बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 21 ऑक्टोबर 2021 (21:59 IST)

सेवा विकास बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी अ‍ॅड. सागर सुर्यवंशीला अटक

सेवा विकास बँकेच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अ‍ॅड. सागर सूर्यवंशी याला अटक केली. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये अटक झाल्यानंतर न्यायालयाने दिलेली कोठडीची मुदत गुरुवारी संपली. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी न्यायालयाकडून त्याचा ताबा घेतला. आता पोलीस त्याने बनावट कागदपत्र सादर करुन घेतलेल्या कर्जाचा तपास करणार आहेत.
 
अ‍ॅड. सागर मारुती सूर्यवंशी (वय 43, रा. बंगला नंबर 68, साऊथ मेन रोड, कोरेगाव पार्क) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.याप्रकरणी विजयकुमार गोपीचंद रामचंदानी (वय 52, रा. पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे.या संदर्भात पिंपरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे या गुन्ह्यामध्ये सेवा विकास बँकेचे अमर साधुराम मुलचंदानी आणि प्रकाश शिवदास पमनानी यांना देखील अटक करण्यात आली होती.या गुन्ह्यामध्ये रश्मी तेजवानी (मॅनेजर), आकाऊंटंट हरीश चुगवाणी, सहायक जनरल मॅनेजर विजय चांदवानी, जॉईन्ट सीईओ रमेश हिंदुजा, यांच्यासोबतच सेवा विकास सहकारी बँकेचे संचालक मंडळ आणि कर्मचारी यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.
 
मीरचंदानी हा अध्यक्ष असताना सर्व आरोपींनी आपापसात संगणमत करून कट रचून गुल भगवानदास तेजवानी यांच्या तसेच शितल तेजवानी,गिरीश तेजवानी आणि सागर सूर्यवंशी यांची पत पात्रता नसताना त्यांना नियमबाह्य पद्धतीने हायर परचेस लोन मंजूर केले होते.किशोर केसवानी, गुल तेजवानी आणि बँकेचे संचालक मंडळ यांनी बोगस कर्ज प्रकरणासाठी बनावट कागदपत्र तयार करून दिले.हे कर्ज शहाबाज अब्दुल अजीज शेख आणि हया शहाबाज शेख यांच्या नावावर बँक खात्यामध्ये वितरित केले.त्यामधून कर्ज रखमा रोखीने काढून घेतल्या. या रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून अपहार केला तसेच बँकेची फसवणूक केली.कर्जाचे हप्ते न भरता 5 कोटी 75 लाख 63 हजार 567 रुपयांची रक्कम (Pune Crime) थकीत ठेवली असा हा गुन्हा दाखल आहे.
 
सूर्यवंशी याला मागील आठवड्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी)  अटक केली होती.त्याला न्यायालयाने कोठडी सुनावली होती. या कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला गुरुवारी न्यायालयामध्ये हजर करण्यात आले.यावेळी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयामध्ये प्रोड्युस वॉरंट सादर केले होते.त्यानुसार न्यायालयाने सूर्यवंशीचा ताबा पोलिसांकडे दिला आहे.
 
पोलिसांनी यावेळी आरोपी बँकेत सादर केलेले रेकॉर्ड रिकव्हर करायचे असल्याचे सांगितले. त्याने बनावट कागदपत्र बँकेत सादर केली होती. ही कागदपत्र हस्तगत करायची आहेत. तसेच बनावट कर्ज प्रकरण करून मिळवलेले पैसे देखील हस्तगत करायचे असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले.सूर्यवंशी याने बनावट कर्ज प्रकरण करून बेंटली कार विकत घेण्यासाठी कर्ज रक्कम मंजूर करून घेतली.मात्र, प्रत्यक्षात कार खरेदी केली नाही.तसेच बँकेला कार खरेदी केल्याचा बनावट नंबर दिला. या सर्व प्रकरणाचा तपास करण्यासाठी त्याच्या कोठडीची मागणी करण्यात आली.त्याचा ताबा मिळावा अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली.ती न्यायालयाने मान्य केल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक देवेन्द्र चव्हाण  यांनी सांगितले.