म्हणोनि सर्वचि सर्वाला । येतां दिसेना ॥४५॥
एकास मिळे संपत्ति । परि अक्कल नाही त्यासि पुरती । एकास विद्वत्ता पिसे अति । परि खाया पुरेना ॥४६॥
एक अतीच धाडसी दिसतो । परि बुध्दीने शून्यचि भासतो । म्हणोनि जीवनांत तो ठरतो । वेडा अथवा गुंड जैसा ॥४७॥
एक शब्दसृष्टि उभी करितो । एक गायनें जग डोलवितो । एक अदभुत वाद्यें वाजवितो । लहानपणीं ॥४८॥
एक ध्यान करण्यांत प्रवीण । एका भक्तीचेंचि अवधान । एकास विश्वज्ञान आत्मज्ञान । लहानपणीं ॥४९॥
याचें एकचि कारण । ज्याने जें कर्तव्य केलें समजोन । तेचि त्याचे संस्कार पूर्ण । पावले तया पूर्वीचे ॥५०॥
इच्छा-संस्कार कर्तव्य-संस्कार । यांचेंच हें रूपान्तर । ज्याने केला जो व्यवहार । तोच फळला यत्नें त्यासि ॥५१॥
प्रयत्नशील त्यासीच म्हणावें । इच्छेंत तेंच चिंतनीं असावें । हातांनी कार्य तेंचि घडावें । सर्वकाळ ॥५२॥
मनीं वसे तें ध्यानीं दिसे । ध्यानीं ठसे तेंचि स्थानी भासे । तैसेंचि कर्तव्य इच्छाउल्हासें । उमटों लागे जीवनीं ॥५३॥
या सर्वांचा मेळ झाला । तरीच यश प्रयत्नाला । नाहीतरि अवघा गलबला । एक मिळेना एकाशीं ॥५४॥
याचा अनुक्रम ऐसा आहे । प्रथम मनीं संकल्प राहे । संकल्प दृढ होतां निश्चय । सत्कार्याचें रूप घेई ॥५५॥
कुणाचे संकल्प अवधी न लाविती । त्यांची तैसीच असते प्रकृति । कांही संस्कार मागील असती । कांही लाभती मातापित्याचे ॥५६॥
ऐसे संग्रहित होत जाती । त्यांची पुढे पुढे होई प्रगति । तैसी तैसी लाभे गति । बर्यावाईट फळांची ॥५७॥
पूर्वी केले उत्तम यत्न । म्हणोनि हातीं आलें रत्न । वाईट वर्तनाने पुढे पतन । फळा येईल आपैसें ॥५८॥
पूर्वीची कमाई भोगली । पुढे सुकृत-जोड नाही केली । त्यासि भोगावी लागली । राज्याअंतीं नर्कगति ॥५९॥
पूर्वी कांही पुण्य घडलें । म्हणोनि सुख वाटयासि आलें । परि पाप करतां येतील घाले । निश्चयाने या पुढती ॥६०॥
पुण्यवंता आज कष्ट । याचें कारण आहे स्पष्ट । एका संस्कारें तो पुण्यनिष्ठ । परि दुसरा फळला दु:खरूपें ॥६१॥
प्रयत्न सर्वांगीण आदर्श । सर्वचि संस्कारांचा उत्कर्ष । ऐसें न होय म्हणोनि पुरुष । विचित्र फळें भोगिती ॥६२॥
तुकाराम आणि एकनाथ । दोघें सारखेचि अधिकारी संत । परि एका त्रास एक धनवंत । फळें हीं भिन्न संस्कारें ॥६३॥
सकाळीं उठण्याचें फळ निराळें । अभ्यासाचें फळचि वेगळें । उत्तम राहणीचें फळ आगळें । झाकवितां झाकेना ॥६४॥
चित्तशुध्दीचें वेगळें फळ । दानादिकांचें भिन्न सकळ । ज्ञान-साधनाचें फळ प्रांजळ । नाही मेळ एक-एका ॥६५॥
उत्तम कार्या फळ उत्तम । परि दुसरें एक वाईट कर्म । म्हणोनि फळ लाभे अधम । मागे-पुढे याचें त्याचें ॥६६॥
कल्याणकर्म केलें जेवढें । तें कधीतरी फळेल मागेपुढे । हा सिध्दान्त व्यर्थ न घडे । कदाकाळीं ॥६७॥
म्हणोनि उपकार नाही फळले । पुण्य करितां अपकार झाले । हें म्हणणेंचि नाही शोभलें । शहाण्या जना ॥६८॥
फळ वेगळेंचि आज दिसतें । परि आलें कैसें धुंडितां तें । सहज कळेल, प्रयत्नचि होते । मागे केले ॥६९॥
उपकरपुण्य संग्रहीं पडलें । अपकाररूपें पूर्वपाप फळलें । ऐसा मिश्र व्यवहार चाले । ओळखूं येना ॥७०॥
कोणत्या कर्माचें कोणतें फळ । हें जाणतां येना तत्काळ । तेणें चित्तीं होय गोंधळ । वाढूं लागे कुशंका ॥७१॥
प्रत्येक कर्माचें वेगळें फळ । परि जाणताचि लावी मोल सकळ । प्रयत्न-फळांची गुंतवळ । उकलेना सहजपणें ॥७२॥
उत्तमगाण्याचें फळ खाद्य नोहे । परि त्याहूनि त्यांत सुख आहे । हें कैसें कळेल ? जोंवरि रुचि नये । गायनाची ॥७३॥
उपकार-सेवेंत आत्मसमाधान । हें फळचि असे महान । तेथे कां इच्छावें बक्षीस अन्य । सज्जनांनी ? ॥७४॥
आपुले प्रयत्नचि सरस करावे । केले तरी करीतचि राहावें । थोडें उणें होऊं न द्यावें । प्रयत्नामध्ये ॥७५॥
क्षण एक चुकीं न द्यावें । प्रयत्नासि दूरदृष्टीने जपावें । प्रयत्नहि सर्वांगीण व्हावे । सर्व सुखें भोगावया ॥७६॥
एरव्ही प्रयत्नाशिवाय कोणीच नाही । प्रयत्न होती सर्वदाहि । परि दु:खचि देती प्रयत्न कांही । जीवजना ॥७७॥
कांही प्रयत्न नांवलौकिका नेती । कांही प्रयत्नें होय फजीती । कांही प्रयत्न प्राणचि घेती । आपुले आणि परक्यांचे ॥७८॥
म्हणोनि प्रयत्न करावे चांगले । कर्त्या सज्जना पाहिजे पुसलें । लोभप्रतिष्ठेसि जे नाही भाळले । तेचि खरे प्रयत्नशील ॥७९॥
कांही प्रयत्न उलटे घडती । त्यांचीं फळें मरणतुल्य येती । कांही प्रयत्न प्रांजळ होती । तेणें पावती उत्तम जन्म ॥८०॥
मरणासीहि प्रयत्नचि कारण । जन्मण्यासहि प्रयत्नचि प्रमाण । भोग-सुख-दु:खांचें निधान । प्रयत्नचि ॥८१॥
कांही प्रयत्न योजनारूप होती । त्यांनी कीर्तिपळें लाभती । कांही प्रयत्नीं शिकस्त करिती । मुक्ति पावती साक्षात्कारें ॥८२॥
कांही प्रयत्न संचितीं पडती। प्रारब्ध भोगतां जे जे घडती । नाही मुळीच उपभोगाची वृत्ति । त्यांचे प्रयत्न कळसाचे ॥८३॥
त्यांचे प्रयत्न शुभप्रारब्ध झाले । दोन्ही मिळोनि देवपणासि आले । आपण आपणांत मिळाले । साक्षात्कारें आत्मत्वें ॥८४॥
मित्रा ! म्हणोनि प्रयत्नशील व्हावें । प्रारब्धाचें थोरपण न मानावें । कर्तव्याने चमकून उठावें । भूमंडळीं उत्साहें ॥८५॥
अमका प्रारब्धें श्रीमंत झाला । अमका पुण्य करितां दैवें गिळिला । अमका देव देव म्हणतां तरला । प्रयत्नाविण ॥८६॥
हें तों म्हणणें अज्ञानाचें । पुन्हा करूं नको उच्चार वाचें । सुप्रयत्नासि फळ सौख्याचें । निश्चयें आहे ॥८७॥
दुसर्याचें फळ पाहोनि झुरावें । आपण कांहीच न करावें । हें तों लक्षण आहे बरवें । अधोगतीचें आपुल्या ॥८८॥
आमुचें पूर्वसुकृत नाही बळी । म्हणोनि हात ठेवावा कपाळीं । हें तों आमुच्याने कधीकाळीं । घडोंचि नये ॥८९॥
नाही तेंचि आता कमावूं । आहे तें तें अधिक वाढवूं । इच्छा फलद्रूप करोनि घेऊं । हाचि करावा निर्धार ॥९०॥
याच निर्धारें वाल्या कोळी । पुण्यश्लोक झाला भूमंडळीं । संत योगी वीर बळी । गाजले मानव-इतिहासीं ॥९१॥
वेश्यागामी बिल्वमंगल । यत्नें झाला सूरदास निर्मल । आपणासह महीमंडल । केलें पावन भजनाने ॥९२॥
हेंचि शिकावें सत्संगतीने । यानेचि मानव होती शहाणे । भाग्य उजळेल सूर्याप्रमाणें । उद्योगशील झालिया ॥९३॥
प्रत्येक उद्योगा फळ पावे । शेतकर्यासि हितगुज पुसावें । प्रयत्नें एक बीज लावावें । फळ पावावें कणसापरी ॥९४॥
प्रयत्नविण स्वयंपाक झाला । प्रयत्नाविण घास मुखीं गेला । प्रारब्धानेच व्यवहार चालला । ऐसें कोण सांगो शके ? ॥९५॥
पटवावया प्रारब्धवाद । त्यासहि लागे प्रयत्न सिध्द । विमान, दूरध्वनि आदि शोध । लाविले काय प्रारब्धें ? ॥९६॥
उघड आहे प्रयत्नाची थोरी । प्रयत्नापुढे प्रारब्ध ताण करी । हें म्हणणेंचि अपुरें सर्वतोपरीं । दूरदृष्टीने पाहतां ॥९७॥
मुख्य असे प्रयत्नचि केवळ । प्रारब्ध हेंहि प्रयत्नाचें फळ । वृक्षावांचोनि झालें फळमूळ । कोण म्हणे ? ॥९८॥
प्रयत्न सोडोनि प्रारब्ध धरलें । तरि ते प्राणी दोघांतूनि गेले । नाही प्रयत्नहि पूर्ण केले । प्रारब्ध पळालें दूरदेशीं ॥९९॥
कोणी एक झाड लावलें । दिवसेंदिवस सुकतचि गेलें । त्याचेकडे दुर्लक्ष केलें । कोणी एकीं ॥१००॥
लोक म्हणती आयुष्य सरलें । कोणी म्हणती किडयांनी ग्रासलें । कोणी म्हणती त्याचें प्रारब्ध आलें । मरणस्थानीं ॥१०१॥
कोणी म्हणती येथे झाड जगेना । कोणी म्हणती चुकूं द्या यातना । कोणी म्हणती काय आपणा- । हातीं आहे ? ॥१०२॥
अरे ! हें सर्वचि आहे खरें । परि प्रयत्न करोनि पहा बरें । झाड जगतें की ऐसेंचि मरे । प्रयत्न केलिया ? ॥१०३॥
म्हणोनि त्यास खत घातलें । तारतम्य ठेवोनि सांभाळिलें । पाणी देवोनि वाचविलें । मूळडाळ सर्वचि ॥१०४॥
पुढे पुढे झाड फुललें । पुष्पींफळीं बहरोनि आलें । प्रयत्न केल्यानेचि झालें । आहेना हें प्रत्यक्ष ? ॥१०५॥
कलमें करोनि नानापरीं । फुलें आणिलीं बहुप्रकारीं । हात ठेवितां कपाळावरि । ऐसें कधी होईल का ? ॥१०६॥
तैसेंचि मानवाचें जीवन । उन्नत व्हावया हवा प्रयत्न । अपमृत्यु आदि धोके दारूण । टळती संशोधन केलिया ॥१०७॥
मानव सृष्टीहूनि थोर । तो ईश्वराचा अंशावतार । अचूक प्रयत्न दैवी हत्यार । निर्मू शके प्रतिसृष्टि ॥१०८॥
म्हणोनि सांगतों प्रयत्न करा । विचारशक्ति प्रयत्नांत भरा । शिका शिकवा, प्रयत्न सारा । व्यापूं द्या गांवोगांवीं ॥१०९॥
ज्या ज्या राष्ट्रांनी ऐसें केलें । त्यांचें वैभव शिगेस गेलें । जीवनमान आदि वाढलें । इच्छेसारिखें तयांचें ॥११०॥
प्रारब्धवादी शिथील झाला । प्रयत्नवादी चेतना पावला । शोध करीत पुढे गेला । दिगंतरीं ॥१११॥
केलें मंगळावरि उड्डाण । चढला हिमगिरिशिखरीं पूर्ण । शोधिलें अग्निअस्त्र अणुअस्त्र महान । हैड्रोजनादि ॥११२॥
ऐकती करोडो मैलांवरून । परस्परांचें गायन-भाषण । विश्व हें आटोक्यांत आणून । घर केलें राहण्याचें ॥११३॥
प्रयत्नाची शिकस्त झाली । अजूनिहि जागा आहे उरली । धाव कधीच नाहीं संपलीं । प्रयत्नशीलांची ॥११४॥
प्रयत्नें देवपण पावला भक्त । प्रयत्नें योगी झाला जीवन्मुक्त । प्रयत्नें बध्द झाला निरासक्त । विषयामाजीं ॥११५॥
प्रयत्नें गांव झाला आदर्श । प्रयत्नें सुखी होय स्वदेश । प्रयत्नें विश्वशांतीचे सायास । सफल होती ॥११६॥
यासाठी प्रयत्न करावे आपण । मिरवावें देवाचें थोरपण । अंगां येईल अहंकार म्हणोन । देव मध्यस्थीं घालावा ॥११७॥
प्रयत्नें राज्य समृध्द करावें । प्रयत्नें भूमंडल डोलवावें । प्रयत्नेंचि दासपण शोभवावें । कार्यप्रभावें ॥११८॥
प्रयत्नें मानव होई उन्नत । गांवचि नव्हे, हालवी दिक्प्रांत । ही अनुभवाची मात । विसरूं नका तुकडया म्हणे ॥११९॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । कथिला प्रयत्नवाद समर्थ । पस्तिसावा अध्याय संपूर्ण ॥१२०॥
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
********************
ग्रामगीता अध्याय छत्तिसावा
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
ईश्वर-अंश सर्व जीव । यत्न तोचि जणावा देव । ऐसें वदती संतग्रंथ, मानव । सर्वचि नित्य ॥१॥
परंतु पाहतां जगाकडे । दिसती प्रकृति-भेदाचे पोवाडे । व्यक्ति तितक्या प्रकृतींचे पाढे । ठायीं ठायीं ॥२॥
वाटे ही निसर्गाचीच रचना । तेथे ठाव नाही प्रयत्ना । ऐसी धारणा बसली मनां । श्रोतियांच्या ॥३॥
म्हणोनि करूं निरूपण । ऐका ऐका श्रोतेजन ! प्रकृति ठायीं ठायीं दिसे भिन्न । परि ती स्वतंत्र म्हणों नये ॥४॥
प्रकृति पुरुषाच्या आधीन । त्याच्या इशारें करी नर्तन । बहु होण्याचा संकल्प पूर्ण । तीच भिन्न प्रकृति ही ॥५॥
परम पुरुष जो परमात्मा । त्याच्या शक्तीसि नाही सीमा । मानव त्याचीच प्रतिमा । अंशरूप निश्चयें ॥६॥
म्हणोनि जीवांत सामर्थ्य अनंत । अभ्यासाने प्रकटे निवांत । नलगे आत्मशक्तीचा अंत । कोणासहि ॥७॥
सर्व होतें केलें असतां । सर्व मिळतें धरितां हातां । अभ्यासें तंव ब्रह्मसत्ता । पावती योगी ॥८॥
आणि अभ्यासाच्याचि बळें । भिन्न मार्गीं वाढले जीव सगळे । जैसी श्रध्दा तैसीं फळें । श्रध्दामय पुरुष म्हणोनि ॥९॥
जैसी श्रध्दा जैसा संकल्प । जैसा यत्न पुण्यपापरूप । तैसाचि जीव होई आपोआप । अभ्यासाने तयार ॥१०॥
नैसर्गिक दिसे प्रकृति-भेद । तो पूर्व अभ्यासानेच सिध्द । मुळीं एक परि कलांनी विविध । जाहले जीव ॥११॥
पूर्व जन्मींची अभ्यासकला । तैसा या जन्मींचा यत्न आपुला । यांनीच भिन्नत्व आणिलें जीवाला । नानापरी ॥१२॥
आपुली आपणा कला फळली । म्हणोनि प्रकृति भिन्न झाली । येथे निसर्गावरि बोली । देवोंचि नये ॥१३॥
देवाने निर्मिली ही क्षिती । जिच्या पोटीं अनंत जीव होती । न करवे तयांची गणती । गणित-मार्गाने ॥१४॥
निसर्गत: लाभलें सारखें जीवन । परि कलेने भरलें भिन्नपण । एक-एकशी मिळते गुण । क्वचितचि आढळती ॥१५॥
एकचि वस्तु विश्वीं संचली । परि प्रकृतिगुणें भिन्न भासली । रचना बोली निराळी झाली । कला केली जीवांनी ॥१६॥
प्रत्येक जीवचि अवतार पाही । परि कोठे कांही कोठे कांही । एक आहे एक नाही । ऐसें वैशिष्टय सर्वत्र ॥१७॥
प्रत्येक जीव आपुल्यापरी । कलापूर्णतेने खेळे भूमीवरि । एक-एकाची स्वभाव-कुसरी । दुसरा पाहतां दिसेना ॥१८॥
सृष्टींत खेळती जे जीव । पहा तयांचें लीलालाघव । अंग-अंग अभिनव । नाना तर्हा तयांच्या ॥१९॥
नाना कला नाना रंग । नाना स्वभाव नाना उद्योग । नाना वस्त्रें, भूषणें, उपभोग । भोगणारे निर्मिले ॥२०॥
निसर्ग नानापरी नटला । तो भिन्न जीवांच्या वाटयासि आला । प्रकृतीकडोनि साथ मिळाला। जीवाचिया कलेऐसा ॥२१॥
जीवांत नखशिखान्त भरली कला । गुणावगुणांचा मेळा झाला । इंद्रियें भोगती वस्तूला । आपुलाल्या भिन्न भावें ॥२२॥
जीव आपणचि संकल्प करी । कल्पोनि आरोप वस्तूवरि । मग तदाकार होवोनि व्यवहारीं । रागद्वेष पाहतसे ॥२३॥
ईश्वरनिर्मित एकचि सृष्टि । परि पाहणाराची भिन्न दृष्टि । आपुल्या भावें सुखी-कष्टी । होय व्यष्टि-समष्टीने ॥२४॥
