1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 (08:23 IST)

घरफोडी करुन गावाकडं थाटला संसार, 7 वर्षांनी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुण्यातील कोथरुड परिसरात घरफोडी करुन फरार झालेल्या एका चोरट्याने गावाकडं लग्न करुन संसार थाटला. मात्र, सात वर्षांनी गुन्हे शाखेच्या पोलिसांना त्याची माहिती मिळाली अन् तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी आरोपीच्या सात वर्षांनी मुसक्या आवळल्या आहेत.ही कारवाई पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट एकने सोमवारी व्हिआय.टी हॉस्टेल चौकात केली.
 
गणेश भाऊराव कांबळे (वय-31 रा.डॉल्फीन चौक,चैत्रबन वसाहत,अप्पर इंदिरानगर पुणे सध्या रा.अण्णा भाऊ साठेनगर,मुपो रोही-भालगाव ता.बार्शी जि.सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2014 मध्ये कोथरुड परिसरातील महेंद्र करडे हे बाहेर गावी गेले होते. त्यावेळी अज्ञात आरोपीने कुलुप तोडून घरातील 66 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरूननेले होते. याबाबत कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला  होता.या गुन्ह्यात नितीन लक्ष्मण तांबारे (रा. डहाणूकर कॉलनी, कोथरुड) याला अटक करण्यात आली होती. तर त्याचा साथिदार गणेश कांबळे हा फरार झाला होता.
 
दरम्यान गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अंमलदार अमोल पवार  यांना बातमीदारामार्फत गणेश कांबळे हा भावाला भेटण्यासाठी व्हीआयटी हॉस्टेल चौकात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी (दि.9) व्हीआयटी चौकात सापळा रचून रिक्षातून उतरत असतानाच गणेश कांबळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.आरोपीने गुन्हा केल्यानंतर सात वर्षापासून फरार होता. या कालावधीत त्याने लग्न करुन सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील रोही भालगाव येथे कुटुंबासह राहत होता.
आरोपी विरोधात भारती विद्यापीठ -2, बिबवेवाडी-1,सहकारनगर 1, कोथरुड 1,लोणी काळभोर 1 व हवेली पोलीस ठाण्यात 4 असे घरफोडी चोरी, दरोड्याची तयारी व इतर असे एकूण 10 गुन्हे दाखल आहेत.