1. धर्म
  2. हिंदू
  3. पोथी आणि पुराण
Written By
Last Updated : शुक्रवार, 7 मार्च 2025 (12:56 IST)

नृसिंहाख्यान संपूर्ण अध्याय (१ ते १०)

नृसिंहाख्यान अध्याय १ ला
परिक्षित राजा म्हणाला, - हे शुकमुने, सर्व भूतांचे हित करणारा, सर्वांना आवडणारा व सर्वांचे ठिकाणी समदृष्टि ठेवणारा असा जो भगवान् त्यानें इंद्राच्या पक्षपातानें केवळ शत्रूप्रमाणें दैत्यांचा वध स्वतः कसा केला बरें ? ॥१॥
 
कारण, साक्षात् परमानंदस्वरुपी अशा निर्गुण विष्णूला देवांपासून कांही कार्यभाग करुन घ्यावयाचा नसल्यामुळे, देवांवर त्याची प्रीति असणें जसें संभक्त नाहीं; तसेंच असुरांपासून त्याला भीति नसल्यामुळें त्यांच्याशीं द्वेष असण्याहि संभव नाहीं ॥२॥
 
असें असल्यामुळें श्रीनारायणाच्या या कृत्याविषयीं आम्हांला मोठा संशय झाला आहे. तेव्हां हे महामुने, तो संशय तूं दूर कर ॥३॥
 
शुक्राचार्य म्हणाले, - हे परिक्षित राजा, ज्यामध्यें अतिशय पुण्यकारक आणि ईश्वरभक्तीची वृद्धि करणारें असें भगवद्भक्त प्रल्हादाचें महात्म्य नारदादि ऋषिनी गायन केलें आहे, त्या अद्भुत हरिचरित्राविषयीं तूं फार उत्तम प्रश्न केलास; करितां व्यासमुनीला नमस्कार करुन ती हरिकथा मी तुला कथन करितों ॥४॥॥५॥
 
हे राजा, भगवान् मायातीत, निर्गुण, जन्मादिविकारशून्य व देहेन्द्रियादिरहित असा असतांहि, आपल्या मायेच्या सत्त्वादि गुणांमध्यें प्रवेश करुन शिक्षेस पात्र असलेल्या दुष्टांना शिक्षा करणारा होतो ॥६॥
 
हे राजा, सत्त्व, रज व तम, हे गुण प्रकृतीचेच आहेत, परमात्म्याचे मुळींच नाहींत. कारण, सत्त्वादि गुणांचा हास किंवा वृद्धि ही एकदम घडत नाहींत ॥७॥
 
सत्त्वगुणांच्या जयकाळीं परमात्मा त्या काळाला अनुकूळ होऊन देव आणि ऋषी यांच्या देहांमध्यें प्रविष्ट होतो व त्यांची वृद्धि करितो. तसाच रजोगुणाच्या जयकाळीं तो असुरांच्या देहांमध्यें प्रविष्ट होऊन त्यांची वृद्धिं करितो; आणि तमोगुणाच्या जयकाळीं यक्ष व राक्षस यांच्या देहांमध्यें प्रविष्ट होऊन त्याचा उत्कर्ष करितो ॥८॥
 
 
जसे अग्नि, उदक, आकाश, इत्यादि पदार्थ, काष्ठ, जलपात्र, घट, इत्यादिकांच्या ठिकाणी त्यांच्यात्यांच्यासारख्या वेगवेगळ्या रुपांनी भासतात, त्याचप्रमाणें भगवानहि देवादिकांच्या ठिकाणी समान होतो. परंतु जसा अग्नि काष्ठादिकांच्या ठिकाणी भिन्नत्वानें अनुभवास येतो, तसा मात्र तो अनुभवास येत नाहीं. तथापि ज्ञानी पुरुष, विचार करुन त्या परमात्म्याचे ज्ञान करुन घेतात ॥९॥
 
जेव्हां जीवाच्या भोगाकरितां परमेश्वराला शरीरें उत्पन्न करण्याची इच्छा होत्ये, तेव्हां तो आम्यावस्येमध्यें असलेल्या रजोगुणाला आपल्या मायेच्या योगानें निराळा करुन त्याची वृद्धि करितो. तसेंच जेव्हां त्याला चित्रविचित्र शरीरांमध्यें क्रीडा करण्याची इच्छा होते, तेव्हां सत्त्वगुणाला निराळा करुन तो त्याची वृद्धि करितो; आणि निद्रा घेण्याची जेव्हां त्याला इच्छा होत्ये, तेव्हां तो विश्वाचा संहार करण्याकरितां तमोगुणाला पृथक् करुन त्याची वृद्धि करितो ॥१०॥
 
हे राजा, निमित्तभूत असलेल्या प्रकृतिपुरुषांच्या योगानें सृष्टयादि सर्व व्यापार करणारा हा ईश्वर, प्रकृतिपुरुषांना साहाय्य करणारा असल्यामुळें त्यांच्या आश्रयभूत अशा काळाला आपण स्वतः च उत्पन्न करितो. हे राजा, हा जो काळ आहे तो सत्त्वगुणाची वृद्धि करितो, म्हणून त्याचा नियंता हा महाकीर्तिमान् देवप्रिय ईश्वरहि सत्त्वगुणप्रधान अशा देवसमुदायाची वृद्धि करितो, आणि रजोगुण व तमोगुण ज्यांत प्रधान आहेत असे जे देवांचे शत्रु असुर, त्यांचा वध करितो ॥११॥
 
हे राजा, ‘ ईश्वर द्वेषादिशून्य असतां त्यानें दैत्यांचा वध का केला ’ ह्याविषयीं राजसूयनामक महायज्ञाच्याप्रसंगी पूर्वी युधिष्ठिरानें प्रश्न केला असतां, देवर्षि नारदानें त्याला याविषयींचा इतिहास प्रेमानें सांगितला होता ॥१२॥
 
 
त्या राजसूयनामक महायज्ञामध्यें भगवान् वासुदेवाच्या ठिकाणी शिशुपाळाला प्राप्त झालेलें सायुज्यपद अवलोकन करुन, पांडुपुत्र धर्मराजाच्या मनाला आश्चर्य वाटलें, व सर्व मुनि ऐकत असतां त्या यज्ञप्रसंगी धर्मराजानें तेथें बसलेल्या देवर्षि नारद मुनीला पुढील प्रश्न केला ॥१३॥॥१४॥
 
युधिष्ठिर म्हणाला, - हे नारद मुने, हा शिशुपाळ श्रीकृष्णाचा नित्य द्वेष करीत असून, त्याला मायातीत अशा वासुदेवरुप तत्त्वामध्यें,एकनिष्ठ भक्तांनाही जी दुर्लभ, अशी सायुज्यमुक्ति प्राप्त व्हावी, हें मोठें आश्चर्य होय ॥१५॥
 
हे मुने, हा प्रकार काय आहे हें आम्हां सर्वांनां च जाणण्याची इच्छा आहे. कारण, भगवन्निदेमुळे वेनराजाला ब्राह्मणांनी नरकांत पाडिलें होतें ॥१६॥
 
असें असतां हा दमघोषाचा पुत्र, पापी शिशुपाळ तसाच त्याचा कनिष्ठ बंधु दंतवक्त्र, ( बालपणापासून ) बोंबडे शब्द उच्चारुं लागल्यापासून तों आतांपर्यंत भगवान् गोविंदाशीं मत्सरबुद्धीनेंच वागत आले आहेत ॥१७॥
 
अक्षय अशा परब्रह्मस्वरुप श्रीविष्णूची ते सारखी निंदा करीत होतें. असे असतां त्यांच्या जिव्हेवर कुष्ठ न उठतां किंवा ते घोर नरकामध्ये न पडतां उलट त्या दुर्लभस्वरुप भगवंताच्या ठिकाणी सर्व लोकांसमक्ष अनायासानें यांचा लय झाला ! हें अवलोकन करुन वायूनें भ्रमण पावणार्‍या दीपज्वाळेप्रमाणें माझी बुद्धि भ्रमण करीत आहे. मला हे अत्यंत आश्चर्य वाटत आहे ! यास्तव असा हा प्रकार होण्याचें कारण काय, तें तूं मला सांग. तूं सर्वज्ञ आहेस ॥१८॥॥१९॥॥२०॥
 
शुकाचार्य म्हणाला, - हे परीक्षित राजा, धर्मराजाचें तें भाषण श्रवण करुन भगवान् नारद ऋषि संतुष्ट झाला, आणि सर्व सभा श्रवण करीत असतां त्या धर्मराजाला सावध करुन तो ती कथा सांगूं लागला ॥२१॥
 
नारद म्हणाला, - हे धर्मराजा, निंदा, स्तुति, सत्कांर आणि तिरस्कार, ह्यांचे ज्ञान होण्याकरितां प्रकृतिपुरुषांचा भेद न मानितां शरीराची रचना झाली आहे ॥२२॥
 
हे धर्मराजा, त्या देहादिकांच्या अभिमानानें प्राण्याला त्याविषयीं वैषम्य उत्पन्न होतें, आणि त्या वैषम्याच्या योगानें ताडण व निंदा उद्भवतात. देहाविषयींचा अभिमान अतिदृढ झालेला असल्यामुळें त्या जिवाचा वध झाला म्हणजे प्राण्यांना वध केल्याचें पाप लागतें, तसें ईश्वरास मान्य नाही. कारण, तो सर्वाचा अद्वितीय आत्मा असल्यामुळें त्याच्या जवळ प्राण्यांसारखा अभिमान नाही. तो परमात्मा दैत्यांच्या हिताकरितांच काम करीत असतो; त्यामुळें त्याला त्या हिंसेचा दोष लागू शकत नाही. ॥२३॥॥२४॥
 
हे धर्मराजा ह्याकरितां वैरानुबन्ध, निर्वैर भक्तियोग, भय, स्नेह अथवा काम, ह्यांपैकी कोणत्याही उपायानें ईश्वराच्या ठिकाणी मन लावावें. कारण, तसें मन लावलें असतां पुरुषाला ईश्वरव्यतिरिक्त इतर वस्तु दिसेनाशी होत्ये ॥२५॥
 
मत्सर, वैर, द्वेष, या नित्य वैराच्या योगें मनुष्य जसा तन्मय होऊन जातो, तसा भक्तियोगानें होत नाहीं, असें माझें ठाम मत झालें आहे ॥२६॥
 
उदाहरण, ‘ कुंभारीण ’ नांवाच्या भ्रमरानें भिंतीवर घर बांधून त्यांत ठेविलेला कीटक त्या भ्रमरविषयाचा द्वेष व भय, यांच्या योगानें निरंतर त्याचें स्मरण करीत असल्यामुळें त्याला शेवटी भ्रमराचे स्वरुप प्राप्त होतें. त्याप्रमाणे मायेनें मनुष्यरुप धारण करणार्‍या भगवान् सदानंदरुप ईश्वराच्या ठिकाणी वैरभाव धारण करुन त्याचें वारंवार चिंतन करणारे कित्येक प्राणी निष्पाप होऊन शेवटी ईश्वरस्वरुपास प्राप्त झाले आहेत ॥२७॥२८॥
 
हे राजा, काम, द्वेष, भय, स्नेह अथवा भक्ति, ह्या साधनांनी ईश्वराच्या ठिकाणी मन लावून व त्या कामादिनिमित्तक पातकाचे निरसन करुन पुष्कळ लोक त्याच्या सायुज्य गतीला प्राप्त झाले आहेत ॥२९॥
 
कामाच्या योगानें गोपी, भयामुळें कंस, द्वेषानें शिशुपाळप्रभृति राजे, संबंधानें यादव, स्नेहामुळे तुम्ही पांडव आणि हे धर्मराजा, भक्तीनें आम्ही त्याच्या स्वरुपाला प्राप्त झालों आहों ॥३०॥
 
पण हे राजा, श्रीहरीचें चिंतन करणार्‍या या पांचांपैकी वेनराजा कोणीच नव्हता. तात्पर्य, कोणत्या तरी उपायानें श्रीकृष्णाच्याठिकाणीं मन तल्लीन झालें पाहिजे ॥३१॥
 
हे पांडुपुत्रा, शिशुपाळ आणि दंतवक्त्र हे जे तुम्हां पांडवाचे मावसभाऊ, ते मूळचे विष्णूच्या पार्षदगणांपैकी मुख्य होते. पण ब्राह्मणांच्या शापामुळे ते वैकुंठस्थांनापासून च्युत झाले होते ॥३२॥
 
युधिष्ठिर म्हणाला - हे मुने, श्रीहरीच्या भक्तांवरहि संकटें आणणारा असा तो शाप कोणत्याप्रकारचा होता, व तो कोणी दिला ? मला तर हा शाप अविश्वसनीय वाटतो. कारण श्रीहरीच्या एकनिष्ठ भक्तांना जन्म प्राप्त होणें हे असंभवनीय आहे ॥३३॥
 
जन्माला कारणीभूत असे देह, इंद्रियें व प्राण हे वैकुंठवासी पुरुषांना तर मुळींच नसतात. तेव्हां त्यांना देहाचा संबंध कसा घडला, तो वृत्तांत तुम्ही आम्हांला कृपाकरुन कथन करा ॥३४॥
 
नारद म्हणाला, - हे युधिष्ठिरा, एका वेळी सनत्कुमार, सनक, सनंदन आणि सनातन, हे ब्रह्मदेवाचे चार पुत्र त्रैलोक्यामध्ये संचार करीत करीत भगवदिच्छेनें वैकुण्ठास गेले ॥३५॥
 
मरीचिप्रभृति प्रजापतींच्याहि आधीं उत्पन्न झालेले ते मुनि, पांचसहावर्षांच्या मुलांसारखे दिसत असून नग्न होते, म्हणून दोघां द्वारपाळांनी त्यांस मुलें समजून आंत जाण्याविषयीं प्रतिबंध केला ॥३६॥
 
तेव्हां ते क्रुद्ध झाले व त्यांनी त्या द्वारपाळांस शाप दिला कीं, " तुम्ही रजोगुण आणि तमोगुण यांनी रहित अशा मधुसूदनाच्या चरणापाशीं नुसतें रहाण्यासहि योग्य नाही. ह्याकरितां हे मूढहो, अत्यंत पापी अशा असुरयोनींत तुम्ही सत्वर जा " ॥३७॥
 
असा शाप होतांच ते दोघे स्वस्थानापासून भ्रष्ट होऊं लागले. तेव्हां त्या दयाळू मुनींनी त्यांना पुनः असा उः शाप दिला कीं, तुमचे तीन जन्म झाले म्हणजे हा शाप समाप्त होऊन तुम्हांला पुनः स्वस्थानाची प्राप्ति होईल ॥३८॥
 
नंतर ते दोघे द्वारपाळ, दैत्य आणि दानव ह्यांना पूज्य, असे दितीचे पुत्र झाले. त्यांत हिरण्यकशिपू हा ज्येष्ठ असून हिरण्याक्ष हा त्यापेक्षां लहान होता ॥३९॥
 
श्रीहरीनें नारसिंहावतार घेऊन हिरण्यकशिपूचा वध केला आणि पृथ्वीचा उद्धार करण्याकरितां वराहावतार घेणार्‍या त्याच श्रीहरीनें हिरण्याक्षाचाहि वध केला ॥४०॥
 
हिरण्यकशिपूनें श्रीहरीची आवडीनें भक्ति करणार्‍या अशा आपल्या प्रल्हाद नामक पुत्राचा वध करण्याची इच्छा धरुन त्याला ठार मारण्याकरितां नानाप्रकारच्या उपायांची योजना केली; ॥४१॥
 
परंतु सर्वत्र सबाह्याभ्यन्तरी व्यापक ब्रह्मच आहे असें पहाणारा प्रल्हाद, सर्व भूतांचा आत्माच व द्वेषा. दिशून्य आणि ईश्वराच्या तेजानें व्याप्त असल्यामुळें, त्या अनेक उपायांनीं त्याचा वध करण्यास हिरण्यकशिपू समर्थ झाला नाही ॥४२॥
 
नंतर दुसर्‍या जन्मीं ते उभयतां विश्रवानामक ऋषीच्या केशिनीनामक स्त्रीच्या पोटीं जन्मास आले व रावण आणि कुंभकर्ण या नांवांनी प्रसिद्ध होऊन सर्व लोकांना पीडा देते झाले ॥४३॥
 
तेव्हांहि भगवंताने ब्राह्मणशापापासून त्यांना मुक्त करण्याकरितां रघुवंशामध्यें रामावतार धारण करुन त्यांचा वध केला. हे धर्मराजा, त्या भगवान् रामाचा पराक्रम मार्कण्डेय ऋषींच्या तोंडून तुला ऐकावयास मिळेल ॥४४॥
 
असो. पुढें तेच रावणकुंभकर्ण तिसर्‍या जन्मीं क्षत्रिय होऊन तुझे मावसबंधु शिशुपाळ आणि दन्तवक्त्र झाले; आणि श्रीकृष्णाच्या सुदर्शनचक्रानें निष्पाप होऊन ते नुकतेच ब्रह्मशापापासून मुक्त झाले ॥४५॥
 
ह्याप्रमाणें ते विष्णुपार्षद नित्यवैरामुळें घडलेल्या तीव्र ध्यानानें अच्युतस्वरुपी होऊन पुनरपि श्रीहरीजवळ गेले ॥॓६॥
 
युधिष्ठिर म्हणाले, - हे नारद मुने, महात्म्या अशा आपल्या प्रिय पुत्राविषयीं हिरण्यकशिपूचा इतका द्वेष होण्यास व त्या प्रल्हादाचें अच्युताच्या ठिकाणीं एकचित्त होण्यास कारण काय झालें ? तें तूं मला सांग ॥४७॥
 
॥ पहिला अध्याय समाप्त ॥१॥

नृसिंहाख्यान अध्याय २ रा
नारद म्हणाला, - हे धर्मराजा, ह्याप्रमाणे वराहरुप धारण करणार्‍या श्रीहरीने भ्रात्या हिरण्याक्षाचा वध केला असतां रोषानें व शोकानें हिरण्यकशिपु अगदी संतप्त झाला ॥१॥
 
क्रोधामुळें त्याच्या शरीराला कंप सुटला, तो आपले ओठ चावूं लागला; व कोपानें त्याचे नेत्र अत्यंत प्रज्वलित झाले. त्याला आकाश धूम्रवर्ण झालेले दिसूं लागलें. भयंकर दाढांमुळे त्याची दृष्टि उग्र होऊन वांकडया भुंवयांमुळें त्याचे मुख अवलोकन करण्यासहि अशक्य झाले. अशा स्थितीत तो हिरण्यकशिपु, हातांतील शूळ वर उचलून सभेमध्ये दानवांना उद्देशून बोलूं लागला ॥२॥॥३॥
 
तो म्हणाला, हे शकुनिप्रभृति दैत्य दानव हो, हे द्विमूर्धन, हे त्र्यक्षा, हे शंबरा, हे शतबाहो, हे हयग्रीवा, हे नमुचे, हे पाका, हे इल्वला, हे विप्रचिते आणि हे पुलोभ्या, तुम्ही सर्वजण माझें वचन श्रवण करा; व विलंब न करितां माझ्या आज्ञेप्रमाणें आचरण करा ॥४॥॥५॥
 
अहो, समदृष्टि असूनहि भजननिमित्तानें सहाय्यक झालेल्या श्रीहरीच्या आधारानें हे आमचे क्षुद्र शत्रु जे देव, त्यांनी माझ्या अत्यंत भ्रात्याच्या वध केला ॥६॥
 
स्वतः शुद्ध तेजोमय असून जो कोणी आपली भक्ति करील त्याला अनुसरणारा, मायेनें वराहरुप धारण करणारा, बालकाप्रमाणें अस्थिरचित असणारा आणि आपल्या ‘ समत्वरुप ’ स्वभावाचा त्याग करणारा, असा जो श्रीहरी, त्याचा कंढ मी आपल्या शूळानें विदीर्ण करुन त्यांतील विपुल रक्तानें जेव्हां आपल्या रक्तप्रिय भ्रात्याचें तर्पण करीन, तेव्हांच माझ्या अंतः करणांतील व्यथा नाहींशी होईल ॥७॥॥८॥
 
 
ज्याप्रमाणें वृक्षाचे मूळ तोडिलें असतां शाखा आपोआप शुष्क होऊन जातात, त्याप्रमाणें तो कपटी प्रतिपक्षी विष्णु नाहींसा झाला असतां, देव स्वतः च नाश पावतील. कारण, विष्णु हाच त्यांचा प्राण आहे ॥९॥
 
यास्तव, ह्याक्षणींच आम्ही ब्राह्मण व क्षत्रिय ह्यांनी समृद्ध झालेल्या भूमीवर जा, आणि जे जे म्हणून तप, यज्ञ, वेदाध्ययन, व्रत आणि दान करीत असतील त्यांचा घात करा ॥१०॥
 
हे दैत्य हो, हा पुरुषोत्तम विष्णु यज्ञरुप असून धर्ममय असल्यामुळें द्विजांचे अनुष्ठान हेंच त्याचें मूळ आहे; आणि देव, ऋषि पितर, भूतें व धर्म यांचा मुख्य आश्रयहि तोच आहे ॥११॥
 
म्हणून जेथें इथें द्विज, गाई, वेद, वर्णाश्रम व वर्णाश्रमविहित कर्मे चालत असतील त्या त्या देशी जाऊन तुम्ही ती जाळून टाका ॥१२॥
 
अशा प्रकारे हिरण्यकशिपूने आज्ञा करतांच त्याचे सेवक ते हिंसाप्रिय दानव त्याच्या आज्ञेप्रमाणें लोकांचा संहार करुं लागले ॥१३॥
 
हे धर्मराजा, नगरें, गांव, गोठे, बागा, शेतें, आरामस्थानें, ऋषीचें आश्रम, खाणी, शेतकर्‍यांची घरें डोंगरांच्या दर्‍यांत असलेली खेडी, गौळवाडे आणि राजधान्या, इत्यादि सर्व त्या दानवांनीं जाळून टाकिलीं ॥१४॥
 
कांही जणांनी तर खोरीकुदळी घेऊन पूल, कोट आणि वेशी पाडिल्या; कांहीनी हातामध्यें कुर्‍हाडी घेऊन लोकांच्या निर्वाहाला साधनभूत असलेले वृक्ष तोडिले; आणि कांही जणांनी जळक्या लांकडानी लोकांची घरें जाळली ॥१५॥
 
 
ह्याप्रमाणें दैत्यराज हिरण्यकशिपूचे ते आज्ञाधारक दैत्य वारंवार लोकांना उपद्रव देऊं लागले. तेव्हां, यज्ञसंबंधी हविर्भाग मिळत नाहींसा झाल्यामुळें, देव स्वर्गाचा त्याग करुन गुप्तरीतीनें भूमीवर संचार करुं लागले ॥१६॥
 
हे धर्मराजा, इकडे भ्रातृमरणामुळें दुःखित झालेल्या हिरण्यप्रकशिपूनें आपल्या हिरण्याक्ष भ्रात्याचें उत्तर कार्य केलें आणि मग तो त्याच्या पुत्रांचें सांत्वन करुं लागला ॥१७॥
 
हे धर्मराजा, देश व काल जाणणारा हो हिरण्यकशिपु, मधुर वाणी शकुनि, शंबर, धृष्ट, भूतसंतापन, वृक, कालनाभ, महानाभ, हरिश्मश्रु आणि उत्कच ह्यांना व रुषाभानुनामक त्यांच्या मातेला आणि आपली माता जी दिति तिला उद्देशून पुढीलप्रमाणें समाधान करुं लागला ॥१८॥॥१९॥
 
हिरण्यकशिपु म्हणाला, - हे माते, हे वहिनी, आणि हे पुत्रहो, महावीर अशा हिरण्याक्षाकरितां शोक करणें तुम्हांला योग्य नाही कारण, शत्रूंच्या हे सुव्रते माते पाणपोईमध्यें ज्याप्रमाणें प्राण्यांचा सहवास क्षणिक असतो, त्याचप्रमाणें ह्या मृत्युलोकी माता व पुत्र इत्यादिकांचा सहवास क्षणिक आहे. कारण, दैवयोगानें प्राणी एकत्र संयुक्त होतात; व पुनरपि आपआपल्या कर्मामुळें वियुक्त होतात ॥२१॥
 
हे माते, आत्मा हा मृत्युरहित अक्षय, निर्मळ, सर्वव्यापी आणि सर्वज्ञ असा आहे. कारण, तो देहादिकाहून भिन्न आहे. म्हणून मृत, कृश, मलिन, वियुक्त, अज्ञ असें समजून त्याबद्दल शोक करणे योग्य नाही. हे माते, हा आत्मा आपल्या अविद्येमुळें मोहित होऊन सुखदुःखादिकांचा विशेषेंकरुन स्वीकार करीत असल्यामुळें शरीर धारण करितो. सारांश, त्याला लिगशरीररुप जो उपाधी प्राप्त झाला आहे तोच संसार होय ॥२२॥
 
हे माते, जसे उपाधीचे धर्म उपाधियुक्त वस्तूवर भासमान होतात, म्हणजे ज्याप्रमाणें उदक हालत असल्यामुळें त्यामध्ये प्रतिबिंबित झालेले वृक्षहि हालत आहेत असें दिसतें; अथवा ज्याप्रमाणे नेत्रांना भ्रमण झाल्यामुळें पृथ्वी हालल्यासारखी दिसते, अथवा ज्याप्रमाणें मुणांच्या योगानें मनाचें भ्रमण झालें म्हणजे, आत्मा शरीरमय भासतो. परंतु खरें पहातां आत्मा परिपूर्ण असूनहि देहादिसंबंधरहित असा आहे. तथापि मनाच्या कल्पनेनें तो देहधारी असल्यासारखाच दिसतो ॥२३॥॥२४॥
 
वस्तुतः आत्म्याचा संबंध देहाशीं नाही. अर्थांत देहाविषयी अभिमान, प्रिय वस्तुशी वियोग, अप्रिय वस्तूंशी संयोग, कर्म, अनेक योर्नीमध्ये प्रवेश, उत्पत्ति, विनाश, नानाप्रकारचा शोक, अविवेक, चिंता, विवेकाची विस्मृति इत्यादि इत्यादि सर्व धर्म आत्मस्वरुपाहून अगदीं निराळे आहेत. त्यांचा आत्मस्वरुपाशी मुळींच संबंध नाहीं ॥२५॥॥२६॥
 
सारांश, शोकाचें कारण नसूनहि तुम्हीं हा व्यर्थ शोक करीत आहां. असो, ह्याविषयी एका मृत पुरुषाचे स्त्रीपुत्रादिक आप्त आणि यम ह्यांमध्यें झालेला संवादरुप पुरातन असा एक इतिहास आहे तो मी तुम्हाला सांगतो, तो श्रवण करा ॥२७॥
 
उशीनर देशामध्यें सुयज्ञ म्हणून प्रसिद्ध असा एक राजा होता. त्याच्या शत्रूंनी युद्धामध्यें त्याचा वध केला असतां; त्याचे सर्व नातलग त्याच्या सभोंवती जमून शोक करीत बसले ॥२८॥
 
 
हे माते, त्याराजाच्या रत्नमय कवचाचे तुकडे तुकडे होऊन गेले होते; त्याच्या शरीरावरील भूषणें व माळा गळून गेल्या होत्या ; बाणांनी त्याचें हदय विदीर्ण झालें होतें व त्याचें सर्वांग रक्तानें भरुन तो भूमीवर पडला होता. त्याचे केंस अस्ताव्यस्त झाले होते; डोळे फुटले होवे; आवेशामुळें त्यानें आपला ओंठ चावलेला होता, त्याचें मुखकमळ धुळीने भरलें होते आणि त्याच्या भुजा आयुधासह युद्धामध्यें छिन्नभिन्न झाल्या होत्या ॥२९॥॥३०॥
 
याप्रमाणे प्रारब्धकर्मामुळे अशा विपन्न स्थितीमध्यें पडलेला आपला भर्ता तो उशीनरदेशाचा राजा, त्याला अवलोकन करुन त्याच्या राण्याने दुःखानें व्याकूळ झाल्या, आणि हे नाथा, ‘ आमचा सर्वस्वी घात झाला असे म्हणून हातानी वारंवार ऊर बडवून घेत त्या त्याच्या पायांजवळ शोक करीत पडल्या ॥३१॥
 
उच्चस्वरानें रोदन करीत असतां त्यांच्या स्तनांवरील केशरानें रक्तवर्ण झालेल्या अश्रूंनी, त्यांनी आपल्या प्रिय पतीचे पाय भिजविले. केंस मोकळे टाकून व अलंकारांचा त्याग करुन त्या आक्रोशपूर्वक विलाप करुं लागल्या. त्यांचा विलाप पाहून लोकांनाहि दुःख झालें ॥३२॥
 
त्या म्हणाल्या, - हे प्राणप्रिय प्रभो, ज्या विधात्यानें आमच्या दृष्टीच्या पलीकडील स्थितीत तुला नेलें, तो खरोखर निर्दय आहे. कारण, तूं पूर्वी त्या विधात्यानें तुला त्यांच्या शोकांची वृद्धि करणारा केलें आहे ॥३३॥
 
हे भूपते, सर्वोत्कृष्ट मित्र असा जो तं त्या तुजवांचून आम्हीं कसें बरें रहावें ? यास्तव हे विरा, ज्याठिकाणी तूं जावयाला निघाला आहेस, त्याठिकाणी तुझ्या चरणकमळाची सेवा करणार्‍या आम्हांलाहि आपल्या मागोमाग येण्याची आज्ञा दे ॥३४॥
 
ह्याप्रमाणे आपल्या मृत पतीला आलिंगन देऊन, - त्याचे शव दहन करण्यासहि नेण्याची इच्छा न करितां, त्या स्त्रिया सारख्या विलाप करीत बसल्या असतां, सूर्य अस्तास गेला ॥३५॥
 
तेव्हां आला, व त्याची समजूत करुं लागला ॥३६॥
 
यम म्हणाला, अहो, काय आश्चर्य हें ? अरे, आमच्यापेक्षां वयाने अधिक असून, लोकांचा जन्ममरणादि प्रकार नित्य अवलोकन करीत असतांहि ह्यांना केवढा हा मोह प्राप्त झाला आहे ! आपणहि मरणधर्मानें युक्त असून, ज्या अव्यक्त रुपापासून हा प्राणी जन्मास आला, तेथेंच तो गेला असतां त्याच्याविषयी हे व्यर्थ शोक करीत नाहीं काय ? ॥३७॥
 
अहो, ह्या लोकी मातापितर आम्हांला दुर्बळ स्थितीत सोडून गेले असतांहि, लांडगे आदिकरुन प्राण्यांनी आम्हांला भक्षण केले नाही, आणि ज्यानें गर्भामध्येहि आमचें रक्षण केलें, तोच इतर सर्वत्रहि आमचें रक्षण करील, असें समजून आपल्या रक्षणाचीहि आम्ही चिंता करीत नाही. तेव्हां सर्वापेक्षा आम्ही धन्य आहों ॥३८॥
 
हे अबलांनो, जो ईश्वर स्वतः नाशरहित असून स्वेच्छेने हें विश्व उत्पन्न करितो, त्याचें रक्षण करितो व त्याचा संहारहि करितो, त्या ईश्वराचे हें चराचर विश्व क्रीडासाधन आहे असें म्हणतात. म्हणून तोच त्याचें पालन व संहार करण्यास समर्थ आहे ॥३९॥
 
मार्गामध्येहि पडलेली वस्तु दैव राखीत असतां तशीच सुखरुप रहात्ये; पण दैवानें ज्या वस्तूची उपेक्षा केली, ती गृहामध्यें असली तरी नाहींशी होत्ये. त्याप्रमाणेच एकादा पुरुष अनाथ असूनहि दैवानें त्याच्यावर कृपादृष्टि ठेविली असतां तो वनामध्येंहि जिवंत रहातो, आणि दैवानें ज्यांची उपेक्षा केली आहे असा पुरुष गृहामध्ये असूनहि जगत नाहीं ॥४०॥
 
 
हे अबलांनों, सर्व देह लिंगशरीरापासून झालेल्या नानाप्रकारच्या कर्मांमुळें त्या त्या काळीं उत्पन्न होतात व नाशहि पावतात; परंतु आत्मा हा प्रत्येक वेळी देहामध्यें असूनहि त्याहून भिन्न व अमूर्त असल्यामुळें त्या शरीराच्या जन्मालि धर्मांनी तो बद्ध होत नाहीं ॥४१॥
 
हे स्त्रियांनो, ज्याप्रमाणें अत्यंत अविवेकी पुरुषानें आपले म्हणून मानिलेले घर त्याच्यांहून निराळें असतें, त्याचप्रमाणें अविवेकानें आपलें म्हणून भासत असलेलें हें पुरुषाचें शरीर पंचमहाभूतात्मक असून दृष्टिगोचर होत असल्यामुळें अभौतिक आणि साक्षीभूत अशा पुरुषापासून वस्तुतः पृथकच आहे. जसें उदकापासून झालेले बुडबुडे, पृथ्वीपासून झालेले घट व तेजापासून झालेले कुंडलादिक अलंकार नाश पावतात; त्याप्रमाणें त्या तिन्ही भूताच्या परमाणूंनी उत्पन्न झालेला देहच काळामुळे परिणत होऊन नाश पावतो, पण आत्मा नाश पावत नाही. ॥४२॥
 
जसा अग्नि काष्टांमध्यें असतांहि प्रकाशकरुपानें व दाहकरुपानें निराळाच अनुभवास येतो, आणि जसा देहांत असलेला वायु, मुख व नासिका इत्यादि स्थानांमध्यें निराळाच प्रतीतीला येतो, तसा आत्मा देहामध्यें असूनहि त्याहून भिन्न आहे. कारण, आत्मा देहामध्यें असतांनाहि त्याच्या ठिकाणी देहधर्म मुळींच नसतात. जसें आकाश सर्वत्रठिकाणी असूनहि तें कोठें लिप्त होत नाही, त्याप्रमाणे आत्मा देहेंद्रियादि सर्व गुणांच्या आश्रयानें असतांहि त्याहून निराळाच आहे ॥४३॥
 
आणि त्यांतूनहि, हे मूढहो, ज्याकरितां तुम्ही शोक करीत आहां, तो हा तुमचा भर्ता सुयज्ञ तर येथें शयन करीत आहेच; तेव्हां तुम्ही कोणाकरितां शोक करीत आहां बरें ? पूर्वी ह्याठिकाणी जो श्रवण करीत होता, जो प्रत्त्युत्तर देत होता, तो सुयज्ञ वस्तुतः कधींहि दृष्टिगोचर होत नव्हता ॥४४॥
 
सर्व इंद्रियांच्या चेष्टांना कारण असल्यामुळें मोठा व मुख्य असा जरी प्राण आहे, तथापि ह्या देहांतील श्रोता व वक्ता हा नव्हे. हे स्त्रियांनो, इंद्रियांच्या योगानें त्याचें विषय जाणणारा जो आत्मा, तो नर, प्राण व देह ह्या दोन्ही अचेतन वस्तूंहून वेगळा असून सचेतन आहे ॥४५॥
 
तो सर्वव्यापी आत्मा, भूतें, इंद्रियें आणि मन, ह्यांच्या योगानें लक्षित होणार्‍या बर्‍यावाईट देहांचा स्वीकार करितो; परंतु तो त्याच्याहून भिन्न आहे. कारण आपल्या विवेकबलांच्या योगानें त्यांचा तो त्यागहि करितो ॥४६॥
 
जोंपर्यत आत्म्याला लिंगशरीराचा अभिमान असतो, तोंपर्यंत त्याचें तें कर्म बंधनाला कारण होतें व त्यापासून देहधर्माचें भोक्तृत्व त्याला प्राप्त होऊन क्लेश होतात; पण लिंगशरीराविषयीचा अभिमान निवृत्त झाल्यानंतर असा प्रकार घडत नाहीत. कारण, हा देहधर्मभोक्तृत्वरुप विपर्यय मायेनें होत असतो, तो वस्तुतः खरा नाहीं ॥४७॥
 
सुखदुःखादि गुणकार्ये खरीं आहेत असें मानणें व म्हणणें हा अगदी व्यर्थ अभिमान होय. कारण, जाग्रदावस्थेमध्ये मनोरथानें प्राप्त होणारे राज्यादि सुख अथवा स्वप्नावस्थेमध्यें प्राप्त होणारे स्त्रीसंभोगादि सुख जसें वस्तुतः खरें नाही, तसेंच सर्व इंद्रियजन्य सुखहि वस्तुतः खरे नाहीं ॥४८॥
 
वास्तविक आत्मा नित्य असून देह अनित्य आहे असें जाणणारे लोक आत्म्याविषयीं अथवा देहाविषयीं ह्या संसारामध्यें शोक करीत नाहीत. शोक करणार्‍यांचा स्वभाव निवृत्त करणें अशक्य आहे. ज्ञान दृढ झाल्यावांचून तो स्वभाव जात नाहीं ॥४९॥
 
हे स्त्रियांनो, पक्षांना मारणारा कोणी एक पारधी अरण्यामध्यें ईश्वरानें निर्माण केला होता. तों जेथें जेथें ते पक्षी असत तेथें तेथें घान्यकणादिकांनी त्यांना लोभ उत्पन्न करीत असे; आणि जाळें पसरुन त्यांना धरीत असे ॥५०॥
 
एकदां एक कुलिंगपक्षांचे जोडपें त्याठिकाणीं संचार करीत असतांना त्या व्याधाच्या दृष्टीस पडले. तेव्हा त्या उभयतांपैकी कुलिंगीला त्यानें धान्य पसरलेलें दाखवून एकाएकी मोहित केलें ॥५१॥
 
नंतर काळानें प्रेरित झालेली ती कुलिंगी दोर्‍यांमध्ये अडकली. ती तशाप्रकारच्या संकटांत सांपडून अगदी दीन झाली आहे, असें कुलिंगपक्ष्यानें अवलोकन करतांच तो अत्यंत दुःखित झाला; पण तिला सोडविण्याविषयी तो असमर्थ असल्यामुळें अगदी दीन होऊन प्रेमामुळें एका वृक्षाच्या शाखेवर बसून विलाप करुं लागला ॥५२॥
 
तो म्हणाला - अहो ! हा निर्दय ब्रह्मदेव, सर्वप्रकारें दयेस पात्र अशा मज दीनाकरितां शोक करणार्‍या ह्या माझ्या दीन स्त्रीला नेऊन काय बरें करणार आहे ? ॥५३॥
 
अरेरे, विधुरावस्थेत दीन होऊन दुःखानें जिवंत रहाणार्‍या ह्या माझ्या अर्ध्या देहाचें आतां मला काय बरें प्रयोजन आहे ? ह्यास्तव आतां तो यमराज मलाहि खुशाल नेवो ॥५४॥
 
हे परमेश्वरा, जी माझी दुर्दैवी बाळें खाण्याकरितां घरटयामध्यें मातेची वाट पहात आहेत, ज्यांना अद्याप पंखसुद्धां फुटले नाहींत, त्या पोरक्या बालकाचें मी आतां पोषण कसें करुं ? ॥५५॥
 
ह्याप्रमाणें प्रियेच्या वियोगानें व्याकुळ झाल्यामुळें अश्रूंनी कंठ दाटून येऊन तो कुलिंगपक्षी विलाप करीत असतां मारिला ॥५६॥
 
असो. हे मूढ स्त्रियांनो, त्या पक्ष्याप्रमाणेंच आपला मृत्यु न जाणून शेकडो वर्षे जरी शोक करीत बसलां, तथापि हा पति तुम्हांला पुन्हा प्राप्त होणार नाही. ॥५७॥
 
हिरण्यकशिपु म्हणाला, - हे माते ह्याप्रमाणे तो बालक भाषण करीत असतां सुयज्ञ राजाचे सर्व न तलग मनामध्यें विस्मित झाले; आणि हें सर्व जगत् अनित्य असून मिथ्यारुपानेंच प्रकट झालें आहे असें मानूं लागतो ॥५८॥
 
असो. यमधर्म हें अख्यान सांगून त्याचठिकाणीं गुप्त झाला; व त्या नातेवाइकांनीही सुयज्ञाचें परलोकप्राप्तिविषयी करावयाचें सारें उत्तरकार्य केलें ॥५९॥
 
यास्तव स्वतः करितां तसेंच दुसर्‍याकरितां तुम्ही मुळीच शोक करुं नका. कारण, अमुक आपलें व अमुक दुसर्‍याचें अशा अभिमानरुप अज्ञानावांचून संसारांत प्राणिमात्रांना स्वतः कोण व इतर कोण ? स्वकीय कोण व परकीय तरी कोण आहे ? सर्व एकच आहे ॥६०॥
 
नारद म्हणाला, - हे धर्मराजा, ह्याप्रमाणें दैत्याधिपति हिरण्यकशिपूचे भाषण सुनेसह श्रवण केल्यावर दितीनें एका क्षणामध्यें पुत्रशोकाचा त्याग केला आणि आपलें मन आत्मस्वरुपीं लाविलें ॥६१॥
 
॥ दुसरा अध्याय समाप्त ॥२॥

नृसिंहाख्यान अध्याय ३ रा
नारद म्हणाला, - हे धर्मराजा, हिरण्यकशिपूनें, आपण अजिंक्य, अजरा भर, प्रतिपक्षशून्य आणि अद्वितीय प्रभु व्हावें असें मनांत आणिलें; आणि त्यासाठी मंदरपर्वताच्या दरीमध्यें वाहू वर करुन, आकाशाकडे दृष्टि ठेवून आणि एका पायाच्या अंगठ्यावर उभें राहून अतिभयंकर तप केलें ॥१॥॥२॥
 
ज्या वेळीं प्रलयकाळचा सूर्य जसा शोभतो, त्याप्रमाणें जठांच्या कांतींनें तो शोभूं लागला. याप्रमाणें तो तप करुं लागला असतां, पूर्वी गुप्तरीतीनें भूमी वर संचार करीत असलेले देव फिरुन आपापल्या स्थानांवर गेले ॥३॥
 
नंतर त्याच्या मस्तकांतून धुरासह निघालेला तपोमय अग्नि सर्वत्र पसरुन त्यायोगें, खाली, वरती व मध्ये असलेले सर्व लोक संतप्त झाले ॥४॥
 
आणि नद्या व समुद्र क्षुब्ध होऊन गेले, द्वीपें व पर्वत ह्यांसह भूमि कांपूं लागली, महासह नक्षत्रे गळून पडूं लागली आणि दशदिशा प्रज्वलित होऊं लागल्या ॥५॥
 
नंतर त्या अग्नांने तप्त झालेले देव स्वर्गाचा त्याग करुन ब्रह्मलोकीं गेली आणि ब्रह्मदेवाला विनंति करुन म्हणाले, - हे ‘ जगत्पते, हे देवाधिदेवा, दैत्यश्रेष्ठ हिरण्यकशिपूच्या तपानें संतप्त झाल्यामुळें आम्ही स्वर्गावर राहण्यास समर्थ नाही. यास्तव हे महात्म्या सर्वाधिपते, तुझी पूजा करणार्‍या लोकांचा जोंपर्यंत नाश झाला नाहीं, तोंपर्यंत जर तुला वाटत असेल तर त्याचें तूं निवारण कर ॥६॥॥७॥
 
हे जगदीशा, दुश्चर तप करणार्‍या त्या हिरण्यकशिपूचा संकल्प तुह्मांला ठाऊक नाहीं काय ? नसेल तर आम्ही निवेदन करितों तो श्रवण करावा ॥८॥
 
हे ईश्वरा, त्यानें असें ठरविलें आहे कीं, " तप व योग ह्यांच्या एकनिष्ठ आचरणानें चराचर विश्व उत्पन्न करुन ब्रह्मदेव ज्याप्रमाणें सर्वस्थानापेक्षां श्रेष्ठ अशा आपल्या सत्यलोकरुप स्थानावर बसला आहे, त्याप्रमाणे तप व योग ह्यांच्या वृद्धिंगत होणार्‍या तेजांच्या योगानें तें स्थान आपणहि प्राप्त करुन घेऊं. कारण, काल नित्य आहे व आत्माहि अमर आहे. ॥९॥॥१०॥
 
तपोबलाच्या योगानें पूर्वीपेक्षां हें जगत् मी अगदी निराळ्या प्रकारचें करीन; ( ह्नणजे ब्रह्मचर्यव्रतादिक पुण्यकर्मे करणारांस नरकादि दुःखेंच भोगावयास लावीन व विषयासक्त असून पापकर्मे करणारांस स्वर्गसुखांचा उपभोग घ्यावयास लावीन, आणि स्वर्ग हें असुरांचे स्थान आणि नरक हें देवांचे स्थान असें करीन ) अवतारकल्पाच्या अंती कालानें नाश पावणारी वैष्णवादि इतर स्थानें मला काय करावयाची आहेत ? ॥११॥
 
असो. हे त्रैलोक्याधिपते, ह्याप्रमाणें तुझे स्थान हरण करण्याविषयीं त्याचा निश्चय झालेला आम्ही श्रवण केला आहे; आणि हें मोठें तप तरी तो त्यासाठीच करीत बसला आहे. यास्तव त्याविषयी आतां जें योग्य असेल तें तूं स्वतः कर ॥१२॥
 
हे ब्रह्मदेवा, तूं ज्या स्थानावर विराजमान झाला आहेस, त्या स्थानाचा अधिकार म्हणजे द्विज व गाई यांची उत्पत्ति करणें व त्यांना सुख व ऐश्वर्य देऊन त्यांचें क्षेम आणि उत्कर्ष करणें हाच होये ॥१३॥
 
हे धर्मराजा, याप्रमाणे भगवान् ब्रह्मदेवाची देवांनी प्रार्थना केली असतां, भृगु, दक्ष इत्यादि प्रजाधिपतीनी वेष्टिलेला तो ब्रह्मदेव, हिरण्यकशिपूच्या आश्रमास गेला ॥१४॥
 
पण तेथें त्याला हिरण्यकशिपु प्रथम दिसला नाही. त्याचें शरीर वारुळें, गवत व वेळूंची बेटें यांनी आच्छादून गेलें होतें, व त्यांतील मेद, त्वचा, मांस आणि रक्त, ही मुंग्यानी खाऊन टाकिली होतीं ॥१५॥
 
थोडया वेळानें मेघांनी आच्दादित झालेल्या सूर्याप्रमाणें वारुळादिकांनीं आच्छादिलेल्या व तपाच्या योगानें लोकांना त्रास देणार्‍या त्या हिरण्यकशिपूला त्यानें पाहिले. त्या वेळी त्याची ती एकंदर स्थिति पाहून ब्रह्मदेव विस्मित झाला, आणि हंसतहंसत त्याला उद्देशून बोलूं लागला ॥१६॥
 
ब्रह्मदेव म्हणाला, - हे कश्यपपुत्रा हिरण्यकशिपो, तुझें कल्याण असो. तपाच्या योगानें तूं कृतार्थ झाला आहेस. मी तुला वर देण्याकरितां येथें प्राप्त झालों आहें, तरी तूं मजपासून इच्छित वर मागून घे ॥१७॥
 
हें तुझें मोठें अद्भुत धैर्य मी पहात आहे. अरे, दनमक्षिकांनी तुझा देह भक्षण केला असून तुझे प्राण केवळ अस्थींचा आश्रय करुन राहिले आहेत ॥१८॥
 
असें तप पूर्वीच्या ऋषीनी कधींच केले नाही, व पुढेंहि कोणी करणार नाहीत. उदकसुद्धां प्राशन न करणारा कोणता पुरुष देवांची शंभरवर्षेपर्यत प्राणाचें धारण करील ? ॥१९॥
 
हे दितिपुत्रा, मोठा मनोनिग्रह करणार्‍या पुरुषांना करण्यास दुष्कर असा निश्चय करुन तपोनिष्ट झालेल्या तूं खरोखर मजवरहि विजय मिळविला आहेस ॥२०॥
 
यास्तव हे असुरश्रेष्ठा, तुझे सर्व मनोरथ मी परिपूर्ण करितों; कारण, तूं मर्त्य आहेस; आणि मी अमर आहे. तेव्हां माझें जें दर्शन तुला झालें आहे तें निष्फळ होणार नाहीं ॥२१॥
 
नारद म्हणाला; - हे धर्मराजा, असें भाषण करुन ब्रह्मदेवानें अमोघ सामर्थ्यानें युक्त अशा आपल्या कमंडलूंतील जलानें, मुंग्यांनी भक्षण केलेल्या हिरण्यकशिपूच्या त्या देहावर प्रोक्षण केलें ॥२२॥
 
तें प्रोक्षण होतांच तो हिरण्यकशिपु मानसिक शक्ति, इंद्रिय शक्ति व शारीरिक शक्ति, ह्यांनी युक्त होऊन सर्व अवयवांनी संपन्न, वज्रासारखा दृढशरीरी, तरुण व तापलेल्या सुवर्णासारखा तेजस्वी झाला; व जसा काष्ठापासून अग्नि प्रगट होतो. त्याप्रमाणें वेळूंनी आच्छादिलेल्या वारुळांतून तो निघाला ॥२३॥
 
तेव्हां समोर आकाशामध्यें असलेला ब्रह्मदेव त्याच्या दृष्टीस पडला. त्याला पाहतांच तो आनंदित झाला; आणि त्यानें त्याला भूमीवर साष्टांग नमस्कार घातला ॥२४॥
 
नंतर तो उठून उभा राहिला. त्याच्या नेत्रांमध्ये हर्षामुळे आनंदाश्रु आले व शरीरावर रोमांच उभे राहिले. अशा स्थितींत हात जोडून नम्रपणें ब्रह्मदेवाकडे पहात तो गद्गद वाणीने ब्रह्मदेवाची स्तुति करुं लागला ॥२५॥
 
हिरण्यकशिपु म्हणाला, - कल्पाच्या अंतीं, काळानें निर्माण केलेल्या प्रकृतिगुणरुप निबिड अंधः कारानें व्याप्त झालेलें हें जग, ज्या स्वयंप्रकाश ईश्वरानें आपल्या प्रकाशानें प्रकाशित केलें; आणि जो त्रिगुणात्मक अशा आपल्या स्वरुपानें ह्या विश्वाची उत्पत्ति, स्थिति व लय करितो, त्या रज, सत्त्व व तम ह्यांना आश्रयभूत असलेल्या महात्म्या परमेश्वराला माझा नमस्कार असो ॥२६॥॥२७॥
 
जो सर्वांचा आदि असून सर्वत्र बीजभूत कारण आहे, ज्ञान आणि विज्ञान हच ज्याचें स्वरुप आहे, व ज्याला प्राण, इंद्रिय, मन आणि बुद्धि ह्यांच्या कार्यांमुळें व्यक्त आकार प्राप्त होतो, त्या तुला नमस्कार असो ॥२८॥
 
हे विधात्या, तूंच सूत्रात्मक मुख्य प्राणांच्या योगानें स्थावरजंगमात्मक विश्वाचे नियमन करीत असल्यामुळें प्रजांचा व चित्त, चेतना, मन आणि इंद्रियें ह्यांचाहि स्वामी आहेस. तसाच तूं महत्तस्वरुप असल्यामुळें आकाशादि भूतें, शब्दादि विषय आणि तत्संबंधी वासना, ह्यांचा उत्पादक आहेस ॥२९॥
 
होता, अध्वर्यू, इत्यादिक चार ऋत्विजांनी युक्त अशा यज्ञकर्माचें प्रतिपादन करणार्‍या तीन वेदांच्या रुपानें तूंच अग्निष्टोमादि सात यज्ञांचा विस्तार करितोस. तूं प्राण्यांचा आत्मा आणि अंतर्यामी असून काळानें व देशानें अमर्यादि असा अनादि, अखंड व सर्वज्ञ आहेस ॥३०॥
 
