शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 18 ऑक्टोबर 2021 (08:36 IST)

पुण्यातील लाचखोर उपायुक्त नितीन ढगेच्या घरात सापडले 2.81 कोटींचं ‘घबाड’; ‘बेनामी’चा होणार पर्दाफाश

तक्रारदारांच्या पत्नीचे जात प्रमाणपत्र पडताळणी करुन ते वैध करण्यासाठी उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्य नितीन चंद्रकांत ढगे  (वय-40) यांना 1 लाख 90 हजार रुपयांची लाच घेताना पुणे लाचलुचपत प्रतबिंधक विभागाच्या  पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी रात्री 9.40 वाजता वानवडी  येथील ढगे यांच्या घराजवळ सापळा रचून अटक करण्यात आली. त्यानंतर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ढगे यांच्या राहत्या घराची झडती घेतली असता तब्बल पावणे तीन कोटी रुपयांचे घबाड पथकाच्या हाती लागले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
 
नितीन ढगे यांना अटक केल्यानंतर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या  पथकाने त्यांच्या राहत्या घराची रात्रभर झडती घेतली.रविवारी त्यांच्या घराची झडती संपली. या झडतीमध्ये रोख 1 कोटी 28 लाख 49 हजार रुपये, मालमत्तांची कगादपत्रे यासह 2 कोटी 81 लाख 89 हजार रुपयांची मालमत्ता मिळून आली आहे.कारवाई दरम्यान आढळून आलेल्या रकमेपैकी किती रक्कम वैध आणि किती अवैध आहे याची तपासणी सुरु असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
 
काय आहे प्रकरण ?
तक्रारदार यांच्या पत्नीचे जात प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता.ते प्रमाणपत्र वैध करण्याकरीता ढगे याने 8 लाख रुपयांची लाच  मागितली.तक्रारदारांनी याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात ढगे यांनी तडजोड करुन 3 लाख रुपये लाच मागून तडजोडीत 2 लाख रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर तक्रारदार यांना ढगे यांनी पैसे देण्यासाठी वानवडीतील आपल्या निवासस्थानाजवळ बोलाविले होते.त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने  सापळा रचला.तक्रारदाराकडून प्रत्यक्षात 1 लाख 90 हजार रुपयांची लाच घेताना ढगे यांना पकडण्यात आले.वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली.
 
दरम्यान, नितीन ढगेंची अनेक ठिकाणी बेनामी प्रॉपर्टी असल्याची चर्चा रंगली आहे. ढगे यांच्या मुळ गावी आणि इतर ठिकाणांवर प्रॉपर्टीची माहिती घेण्यात येत आहे.अ‍ॅन्टी करप्शनचे अधिकारी त्याची देखील माहिती घेत असल्याचं सांगण्यात आलं आहे.