ईश्वरनिर्मित स्त्रीरूप सत्ता । ती कुणाची माता कुणाची कांता । आपुल्या भावें सुखदु:खभिन्नता । भोगी जीव ॥२५॥
एकाच निसर्गसृष्टीवरि । जीव आपली सृष्टि करी । तैसेंचि सुखदु:ख भिन्न अंतरीं । अनुभवा येई ॥२६॥
रागद्वेषादि दृढ विकार । ऐकिलें भोगिलें त्यांचे संस्कार । हे घेवोनि जन्मती पुन्हा नर । आपापल्या कलेसह ॥२७॥
पूर्व अभ्यास, प्रयत्न, संकल्प । त्यापरी लाभे वेगळें रूप । जीवांच्या अनंत कलांचा गोफ । ती ही सृष्टि ॥२८॥
बहु व्हावें हा ईश्वरी संकल्प । जीवांद्वारें घेई रूप । म्हणोनि दुजियांची ओढ आपोआप । जीवाअंगीं ॥२९॥
एका जीवाचा भिन्न संकल्प । दुसर्या जीवाचा निराळा व्याप । परि प्रबल शक्तीचा कार्यकलाप । ओढोनि नेतो दुसर्यासि ॥३०॥
एकाहूनि दुसरा कलाधिकारी । अधिक टाकी मोहनी समाजावरि । आपुले मंत्र साजवी मधुरी । वाणी-वीणा वाजवोनि ॥३१॥
कोणी कल्पिली गायनकला । वाद्यकला चित्रकला तंतुकला । शब्दकला नृत्य शृंगारकला । मोहावया अन्य जीवांसि ॥३२॥
राहणें कला पाहणें कला । बोलणें कला हसणें कला । सर्वांमाजीं सौंदर्य-कला । ओतप्रोत दर्शवी ॥३३॥
कुणाचे मंजुळ बोल गोजिरवाणे । कुणाचें व्याघ्रापरी गर्जणें । रणकर्कशता जीवीं बाणे । कलंकशोभा कोणाची ॥३४॥
कुणास पाहोनि मोह वाटे । कुणास पाहतां येती कांटे । कुणाचे देखतां मुखवटे । छाती फाटे धीरांची ॥३५॥
कुणाची गंभीर मुद्रा सजली । वैराग्य येतें दृष्टीच पडली । कुणाकडे पाहतां वृत्ति गेली । विषय-वाटेने ॥३६॥
कुणास पाहतां चीड दाटे । कुणाचा संग सोडतां न सुटे । जीवभाव ओवाळावा वाटे । चरणीं तयाच्या ॥३७॥
हा सर्व निसर्गचमत्कार नोहे । प्रत्येक कलेचें सामर्थ्य आहे । प्रयत्नशील मानवचि राहे । परि देव म्हणती तयासि ॥३८॥
कृष्णाचाचि मामा कंस । परि एक देव एक राक्षस । मुळीं पाहतां एकचि वंश । परि भेद केला कलांनी ॥३९॥
कला मानवासि देव बनविते । परि अवकळा नसावी जरा तेथे । पूर्णताहि कलेनेच येते । रमतां अंगीं आत्मबोध ॥४०॥
अवकलेने छी:थू: होते । कला येतां देवत्व लाभतें । जैसा प्रयत्न करावा तयातें । फळ येतें याच देहीं ॥४१॥
विश्वामित्रें केली कला । राजर्षीचा ब्रह्मर्षि झाला । ब्रह्मवंशीय रावण राक्षस ठरला । मेला आपुल्या कलेने ॥४२॥
रावणें कला संपादिली । देवदेवता प्रसन्न केली । आपुली शक्ति वाढवोनि घेतली । कलाकुसरीने ॥४३॥
परि ती पचवितां नाही आली । उपभोगाची भावना झाली । म्हणोनि कला अवकळा पावली । अहंकारें ॥४४॥
कुंभकर्णें सुखमार्ग धरिला । आहारनिद्रेची वाढविली कला । क्रूरपणाचा खेळचि झाला । नाश पावला सर्वासह ॥४५॥
तोचि बिभीषण कला शिकला । रामनामीं रंगोनि गेला । राम धांवोनि घरीं आला । सौख्य दिलें अंतर्बाह्य ॥४६॥
दिलें लंकेचें राज्य हातीं । परि नाही उपभोगाची प्रीति । म्हणोनीच आजवरि कीर्ति । अमर तया सज्जनाची ॥४७॥
कलेचे ऐसे तीन प्रकार । राजस, तामस, सात्विक सुंदर । जो जयासि सजवी चतुर । तो ओळखावा त्या गुणाचा ॥४८॥
या सकळामाजीं जीवनकला । सात्विकतेचा प्रवाह भरला । मोहवूनि प्रेमाने सकलां । कीर्तिमार्ग दावी भूलोकीं ॥४९॥
एरव्ही सर्वांतचि आहे कला । एक चातुर्ये खाय एकाला । मोठी खातो लहानाला । नियम ऐसा जीवनीं ॥५०॥
परि हा नियम मानवी नाही । पशुपक्ष्यांना शोभे सर्व कांही । अंडज जारज उदभिज स्वेदजहि । याच मार्गीं ॥५१॥
याच मार्गे मानव गेला । तेणें जगीं हाहा:कार झाला । बळी तो काळ पिळी या बोला । जीवनकला म्हणों नये ॥५२॥
सामुदायिक वृत्तीविण । जगीं टिकले प्राणी कोण ? जगावें जगवावे जीवजन । हीच खरी जीवनकला ॥५३॥
हेंच वैशिष्ठय मानवाचें । जगीं सौख्य नांदवी साचें । त्याविण सार्या प्रगतीचें । मंदिर मिळे धुळीमाजीं ॥५४॥
म्हणोनि सर्व जीवांची कला वेगळी । जगावें दुसरे घेवोनि बळी । परि मानवांची कला निराळी । उन्नत करी दुर्बलांहि ॥५५॥
पशुपक्ष्यांचें नर्तन गायन । मानव सर्वांतचि झाला निपुण । परि तयाचें मानवपण । असे भिन्न सर्वाहूनि ॥५६॥
तो कातिणीपरी काती-विणी । कोकिळेपरी गाई गाणीं । मत्स्यापरी तरे जीवनीं । उडे गगनीं पक्ष्यांपरी ॥५७॥
मधमाशीपरी संचय करी । मुंग्यासारिखे किल्ले उभारी । रंग बदली सरडयापरी । नृत्य करी मोराऐसें ॥५८॥
फुलपाखरांचे धरी वेष । चिमण्यांपरी घरटयांची हौस । ऐशा सर्वचि कला साधती त्यास । परि त्याची कला निराळी ॥५९॥
तो राहतो नीटनेटका । वायां न धाडी आपुला पैका । सर्वां सांभाळितो सारखा । आपुल्यापरी ॥६०॥
मनुष्य स्वभावेंचि भिन्न पडतो । तो सर्वांसीच सांभाळितो । मर्यादेने वागत जातो । सदधर्माच्या ॥६१॥
विवेक-बुध्दीने चालतो । पडलेल्यासि उचलोनि घेतो । दुसर्याचिया हितास्तव जातो । बळी प्रसंगीं ॥६२॥
देतो सर्वांसि आपुला हिस्सा । गांवीं न यावी म्हणोनि अवदशा । त्याचें कुटुंब गांवचि सहसा । वाटे तया ॥६३॥
आपण जें जें कांही करावें । त्याने इतरांसि दु:ख न व्हावें । अहर्निशीं ऐसेंचि वर्तावें । आवडे तया ॥६४॥
दूरदृष्टीचा विचार धावे । कार्यकारण तयासि ठावें । व्यक्तिऐसें विश्व सुखी व्हावें । म्हणोनि करी कष्ट नाना ॥६५॥
ऐसें करन्यासि जे जे चुकले । ते मानवचि नव्हती भले । मानवदेहीं जन्मासि आले । परि राहिले पशूचि ते ॥६६॥
जें जें असेल माझ्या घरीं । सगळया सुख लाभावें तयाचि परी । ऐसी चिंता नित्य करी । तोचि धन्य मानव ॥६७॥
तो आपुली कलाकुसरी । सर्वांचिया जीवनीं भरी । शोषण पतन कुणाचें न करी । आपुल्या कलेने ॥६८॥
कलेकरितां कला न ठेवी । जीवनासि कला भूषवी । आपण सजवूनि दुसर्या दाखवी । मनुष्यपण गोड शब्दें ॥६९॥
लोभासाठी गोड बोलणें । ही जरी कला घेतली कोणें । तरि तें जाणावें दु:खदवाणें । प्रेमळपण दिसे जरी ॥७०॥
कोणी विषयासाठी नटला थटला । तोंडा रंग फासोनि फिरला । तरी अंतरींच्या काळिमेला । बघती जन तयाच्या ॥७१॥
कोणी शिकला चातुर्यकला । साहित्य अभिनय मोही जगाला । परि तेणें स्वार्थापायीं घातला । समाज पतनीं ॥७२॥
कोणी नृत्यगायन नटविलें । चित्रादि कलांना शृंगारिलें । म्हणती आम्ही मानवां केलें । उन्नत ऐशा कलांनी ॥७३॥
परि पाहतां अनुभव आला । मानव क्षुद्र वृत्तींनी घेरला । याचें कारण बाजार झाला । स्वार्थापायीं कलांचा ॥७४॥
प्रत्येक कलाकौशल्यामागे । सदगुणांचीं असती अंगें । परि तेवढेंच विसरती जन संयोगें । घेती त्यांतूनि वाईट ॥७५॥
याचें कारण एक आहे । समजदार प्रलोभनीं दंग राहे । तेथे उपायचि होती अपाय । रंगविले किती तरी ॥७६॥
परि ती कला नव्हे-करंटेपण । तो शृंगार नव्हें-तें मरण । मधुर बोलणेंहि जहरासमान । वाटे कळतां अंतरींचें ॥७७॥
अंतरींचें दिसती डोहाळे । क्षणोक्षणीं वरि उफाळे । काय होतें बोलोनि प्रेमळें । कलाकुसरीचें ? ॥७८॥
हा दंभ विसरायाची कला । जो कोणी साधकजन शिकला । त्यासीच लोक मानिती भला । सदभावाने ॥७९॥
त्याची प्रत्येक कला निर्मळ । अनुपानें विषहि दे अमृतफळ । मानवतेचें वाढवी बळ । तीच कला महाथोर ॥८०॥
मुख्य कलेची सांगता । असावी लागते तारतम्यता । सदा सावध असावा माथा । उन्नतीसाठी सर्वांच्या ॥८१॥
मग कला मागे धावती । न कळत्या खुणा कळों येती । जीवनकला पाववी सुमति । सर्वांगीण उध्दाराची ॥८२॥
कुणाचें बिघडलें सुधारावें । कुणाचें भांडण तोडोनि द्यावें । कुणासाठी योजनाबध्द व्हावें । मार्ग सांगावया ॥८३॥
हीच खरी कला शिकावी । यानेच जीव तरतील भवीं । मरणावरीहि कीर्ति रहावी । कलाकाराची ॥८४॥
एरव्ही चौदा विद्या चौसष्ट कला । काय करावें शिकोनि गलबला ? जो दुसर्याच्या कामीं न आला । व्यर्थ मेला अभिमानाने ॥८५॥
कमींत कमी गरजांत राहिला । अधिकांत अधिक उपकार केला । समाजाशीं समरस झाला । तोचि खरा कलावंत ॥८६॥
ही जीवनकला ज्यांना गवसली । त्यांची मानवता विकास पावली । मानवी देव पदवी लाभली । सात्विक कलावंतासि ॥८७॥
जो ही ऐसी कला चुकला । तो गांवीं जगण्यासचि मुकला । सर्व संसार फाटका झाला । सहकार्याविण बिचार्याचा ॥८८॥
म्हणोनि बोललों मुख्य कला । मानवतेने सजविणें विश्वाला । सर्व मिळोनि संसार केला । पाहिजे हा स्वर्गापरी ॥८९॥
आपुलें आपुलें सर्व करा । सर्वांच्या सुखाचाहि मार्ग धरा । सर्वांत आपुल्याहि सुखाचा झरा । दिसों लागे ॥९०॥
सर्व कलांहूनि श्रेष्ठ कला । सर्वांत समरसता लाभावी जीवाला । दृष्टीसि जो जैसा दिसला । आनंद वाटला पाहिजे मना ॥९१॥
मनचि न व्हावें वेगळें । जें दिसतें तें सुंदरचि सगळें । हें कळावया आत्मबळें । पाहिजे कला बोधाची ॥९२॥
आत्म्याची ओळखी ही कला । साधूनि विश्वाशीं समरस झाला । तोचि कसोटीला लागला । शेवटीं पूर्णत्वाच्या ॥९३॥
पूर्णत्वीं दु:खदोषादि कांही नाही । परि ही कला विरळाचि घेई । दु:खदोष निवारूनि जना पाही । तोहि थोर कलावंत ॥९४॥
ज्यासि आहे जगाचें भान । त्यावरि जगाची जबाबदारी पूर्ण । त्याने केलेंचि पाहिजे दु:ख निवारण । समाजाचें स्वकलेने ॥९५॥
म्हणोनि ऐका करा उल्हासें । मानवमात्र सुखी व्हावे ऐसें । उणीव दिसतां सहकार्य हर्षें । नेहमी करा सर्वांशीं ॥९६॥
सर्वांशी सर्वांचा सहकार । हाचि आहे मार्ग थोर । गांवीं ये स्वर्गीयता सुंदर । याच कलेने निश्चयेंसि ॥९७॥
ही मानव्याची जीवनकला । गांवीं शिकवा सर्वांला । मग उणें न पडे कोणाला । कधी कांही ॥९८॥
योगियांची जीवनकळा । सत्रावीचा अमृतसोहळा । तैसी सुखी अमर करील मानवकुळा । कला ही गांवीं ॥९९॥
गांव होईल आरोग्यवंत । ज्ञानवंत सदभाग्यवंत । सहकार्यावरीच जग जिवंत । विचारें पाहतां ॥१००॥
हजार साधनांहूनि अमोल । एक सहकार्यवृत्ति निर्मल । ही गांवीं फोफावूं द्या अमरवेल । नाना प्रयत्नें ॥१०१॥
याने मानवांअंगींची शक्ति । प्रकट होईल महादीप्ति । सेवा करील निसर्ग-प्रकृति । सर्व जीवांची ॥१०२॥
जीव ईश्वराचे अंश । त्यांचें गांवचि कां राक्षस ? जिकडे तिकडे सुखसंतोष । नांदेल या प्रयत्नांनी ॥१०३॥
म्हणोनि शिका मानव्यकला । आत्मविकास साधा आपुला । आता पुरे हा गलबला । दैववादाचा ॥१०४॥
अनुभवें सांगतों तुम्हांप्रति । करूं म्हणाल तें साधेल निश्चिती । करा करा आत्मोन्नति । तुकडया म्हणे ॥१०५॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । जीवनकला कथिली उन्नत । छत्तिसावा अध्याय संपूर्ण ॥१०६॥
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
*********************
ग्रामगीता अध्याय सदतिसावा
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
अनुभव ऐसा शब्द ऐकला । त्यावरि श्रोत्यांनी प्रश्न पुसला । आत्मानुभवाचा मार्ग सांगितला । पाहिजे आम्हां ॥१॥
केले प्रयत्न तुम्हीं कोण ? कैसें गेलें तुमचें जीवन ? खरी आत्मानुभवाची खूण । काय आहे ? ॥२॥
मित्रांनो ! ऐका सावकाश । प्रत्येक जीव देवाचा अंश । आपुल्या कर्तव्यें पद त्यास । प्राप्त होय हवें तें ॥३॥
करणी करितां विवेकें पूर्ण । नरचि होय नारायण । प्रारब्ध आणि परिस्थिति जाण । वाट देई तयासि ॥४॥
ज्यासि करूं आवडे उन्नति । निसर्ग होई ग्रंथ त्याप्रति । साधन होई एकेक वृत्ति । जाणत्यासि ॥५॥
आधि पाहिजे सुंसंस्कार । पुढे जाण्याचा निर्धार । संत, ग्रंथ काय, अवघाचि संसार । सहायक होई तयासि ॥६॥
बुडतें जग त्यासि जागवी । संकटें स्फूर्ति देती नवी । अघातांतूनि हितचि भावी । साधक तो ॥७॥
मनीं आत्मोन्नतीची तळमळ । त्यासि वाट देती सकळ । आपुलें आपणांतचि बळ । पाहिजे आधी ॥८॥
सत्य संकल्पाचा निश्चय । लावी जीवनासि सोय । वाट चालतां निर्भय । मुक्काम पावे ठायींच ॥९॥
आपुल्या अंगीं प्रकाश भरला । तो पाषाणचि हिरा ठरला । खाणींत शोधूनि आणिती त्याला । प्रयत्नें जन ॥१०॥
मृगनाभीची कस्तुरी । ती स्थान पावे राज-शिरीं । कमल चढे देवावरि । चिखलीं जन्मूनि स्वगुणांनी ॥११॥
हाचि अनुभव प्रमाण । यत्नाअंगींच देवपण । हें संतग्रंथांचें सत्यचि कथन । जाणावें श्रोतीं ॥१२॥
तुम्हीं विचारिलें माझें जीवन । म्हणोनि करितों थोडे कथन । जनासह आपण जनार्दन । हीच खूण अनुभवाची ॥१३॥
हीच अनुभवावयासाठी । सर्व कराव्या आटाआटी । ऐसेंचि प्रत्यया येई शेवटीं । साधकाच्या ॥१४॥
देवत्वाची ज्योत दीप्तिमान । परि आवरण पडलें मलीन । तें साफ करावयासीच प्रयत्न । म्हणती साधन त्यालागी ॥१५॥
ऐसीं साधनें निमित्तमात्र । स्वरूप एकचि असे सर्वत्र । तें अनुभवा आणी वृत्ति पवित्र । हेंच सूत्र उन्नतीचें ॥१६॥
या उन्नतिमार्गी जो लागला । विवेकें अंतरीं जागला । तो स्वयें उध्दरोनि गेला । तारक झाला जनांसि ॥१७॥
हें प्रयत्नाचें शुध्द महिमान । ऐकोनि मींहि केलें साधन । तें कळाया करितों वर्णन । थोडकेपण आयुष्याचे ॥१८॥
लहान ऐशा गांवामाजीं । मागासलेल्या जनसमाजीं । उपासाचीच लाभे रोजीं । ऐशा ठायीं जन्मलों ॥१९॥
घरीं दारिद्रयाचें वरदान । परि भावभक्तीची नसे वाण । ऐकत सुसंस्कारांचें गान । सोशीत कष्ट वाढलों ॥२०॥
अंतरीं जिज्ञासा असे खूप । ती घरी हूडपणाचें रूप । अल्लडपणें साहोनि ताप । सर्वांमाजी वावरलों ॥२१॥
ऐकिलें श्रवणीं थोडें कीर्तन । त्यावेळीं होतें आर्तपण । धृवप्रल्हादाचें आख्यान । मना वाटे ऐकावें ॥२२॥
कांही ऐकिली संतचर्चा । कांही कथां ऐंकिल्या पुरानीच्या । कांही वाढविल्या भावना मनाच्या । वैराग्ययोगें ॥२३॥
झाली परिस्थितीहि कारण । धरावया एकान्तीं मुद्राध्यान । तें सर्व केलिया कथन । वेळ पुरेना वर्षाचा ॥२४॥
महत्त्वाचेम सांगावें वाटतें । साधकाला मिळेल आइते । आत्मानात्म-विचार येथे । श्रोते ऐकती म्हणोनि ॥२५॥
कांही संगतीचें लाभलें फळ । आलें आत्मचिंतनासि बळ । देवदर्शनाची खळबळ । झाली हृदयीं दृढ ऐसी ॥२६॥
पुढे कल्पना सरसावली । धृवानेच कां तपस्या केली ? आपणासहि कां न घडली । पाहिजे तैसी ? ॥२७॥
काय करावें वाटे मनीं । कैसें ध्यान करावें नेत्र लावोनि । कोणा विचारावें, समाधानी । वृत्ति व्हाया जीवाची ? ॥२८॥
मग बळेंचि रानीं जावें । वृक्षाखाली ध्यान धरावें । कधी मूर्तिपूजनचि करावें । मंदिरामाजीं ॥२९॥
कधी रेणुकांची करावी मूर्ति । वनपुष्पपत्रें पूजावी ती । भजन करावें अहोरातीं । तन्मय चित्त करोनिया ॥३०॥
ऐसा वाढला प्रेमनिश्चय । मानसिक संकल्पांचा समुच्चय । धरिली ध्यान-मुद्रेची सोय । एकांतामाजीं ॥३१॥
परि झालें नाही समाधान । चित्त उडे मधून मधून । तशांतचि करावें कीर्तन । तळमळोनि ॥३२॥
आपणचि मना समजावावें । आपणचि समाधान मानावें । गावें नाचावें बोलत जावें । आपल्याशींच एकान्तीं ॥३३॥
परि प्रारब्धभोग आडवा पडे । विषयांकडे वृत्ति ओढे । कधी दुष्परिणाम घडे । देह-धारणेने ॥३४॥
म्हणोनि निघालों घर सोडून । बावळट ऐसा वेष घेऊन । कधी कधी विसरों देहभान । चिंतेंत देवदर्शनाच्या ॥३५॥
राहिलों वनीं, घोर रानीं । रानवट लोकीं, धनिकाभुवनीं । अनेक अनुभव आले जीवनीं । स्फुरले मनीं सदभाव ॥३६॥
कांही योगाचें साधन । थोडें अध्यात्म-वाचन । विशेष विश्वनिरीक्षण । केलें मनन सर्वकाळ ॥३७॥
भजन, सप्ताह, यज्ञयाग । महोत्सव, व्रतें, महाप्रसंग । नाना कार्यें, साधनप्रयोग । असंख्य केले ॥३८॥
केलें बहुत पर्यटन । वनभ्रमण तीर्थाटन । पाहिले सर्व प्रांत फिरून । आयुष्यांत ॥३९॥
नाना मंदिरें, देवालयें । संस्था, आश्रम, वाचनालयें । दरीं कंदरीं होऊनि निर्भय । पाहिलीं स्थानें ॥४०॥
भेट घेतली वरिष्ठांची । पाहिली भिन्नता रीतिरिवाजांची । रुचि घेतली खाण्यापिण्याची । देशीं-भेंषीं ॥४१॥
पाहिले अखाडे साधुजनांचे । गोसाव्यांचे, संन्याशांचे । वैराग्यांचे, महानुभवांचें । वारकर्यांसहित ॥४२॥
प्रवास केला बैलगाडीचा । घोडे, टांगे, हत्ती-अंबारीचा । सायकल, मोटार, विमानाचा । सर्वकाही ॥४३॥
पाहिले सागर, भव्य स्थानें । सातपुडा सह्याद्रि विंध्याद्रि, रानें । हिमालयासहित अति उंचपणें । गगनभेदी ॥४४॥
निसर्गाचीं दृश्यें अपूर्व । मानवकृत चमत्कार-वैभव । सुखसाधनें ज्ञानसाधनें सर्व । पाहिलीं लोकीं ॥४५॥
हें सर्वकांही पाहूनि पूर्ण । नाहीच झालें शांत मन । शेवटीं घ्यावा लागला अनुभव जाण । आपणामाजीं ॥४६॥
बहिर्मुख दृष्टीने पाहतां । समाधान न लागे हातां । हीच असे अनात्मता । दु:खदायी सर्वांसि ॥४७॥
विश्व कोण मी कोण ? यांचें मुळांत एकपण । तें जाणतां विचारें पूर्ण । अंतर्मुख वृत्ति होय ॥४८॥
एकचि तत्त्व चैतन्यघन । सागरीं बर्फ-तुकडयांसमान । त्यावरि सजलें विविधपण । हीच खूण अनुभवाची ॥४९॥
मीच आहे सकळांस कारण । माझ्याच आत्म्याचें हें विशालपण । ओळखी होतां कळलें पूर्ण । अद्वैतपण सर्वांचें ॥५०॥
मग मुरली पाहण्याची हौस । निवांत झालों सावकाश । जें जें दिसे या दृष्टीस । तें तें भासे आपणचि ॥५१॥
वाटे सर्वचि येथे आमचे । भिन्न कोण निवडायाचे ? हर्ष न समाये, मनाचें । मोठेपणीं आतलाचि ॥५२॥
मुंगी आणि ऐरावत । अणुरेणु आणि मेरूपर्वत । सर्व माझेचि संकल्प मूर्त । कळों आलें ॥५३॥
अजूनि कितीतरी आत्मा थोर । न चाले मोजमाप अनिवार । अनंत ब्रह्मांडें विश्वाकार । संचले असती ॥५४॥
माया, ईश्वर, ब्रह्म, सृष्टि । सर्व आत्मरूपाचिया पोटीं । पोटपाठहि नाही शेवटीं । तेंचि तत्त्व मी ॥५५॥
ब्रह्म म्हणती सर्वांत मोठें । परि ही भाषा परकी वाटे । अनुभव घेतां वेगळें न भेटे । ब्रह्मपण आटे आपणांत ॥५६॥
प्रथम गांव-मंदिर मोठें वाटलें । मग तीर्थाटन मोठें झालें । आणि पुढे निसर्गरूप दिसूं लागलें । मोठें मोठें ॥५७॥
परि त्याच्या मुळाचा अनुभव घेतां । मोठा कळलाच नाही कोणता । हा आत्म्याचा विलासचि तत्त्वता । अनुभवा आला ॥५८॥
मोठा तो पंचतत्त्वादि भेदोनि । लहान तोचि अणुरेणूहूनि । पाहतां पाहणें दुरी सारोनि । कळला एकपणीं जवळचि तो ॥५९॥
तेथेचि झालें पूर्ण साधन । मग दिसों लागलें एकचिपण । सुखदु:ख आणि जन्ममरण । सारिखेंचि ॥६०॥
भिकारी आणि धनवान । हे तों संकुचित भावें दोन । विकास होतां न राहती भिन्न । होती समान उन्नत ॥६१॥
नाही जातिपंथादि भेद । आपपरभाव हर्षखेद । प्रकट होई सच्चिदानंद । सर्व ठायीं समरूपें ॥६२॥
जन्मणें मरणें झाला खेळ । सुखदु:ख सर्व झालें शीतळ । संकटें येतां वाटे प्रेमळ । प्रवाह आला ॥६३॥
आता विषादचि नाही उरला । विचार विस्ताररूपें व्यापला । जें जें करणें असेल निसर्गाला । रुचि वाटे तयाची ॥६४॥
यासीच खरा बोलती प्रारब्धवाद । ज्यांतूनि आसक्तीचा उच्छेद । इच्छेविरहीत आनंद । सर्वांसाठीं निर्विषय ॥६५॥
नाही शृंगार सौंदयाचा । नाही पाल्हाळ काव्यकलांचा । जें असेल जैसें तयाचा । आनंद वाटे चित्तासि ॥६६॥
हें सर्व कासयाने झालें ? यासाठी काय साधन केलें ? कासयाने द्वैतपण मुरलें । आपणामाजीं ? ॥६७॥
हें आठवतां भान येतें । साक्षित्वरूपें पाहतां कळतें । अंतरंगीं विचारितां वळतें । कार्यमर्म सर्वकांही ॥६८॥
बुध्दीसि स्वातंत्र्य दिलें । जैसें जें दिसलें तें विचारिलें । त्यापरी कार्यसंबंध जोडले । आत्मत्व आलें देहभावा ॥६९॥
आपण तैसे सकळ जन । मग कासया मानावें भिन्नपण ? ऐसा होतां झालें सावधान । ज्ञानमार्ग सर्वकांही ॥७०॥
ऐसा जीवेंचि मंत्र धरिला । न कळे कोणीं वरदहस्त ठेविला । परि सदभावें मीं नमस्कारिला । आडकोजी गुरुस्थानीं ॥७१॥
बहिरंग बोध नाही केला । स्वयेंचि श्रध्दाभावें घेतला । अहंकार न हो म्हणोनि पूजिला । सदगुरुराजा ॥७२॥
परि अंतरीं कळलें मर्म । गुरुशिष्यपण आहे भ्रम । आहे एकचि वस्तु अगम्य । दोघांमाजीं ॥७३॥
हें कळावयासि संगति लागे । संगतियोगें भावना जागे । भावना जागतां अंतरंगें । दिसे मुळींचें आत्मरूप ॥७४॥
मग जें जें मागे पाहिलें । तें तें सर्व सहज झालें । स्वाभाविकपणचि अंगीं आलें । स्वरूपानुभवें ॥७५॥
स्वरूप म्हणजे अखंड स्थिति । जी आत्म्याची सहजगति । नाही कृति ना विकृति । स्वरूपामाजीं ॥७३॥
अखंड प्रेम अगाध ज्ञान । अबाधित सत्य आनंद पूर्ण । हेंच स्वरूपाचें लक्षण । अवीट अभिन्न अक्षय जें ॥७७॥
परि हें प्रथम कळलें नव्हतें । म्हणोनि धुंडिलें स्थानमानातें । नवल तोंवरि वाटलें होतें । न लक्षितां स्वरूपस्थिति ॥७८॥
जैसी जैसी जाणीव वाढवी । तैसी शक्ति व्यापक झाली । पुढे वाटली पर्वतावलि । गोवरी जैसी ॥७९॥
राजाहि वाटला घरचा गडी । सुचवावयाची झाली तातडी । संसार झाला आपुला सवंगडी । याचि गुणें ॥८०॥
आपुला आनंद पैसावला । सुखवूं पाहे दु:खिताला । निद्रेत कोणी ओसणला । तरी ये दया त्याची जैसी ॥८१॥
परकेपणाची दृष्टीच गेली । वासना भावनेंत विरूं लागली । दुसर्यांचीं सुखदु:खें झालीं । आपणाऐसीं सहजचि ॥८२॥
मग माघारलीं पूजामंदिरें । दिसूं लागलीं जिवंत शरीरें । यानेच दिसे सर्वांचें बरें । देवकृपा व्हावयासि ॥८३॥
जिकडे जिकडे उणीव भासे । तिकडे तिकडे मन उल्हासें- । धाविनो करी आपणाऐसें । एकचि अंग समजोनि ॥८४॥
जंव अंतरीं आत्मा कळला । तंव आपल्यांतचि विश्व पाहों लागला । जैसा दिव्यदृष्टीचा प्रकाश गवसला । अर्जुनालागी ॥८५॥
मग अनंत उदरें अनंत हस्त । दिशा व्यापूनिया समस्त । दिसे विराटरूप महासमर्थ । ठायींच्या ठायी ॥८६॥
ही दृष्टि सर्वांसचि आहे । परि विचारें उघडील तोचि पाहे । तो अनुभवमार्ग सांगती लवलाहें । संतसज्जन ॥८७॥
जैसे आकाशाचे तुकडे नोहे । ते घटोपाधीमुळेचि भासती पाहे । तैसा जीव अल्पज्ञ वेगळा न राहे । अनुभव घेतां ॥८८॥
नुरे जीवाचें जीवपण । दारिद्यदु:ख रंकपण । आनंदाचें शिखर पूर्ण । प्राप्त होई निश्चयें ॥८९॥
मग प्रारब्ध तयाचा खेळ । प्रयत्न लीलारूप केवळ । आत्मरूपें विश्व सकळ । अनुभवा ये एकपणें ॥९०॥
जीव आपुली वारी व्यथा । तैसाचि सुखवी जगा समस्ता । उरला उपकारापुरता । सर्वांचिया आत्मभावें ॥९१॥
त्यासि नाही उरली कामना । निष्काम कर्म त्याचा बाणा । मग बाधक होईल कोणा । कैशापरी संसारीं ? ॥९२॥
तो जें करी तें ईश्वरपूजन । बोलेल तेंचि वेदवचन । त्यांच्या शब्दें आंदोलन । करिती जन सदभावें ॥९३॥
सत्तेविण त्याची सत्ता । क्रांतीहूनि सेवेची महत्ता । इशारा होतां मालमत्ता । लोक लाविती सत्कार्यीं ॥९४॥
त्याच्या संदेशाचें बळ । गांवीं करी प्रेमाचा सुकाळ । सुखी होती लोक सकळ । गांवोगांवींचे ॥९५॥
त्याच्या ज्ञानें भारले अज्ञजन । ते ज्ञानियांसि देतील शिकवण । झुंजती काळाशीं दारूण । स्त्रिया मुलेंहि ॥९६॥
हें आत्मविकासाचें बळ । मानवी प्रयत्नाचेंचि फळ । देव होवोनि करील सकळ । लोकचि देव ॥९७॥
मित्रा ! ऐसा अभ्यास करि । धरोनि मार्ग-बोध अंतरीं । मग दिसेल याच शरीरीं । तो श्रीहरि व्यापला ॥९८॥
लाभतां अनुभवाची खूण । जनता होईल जनार्दन । गांवीं ऐसा एकटाहि जाण । उन्नत करी गांव सारें ॥९९॥
तो प्रलोभनीं कोठे फसेना । रागद्वेषेंहि गोंधळेना । त्याच्या सहवासेंचि ग्रामजीवना । अमृत लाभे ॥१००॥
ऐसा सेवकचि पाया जगाचा । गांवचा रत्ननिधिच तो साचा । अभ्यास करा सक्रिय अध्यात्माचा । याचसाठी ॥१०१॥
प्रयत्नें मानव होई देव । प्रयत्नें स्वर्गतुल्य होई गांव । संतांच्याहि अभेदभक्तीचें वैभव । ग्रामसेवा-प्रयत्नीं ॥१०२॥
ऐसे लोक निर्माण करावे । तरीच उदया ये जग नवें । नांदेल ग्राम, विश्व, वैभवें । सर्वकाळ तुकडया म्हणे ॥१०३॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरुशास्त्रस्वानुभव संमत । स्वानुभवें कथिला अध्यात्मपथ । सदतिसावा अध्याय संपूर्ण ॥१०४॥ग्रंथ खरेदी
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
******************
ग्रामगीता अध्याय अडतिसावा
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
श्रोते आत्मबोधीं रंगले । म्हणती हेंचि पाहिजे कथिलें । साधुसंतीं हेंचि सांगितलें । सर्व जनांसि ॥१॥
धन्य धन्य आत्मबोध । ऐकतां होय ब्रह्मानंद । येथे गांवसेवेची ब्याद । कासयासि सांगावी ? ॥२॥
ऐसी श्रोत्यांची धारणा । ऐका आता समाधाना । एकाग्र करोनिया मना । सर्व जनहो ! ॥३॥
माझ्या जिवींचें मनोगत । मी सांगतों आता सत्य । ग्रामगीतेचा मतितार्थ । यांतचि आहे सर्वहि ॥४॥
माझाच नव्हे हा विचार । सर्व संतग्रंथांचा सार । महात्म्यांची तळमळ अपार । तेंच वर्म कथितों मी ॥५॥
आपण त्यांचे वाचता ग्रंथ । आत्मबोध ऐकता सतत । परंतु त्यांचें काय हृदगत । दुर्लक्ष झालें तयाकडे ॥६॥
जगीं ज्यांनी घेतला स्वानुभव । ज्यांनी जाणलें मूळतत्त्व । त्या सर्वांचा एकचि भाव । व्हावेत सर्व लोक सुखी ॥७॥
अवघाचि संसार व्हावा सुखी । मंगलता निघो सर्वांमुखीं । खळदुर्जनांचीहि दृष्टि निकी । व्हावी सर्वथा ॥८॥
मित्रता नांदावी सर्वजनीं । उणीव न दिसावी कोठे कोणी । जी जी इच्छा करिती प्राणी । व्हावी पूर्ण ती न्यायें ॥९॥
नको कोठेहि द्वेषवैर । न उरो कोठे हाहा:कार । दंभ मत्सर अत्याचार । अनाचार न राहो ॥१०॥
लया जावो जगाचा भेद । परस्परपोषक होवोत वाद । नांदो आनंदी आनंद । सगळीकडे सर्वदा ॥११॥
हीच तळमळ रात्रंदिनीं । सारखी होती तयांचें मनीं । जगीं जे झाले थोर कोणी । महापुरुष कोठेहि ॥१२॥
त्यांनी कथिलें आत्मज्ञान । तेंहि सुखी कराया जन । आत्मवत जाणावें सर्वांसि म्हणोन । प्रत्येकाने ॥१३॥
त्यांनी वर्णिलें ईश्वर-भजन । तेंहि शुध्द व्हावया मन । पाहावीं देवाचीं लेकरें समान । म्हणोनिया ॥१४॥
त्यांनी कथिलें त्यागवैराग्य । तेंहि जग न मानतां भोग्य । निष्काम सेवेने पावावें भाग्य । याचसाठी ॥१५॥
भूतदया परोपकार । दानधर्म यज्ञादि अपार । याद्वारें दु:खितांसि आणावें वर । अधिक तें तें देवोनि ॥१६॥
करावी समाजीं समानता । म्हणोनीच हीं साधनें तत्त्वता । तीर्थादिद्वारें सामुदायिकता । शिकविली साधुसंतांनी ॥१७॥
एकमेकांमुखीं काला द्यावा । समानभावें भात खावा । सोनें वाटोनि स्नेह वाढवावा । ऐशा प्रथा कितीतरी ॥१८॥
सर्वांमाजीं एकचि भाव । आकुंचित न व्हावा मानव । सामुदायिक वृत्तीने करावें सर्व । विश्वचि सुखी ॥१९॥
सर्व मिळोनि एकत्वें रहावें । सर्वांनी सर्वांस चालवावें । सर्व भूत-हितीं रत व्हावें । ऐसेंचि वचन गीतेचें ॥२०॥
वेदापासूनि हाच घोष । समानसुखें नांदावा मानववंश । सर्व धर्मांचा हाच उद्देश । जिव्हाळयाचा ॥२१॥
परंतु हें सारें पडलें पचनीं । मानव राहिला मागासलेपणीं । करमणूक झाली संत-वाणी । उच्च ज्ञानाची ॥२२॥
एक एकाचे घेवोनि शब्द । करिती चर्चा वितंडवाद । जीवनीं उतरायाचा बोध । त्यासि नाही ठाव कोठे ॥२३॥