नित्य जागृत असा तूंच काळरुपी होऊन त्या काळाचा लवादिक अवय यांनी लोकाचें आयुष्य क्षीण करितोस, परंतु वस्तुतः तूं ज्ञानरुप अपरिच्छिन्न परमेश्वर आणि जन्मशून्य असल्यामुळें निर्विकार आहेस. जीवलोक, कर्मवश असल्यामुळे त्याला जन्मादि विकार घडतात; परंतु तूं त्या जीवलोकाचा नियंता असल्यामुळें त्याच्या जीवनाचेहि कारण तूंच आहेस ॥३१॥
 
हे देवा, स्थावर अथवा जंगम असें कोणतेंहि कारण अथवा कार्य तुझ्याहून निराळें नाही. हे विधात्या, विद्या आणि कला ह्या सर्व तुझ्याच तनु आहेत. हिरण्यरुप ब्रह्मांड तुझ्या गर्भामध्यें असून तूं त्रिगुणात्मक मायेहून निराळा ब्रह्मरुप आहेस ॥३२॥
 
हे सर्वव्यापका, हें व्यक्त ब्रह्मांड म्हणजेच तुझें स्थूल शरीर होय. त्याच्या योगानें तूं इंद्रियें, प्राण व मन ह्यांच्या विषयांचा उपभोग घेतोस. आपल्या स्वरुपी स्थित असूनच तूं हा उपभोग घेत असल्यामुळें तूं उपाधिशून्य, ब्रह्मरुप व पुराणपुरुष असा आहेस ॥३३॥
 
हे अनंत आपल्या अव्यक्तरुपानें हें सर्व जग ज्यानें व्यापून टाकिलें आहे आणि ज्या ऐश्वर्य, विद्या व माया ह्यांनी युक्त असल्यामुळें अचिंत्य आहे, त्या तुला नमस्कार असो ॥३४॥
 
हे वर दोत्तमा, जर मला पाहिजे असलेले वर देत असलास, तर हे प्रभो, तूं उत्पन्न केलेल्या भूतांपासून मला मृत्यु प्राप्त होऊं नये ॥३५॥
 
त्याचप्रमाणे घराच्या आंत अथवा बाहेर, दिवसा अथवा रात्रीं, तूं उत्पन्न केलेल्या प्राण्यांकडून किंवा दुसर्‍या कोणत्याहि प्राण्यांपासून, भूमीवर अथवा आकाशामध्यें, मनुष्य, मृग, असुर, देव, महानाग, आणि आणखीहि ज्या कांही सचेतन किंवा अचेतन वस्तु असतील त्यांपासून मला मृत्यु प्राप्त होऊं नये. तसेच ज्याप्रमाणें तुझा महिमा आहे त्याप्रमाणें माझा होऊन मला युद्धामध्यें कोणीहि प्रतिपक्षि नसावा. सर्व प्राण्यांचा अधिपति मी एकटाच असावें; आणि तप व योग ह्यांच्या योगानें प्रभावशाली अशा लोकाचें जें अणिमादि ऐश्वर्य जें कधीहि नाश पावत नाहीं, तें मला प्राप्त व्हावे. असे वर तूं मला दे ॥३६॥॥३७॥
 
तिसरा अध्याय समाप्त ॥३॥

नृसिंहाख्यान अध्याय ४ था
नारद म्हणाला, - हे धर्मराजा, ह्याप्रमाणें हिरण्यकशिपूनें ब्रह्मदेवापाशीं वर मागितले असतां, त्याच्या तपानें प्रसन्न झालेल्या त्या ब्रह्मदेवानें अत्यंत दुर्लभ असेहि वर त्याला दिले ॥१॥
 
ब्रह्मदेव म्हणाला, - ‘ बा देत्यराजा, तूं जे मजपाशी वर मागत आहेस ते पुरुषांना प्राप्त होण्यास दुर्लभ आहेत; तथापि, हे दैत्यश्रेष्ठा, ते दुर्लभ वर देखील मी तुला देतो ’ ॥२॥
 
वर मिळाल्यावर ज्याचा अनुग्रह कधींच निष्फळ होत नाहीं अशा त्या भगवान् ब्रह्मदेवाची असुरश्रेष्ठ हिरण्यकशिपूने पूजा केली, व मरीच्यादि प्रजापति त्याची स्तुति करीत असतां तो स्वस्थानी निघून गेला ॥३॥
 
ह्याप्रमाणे वर प्राप्त झालेला तो दैत्य सुवर्णासारखें तेजः पुंज शरीर धारण करुन आपल्या भ्नात्याच्या वधाचें स्मरण करीत भगवंताचा द्वेष करुं लागला ॥४॥
 
त्या जगद्विजयी महादैत्याने सर्व दिशा, तिन्ही लोक, देव, असुर व मानव यांचे राजे, गंधर्व, गरुड, नाग, सिद्ध, चारण, विद्याधर, ऋषि व पितृगण यांचे अधिपति, मनु, यक्ष, राक्षस व पिशाच ह्यांचे अधिपति, प्रेतें व भूतें ह्यांचे स्वामी आणि सर्व प्राण्याचे अधिपति ह्या सर्वांना जिंकून आपल्या आधीन करुन घेतलें व लोकपालांची स्थानें त्यांच्या तेजासह त्यानें हरण केली ॥५॥॥६॥॥७॥
 
नंतर तो हिरण्यकशिपु देवांचे शोभायमान असें क्रीडावन ज्यांत आहे अशा खर्गलोकीं गेला आणि तेथें विश्वकर्म्याने निर्माण केलेलें त्रैलोक्यलक्ष्मीचे केवळ वसतिरथान आणि सर्व समृद्धीनें युक्त जें इंद्राचे मंदिर यामध्ये वास करुं लागला ॥८॥
 
 
हे धर्मराजा, त्या इंद्राच्या मंदिरांत पोंवळ्याच्या आणि पाचेच्या फरसबंद्या असून स्फटिक मण्याच्या भिंती होत्या व ठैडूर्यमण्यांचे खांब होते ॥९॥
 
 
त्यांत सर्वत्र चित्रविचित्र चांदवे लाविले असून ठिकठिकाणी पद्मराग मण्यांची आसनें मांडून ठेविलेलीं होती; आणि सभोंवार मोत्यांचे सर लोंबत असलेल्या हस्तिदंती दुधाच्या फेंसासारख्या मृदु व शुभ्र अशा शय्याहि होत्या ॥१०॥
 
हे राजा, त्या इंद्रमंदिरांत रुणझुण वाजणार्‍या तोरडया पायांत घालून एकमेकींना हाक मारीत संचार करणार्‍या देवांगना रत्नांच्या फरशीमध्यें प्रतिबिंबित झालेलें आपले सुंदर मुख अवलोकन करीत होत्या ॥११॥
 
तेथें सर्व इच्छित मनोरथ परिपूर्ण होत असल्यामुळें प्रसन्नचित्त होणारा, महाबलाढय, सर्व लोकांस पराजित करुन त्रैलोक्याचें राज्य एकटाच करणारा; आणि अतिशय कडकारीतीनें अंमल करणारा असा तो दैत्यराज हिरण्यकशिपु रममाण झाला; व अत्यंत ताप पावलेले देवादिकहि त्याच्या पायांना अभिवंदन करुं लागले ॥१२॥
 
हे धर्मराजा, उग्रवासाच्या मद्यानें तो मत्त होऊन त्याचे नेत्र धुंद व आरक्त होत. तेज, मनः सामर्थ्य, शरीरसामर्थ्य आणि इंद्रियसामर्थ्य, ह्यांचे तो माहेरघरच असल्यामुळें ब्रह्मा, विष्णु व महेश्वर ह्या तीन देवांवांचून इतर सर्व लोकपाल हातांत नजराणे घेऊन त्याच्या सेवेला सादर होत असत ॥१३॥
 
हे पांडुपुत्रा, स्वसामर्थ्यानें महेंद्राच्या आसनावर बसलेल्या त्या हिरण्यकशिपूच्या गुणाचे विश्वावसु, तुंबरु आणि मी, इत्यादि सर्वजण गायन करीत असूं, व गंधर्व, सिद्ध, ऋषि, विद्याधर, अप्सरा, वारंवार त्याची स्तुति करीत असत ॥१४॥
 
 
वर्णाश्रमनिष्ठलोक बहुदक्षिणायुक्त अशा यज्ञांनी त्यांचीच आराधना करुं लागले व तोहि आपल्या तेजानें त्या सर्वांचे हविर्भाग ग्रहण करुं लागला ॥१५॥
 
त्याच्या राज्यांत सप्तद्वीपवती पृथ्वी नांगरल्यावांचून पिकूं लागली, सर्व लोक त्याचे इच्छित मनोरथ पूर्ण करुं लागले; आणि अंतरिक्ष लोकांत नानाप्रकारच्या आश्चर्यकारक वस्तु उत्पन्न करण्याचें तो एक स्थान झाला ॥१६॥
 
त्याचप्रमाणें खारें पाणी, मद्य, घृत, उसाचा रस, दहीं, दूध आणि गोडें पाणी ह्यांचे सात समुद्र व त्यांस मिळणार्‍या नद्या, ही सर्व आपल्या लाटांबरोबर रत्नांच्या राशी त्याला आणून देऊं लागली. पर्वत आपापल्या दर्‍यांत त्याच्याकरितां क्रीडास्थानें करुं लागले. वृक्ष सर्वच ऋतूंमध्यें फळे व फुले देऊं लागले, आणि तो एकटाच वृष्टि करणें, दहन करणें, शोषण करणें, इत्यादिक लोकपालाचे भिन्नभिन्न गुण धारण करुं लागला ॥१७॥॥१८॥
 
ह्याप्रमाणें तो दिग्विजयी व निष्कंटक राजा झालेला हिरण्यकशिपु, आपल्याला प्रिय असलेल्या विषयांचा यथेच्छ उपभोग घेऊं लागला; पण तो जितेन्द्रिय नसल्यामुळें त्याची तृप्ति मात्र कवीं झाली नाही ॥१९॥
 
असो. ह्याप्रमाणें सनकादिकांच्या शापास पात्र झालेल्या, ऐश्वर्यानें मत्त झालेल्या आणि शास्त्रविरुद्ध वर्तन करणार्‍या, अशा त्या हिरण्यकशिपूचा बराच मोठा काळ निघून गेला ॥२०॥
 
तेव्हां उग्र दंडानें अत्यंत उद्विग्र झालेले सर्व लोक दुसरा कोणेहि रक्षक नसल्यामुळें लोकपालांसह भगवान् अच्युताला शरण गेले ॥२१॥
 
तेथें गेल्यावर, शांत आणि निर्मळचित्त असे संन्यासी लोक ज्या स्थानी गेले असतां पुनः संसारांत माघारे येत नाहींत, व ज्या स्थानी सकलदुःखहर्ता असा परमात्मा भगवान् वास करतो, त्या स्थानाला आमचा नमस्कार असो, असें म्हणून त्यानीं बाह्येंद्रियें व मन यांचें संयमन केले. अंतः करणांतील रागादि मळ काढून बुद्धीची एकाग्रता केली आणि निद्रेचा त्याग करुन व वायुभक्षण करुन निर्वाह करीत ते देव त्या हषीकेशाची स्तुति करुं लागले ॥२२॥॥२३॥
 
तेव्हां साधूंजनांना अभय देणारी व मेघासारख्या गंभीर शब्दानें युक्त असल्यामुळें दशदिशांना नादित करणारी अशी वक्तृरहित आकाशवाणी उत्पन्न झाली ॥२४॥
 
‘ सुरश्रेष्ठ हो, तुम्ही भिऊं नका, तुम्हां सर्वाचें कल्याण असो. कारण, प्राण्यांना माझें दर्शन झालें असतां तें त्यांच्या कल्याणासच सर्वस्वी कारण होतें ॥२५॥
 
हे देव हो, ह्या दैत्याधर्माचा दुष्टपणा मी जाणिला आहे; व मी त्याचा वधहि, करणार आहे; परंतु तुम्ही कांही काळ वाट पहा ॥२६॥
 
अहो, देव, वेद, गाई, ब्राम्हण, साधु, धर्म आणि मी, यांच्या ठिकाणी जेव्हां पुरुषाचा द्वेष उत्पन्न होतो, तेव्हा तो लवकरच नाश पावतो ॥२७॥
 
हे सुरश्रेष्ठ हो, वैररहित आणि अत्यंत शांत अशा आपल्या महात्म्या प्रल्हादनामक पुत्राशी जेव्हां हा द्रोह वरुं लागेल, तेव्हां ब्रह्मदेवाच्या वराने जरी हा प्रबळ झाला आहे; तथापि मी ह्यांचा वध करीन " ॥२८॥
 
नारद म्हणाले, - हे धर्मराजा, ह्याप्रमाणे जगद्गरु परमात्म्याने आकाशवाणीनें त्यांना सांगितलें असतां, त्याल नमस्कार करुन निर्भय झालेले देव परत गेले, व त्या असुराचा वध आतां झालाच असे त्यांनी मानिलें ॥२९॥
 
हे धर्मराजा, त्या दैत्याधिपति हिरण्यकशिपूला परमप्रतापी असे चार पुत्र होते त्यापैकी प्रल्हाद हा वयानें सर्वापेक्षां लहान असून गुणांनी मोठा होता सत्पुरुषांचा उपासक, ब्राह्मणभक्त, शीलसंपन्न, सत्यवादी व जितेन्द्रिय असून आत्म्याप्रमाणें सर्व भूतांचा एकच प्रिय व हितेच्छु होता. तो दासाप्रमाणे श्रेष्ठ पुरुषांच्या चरणी नम्र, पित्याप्रमाणें दीनावर प्रेम करणारा, आपल्या बरोबरींच्यावर भ्रात्याप्रमाणें प्रीति करणारा, गुरुचे ठिकाणी ईश्वरबुद्धी वागणारा, आणि विद्या, वित्त, सौंदर्य व उत्तम जन्म, ह्यांनी युक्त असून मान व गर्व ह्यांनी रहित होता. संकटें प्राप्त झाली असतांहि तो मनामध्यें उद्विग्न होत नसे. परमात्म्यावांचून इतर सर्व मिथ्या आहे असें तो समजे. ह्या लोकीच्या व परलोकींच्या विषयांविषयीं तो निस्पृह असून इंद्रिये, प्राण, शरीर आणि बुद्धि ह्यांना त्यानें वश केलें होते. तो असुर असतांहि असुरांच्या गुणांनी रहित असल्यामुळे त्याच्या विषयवासना शांत झाल्या होत्या ॥३०॥
 
॥३१॥॥३२॥॥३३॥
 
हे धर्मराजा, भगवान् ईश्वराच्या ठिकाणीं असलेले गुण जसे कधीं लुप्त होत नाहींत, त्याप्रमाणें त्या प्रल्हादाच्या ठिकाणी असणारे ते श्रेष्ठ गुणहि अद्याप झाकून जात नाहीत. विवेकी पुरुष वारंवार ते ग्रहण करीत असतात ॥३४॥
 
हे धर्मराजा, तुझ्यासारखे विष्णुभक्त त्या प्रल्हादाची प्रशंसा करतील ह्यांत आश्चर्य नाही; परंतु असुरांचे शत्रु जे देव असेहि सुद्धां भरसबेमध्ये खरा साधु कोण, याविषयीं गोष्टी निघाल्या असतां शप्रल्हादाचीच उपमा देत असतात ॥३५॥
 
असंख्यात गुणांनी भूषित असें त्या प्रल्हादाचें माहात्म्य असून मी तुला थोडक्यांत त्याचें केवळ दिग्दर्शन करितों. भगवान् वासुदेवाच्या ठिकाणी त्याची स्वाभाविक प्रीति जडली होती ॥३६॥
 
हे राजा, तो अगदी बालक असतांच कृष्णरुप पिशाचानें त्याचें मन घेरुन टाकिलें असल्यामुळें तें त्या कृष्णाच्याच ठिकाणी एकसारखे लागलें होतें; व म्हणून सर्व खेळणी टाकून तो सर्वदा कृष्णचिंतनच करीत असे. हें जग अशाप्रकारचें विषयासक्त आहे अशी त्याला जाणिवच नव्हती; व त्यामुळें त्याची स्थिति लोकांमध्ये जडासारखी भासत होती ॥३७॥
 
बसत असतां, हिंडत असतां, भोजन करीत असतां, शयन करीत असतां उदक प्राशन करीत असतां, भोजन करीत असतां, शयन करीत असतां, उदक प्राशन करीत असतां, किंवा भाषण करीत असतां, त्याला त्या आसनादि पदार्थांचे भानहि नसे. इतकें त्याचें गोविदानें आपल्याशी अगदी एकीकरण केलें होतें ॥३८॥
 
एकाद्या वेळी भगवच्चिंतनानें त्याचें अंतः करण क्षुब्ध झालें, म्हणजे तो रोदन करीत असे, केव्हां भगवच्चिंतनानें आनंद झाला म्हणजे तो हास्य करीत असे; व कधी कधी उच्चस्वराने भगवंताच्या गुणांचे गायन करीत असे ॥३९॥
 
कधीं कधीं तो मोठयानें हे हरे, हे प्रभो, इत्यादि गर्जना करी, तर केव्हां निर्मिड होऊन नृत्य करी; आणि एकादे वेळी ईश्वरचिंतनामध्ये गढून गेला म्हणजे तन्मय होऊन भगवंताच्या लीलांचें स्वतःच अनुकरण करी ॥४०॥
 
केव्हां केव्हां भगवत्स्वरुपी लीन होऊन गेल्यामुळें तो पूर्ण सुखामध्यें निमग्न होई. त्याच्या शरीरावर रोमांच उठत असत आणि स्थिर प्रेमापासून झालेल्या आनंदाश्रूंनी भरुन गेल्यामुळें त्याचे नेत्र किंचित् मिटत, व तो कांही एक न बोलतां स्वस्थ राही ॥४१॥
 
याप्रमाणें अशा साधूंच्या समागमाने श्रेष्ठकीर्ति वैराग्यशील परमेश्वराच्या चरणकमलांची निरंतर सेवा त्याला प्राप्त झाल्यामुळें तो स्वतः ला वारंवार परमानंदसुखाची प्राप्ति करुन घेई. इतकेंच नव्हें तर दुर्जनांच्या संगामुळें दीन झालेल्या दुसर्‍या पुरुषाच्याहि मनाला शांत करीत असे ॥४२॥
 
हें असो. हे धर्मराजा, ह्याप्रमाणें महाभगवद्भक्त महाभाग्यशाली आणि महात्मा असा जो आपला पुत्र प्रह्लाद, त्याचा हिरण्यकशिपु द्रोह करुं लागला ॥४३॥
 
धर्मराजा पुनः म्हणाला, - हे नारदा, शुद्ध आणि साधु असा जो आपला पुत्र प्रह्लाद त्याच्याशी पित्यानें द्रोह केला, हें मोठें आश्चर्य असून तुजपासून ते सविस्तर ऐकावें अशी आमची इच्छा आहे ॥४४॥
 
पुत्र जरी प्रतिकुल असला तथापि पिते पुत्रवत्सल असल्यामुळें केवळ शिक्षा लावण्यासाठी शब्दांनीच त्यांना ताडन करितात, परंतु शत्रूप्रमाणे त्यांच्यांशी द्रोह कधीहि करीत नाहीत ॥४५॥
 
तेव्हां पिता हेच ज्याचें दैवत आहे, जो कामक्रोधरहित असून आपणास अनुकूल आहे, अशा त्या प्रल्हादासारख्या पुत्राशीं पिते द्रोह कसे करितील ? यास्तव हे ब्रह्मनिष्ठा प्रभो, हिरण्यकशिपू पित्यानें स्वपुत्र प्रल्हादाचा द्वेष केला असतां तो त्या हिरण्यकशिपूच्या मरणास कारण झाला हें मोठें आश्चर्य आहे ? तरी आमच्या या शंकेचे निराकरण करा ॥४६॥
 
॥ चवथा अध्याय समाप्त ॥४॥

नृसिंहाख्यान अध्याय ५ वा
नारद म्हणाला, - हे धर्मराजा, भगवान् शुक्राचार्याला असुरांनी आपला पुरोहित केले होतें, आणि शंड आणि अमर्क नांवांचे त्याचे दोन पुत्र दैत्यराज हिरण्यकशिपूच्या गृहाजवळ रहात होते ॥१॥
 
राजानें आपला पुत्र प्रल्हाद नीतिशास्त्रामध्यें निपुण असतांहि तो अज्ञानी आहे असें समजून शंडामर्कांकडे पाठविला असतां, त्यांनी पढविण्यास योग्य असे राजनीति आदिकरुन विषय इतर असुरबालकांबरोबर त्यालाहि पढविले ॥२॥
 
गुरुगृही गुरुनें जें दंडनीतिशास्त्र त्याला सांगितलें, तें प्रल्हादानें श्रवण केलें व पठणहि केलें; परंतु, ‘ हा मी आणि हा दुसरा ’ अशाप्रकारचा जो मिथ्याभिमान तोच त्या नीतिशास्त्राचा आश्रय असल्यामुळें, त्याला तें मनापासून चांगलें वाटलें नाही ॥३॥
 
ह्याप्रमाणें चाललें असतां, हे पंडुपुत्रा धर्मराजा, एके दिवशी दैत्यराज हिरण्यकशिपूनें आपल्या पुत्राला मांडीवर घेऊन ‘ बाळा तुला काय चांगले वाटते तें सांग ’ असें विचारलें ॥४॥
 
प्रल्हाद म्हणाला, - हे दैत्यश्रेष्ठा, मी व माझें, या मिथ्याभिमानामुळें मनांत सर्वदा अत्यंत उद्विग्र झालेल्या प्राण्यांनी अंधकूपाप्रमाणें मोहकारक व आपल्या अधः पाताला कारण, अशा गृहाचा त्याग करावा, आणि वनामध्ये जाऊन श्रीहरीला भजावें, हें मला चांगलें वाटतें ॥५॥
 
नारद म्हणाला, - हे धर्मराजा, आपला शत्रू जो विष्णू त्याविषयी निष्ठायुक्त असें आपल्या पुत्राचें भाषण श्रवण करुन हिरण्यकशिपूला हंसूं आलें; आणि तो म्हणाला, अहो, शत्रुपक्षीय लोक मुलाचा बुद्धिभेद करुन टाकितात ॥६॥
 
 
तरी हे शंडामर्कहो, विविध वेष धारण करुन गुप्तरीतीने संचार करणारे विष्णुपक्षपाती ब्राह्मण ह्याचा बुद्धिभेद जेणेंकरुन करणार नाहींत, अशा चांगल्या बंदोबस्तानें तुम्हीं आपल्या घरी ह्या बालकाचें शिक्षण करावें ॥७॥
 
नंतर हिरण्यकशिपूनें त्यांच्या घरी प्रल्हादाला पोंचविलें असतां पुरोहितांनी त्याला हांक मारुन त्याची प्रशंसा केली; आणि मृदुभाषणपूर्वक सामोपचारानें ते त्याच्याशी बोलूं लागले ॥८॥
 
ते म्हणाले, - बाळा प्रल्हाद, तुझें कल्याण असो. जें आम्ही आतां तुला विचारणार आहो, तें तूं खरें सांग; खोटें सांगूं नको. अरे, इतर मुलांहून अगदी विपरीत अशी ही बुद्धि तुला कोठून उत्पन्न झाली बरें ? ॥९॥
 
हे कुलनन्दना प्रल्हादा, दुसर्‍यांनी तुझ्या बुद्धीचा भेद केला, कीं आपोआपच तो झाला ? आम्ही तुझे गुरु असून हें समजून घेण्याची आमची इच्छा आहे, तरी हा प्रकार तूं आम्हांला सांग ॥१०॥
 
प्रल्हाद म्हणाला, - ‘ मी व दुसरा ’ असा मिथ्या अभिमान ज्याच्या मायेनें केलेला असून त्या मायेनें बुद्धीला मोह पडलेल्या तुम्हांसारख्या पुरुषांच्या ठिकाणींच तो दृष्टीस पडतो; त्या भगवंतालाच नमस्कार असो ॥११॥
 
तो भगवान् जेव्हां पुरुषांना अनूकूळ होतो, तेव्हां ‘ हा वेगळा व मी वेगळा ’ अशी मिथ्या संसारविषयक अविवेकी बुद्धि नष्ट होत्ये ॥१२॥
 
 
वास्तविक पाहूं गेलें असतां, ह्या परमात्म्याचेंच अविवेकी लोक, ‘ हा मी आहे व हा परकी आहे ’ असें निरुपण करितात. त्या परमात्म्याची लीला दुर्धट असून त्याला जाणण्याच्या कामी ब्रह्मादिक देवसुद्धां वेडे होऊन जातात, तो हा परमात्माच माझ्या बुद्धीचा भेद करीत आहे ॥!३॥
 
अहो गुरुजी, ज्याप्रमाणें लोहचुंबकाजवळ लोखंड आपण होऊन भ्रमण करुं लागतें, त्याप्रमाणें चक्रपाणी श्रीहरीच्या समीप माझें चित्त दैवयोगानें जाऊन तेथें त्याला बुद्धिभेद होतो ॥१४॥
 
नारद म्हणाला, - हे धर्मराजा, त्या ब्राह्मणाला असें बोलून तो महाबुद्धिमान् प्रल्हाद स्तब्ध राहिला असतां तो अविवेकी राजसेवक ब्राह्मण कुद्ध झाला व त्याची निर्भर्त्सना करुन म्हणाला ॥१५॥
 
अरे ! हा आम्हांला अपयश देणारा पोर आहे, ह्यास्तव एक छडी आणा. ह्या दुर्बुद्धी कुलांगाराला सामदानादि चार उपायांमधील चवथा उपाय जो दंड तोच योग्य आहे ॥१६॥
 
अहो, काय सांगावें ! दैत्यरुप चंदनवृक्षाच्या वनांत हा कंटकवृक्षच उपजला असून दैत्यरुप चंदनवृक्षाची मुळें तोडून टाकण्यास तयार असलेल्या विष्णुरुप कुर्‍हाडीचा हा पोरटा म्हणजे दांडाच झाला आहे ॥१७॥
 
असो. ह्याप्रमाणें दरडावणीसारख्या नानाप्रकारच्या उपायांनी त्या प्रल्हादास भय दाखवून त्या ब्राह्मणानें त्याला धर्म, अर्थ व काम ह्यांचे प्रतिपादन करणारें शास्त्र पढविलें ॥१८॥
 
नंतर शिकण्यास योग्य असे जे समदानादिक चार उपाय ते ह्याला समजले असें जाणून गुरुनें त्यास मातेकडून अभ्यंगस्त्रान घालविलें; आणि तिलकादिकांनी अलंकृत करुन ते त्याला हिरण्यकशिपूकडे दाखवायास घेऊन गेले ॥१९॥
 
तेथें प्रल्हाद पित्याच्या पायां पडला असतां हिरण्यकशिपूनें त्याला आशीर्वाद दिला; आणि त्याचें अभिनंदन करुन बाहूंनी पुष्कळ वेळपर्यंत त्याला आलिंगान दिलें. त्या असुर श्रेष्ठ हिरण्यकशिपूला पुत्राला पाहून परमानंद झाला ॥२०॥
 
हे युधिष्ठिरा, प्रसन्नमुख अशा त्या प्रल्हादाला हिरण्यकशिपूनें अंकावर घेऊन त्याच्या मस्तकाचें अवघ्राण केले आणि प्रेमाच्या अश्रुबिदूंनीं त्याला सिंचन करीत तो त्याच्याशीं बोलूं लागला ॥२१॥
 
हिरण्यकशिपु म्हणाला, - बाळा प्रल्हादा, तुला दीर्घायुष्य असो. तो पुढें म्हणाला, बाळा प्रल्हादा, ह्या वेळपर्यंत गुरुपासून जें तूं शिकलास त्यांपैकी तुला चांगले येत असेल तें म्हण पाहूं ? ॥२२॥
 
प्रल्हाद म्हणाला, - ‘ हे ताता, विष्णूचे कीर्तन, श्रवण, स्मरण, पादसेवन, पूजन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मसमर्पण ह्या नऊ लक्षणांनी युक्त अशी भगवान् विष्णूच्या ठिकाणी पुरुषानें अर्पण केलेली भक्ति ज्याच्या योगानें साक्षात् उत्पन्न होत्ये, तेंच उत्तम अध्ययन असें मी समजतों " ॥२३॥॥२४॥
 
 
पुत्राचें असें हें भाषण श्रवण करतांच हिरण्यकशिपूचे ओंठ क्रोधानें स्फुरण पावूं लागले आणि तो गुरुपुत्राला म्हणाला ॥२५॥
 
हे अधम ब्राह्मणा, हें तूं काय केलेंस ? हे दुर्मते, माझ्या प्रतिपक्षाचा आश्रय करणारा तूं दुष्टानें मला न जुमानितां ज्याच्यामध्यें कांही अर्थ नाही, असे हें काही तरी ह्याला शिकवले आहेस ॥२६॥
 
असो. मित्रत्वानें वागत असूनहि तुझें आचरण आमच्या विरुद्ध झालें हें काही मोठें असंभवनीय नाही. कारण ज्यांची मैत्री कपटयुक्त असते असे तुमच्यासारखे कपटवेष धारण करुन संचार करणारे दुर्जन ह्या लोकामध्यें आहेतच; पण जसा पातकी लोकांना नरकभोगानंतरहि सुद्धां रोगाचा उद्भव होतो, तसा वरकरणी सज्जनाप्रमाणें वागणार्‍या त्या दुर्जनांच्या अंतर्यामीं असलेला द्वेषहि कालांतरानें दृष्टोत्पत्तीस येतो ॥२७॥
 
गुरुपुत्र म्हणाला, - हे इंद्रशत्रो, हा तुझा पुत्र जें सांगत आहे, तें त्याला मी पढविलें नाही; व दुसर्‍याहि कोणी पढविलें नाही. तर ही ह्याची स्वाभाविक उपजत बुद्धि आहे. तरी हे राजा, आपला क्रोध आवरुन धर, आमच्यावर भलताच दोषारोप करुं नकोस ॥२८॥
 
नारद म्हणाला, - हे धर्मराजा, ह्याप्रमाणें गुरुपुत्रानें प्रत्युत्तर दिलें असतां हिरण्यकशिपु आपल्या पुत्राला म्हणाला, - ‘ हे अभद्रा, गुरुपासून जर हि दुष्ट बुद्धि तुला प्राप्त झाली नाहीं, तर ती कोठून प्राप्त झाली ? " ॥२९॥
 
अशाप्रकारें हें पित्याचें भाषण ऐकून प्रल्हादानें उत्तर दिलें, ज्यांची गृहसौख्याविषयींच निरंतर चिता चाललेली असत्ये, इंद्रियांच्या योगानें जे संसारामध्यें प्रवेश करुन वारंवार विषयांचें सेवन करीत असतात, अशा पुरुषांची बुद्धि दुसर्‍यांच्या उपदेशानें आपण होऊन अथवा परस्परांच्या संभाषणानेंहि श्रीकृष्णाच्या ठिकाणी आसक्त होत नाहीं ॥३०॥
 
ज्यांच्या अंतः करणांत विषयवासना भरल्यां आहेत, व जे बाह्य विषयांनाच पुरुषार्थ मानतात, ते स्वस्वरुपांतच पुरुषार्थ आहे असें मानणार्‍याचें उद्दिष्टस्थान जो विष्णु, त्याला जाणत नाहीत. बाह्य विषयांच्या ठिकाणी परमार्थबुद्धि धारण करणार्‍यांनाच गुरु असें समजण्याचा त्यांचा स्वभाव असल्यामुळें जसे आंधळ्याच्या मागून जाणारे आंधळे, मार्ग न जाणतां खाडयामधें पडतात, त्याप्रमाणें ईश्वराच्या वेदवाणीरुप दावणींत ते काम्यकर्माच्या योगानें बद्ध होतात ॥३१॥
 
हे तात, ज्यांचा विषयसंबंधी अभिमान अगदी नष्ट झाला आहे, त्या अत्यंत पूज्य पुरुषांच्या चरणरजांनीं स्त्रान करण्याची आवड जोंपर्यंत ह्यांनीं धरिली नाहीं, तोंपर्यंत श्रतिवचनांनी उत्पन्न झालेली ह्यांची बुद्धि देखील भगवंताच्या चरणीं रत होत नाहीं ॥३२॥
 
इतकें बोलून प्रल्हाद स्वस्थ बसला असतां विवेकशून्य अंतः करणार्‍या त्या हिरण्यकशिपूनें त्याला क्रोधानें आपल्या मांडीवरुन भूमीवर लोटून दिलें ॥३३॥
 
असहिष्णुता व क्रोध ह्यांनीं व्याप्त झाल्यामुळें त्याचे नेत्र आरक्त झाले व तो म्हणाला, - ‘ हे राक्षसहो, याला येथून लवकर बाहेर काढा आणि याचा वध करा. हा वधासच योग्य आहे ॥३४॥
 
हे राक्षसहो, मित्रांना टाकून हा अधम पुत्र ज्याअर्थी चुलत्याचा घात करणार्‍या अशा त्या विष्णूच्या चरणांचे एकाद्या दासाप्रमाणें पूजन करितो, त्याअर्थी माझ्या भ्रात्याचा घात करणारा विष्णु तो हाच आहे ॥३५॥
 
अहो ! ज्यानें पांच वर्षांचा असतांना त्याग करण्यास कठीण अशा आपल्या मातापितरांच्या स्नेहाचा त्याग केला तो हा कृतघ्न, विष्णूंचे तरी काय हित करणार आहे ? ॥३६॥
 
हे राक्षसहो, जस्सें औषध परिणामी हितकारक असतें; त्याप्रमाणें एकादा परकीसुद्धां जर आपला हितकारक असेल तर तो आपला आप्तच समजला पाहिजे, पण आरैसपुत्र जर आपलें अहित करणारा असेल, तर त्याला रोगाप्रमाणें आपला शत्रु समजलें पाहिजे. फार काय, आपल्या शरीराचा एकादा अवयव जर आपलें हित करणारा नसेल तर तो तोडून टाकावा; कारण, तेवढ्याचा त्याग केला असतां बाकीचे शरीर सुखानें वाचतें ॥३७॥
 
यास्तव भोजन, शयन, आसन, इत्यादि कोणत्याहि मार्गानें विषप्रयोग वगैरे करुन ही ह्यांचा वध करा. कारण विषयासक्त झालेलें इंद्रिय जसें मुनीला शत्रुवत् असतें, त्याप्रमाणें पुत्रवेष धारण करणारा हा पोरहि माझा शत्रूच आहे ॥३८॥
 
राजाची अशी आज्ञा होताच, तीक्ष्ण दाढांचे, भयंकर मुखांचे आणि लाल केंस व दाढीमिशा असलेले असे ते राक्षस हातांमध्ये शूळ घेऊन भयंकर गर्जना करीत ‘ तोडा, मारा ’ असें म्हणत, स्वस्थ बसलेल्या त्या प्रल्हादाच्या मर्मस्थानीं प्रहार करुं लागले ॥३९॥॥४०॥
 
परंतु दैवहीन पुरुषाचे जसे मोठमोठेहि उद्योग व्यर्थ जातात, त्याप्रमाणें प्रल्हादाच्या शरीरावर त्या राक्षसानी केलेले प्रहार निष्फळ झाले. कारण त्यानें आपलें मन निर्विकार, निर्विषय, निरतिशय ऐश्वर्यांनी युक्त आणि शस्त्रादिकांचाहि नियंता, अशा परमेश्वराच्या ठिकाणीं लाविलें ॥४१॥
 
हे युधिष्ठिरा, ह्याप्रमाणें त्या प्रल्हादाला मारण्याविषयीचा प्रयत्न निष्फळ झाला असें पाहून हिरण्यकशिपूला फारच भीति उत्पन्न झालोई, व त्यानें अत्यंत आग्रहपूर्वक त्याच्या वधाविषयी आणखी उपाय योजिले ॥४२॥
 
त्यानें त्याला दिग्गजांच्या पायांखालीं तुडविलें, मोठमोठया सर्पांकडून दंश करविले, त्याच्या मागें कृत्या लाविली, पर्वतशिखरांवरुन त्याला खाली लोटून दिलें, नानाप्रकारच्या मार्गांनी त्याचा घात करण्याचा प्रयत्न केला. खाडयामध्यें घालून त्याला पुरिलें, विषप्रयोग केला, उपाशीं ठेविलें, कडक थंडीवार्‍यामध्यें व अग्नीमध्यें टाकिलें, पाण्यामध्यें बुडविलें आणि त्याच्या अंगावर पर्वतहि फेंकले; पण या सर्वहि उपायांनी जेव्हां त्या निष्पाप पुत्राला मारण्यास तो असुर समर्थ झाला नाहीं, व त्याचा वध करण्यास जेव्हां त्याला आणखी कांहींच उपाय सुचेनासा झाला, तेव्हा तो अत्यंत चिंताग्रस्त होऊन मनामध्यें म्हणाला ॥४३॥॥४४॥
 
अहो, मी याला निष्ठुर कटुशब्दांनी पुष्कळ टाकून बोललों, नानाप्रकारे त्याचा छल करुन अभिचारांदि निंद्य कर्मांनीं याचा वध करण्याचा यत्न केला; परंतु त्यांपासूनहि हा आपल्या सामर्थ्यानें मुक्त झाला ॥४५॥
 
हा बालक असून माझ्या समीप उभा असतांहि ह्याच्या चित्ताला माझी भीति मुळीच वाटत नाही. तेव्हा शुनःशेपाप्रमाणें हाहि माझें शत्रुत्व विसरणार नाही ॥४६॥
 
ह्याचा प्रभाव अपरिमित दिसतो. ह्याला कोणापासूनहि भय दिसत नाही. हा अमर दिसतो. यावरुन ह्याच्याच विरोधामुळें मला मृत्यु प्राप्त होईल असें वाटतें ! नाहींपेक्षां मी निः संशय अमरच आहे. ॥४७॥
 
अशा प्रकारच्या चिंतनानें हिरण्यकशिपु किंचित् निस्तेज होऊन शून्यांतः करण नें खाली मान घालून बसला असतां शुक्राचार्याचे पुत्र शंडामर्क त्याजवळ आले आणि म्हणाले ॥४८॥
 
हे प्रभो, केवळ भ्रुकुटींच्या चलनानें ज्यांतील सर्व लोकपाल भयभीत झाले आहेत असें हें त्रैलोक्य ज्याअर्थी तूं एकटयानें जिंकिलें आहेस त्याअर्थी तुला चिंतास्पद होण्याचें कारण मुळीच नाही. आतां ह्या प्रल्हादाचा तुजविषयी शत्रूप्रमाणे पक्षपातपणा व प्रभाव दिसतो, पण त्याचे भय मानण्याचें मुळींच कारण नाही ॥४९॥
 
तथापि हे असुरश्रेष्ठा, शुक्राचार्य गुरु तपश्चर्या पुरी करुन माघारे येईपर्यंत, हा प्रल्हाद भयभीत होऊन पळून न जाईल अशारीतीनें तूं याला वरुणपाशांनी बद्ध करुन ठेव. कारण, वय जाईल अशारीतीनें तूं याला वरुणपाशांनी बद्ध करुन ठेव. कारण, वय जाईल त्या मानानें थोर पुरुषाची बुद्धि बदलून चांगली होत्ये ॥५०॥
 
ह्याप्रमाणें गुरुपुत्रानें दिलेल्या मसलतीचा, ठीक आहे, असें म्हणून अंगीकार करुन हिरण्यकशिपु त्याला म्हणाला, - ‘ गुरुपुत्रहो, गृहस्थाश्रमी राजाजे जे धर्म आहेत तेच तुम्ही आतां ह्याला शिकवावे ॥५१॥
 
हे धर्मराजा, नंतर त्या शंडामर्कांनी विनययुक्त आणि नम्र अशा प्रल्हादाला अनुक्रमानें धर्म, अर्थ व काम हेच पुरुषार्थ निरंतर पढविले ॥५२॥
 
परंतु गुरुंनी आपल्याला यथासांग शिकविलेले जे धर्म, अर्थ व काम, ते त्याला चांगले वाटले नाहीत. कारण, हें शिक्षण रागद्वेषादि द्वंद्वांमुळें विषयांवर आसक्त होणार्‍या पुरुषांनी मात्र चांगलें म्हणून वर्णिले आहे ॥५३॥
 
असो. एका वेळी तो गुरु कांही गृहकर्मासाठी दूर गेला असतां, मुलांना खेळण्याची संधी सांपडली. त्या वेळी समवयस्क मुलानी त्या प्रल्हादाला खेळण्याकरितां हाक मारिली ॥५४॥
 
तेव्हां त्यांची स्थिति ओळखून त्या महाज्ञानी प्रल्हादानें मधूर वाणीने त्यांनांच आपल्याजवळ बोलाविलें आणि हंसतहंसत प्रेमानें तो त्यांच्याशी बोलूं लागला ॥५५॥
 
हे धर्मराजा, ते बालक असल्यामुळें रागद्वेषादि द्वंद्वांनी विषयासक्त झालेल्या पुरुषांच्या उपदेशांनी व आचरणांनीं त्यांची बुद्धि दूषित झाली नव्हती. प्रल्हादाविषयीं त्यांना आदर वाटत असे, व त्यामुळे त्याचें भाषण ऐकतांच त्या सर्वांनी आपल्या खेळण्याचा त्याग केला व आपले अंतः करण आणि दृष्टि त्याच्याकडे लावून ते त्याच्या सभोंवतीं बसले. तेव्हां दयाळू व लोकहितकारी असा तो महाभगवद्भक्त असुर प्रल्हाद त्या असुर बालांना उपदेश करुं लागला ॥५६॥॥५७॥
 
पांचवा अध्याय समाप्त ॥५॥

नृसिंहाख्यान अध्याय ६ वा
प्रल्हाद म्हणाला, - हे मित्रहो, ज्ञानी पुरुषानें ह्या मनुष्यजन्मामध्येंच व त्यांतूनहि अगदीं कौमारावस्थेमध्येंच भागवतधर्माचें आचरण करावें; सकामधर्माचे आचरण करुं नये. कारण, हा मनुष्यजन्म जरी दुर्लभ असून पुरुषार्थप्रद आहे, तरी तो अशाश्वत आहे ॥१॥
 
मनुष्यजन्मामध्ये विष्णूला शरण जावें हेंच पुरुषाला योग्य आहे. कारण, हा विष्णुच सर्व भूतांचा आत्मा, ईश्वर, प्रिय आणि हितकारी आहे ॥२॥
 
हे दैत्यहो, जसें प्राण्यांना आयास न करितां पूर्वकर्मानेंच दुःख प्राप्त होतें, त्याप्रमाणें देहाच्या योगानें इंद्रियासंबंधी सुखहि सर्व योनीमध्यें दैवयोगानेंच प्राप्त होतें ॥३॥
 
म्हणून त्याच्याकरितां प्रयत्न करुं नये. तसा प्रयत्न केल्यानें केवळ आयुष्याचा व्यय मात्र होतो. शिवाय मुकुंदाच्या चरणकमलाची सेवा करणारा पुरुष जसें परमानन्दरुप क्षेम पावतो, तसें क्षेम विषयसुखार्थ प्रयत्न करणारा पुरुष पावत नाही ॥४॥
 
ह्यास्तव संसारामध्यें सांपडलेल्या विवेकी पुरुषानें जोंपर्यंत सर्वांगानी परिपूर्ण असलेल्या आपल्या नाश झाला नाहीं, तोपर्यंत होईल तितका लवकर आत्मकल्याणाचा प्रयत्न करावा ॥५॥
 
अहो, पुरुषांचें आयुष्य आधीं मुळी शंभर वर्षे; त्यांतील अर्धे आयुष्य अज्ञानांत इंद्रियनिग्रह न केल्यामुळें व्यर्थ जातें. कारण, तो पुरुष, विषयरुपी अज्ञानामध्यें निमग्न होऊन घोरत पडतो ॥६॥
 
 
तसेंच बाळपणी अज्ञान स्थितीत असल्यामुळें दहा वर्षे, कौमारावस्थेमध्यें खेळत असल्यामुळें दहा वर्ष, मिळून वीस वर्षे आणि वृद्धावस्थेमध्यें जरेनें शरीर ग्रस्त होऊन अशक्त झाल्याळें वीस वर्षे असें आणखी आयुष्य फुकटच जातें ॥७॥
 
बाकीचें आयुष्य प्रबळ मोहानें व दुःखांनी चोहोंकडून परिपूर्ण अशा कामाच्या योगाने गृहामध्यें आसक्त झालेल्या त्या प्रमत्त पुरुषाच्या बाबतीत व्यर्थच जातें ॥८॥
 
तात्पर्य, हे दैत्यहो, इंद्रियदमन न केलेला असा पुरुष, एकदां संसारांत पडला म्हणजे तो स्नेहरुप दृढपाशांनी बद्ध होतो; आणि मग त्याला स्वतः ची सुटका करणें अशक्य होतें ! ॥९॥
 
जें द्रव्य, चोर, सेवक आणि वाणी आपले अतिप्रिय प्राण खर्चून सुद्धां मिळवूं पहातात, त्या प्राणांपेक्षाहि प्रिय असलेल्या द्रव्याची इच्छा कोणता पुरुष बरें सोडून देईल ? ॥१०॥
 
जसा कोश करणारा कीटक आपणाला हितकारक असें घर निर्माण करीत असतां, शेवटी आपणांस त्यांतून बाहेर पडण्यासहि मार्ग ठेवीत नाहीं, त्याप्रमाणें विषयांची इच्छा तृप्त न झाल्यामुळें लोभानें स्वतः च्या बंधनास कारण होणारी कर्मे करणारा जो पुरुष, स्त्रीपुत्रांवर अनुरक्तचित होऊन, त्यांच्या स्नेहपाशानें बद्ध होतो, तो दयायुक्त अशा प्रिय भार्येचा एकांतस्थळी घडलेला प्रसंग, तिच्याबरोबर झालेली मनोहर भाषणें, मित्रांची संगती, मधुर शब्द उच्चारणारी मुलें, सासरी असलेल्या त्या मनोहर कन्या, भ्राते, भगिनी, वृद्धावस्थेमुळें दीन झालेले मातापितर, सुंदर आणि विपुल साहित्यांनी भरलेलीं घरें, कुलपरंपरेनें आलेल्या वृत्ति, पशुसमुदाय आणि भृत्यगण, ह्यांचे स्मरण करणारा त्यांचा त्याग करण्यास कसा बरें समर्थ होईल ? मित्रहो, जो शिस्त्र आणि जिव्हा ह्यापासून होणारें सुखच अधिक मानितो, व ज्याला अत्यंत मोह प्राप्त झाला आहे, तो कसा बरें विरक्त होईल ॥११॥॥१२॥॥१३॥
 
हे असुरबालकहो, संसारी पुरुष प्रमत्त होऊन कुटुंभाच्या पोषणार्थ आपल्या आयुष्याचा क्षय होत आहे व आपण पुरुषार्थाला मुकत आहों, हें जाणत नाहीं व सर्वकाळी आणि सर्वठिकाणी तापत्रयानें दुःख पावत असूनहि कुटुंबामध्येंच रममाण होत असतो; त्याला त्या कुटुंबामध्यें दुःख आहे असें वाटतच नाहीं ॥१४॥
 
अहो, फार काय, परंतु ज्याचें चित्त द्रव्याच्या ठिकाणीं संलग्न झालेलें असतें, अशा त्या परवित्त हरण करणार्‍या कुटुम्बी पुरुषाला परलोकी नरकरुप व इहलोकीं राजदंडादिरुप दुःख भोगावें लागतें, हें जाणत असूनहि, तो जितेन्द्रिय नसल्यामुळें व द्रव्यामिलाषाची त्याची शांति झाली नसल्यामुळें तो परवित्त हरण करतोच ॥१५॥
 
हे दानवहो, ह्याप्रमाणें केवळ कुटुंबपोषण करणारा पुरुष, विद्वान् असला तरी, आत्मज्ञान मिळविण्याला समर्थ होतो असें नाही. अत्यंत मूढ मनुष्याप्रमाणें तोसुद्धां अज्ञानांत पडतो. कारण, ‘ हे माझें व हे दुसर्‍याचें ’ असा भिन्न भाव त्याच्या ठिकाणी उत्पन्न झालेला असतो ॥१६॥
 
हे दैत्यपुत्रहो, ज्याचा नेत्रकटाक्षामध्यें कामेच्छा आहे, व ज्यांचा संबंध घडल्यानें शृंखलेप्रमाणें बंधास कारण, अशी पुत्रपौत्रादि संतति प्राप्त होते, त्या स्त्रियांचा, त्यांच्या बरोबर क्रीडा करण्याकरिता ठेवलेला जणूं वानरच, असा कोणताहि विषयलंपट पुरुष ज्याअर्थी कोणत्याहि ठिकाणीं व कोणत्याहि काळीं आपली स्वतः ची सुटका करुन घेण्यास समर्थ होत नाहीं, त्याअर्थी तुम्ही विषयाच्याच ठिकाणीं आसक्त असणार्‍या दैत्यांचा संग सोडून द्या व आदिदेव जो नारायण त्याला सत्त्वर शरण जा. कारण, सर्वसंगपरित्याग केलेले विवेकी पुरुष मोक्ष म्हणून त्याचाच स्वीकार करितात ॥१७॥॥१८॥
 
हे दैत्यपुत्रहो, भगवान् अच्युत हा भूतमात्रांचा आत्मा असून सर्व ब्रह्मांड व्यापून असल्यामुळे त्याला प्रसन्न करुन घेण्यास पुरुषाला फारसा प्रयास पडत नाही ॥१९॥
 
वृक्षपाषाणादिकांपासून तो ब्रह्मदेवापर्यंत लहानथोर जीवमात्रांमध्यें, पंचमहा भूतांपासून झालेल्या अचेतन अशा घटपटादि पदार्थांमध्ये, आकाशादि पंचमहाभूतांपासून झालेल्या अचेतन अशा घटपटादि पदार्थांमध्यें, आकाशादि पंचहाभूतांमध्ये व सत्त्वादिगुणांमध्ये, मायेमध्यें व गुणांचे विकार अशा महतत्त्वादिकांमध्येंहि ब्रह्मस्वरुप, सर्वांतर्यामी, अर्चित्य, ऐश्वर्यांनी युक्त व अपक्षयादि विकारानें रहित, असा एकच ईश्वर भासत आहे ॥२०॥२१॥
 
हे मित्रहो, केवळ अनुभवात्मक आनंदस्वरुपी असा तो ईश्वर, स्वतः भेदरहित व निर्देश करण्यास अशक्य असूनहि, अन्तर्यामीं द्रष्ट्याच्या स्वरुपानें व्यापक व भोग्य अशा देहादि स्वरुपानें व्याप्य म्हणून जाणिला जातो. तथापि त्यानें गुणमय सृष्टि उत्पन्न करणार्‍या मायेच्या योगानें आपले ऐश्वर्य आच्छादित करुन टाकिलें आहे; म्हणून तो सर्वत्र असतांहि त्याचे सर्वज्ञत्वादि गुण सर्व ठिकाणी उपलब्ध होत नाहींत ॥२२॥२३॥
 
यास्तव तुम्ही असुरस्वभावाचा त्याग करुन सर्व भूतांविषयी दया आणि मैत्री धारण करा. कारण तिच्या योगानें अधोक्षज भगवान् संतुष्ट होतो ॥२४॥
 
तो आदिपुरुष अनंत भगवान् संतुष्ट झाला असतां काय बरें दुर्लभ आहे ? आणि मग गुणांचा परिणाम करणारें जें दैव, ज्याच्या योगें ह्या लोकी आपोआप सिद्ध होणारे जे धर्मादि पुरुषार्थ, ते आचरण करुन तरी वास्तविक काय लाभ ? तसेंच भगवच्चरणाच्या सान्निध्यांत राहून त्याच्या माहात्म्याचें गायन करुन त्यांतील सार सेवन करणार्‍या आम्हांला मोक्षाची इच्छा करुन तरी काय करावयाचें आहे ? ॥२५॥
 
हे असुरहो, धर्म, अर्थ व काम, म्हणून जो तीन प्रकारचा पुरुषार्थ सांगितला आहे, व ज्याकरितां आत्मविद्या, कर्मविद्या, दंडनीति, तर्कशास्त्र इत्यादि नानाप्रकारचीं जीं उपजीविकासाधनें दाखविली आहेत, तीं सर्व वेदामध्यें सांगितली आहेत; परंतु अंतर्यामी परमपुरुष भगवंतास स्वात्मनिवेदन करणें, हेंच एक सत्य असें मी मानितों ॥२६॥
 
हे दैत्यपुत्रहो, निर्मल व दुर्लभ असें हें ज्ञान ऋषीचा नरसखा जो नारायण, त्यानें नारदाला सांगितलें होते. ज्यांनी सर्वसंगपरित्याग केला आहे, ज्यांस भगवद्भक्तीच्या चरणकमलांच्या रजः कर्णाचे स्त्रान घडलें आहे, अशा एकनिष्ठ भक्तांनाच तें ज्ञान अवश्य प्राप्त होते. उत्तम पुरुषांनाच होते असे नाहीं ॥२७॥
 
मी हें सानुभव ज्ञान व शुद्ध असा भागवतधर्म, अशीं दोन्हीं भगवंताचें नित्य दर्शन घेणार्‍या नारदापासून श्रवण केलीं आहेत ॥२८॥
 
दैत्यपुत्र म्हणाले, - हे प्रल्हादा, ह्या गुरुपुत्रांवांचून तुला व आम्हांला दुसरा गुरु मुळींच माहीत नाही. आपण अगदी लहान होतों तेव्हांपासून हेच आपले गुरु आहेत ॥२९॥
 
अंतः पुरामध्यें असलेल्या बालकाला तर नार, दासारख्या महात्म्याची भेट होणें दुर्घट आहे. यास्तव हे प्रियमित्रा प्रल्हादा, याविषयीं तुझ्या वचनावर आमचा विश्वास बसण्यासारखी जर कांही गोष्ट असेल तर ती सांगून तूं आमचा संशय दूर कर ॥३०॥
 
सहावा अध्याय समाप्त ॥६॥

नृसिंहाख्यान अध्याय ७ वा
नारद म्हणाला, - हे धर्मराजा, ह्याप्रमाणें महाभगवद्भक्त प्रल्हादाला दैत्यपुत्रांनी प्रश्न केला असतां, तो काय सांगतो याविषयी जिज्ञासा उत्पन्न झालेल्या दैत्यपुत्रांना माझ्या उपदेशाचें स्मरण करीत तो प्रल्हाद उत्तर देऊं लागला ॥१॥
 
प्रल्हाद म्हणाला, - हे दैत्यपुत्रहो आमचा पिता हिरण्यकशिपु तप करण्याकरितां मंदरपर्वतावर गेला असतां जशा मुंग्यांनी सर्पाचा देह भक्षण करावा त्याप्रमाणें त्याचाहि देह भक्षण केला. तेव्हां लोकांना अतिशय ताप देणार्‍या ह्या प्राण्याला त्याच्या पापानेंच भक्षण केलें हें फार चांगलें झालें, असें हर्षपूर्वक बोलून इंद्रादि देवांनी दानवांबरोबर युद्ध करण्याकरितां मोठा उद्योग आरंभिला ॥२॥॥३॥
 
तो त्यांचा अतिपराक्रमाचा उद्योग पाहून असुरांचे सर्व सेनापति भयभीत झाले आणि देव त्यांचा वध करुं लागले असतां, आपल्या स्त्रिया, पुत्र, मित्र, आप्त, गृहें, पशु आणि भोगसाधनभूत पदार्थ ह्यांच्याकडे लक्ष न देतां त्यांचा त्याग करुन, ते आपल्या प्राणांचे रक्षण करण्याकरितां दशदिशांकडे पळून गेले ॥४॥॥५॥
 
त्या वेळी विजयेच्छु देवांनी राजवाडा लुटून त्यांतींल सर्व द्रव्यांचा अपहार केला. इंद्र तर राजाची पट्टराणी व माझी माता जी कयाधू, तिला पकडून घेऊन चालला ॥६॥
 
तेव्हां ती मार्गामध्यें टिटवी पक्षिणीप्रमाणें भयानें उद्विग्न होऊन रोदन करुं लागली. तेव्हां अकस्मात् तेथें आलेल्या नारदानें तिला पाहून इंद्राला सांगितलें की, ‘ हे देवेन्द्रा, ह्या निरपराधि स्त्रीला घेऊन जाणें हें तुला योग्य नाही. हे भाग्यवंता, तूं हिला सोडून दे. कारण, ही परस्त्री असून पतिव्रता आहे ॥७॥॥८॥
 
 
इंद्र म्हणाला, - हे देवर्षे, हिच्या गर्भामध्यें देवद्वेषी हिरण्यकशिपूचें, सहन करण्यास दुर्धर असें वीर्य गर्भरुपानें वाढत आहे, ह्यास्तव ही प्रसूत होईपर्यंत हिला येथें असूं दे. नंतर तिला होणार्‍या पुत्राचा वध करुन माझे कार्य झाल्यावर मी हिला सोडून देईन ॥९॥
 
नारद म्हणाला, - हे इंद्रा, हा हिचा गर्भ, साक्षात् भगवान् अनंताचा सेवक, बलाढय, निर्दोष, केवळ आपल्या गुणांनींच मोठा झालेला आणि महाभगवद्भक्त असल्यामुळें तुझ्या हातून मरण पावणार नाहीं ॥१०॥
 
इंद्राने नारदाच्या त्या वचनाला मान देऊन तिला सोडून दिलें आणि तिच्या पोटी असणारा भगवद्भक्त जो मी त्या माझ्याविषयींच्या भक्तीमुळें तिला प्रदक्षिणा करुन तो स्वर्गी गेला ॥११॥
 
नंतर तो देवर्षि माझ्या मातेला आश्रमास घेऊन गेला आणि तिला आश्वासन देऊन, ‘ मुली, तुझा भर्ता तपश्चर्या करुन माघारा येईपर्यंत तूं ह्या आश्रमामध्यें खुशाल रहा ’ असें तिला म्हणाला ॥१२॥
 
तेव्हां तिनेंहि ‘ ठिक आहे ’ असें म्हटले व दैत्याधिपति हिरण्यकशिपु आपलें घोर तप संपवून परत येईपर्यंत ती नारदाच्या आश्रमांत निर्भयपणें राहिली ॥१३॥
 
मग त्या गर्भिणी पतिव्रतेनें आपली प्रसूति इच्छित वेळीं व्हावी व तोंपर्यंत आपल्या गर्भाचें संरक्षण व्हावें, यासाठी मोठया भक्तीनें त्या आश्रमामध्यें नारदऋषीची सेवा केली ॥१४॥
 
 
तेव्हां त्या दयाळू समर्थ ऋषीनें तिच्या शोकाची निवृत्ति व्हावी आणि मलाहि समजावें अशा उद्देशानें धर्माचें भक्तिरुप तत्त्व व आत्मानात्मविवेकरुप निर्मळ ज्ञान ह्या दोहोंचा तिला उपदेश केला ॥१५॥
 
परंतु पुष्काळ काळ लोटल्यामुळें व जात्या स्त्री असल्यामुळें, माझी माता तें ज्ञान विसरुन गेली. परंतु मजवर ऋषीचा अनुग्रह असल्यामुळें, अद्यापिसुद्धां मला त्याची विस्मृति पडत नाहीं ॥१६॥
 
आतां तुम्ही जर माझ्या भाषणावर विश्वास ठेवाल, तर तुम्हांलासुद्धां ती दोन्हीं प्राप्त होतील. कारण, श्रद्धेमुळें जशी मला अहंकाराचा नाश करणारी निपुण बुद्धि प्राप्त झाली, तशीच स्त्रिया व मुलें ह्यांनांहि ती प्राप्त होते ॥१७॥
 
हे मित्रहो, नानाप्रकारें विकार उत्पन्न करण्यास समर्थ अशा कालाच्या योगानें वृक्षाच्या फळांत जसें, उत्पन्न होणें, असणें, वाढणें, परिणाम पावणें, संकोचित होणें व नाश पावणें, हे सहा विकार घडून येतात; पण ते त्या वृक्षाला घडत नाहींत ॥१८॥
 
त्याप्रमाणें हे दैत्यपुत्रहो, आत्मा तर नित्य, अक्षय, शून्य, शुद्ध, अद्वितीय, शरीरादिकांचा ज्ञाता, सर्वांना आश्रयभूत, क्रियाशून्य, स्वयंप्रकाश, सर्वांचा उत्पादक, सर्वव्याधक, अलिप्त व आवरणरहित असा आहे ॥१९॥
 
ह्यास्तव आत्मानात्मविवेक उत्पन्न करण्यास समर्थ अशा ह्या आत्म्याच्या बारा लक्षणांनीं, तो देहातून भिन्न आहे असें जाणणार्‍या पुरुषानें, देहादिकांविषयी ‘ मी व माझे ’ अश्याप्रकारच्या असलेल्या मोहजन्य मिथ्याबुद्धीचा त्याग करावा ॥२०॥
 
हे असुरबालकहो, सुवर्णाच्या खाणीमध्यें चकचकणार्‍या सुवर्णांनी युक्त असलेल्या पाषाणांतून सुवर्ण काढण्याचे उपाय जाणणारा सोनार, भट्टी लावून जसें सुवर्ण काढून घेतो, त्याप्रमाणें देहरुप क्षेत्रांतून अध्यात्मज्ञानी पुरुष आत्मप्राप्तीच्या उपायांनी ब्रह्मत्व प्राप्त करुन घेतो ॥२१॥
 
मूलप्रकृति महतत्व, अहंकार, शब्द, स्पर्श, रुप, र्स आणि गंध ह्या आठ प्रकृति आहेत. सत्त्व, रज आणि तम हे तीन प्रकृतीचे गुण आहेत. श्रोत, त्वचा, नेत्र, जिव्हा, नासिका, वायु, उपस्थ, हस्त, पाद, वाणी आणि मन ही अकरा इंद्रिये व पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश हीं पंचमहाभूतें मिळून सोळा विकार आहेत. ह्या सर्वाच्या ठिकाणी साक्षिरुपानें व्यापून असणारा एक आत्मा आहे, असें कपिलप्रभृति आचार्यांनी सांगितलें आहे ॥२२॥
 
देह, प्रकृत्यादि सर्व समुदायात्मक असून स्थावर आणि जंगम असा दोन प्रकारचा आहे. ह्या देहामध्येंच अमुक द्रव्य आत्मा नव्हे, अशी परीक्षा करीत आत्मव्यतिरिक्त जें असेल त्याचा निरास करुन, त्यांहून निराळा असा जो अन्तर्यामी आत्मा, त्याचें शोधन करुन घ्यावें ॥२३॥
 
असा दोन प्रकारचा आहे. ह्या देहामध्येंच अमुक द्रव्य आत्मा नव्हे, अशी परीक्षा करीत आत्मव्यतिरिक्त जें असेल त्याचा निरास करुन, त्यांहून निराळा असा जो अन्तर्यामी आत्मा, त्याचें शोधन करुन घ्यावें ॥२३॥
 
जसें मण्यांच्या माळेमध्यें सूत्र, सर्व मण्यांना व्यापून असतें, तसा आत्माहि सर्व व्यापून आहे. आणि तें एकच सूत्र जसें प्रत्येक मण्याहून निराळें असतें तसा आत्माहि सर्व वस्तूंत असून निराळा आहे; असा हा अन्वयव्यतिरेक लक्षांत घेऊन सुद्ध झालेल्या मनाच्या योगानें जगाच्या उत्पत्तिस्थितिसंहारांच्या अनुसंघानानें एकाग्रपणें विचार करणार्‍या पुरुषांनीं, त्या परमात्म्याचा शोध केला असतां त्यांना त्याचें ज्ञान होतें ॥२४॥
 
 
आतां, हे दैत्यपुत्रहो, जागरण, स्वप्न आणि सुषुप्ति, अशा बुद्धीच्या तीन वृत्ति आहेत, त्यांचा अनुभव ज्याच्या योगानें येतो, तो अवस्थात्रयाचा साक्षी परमपुरुष होय ॥२५॥
 
ह्यास्तव, पुष्पधर्मरुप सुगंधाच्या योगानें, त्याला आश्रयभूत असलेला वायु जसा जाणतां येतो, त्याप्रमाणें आत्म्याचे धर्म नव्हत म्हणून त्याग केलेले, कर्मापासून उत्पन्न झालेले व त्रिगुणात्मक असे जे हे जाप्रदादिक बुद्धीचे परिणामरुप भेद, यांच्या योगानें आत्म्याचें स्वरुप जाणावें. म्हणजे आत्मा वस्तुतः बुद्धीच्या जाप्रदादिक अवस्थांहून निराळा असून त्यांना व्यापून असल्यामुळें त्या अवस्थांनी युक्त असल्यासारखा भासतो असें समजावें ॥२६॥
 
हे दैत्यपुत्रहो, संसार हा बुद्धीच्या गुणांनीं व कर्मानी बद्ध असल्यामुळें तो बुद्धीच्या द्वारानेंच पुरुषाला प्राप्त होतो; स्वतः प्राप्त होत नाही. तो अज्ञानमूलक असल्यामुळें तो असत्य असून स्वप्नाप्रमाणें मानिला आहे. ॥२७॥
 
यास्तव त्रिगुणात्मक कर्माच्या अंज्ञानरुप बीजाला जाळून टाकणारा, व बुद्धीच्या जाग्रदादि अवस्थारुप प्रवाहाचा नाश करणारा, असा भक्तियोगच तुम्हीं करा ॥२८॥
 
हे मित्रहो, देहादिकांच्या ठिकाणी आत्म्याचा होणारा अभास निवृत्त करण्याचे जे हजारों उपाय आहेत, त्यांमध्यें जेणेंकरुन व ज्या साधनांनी भगवान् ईश्वराच्या ठिकाणी सत्वर प्रीति उत्पन्न होईल अशीं साधनें नारदानें सांगितलीं आहेत ॥२९॥
 
तीं साधने म्हणजे गुरुची शुश्रुषा करणें, प्राप्त झालेल्या सर्व वस्तु भगवंताला किंवा भगवद्भक्तांना समर्पण करणें, निष्कपट भक्तांचा सहवास, ईश्वराराधन, भगवत्कथेच्या ठिकाणी श्रद्धा, भगवंताच्या गुणकर्मांचें कीर्तन, त्याच्या चरणकमलांचे ध्यान, त्याच्या मूर्तीचे दर्शन व पूजन, आणि सर्व भूतांच्या ठिकाणीं दुःखहर्ता भगवान् ईश्वर वास करीत आहे असें मनामध्यें आणून त्याला मान देणें, हीं होत ॥३०॥॥३१॥॥३२॥
 
ज्यांनी कामक्रोधादि षड्रिपु जिंकिले आहेत, ते लोक ईश्वराची अशी भक्ति करितात व तिच्यायोगानें भगवान् वासुदेवाच्या ठिकाणी पुरुषाला प्रीति उत्पन्न होत्ये ॥३३॥
 
हे दैत्यपुत्रहो, इतरांच्या ठिकाणी नसणारे असे श्रीभगवंताचे भक्तवात्सल्यादिक गुण, तशींच त्याने स्वेच्छेनें धारण केलेल्या रामकृष्णादिक रुपानें केलेली लौकिकदृष्टया चेष्टारुप कर्मे व रावणवधादिक पराक्रम, यांचें श्रवण करीत असतां अति हर्षानें शरीरावर रोमांच उठून, ज्याच्या नेत्रामध्यें आनंदाश्रु येतात व रामस्वरुपी तन्मय होऊन जो उच्चस्वरानें गायन करितो, रोदन करितो, नृत्य करितो, अथवा पिशाचानें झपाटल्यासारखा बेफाम होऊन कधीं हंसतो तर कधी विलाप करितो, केव्हां भगवंताचें ध्यान करितो र केव्हां लोकांना वंदन करितो आणि केव्हां भगवंताच्या ठिकानी बुद्धि लीन झाल्यामुळें निर्लज्ज होऊन वारंवार श्वास टाकीत, हे हरे, हे जगत्पते, हे नारायणा, अशा हाका मारितो ॥३४॥॥३५॥
 
तेव्हां अतिवेगवान् अशा त्या उत्कृष्ट भक्तीच्या योगानें त्या पुरुषाचें ठायी संसारास बीजभूत असलेलें असें अज्ञान आणि वासना, हीं जळून जातात. त्याचें मन व शरीर हीं भगवंताच्या लीलारुप चिंतनानें तन्मय होऊन जातात, व त्याची पुण्यपापादि सर्व बंधनें तुटून जाऊन तो भगवत्स्वरुपाला पावतो ॥३६॥
 
खर्‍या अंतः करणानें केलेला भगवंताचा स्पर्श तोच इहलोकीं अशुद्ध अंतः करणानें युक्त असलेल्या पुरुषाच्या संसार चक्राचा नाश करणारा होय, व तेंच ब्रह्माच्या ठिकाणीं मोक्षरुप सुख होय, असें ज्ञानी पुरुष म्हणतात. म्हणून तुम्ही आपल्या हदयांत असलेल्या अंतर्यामीं ईश्वराचें भजन करा ॥३७॥
 
हे असुरपुत्र हो, आपल्या स्वतः चा सखा व आकाशाप्रमाणें आपल्या हदयामध्यें वास करणारा असा जो श्रीहरि, त्याची उपासना करण्यांत कोणता मोठा आयास आहे ? असें असतां विषयसुख संपादन करुन काय मिळायाचे आहे ? कारण, सर्वच प्राणी विषयोत्सुक असल्यामुळे आपणहि जर विषयसुखाविषयी तत्पर झालों, तर त्यांच्या सारखेच आपण नव्हे काय ? ॥३८॥
 
द्रव्य, कलत्र, पशु, व पुत्रादिसंबंधि जन, गृहें, भूमि, गजशाळा, भोगसाधनभूत पदार्थांच्या समृद्धि आणि सर्व प्रकारचे अर्थ व काम हे नश्वर असल्यामुळें, ज्याचें आयुष्यच क्षणभङ्मुर आहे अशा मर्त्य पुरुषांचें ते कितीसें प्रिय करणार आहेत ? ॥३९॥
 
ह्याच प्रमाणें यज्ञयागादिकांनीं प्राप्त झालेले जे हे स्वर्गादि लोक, तेहि विनाशी व पुण्यादि तारतम्यानें श्रेष्ठ व कनिष्ठ असून सर्वथा निर्मळ नाहींत, म्हणून सर्वोत्कृष्त अशा ईश्वराचेंच तुम्ही आत्मप्राप्तीकरितां एकनिष्ठ भक्तीनें सेवन करा अशा ईश्वराचेंच तुम्ही आत्मप्राप्तीकरितां एकनिष्ठ भक्तीनें सेवन करा कारण तो सर्वथैव निर्दोष आहे. त्याच्यांत कोणीहि दोष पाहिलेला अथवा ऐकिलेला मुळींच नाहीं. ॥४०॥
 
आपणासच विद्वान् असें मानणारा पुरुष, जी वस्तु प्राप्त होण्याचा संकल्प करुन ह्या लोकीं कर्मे करितो, त्याला त्या संकल्पित कर्माचें फळ विपरीत असेंच बहुधा प्राप्त होतें ॥४१॥
 
संसारांत सुखाची प्राप्ति आणि दुःखाची निवृत्ति व्हावी यासाठीं कर्मे करण्याचा पुरुषाचा संकल्प असतो. परंतु, जो पूर्वी निरिच्छ असल्यामुळें सुखानें युक्त असतो, तोच इच्छा करुं लागला म्हणजे तिच्या योगानें सर्वदा दुःख पावतो ॥४२॥
 
या लोकीं काम्यकर्माच्या योगानें ज्याच्याकरितां म्हणून पुरुष भोगांची इच्छा करितो, तो देह पाहूं गेलें असतां, श्वानसूकरादिव नाशहि पावतो ॥४३॥
 
यास्तव ज्याअर्धी देहाचीच अशी स्थिति आहे, याअर्धी देहाहून निराळे असे माझे म्हणविले जाणारे जे पुत्र, कलत्र, गृह, द्रव्यादिक, राज्य, खजिना, हत्ती, अमात्य, भृत्य, आणि आप्त, हे सर्व नश्वर आहेत हें काय सांगावयास पाहिजे ? ॥४४॥
 
म्हणून नित्यानंदाचा केवळ समुद्रच अशा आत्म्याला, वस्तुतः अनर्थकारक असून बाह्यतः मात्र पुरुषार्थाप्रमाणें भासणार्‍या व देहासहित नाश पावणार्‍या अतितुच्छ अशा ह्या पुत्रादिकांनी काय साधणार आहे ? ॥४५॥
 
हे असुरहो, प्राण्याला या लोकीं कितीसा स्वार्थ साधतो तो सांगा बरें ! ॥४६॥
 
देहधारी प्राणी आत्म्याला अनुसरणार्‍या देहाच्या योगानें कर्मे करितो व कर्माच्या योगानें देह धारण करितो; पण त्या दोन्ही गोष्टी तो अज्ञानानेंच करितो ॥४७॥
 
म्हणून धर्म, अर्थ व काम, हे ज्याच्या स्वाधीन आहेत, त्या निरपेक्ष, सर्वसमर्थ व दुःखहर्त्या परमात्म्याचें तुम्ही निष्कामबुद्धीनें सेवन करा ॥४८॥
 
कारण, तो श्रीहरिच स्वतः निर्माण केलेल्या पंचमहाभूतांपासून उत्पन्न केलेल्या सर्व प्राण्यांचा आत्मा, प्रिय, नियंता आनि अन्तर्यामी आहे ॥४९॥
 
दैत्यपुत्रहो, जसे आम्हीं भगवंताचें भजन करुन सुखी झालों, तसा कोणीहि होईल; मग तो देव, असुर, मनुष्य, यक्ष अथवा गंधर्व कोणीहि असो ॥५०॥
 
हे असुरपुत्रहो, मुकुंदाला संतुष्ट करण्याकरितां द्विजपणा, देवपणा, ऋषिपणा सद्वर्तन, बहुश्रुतपणा, दान, तप, याग, शुद्ध आचरण आणि व्रतें, ही पुरी होत नसून तो श्रीहरि केवळ निष्काम भक्तीच्याच योगानें संतुष्ट होतो. भक्तीवांचून इतर सर्व साधनें केवळ सोंगे होत ॥५१॥॥५२॥
 
यास्तव हे दानवहो, आपल्याप्रमाणेंच सर्वांना सुख व दुःख होतें अशी बुद्धि धारण करुन सर्व भूतांचा आत्मा आणि ईश्वर असा जो भगवान् श्रीहरि त्याच्या ठिकाणीं भक्ति करा ॥५३॥
 
कारण, दैत्य, यक्ष, राक्षण, स्त्रिया, शुद्र गोकुळवासी लोक, पक्षी, मृग आणि इतरहि पातकी जीव, अच्युताच्या भक्तीनें खरोखर मोक्ष पावले आहेत ॥५४॥
 
असो. गोविंदाच्या ठिकाणीं एकनिष्ठ भक्ति आनि स्थावरजंगमात्मक सर्व भूतांच्या ठिकाणीं भगवान् आहे असें पहाणें, हाच काय तो या लोकीं पुरुषाला उत्कृष्ट स्वार्थ सांगितलेला आहे ॥५५॥
 
सातवा अध्याय समाप्त ॥७॥

नृसिंहाख्यान अध्याय ८ वा
नारद म्हणाला, - हे धर्मराजा, याप्रमाणें प्रल्हादाचें भाषण श्रवण केल्यावर तें निर्दोष आहे असें जाणून, गुरुच्या शिकवणीचा त्याग करुन, सर्व दैत्यपुत्रांनी त्याचा स्वीकार केला ॥१॥
 
तेव्हां त्यांची बुद्धि अंतर्निष्ठ झाली असें पाहून शंडामर्काना भय वाटलें, आणि त्यानें तें सर्व वृत्त राजाला सत्वर जाऊन निवेदन केलें ॥२॥
 
दुःसह आणि अप्रिय असें पुत्राचें दुवर्तन श्रवण करुन, हिरण्यकशिपूचें शरीर कोपाच्या आवेशानें कापूं लागलें, आणि पुत्राचा वध करावा असें त्यानें मनांत ठरविले ॥३॥
 
मग विनयामुळें नम्र झालेला व इंद्रियाचें दमन केलेला असा तो प्रल्हाद, हात जोडून आपल्या अग्रभागीं उभा आहे असें पाहून, जो तिरस्कार करण्यासहि अयोग्य, अशा त्या पुत्राची कठोर शब्दांनी निंदा करुन, स्वभावतःच क्रूर असा तो हिरण्यकशिपू, पायानें ताडण केलेल्या सर्पाप्रमाणे फूत्कार टाकींत, सक्रोध व वक्र हे दृष्टीनें त्याच्याकडे पाहात प्रल्हादाला म्हणाला ॥४॥॥५॥
 
‘ हे उद्धटा ’ हे मंदबुद्धे, हे कुलांत दुही उत्पन्न करणार्‍या अधमा, अरे माझ्या आज्ञेंचें उल्लंघन करणार्‍या उद्धट अशा तुला मी आज यमसदनास पोंचवितो ॥६॥
 
हे मूर्खां, जो क्रुद्ध झाला असता लोकपालांसह तिन्ही लोक कंपित होतात, त्या माझ्या आज्ञेचें तूं निर्भय पुरुषाप्रमाणें कोणाच्या बळाचा आश्रय करुन उल्लंघन करीत आहेस ? ॥७॥
 
