शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 2 जून 2022 (15:11 IST)

अविनाश भोसलेंच्या अडचणीत वाढ, पुण्यातली मालमत्ता रिकामी करण्यासाठी ED ची नोटीस

avinash bhosale
पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले यांना मुंबईतील सीबीआय विशेष न्यायालायाने 10 दिवसांची कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आता पुण्यातली मालमत्ता रिकामी करण्यासाठी ईडीनेही कारवाईची नोटीस बजावली आहे. गेल्या वर्षी मनी लाँडरिंग प्रकरणात ही मालमत्ता ईडीने जप्त केली होती.
 
गेल्या काही दिवसांपासून येस बँक आणि दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या (डीएचएफएल) घोटाळ्याप्रकरणी अविनाश भोसले सीबीआयच्या रडारवर होते. सीबीआयने अविनाश भोसले यांना 26 मे रोजी पुण्यातून अटक केली होती. त्यानंतर मुंबईतील सीबीआय कोर्टात त्यांना 27 मे रोजी हजर करण्यात आले होते. त्यातच आता ईडीने ही नोटीस बजावली आहे. मनी लाँडरिंग प्रकरणाव्यतिरिक्त ईडीने फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट कायद्याच्या उल्लंघनाच्या आरोपाखाली त्यांची चौकशी केली होती.
 
कोण आहेत अविनाश भोसले?
अविनाश भोसले हे इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या बांधकाम कंपनीचे मालक आहेत. त्यांचा जन्म संगमनेर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला असून त्यांचे वडील निवृत्ती गणपत भोसले हे संगमनेर येथील सावर्जनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता होते. रोजगाराच्या शोधात पुण्यात आलेल्या अविनाश भोसले यांनी रिक्षाचालक म्हणून सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी बांधकाम क्षेत्रात उडी घेतली. रिक्षा चालक ते मोठे बांधकाम व्यावसायिक हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. तसेच, अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत.