देशात 2023 पर्यंत एक हजार ‘खेलो इंडिया’ केंद्रांना मंजुरी
संपूर्ण देशात खेलो इंडियाची कमीत कमी एक हजार केंद्र असावीत, असा केंद्र सरकारचा मानस आहे. आतापर्यंत 450 खेलो इंडिया केंद्रांना मंजुरी दिली असून 15 ऑगस्ट 2023 पर्यंत जवळपास एक हजार केंद्रांना मंजुरी मिळावी, यासाठी पावले उचलण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडामंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी येथे दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने खाशाबा जाधव क्रीडा संकुलाचा नामकरण सोहळा तसेच स्वामी विवेकानंद आणि पै. खाशाबा जाधव यांच्या पूर्णाकृती पुतळय़ांचे अनावरण ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी खासदार गिरीश बापट, आमदार सिद्धार्थ शिरोळे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. दीपक माने, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, सुनेत्रा पवार, रणजित जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
ठाकूर म्हणाले, आज खेळाकडे भविष्य, करिअर म्हणून पाहिले जात आहे. देशातील पारंपारिक खेळाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. परंतु खेळात राजकीय हस्तक्षेप नसला पाहिजे. भारताला जास्तीत-जास्त पदके मिळविण्यासाठी तयार करायला हवे. त्यासाठी केंद्र, राज्य, क्रीडा संस्था, स्वयंसेवी संस्था यांनी एकत्रित येऊन काम करणे गरजेचे आहे. क्रीडा प्रकारात उत्कृष्ट क्रीडापटूंना पुढे आणण्यात राज्य सरकारची महत्त्वाची भूमिका आहे. केंद्र सरकारने खेलो इंडियासाठी गेल्या वर्षी 657 कोटी रुपयांचे बजेट दिले होते, यंदा 974 कोटी रुपयांचे बजेट मान्य केले आहे. तसेच 2013-14 मध्ये संपूर्ण क्रीडा खात्याचे बजेट एक हजार 219 कोटी रुपये होते, आता ते तीन हजार 62 कोटी रुपये इतके वाढविण्यात आले आहे. खेलो इंडिया केंद्रामार्फत माजी खेळाडूंना प्रशिक्षक म्हणून नेमले जाईल आणि त्यांना वर्षाला पाच लाख रुपये दिले जातील. माजी क्रीडापटूंच्या अनुभव आणि प्रशिक्षणातून नवोदित खेळाडू तयार होतील, हा यामागील उद्देश आहे.
अमेरिकेतील एखाद्या विद्यापीठातील खेळाडू शंभरहून अधिक पदके आणतात, आपल्याकडेही या दृष्टीने विद्यापीठ स्तरावर तयारी होणे अपेक्षित आहे. याकामी पुणे विद्यापीठास सर्वतोपरी मदत करू, असे सांगत शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, राज्य अशा स्तरांवर क्रीडा स्पर्धा होणे गरजेचे आहे. क्रीडा संकुलाचे द्वार सर्वांसाठी खुले असावे. तरुणांनी अभ्यास आणि खेळात समन्वय साधावा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.