 
प्रल्हाद म्हणाला, - हे राजा, ब्रह्मदेवप्रभृति लहानथोर असे जे स्थावरजंगमात्मक सर्व प्राणी, ज्यानें आपल्या स्वाधीन करुन ठेविले आहत, तो भगवान् केवळ माझेंच बळ आहे असें नाही. तर तुझें व इतरहि सर्व बलिष्ठ लोकांचे तोच बळ आहे ॥८॥
 
हे राजा, तो परमेश्वर भगवान् विष्णुच कालरुपी आहे. तोच इंद्रियशक्ति, मनः शक्ति, धैर्य, शरीरशक्ति आणि इंद्रियें ह्यांचा आधार आहे. तोच हा गुणत्रयाचा नियंता परमेश्वर आपल्या शक्तींना योगानें ह्या जगाची उत्पत्ति, स्थिति व संहार करितो ॥९॥
 
तूं आपल्या ह्या शत्रुमित्रादि कल्पनारुप आसुरी स्वभावाचा त्याग करुन मनाची वृत्ति सर्वत्र सारखी ठेव. कारण, न जिंकलेल्या व कुमार्गांमध्यें प्रवृत्त होणार्‍या मनावांचून, शत्रु असे दुसरे कोणीच नाहींत. मनाची वृत्ति सारखी राखणें हेंच भगवान् अनंताचे उत्कृष्ट पूजन आहे ॥१०॥
 
हे दैत्याधिपते, तुझ्यासारखे किती तरी मंदबुद्धि पुरुष, प्रथम सर्वस्व हरण करणार्‍या इंद्रियरुप षड्रिपूंना न जिंकिंता, आपण दशदिशा जिंकिल्या आहेत असें मानितात; परंतु वास्तविक पाहूं गेलें असतं जो मनोनिग्रह करुन ज्ञानी झाला आहे, आणि ज्याची सर्व प्राण्यांविषयीं समदृष्टि आहे, त्या साधूंना मात्र देहाभिमानानें कल्पिलेले कामादि मानसिक शत्रु नसतात. अर्थात् त्यांना बाहेरचे इतर शत्रु नसतात हें सांगावयास नकोच ॥११॥
 
हिरण्यकशिपु म्हणाला, - हे मंदबुद्धे, ज्याअर्थी तूं अतिशय बडबड करीत आहेस, त्याअर्थी खरोखर तुला मरणाचीच इच्छा झालेली दिसते; कारण, जे मरणोन्मुख झालेले असतात, तेच अशाप्रकारें अनन्वित बरळत असतात ॥१२॥
 
 
हे मंदभाग्या, माझ्याहून दुसरा असा तूं जगाचा नियंता म्हणून सांगितलास, तो कोठें आहे ? तो सर्वठिकाणीं जर आहे, तर मग ह्या खांबामध्यें कां दिसत नाही ? ॥१३॥
 
तेव्हां व्यर्थ बडबड करणारें तुझें शिर मी आता धडापासून वेगळें करितो. तो तुझा आवडता हरि, जर तुझें रक्षण करणारा आहे, तर त्यास आतां येऊंदे ॥१४॥
 
ह्याप्रमाणें रागाच्या आवेशांत कठोर शब्दांनी आपल्या महाभगवद्भक्त पुत्राला वारंवार पिडा देणारा तो अतिबलाढय महादैत्य, हातामध्यें खङ्ग घेऊन सिंहासनावरुन उडी टाकिता झाला, व आपल्या मुष्टीनें त्यानें स्तंभावर ताडण केलें ॥१५॥
 
हे राजा, तोंच त्या खांबामध्ये अतिभयंकर असा ध्वनि उत्पन्न झाला, व त्याच्यायोगानें ब्रह्मांडकटाह फुटलाच की काय, असें सर्वांस भासले. तो ध्वनि, देव आपल्या स्थानी बसले होते तेथेंहि जाऊन पोंचला. तो ध्वनी ऐकून आपल्या स्थानांचा नाश होतो कीं काय, असें ब्रह्मादिक देवांनाहि भय वाटलें ॥१६॥
 
पुत्रवधाची इच्छा धरुन, त्यासाठी आपल्या बलानें प्रयत्न करणारा तो हिरण्यकशिपु, ज्याच्या योगानें दैत्यसेनाधिपति अत्यंत भयभीत झाले होते असा तो अपूर्व व अद्भुत नाद ऐकून, तो कशापासून निघाला तें जाणण्यासाठी तो इकडेतिकडे पाहूं लागला; पण तो नाद कोठून निघाला, हें त्याच्या दृष्टीस पडलें नाही ॥१७॥
 
इतक्यामध्यें सर्व भूतमात्रामध्यें असलेली आपली व्याप्ति खरी करण्याकरितां व आपल्या भक्तांनी केलेलें भाषण सव्य करण्याकरितां, मनुष्याकार नव्हे व मृगाकारहि नव्हे, असें अत्यंत अदभुत रुप धारण करणारा भगवान् श्रीहरि सभेमधील त्या स्तंभांत प्रगट झाला ॥१८॥
 
ह्याप्रमाणें अदभुत नाद करणार्‍या प्राण्याचा, तो दैत्य चोहोंकडे दृष्टी फिरवून जों शोध करीत आहे, तोंच स्तंभांतून बाहेर निघणारे तें मनुष्याचें व सिंहाचें मिश्ररुप त्याच्या दृष्टीस पडलें. तें पाहून ‘ हा मृगहि नव्हे व नरहि नव्हे, तर हा कोण विचित्र प्राणी आहे ? ’ असा तो विचार करुं लागला ॥१९॥
 
तो मनाशीं विचार करीत आहे, इतक्यांत त्याच्यापुढें नृसिंहरुपी भगवान् दत्त म्हणून उभा राहिला. त्याचें रुप फारच भयानक होतें. त्याचे डोळे तापलेल्या सोन्याप्रमाणें लाल असून त्याच्या मानेवरील आयाळाचे केंस विजेप्रमाणें तळपत होते; व त्यामुळे त्यांचें मुख फारच विक्राळ व विशाल दिसत होतें ॥२०॥
 
त्याच्या दाढा भयंकर होत्या. जिव्हा तरवारीसारखी चंचल व वस्तर्‍याच्या धारे प्रमाणे तीक्ष्ण होती. चढविलेल्या भुंवयांमुळें त्याचे मुख उग्र दिसत होतें व कान शंकूप्रमाणें ताठ उभारलेले होते. त्याचें तोंड व नाकपुडया हीं पर्वताच्या गुहेप्रमाणें विस्तृत असून जबडा पसरल्यामुळें तीं भयंकर दिसत होती. त्याचे मस्तक स्वर्गाला स्पर्श करीत होतें. त्याची मान आंखूड व स्थूळ होती. त्याचें वक्षः स्थळ विशाळ असून उदर कृश होतें. चंद्रकिरणाप्रमाणे गौरवर्ण असे केंस त्याच्या सर्व अंगावर विखुरले होते. त्याचीं नखें हींच जणूं काय त्याची आयुधें होती. त्याच्या जवळ जाणें तर अशक्यच होतें. स्वतः च्या चक्रादि व इतरांच्या वज्रादि आयुधांच्या योगानें ज्याने सर्व दैत्यदानवांना पळवून लाविलें होतें. अशा त्या स्वरुपाला पाहून हिरण्यकशिपु म्हणाला; मायावी श्रीहरीनें माझ्या मृत्यूच्या उपायार्थाच हें रुप घेतलेले दिसतें; पण असें हें रुप माझें काय करणार ? असें म्हणून, त्यानें हातामध्यें गदा घेतली, व गर्जना करीत तो दैत्यश्रेष्ठ नृसिंहाच्या सन्मुख वेगानें धांवला. परंतु अग्नीमध्ये पडलेल पतंग जसा दिसेनासा होतो, त्याप्रमाणें नृसिंहाच्या तेजापुढें तो दैत्य निस्तेज झाला ॥२१॥॥२२॥॥२३॥॥२४॥
 
अहो, ज्या हरीने सृष्टीच्या आरंभीं आपल्या तेजाच्या योगानें प्रलयकालाच्या अंधः काराचा सुद्धां नाश केला होता, त्या सत्त्वप्रकाशरुपी श्रीहरीच्या ठिकाणी त्या तमोगुणी असुराचें अदर्शन झालें हें कांही आश्चर्य नव्हे. त्या महादैत्यानें भगवंताच्या सन्मुख येऊन, क्रोधपूर्वक अतिवेगाने फिरविलेल्या आपल्या गदेनें नृसिंहाला प्रहार केला ॥२५॥
 
 
तेव्हां जसा गरुड मोठ्या सर्पाला पकडतो, त्याप्रमाणे आपल्यावर प्रहार करणार्‍या त्या हिरण्यकशिपूला नृसिंहानें त्यांच्या गदेसह हाती धरिलें, परंतु क्रीडा करणार्‍या गरुडाच्या हातून जसा सर्प गळून पडतो त्याप्रमाणे त्या नृसिंहाच्या हातांतून तो असुरहि सुटून गेला ॥२६॥
 
हे भरतकुलोत्पन्ना धर्मराजा, त्या हिरण्यकशिपूनें ज्यांची स्थानें हरण केल्यामुळें ज भीतीनें मेघांच्या आड दडून राहिले होते, अशा त्या सर्व लोकपालांना व देवांना, नृसिंहाच्या हातांतून दैत्य सुटला असें पाहतांच, अत्यंत वाईट वाटलें कारण, युद्धामध्यें नेहमी बेफिकीर असणारा तो महादैत्य नृसिंहाच्या हातांतून सुटल्याबरोबर, आपल्या बलानें नृसिंह भयभीत झाला आहे असें मानिता झाला, आणि हातांत ढाल व तलवार घेऊन मोठ्या वेगानें पुनरपि तो त्या नृसिंहावर चालून गेला ॥२७॥
 
हे राजा, पण शेवटीं, ससाण्याप्रमाणे ज्याचा वेग आहे व जो ढालतलवारीचे कुशलतेनें हात करीत असल्यामुळें ज्याच्यावर प्रहार करण्यास मुळी अवकाशच सांपडत नाही, अशा त्या हिरण्यकशिपूला, महावेगवान नृसिंहानें, तीव्र व भयंकर असें हास्य करुन, सर्प जसा उंदराला पकडतो, त्याप्रमाणें पकडिलें. त्या वेळी श्रीहरिच्या हास्यध्वनीनें व तेजानें त्या हिरण्यकशिपूचें डोळे मिटूनच गेले ॥२८॥
 
ज्या हिरण्यकशिपूच्या त्वचेला पूर्वी इन्द्राचें वज्रहि दुखवूं शकलें नव्हतें, असा तो महादैत्य, भयभीत होऊन नरसिंहाच्या हातून सुटण्याची धडपड करुं लागला, पण गरुड जसा अतितीव्रविषधारी सर्पाचेंहि विदारण करितो, त्याप्रमाणे नृसिंहानें द्वारामध्येंच संध्याकाळचे समयीं त्या दैत्याला आपल्या मांडीवर उताणें पाडून नखांनीं त्याचें हदय विदारण केले ॥२९॥
 
नंतर ज्याचे नेत्र क्रोधाने लाल झाल्यामुळे ज्याकडे अवलोकन करणेंहि कठीण झाले आहे, जो आपल्या जिभेनें आपले विशाल ओंठ चाटीत आहे, ज्याच्या मानेवरील केंस व मुख ही रक्तबिंदूंनीं लिप्त झाल्यामुळें लाल झाली आहेत, ज्यानें त्या दैत्याच्या आंतडयाच्या माळा आपल्या कंठामध्यें धारण केल्या आहेत, जो हत्तीच्या वधानें शोभणार्‍या सिंहाप्रमाणें भासत आहे; आणि जो अनेक बाहूंनी युक्त आहे, अशा त्या नृसिंहरुपी श्रीहरीनें नखाप्रांनी त्या हिरण्यकशिपूचे हदयकमळ विदारण केल्यानंतर त्याला मांडीवरुन खाली टाकून दिलें. नंतर ज्यांनी आयुधें उचलली आहेत अशा त्याच्या सेवकांना व त्याच्या मागून येणार्‍या त्याच्या पक्षपाती हजारो दैत्यांना, नखरुप शस्त्रांनी व पायांच्या टांचांनींच मारुन टाकिलें ॥३०॥॥३१॥
 
हे राजा, त्या वेळीं त्या नृसिंहाच्या मानेवरील केसांमुळें कंपित झालेले मेघ विसरुन गेले; आदित्यादि ग्रह त्याच्या दृष्टीने निस्तेज झाले, त्याच्या श्वासानें ताडित झालेले सागर क्षोभ पावले, व त्याच्या गर्जनेनें भ्यालेले दिग्गज उच्चस्वरानें आक्रोश करुं लागले ॥३२॥
 
त्याच्या मानेवरील केसांच्या फटकार्‍यानें उडालेल्या विमानांतील देव स्थानभ्रष्ट झाले, त्याच्या पायांच्या भारानें पीडित झालेली पृथ्वी दबून गेली, त्याच्या वेगानें पर्वत ढासळून पडले आणि त्याच्या तेजानें आकाश व दिशा निस्तेज झाल्या ॥३३॥
 
नंतर ज्याचें उग्र तेज सर्वत्र फांकले आहे, ज्याला कोणीच प्रतिस्पर्धी उरला नाही, ज्याचें स्वरुप अतिभयंकर आहे, असा तो प्रभु नृसिंह, त्या सभेमध्यें राजसिंहासनावर बसला असतां, त्याचा स्तव करण्याकरितां त्याच्याजवळ जाण्याचें धैर्य कोणासही होईना ॥३४॥
 
असो. मस्तकांतील शूळव्यथेप्रमाणें त्रैलोक्यास दुःसह अशा त्या आदिदैत्य हिरण्यकशिपूचा युद्धामध्यें श्रीहरीनें वध केला असें पाहून, अतिहर्षामुळें ज्यांची मुखें विकसित झाली आहेत अशा देवांगना त्या नृसिंहावर पुष्पांचा वर्षाव करुं लागल्या ॥३५॥
 
 
त्या नृसिंहाला पहाण्याकरितां देवांच्या विमानांनी आकाशमंडळ भरुन गेलें, नगारे व नौबतीच्या ध्वनीनें दशदिशा दुमदुमुन गेल्या, अप्सरा नृत्य करुं लागल्या आणि गंवर्वश्रेष्ठ गाय करुं लागले ॥३६॥
 
हे धर्मराजा, नंतर ब्रह्मदेव, इंद्र, शिव इत्यादि देव, ऋषि, पितर, सिद्ध, विद्याधर, श्रेष्ठ नाग, मनु, प्रजापति, गंधर्व, अप्सरा, चारण, यक्ष, किंपुरुष, वेताळ, सिद्ध, किंनर आणि सुनंद व कुमद इत्यादि विष्णूचे सर्व पार्षद तेथें आले व नृसिंहाच्या संनिध हात जोडून उभे राहिले, आणि सिंहासनावर बसलेल्या त्या प्रखर तेजधारी नृसिंहाची विविधप्रकारानें स्तुति करुं लागले ॥३७॥॥३८॥॥३९॥
 
ब्रह्मदेव म्हणाला, - हे परमेश्वरा, ज्याच्या शक्ति अनंत आहेत, ज्याचें पराक्रम विचित्र आहेत, ज्याचीं कर्मे श्रवणमात्रेंकरुनच अंतः करणाला शुद्ध करणारीं आहेत, जो आपल्या सहज लीलेनें सत्त्वादिक गुणांच्या योगे जगाची उत्पत्ति, स्थिति व संहार करितो, असे असूनहि ज्याच्या स्वरुपाच्या कधीहिं नाश होत नाहीं, त्या अनंतस्वरुपी तुज भगवंताला प्रसन्न करुन घेण्याकरितां मी नम्र झालो आहे ॥४०॥
 
रुद्र म्हणाला, - हे भक्तवत्सला, सहस्त्र युगांचा अंत हाच तुझा वास्तविक कोपकाळ होय; पण आतां तर हा क्षुद्र असुर तूं मारिला आहेस, यास्तव विनाकारण क्रोध न धरितां, तुला शरण आलेला हा दैत्याचा पुत्र जो भंक्तं प्रल्हाद त्याचें तूं रक्षण कर ॥४१॥
 
इंद्र म्हणाला, - हे परमेश्वरा, यज्ञामध्यें अंतर्यामिरुपानें तूंच भोक्ता असल्यामुळें, दैत्यापासून आमचें रक्षण करुन हे प्रभो तूं स्वतः चे हविर्भाग परत घेतले आहेस. तुझें गृहरुप जें आमचें हदयकमळ तें ह्या दैत्याच्या भयानें व्यापून गेलें होतें; परंतु तें भय दूर करुन तूं तें विकसित केलें आहेस. हे स्वामिन् , तुझी शुश्रूषा करणार्‍या भक्तजनांना, काळानें गिळून टाकलेले असें हें त्रैलोक्याचें ऐश्वर्य काय करावयाचें आहे ? त्यांना मुक्तिसुद्धां जर महत्वाची वाटत नाही, तर स्वर्गादिक इतर ऐश्वर्याची काय किंमत ? ॥४२॥
 
ऋषि म्हणाले, - हे आदिपुरुषा, आपल्या स्वरुपांत पूर्वी लीन असलेलें हे विश्व, तूं ज्या तपाच्या योगानें उत्पन्न केलें आहेस, तें आपलें प्रभावरुन सर्वोत्कृष्ट तप, तूं आम्हां ऋषींना उपदेशिलें होतें. तें तप ह्या दैत्यानें लोपवून टाकिलें असतां, हे शरणागतपालका, भक्तांच्या रक्षणार्थ तूं हें नृसिंहस्वरुप धारण करुन, पुनरपि ‘ तप करा ’ अशी आम्हांस आज्ञा दिली आहेस; त्या तुज भगवंताला आमचा नमस्कार असो ॥४३॥
 
पितर म्हणाले, - हे देवा, आम्हांला पुत्रांनीं श्रद्धापूर्वक दिलेली पिंडदानें जो आपणच बलात्कारानें भक्षण करीत असे, आणि तीर्थस्नान करतेवेळीं दिलेलें तिलोदकहि जो पीत असे, त्या दैत्याच्या उदराची त्वचा तूं नखांनी विदारण करुन त्यांतून ते पिंडादिक बाहेर काढिले आहेस; त्या तुज सर्वधर्मरक्षक नृसिंहाला आमचा नमस्कार असो ॥४४॥
 
सिद्ध म्हणाले, - हे नृसिंहा, योग व तप यांच्या बलानें ज्या दुष्टानें आमची अप्रणिमादि सिद्धिरुप योगासिद्ध गति हरण केली होती, त्या अनेकप्रकारच्या दर्पानें युक्त असलेल्या दैत्याचें तूं आपल्या नखांनी विदारण करुन आमचे संकट दूर केलेंस, त्या तुला आम्ही नमस्कार करितों ॥४५॥
 
विद्याधर म्हणाले, - नानाप्रकारच्या धारणेनें प्राप्त झालेल्या आमच्या गुप्त होण्याच्या विद्येला, देहशक्ति व पराभवसामर्थ्य ह्यांच्या योगानें गर्विष्ठ झालेल्या ज्या मूर्खानें प्रतिबंध केला होता, त्या दैत्याचा ज्यानें युद्धामध्यें पशूप्रमाणें वध केला आहे, त्या हे नृसिंहरुपधारी प्रभो, तुला आम्ही नम्र आहों ॥४६॥
 
नाग म्हणाले, - हे परमेश्वरा, ज्या पाण्यानें आमच्या फणांतील रत्ने व आमच्या स्त्रिया हरण केल्या होत्या, त्याच्या वक्षः स्थलाचें विदारण करुन त्या स्त्रियांना तूं आनंद दिला आहेस अशा तुला नमस्कार असो ॥४७॥
 
मनु म्हणाले, - हे देवा, आम्ही तुझ्या आज्ञेप्रमाणें वागणारे मनु आहों. आजपर्यंत दैत्य हिरण्यकशिपूनें आमच्या वर्णाश्रमसंबंधीं सर्व धर्ममर्यांदा मोडून टाकिल्या होत्या. त्या दुष्टाचा तूं वध करुन आम्हांस संकटमुक्त केलेंस. यास्तव हे प्रभो, आतां तुझी कोणती सेवा करावी, त्याविषयीं आम्ही दासांना आज्ञा करा ॥४८॥
 
प्रजापति म्हणाले, हे परमेश्वरा, तूं उत्पन्न केलेले आम्हीं प्रजापति आहों. ज्या दैत्योंन प्रतिबंध केल्यामुळें प्रजा उत्पन्न करण्याचें आमएं कार्य बंद पाडलें होतें; त्याच्या वक्षः स्थळाचें तूं विदारण केल्यामुळें तो नष्ट झाला आहे; आतां आम्ही पुन्हा प्रजा उत्पन्न करुं शकूं हे सत्त्वमूर्ते, तुझा हा अवतार जगाचें कल्याण करणारा आहे ॥४९॥
 
गंधर्व म्हणाले, - हे प्रभो, तुझ्या अग्रभागीं नृत्य करणार्‍या व नृत्यामध्यें गायन करणार्‍या आम्हांला, शौर्य आणि शक्ति ह्यांच्या बलावर ज्या दैत्यानें आम्हांस आजपर्यंत आपल्या आधीन करुन ठेवलें होतें, तो हा दैत्य आज तुझ्या हातून मरण पावला आहे; कारण, कुमार्गानें प्रवृत्त झालेल्या पुरुषाचें कल्याण कधींहि होत नाहीं ॥५०॥
 
चारण म्हणाले, - हे हरे, साधूंच्या अंतः करणामध्यें भय उत्पन्न करीत असलेल्या ह्या असुराला तूं मारुन टाकिल्यामुळें, तुझ्या संसारनिवर्तक चरणकमळांचा आश्रय करुन राहिलेले आम्ही निर्भय झालों आहोंत ॥५१॥
 
यक्ष म्हणाले, - हे नरहरे, मनोहर कर्मांच्या योगानें तुझ्या सेवकांमध्यें श्रेष्ठ झालेले जे आम्हीं, त्या आम्हांला ह्या दितिपुत्र हिरण्यकशिपूनें पालखीला वाहरणारे भोई केलें होते; परंतु हे प्रभो, तूं लोकाचें दुःख जाणणारा आहेस. तूं हा अवतार घेऊन आज त्या दैत्यास पंचत्वास पोंचविलें आहेस ॥५२॥
 
किंपुरुष म्हणाले, - हे देवा, आम्हीं अतितुच्छ प्राणी आहों, व तूं तर अद्भुतप्रभाववान्, सर्वनियंता पुरुषोत्तम आहेस. जेव्हां भगवद्भक्तांनी ह्या दैत्याचा तिरस्कार केला, तेव्हांच वस्तुतः हा दुर्जन नष्ट झाला होता ॥५३॥
 
वैतलिक म्हणाले, - हे भगवन, सभा व यज्ञ ह्यांमध्ये तुझ्या निर्मळ यशांचे गायन करुन आम्ही पूर्वी मोठमोठे मान मिळविले; परंतु या वैर्‍यानें ते सर्व अगदी बंद करुन टाकिले होते. तेव्हां रोगासारखा असा हा घातकी दुर्जन दौत्य तूं मारुन टाकिलास ही फार चांगली गोष्ट झाली ॥५४॥
 
किंन्नर म्हणाले; - हे ईश्वरा, आम्ही किन्नरगण तुझे अनुयायी असून ह्या दितिपुत्र हिरण्यकशिपूनें आम्हांला वेठीला लाविलें होतें. हे हरे, तो पापी दैत्य तूं मारुन टाकिला आहेस. हे नाथा, हे नरसिंहा, तूं आम्हां सेवकांचा आतां उत्कर्ष कर ॥५५॥
 
विष्णुपार्षद म्हणाले, - आम्हां भक्तजनांना आश्रय देणार्‍या हे भगवंता, सर्व लोकांना मंगलकारक असें हे तुझे अद्भुत नृसिंहरुप आम्ही आज पाहिलें. हे ईश्वरा, हा हिरण्यकशिपु मूळचा तुझा दासच असून ब्राह्मणांचा शाप झाल्यामुळें दैत्य झाला होता; तेव्हां त्याचा वध त्याच्या अनुग्रहासाठींच तुझ्याकडून झाला आहे असें आम्ही समजतों ॥५६॥
 
आठवा अध्याय समाप्त ॥८॥

नृसिंहाख्यान अध्याय ९ वा
नारद म्हणाला, - हे धर्मराजा, ह्याप्रमाणें दूर उभें राहून स्तुति करीत असलेले ब्रह्मरुद्रप्रभृति सर्व देवादिक, ज्याला क्रोधानेंझ आवेश चढला आहे, व म्हणून ज्याच्याजवळ जाणें अत्यंत कठीण झालें आहे, अशा त्या नृसिंहाजवळ जाण्यास समर्थ झाले नाहींत ॥१॥
 
फार काय, परंतु प्रत्यक्ष लक्ष्मीला देवांनी कोपशान्त्यर्थ त्याच्याकडे पाठविलें असतां, तीहि, पूर्वी कधींहि न पाहिलेलें व न ऐकिलेलें असें तें भगवंताचें अत्यंत अद्भुत नृसिंहरुप अवलोकन करुन भयभीत झाली व त्यामुळें त्याजवळ जाऊं शकली नाही ॥२॥
 
तेव्हां ब्रह्मदेवानें आपल्याजवळ उभा असलेल्या प्रल्हादाला प्रभूचा क्रोध शांत करण्याकरितां पाठविलें. ब्रह्य्मदेव म्हणाला, बा प्रल्हादा, तूं प्रभू जवळ जा, आणि आपल्या पित्यावर क्रुद्ध झालेल्या प्रभूला शांत कर ॥३॥
 
हे राजा, तेव्हां ‘ ठिक आहे ’ असें म्हणून तो महाभगवद्भक्त बालक प्रल्हाद हळूहळू भगवंताजवळ गेला, व हात जोडून त्यानें त्याला साष्टांग नमस्कार केला ॥४॥
 
त्या वेळी आपल्या पायां पडत असलेल्या त्या बालकाला पाहून तो प्रभु कृपेनें सद्गदित झाला, व त्याला उठवून, कालरुप सर्पापासून ज्यांची बुद्धि गलित झाली आहे अशा शरणागतांना अभयदान देणारा आपला हस्त त्यानें त्याच्या मस्तकावर ठेविला ॥५॥
 
नृसिंहाचा करस्पर्श होतांच प्रल्हादाचें वासनारुप सर्व पाप नष्ट झालें, व तत्क्षणीच त्याला भगवंताच्या स्वरुपाचें यथार्थ ज्ञानहि झालें. परमानंदामुळें त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले त्याचें हदय प्रेमानें आर्द्र झालें, त्याच्या नेत्रांतून आनंदाश्रूचे लोट वाहूं लागले, आणि त्यानें आपल्या हदयामध्यें भगवंताचे चरणकमळ धारण केलें ॥६॥
 
 
नंतर शांतचित असा तो प्रल्हाद भगवंताच्या ठिकाणी आपलें हदय व दृष्टि लावून एकाग्रअंतः करणपूर्वक प्रेमानें सद्गदित झालेल्या शब्दांनी श्रीहरीचे स्तवन करुं लागला ॥७॥
 
प्रल्हाद म्हणाला, - सत्त्वगुणाच्याठिकाणी एकग्रबुद्धि असलेले ब्रह्मादिक देवगण, तित्य भगवचिंतन करणारे ऋषि आणि ज्ञानसंपन्न असे सनकादिक सिद्ध बहुत काळपर्यंत आराधन करीत असून हा वेळपर्यंतहि आपल्या प्रवाहांनी व धनरुपहि गुणांनी ज्याला संतुष्ट करुं शकले नाहींत, तो श्रीहरि असुरयोनींत जन्मलेल्या मजवर कसा संतुष्ट करुं शकले नाहींत, तो श्रीहरि असुरयोनीत जन्मलेल्या मजवर कसा संतुष्ट होईल ? ॥८॥
 
वित्त, सत्कुला मध्ये जन्म, सौंदर्य, तप, पांडित्य, इंद्रियसौष्ठव, कांति, प्रताप, शरीरशक्ति, उद्योग, बुद्धि आणि अष्टांगयोग, हे बाराहि गुण, लोकांमध्ये व शास्त्रांमध्यें जरी श्रेष्ठ म्हणून प्रसिद्ध आहेत तथापि ते परमपुरुष भगवंताला संतुष्ट करण्यास समर्थ होत नाहींत, असें मी मानितों. कारण, केवळ भक्तीच्याच योगानें भगवान् गजेंद्रावर संतुष्ट झाला होता ॥९॥
 
या बारा गुणांनी युक्त परंतु पद्मनाभ भगवंताच्या चरणकमलापासून विमुख अशा ब्राह्मणापेक्षा, ज्यानें मन, कर्म, द्रव्य आणि प्राण हे त्या पद्मनामाच्याठिकाणीं अर्पण केले आहेत त्या चांडाळाला सुद्धा मी श्रेष्ठ मानितो. कारण, तो चांडाळ हरिभक्तीमुळें आपलें सर्व कुळ पवित्र करितो; पण अतिगर्विष्ठ ब्राह्मणाला तसें करितां येत नाही ॥१०॥
 
हा ईश्वर आत्मलाभानेंच पूर्णकाम झाल्यामुळें आपल्याकरितां क्षुद्रजनांपासून पूजेची इच्छा करीत नाहीं; परंतु तो कृपाळू असल्यामुळें भक्ताकरितांच तिची इच्छा करितो. कारण आपल्या मुखावर असलेली शोभा जशी आरशांतील प्रतिबिबाला प्राप्त होते, त्याप्रमाणे ज्या धनादिकांच्या योगानें भक्त भगवंताचें पूजन करितो, तें सर्वहि त्या भक्ताला स्वतः लाच प्राप्त होतें ॥११॥
 
 
सारांश, भगवान ज्याअर्थी केवळ भक्तीच्याच योगें संतुष्ट होतो, त्याअर्थी मी जरी नीच आहे, तथापि आतां निः शंकपणें यथामति ईश्वराचें महात्म्य वर्णन करीत आहे. तेव्हां, त्या माहात्म्याच्या गुणवर्णनानें संसारांत पडलेला पुरुषहि जर शुद्ध होतो तर मी कां होणार नाही ? ॥१२॥
 
हे ईश्वरा, तुला भीत असलेले हे सर्वहि ब्रह्माहि देव, आह्मां असुरांप्रमाणें वैरभावानें तुझी भक्ति करणारे नसून, सत्त्वमूर्ति अशा तुझ्या भगवंताच्या आज्ञेमध्यें श्रद्धापूर्वक वागणारे भक्त आहेत. तूं आपल्या मनोहर अवतारांच्या योगानें करीत असलेल्या नानाप्रकारच्या लीला, ह्या विश्वाच्या कल्याणाकरितां, ऐश्वर्यप्राप्तीकरितां आणि आत्मानंदाच्या लाभाकरितांच असतात, त्यांना भय उत्पन्न करण्याकरितां नसतात ॥१३॥
 
यास्तव हे भगवन्, आतां क्रोध आवरा. हा असुर तर आतां मरण पावला आहे. दुसर्‍यास उपद्रव करणार्‍या विंचू, साप इत्यादिक प्राण्यांच्या वधानें, साधूलाहि आनंदच होईल. सर्व लोक आतां सुखी झाला असून, तुझ्या क्रोधाचा उपशम होण्याची आतां वाट पहात आहेत. हे नृसिंहा, भयनिवृत्तीकरितां सर्व लोक ह्या नृसिंहस्वरुपांचे स्मरण करितील ॥१४॥
 
हे अजिता, विक्राळ मुख व जिव्हा, सूर्यासारखे नेत्र, चढविलेल्या भुंवया व तीक्ष्ण दाढा, यांमुळें अति भयंकर दिसणारें तुझें मुख, आंतडयांच्या माळा घातलेला कंठ, रक्तानें भरलेलें मानेवरील केंस, शंकूसारखे उभे टंवकारलेले कान, दिग्गजांनाहि भयभीत करणारा शब्द आणि शत्रूंना विदारण करणारी नखें, असें हे तुझें भयंकर रुप आहे; पण या रुपाला मी मुळीच भीत नाही ॥१५॥
 
परंतु हे दीनवत्सला, दुःसह आणि उग्र असें जें संसारचक्रांतील दुःख त्याला मात्र मी भिऊन गेलों आहे. ह्याठिकाणी पातकी लोकांमध्ये मी कर्मांनी बद्ध होऊन पडलों आहें. तेव्हां हे प्रिय परमात्म्या, मजवर तूं प्रसन्न होऊन संसारदुःखनिवर्तक अशा आपल्या आश्रयभूत चरणकमळाजवळ मला केव्हां बरें बोलावून नेशील ? ॥१६॥
 
नानाप्रकारच्या योनींमध्यें दुःख पावत असलेल्या या जीवाला तुझी सेवा करण्याचें ज्ञान कांहींच नाहीं. यास्तव तूंच त्या ज्ञानाचा मला उपदेश कर. हे विभो, प्रिय वस्तुंपासून वियोग आणि अप्रिय वस्तुंशी संयोग, ह्यांच्यामुळें उत्पन्न होणार्‍या शोकाग्नीनें सर्व योनीमध्यें मी पोळून गेलों आहे. दुःखाच्या निवृत्तीचा उपाय म्हणून जो करावा तोहि दुःखमयच होतो. देहादिकांच्या अभिमानानें मी मोहित झालों आहे. यास्तव हे प्रभो, तुझी सेवा करण्याचा उपाय तूं मला कयन कर ॥१७॥
 
हे नृसिंहा, तूं अनुग्रह केल्यामुळें, तुझ्या दासाच्या ठिकाणीं प्रवृत्त झालेला, तुझ्या चरणद्वयाचा आश्रय करणारा, सत्पुरुषांच्या समागम करणारा, विषयां पासून मुक्त होऊन, तुझा प्रिय, मित्र व श्रेष्ठ अशा देवतारुप ब्रह्मदेवानें गायन केलेल्या, तुझ्या लीलांच्या कथा मी वर्णन करुं लागलों, म्हणजे सर्व संसारदुःखे अनायासानें तरुन जाईन ॥१८॥
 
हे नृसिंहा, दुःखांनी संतप्त झालेल्या जनास दुःखनिवृत्तीचा उपाय म्हणून जो या लोकीं सांगितलेला आहे, हे विभो, तूं उपेक्षा केलेल्या लोकांना तो क्षण मात्रच होतो, कायमचा होत नाही. उदाहरण, मातापितर हे बालकाचे रक्षक या लोकी जरी आहेत, तथापि ते कायमचे नव्हेत. कारण, ते रक्षण करीत असतांहि बालकांना दुःख होत असलेले दृष्टोत्पतीस येते. तसेंच औषध रोग्याचें रक्षक म्हणावे तर तेहि नाही. कारण, औषध दिलें असतांहि मृत्यु येतो असें आपल्या अनुभवास येतें. त्याप्रमाणे नौका ही समुद्रामध्यें बुडत असलेल्या प्राण्यांचे रक्षण करणारी आहे असे म्हणावें तर तीहि नाहीं. कारण, कधी कधी नौकेसह लोक समुद्रामध्यें बुडतात, असें आपल्या दृष्टीस पडतें. यास्तव खरा रक्षक असा एक तूंच आहेस ॥१९॥
 
 
हे भगवन्, सत्त्वादि स्वभावयुक्त असा प्राचीन ब्रह्मादिक मुख्य कर्ता, अथवा त्यानें प्रेरणा केलेला असा अर्वाचीन पित्रादिक कर्ता, जेथें, ज्या निमित्तास्तव, ज्या काळीं, ज्या साधनानें, ज्याच्यापासून, ज्याकरितां, ज्याकारणानें जें उत्पन्न करितो, अथवा ज्याचें रुपांतर करितो, असें हें सर्व जग तुझेंच स्वरुप आहे ॥२०॥
 
हे सर्वशक्तिमान् जन्मादिविकारशून्य परमेश्वरा, ज्याच्या अवलोकनरुप अनुग्रहानें प्रेरित झालेल्या काळाच्या योगानें, जिच्यांतील सत्त्वादि गुणांचा क्षोभ झाला आहे अशी माया, अविद्येच्या द्वारानें जीवाच्या भोगाकरितां सोळा विकारांनीं आणि अनंत कर्मवासनांनी युक्त अशाप्रकारे वेदोक्तकर्मप्रधान असें हें लिंगशरीर उत्पन्न करित्ये. अशा कर्मबंधनानें बद्ध झालेला पुरुष, मनः प्रधान अशी तुझी अशी तुझी भक्ति केल्यावाचून या संसारचक्रांतून कसा बरें मुक्त होईल ? ॥२१॥
 
हे समर्था ईश्वरा, तूं आपल्य चैतन्यशक्तीच्या योगानें निरंतर बुद्धीचे गुण जिंकिले आहेस. तूं मायेचा नियंता असून सर्व कार्यांच्या व साधनांच्या शक्ति तूंच आपल्या स्वाधीन ठेवितोस. मायेनें सोळा विकारात्मक संसारचक्रामध्यें सांपडलेला असा मीं, पिळून निघणार्‍या उंसाप्रमाणें अत्यंत पीडित झालों आहें. तरी मज शरणागताला आपल्या समीप ओढून घे ॥२२॥
 
हे प्रभो, संसारी मनुष्य स्वर्गलोकांत जें प्राप्त व्हावें म्हणून इच्छा करितो, तें सर्व लोकपालांचे आयुष्य, संपत्ति व आधिपत्यरुप अधिकार अतितुच्छ आहेत, असें मी पाहिलें आहे. कारण जे लोकपाल माझ्या पित्याच्या नुसत्या कोपयुक्त हास्याने व फिरविलेल्या भुंवयांच्या चालनानें विध्वंस पावत होते, असा जो माझा पिता तो तूं मारुन टाकिलास ॥२३॥
 
सारांश, जीवांचे हे भोग, आयुष्य, संपत्ति आणि वैभव, ह्यांचे परिणाम जाणत असल्यामुळें, ब्रह्मदेवाच्या भोगांपर्यंत इंद्रियांनी उपभोग घेण्यास योग्य असलेल्या कोणत्याहि विषयांची इच्छा मी करीत नाही. कारण, त्या सर्वहि आणिमादि संपत्ति तुज कालरुप परमेश्वराच्या महापराकमानें उद्धस्त झाल्या आहेत. यास्तव मला तूं आपल्या सेवकांजवळ घेऊन पोंचीव ॥२४॥
 
कानाला मात्र गोड लागणार्‍या, परंतु मृगजळाप्रमाणें मिथ्या असलेल्या सर्व विषयादि वासना आणि सर्व रोगांचें उद्भवस्थान असें शरीर, हीं सर्व नश्वर आहेत असें जाणत असतांहि, त्यापासून विरक्त न होतां, त्या दुः साध्य मानून विषयलालसेनें सर्व प्राणीमात्र मधाप्रमाणें त्या कामरुप अग्नीचीच शांति करुं पहातात ! ॥२५॥
 
हे ईश्वरा, ज्यामध्यें तमोगुण अधिक आहे व जें रजोगुणानेंच उत्पन्न झालें आहे, अशा असुरकुळामध्यें उत्पन्न झालेला मी कोणीकडे ? आणि तुझी कृपा कोणीकडे ? पण ती कृपा तूं मजवर केली आहेस; आणि ब्रह्मदेव, रुद्र व लक्ष्मी ह्यांचाहि मस्तकावर कधीं ठेविला नाहीं असा तुझा तो कमळाप्रमाणें सर्व संताप दूर करणार देव श्रेष्ठ आहेत, व हा असुर नीच आहे, ही उत्कृष्टनिकृष्ट भावनारुप बुद्धि एकाद्या प्राकृत मनुष्यासारखी तुझ्याठिकाणी नाहीं. कारण, तूं जगाचा आत्मा व हितकर्ता आहेस. हे परमेश्वरा, सेवेच्या योगानेंच तुझा प्रसाद होतो; परंतु जसा कल्पवृक्ष सेवकाच्याच इच्छेनुसार फळ देतो, पण तो स्वतः विषम मुळींच नसतो, त्याप्रमाणें सेवातारतम्यानें तुझ्या प्रसादापासून धर्मादिकांची प्राप्ति होत्ये; म्हणून उत्कृष्टत्त्व व निकृष्टत्व हें कांहीं तुझ्या प्रसादाला कारण नाहीं. ॥२७॥
 
संसाररुपी सर्पयुक्त कूपामध्यें पडलेल्या विषयेच्छु लोकांच्या मागून त्यांच्या सहवासानें त्या संसारकूपांत पडलों असतां, देवा, तुझा आतां जसा हा प्रसाद झाला, तसाच पूर्वी देवर्षि नारदानें मला आपला असें म्हणून माझ्यावर अनुग्रह केला. त्या तुझ्या सेवकांच्या सेवेच्या अनुग्रहाचा मीं कसा बरें त्याग करीन ? ॥२८॥
 
हे अनंता, पुत्रवधासारखें अयोग्य कर्म करण्याच्या इच्छेनें, जेव्हां माझा पिता हातात खङ्ग घेऊन मला मारावयास उभा राहिला, आणि - ‘ तुला मान्य असा ईश्वर माझ्याहून जर निराळा आहे तर तो आतां तुझें रक्षण करो ’ - असें म्हणाला, त्यासमयी तूं प्रगट होऊन, पित्याचा वध करुन माझें रक्षण करो ’ - असें म्हणाला, त्यासमयी तूं प्रगट होऊन, पित्याचा वध करुन माझें रक्षण केलेंस. हें तुझें कृत्य, तुझा भक्त जो नारद त्यांचें वाक्य खरें करण्याकरितांच होतें ॥२९॥
 
 
हे भगवन्, हें सर्व जग, तूंच एक आहेस. कारण, ह्याच्या आरंभी, शेवटी आणि मध्येंहि तूंच प्रत्ययास येतोस. हे जगदात्म्या, आपल्या मायेनें हें गुणपरिणामात्मक जग उत्पन्न करुन त्याच्यामध्यें प्रविष्ट झालेला तूं त्या गुणांच्या योगाने, उत्पन्न करणारा, रक्षण करणारा व मारणारा अशा अनेक रुपानी युक्त असल्यासारख्या भासतोस ॥३०॥
 
हे ईश्वरा, हें कार्यकारणात्मक जग तूंच आहेस, तुझ्याहून निराळें असें कांहीं नाहीं. तूंच ह्या जगाच्या आदीं, अंतीं व मध्ये असून त्यापासून निराळा आहेस; म्हणून ‘ हा आपला व हा दुसर्‍याचा ’ अशी जी ही बुद्धि ती केवळ व्यर्थ माया आहे. कार्यरुप वृक्ष ज्याप्रमाणें कारणरुपानें बीजात्मक असतो, तसेंच बीजहि पृथ्वीरुप असून, ती पृथ्वी पुनः आपल्या सूक्ष्मरुपानें बीजांत असते, त्याप्रमाणेंच माती आदिकरुन ज्या पदार्थापासून घटादि पदार्थांची उत्पत्ति होते, व प्रकाश, लय व स्थिति ही त्यांस प्राप्त होतात, पण घटादिक पदार्थ मृत्तिकारुपच असतात. तद्वत् हें सर्व कार्यकारणात्मक जग परमकारण असें तुझेंच स्वरुप आहे ॥३१॥
 
हे भगवन्, तूं प्रलयकाळच्या उदकामध्यें आपल्याच योगानें आपल्याच ठिकाणीं या जगांचा उपसंहार करुन आत्मसुखाचा अनुभव घेत कर्मरहित होऊन शयन करितोस, पण स्वरुपानुसंधानरुप योगांनें डोळे मिटून व स्वरुपप्रकाशानें निद्रा जिंकून, जाग्रदादिक अवस्थात्रयाहून निराळ्या अशा आपल्या तुरीय स्वरुपांत तूं राहतोस. परंतु तमआदिकरुन गुणांनी तूं केव्हांही बद्ध होत नाहींस ॥३२॥
 
तू स्वतःच्या कालशक्तीनें प्रकृतीचे सत्त्वादि धर्म प्रेरित केले असून उदकामध्यें शेषशय्येवर शयन करितोस. हें जग तुझेंच स्वरुप आहे व याच्यामध्यें विसर्जन होऊं लागलें, तेव्हां वटबीजापासून उत्पन्न होणार्‍या महावटवृक्षाप्रमाणें तुझ्याठिकाणीं लीन असलेले हें ब्रह्मांडरुप महाकमळ तुझ्या नाभी पासून प्रल्योदकामध्यें उत्पन्न झालें ॥३३॥
 
हे ईश्वरा, त्या कमळापासून उत्पन्न झालेल्या सूक्ष्मदृष्ट्यां ब्रह्मदेवालाहि त्या कमळावांचून इतर कांहीच दिसेनासें झालें; तेव्हा स्वतःच्या ठिकाणीं बीजभूत असलेल्या अशा तुला तो बाहेर शोधूं लागला, व उदकामध्यें प्रवेश करुन त्यानें पुष्कळ काळपर्यंत तुझा शोध केला; पण त्याला तुझी प्राप्ति झाली नाही. याचें कारण उघड आहे. अहो, अंकुर उत्पन्न झाला असतां त्याला व्यापून असलेले करणरुप बीज त्याहून निराळें असें कसें बरें मिळेल ॥३४॥
 
हे ईश्वरा, त्या ब्रह्मदेवानें शंभर वर्षेपर्यंत उदकामध्यें शोध करण्याचें त्यानें सोडून दिलें; आणि नाभिकमलाचा आश्रय करुन दीर्घ काळ तप केलें. नंतर तपानें अंतः करण शुद्ध झाल्यावर, जसा भूमीमध्यें सूक्ष्मरुपानें गंध व्याप्त असतो, त्याप्रमाणें भूतें, इद्रियें आणि मन ह्यांनी बनलेल्या आपल्या देहांत अतिसूक्ष्मरुपाने व्याप्त असलेला जो तूं, त्या तुला त्यानें अवलोकन केलें ॥३५॥
 
त्या वेळी अपरिमित मुखें, पाय, मस्तकें, हात, मांडया, नाक, कर्ण, नेत्र, भूषणें आणि आयुधें ह्यांनी समृद्ध, व चतुर्दशलोकविस्तरात्मक रचनेनें युक्त आणि मायामय अशा विरा ट्पुरुषरुपानें स्थित असलेल्या तुला पाहून त्या ब्रह्मदेवाला आनंद झाला ॥३६॥
 
त्या वेळी हयग्रीवमूर्ति धारण करुन तूं त्या वेदद्रोही व अतिप्रबल अशा रजस्तमोरुप मधुकैटमनामक दैत्यांचा वध केलास, व ब्रह्मदेवाला वेदसमूह आणून दिलास. म्हणून सत्त्वगुण हीच तुझी अत्यंत प्रिय मूर्ति आहे असें मानितात ॥३७॥
 
हे महापुरुषा, ह्याप्रमाणें तूं मनुष्यांमध्यें रामादिक, तिर्यग्योनींमध्यें वराहादिक, ऋषींमध्यें परशुरामादिक, देवांमध्यें वामनादिक व जलचरांमध्यें मत्स्यकूर्मादिक अवतार धारण करुन लोकांचे पालन करितोस, व जगाला प्रतिकूळ असतील त्यांचा वध करितोस; आणि निरनिराळ्या युगामध्यें चालू असलेल्या धर्माचें रक्षण करितोस. परंतु कलियुगामध्यें तूं अवतार धारण करुन तें पालनादिक काय करीत नाहींस, म्हणून तीनच युगांमध्यें प्रगट होणारा तूं ‘ त्रियुग ’ ह्या नांवानें प्रसिद्ध आहेस ॥३८॥
 
हे वैकुंठनाथा, पातकांनी दूषित, बहिर्मुख, दुर्वर, कामातुर व हर्ष, शोक, भय ह्यांनी दुःखित झालेलें हें माझें मन, तुझ्या कथांत रममाण होत नाहीं; अशा स्थितींत हे प्रभो, मी दीनानें तुझ्या स्वरुपाचा विचार कसा करावा ? ॥३९॥
 
हे अच्युता, ज्याप्रमाणें अनेक भार्याच्या पतीला त्याच्या स्त्रिया सवतीमत्सरानें जशा आपल्याकडे ओढितात त्याप्रमाणें कधींहि तृप्त न होणारी अशी ही जिव्हा मला मधुरादि रसांकडे आकर्षण करित्ये, शिरुन कामिनीकडे ओढून नेतें, त्वचा चंदनादि पदार्थाकडे ओढित्ये, क्षुधेनें तप्त झालेलें उदर आहाराकडे नेतें, श्रवणेंद्रिक गायनाकडे घेऊन जातें, घ्राणेंद्रिय सुगंधाकडे नेतें, आणि चंचल दृष्टि रुपाकडे वळवित्ये. अशाप्रकारें हीं कर्मेद्रियें आपआपल्या विषयांकडे मला ओढून नेतात ॥४०॥
 
हे नित्यमुक्त ईश्वरा, आपल्या कर्मानें संसाररुप वैतरणीनदीमध्यें पडलेल्या, परस्परांच्या संसर्गानें मरण, जन्म व विषयसेवन ह्यांपासून अत्यंत भयभीत झालेल्या, आणि स्वजनांच्या देहांविषयी मैत्री व इतरांच्या देहांविषयी वैर धारण करणार्‍या अशा ह्या मूढ जनसमुदायाला पाहून ‘ अरेरे, ह्यांना फार दुःख होत आहे ? ’ असें म्हणून तूं त्यांवर दया कर, आणि ह्या वैतरणीनदींतून त्यांना बाहेर काढून त्यांचें रक्षण कर ॥४१॥
 
 
हे जगद्गुरो, ह्या विश्वाची उत्पत्ति, स्थिति व लय, ह्यांचें कारण तूंच आहेस. ह्या जनांच्या उद्धार करण्याला तुला प्रयास तो काय पडणार आहे ? मूढ जनांवर तुज महात्म्याचा अनुग्रह होणें अवश्य आहे. दुःखितांना साह्य करणार्‍या हे दीनबंधो, तुझी सेवा करणार्‍या एकटया भक्तजनांचाच उद्धार करुन काय उपयोग ? ॥४२॥
 
हे सर्वोत्तमा, मला स्वतःला, दुस्तर अशा ह्या संसाररुप वैतरणीनदीची भीति मुळींच वाटत नाही; कारण, तुझ्या चरित्राच्या गानरुप महामृतामध्यें माझें अंतः करण अगदी तल्लीन होऊन गेलें आहे; परंतु त्या महामृतापासून ज्यांचे चित्त पराङ्मुख झालें आहे व इंद्रियनिमित्त मायिक विषयसुखाकरितां ज्यांनी कुटुंबपोषणाचा भार अंगावर घेतला आहे अशा मूढ जनांचेंच मला फार वाईट वाटते ॥४३॥
 
हे देवा, प्रायशः स्वतः लाच मुक्ति प्राप्त होण्याविषयेची इच्छा करणारे मुनि, एकांतस्थळी मौन धारण करुन ध्यानादिक कर्मे करीत असतात; पण ह्या दीन जनांना सोडून आपण एकटें मुक्त व्हावें अशी इच्छा मी करीत नाही. हे परमेश्वरा, अनेक योनीमध्यें भ्रमण पावत असणार्‍या ह्या मूढ जनांचा उद्धार करणारा तुजवाचून दुसरा कोणीहि मला दिसत नाहीं ॥४४॥
 
हे परमात्म्या, मैथुनादिकांच्या योगें गुहस्थाश्रमी पुरुषांना होणारें जें सुख, तें अतितुच्छ असून, जसें हातांनी खाजविलेल्या खरजेपासून प्रथम किंचित् सुख वाटतें, परंतु मागाहून अधिकाच दुःख होतें; तसें हे गृहस्थाश्रमांसंबंधी सुखहि उत्तरोत्तर अधिकच दुःखकारक आहे. परंतु शरीरांतील कामदेवना अनिवार असल्यामुळें कामुक जन खरजेप्रमाणें नानाप्रकारचीं दुःखे भोगीत असूनहि गृहसंबंधी सुख आतां पुरें असें न मानता कंडूप्रमाणें कामवासनेंतच रममाण होतो. ॥४५॥
 
