वादग्रस्त टिप्पणीनंतर बागेश्वर धामचे पिठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री अखेर तुकोबा चरणी
Bageshwar Dham Sarkar Dhirendra Shastri in Pune बागेश्वर धामचे पिठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी देहूतील मंदिरात येऊन जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. दरम्यान संत तुकाराम महाराजांबाबत दिलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल बागेश्वर धाम सरकारने माफी मागितली. संत तुकाराम हे देवासारखे आहेत आणि माझी त्यांच्यावर नितांत श्रद्धा आहे. मी ते विधान एका पुस्तकातील लेखावर बुंदेलखंडी उच्चारात बोलताना केले होते. कोणाचा विश्वास दुखावला गेला असेल तर माफ करा, असे ते म्हणाले.
काही दिवसांपूर्वी धीरेंद्र शास्त्री यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त टिप्पणी केल्यावरून वाद रंगला होता. पुण्यात सुरू असलेल्या त्यांच्या कार्यक्रमाला काही संघटनांनी विरोध दर्शवला होता मात्र पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या बद्दल केलेल्या टिप्पणी बद्दल माफी मागत संत तुकाराम महाराज हे भगवानाचे रूप असल्याचे म्हटले.
मात्र आता धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकारने पुण्यात खळबळजनक मागणी केली आहे. देशाला हिंदू राष्ट्र करण्यासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सनातन भारतीय संस्कृती आणि हिंदू ऐक्य मजबूत करण्यासाठी आम्ही 'दरबार' आयोजित करण्याबाबत कोणाला काही आक्षेप असल्यास त्यांनी न्यायालयात येऊन आपले म्हणणे मांडावे, असे ते म्हणाले. पुण्यात होत असलेल्या कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि भीम आर्मी एकता बहुजन संघटनेकडूनविरोध दर्शविण्यात आला होता.
खरे तर बागेश्वर धाम सरकारचे दावे घटनाबाह्य, अवैज्ञानिक आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे आहेत, त्यामुळे त्यांच्यावर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली होती. त्यावर धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, सनातन हिंदू संस्कृतीच्या संवर्धनासाठी आम्ही दरबार भरवतो.
धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी आज जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या मंदिरात येऊन दर्शन घेतलं तसेच देहू संस्थानच्या वतीने धीरेंद्र शास्त्री महाराज यांचा सत्कारही करण्यात आला आहे.