संतांनी कथिलें ब्रह्मज्ञान । विशाल व्हाया मानवी मन । सर्वांनी राहाया समान । परस्पर-सहकार्यें ॥२४॥
परि तें राहिलें नुसतें मुखीं । स्वार्थाचीच वाढली शेखी । आपुला शेजारी मरो दु:खीं । नाही चिंता आज कोणा ॥२५॥
चर्चेसाठी तत्त्वज्ञान । आणि चैनीसाठी जीवन । ऐसें घेतलें भिन्नपण । मानवांनी वाउगें ॥२६॥
तेणें संतऋषींचा हेतु । ग्रासूनि गेला राहूकेतु । राम गेला बांधूनि सेतु । गोटे राहिले जैसे-तैसे ॥२७॥
त्यांना सांगावी संत-कहाणी । हाडें दिलीं दधीचींनी । जनसेवेसाठी ऋषिमुनि । रात्रंदिवस कष्टले ॥२८॥
दामाजींनी सुखविलें जना । त्यांतचि तृप्ति नारायणा । संत दादू करी पिंजणा । सेवाभावें ॥२९॥
हातीं घेवोनि तूपवाटी । नामदेव लागे श्वानापाठीं । संतोषवी जगीं जगजेठी । कपडे शिवोनि ॥३०॥
सावतोबांनी शेत पिकविलें । चोखोबांनी गांव झाडलें । लोकसेवेचें महत्व कथिलें । सर्व संतांनी ॥३१॥
कबिरांनी विणले शेले । जातिधर्मादि भेद निरसले । हें सर्व जरी सांगितले । तरी जाग नये त्यांसि ॥३२॥
ते म्हणती हें साधूंकरितां । आम्ही प्रापंचिक सर्वथा । आम्हां पाप्यांसि त्या कथा । ऐकल्याने पुण्य लाभे ॥३३॥
आम्ही सकळांसाठी जन्मलों । सर्व मिळोनि राहाया आलों । परस्परांशीं पाहिजे पूरक झालों । हें न कळे तयां ॥३४॥
तेणें ग्राम झालें कुग्राम । नाही परस्परांशीं निर्मल प्रेम । सर्वांचे स्वार्थ वाढले बेफाम । आपुल्याचि व्यक्तित्वाचे ॥३५॥
एक लाडू करोनि खातो । तेथेचि दुजा उपाशी राहतो । हें आम्ही गांवोगांवीं पाहतों । मानती भूषण ते त्यासि ॥३६॥
एक हौसेने महाल करी । दुजास राहे घर कौलारी । तिजास कुडाचीहि झोपडी बरी । पाहतां दिसेना ॥३७॥
एकास नाही जराहि वाव । एकास उधळपट्टीची हाव । एक बसोनि भोगी वैभव । कष्ट करोनि दु:खी एक ॥३८॥
सदा एक-दुसर्यासि जळती । एक-दुजाचें वाभाडें काढिती । किंवा नशिबावरि हात ठेविती । हांक देती देवासि ॥३९॥
कैसा होईल यांचा मिलाप ? कशाने फळेल संतसंकल्प ? कैसियाने होईल विश्वरूप । सुखी हें सारें ? ॥४०॥
यासाठी अनेक महात्मे झटले । परि जगाचें दु:ख नाही मिटलें । उपदेश त्यांचे नाही उतरले । लोकजीवनीं म्हणोनिया ॥४१॥
यासाठी शोधिला पाहिजे उपाय । जेणें जगीं सुखशांति राहे । महापुरुषांचें समाधान होय । विचारूं तैसें ॥४२॥
ऐसे संकल्प उठतां । लागलों कराया विचार तत्त्वता । सापडला मार्ग निर्मळ हातां । ग्रामकुटुंबयोजनेचा ॥४३॥
उपदेश सुधारी कांही लोकां । परि समाजरचना देई धोका । तेणें आणतां नये अनेकां । प्रत्यक्षांत संतबोध ॥४४॥
म्हणोनि समाज-रचना बदलावीं । संतबोधावरि मांडणी करावी । ब्रम्हज्ञानासि सक्रियता द्यावी । समत्व आणोनि जीवनीं ॥४५॥
देव एक असोनि अनंत झाला । नाना रूपें धरोनि नटला । परि तो पाहतां एकचि दिसला । तैसें व्हावें जनलोकीं ॥४६॥
एकाचें सुखदु:ख सर्वांसि । सर्वांचा उपयोग एकासि । घटकासि आणि विश्वासि । सांगड व्हावी सर्वथा ॥४७॥
सर्व विश्वचि माझें घर । ऐसें बोलिले संत ज्ञानेश्वर । त्याचें प्रात्यक्षिक हें सुंदर । करावें ग्राम आपुलें ॥४८॥
गांवाची करावी आदर्श व्यवस्था । म्हणोनि कथिली ग्रामगीता । ग्रामापासोनि पुढे वाढतां । विश्वव्यापी व्हावें ॥४९॥
जेथे गांवाचाच न कळे धर्म । तेथे विश्वधर्माचें कैचें वर्म ? हेंचि कळावया साधन सुगम । धरिलें गांवाचें ॥५०॥
मनुष्य ग्रामाचा संरक्षक । ग्राम देशासि पोषक । देश विश्वाचा घटक । ऐसें व्हावें यथार्थ ॥५१॥
मनुष्याचें सर्वस्व ग्राम आहे । त्याविण त्याला अस्तित्व नोहे । ग्राम सर्वांगपूर्ण राहे । तरीच वैभव मानवाचें ॥५२॥
गांवीं एकाने माडी बांधली । सर्व घरें मोडून पडलीं । याने आमुची कीर्ति वाढली हें समजणें वेडेपणाचें ॥५३॥
खरा स्वार्थ तोचि करी । ज्याचा व्यवहार समाजा उध्दरी । नाही भिन्नत्वाची उरी । जयामाजीं ॥५४॥
नाहीतरि उलट घडे । ऐसे चालत आले पोवाडे । श्रीमंत-गरीब हे आकडे । पुसले पाहिजेत या पुढती ॥५५॥
आपुला स्वार्थचि धरिला उरीं । पर्वा इतरांची न केली जरि । तेणें आपणांसहि शांति संसारीं । न साधेल कधी ॥५६॥
म्हणोनि ज्यासि दूरदृष्टि आली । त्याने हीच ठेवावी बोली । देवाने ही दुनिया निर्मिली । सकळांसाठी ॥५७॥
हीच खरी विकासाची वाणी । जाणेल तोचि खरा ज्ञानी । अभ्यास करावा सर्व लोकांनी । आतातरी ॥५८॥
हा अभ्यास नको शाब्दिक । बौध्दिक अथवा केवळ तात्त्विक । जीवनचि करा सामुदायिक । ग्राम-जन हो ! ॥५९॥
त्यानेच साधेल संत-उद्देश । ईश्वरी संकल्प येईल फळास । व्यवहारीं लाभेल ब्रह्मरस । सर्व गांवासि ॥६०॥
यावरि श्रोतीं विचारिलें । आपण सामुदायिकत्व सुचविलें । परि त्याचें स्वरूप कळलें । नाही आम्हां ॥६१॥
तेंचि ऐका सविस्तर । परमार्थमय हा व्यवहार । जेणें गांवीं वैकुंठपूर । नांदूं लागे सहजचि ॥६२॥
शक्ति, बुध्दि, सत्ता, धन । आज ज्याच्या जें स्वाधीन । तो त्या त्या साधनें स्वार्थ साधून । लुटतो गांवा ॥६३॥
पाहती आपापल्या पुरतें । लाभ इच्छिती आइते । इतर मेलियाची तेथे । पर्वा नाही कोणासि ॥६४॥
हें आकुंचितपण बाधक । पोसाया आपुले कुटुंबीय लोक । इतरांसि मागाया लावित भीक । नाना मार्गें ॥६५॥
म्हणोनि स्वरूप द्यावें सामुदायिक । सर्व गांवचि कुटुंब एक । श्रमती खाती सर्वचि लोक । ऐसें दृश्य दिसावें ॥६६॥
गांवीं जेवढी शक्ति बुध्दि । तो सर्व गांवाचाचि निधि । ऐसें होतां आधिव्याधि । नष्ट होतील सर्वचि ॥६७॥
आज मजुरां नाही शास्त्रीय ज्ञान । शास्त्रज्ञाअंगीं श्रमाची वाण । तेणें वाढेल कैसें उत्पन्न । गांवाचें आमुच्या ? ॥६८॥
श्रम करितील सर्व मिळून । तरि पिकूं लागेल बरड जमीन । मार्ग काढतील बुध्दिमान । नव्या नव्या शोधांनी ॥६९॥
सामुदायिक प्रयत्नांनी । सामर्थ्य वाढेल कणोकणीं । जेथे नसे घोटभर पाणी । तेथे सरिता वाहूं लागे ॥७०॥
स्वच्छ पाण्याचें भरेल तळें । विहिरी, जागोजागीं मळे । नदीचे प्रवाह होतील सगळे । शेतीसाठी उपयोगी ॥७१॥
नदी सागरीं मिळावी । तिची अपार शक्ति व्यर्थचि जावी । ऐसी ईश्वरी इच्छाचि नसावी । उपयोगी यावी सर्वांच्या ॥७२॥
तैसीच मानवी शक्तिबुध्दि । स्वार्थींच वाया न जावी कधी । गांवीं नांदवाव्या ऋध्दिसिध्दी । नाना प्रयत्नें ॥७३॥
आमुचें गांवचि आमुचें घर । सर्व व्यवहार सगळयांवर । सर्वांचा सर्वांठायीं हातभार । असलाचि पाहिजे ॥७४॥
बुध्दिकाम, देहपरिश्रम । कलाकाम, कौशल्यौद्यम । ज्याचें असेल जें जें कर्म । तें तें वाहावें समाजा ॥७५॥
कोणी द्यावा आपुला धंदा । कोणी द्यावी सर्व संपदा । कोणी नोकरीचा पगार सर्वदा । समर्पावा या योजनेसि ॥७६॥
त्यांत असावे चांभार-कुंभार । त्यांत असावे सुतार-बेलदार । शिक्षक, शिंपी, लोहार, कलाकार । दाई, सेविका सर्वचि ॥७७॥
शेती उत्तम कसणारे । शेतीची योजना जमविणारे । वैद्य, कोष्टी, विणणारे- । कापड, साडया, सतरंज्या ॥७८॥
अजूनीहि जे गांवीं असती । त्यांची पाहिजे अधिक भरती । त्या सर्वांची शक्तियुक्ति । संघटित व्हावी गांव-सेवे ॥७९॥
धन द्यावें धनवानांनी । भूमि द्यावी जमीनदारांनी । श्रम द्यावेत मजुरांनी । सर्वतोपरीं आपुले ॥८०॥
बुध्दि द्यावी बुध्दिवंतांनी । कला द्यावी कलावंतांनी । सेवा करावी वैद्य-डॉक्टरांनी । आळसी कोणीं नसावें ॥८१॥
सर्व लोकांनी झीज सोसावी । गांवसोयीसाठी जागाहि द्यावी । गरीबांचीं घरें दुरुस्त करावीं । गांव-खर्चाने ॥८२॥
देवळांच्या जमिनी, पडीत खंडारें । वाटोनि द्यावें गरीबां सारें । व्यवस्था ठेवावी उत्तम प्रकारें । सर्वांच्याच जीवनाची ॥८३॥
सर्वांनी समयदान करावें । घरें, रस्तेहि सजवोनि द्यावे । गांव नंदनवन बनवावें । सामुदायिक कष्टांनी ॥८४॥
कोणी नसावा गांवीं उपाशी । उद्योग द्यावे सकळ जनांसि । भीक मागण्याची प्रथा जराशी । नसावी गांवीं आमुच्या ॥८५॥
असो पुजारी वा पंडित । कामें करील जो उचित । तोचि राहील या गांवांत । सर्वानुमतें सांगावें ॥८६॥
सर्वांनी सारखेंच काम करावें । आपुलाल्या कलेने बरवें । कष्टाविण कुणाला पोसावें । ऐसें नाही ॥८७॥
कष्ट करोनि वृध्द झाला । काम बदलोनि द्यावें त्याला । अथवा कोणी बिमार पडला । तरीच पोसावें सर्वांनी ॥८८॥
असो साधु भक्त विद्वान । त्यांनीहि न खावें कष्टाविण । उलट आदर्श दावावा झटून । सर्व लोकांसि ॥८९॥
मुखें भजावें गोविंदा । हातें करावा कामधंदा । प्रेम ठेवावें सदासर्वदा । सर्वेश्वराठायीं ॥९०॥
आपुलालें काम करावें । सर्व लोकांशीं इमानदार व्हावें । घेणें देणें सर्वचि करावें । प्रांजळ बुध्दि धरोनि ॥९१॥
जैसा गोरा कुंभार मडकीं करी । नित्य उच्चारी हरिहरि । परि मडकियांत बैमानी धरी । ऐसें कल्पान्तीं घडेना ॥९२॥
जनाबाई संत झाली । परि गोवर्या वेचणें नाही भुलली । तैसीच चोख्याने भक्ति केली । ढोरें ओढतां ग्रामाची ॥९३॥
खरा नाथ भक्तिवान । देई मागासल्यांना ज्ञान । खाऊं घाली पितरांचें अन्न । कष्टकर्त्या दीनजना ॥९४॥
एका पैचा न चुको हिशेब । म्हणोनि जागे, नसोनि लोभ । संतोषला पद्मनाभ । पाणी पाजतां गाढवासि ॥९५॥
हेचि त्यांची खरी भक्ति । स्वयें बोलला जगत्पति । नाचे सावत्याच्या मळयाप्रति । नेटकें काम बघोनि ॥९६॥
ऐसें घडलें पाहिजे साचें । काम करोनि ग्रामाचें । त्यांत ठेवावें भक्तिरसाचें । हृदय आपुलें ॥९७॥
जे जे गांवीं भिन्न उद्योग । त्यांचा जुळवावा संयोग । ठराविक जागीं नाना प्रयोग । चालवावे गांवांत ॥९८॥
आपल्या कामाचा ठरला वेळ । सर्वांनी झटावें लावोनि बळ । चिंता करूं नये वेडगळ । भलतियाचि ॥९९॥
जो जो असे आपुला धंदा । तल्लीन राहावें कामांतचि सदा । ठरल्या वेळीं व्यवसायाबंधा । सोडूनि द्यावें सर्वांनी ॥१००॥
नियमित वेळीं काम करावें । नियमितपणें खेळ खेळावे । नियमित समयीं प्रार्थने जावें । सर्व मिळोनि ॥१०१॥
एरव्ही सामुदायिक जीवन । हेचि प्रार्थना असे महान । गांवासाठी कष्टावें पूर्ण । सेवाभावाने ॥१०२॥
काय नाही आपल्या गांवीं । याची चौकशी असावी । नसेल ती साजवावी । पुष्पवाटिका ग्रामासि ॥१०३॥
गांव-जीवनासि जें आवश्यक । त्याची मागावी नलगे भीक । ऐसें सर्वांनी श्रमोनि करावें ठीक । जीवन सारें ॥१०४॥
कोणी गांवास्तव जोडे शिवी । कोणी कपडे शिवोनि पाठवी । कोणी लोखंडी कामेंहि बरवीं । पाठवी वस्तुभांडारीं ॥१०५॥
कोणी कपडा विणूनि आणावा । कोणी नवारी, दोर द्यावा । लाकडी कामें करोनि बरवा । आणतो कोणी ॥१०६॥
कोणी महिनोगणती शेती करी । हंगाम होतां आणी दरबारीं । प्रत्येक ऋतूचि तुरी-बाजरी । तांदूळ आदि सामुग्री ॥१०७॥
धान्य उपजवावें सर्वतोपरीं । जें जें लागे गांवीं घरीं । दुसरीकडोनि न घ्यावी माधुकरी । हेंचि उत्तम ॥१०८॥
जें जें आपुल्या गांवीं होतें । आपणचि वापरावें सामान तें । उरलेलें विकावें भोवतें । भिन्न गांवीं ॥१०९॥
सर्व गांवाचें एक दुकान । सर्वांच्या सहकार्याचें प्रदर्शन । फायदा झालियाचें धन । सर्वांच्याचि मालकीचें ॥११०॥
सर्वचि धन हें सर्वांचें । हे उद्योगहि सकळिकांचे । हें भुवन प्रत्येकाचें । ग्रामचि आहे ॥१११॥
म्हणोनि सर्व एकत्र करावें । ज्याचें काम त्याला द्यावें । उणें असता अधिक मागावें । जास्त द्यावें खजिन्यामाजीं ॥११२॥
अहो ! पैशांचें तोंड काळें । सर्व आपुल्याच गांवीं मिळे । न मिळतां प्रयत्नबळें । तैसें करूं ग्राम आमुचें ॥११३॥
आमुच्या गांवींचें सर्व धन । ग्रामवासियांचें सुखस्थान । आम्ही सर्वचि मिळोन । करूं स्वर्ग गांवासि ॥११४॥
याहीवरि उणें पडे । तरि मागूं देश-पित्याकडे । पूर्ण कराया पोवाडे । गांवाचे आमुच्या ॥११५॥
ग्रामों जरि अधिक उरे । तरि देऊं परगांवीं संतोषभरें । यांत तिळभरि अंतर न शिरे । कल्पान्तींहि ॥११६॥
आधी ग्राम असावें सुखी । कोणी न व्हावीं कोणाशीं पारखीं । सर्व कामें गांवींच निकीं । करूं आम्ही ॥११७॥
याच दृष्टीला धरोन नामी । व्याप्ति करूं विश्वाची आम्ही । लावावया मानवता कामीं । सकळिकांची ॥११८॥
ज्या ज्या मार्गें ऐसें घडे । तोचि धर्म तेंचि ज्ञान रोकडें । तुकडया म्हणे समाधान जोडे । सकळ जनांसि ॥११९॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । सामुदायिक जीवन कथित । अडतिसावा अध्याय संपूर्ण ॥१२०॥ग्रंथ खरेदी
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
****************
ग्रामगीता अध्याय एकोणचाळीसावा
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
सर्व जनांचें समाधान । याहूनि स्वर्ग नाही महान । नांदती द्वेष-मत्सराविण । बंधुभावें सर्व जेथे ॥१॥
गरीब-श्रीमंत कोणी नाही । नाही दारिद्रय रोगराई । उंचनीच कामें सर्वहि । करिती लोक प्रेमभरें ॥२॥
पक्ष नाही पंथ नाही । जातिभेद विरोध कांही । एका कुटुंबापरी राही । गांव आपुलें आनंदें ॥३॥
ऐसें व्हावें कोठेतरी । त्यासीच आम्ही म्हणतों वैकुंठपुरी । जेथे नाही भावनाच दुसरी । परकेपणाची ॥४॥
ग्रंथीं स्वर्ग-वैकुंठ-वर्णन । वाचतां तल्लीन होतें मन । त्यांत वर्णिले हेचि गुण । ते कां आपण न घ्यावे ? ॥५॥
