बुधवार, 29 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 22 मार्च 2023 (08:53 IST)

अऱ्हाना बंधूंची 47 कोटींची स्थावर मालमत्ता ईडी कडून जप्त

पुण्यातील रोझरी एज्युकेशन ग्रुपचे संचालक विनय अऱ्हाना आणि त्यांचे बंधू विवेक अऱ्हाना यांची 47 कोटींची स्थावर मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. यामध्ये स्कूलच्या इमारतीसह कुटुंबियांच्या मालकीच्या लष्कर परिसरातील जागेचा समावेश आहे.
 
विनय अऱ्हाना यांनी शाळेच्या नूतनीकरणासाठी 20 कोटी 44 लाख रुपयांचे कर्ज काँसमॉस बँकेकडून घेतले होते. यासाठी त्यांनी बनावट कागदपत्रांचा वापर केला. तसेच ही रक्कम नूतनीकरणासाठी न वापरता त्याचा अपहार करण्यात आल्याची अशी फिर्याद बँकेचे अधिकारी शिवाजी काळे यांनी दिली होती. त्यावरून रोझरी स्कूलचे संचालक विनय अऱ्हाना, विवेक अऱ्हाना यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
 
ईडीने या प्रकरणाच्या तपासादरम्यान, 28 जानेवारीला अऱहाना बंधूंच्या मालमत्तेवर छापे टाकून चौकशी केली होती. त्यानंतर 10 मार्चला विनय अऱ्हाना यांना ईडीने अटक केली आहे. विनय अऱ्हाना आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जप्त केलेल्या मालमत्तेचे बाजारमूल्य 98.20 कोटी असल्याचे ईडीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor