गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 21 ऑगस्ट 2021 (15:46 IST)

मालमत्तांची माहिती देण्यास टाळाटाळ,उडवाडवीची उत्तरे; स्थायी समिती अध्यक्षांसह पाच जणांना आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी

लाच प्रकरणात अटकेत असलेले आरोपी स्थायी समिती अध्यक्षांसह त्यांचे स्वीय सहाय्यक तपासात सहकार्य करत नाहीत. मालमत्ताबाबत काहीही माहिती दिली नसून उडवाडवीची उत्तरे दिली जात आहेत.अंगझडती, कार्यालयात सापडलेल्या 5 लाख 68 हजार रुपयांच्या रोख रकमेबाबत समाधानकारक खुलासा केला नाही. त्यामुळे सखोल तपास करण्यासाठी ‘एसीबी’ पोलिसांनी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली.मात्र, शिवाजीनगर येथील विशेष न्यायालायाने ही विनंती फेटाळत आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सोमवार (दि.23) पर्यंत पोलीस कोठडी असणार आहे.
 
वर्क ऑर्डर मिळविण्यासाठीच्या करारनाम्यावर सही करण्यासाठीचे 1 लाख 18 हजार रुपयांची लाच स्वीकारताना स्थायीच्या कर्मचाऱ्यांना एसीबीने बुधवारी (दि.18) महापालिका मुख्यालयात रंगेहाथ पकडले. समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे, त्यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (मुख्य लिपिक), विजय शंभुलाल चावरिया, (पद लिपिक) , राजेंद्र जयवंतराव शिंदे (संगणक ऑपरेटर) आणि अरविंद भिमराव कांबळे,(पद शिपाई) यांना पोलिसांनी गुरुवारी (दि. 19) पहाटे अटक केली.आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची म्हणजे आजपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.आज कोठडीची मुदत संपल्याने आरोपींना शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयात हजर केले. एसीबीच्या पोलिसांनी आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचे सांगत सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने आरोपी आणि सरकारी वकिलांचा युक्तीवाद ऐकून घेत आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
 
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पोलिसांनी आरोपींच्या पोलीस कोठडीतील वाढीसाठी न्यायालयाला कारणे दिली होती. त्यात फिर्यादीने 3 टक्क्यांमध्ये कमी होऊन 2 टक्के करण्याची विनंती केली असता ज्ञानेश्वर पिंगळे यांनी ते वर 16 जणांना द्यावे लागतात. असे सांगितल्याचे ‘रेकॉर्ड’ झाले. याबाबत आरोपींकडे तपास करता त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला. त्याबाबत आरोपींकडे अधिक तपास करणे आहे. स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांनी मालमत्तेबाबत काहीही माहिती दिली नसून उडवाउडवीची उत्तरे दिली. मालमत्तेबाबत माहिती घेणे आहे. हे एक प्रकारचे मोठे ‘रॅकेट’ असून यात आणखी कोण-कोण सामील आहे. याचा तपास करायचा आहे.
 
सापळा कारवाईदरम्यान आरोपींच्या अंगझडती आणि कार्यालय झडतीत 5 लाख 68 हजार 560 रुपये मिळून आले. त्याबाबतचा त्यांनी समाधानकारक खुलासा केला नाही.उडवाउडवीची उत्तरे दिली असून या रकमेबाबत तपास करायचा आहे. राजेंद्र शिंदे यांच्या अंगझडीत सापडलेल्या 24 हजार 480 रुपयांच्या रमकेबाबत तपास करायचा आहे.टेंडर प्रक्रिया आणि बीड संबंधी कागदपत्रे हस्तगत करण्याची कारवाई सुरु आहे.गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची विनंती पोलिसांनी केली. परंतु, न्यायालयाने ही विनंती अमान्य करत आरोपींना आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.