सत्य युगाची ऐकावी कथा । परि आपुली न सोडावी प्रथा । याने समाजाच्या व्यथा । चुकतील कैशा ? ॥६॥
वैकुंठींचा प्रेमानंद । सत्ययुगाचा समतावाद । आपुल्या गांवीं करावा सिध्द । हेंचि कर्तव्य सर्वांचें ॥७॥
देवाने जगीं अवतार घ्यावा । ऐसें कां वाटतें जीवा ? त्रास अन्याय अनाचार नसावा । कोठेहि लोकीं ॥८॥
जरि हें आपणांसि आवडे । तरि आपणचि व्हावें कराया पुढे । न करितांचि देवानांवें ओरडे । तें सर्व वाया ॥९॥
सर्वचि भगवंताचे सखे । देवाचिया न्यायाने सारखे । मग व्यवहारींच पारखे । कां ठेवावे ? ॥१०॥
देवाचा न्याय जगीं आणावा । तरीच मिटे दु:ख-गवगवा । यासि टाळील तो जाणावा । भक्त कैसा ? ॥११॥
जें एकास तेंचि सकळांस । हेंचि सत्य जीवनाचें रहस्य । सर्वांच्या सुखीं दु:खीं समरस । भावना राहती सकळांच्या ॥१२॥
उणा-अधिक गुणापाशी । नको जाति वा धनापाशी । अधिकार समानचि सर्वांसि । जीवनाचा ॥१३॥
सर्वांनी करावें शक्तिभर काम । अधिकारपरत्वें उपक्रम । सर्वांसि मिळावें सौख्य सम । गरजांप्रमाणे जरूर त्या ॥१४॥
ऐसीच सर्वांची योजना करावी । पूर्ण वर्ष चिंताचि नसावी । अन्नवस्त्र धंद्यांची बरवी । योजना व्हावी सर्वांमिळोनि ॥१५॥
वर्षाचें बजेट ठरवावें । माणसीं लागेल तें योजावें । अन्नवस्त्र अलंकार बरवे । सर्वांलागी घरदार ॥१६॥
वेगळा नफा वेगळी संपत्ति । वेगळें वैभव वेगळी महती । वेगळे चोचले कोणाप्रति । उरोंचि न द्यावे ॥१७॥
एकचि वस्त्र एकचि अलंकार । एकचि आदर एकचि शृंगार । एकचि भोजन एकचि अधिकार । आपुलाल्या कामाचा ॥१८॥
सर्वांना सारखाच सणवार । सर्वांचे एकचि मेजवानी-प्रकार । एरव्ही न मिळो खानपान इतर । भिन्न कोणा ॥१९॥
सणावारीं कोणी वारला । तरि गोडधड नसावें गांवाला । तो दिवस सोडोनि पाहिजे नेमला । दुजा सर्वांनी ॥२०॥
सर्वांची उठण्याची एक वेळा । घरकाम करण्या हुरूप आगळा । सफाई, ध्यान, प्रार्थना सगळा । कार्यक्रम सामुदायिक ॥२१॥
सर्वांस ठेवावें सारखें । राहणी, खाणें, कपडे नेटके । सर्वांच्या मुलांस शिक्षण निकें । योग्यता-भेद बघोनि ॥२२॥
शिक्षणाची एकचि शाळा । राहणीचा एकचि सोहळा । प्रेमाचा सर्वभावें लळा । जेथे तेथे सर्वांशी ॥२३॥
समान व्यवस्था आरोग्याची । सारखीच उन्नति स्त्री-पुरुषांची । एकाची ती सर्वचि गांवाची । जबाबदारी ॥२४॥
जैसे, कोणी येती पाहुणे । ते त्या आदर्श गांवाचेचि म्हणे । वाटून द्यावेत आपुलाले कोणें । ऐसेंहि होतें ॥२५॥
परि त्यासि आहे मर्यादा । तेवढाचि नसावा धंदा । पाहुण्याची वेळ, सीमा सर्वदा । निश्चितचि असावी ॥२६॥
एरव्ही करावा पत्रव्यवहार । जेव्हा नसेल काम जरूर । दिवस घालवूं नयेत भराभर । पाहुणेबाजींतचि ॥२७॥
तैसेचि लग्नादि उत्सव । त्यांसि झटावें गांवाने सर्व । परंतु नेहमीच धावाधाव । न व्हावी तीहि ॥२८॥
गांवच्या मुलामुलीचें लग्न । सामुदायिक पध्दतिच प्रमाण । तेथे तिथि-मुहूर्ताचें कारण । कांहीच नाही ॥२९॥
असोत लग्नें दहा-पन्नास । गांवचीं शंभरहि त्या वर्षास । एकाच वेळीं सावकाश । उरकवावीं एके जागीं ॥३०॥
गांवीं असावें विवाहस्थान । भांडीकुंडीं बिछायत पूर्ण । सर्वांसाठी ठेवावी जमवोन । गांवातर्फे ॥३१॥
पवित्र विशाल सुंदर स्थान । जेथे प्रसन्न राही मन । सर्व वरांनी एकचि ठिकाण । पसंत करावें लग्नासि ॥३२॥
प्रसन्न वेळ आणि सज्जन । तोचि मुहूर्त सुखसंपन्न । प्रसन्न हवापाणी पाहोन । कार्य करावें सर्वांनी ॥३३॥
गांवचे सर्व जमोनि मित्र । सहकार्य अर्पावें सर्वत्र । बसवोन वधुवरांना एकत्र । करावें लग्नकार्य ॥३४॥
लग्नादिकासाठी कोणा । उडवूं न द्यावें गांवच्या धना । कराव्या ग्रामोध्दार-योजना । सर्व मिळोनि ॥३५॥
सर्वांनी आपलें सर्वस्व द्यावें । आदर्ह्स गांवाचें बनोनि राहावें । कोणींहि वेगळें न व्हावें । ऐसी घ्यावी दक्षता ॥३६॥
जरी सर्वांनी संसारी असावें । तरी संततिनियमन सांभाळावें । तीन पुत्रांवरि पुत्र व्हावे । ऐसें इच्छूं नये कोणी ॥३७॥
पुत्र तान्हपणीं वाढला । दुसर्या दूधावरि लागला । की आईपासोनि सोडविला । पाहिजेचि तो ॥३८॥
गांवाने करावें शिशुसंगोपन । म्हातार्या प्रेमळ बायांकडोन । जयांचेनि काम भिन्न । होत नाही कष्टाचें ॥३९॥
संपत्ति आणि संतति । सगळी गांवाची ठेव निश्चिती । वाढवोनि साधावी उन्नति । योग्य मार्गे गांवाची ॥४०॥
आपुल्या गांवाचें सुखदु:ख । सकळांसीच कळावें नि:शंक । येतां परस्परांची हांक । धावोनि जावें जिव्हाळयाने ॥४१॥
ज्याची कोणास जरूर पडे । त्यास त्याने बोलवावें निर्भिडें । कोणीहि घेऊं नयेत आढेवेढे । आपुले अडथळे सांगोनि ॥४२॥
कामाचें महत्त्व पाहोनि । हांकेस त्वरित जावें धावोनि । तोहि येईल तैसाचि समजोनि । कामास माझ्या ॥४३॥
जैसें आपण कोणाचें करावें । तैसेंचि आपुल्या वाटयास यावें । ऐसेंचि आहे स्वरूप बरवें । सहकार्याचें मानवांच्या ॥४४॥
म्हणोनि संकटीं धावोनि जावें । सर्वांनी कष्ट वाटूनि घ्यावे । जेणेंकरूनि सर्वांस वाटावें । कुटुंब माझें विश्वव्यापी ॥४५॥
जीव जगीं जन्मासि आला । ऐसेंचि सहकार्य द्यावयाला । अज्ञानी प्राणी सेवेसि मुकला । त्यास करावें सावधान ॥४६॥
कोणास नाही उद्योगधंदा । कोण लागला भलतिया छंदा । पाहावी निरीक्षोनि आपदा । दूर कराया गांवाची ॥४७॥
कोण कोणाशीं वितंडतो । कोण कोणाला छळीत बसतो । कोण स्वार्थासाठी दंडतो । पाहणें काम आमुचें ॥४८॥
व्यसनाधीन कोण राहे । कोण जुगारीं बसलाहे । चिंतातुर कोण कां आहे । पाहणें काम आमुचें ॥४९॥
कोणी स्त्रियांना जाच करिती । कोणी आईबापा कष्ट देती । कोणी मुलीच न पाठविती । कोणी नेती पळवोनि ॥५०॥
हे सर्व दोष सारावया । जबाबदार आम्हीच तया । गांवचे रहिवासी म्हणोनिया । काळजी असो आम्हांसि ॥५१॥
आमुचें करणें आमुचें नव्हे । त्या जामीन सर्व गांव आहे । हें समजोनि करावें होय-नोहे । सर्व कांही सर्वांनी ॥५२॥
आम्ही गांवीं दारू प्यालों । म्हणजे दारूडे लोक झालों । तेणें दारूबाज गांव नांव चालो । ऐसें होतें ॥५३॥
मग सांगा सर्व दारूबाज । होतां कैसें चालेल राज्य ? म्हणोनि व्यसनादिकांचें बीज । येऊं न द्यावें शिवेआंत ॥५४॥
कोणी गांवीं तमाशा करी । मनोरंजनाचा प्रचार विषारी । तेणें मुलें नाचती दारोदारीं । नाचे जैसे ॥५५॥
नृत्यकलेच्या नांवाखाली । विषयांध भावना पसरली । ऐसी नको सुधारणा-भुली । आमुच्या गांवीं ॥५६॥
ही कला नव्हे, विडंबन । पैसे लुटायाचें स्थान । ऐसें नाटक, पथक, गायन । असों न द्यावें ॥५७॥
असेल ज्यांत जनहित । त्यासीच राहावें सहमत । वाढूं न द्यावा वाईट पंथ । कोणताहि गांवीं ॥५८॥
उत्तम कार्यासि जे निघाले । रामधून भजन कलापथक चाले । व्यायाम खेळ मनोरंजन भलें । सर्वकांही ॥५९॥
कोठेचि नाही कुटिलता । तमाशे-दंडारींची हीनता । विचारल्याविण पुढारी येतां । भय वाटावें तयासि ॥६०॥
परका कार्यक्रमासि घुसे । विचारल्याविण मुख्यासि सहसें । कधीहि घडणार नाही ऐसें । गांवीं आमुच्या ॥६१॥
गांवाच्या बुध्दीची उच्च पातळी । लोकां कळावें तत्त्वें सगळीं । भाषणें चालावीं वेळोवेळीं । ग्रामोन्नतीचीं यासाठी ॥६२॥
आपण कोणी भिन्न आहों । ऐसी स्वप्नींहि भावना न येवो । यासाठी ज्ञानपाठ जागता राहो । गांवीं आमुच्या ॥६३॥
आमुच्या गांवीं प्रार्थना-मंदिर । जेथे सर्व धर्मांचा आदर । विश्वांतील जे असतील थोर । ते आम्हांसि देवतुल्य ॥६४॥
त्याच मंदिरीं थोरांची जयंति । उत्सव आणि संत-पुण्यतिथि । जागती राहे सामुदायिक वृत्ति । बौध्दिक-बळें ॥६५॥
साधुदेवतांची जयंति । पुण्यतिथि आदि उत्सव किती । इच्छा असेल ती सत्कृति । करावी गांवीं ॥६६॥
पण सर्वांचें असावें मत पवित्र । गांवाने होऊनि एकत्र । सामुदायिकचि सर्वत्र । उत्सव करावे ॥६७॥
गांवचा उत्सव तो सर्वांचा । त्यांत हर्ष अति आदर्शाचा । तेथे आपापल्या मनाचा । तोल नसावा विपरीत ॥६८॥
नाहीतरि वाढे सांप्रदायिकता । जातीयता, व्यक्तिनिष्ठता । तेणें गांवाचे तुकडे होतां । वेळ न लागे ॥६९॥
म्हणोनि भेदचि नको कांही । सर्वांमनीं उत्साह राही । एक कुटुंब ऐसें सर्वहि । ग्राम आमुचें प्रेमळ ॥७०॥
आपुलें प्रेमचि अमोल संपत । आपुले श्रमचि महान दौलत । आपुलें सहकार्यचि खरी इज्जत । समजावोनि द्यावें सर्वांसि ॥७१॥
गांवीं तेंचि सर्वांनी करावें । कीर्तिस्फूर्तीने गांव भरावें । घराघरांत शांतिसुख पावे । जनता जेणें ॥७२॥
कोणी एक मागे पडला । त्यास दुसर्याने सांभाळिला । ऐसें करितांच गांव झाला । सर्व गुणीं संपन्न तो ॥७३॥
गांवांत नाही झगडा तंटा । कोणी नाही बोलणार उफराटा । सरळ सालस स्वभाव चोखटा । प्राणियांचा दिसावा ॥७४॥
जरी मत भिन्न झालें । तरी पाहिजे गांवांतचि मिटविलें । आपुल्या गांवाविण नाही उरलें । कोर्टकचेरी-काम कोठे ॥७५॥
गांवचा झगडा गांवींच मिटे । निवडणुकीचें काम नव्हे खोटें । लंदफंद गांवांत नाही कोठे । ऐसें ग्राम सुंदर हें ॥७६॥
ऐसें सांगाया वाटावा अभिमान । तेंचि खरें गांवाचें भूषण । गांवांतील सर्व लोक सज्जन । परस्परांवरि अति मोह ॥७७॥
यांत कोणी उनाड दिसला । त्यासि उपदेश द्यावा चांगला । एवढें करोनि नाही वागला । तरि तो झाला बहिरंग ॥७८॥
ज्याने गांवांत धिंगाणा घातला । तो गांव-घातकीच ठरला । त्यास पाहिजे सरळ केला । शांति-प्रयत्न करोनि ॥७९॥
मग सर्वांनी मिळोनि ठरवावें । याचें पुढे काय करावें । निरुपाय होतां पाठवावें । निर्णय करोनि परगांवीं ॥८०॥
मग त्यास न मिळे सामान । अथवा त्याचें असलेलें धन । त्याने पळावें जीव घेवोन । आपुला कोठे ॥८१॥
ऐसें बळकटपण जंव नाही । तंव आदर्श गांव तमाशाच राही । त्यांत स्थिरताच येणार नाही । कांही केल्या ॥८२॥
यावरि श्रोता प्रश्न करी । गांवांत अडचणी नानापरी । सर्व लोक जनोनि कोठवरि । सोडवतील सर्वचि त्या ? ॥८३॥
सर्वचि पाहती कारभार । तरि केव्हा करावें काम इतर ? याने ग्रामजीवन स्थिर । होईल कैसें सांगाना ? ॥८४॥
ऐका याचें समाधान । करावी एक समिति निर्माण । सर्वांनी आपले प्रतिनिधि म्हणून । नेमावे कांही कारभारी ॥८५॥
ज्यांनी आपुलें सर्वस्व द्यावें । तेचि समितीचे घटक बरवे । तनमनधन समर्पावें । ग्रामासाठी जयांनी ॥८६॥
त्या सर्वांना सभासद करावें । त्यांतून पांचजण निवडावे । सर्वांनीं प्रांजळ मनें पाहावे । इमानदार न्यायनिष्ठ ॥८७॥
सर्वांचें मालधन एक करावें । सभासदांचें मोजमाप घ्यावें । मग सर्वांचेंचि जीवन बनवावें । एकसारिखें ॥८८॥
सर्वांना भरपूर कामें द्यावीं । उत्पन्नाची व्यवस्था लावावी । सर्व व्यवहार-उपाधि पाहावी । त्याच पंचांनी ॥८९॥
सर्वांनी आपापलें काम करावें । विकणें घेणें पंचांनी पाहावें । आणि उद्योगासि सामान पुरवावें । पंचांनीच ॥९०॥
गांवाकरितां मार्ग जोडावा । गांवाकरितां व्यापार पुढे न्यावा । हरतर्हेचा संबंध आणावा । सुखी कराया गांव हें ॥९१॥
गांवांतून जें द्रव्य जावें । माल, मनुष्यबल, सामान बरवें । तें प्रथम पूर्ण निरीक्षोनि घ्यावें । गांवासाठी पंचांनी ॥९२॥
सर्वचि योजना पंचांवरती । कोणाचेंचि नाही इतराहातीं । इतर निश्चिंत राहती । कराया प्रगति अधिकाधिक ॥९३॥
एकदा येथें अनन्य झाले । ते व्यापारचिंतेपासूनि सुटले । नि:स्पृह भगवत्प्रेमी झाले । काम आपुलें करोनि ॥९४॥
पंच म्हणजे परमेश्वरदूत । सर्वांची चिंता करी निश्चित । याविषयीं कोणाचें दुमत । असूंचि नये ॥९५॥
तयांनी सर्व काळजी घ्यावी । गांवची जनता सुखी ठेवावी । निर्णय देतांचि ऐकावी । हांक जनतेने पंचांची ॥९६॥
ग्रामीं जनता असेल मोठी । परि ती पंचापुढे धाकुटी । सदा तत्पर सेवेसाठी । प्राण पणा लावोनि ॥९७॥
पंच बोलले तें वेदप्रमाण । हीच गांवधर्माची खूण । यांतचि ग्रामाचें आदर्शपण । आमुच्या मतें ॥९८॥
आमुचें गांव एक कुटुंब । पंच तयाचा मूळस्तंभ । सर्वांवरि न्यायाचा दाब । हाचि कळस विकासाचा ॥९९॥
नसतां कोणाचेंहि शासन । न्यायाने वागती सत्ययुगीं जन । त्याचेंचि रूपांतर पंचायतन । लोकशाही लोकतंत्र ॥१००॥
या योजनेचें एकचि मरण । तेंहि देतों लक्षांत आणोन । पंच म्हणोनि निवडाल गौण । तरि ये धोका जीवनासि ॥१०१॥
सेवाहीनांची पंचायत । ती गांवास करील पंचाईत । लोकशाही म्हणजे लोकांचें मनोगत । सिंहासनीं चढावें ॥१०२॥
लोकशाही म्हणजे लोकांचें हित । लोकांकडूनि व्हावें हातोहात । सर्व मालक म्हणोनि सत्य । जबाबदारी ओळखावी ॥१०३॥
तीच म्हणावी लोकाशाही । जेथे कोणी कामचुकार नाही । सेवातत्पर सर्व उत्साही । न्यायी जन ॥१०४॥
लोकशाहींत जो सत्ताधारी । तो मालक नव्हेचि निर्धारी । लोकसेवेचा कारभारी । जबाबदारी हे त्याची ॥१०५॥
सर्व लोक कार्यतत्पर । त्यांहूनि विशेष जो धुरंधर । तोचि ग्रामाधिकारी खरोखर । पंच वा नेता ॥१०६॥
पंच तो असे आमुच्यांतील । अधिक कामकर्ता आचारशील । ज्यासि संडास-सफाईचेंहि नवल । नसे कांही ॥१०७॥
अधिक सुरळीत काम करील । नेमाने निष्ठेने राहील । तोचि अधिकारी होईल । या गुणांनी गांवाचा ॥१०८॥