हे अंतर्यामी परमात्म्या, जप आणि समाधि, हे जे मोक्षाला साधनभूत म्हणून प्रसिद्ध असे दह धर्म आहेत, ते बहुतकरुन अजितेंद्रिय लोकांना केवळ जीवनाचे उपायच होताता; पण दांभिकांना तर ते निवार्हाची साधनें होसील कीं नाही हा संय आहे ॥४६॥
 
हे प्रभो, कस्तुतः तूं रुपरहित आहेस. बीजांकुरांप्रमाणें कार्यकारणात्मक अशी जी तुझी दोन रुपें वेदानें प्रकाशित केली आहेत, यांखरेजी तुझें ज्ञापक चिन्ह दुसरें कांहीच नाहीं. जसे अग्निक्षोत्री काष्ठात असलेप्या अग्नीला मंथनाने प्राप्त करुन घेतात
त्याप्रमाणें इंद्रियनिग्रह करणारे योगी कार्यकारणांमध्ये व्यापकरुपानें असणार्‍या तुला भक्तियोगानें प्रत्यक्ष अवलोकन करितात; दुसर्‍या उपायांनी तुझं तुझें स्वरुपज्ञान होत नाही ॥४७॥
 
हे सर्वव्यापी परमेश्वरा, वायु, अग्नि, पृथ्वी, आकाश, जल, शब्दादि विषय, प्राण, इंद्रियें, मन, चित्त, अहंकार व स्थूलसूक्ष्मात्मक असें हें सर्व ज गत तूंच तुझ्याहून भिन्न नाही. ॥४८॥
 
हे उरुगाय भगवन् सत्त्वादि गुण, गुणाभिमानी देव, देव व मनुष्यें यांसह महदादि तत्त्वें, तसेंच मन, बुद्धि इत्यादिकांचे अभिमानी देव, हे सर्व आदि व अंत ह्यांनी युक्त असल्यामुळें तुला जाणत नाहींत. ह्यास्तव विद्वान् लोक अध्ययनादि व्यापारापासून अलग राहतात; ॥४९॥
 
पण, हे अतिपूज्य परमात्म्या, प्रणिपात, स्तुति, सर्वकर्मसमर्पण, उपासना, तुझ्या चरणांचें स्मरण व तुझ्या कथेचें श्रवण, अशा सहा प्रकारच्या सेवेवांचून, पुरुषाला परमहंसाना प्राप्त कथेचें श्रवण, अशा सहा प्रकारच्या सेवेवांचून, पुरुषाला परमहंसांना प्राप्त होण्यास योग अशी भक्ति कशी प्राप्त होईल ? ॥५०॥
 
नारद म्हणाला, - हे धर्मराजा, याप्रमाणें भक्त प्रल्हादानें भक्तिपूर्वक निर्गुण परमात्म्याच्या गुणांचें वर्णन केलें असतां तो परमात्मा प्रसन्न झाला, आणि कोप आंवरुन त्या नम्र झालेल्या प्रल्हादाशीं बोलूं लागला ॥५१॥
 
श्रीभगवान् म्हणाले, - हे असुरश्रेष्ठा प्रल्हादा, तुझें कल्याण असो. मी तुजवर प्रसन्न झालों आहे. यास्तव हे कल्याणा, तूं इष्ट वर माग. कारण, मी पुरुषांच्या मनकामना पूर्ण करणारा आहें ॥५२॥
 
हे आयुष्मन् प्रल्हादा, मला प्रसन्न न करणार्‍या पुरुषास माझें दर्शन होणें खरोखर दुर्लभ आहे; परंतु ज्याला माझें दर्शन होतें तो प्राणी शोकभयापासून मुक्त होतो. ॥५३॥
 
ह्याकरितां सदाचारसंपन्न, महाभाग्यवान् आणि आपलें कल्याण व्हावें अशी इच्छा करणारे विवेकी पुरुष, सर्व मनोरथ पूर्ण करणार्‍या मज परमेश्वराला परम भक्तीनें संतुष्ट करितात ॥५४॥
 
हे धर्मराजा, याप्रमाणें प्राण्यांना लोभ उत्पन्न करणार्‍या वरांच्या योगानें, भगवंतानें लोभ दाखविला असतांहि भगवंताविषयींच्या एकांत भक्तीमुळें, त्यां असुरश्रेष्ठ प्रल्हादानें, त्या वरांची इच्छा मुळींच केली नाही ॥५५॥
 
अध्याय नववा समाप्त ॥९॥

नृसिंहाख्यान अध्याय १० वा
नारद म्हणाला, - हे धर्मराजा, वर मागण्यासंबंधाचें भगवंताचे ते भाषण भक्तियोगाला विघ्नकारक आहे असें मानणारा तो प्रल्हाद बालक आश्चर्य प्रदर्शित करीत भगवंताला उत्तर देऊं लागला ॥१॥
 
प्रल्हाद म्हणाला, - हे परमेश्वरा, स्वभावतः च विषयांच्या ठिकाणी आसक्त असलेल्या मला, असल्या वराच्या अमिषानें लोभवूं नकोस. कारण विषयांच्या संगाची भीति वाटल्यामुळेंच त्यांपासून विरक्त होऊन मोक्षप्राप्ति होण्याच्या इच्छेनें तुला मी शरण आलों आहे ॥२॥
 
हे प्रभो, हदयाच्या गांठीप्रमाणें बंधास कारण होणारे व संसाराला बीजभूत असे जे विषय, त्याविषयीं जी तूं प्रेरणा केलीस, ती केवळ माझी कसोटी पहाण्याकरितां केली आहेस ॥३॥
 
नाहींपेक्षां, हे जगद्गुरो, कृपाळू अशा तुला अनर्थसाधनामध्यें आपल्या भक्ताला प्रवृत्त करणें शक्यच नाही. हे ईश्वरा, तुझ्यापासून जो भक्त विषयप्राप्तीची इच्छा करतो तो भक्तच नव्हे, तर केवळ व्यापारी होय ॥४॥
 
जो सेवक स्वामीपासून आपले मनोरथ पूर्ण करण्याची इच्छा करितो तो सेवकच नव्हे, व जो स्वामी सेवकापासून स्वकार्य साधण्याच्या इच्छेनें त्याला द्रव्य देतो, तो स्वामीहि नव्हे; तर ते परस्पर व्यापारी समजले पाहिजेत ॥५॥
 
तुझ्यामध्यें असलेला स्वामिसेवकभाव मात्र वास्तविक आहे; परंतु मी तर तुझा निष्काम भक्त आहे व तूंहि माझा निरपेक्ष स्वामी आहेस. ह्यामुळें जसा राजा आणि सेवक ह्यांच्यामध्ये कारणपरत्वें स्वामिभृत्यभाव असतो तसा आपल्यांमध्ये नाही ॥६॥
 
 
तथापि हे वरदश्रेष्ठा परमेश्वरा, तूं जर मला इष्ट वर देत असलास, तर माझ्या हदयामध्यें वासनांचा अंकुरच उत्पन्न होऊं नये, असा मी तुजपासून वर मागतो. ॥७॥
 
 
हे कमलनयना, कामांकुराच्या उत्पत्तीमुळें, इंद्रियें, मन, प्राण, देह, धर्म, धैर्य, सारासार विवेक, लज्जा, ऐश्वर्य, प्रताप, स्मृति आणि सत्य ही सर्व नाहींशीं होतात. ॥८॥
 
हे पुंडरीकाक्षा, जेव्हां पुरुष, मनामध्यें असलेल्या सर्व कामवासनांचा त्याग करितो तेव्हांच तुझ्यासारखें ऐश्वर्य मिळविण्यास तो योग्य होतो ॥९॥
 
हे भगवंता, हे महात्म्या पुराणपुरुषा, हे श्रीहरे, हे अद्भुत नृसिंहरुप धारण करणार्‍या ब्रह्मस्वरुप परमात्म्या, तुला नमस्कार असो ॥१०॥
 
श्रीनृसिंह म्हणाला, - हे प्रल्हादा, तुझ्यासारिखे जे माझे एकनिष्ठ भक्त आहेत ते कधींहि इहलोकसंबंधी अथवा परलोकसंबंधीं विषय मजपासून प्राप्त होण्याची इच्छा करीत नाहीत. तथापि हें मन्वंतर संपेपर्यंत तूं दैत्यांचा राजा होऊन ह्या भूलोकीं विषयांचा उपभोग घे ॥११॥
 
तसेंच माझ्या आवडत्या कथा श्रवण करीत, सर्व भूतांमध्यें रहाणार्‍या एकटया मज यज्ञाधिष्ठात्या परमेश्वराला मनामध्यें धारण करुन तूं माझें आराधन कर, आणि सर्व कर्मे मला अर्पण करुन त्यांच्या बंधापासून मुक्त हो ॥१२॥
 
सुखानुभवानें पुण्याचा, सदाचरणानें पातकाचा आणि कालवेगानें देहाचा त्याग करुन, देवलोकीहि गायन करण्यास योग्य अशी अत्यंत पवित्र कीर्ति इहलोकी संपादन करुन तूं कर्मबंधनापासून मुक्त होशील व शेवटी मजप्रत प्राप्त होशील ॥१३॥
 
तुझें व माझें स्मरण करीत जो पुरुष, तूं गाईलेल्य माझ्या स्तोत्राचें पठण करील तोहि कर्मबंधनापासून मुक्त होईल ॥१४॥
 
प्रल्हाद म्हणाला - हे महेश्वरा, वर देणार्‍या ब्रह्मादिकांचा तूं अधिपति आहेस तरी तुजपासून दुसरे असें एक मागणेंख मागतों कीं, क्रोधानें अंतः करण व्याप्त झाल्यामुळें ईश्वरी तेज न जाणणार्‍या माझ्या पित्यानें, ‘ हा माझ्या भ्रात्याचा घात करणारा आहे ’ अशा असत्य दृष्टीनें, साक्षांत तुज त्रैलोक्याधिपति सर्वलोकगुरुची निंदा केली, व मी जो तुझा भक्त त्याशी द्रोह केला, त्या मोठ्या व दुर्धर पातकापासून तो माझा पिता मुक्त होवो. हे दीनवत्सला, तूं कटाक्षदृष्टीनें त्याच्याकडे पाहिलेंस तेव्हांच वस्तुतः तो पवित्र झाला आहे ॥१५॥॥१६॥॥१७॥
 
श्रीभगवान् म्हणाले, - हे निष्पापा, तुझा पिता आपल्या एकवीस पूर्वजांसह पवित्र झाला आहे. कारण, हे साधो, ह्याच्या घरी कुलपवित्र करणारा असा तूं उत्पन्न झालास ॥१८॥
 
हे प्रल्हादा, जेथेंजेथें अत्यंत शांत, समदर्शी, परोपकारी आणि सदाचारसंपन्न असे माझे भक्त असतात, ते कीकट देशासारखे अत्यंत अपवित्र असलेले देशहि पवित्र होतात ॥१९॥
 
हे दैत्यश्रेष्ठा, माझ्या भक्तीनें निरिच्छ झालेले जे लोक आहेत, ते कामक्रोधादिकांमुळें जरी कदाचित् परतंत्र झाले, तथापि ते लहानथोर प्राण्यापैकी कोणाचीहि हिंसा करीत नाहीत ॥२०॥
 
या लोकी जे पुरुष तुला अनुसरुन वागतील, ते सुद्धां माझे भक्त होतील; तूं तर खरोखर माझ्या भक्तांमध्ये श्रेष्ठ आहेस ॥२१॥
 
हे प्रल्हादा, माझ्या शरीराचा स्पर्श झाल्यामुळें सर्वप्रकारें पवित्र झालेल्या आपल्या पित्याची केवळ शास्त्रमर्यादारक्षणार्थ तुं और्ध्वदेहादिक कार्ये कर; म्हणजे तुज सत्पुत्राच्या योगानें तो उत्तम लोकास जाईल ॥२२॥
 
आणि बा प्रर्‍हादा, ब्रह्मवेत्याच्या वचनाला अनुसरुन तूं पित्याच्या स्थानावर आरुढ हो, आणि माझ्या ठिकाणी मन लावून व मजवर निष्ठा ठेवून सर्व कर्मे आचरण कर ॥२३॥
 
नारद म्हणाला, - हे धर्मराजा, ह्याप्रमाणें भगवंतानें आज्ञा केल्याप्रमाणें प्रल्हादानें पित्याचें योग्य ते और्ध्वदेहिक कृत्य केलें, आणि नंतर द्विजश्रेष्ठांनी त्याला राज्याभिषेक केल्यावर तो प्रल्हाद भगवत्पर होऊन सर्व कर्मे करुं लागला ॥२४॥
 
नंतर प्रसन्नतेमुळें सौम्यवदन झालेल्या त्या नृसिंहरुप श्रीहरिला पाहून देवादिकांसहित ब्रह्मदेव पवित्र शब्दांनी त्याची स्तुति करुं लागला ॥२५॥
 
ब्रह्मदेव म्हणाला, - हे देवाधिदेवा, हे सर्वांतर्यामी परमात्म्या, तूं प्रजापतीचाहि पूर्वज आहेस. लोकांना त्रास देणारा हा पापी असुर तूं मारिलास, ही फार चांगली गोष्ट झाली ॥२६॥
 
हा दैत्य, माझ्यापासून वर प्राप्त झाल्यामुळे मी उत्पन्न केलेल्या देवमनुष्यादिकांपासून मृत्यु पावण्यास अशक्य झाला होता; व तप आणि योग यांच्या बलानें गर्विष्ठ होऊन त्यानें वेदप्रणीत सर्व धर्म नाहींसे करुन टाकिले होते; यास्तव त्याला तूं मारलेस ही फार चांगली गोष्ट झाली ॥२७॥
 
त्याप्रमाणें बालक असूनहि सदाचरणसंपन्न व महामगवद्भक्त असा त्याचा पुत्र जो प्रल्हाद त्याला तूं मृत्यूपासुन सोडविलेंस व तो तुला शरण आला, हेंहि फार चांगले झाले ॥२८॥
 
हे भगवन्, तुझें हे स्वरुप, मनोनिग्रहपूर्वक तुझें ध्यान करणार्‍या पुरुषाला सर्व भीतीपासून किंबहुना वध करण्याची इच्छा करण्यार्‍या मृत्यूपासूनहि रक्षण करणारें आहे ॥२९॥
 
नृसिंह म्हणाला, - हे ब्रह्मदेवा, आजपासून अशाप्रकारच्या वर करस्वभावाच्या असुरांना तूं कधींहि देऊं नकोस. कारण, सर्पांना दूध पाजिलें असतां तें जसें सज्जनांना उपद्रव करितें, तसेंच स्वभावतः निर्दय, अविचारी, अशा असुरांना दिलेला वरहि लोकांना उपद्रव करणारा होतो ॥३०॥
 
नारद म्हणाला, - हे धर्मराजा, ह्याप्रमाणें ब्रह्मदेवाला सांगून त्याचें पूजन केल्यावर, भगवान् श्रीनृसिंह तेथेंच अंतर्धान पावला; ( अदृश्य झाला. ) ॥३१॥
 
नंतर भगवंताचें अंशभूत असे जे ब्रह्मदेव, महादेव, कश्यपादि प्रजापति व इंद्रादि देव ह्याचें त्या भक्त प्रल्हादानें उत्तमप्रकारें पूजन करुन त्यांना वंदन केलें ॥३२॥
 
नंतर भृगुप्रभृति मुनसिंह ब्रह्मदेवानें प्रल्हादाला, दैत्य व दानव ह्यांचें आधिपत्य दिलें ॥३३॥
 
हे राजा, याप्रमाणें प्रल्हादानें ब्रह्मादिदेवांची पूजा केल्यानंतर सर्व देव त्याला उत्तमप्रकारचे आशीर्वाद देऊन आपआपल्या स्थानी निघून गेले ॥३४॥
 
असो. हे धर्मराजा, ह्याप्रमाणे पूर्वी जयविजयसंज्ञक असलेले मूळचे विष्णुपार्षद ब्राह्मणांच्या शापामुळें दितीचे पुत्र झाले असतां, त्यांच्या हदयामध्यें वैरभावानें असलेल्या श्रीहरीनें त्यांचा वध केला ॥३५॥
 
नंतर त्याच शापामुळें ते रावण व कुंभकर्ण ह्या नांवानें दोन राक्षस झाले; त्या वेळी प्रभूनें रामावतार घेऊन त्यांचा वध केला ॥३६॥
 
रामाच्या बाणांनीं त्यांचें हदय विदीर्ण होऊन ते युद्धभूमीवर पडले असतां पूर्वजन्माप्रमाणेंच त्यांनी आपले चित्त रामाकडे लावून देहाचा त्याग केला ॥३७॥
 
नंतर तेच फिरुन या भूलोकी शिशुपाल व दंतवक्त्र ह्या नावांनी पुनः उत्पन्न झाले, आणि वैरानुबंधानें हे धर्मराजा, तूं पहात असतांच श्रीहरीच्या ठिकाणीं सायुज्य मुक्ति पावले ॥३८॥
 
हे राज, कुंभारीणनामक माशीनें वारंवार दंश केलेला कीटक, जसा तिच्या निरंतर ध्यानामुळें तिचे स्वरुप पावतो, त्याप्रमाणे कृष्णद्रोही राजांनी कृष्णनिंदादिकांच्या योगानें पूर्वी जें पातक केले होते, तें श्रीकृष्णाच्या नित्य ध्यासानें नष्ट होऊन शेवटीं ते त्याच्या स्वरुपाला पोंचले ॥३९॥
 
असो. जे एकनिष्ठ भक्त आहेत, ते भेददृष्टिरहित अश सर्वोत्कृष्ट भगवद्भक्तीनें श्रीहरीचें चिंतन करुन जसे पूर्वी त्याच्या सारुप्याला पोंचले, त्याप्रमाणें शिशुपालप्रभृति राजेहि वैरानुबंधानें श्रीहरीचें चिंतन करुन त्याच्या सारुंप्याला पोंचले आहेत ॥४०॥
 
हे राजा, दमघोषाचे पुत्र आदिकरुन श्रीकृष्णाचा द्वेष करीत असूनहि त्याच्या सायुज्याला कसे पावले, असें जें तूं मला विचारलें होतेंस तें सर्व तुला मी कथन केलें आहे ॥४१॥
 
ह्याप्रमाणें हिरण्याक्ष व हिरण्यकशिपु ह्या आदिदैत्यांचा वध जिच्यामध्यें वर्णिला आहे, अशी ही ब्रह्मज्ञानसंपन्न, व भक्तिमान् परमपूज्य अशी श्रीनृसिंहवताराची पुण्यकारक कथा मी तुला कथन केली आहे ॥४२॥
 
॥ ॐ शांति शांति ॥

नृसिंहाख्यान सप्ताह पारायण विधि
कायेन वाचा मनसापि पातकं । नित्यं प्रकुर्वन्ति शठा हठेन थे ॥
 
परस्वपुष्टा मलिना दुराशयाः । सप्ताहयज्ञेन कलौ पुनन्ति ते ॥
 
( पद्मपुराण )
 
श्रीमद्भागवतसप्ताहपारायण हे इतर सर्व मोक्षसाधनांहून श्रेष्ठ आहे, असें भागवतमाहात्म्यांत सांगितलें आहे. ‘‘ राजाहः सखिभ्यष्टच् " ह्या पाणिनीच्या व्याकरणसूत्रानें सप्ताह असें रुप सिद्ध झालें असून सात दिवसांनीं जें पूर्ण केलें जातें, त्यालाच सप्ताह ह्नणतात. ‘ यत्फलं नास्थि तपसा न योगेन समाधिना ॥ अनायासेन तत्सर्वं सप्ताहश्रवणे लभेत् ॥ यज्ञाद्गर्जति सप्ताहः सप्ताहो गर्जति व्रतात् ॥ तपसो गर्जति प्राच्चैस्तीर्थान्नित्यं हि गर्भति ॥ ’ जें फल तप, योग, यज्ञ इत्यादि प्रकारांनी मिळत नाही, तें फळ सप्ताहश्रवणानें प्राप्त होतें, असें ह्नटलें आहे. हें सप्ताहपारायण शुकाचार्यानें परीक्षित् राजाला श्रीकृष्ण निजघामाला गेल्यानंतर कलियुगांची ३० वर्षे पूर्ण होऊन ३१ वें वर्ष सुरु झालें असतां भाद्रपदातील नवमी तिथीपासून प्रारंभ करुन सांगितले. ह्याच श्रीमद्भागवताचें सप्ताहपारायण गोकर्णानें कलीची दोनशे तीस वर्षे पूर्ण झाली असतां आपला भाऊ जो धुंधुकारी त्याची पिशाच्चत्वापासून मुक्तता करण्याकरितां सूर्याच्या सांगण्यावरुन आषाढ महिन्यांतील नवमीला सुरवात करुन केलें. ब्रह्मपुत्र अशा सनकादि मुनीनीं हेंच भागवतसप्ताहपारायण भक्ति, ज्ञान व वैराग्य ह्यांना तरतरी येण्याकरितां कलियुगाची दोनशें साठ वर्षे गेली असतां कार्तिक महिन्याच्या शुक्लपक्षांतील नवमीला प्रारंभ करुन केलें, अशा कथा आहेत. एकंदरींत कलियुगाला प्रारंभ होऊन आज ५००० वर्षे झाली आहेत, अर्थात् ह्या सर्व गोष्टी ४००० वर्षापूर्वीच्या आहेत; व शुकानें परीक्षिताला भागवत सांगितलें त्याला आजपावणे पांच हजारावर वर्षे झाली असें दिसून येते.
 
सप्ताहपारायणाला आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक व मार्गशीर्ष हे सहा महिने योग्य होत, असें शास्त्रांत सांगितले आहे. ह्यांपैकी कोणत्याहि एका महिन्यांत ज्योतिष्यांना मुहुर्त विचारुन त्या दिवसापासून प्रारंभ करावा. वक्त्यानें उत्तरेकडे तोंड करुन बसावें, व श्रवण करण्यास बसलेल्या श्रोत्यांनी पूर्वेकडे तोंड करुन बसावें. वक्त्यानें सप्ताहाला प्रारंभ करण्यापूर्वी, पूर्व दिवशी क्षीर करावें; सूर्योदयापूर्वी ५ घटका स्नानसंध्यादि नित्यकृत्य करुन सूर्योदयाला कथारंभ करावा. आरंभ करण्यापूर्वी श्रीकृष्णमूर्तीची पूजा करुन -
 
संसारसागरे मग्नं दीनं मां करुणानिधे ॥
 
कर्ममोहगृहीताङ्गं मामुद्धर भवार्णवात् ॥
 
असा मंत्र ह्नणून प्रार्थना करावी. नंतर श्रीमद्भागवतग्रंथाची पूजा करावी आणि हातांत नारळ घेऊन उभें रहावें, व पुढील मंत्र ह्नणावाः-
 
" श्रीमद्भागवताख्योऽयं प्रत्यक्षः कृष्ण एव हि ॥
 
स्वीकृतोऽसि मया नाथ मुक्त्यर्थं भवसागरे ॥
 
मनोरथो मदीयोऽयं सकळः सर्वथा त्वया ॥
 
निर्विघ्नेनैव वर्तव्यो दासोऽहं तव केशव ॥"
 
हे मंत्र ह्नणून पोथीची प्रार्थना करावी. सूर्योदयाला कथेला प्रारंभ करुन साडे तीन प्रहर ह्नणजे सूर्योदयापासून १० तास पर्यंत कथाकार्य चालवावें. मध्यंतरी दोन घटका विसावा घ्यावा. अशारीतीनें सात दिवसांत हें सर्व भागवत सकाळी ४। तास संहिता व सायंकाळीं ७ तास अर्थप्रवचन, अशा क्रमानें पूर्ण करावें. भागवताचे एकंदर अध्याय ३३५ आहेत. प्रतिदिवशीं पन्नास अध्याय ह्या क्रमानें सहा दिवसांत ३०० अध्याय व सातवे दिवशी ३५ अध्याय वाचण्याची परंपरागत पद्धती चालू आहे. मध्यंतरी जी दोन घटका विश्रांती घ्यावयाची तेवढ्या वेळांत विष्णुभक्तांनी कथाकीर्तन, भगवन्नामस्मरण, भगवद्गुणवर्णन वगैरे भगवद्विषयक गोष्ट करण्यार हरकत नाही. कांहीहि न खातां सात दिवस उपोषण करुन सप्ताहश्रवण करणें अधिक चांगलें; परंतु तसें करणें प्रकृतिमानाप्रमाणें अशक्य असल्यास यथाशक्ति हलकें अन्न सेवन करण्यास हरकत नाही. तूप, दूध, किंवा फळफळावळ खाऊन सात दिवस सप्ताहश्रवण करणेंहि सुखकारक होतें. मनाला समाधानकारक आहार न मिळाल्यामुळें जर कथाश्रवणाकडे करणें अधिक चांगलें, असें शास्त्रांत सांगितले आहे. सात दिवसपर्यंत ब्रह्मचर्य पाळावें, जमिनीवर घोंगडी वगैरे हंथरुन त्यावर निजावें, व पत्रावळीवर भोजन करावें द्विदल धान्य ( हरभर्‍याची डाळ वगैरे ), मध, तेल, गव्हासारखी जडान्नें, नासकें, कुसके, उष्टें, शिळें वगैरे खाऊं नये काम, क्रोध, मद, मान, मत्सर, लोभ, दंभ, मोह व द्वेष ह्या सर्व गोष्टी सात दिवसपर्यंत वर्ज्यं कराव्या. ह्याप्रमाणें सप्ताहश्रवण झाल्यानंतर शेवटीं उद्यापन करावें. सप्ताहपारायण केलें असतां धर्म, अर्थ, काम व मोक्ष ह्या चारी पुरुषार्थाची प्राप्ति होते. असें शास्त्रांत सांगितले आहे.
 
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