गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रपती निवडणूक
Written By
Last Updated :नवी दिल्ली , मंगळवार, 28 जून 2022 (13:27 IST)

राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यास शरद पवारांचा नकार; 'या' व्यक्तीचे नाव केले पुढे

sharad pawar
राष्ट्रपती निवडणुकीसाठी आतापासूनच विरोधी पक्षांनी तयारी सुरु केली असून बैठका सुरू केल्या आहेत. राष्ट्रपती पदासाठी संयुक्त उमेदवार विरोधकांकडून देण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव पुढे आले आहे. राष्ट्रपती पदासाठी काँग्रेस, आप, तृणमूलनेही शरद पवारांना प्रस्ताव दिला आहे. परंतु, शरद पवार यांनी राष्ट्रपती निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. राष्ट्रपतीपदासाठी पवारांकडून गुलाम नबी आझाद  यांचे नाव पुढे केले आहे.
 
राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. 15 जून रोजी दिल्लीत विरोधकांची बैठक होणार आहे. याआधी राष्ट्रपती पदासाठी शरद पवार यांचे नाव पुढे येत आहे. काँग्रेसनेही अध्यक्षपदासाठी शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. यासंबंधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी गेल्या गुरुवारी पक्षप्रमुख सोनिया गांधी यांचा संदेश घेऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची चर्चा झाल्याचे समजते.
 
तर तृणमूल, आपनेही शरद पवारांना प्रस्ताव दिला होता. परंतु, मी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या शर्यतीत नाही. मी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणार नसल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले असून त्यांनी राष्ट्रपती पदासाठी गुलाम नबी आझाद यांच्या नावाला पसंती दर्शवली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधी पक्षांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
 
दरम्यान, 24 जुलै रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपत आहे. यासाठी 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे. तर 21 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. तर, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत तब्बल 776 खासदार 41 हजार120 आमदारांना मतदान करावे लागणार आहे. प्रत्येक खासदाराच्या मताचे मूल्य 700 आहे आणि बहुमतासाठी 54 हजार 9452 मतांची आवश्यकता आहे.