येथे महत्त्व सदगुणांचें । धाडसाचें, स्वार्थत्यागाचें । तेचि पुढारी होती गांवाचे । जे गांवास देव मानती ॥१०९॥
ज्याने गांवचि देव मानिला । सेवाकार्याचा मंत्र जपला । त्याचाचि असावा बोलबाला । गांवामाजीं आपुल्या ॥११०॥
तोचि पंच अतिसात्विक । गांव मानी जगन्नायक । एक सेवाचि महापूज देख । इतर नाही त्यासि भक्ति ॥१११॥
त्याला नाही दुसरा धर्म । त्याला नाही दुसरें कर्म । एक सेवाचि त्याचा उपक्रम । सर्वकाळ गांवलोकीं ॥११२॥
त्याचें सर्वस्व आमुच्या करितां । म्हणोनीच तो आमुचा पिता । जेथे जातिधर्मपंथमता । महत्त्व नाही ॥११३॥
तोचि पंच निवडावा । श्रध्दाविचारें ओळखावा । गटबाजीचा होवो न द्यावा । तमाशा कोठे ॥११४॥
करावें सकळांच्या हिताचें । तेथे व्यक्तित्वचि नको आमुचें । जो करि सर्वांहूनि हित लोकांचें । तोचि नेता मानावा ॥११५॥
सज्जनांचें असावें पंचमंडळ । जें गांवा चालवी सर्वकाळ । आपुलें कुटुंबचि गांव सकळ । मानावें त्यांनी ॥११६॥
परस्परांना घेऊनि चालावें । परस्परांचें हृदय एक व्हावें । कोठे उणें पडतां आपणचि समजावें । उणे असों ॥११७॥
आपुल्या व्यक्ति-कुटुंबा करितां । न व्हावी गांवाची अव्यवस्था । ऐसी दृष्टि असावी समस्तां । कार्यकर्त्यासि ॥११८॥
अन्यायें पीडा न होवो कोणास । न व्हावा मुंगीलाहि त्रास । याची जाणीव असावी प्रमुखास । सर्वकाळ ॥११९॥
सार्वजनिक वस्तु घरीं भोगणें । आप्तजनांसि सवलती देणें । हें टाकूनि करावी चोखपणें । तत्परतेने जनसेवा ॥१२०॥
आपुला दुराग्रह दूर सारावा । बहुजनांचा मागोवा घ्यावा । शक्यतों कारभार चालावा । एकमताने गांवाचा ॥१२१॥
पांचामुखीं परमेश्वर । परि नको सत्तेचा अहंकार । नियम पाळतां वाटावें सुखकर । ठरलियावरि ॥१२२॥
सर्वांनी सर्वांसाठी झटावें । सर्वांच्या हितांत स्वहित पाहावें । थोरांनी याचे धडे दाखवावे । आचरोनि निश्चयाने ॥१२३॥
यांतचि आहे मोठेपण । ग्रामजीवन होई स्वयंपूर्ण । हीच आहे खरी खूण । आदर्श ग्रामराज्याची ॥१२४॥
ग्रामराज्यचि रामराज्य । स्वावलंबन हेंचि स्वराज्य । बोलिले महात्मा विश्वपूज्य । विकास त्याचा सुंदर हा ॥१२५॥
आमचें ग्रामचि एक राज्य । सर्वांचें माहेर अविभाज्य । ऐसे आदर्श होती जे जे । नातें आमुचें त्यांच्याशी ॥१२६॥
दुसरें गांव शत्रु नोहे । परि आमुचा संबंध कामीं राहे । सहकार्य देती पंच निश्चयें । चांगुलपण वाढवाया ॥१२७॥
पंचमंडळ निष्ठेने राही । तें तें गांव भूवैकुंठ होई । त्याच्या प्रभावें पवित्र मही । आपोआप होतसे ॥१२८॥
ऐसें जंव गांव साधलें । तंव तें प्रांतांत प्रमुख झालें । ऐसे प्रांत प्रभावी ठरले । तरीच तें भूषण देशासि ॥१२९॥
देश ऐसा उन्नत होय । तोचि विश्वाचा घटक शांतिमय । एरव्ही जो स्वार्थे पुढें घे पाय । घातक होय विश्वासि ॥१३०॥
म्हणोनि ऐका लक्ष लावून । स्वर्ग कराया जगीं निर्माण । करा कुटुंब समर्पण । सामुदायिक तत्त्वासि ॥१३१॥
घ्या वाचून, करा तातडी । मग मनन करोनि आवडीं । घाला या आदर्शयोजनेंत उडी । आपुलें सर्वस्व देवोनि ॥१३२॥
श्रोतेहो ! ऐकिलें काय वचना ? मग वेळ कासयासि पुन्हा ? आजचि तनमनधन समर्पाना । या कार्यासि ॥१३३॥
यानेच थोरांची इच्छा सफळ । सार्थकीं लागे ज्ञानभक्ति सकळ । मिटेल अंतर्बाह्य तळमळ । तुकडया म्हणे सर्वांची ॥१३४॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । आदर्श ग्रामराज्य कथित । एकोणचाळिसावा अध्याय संपूर्ण ॥१३५॥
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
*****************
ग्रामगीता अध्याय चाळीसावा
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
श्रोता आनंदें करी प्रश्न । आपण सांगितलें आदर्श जीवन । परंतु कथाकहाण्या आत्मज्ञान । इतर ग्रंथीं ॥१॥
गांवोगांवीं ग्रंथ लाविती । त्यांहूनि आपुली वेगळीच पोथी । आमुच्या उध्दारासाठी कोणती । निवडावी सांगा ॥२॥
गांव व्हावया वैकुंठपूर । काय कामीं न येती ग्रंथ इतर ? कोणत्या उपायें होतील संस्कार । दृढ गांवाचे ? ॥३॥
याचें उत्तर ऐका आता । वेगळी नोहे ग्रामगीता । येथे नाही अन्य सदग्रंथा । विरोध कांही ॥४॥
सर्व उपनिषदादि गायी । दोहूनि केली गीतामाई । तैसेंचि संतग्रंथ सर्वहि । साररूपें या ग्रंथीं ॥५॥
सर्वांभूतीं भगवदभाव । हा संतश्रेष्ठांचा अनुभव । त्या तत्त्वाचीच उठाठेव । या ग्रामगीतेमाजीं ॥६॥
गीतेचें विश्वरूपदर्शन । वेदाचें विराटपुरुष-वर्णन । संतांच्या विश्वात्मक देवाची खूण । लाभे येथे सक्रिय ॥७॥
अनेक ग्रंथांतील वर्णनें । अनेक तीर्थांतील दर्शनें । अनेक कथाकीर्तनांतील उदाहरणें । तींहि याचसाठी ॥८॥
लोक भुलले सहकार्य देणें । झालें स्वार्थांध विकृत जिणें । आपुल्यासाठी फजीत करणें । लोकांसहि सुरू झालें ॥९॥
हें कोण्यारीतीं निघोनि जाय । याचाच शोध आणि उपाय । करावया महापुरुषांनी सोय । अनुभव घेवोनि लाविली ॥१०॥
वाट चालतां त्यांच्या पाउलीं । बोल बोलतां त्यांच्या बोलीं । जीवन-सफलता होय आपुली । सर्वतोपरीं निश्चयें ॥११॥
यासाठी ग्रंथ-पोथी वाचावी । जनता सगळी जागृत करावी । गांवें संस्कारांनी भरावीं । सहकार्याच्या या मार्गें ॥१२॥
मानवतेची जागवाया शिकवण । गांवीं असावें कथाकीर्तन । पोथीपुराणांचें वाचन । हेंचि शिकविण्या गांवासि ॥१३॥
नाना दृष्टांत कथा अनंत । सांगोनि मानवां करणें उन्नत । याचसाठी ग्रामगीतेचेंहि गीत । गायिलें आम्हीं ॥१४॥
नको उगीच अवडंबर । आपुलें जीवन करावें सुंदर । गांवीं फुलवावें सुखाचे अंकुर । हेंचि कर्तव्य मानवाचें ॥१५॥
मनुष्य निरोगी सात्विक बनावा । त्यास व्यसनांचा उपद्रव नसावा । त्याचा व्यवहार त्रासदायी न व्हावा । कोणासहि ॥१६॥
हेंचि शिकणें असतें पोथींतूनि । भजनांतूनि कीर्तनांतूनि । याचसाठी हीं साधनें योजूनि । ठेविलीं संतीं ॥१७॥
साधनांत साधन-रचना । मुख्य दृष्टि राष्ट्रीय जाणा । साधूनि मानवतेच्या अनुसंधाना । जन लावावे सुमार्गीं ॥१८॥
त्यासाठी तात्त्विकता दावावी । वरकड उपांगें समजावोनि द्यावीं । आवश्यक तीं साधनें लावावीं । आपुल्या गांवीं ग्रंथादि ॥१९॥
ग्रंथ ओवीबध्दचि असावे । हेंहि म्हणणें सोडोनि द्यावें । सहज कळेल तेंचि उत्तम समजावें । गद्यपद्य ॥२०॥
कांही ग्रंथ ऐतिहासिक । कांही चरित्रें, कांही तात्त्विक । कांही अभंग पुराणें सम्यक । पठणीं ठेवावीं ॥२१॥
उगीच भरले चमत्कार । पूजापातीचा डोंगर । जीवनाचें कांहीच सार । नसेल तें काय कामीं ? ॥२२॥
प्रसादासाठी पोथी लाविली । चमत्कार ऐकतां वेळ गेली । आपुली बुध्दि गहाण पडली । ऐसें न व्हावें यापुढे ॥२३॥
रूपकात्मक पूर्वीचें ग्रंथ । जनसाधारण भुलले तेथ । काढूं लागले उलटा अर्थ । विश्वास सहसा बसेना ॥२४॥
पदोपदीं ऐसें उदाहरण । ग्रंथ वाचूनि बिघडे मन । अर्थ न लागतां वेडावून । जाती जन भाविकहि ॥२५॥
मी हरिविजय ग्रंथ ऐकला । कथिलें, नारद नारदी झाला । साठ पुत्र देवोनि गेला । एके रात्रीं ॥२६॥
ग्रंथ ऐकिला पांडवप्रताप । थोरथोरांचें कथिलें पाप । व्यभिचाराचें लागलें माप । आपोआप जेथे तेथे ॥२७॥
कुणाचा जन्म कानांतून । कोणी जन्मला तोंडांतून । कोणी झाला घागरीमधून । ऐसेंहि ग्रंथीं ऐकियलें ॥२८॥
शिंपींतून कोणी जन्मास आला । कोणी जटेंतूनचि जन्मला । कोणी लघवी करितां उध्दरोनि गेला । शिवलिंगावरि ॥२९॥
कोणी प्रसाद टाकोनि जात । म्हणोनि नांव बुडे पाण्यांत । प्रसाद घेतांचि वरि येत । जैसीच्या तैसी ॥३०॥
कोणी पृथ्वी घेवोनि पळाला । सागराइतुकी लघवी कुणाला । कुणाच्या नाकीं गर्दभ चरला । झोपीं जातां ॥३१॥
ऐसे ग्रंथीं चमत्कार । कान धरोनि सांगा अपार । परि मन न माने क्षणभर । काय करावें त्यालागी ? ॥३२॥
हे जरि ऐसेचि ठेविले । तरि अर्थ सांगणारे पाहिजेत भले । त्यांनी तर स्वर्गासहि नाचविलें । दोन बोटांवरि ॥३३॥
म्हणती जनहो ! ऐसेंचि आहे । येथे संशय धरूंचि नये । नाहीतरि पाप निरय । भोगणें पडे सर्वासि ॥३४॥
मानव करावया आदर्श । हाचि काढिला निष्कर्ष । सर्व चमत्कारांचा सारांश । तो ग्रंथराज ठरविला ॥३५॥
जो ऐकेल भावना धरोनि । तयास स्वर्गमुक्ति लाभे क्षणीं । ऐसें सांगोनि स्त्रीपुरुषजनीं । समाज केला पांगळा ॥३६॥
विचारें संशयासि जागा वाढली । समाधान-वृत्ति भंगली । नाही कोणी समजावोनि दिली । रोचक रूपक वाणी ती ॥३७॥
पुराणिक म्हणती उगेंचि ऐकावें । होय म्हणूनि नम्र व्हावें । तरीच जीवा उध्दार पावे । संशयात्मे विनाशती ॥३८॥
हें साधुसंतांनी जाणलें । म्हणोनि विवेकग्रंथ निर्माण केले । त्यांत हे संशयचि फेडले । बहुजन समाजाचे ॥३९॥
भाविक जनासि लावावया वळण । आकळावया सकळ ज्ञान । संतमहंतांनी उपकारऋण । केलें असे आम्हांवरि ॥४०॥
संस्कृतांतूनि काढूनि सार । सुलभ केलें प्राकृत ग्रंथभांडार । जनसाधारणासीहि कळावे सविस्तर । उध्दार मार्ग म्हणोनिया ॥४१॥
पुरातन संस्कृत ऋषि-बोली । त्यांतूनि बहुविध भाषा जन्मली । तैसीच मराठीहि वाढविली । संतकविराजें ॥४२॥
संत ज्ञानदेव मुकुंदराज । चक्रधर नाथादि हंसराज । यांनीच सुलभ केलें सहज । ज्ञान प्राकृत ग्रंथांतरीं ॥४३॥
समर्थ रामदासादि झाले । मुक्तेश्वर मोरोपंतादि भले । गीत अभंग गाथे लिहिले । महाराष्ट्र-ग्रंथकर्त्यांनी ॥४४॥
महाराष्ट्रीं संतकवि-परंपरा । तैसाचि चरित्रग्रंथांचा पसारा । वळणीं लावावया समाज सारा । ग्रंथ लिहिले बहुतांनी ॥४५॥
स्वामी विवेकानंदादि संतीं । जुन्यानव्यांची वाराया भ्रांति । ज्ञानदीप उजळले आपुल्या ग्रंथीं । नाना भाषांमधूनि ॥४६॥
त्या सर्वांतूनि शोधूनि घ्यावे । जे तात्त्विक बोधग्रंथ स्वभावें । कर्मठतेच्या भरीं न भरावें । अथवा शुष्क पांडित्याच्या ॥४७॥
आपली पात्रता ओळखोन । समाजाची पातळी लक्षून । आदर्शाचें सुलभ होय ज्ञान । ऐसेचि ग्रंथ वाचावे ॥४८॥
ग्रंथ वाचतांहि तारतम्य ठेवावें । कोणत्या ग्रंथांतून काय घ्यावें । काय सोडावें काय आचरावें । उन्नतीसाठी आपुल्या ॥४९॥
बोलकें ज्ञान सांगण्यासाठी । ग्रंथ वाचले उठाउठी । तेणें आत्मघात होतो शेवटीं । शांति तिळभरि लाभेना ॥५०॥
सखोल अध्यात्माचे ग्रंथ । त्यासाठी बुध्दीहि पाहिजे समर्थ । आणि उमगला पाहिजे कर्तव्यपथ । अर्जुनापरी ॥५१॥
एरव्ही हजारो ग्रंथ वाचले । त्यांतील मर्मचि नाही कळले । तरि तें वाचणें वाउगेंचि गेलें । वेडयापरी ॥५२॥
वेडा बोलूनि फार गेला । परि त्याचा अर्थचि नाही उमगला । म्हणोनीच तो वेडा ठरला । लोकांमाजीं ॥५३॥
बोलेल जें कांही वाचेने । तारतम्य ठेवोनि विवेकाने । वर्तेल तैसाचि जीवेंप्राणें । त्यासचि म्हणती मानव ॥५४॥
जो फार बोलूनि जातो । परि एकावरि न निश्चित राहतो । त्यासचि वेडा आम्ही म्हणतों । आपुल्या विचारें ॥५५॥
लोकीं हाचि घुसला वेडेपणा । त्याने धर्माचा केला धिंगाणा । माणूस दिसला भाविक शहाणा । तरी तो पाहतां वेडाचि ॥५६॥
मज भेटला ऐसा एक सज्जन । म्हणे ऐकाल काय माझें कथन ? मीं केलें ग्रंथवाचन । बारा वर्षे ज्ञानात्मक ॥५७॥
ब्रह्मसूत्रें उपनिषदें पुराण । वाचलें भागवत अध्यात्मरामायण । तरीहि ब्रह्मज्योतीसि अजून । देखिलें नाही ॥५८॥
आता किती पारायणें करावीं । जेणें कळेल ब्रह्मचवी ? सांगाल काय खूण बरवी । विशद करोनिया ? ॥५९॥
मीं तयाशीं विनोद केला । म्हणालों, कसे पावाल परमार्थाला ! त्यासाठी पाहिजे खल केला । सदग्रंथांचा ॥६०॥
ग्रंथ टाकावे बारीक खलून । चूर्ण सकाळीं घ्यावें दुधांतून । अथवा पाण्याचेंहि अनुपान । चालेल शिळया ॥६१॥
त्या गृहस्थाने घरीं जाऊन । ग्रंथ फाडले दणादण । खल घातला चूर्णप्रमाण । बाह्यबुध्दि तयाची ॥६२॥
सकाळीं येवोनि विचारी । किती दिवस प्यावें तरी ? सांगाल काय कैशापरी । घेत जावें घोळूनि हें ? ॥६३॥
मी म्हणालों, वारे बुध्दि ! अंधानुकरणा धावे आधी । तारतम्य नसतां सांगा कधी । अनुभव येईल वाचका ? ॥६४॥
अरे ! तुज हेंहि नाही कळलें । ग्रंथ फाडोनि चूर्ण केलें । याने का ज्ञान अनुभवलें । जाईल बाबा ? ॥६५॥
तो म्हणाला, आम्हांसि काय ? कोणी सांगेल तैसा करावा उपाय । ऐसींच पारायणें केलीं, संवय । रोज रोज लावूनिया ॥६६॥
कळलें नाही ब्रह्मसूत्र । उपनिषद पंचीकरण विचारसागर । वाचले मुखें भराभर । सविस्तर टीकाग्रंथ ॥६७॥
आता कुठवरि पाठ करावें ? मनें धरिलें आपणांस विचारावें । शंका धरोनि आलों जीवें । आपणापाशी ॥६८॥
आपण सांगितलें चूर्ण करा । तैसेंचि केलें जाऊनि घरां । आलों पुढलिया विचारा । घेण्यासाठी ॥६९॥
कुणीकडे तोंड करावें पिण्यांत ? सांगाल तैसें घेऊं सतत । मी म्हणालों, वारे श्रध्दावंत ! अंधानुकरणी लोक हे ! ॥७०॥
बाबा ! मीच खरा चुकलों । तुझ्याशीं विनोद करोनि ठकलों । पाहावयासि होतों लागलों । बुध्दि तुझी ॥७१॥
एवढे ग्रंथराज वाचोन । किती आलें तारतम्यज्ञान । याचें समजलें मज धोरण । तुझ्या कृतीवरोनि ॥७२॥
कर्मठ अंधानुकरणी बुध्दि । त्यासि ब्रह्मज्ञान नको आधी । शुध्दता अंतर्मुखता साधी । लागेना अवधि तया मग ॥७३॥
म्हणोनि सांगतों खरें ऐक । ग्रंथीं वाचावें चारित्र्य सम्यक । राहणी कळेल ज्यांत उदबोधक । रोजच्या व्यवहाराची ॥७४॥
कधी उठावें कधी झोपावें । कैसें स्नान, ध्यान करावें । कोणतें कर्म आचरावें । पुण्यश्लोक व्हावया ॥७५॥
कोणत्या भावें उद्योग करावा । कोणाचा उपदेश ऐकावा । किती घ्यावा किती सोडावा । विचार-बळें ॥७६॥
हेंचि पठन आधी करावें । मग कर्तव्य-तत्पर व्हावें । पुढे पुढे अनुभवीत जावें । ज्ञान-पुढील मार्गाचें ॥७७॥
ऐसे अनुक्रमें ग्रंथ वाचावे । तरीच ज्ञान संपादावें । एरव्ही पारायणें करीत मरावें । काय होतें तयाने ? ॥७८॥
शास्त्रप्रचीति गुरुप्रचीति । मगचि होते आत्मप्रचीति । या म्हणण्यासीच आहे निश्चिती । अनुभवाअंतीं ॥७९॥
संतीं कथिलें शास्त्रपठन । तें सदग्रंथांसि उद्देशून । परि अधिकारपरत्वेंचि वाचन । सफल जीवन करीतसे ॥८०॥
एरव्ही ग्रंथभांडार बहुत । नाना विध्दानांचें बहु मत । कोणतें निवडावें समजोनि त्यांत । आपणासाठी ? ॥८१॥
नाना अधिकारांचे नाना ग्रंथ । अधिकारपरत्वें असती संमत । आपला कोणता मार्ग त्यांत । निवडोनि घ्यावा ? ॥८२॥
हें तों समजणें आपल्या आधीन । कळावी अधिकारपात्रता पूर्ण । हेंहि समजण्याचें ज्ञान । ग्रंथींच आहे दाविलें ॥८३॥
मूर्ख पढतमूर्ख विवेकी शुध्द । बध्द मुमुक्षू साधक सिध्द । ग्रंथींच दाविला पात्रता-भेद । उन्नतिमार्गासहित ॥८४॥
आपणासि कोण रोग जडला । निश्चित कळावा ज्याचा त्याला । त्याचि रोगाचा उपाय केला । पाहिजे आधी ॥८५॥
परि जो आपणासि ओळखूं नेणे । त्यासि सहाय्य लागे देणें । त्यासाठी पाहिजे साक्ष घेणें । संतसज्जनांची ॥८६॥
नाहीतरि ग्रंथीं सर्वचि विषय । कोणी उपाय कोणी अपाय । अवस्थाभेदें हें सर्व होय । साधक-बाधक ॥८७॥
यासाठी हवी सत-संगति । ज्यासि नाही सूक्ष्म मति । कुणी आपुल्याच विचारें चढती । आत्मानुभूति पावावया ॥८८॥
कोणी संस्कारचि घेवोनि आला । कोणी येथे शिकोनि रंगला। कोणास कांहीच न कळे बोध भला । संतानुभवाचा ॥८९॥
म्हणोनि ग्रंथ वाचावे त्याने । मन लावोनि अर्थ समजणें । हें अनुभवियांकडोनि निवडणें । आपुल्यासाठी ॥९०॥
ग्रंथांचें भरलें महाभांडार । त्यांतूनि निवडती निवडणार । सार तेवढें देती साधकांसमोर । संतसज्जन ॥९१॥
मुळांत सारचि संतांची वाणी । जनासि तारी मार्ग दावूनि । ग्रंथ ही शब्दमूर्तीच ज्ञान-खाणी । दिव्य संतांची ॥९२॥
परि तयांचा लावितां अर्थ । सामान्य बुध्दि पडे भ्रमांत । काल बदलोनि होतो अनर्थ । तारतम्य न कळतां ॥९३॥
यासाठी देशकालानुसार । ग्रंथांचें उकलोनि दावावें अंतर । ऐसा असतो अधिकार । पुढील संतांचा ॥९४॥
साधुसंत अनुभवाचे सागर । त्यांना कळतो पुढील व्यवहार । जीवांचा कैसा होय उध्दार । काय करावें त्यालागी ॥९५॥
कोणास काय साधन द्यावें । हें त्यांसीच कळे स्वभावें । म्हणोनि गुरुप्रचीतीस घ्यावें । बोललों आम्ही ॥९६॥
कोणते ग्रंथ कोणी वाचावे । संतीं कथियलें तें बरवें । सदाचार नित्यनेम घ्यावे । वाचोनि आधी ॥९७॥
झोपावें उठावें ठरल्या वेळीं । आपुलीं कामें करावीं सगळीं । कोणा दु:ख न व्हावें भूमंडळीं । आपणासाठी ॥९८॥
आपुलें कर्म संपवोनि सगळें । जो दुसर्याच्या सेवेसि वळे । तोचि चढे कार्य-बळें । लौकिकासि आणि उन्नतीसि ॥९९॥
ऐसे विचार जया ग्रंथीं । तेचि प्रथम वाचावी पोथी । ठेवोनि लक्ष मुख्य अर्थी । जीवा उन्नतिपदा न्याया ॥१००॥
जयास व्यवहार समजला पूर्ण । सक्रिय कळलें साधनाज्ञान । तेणेंच ब्रह्म कोण आत्मा कोण । समजावें हें ग्रंथपठनीं ॥१०१॥
समजोनि घ्यावें पंचीकरण । आत्मअनात्म ब्रह्मविवरण । कळल्यावरि नेघे मन । मिथ्याभ्रांतिविषयीं आशा ॥१०२॥
मगचि खरें श्रवण मनन । निदिध्यास वाढेल मनापासून । तेणें साक्षात्काराची खूण । कळेल ठायीं आपुल्या ॥१०३॥
साक्षात्कार ब्रम्हज्योति । होईल आत्मानंदाची प्राप्ति । आत्मरंगें विलीन वृत्ति । ब्रह्मामाजीं होतसे ॥१०४॥
जयाची दृष्टि ऊर्ध्व झाली । विषयांतूनि उन्मनींत गेली । त्याची समाधि सुखें डोलली । अखंडाकार ॥१०५॥
देवभक्त नाही दुजे । कळलें अनुभवाने सहजें । विश्वीं विश्वाकार होइजे । ऐसें झालें मग तेथे ॥१०६॥
ग्रंथवाक्याने वृत्ति चढली । गुरुबोधाने अनुभवीं वळली । आत्मरुचीने तदाकार झाली । अखंड जैसी ॥१०७॥
मग कशाचें ग्रंथवाचन ? जें जें करील तेंचि समाधान । जें बोलेल तेंचि ग्रंथज्ञान । होईल स्वयें ॥१०८॥
हर्ष नाही जन्म घेतां । दु:ख नाही मृत्यु होतां । अंगीं बाणे स्थितप्रज्ञता । कैवल्यरूप तयाच्या ॥१०९॥
याचि पूर्ण सुखासाठी । ग्रंथ वाचणें उठाउठी । जीवनाची पूर्णता शेवटीं । यांतचि आहे ॥११०॥
ही आत्मप्रचीति पावावयासि । हाचि मार्ग आहे साधकासि । प्रथम सदग्रंथ-अवलोकनासि । केलें पाहिजे ॥१११॥
एरव्ही जो पूर्वीच उमगला । त्यास नकोचि हा गलबला । तो सरळचि आत्मप्रचीतीसि गेला । समाधानें ॥११२॥
आत्मप्रचीति म्हणजे दिव्यदृष्टि । ज्यांत व्यष्टि, समष्टि आणि परमेष्टि । आपणचि अनुभवतो उठाउठी । अगणित रूपें एकपणें ॥११३॥
असो देव, संत, मानव । पापी, पुण्यवान सर्व । मूळरूपाचा घेतां अनुभव । चैतन्यघन विश्वचि ॥११४॥
ऐसा अनुभव ज्याने घेतला । तो विश्वाच्या उपयोगा आला । त्याचा व्यवहार व्यापक झाला । सकळासाठी ॥११५॥
याचि भावें जनसाधारणासि । ग्रंथ द्यावेत वाचावयासि । त्यानेच लागेल मार्ग त्यांसि । विश्वरूप-दर्शनाचा ॥११६॥
परंतु ज्यांसि व्यवहारपात्रता नाही । त्यांनी करावी अध्यात्म-घाई । हें तों होईल अनाठायी । ग्रंथपठन एकांगी ॥११७॥
शुध्दाचरण मागाहूनि वाचलें । पहिले वेदान्तपठन केलें । वळणीचें पाणी वरि चढविलें । होईल ऐसें ॥११८॥
शब्दें म्हणतील सर्व ब्रह्म । मना आलें तें करितील कर्म । नास्तिकतेहूनि महाभ्रम । माजेल लोकीं शब्दज्ञानें ॥११९॥
गांवीं दु:खांची पेटली आग । तो म्हणेल सच्चिदानंद जग । हें सर्व बहुरूप्याचें सोंग । वाटेल जना वेडयापरी ॥१२०॥
यास्तव गांव होईल शुध्द । प्रेम, ज्ञान, सत्य आनंद । सर्वांस लाभेल ऐसे सुबुध्द । ग्रंथ गांवीं लावावे ॥१२१॥
होईल जीवनाची उन्नति । ज्ञानविज्ञानाची प्रगति । ऐसीच असावी ग्रंथसंपत्ति । गांवोगांवीं ॥१२२॥
सर्वांस कळावें कर्तव्य आपुलें । कैसें होईल सर्वांचें भलें । तनमनधनें फळेफुले । विश्व हें कैसें, कळावें ॥१२३॥
आम्ही रहिवासी सर्वचि मुळचे । विश्वरचाना हें नाटक आमुचें । आपुल्या परीने रंगविणें साचें । आहे आम्हां ॥१२४॥
ऐसें जाणोनि स्वरूपासि । वर्ते तो जिंकी या खेळासि । तुकडया म्हणे हेंचि कळावयासि । कथिली असे ग्रामगीता ॥१२५॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । ग्रंथपठनाचा कथिला भावार्थ । चाळिसावा अध्याय संपूर्ण ॥१२६॥ग्रंथ खरेदी
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
*****************
ग्रामगीता अध्याय एकेचाळीसावा
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
ईश्वरें व्यापिलें हें विश्व । म्हणोनि जगचि आम्हां देव । विश्वाचा मूळ घटक गांव । ग्रामगीता त्यासाठी ॥१॥
यांत ग्रामाचा जयजयकार । सर्व तीर्थक्षेत्रांचें ग्रामचि माहेर । ग्राम हा विश्वाचा पाया सुंदर । ग्राम नसतां प्रलयचि ॥२॥
ग्राम म्हणजे देवमंदिरे । मानव देवमूर्ति सुंदर । सर्वांची सेवा समप्रकार । तीच पूजा आमुची ॥३॥
ग्रामगीता शाब्दिक सेवा । परि दृढ करी संस्कारांचा ठेवा । तेणें ईश्वरी राज्य गांवां । नांदेल सदासर्वकाळ ॥४॥
ग्रामगीता दु:खांसि नाशवी । ग्रामगीता मृत्यूसि हसवी । ग्रामगीता सहकरीतत्त्व वाढवी । मानवधर्मा फुलवाया ॥५॥
चाळीस दिवस म्हणजे मंडळ । ऐसीं अनुष्ठानें प्रांजळ । करितां गांव सुधारेल सकळ । संस्कारें ग्रामगीतेच्या ॥६॥
म्हणोनि चातुर्मास्यादि निमित्तां । मंदिरीं, पारीं, बैठकींत बसतां । वाचावी हर्षभरें ग्रामगीता । रंग रंगणीं आणोनिया ॥७॥
परि ऐसी नसावी भावना । अर्थहीन करितां पारायणा । ना कळे तरी पुण्यराशी नाना । जमा होतील आमुच्या ॥८॥
माझ्या मतें हें अज्ञान । दूर सारोनि करावें वाचन । आधी शिकावें अर्थज्ञान । ग्रंथपठन करितांना ॥९॥
प्रथम हीच महत्त्वाची खूण । ग्रंथवाचनाचें कळावें ज्ञान । आपुलें वाचन आपणा समजून । बोध व्हावा उत्तम ॥१०॥
असेल मित्रमंडळी बसली । त्यांनाहि समजावी आपुली बोली । नाहीतरि वाचनपठनें केलीं । कोणा न कळलें तरि काय ? ॥११॥
काय वाचतो याचें ज्ञान । नाही वाचकासीच झालें पूर्ण । श्रोते पळती उगेच उठोन । अर्थ काय वाचनासि ? ॥१२॥
कोठे थांबावें वाचकांनी । कोठे वाचावें जोर देवोनि । कोठे रंगवावें गंभीरपणीं । कळलें पाहिजे वाचकां ॥१३॥
ऐसें जंव कळलेंच नाही । केलीं पारायणें सर्वहि । लक्ष नसे अर्थप्रवाहीं । तरि तें व्यर्थ वाचन ॥१४॥
वाचतांनाचि बोध होतो । अंगीं स्फुरणभाव उठतो । कर्म करावयासि वळतो । जीव जैसा अंतरीं ॥१५॥
ऐसें वाचन आधी शिकावें । तरीच ग्रंथपठन करावें । मग आपणासि ओळखीत जावें । अधिकारपरत्वें वाचकें ॥१६॥
वाचक असावा आचारशील । तरीच श्रोत्यांवरि परिणाम करील । नाहीतरि होईल टिंगल । जनतेमाजीं तयाची ॥१७॥
मुखाने ग्रंथ वाचावे । घरीं विपरीत आचरावें । तैसेचि बाहेरि गोडवे । गाती लोक थट्टेने ॥१८॥
मुखें वाचतो सत्य बोलावें । परि सत्य करणेंचि नाही ठावें । म्हणे मज सत्यवान म्हणावें । कैसे म्हणतील ग्रामवासी ? ॥१९॥
मी तों धनावरचा सर्प बरवा । परि मला उदार दाता गौरवा । ऐसें कोण मानील आपुल्या गांवां ? सांगा सांगा ॥२०॥
रंजल्यासि न दे पाणी । म्हणे मज म्हणा दानशूर राणी । ऐकेलचि का ऐसें कोणी । किती वाजविले चौघडे तरी ? ॥२१॥
पानतंबाखू खावोनि आला । प्रवचनीं कीर्तनीं शाळेंत बसला । हसती श्रोते-विद्यार्थी त्याला । व्यसनें सोडा बोलतां ॥२२॥
एक पंडित जेवणासि बैसला । आरंभ शांतिपाठासि केला । परि जरा वाढण्यासि उशीर झाला । मारलें त्याने बाइलेसि ॥२३॥
ती म्हणे वाहवा ऐसी शांति ! उत्तम मंत्राची फलश्रुति ! तोंडाने पति दिव्य बोलती । आचरण करिती क्रूराचें ॥२४॥
ऐसें न व्हावें आतातरी । असोत वाचक वक्ते शिक्षक भारी । आहे सर्वांवरीच जबाबदारी । आधी आत्मशुध्दीची ॥२५॥
उपदेशक वाचक आचारशील । असले तरीच भाव फळेल । श्रोत्यांचें हृदय-परिवर्तन होईल । लागवेगेंसि ॥२६॥
वक्ता असेल सरळ सात्विक । तरीच श्रोते बनतील भाविक । जनलोक करितील कौतुक । बघोनि दोघांसि ॥२७॥
म्हणोनि हेंचि वरिष्ठांनी करावें । जैसें सांगावें तैसेंचि वागावें । तरीच होईल त्यांच्या प्रभावें । कल्याण ग्रामजीवनाचें ॥२८॥
येथे श्रोत्यांनी विचारलें । आपण अर्थासि वर्तनासि महत्त्व दिलें । परि कित्येक ग्रंथीं सांगितलें । पारायणचि फलदायी ॥२९॥
कोणी म्हणती ग्रंथाचें पारायण । करितां मिळेल पुत्र, धन । होईल भाग्याचा उदय पूर्ण । पारायणें ग्रंथाच्या ॥३०॥
कोणी म्हणती मंत्रचि जपा । हजारोंनी करा संकल्पा । म्हणती सांगतों मार्ग हा सोपा । ज्ञान मिळेल न वाचतां ॥३१॥
कोणी म्हणती अनुष्ठान करा । वाचा भागवत-गीता-ब्रह्मसूत्रा । मोक्ष चालत येईल घरां । कानीं पडतां शब्दचि ॥३२॥
कोणी म्हणती ग्रंथ ज्या घरीं । तेथे नये काळाची फेरी । याचा मेळ कोणेतरी । बसेल सांगा ? ॥३३॥
याचें उत्तर ऐका सज्जन ! फलश्रुति ही रोचक पूर्ण । ग्रंथ-प्रचार व्हावा म्हणून । दिलें प्रलोभन दावूनि ॥३४॥
त्यांत एक आहे उत्तमहि । लोक ठेविती ग्रंथ संग्रहीं । त्यापासूनि लाभ घेई । कोणी तरी थोडा-बहु ॥३५॥
कानीं पडो एकचि वचन । परि त्यांत असे महापुण्य । हेंहि ओढ लागावीं म्हणून । कथिलें असे थोरांनी ॥३६॥
नुसत्या पारायणाचें महत्त्व । त्यांतहि हेंचि आहे तत्त्व । कधीतरी येईल आचरणीं सर्व । संस्कार होतां ॥३७॥
कराया सांगितलें जप-अनुष्ठान । तेंहि शुध्द कराया जीवन । क्रमाने तितुके दिवस तरि मन । शुध्दाचरणीं लागाया ॥३८॥
म्हणोनि मी या सकलां मानितों । परि जपणारे एकांगी समजतों । तेणेंचि लाभ हातां न येतो । बहुतेकांच्या ॥३९॥
घोडयासि पाणी दाखवावें । म्हणतां तेंचि धरिलें जीवें । पाणी पाजणें नाही ठावें । तैसें झालें लोकांचें ॥४०॥
ऐसेचि नाना ग्रंथ वाचले । परि तैसें मुळीच नाही वर्तले । कोण्या तोंडाने मागावें भलें । फळ तयांसि ? ॥४१॥
कांही ग्रंथांतहि अवास्तवपणा । हें न राहवें सांगितल्याविना । त्यांनी श्रध्देचा होतो धिंगाणा । फल न येतां हातामाजीं ॥४२॥
ग्रंथीं अपार फलश्रुति कथिली । परि अनुभवासि नाही आली । हजारो लोकांनी आम्हां सांगितली । कर्मकहाणी ॥४३॥
ग्रंथीं सुखाची फलश्रुति । म्हणोनि वाचती सकाम पोथी । आळसी भोळे ओढवोनि घेती । अधिक आपत्ति दानादिकें ॥४४॥
कोणी कोणास साधन सांगती । सोने देवोनि करा म्हणे समाप्ति । घरोघरीं व्रतवैकल्यें आचरती । भुलती बायाबापडया ॥४५॥
व्रतांची वाचती कहाणी-पोथी । दान-उद्यापन करा म्हणती । नाहीतरि होईल अधोगति । धाक देती जनतेसि ॥४६॥
कांही उदरनिमित्तासाठी । पोथ्या वाचती उठाउठी । सोन्याचे करोनि ग्रंथ शेवटीं । अर्पा म्हणती देवासि ॥४७॥
लोकहि असती आसक्त बावरे । कांहीहि सांगोत सांगणारे । धावोनिया करिती बिचारे । व्रतसाधनें वेडयापरी ॥४८॥
फळ न लाभतां मग चिडती । म्हणती काय चाटावें ग्रंथाप्रति । रोज वाचावे ग्रंथ किती । तरीहि पुत्र होईना ॥४९॥
पतिपत्नी आरोग्याने वागेना । नवस करिती दगडोबासि नाना । काय होईल बापहो ! सांगाना । ऐशा रीतीं ? ॥५०॥
घाला उंबरीस प्रदक्षिणा । परि सुधारूं नका आचरणा । भोजना करा जडान्न पुन्हा । रोगी व्हाया वेळ कैचा ? ॥५१॥
कलकत्त्याच्या गाडींत बसावें । आणि म्हणे देवा ! पंढरीसि न्यावें । ऐशा प्रार्थनेसि फळ यावें । कोण्या प्रकारें ? ॥५२॥
एकाने चोरी केली ग्रामाप्रति । म्हणती त्यास आली साडेसाती । ती जावया वाची शनीची पोथी । चोरी कांही सोडीना ॥५३॥
शेवटीं पोलिसाहातीं सापडला । गुन्हा त्याचा साक्षींत आला । तो पुसतो आपुल्या गुरुला । साधन सांगा सुटण्याचें ॥५४॥
गुरुहि होता लाचलुचपती । म्हणे वाच शनीदेवाची पोथी । शिवलीलामृताचा अध्याय चित्तीं । सदभावने आठवी ॥५५॥
लावी देवीचें पुराण । करी नेटाने सत्यनारायण । आम्हांसि देई सुवर्णदान । मुक्त होशील लवकरचि तूं ॥५६॥
त्याने तैसेंचि सर्व केलें । ग्रंथ साधन करोनि वाचले । बुवाब्राह्मणा धन उधळलें । दंड कांही चुकेना ॥५७॥
शेवटीं पडला कैदेमाजीं । म्हणे दाखवा तो गुरु पाजी । त्याने केली फजीती माझी । धन तेंहि गमावलें ॥५८॥
वाचली नेमधर्माने पोथी । परि जेल न चुके मजप्रति । काय करावी देवपूजा ती ? ग्रंथ जाळावे अग्नीवरि ? ॥५९॥
बिचारा चोरी करणें सोडीना । पण गुरुसि मागे साधना । काय करिती गुरु, ग्रंथ नाना ? वाचणारा लबाड हा ॥६०॥
ऐसें जन्मभरि साधन केलें । तरी मूर्ख ते मूर्खचि राहिले । याने सांगणारांचेंहि पतन झालें । फिकें पडलें साधन त्यांचें ॥६१॥
ऐसें कासयासि करावें । सत्य तेंचि शोधूनि आचरावें । आपण बुडावें दुसर्या नर्कीं न्यावें । ऐसें न करावें स्वार्थभरें ॥६२॥
सांगणाराने तर्कशुध्द सांगावें । करणाराने सत्यचि करावें । तेव्हाचि फळ अनुभवास यावें । होतें ऐसें ॥६३॥
हीच मुख्य घेवोनि धारणा । झाली ग्रामगीतेची रचना । हा ग्रंथ पुरवी सर्व कामना । कैसा तें ऐका ॥६४॥
हा आहे प्रखर शब्दबाण । जाय वाचकाचें हृदय भेदून । जैसी मूर्ति घडे टाकी लागून । तैसें वाचनबोधें होतसे ॥६५॥
ग्रामगीता नव्हे पारयणासि । वाचतां वाट दावी जनासि । समूळ बदली जीवनासि । मनीं घेतां अर्थ तिचा ॥६६॥
ही नव्हे फुलें टाकण्यासाठी । ही ग्रामाची उध्दारदृष्टि । आजच्या युगाची संजीवनी बुटी । मानतों आम्ही ग्रामगीता ॥६७॥
कोणी दु:खाने होरपळला । कोणी संसारतापें तापला । कोणी असहाय्यपणें संकटीं पडला । त्यासि धीरे दे ग्रामगीता ॥६८॥
कोणी अन्यायें लोकां त्रासावी । त्यासि ग्रामगीता मार्गीं लावी । देवत्व सर्वांचें जागवी । दिव्य व्हाया जग सारें ॥६९॥
याने संस्कार बनतील उत्तम । मनुष्य होई चारित्र्यक्षम । सुखशांति लाभेल करितां उद्यम । सांगितले जे या ग्रंथीं ॥७०॥
अल्पबुध्दि जाईल विलया । वाचतां ज्ञान होईल तया । खरा धर्म अंगीं ये सखया ! जीवन उज्ज्वल होतांचि ॥७१॥
प्रेम आजवरि होतें एकटें । ग्रंथ-चिंतनें वाढेल चोखटें । सर्वांभूतीं दयाभाव प्रकटे । ऐसी फलश्रृति ग्रंथाची ॥७२॥
द्वेषबुध्दीचें अज्ञान । ग्रंथ वाचतां जाईल पळोन । सत्कार्य कराया धावे मन । करितां अनुष्ठान सक्रिय ॥७३॥
ग्रामगीता वाचूनि करी चिंतन । त्यास होईल आत्मज्ञान । दिव्यदृष्टीची संत-खूण । कळे त्यासि आचरतां ॥७४॥
ग्रामगीता ग्रंथ वाचला । तैसाचि गांवीं वर्तूं लागला । त्यासि शत्रुचि नाही उरला । ग्राममाजीं कोणीहि ॥७५॥
सामुदायिक वाढली वृत्ति । सारें गांव त्याची संपत्ति । ग्रामगीता घडवी मूर्ति । ऐशा आदर्श मानवाची ॥७६॥
ग्रामगीतेंतील उद्योगचिंतन । जो कोनी करील मन लावून । त्याचे घरीं धनधान्य । भरपूर येईल समजावें ॥७७॥
आरोग्याचा वाचील धडा । आणि घेईल हातीं फडा । रोगराईचा होईल निवाडा । तत्क्षणीं त्याच्या ॥७८॥
कार्यास लागतां तत्क्षणीं । फलश्रुतीसि आरंभ होय झणीं । चरित्र सुधरे ग्रंथ ऐकोनि । लक्षांत घेतां अर्थ त्याचा ॥७९॥
एकांतीं बैसोनि वाचली गीता । अर्थ समजोनि मनन करितां । जीवनीं उतरे आदर्शता । घरादारांसहितहि ॥८०॥
ऐसें घर आदर्श झालें । कीर्ति-स्फूर्तीने गांवीं चमकलें । मग लोक सारे तैसेचि वर्तले । दिसती जनीं ॥८१॥
हा केवढा लाभ झाला ! सर्व लोकांना स्वर्ग जणू लाभला ! आपुला गांव आदर्श केला । ग्रामगीता वाचूनिया ॥८२॥
ग्रामगीतेचें फळ नव्हे एकटयासि । एकासहित आहे ग्रामासि । उध्दरतील गांववासी । वाचूनि वर्ततां ग्रामगीता ॥८३॥
एक एक साधन वाचतां । आणि मग तैसेंचि वर्ततां । केवढे लाभ येतील हातां । सांगतां नये ॥८४॥
ग्रामगीतेंतील संस्कार-रचना । उपासनेची तत्त्वयोजना । ग्राम-रक्षण ग्राम-सुधारणा । ग्राम-रचना आदर्श ॥८५॥
नाना कलांची उन्नति । शेती-सुधारणा श्रम-संपत्ति । समजूनि येतां विद्या-महती । विकास होई जीवनाचा ॥८६॥
सामुदायिक प्रार्थनेची प्रथा । रामधून, संत-उत्सव व्यवस्था । साधनसंपदा ऐकतां वर्ततां । शांति लाभे सर्वांसि ॥८७॥
गायीगुरांची वाचतां सेवा । करितां तैसेंचि आपुल्या गांवा । दहीदुधाचा दुष्काळ पहावा । न लागे कधी ॥८८॥
विवाहादि सर्व संस्कार । समाजीं होतील सुखकर । मागासल्यांची सुधारणा उध्दार । करील राष्ट्राचा ॥८९॥
स्त्रिया-मुलें होतील आदर्श पूर्ण । हा ग्रंथ घरीं होतां पठन । ग्राम होईल वैकुंठभुवन । वाचतां वर्ततां ग्रामगीता ॥९०॥
भिकारी बेकारी गांवीं राहीना । सत्तेचीं बंधनें नुरतील कोणा । सर्वचि शिकतील शहाणपणा । ग्रामगीता वाचूनिया ॥९१॥
आरोग्यसंपन्न होतील जन । नाही गांवीं तंटाभांडण । अन्याय, व्यसनें, कारस्थान । जातील लया द्वेषादि ॥९२॥
गांवीं वाढेल संघटना । बळ लाभेल सकळांच्या मना । नांदेल विश्वकुटुंबाची रचना । आपुल्या गांवीं ॥९३॥
ग्राम नांदेल स्वर्गापरी । सुखी होतील नरनारी । परमार्थाच्या खुलतील घरोघरीं । आनंद-लहरा ॥९४॥
जी जी इच्छा कराल मनीं । ती ग्रामदेवता देईल पुरवूनि । यांत संदेहचि नाही माझिया मनीं । उरला श्रोतेवक्तेहो ! ॥९५॥
येथे नाही अंधश्रध्दा । प्रत्यक्ष अनुभव मिळे सर्वदा । जे जे शब्द निघती ते गोविंदा । प्रिय समजावे निश्चयेंसि ॥९६॥
मी पंडित नोहे आपुल्या ठायीं । सांगावया पंडिताई । ईश्वराचीच प्रेरणा ही । प्रकट झाली ग्रंथाद्वारें ॥९७॥
माझिया बालरूप वृत्तींतूनि । स्फुरला तो गुरुदेव चक्रपाणी । चंद्रभागेतिरीं उमटली वाणी । केली ऐकोनि लिपिबध्द ॥९८॥
जैसे जडजीवाने वेद बोलावे । पंगूने हिमगिरीस ओलांडावें । तैसेंचि दासाकडोनि घ्यावें । गीताकथन मानतों मी ॥९९॥
म्हणोनि पुन:पुन्हा प्रार्थितो । माझा आवाज नव्हे सत्य तो । या शरीराचा शंख वाजवितो । ध्वनि काढतो भगवंत ॥१००॥
भगवदगीतेचें हें सक्रिय रूप । प्रकट झालें आपोआप । अर्जुनासम व्हावे महाप्रताप । सर्व ग्रामीन म्हणोनि ॥१०१॥
गीता बोधिली अर्जुनाला । ग्रामगीता ही सर्व ग्रामाला । राहूं नये कोणी मागासला । म्हणोनि बोलला देव माझा ॥१०२॥
मी तों केवळ बालकापरी । संतांचे आशीर्वाद घेतले शिरीं । म्हणोनिच प्रकटली धीट वैखरी । देहबासरीमधूनिया ॥१०३॥
श्री ज्ञानराज गुरुमाउली । त्यांच्या कृपादृष्टीची साउली । परंपरेने फळासि आली । ग्रामगीतास्वरूपाने ॥१०४॥
ग्रामगीतेंत ज्यांचीं नांवें, चित्रण । त्या सर्व संतांचेंचि सहवरदान । ऐसें मी मानतों विश्वासें पूर्ण । फळेल निधान ग्रामगीता ॥१०५॥
ग्रामगीता माझें हृदय । त्यांत बसले सदगुरुराय । बोध त्यांचा प्रकाशमय । दिपवोनि सोडील ग्रामासि ॥१०६॥
शब्दरचना गावंढळ । हें मी समजतों मनीं प्रांजळ । दोष तो तो माझा सकळ । गुण तो तो थोरांचा ॥१०७॥
वालुकापात्रीं गंगाजळ । तें पापनाशक मधुर निर्मळ । तैसें वाचक श्रोते केवळ । शुध्द घेवोत समजोनि ॥१०८॥
आमचें गांवचि मागासलें । तेथे जाड शब्द जरि योजिले । ग्रामीण म्हणतील नाही कळलें । सांगा अर्थ पंडितहो ! ॥१०९॥
घरोघरीं पंडित कुठले ? आहेत तेहि विकृत झाले । पोटापाण्यासि लागले । नोकरी धरिली धनिकांची ॥११०॥
जे जे कोणी उरले उत्तम । त्यांनाहि कांही रूढिभ्रम । ते म्हणतील हा उपक्रम । वेदबाह्य अधार्मिक ॥१११॥
क्वचित असती विद्वदरत्न । सर्वचि याती-यातींमधून । त्यांना आहे हा ग्रंथ प्रमाण । मानतों मी अंत:करणें ॥११२॥
ऐसियांसीच पंडित मानावें । जे असतील सात्विक संत स्वभावें । त्यांचे पिसाट शब्दचि ऐकावे । सुधारिती जे ग्रामासि ॥११३॥
धुंडाळूं नयेत पंडित कोणी । वाचक निवडावा गांवांतूनि । आचारशील सात्विक इमानी । सुबुध्द प्रेमळ कार्यकर्ता ॥११४॥
जो ग्रंथहि प्रेमें वाचतो । नांगर धराया शेतींतहि जातो । वेळ पडल्या सेवा करितो । गांवलोकांची पाहिजे ती ॥११५॥
ऐसा असेल कोण्याहि जातीचा । अथवा धर्म, पंथ, देश-विदेशींचा । तरी तो चालेल, ग्रामोन्नतीचा । जिव्हाळा जया ॥११६॥
पंडितांनी वाचूं नये । ऐसें माझें म्हणणें नोहे । परि काम न अडावें त्याशिवाय । नको निष्क्रिय वाद कोणी ॥११७॥
पंडित पुराणिक विद्वान । यांनीहि अवश्य करावें वाचन । समाजाचे जबाबदार म्हणोन । यथार्थ ज्ञान द्यावें सर्वां ॥११८॥
ग्रामीं विचारी शिक्षकजन । त्यांनी वाचावी ग्रामगीता पूर्ण । सकळांस द्यावी समजावोन । लहान-थोरां जमवोनि ॥११९॥
जमवोनि श्रोते वृध्द-तरुण-बाल । मुली-तरुणी-माता सकल । मागासल्यांसहि लावावी चाल । उन्नतीची हळूहळू ॥१२०॥
जे जे नारीनर साक्षर असती । त्यांना माझी नम्र विनंति । वाचा ग्रामगीता, अर्थसंगति । समजावोनि द्या निरक्षरां ॥१२१॥
जो समजोनि हा ग्रंथ न वाचे । ग्राम मागासावें असें मत ज्याचें । तो मार्ग धरील अधोगतीचे । पाप न चुके तयालागी ॥१२२॥
पाप म्हणजे बिघाड करणें । पाप म्हणजे कुमार्ग धरणें । पाप म्हणजे बळीच राहणें । गरीब प्राण्यां पिळोनि ॥१२३॥
ऐसें नसावें वाचकाचें । जें ज्ञान मिळेल ग्रामगीतेचें । तैसेंचि वर्ततां वर्तवितां पुढचे । दोष जळती बाधक जे ॥१२४॥
ग्रामगीता ग्रंथ वाचोन । कोणी घेऊं नयेत पैसे आपण । ग्रामासीच लाभाया महत्त्व पूर्ण । धन वेचावें वक्त्याने ॥१२५॥
ग्रामगीता ग्रंथ सुंदर । निर्मावया गांवाचें चारित्र्य । प्रचार करावा सर्वत्र । होऊनि पवित्र आपणहि ॥१२६॥
जे कोणी माझे स्नेही प्रेमळ । त्यांनी करावा ग्रंथाचा सुकाळ । घरोघरीं चालवावा प्रचार । निर्मळ । ग्रामगीता-वाचनाचा ॥१२७॥
ग्रामांत खेळावी ग्रामगीता । सर्वांस पाठ असावीं सूत्रें तत्त्वता । प्रमाण द्यावें कोणाचें चुकतां । सर्व आपुले म्हणोनिया ॥१२८॥
ज्याचे हातीं हा ग्रंथ पडला । अचानक मधूनि उघडला । वाचतांचि समजावा उपदेश केला । ग्रामदेवतेने मजलागी ॥१२९॥
मग तयाचा न घडो अपमान । विचार करावा तारतम्य जाणून । कळत नसतां घ्यावी पटवोन । ओवी जाणत्यापासूनि ॥१३०॥
उत्तम उपदेश हातीं लाभला । समजावा शुभदिन आज उदेला । तैसेंचि वर्तावें समजोनि बोला । ग्रामगीतेचिया ॥१३१॥
प्रथम ऐकावें हें गीतावचन । आचरणासि दृढ करावें मन । मग संकल्पावें कार्याचें साधन । ग्राम स्वर्ग करावया ॥१३२॥
प्रथम श्रध्देने वाचन करावें । अर्थ सर्व लक्षांत घ्यावे । उठतां बसतां कार्यास लागावें । ग्रामाच्या आपुल्या ॥१३३॥
यांतचि माझें समाधान । सुधारेल । ग्रामाचें जीवन । पाखंड जाईल वितळोन । मतलबियांचें ॥१३४॥
संपोनि जातील भेदवाद । नांदेल गांवीं प्रेम शुध्द । लाभेल आनंदी आनंद । सर्व जना सर्वभावें ॥१३५॥
मानवांतील असुरत्व, पशुत्व । संपोनि उजळेल देवत्व । जीवनीं संचरेल शुध्द तत्त्व । निरूढ ऐसें सर्वांच्या ॥१३६॥
निसर्ग साह्य दे वेळच्या वेळीं । वृक्षवेली बहरती फुलींफळीं । जलपूर्ण होतील नद्यातळीं । आपुली मर्यादा न सोडतां ॥१३७॥
आरोग्य होईल सर्वांचें भूषण । लोपेल दारिद्रय, उणीव, अज्ञान । कोणीच न राहतील हीनदीन । खळदुर्जन कोठेहि ॥१३८॥
समानतेची समाजरचना । शांति देईल जीवजना । प्रगतीची नवी नवी प्रेरणा । करील भुवना उन्नत ॥१३९॥
शोषण अथवा शासन । यांचें गळोनि पडेल बंधन । नाही शत्रूंचें आक्रमण । स्वयंपूर्ण गांव होता ॥१४०॥
दास होतील त्रिविध ताप । नुरेल वैताग वैर पाप । गांव झालिया स्वर्गरूप । शांति लाभेल विश्वासि ॥१४१॥
स्वर्गींचे अमर हेंचि इच्छिती । हेंचि संतऋषींच्या चित्तीं । ऐसिया गांवीं लाभतां वस्ती । कासया जाती वनांतरां ? ॥१४२॥
सांडोनिया आत्मस्थितिभाव । संतसज्जनांचे समुदाव । ऐसिया गांवा देतील वैभव । आपुल्या जीवन्मुक्तीचें ॥१४३॥
त्यांच्या बोधें धर्मनीति । त्यांच्या सहवासें सेवाभक्ति । त्यांच्या प्रभावें शांति, शक्ति । राहील जागती सर्वकाळ ॥१४४॥
ऐसी ग्रामगीतेची फलश्रुति । ज्यांत संतविभूतींची संकल्पपूर्ति । देवचि गेला बोलूनि चित्तीं । वरदवाणी सज्जन हो ! ॥१४५॥
उभा विश्वाचिया विटेवर । सदगुरु विठ्ठल सर्वेश्वर । त्याच्या कृपेचाचि विस्तार । तुकडया म्हणे ग्रामगीता ॥१४६॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । लाभ घेवोत नित्य ग्रामस्थ । म्हणोनि अर्पिला विश्वरूपा ॥१४७॥ग्रंथ खरेदी
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