मंगळवार, 5 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 23 फेब्रुवारी 2022 (14:43 IST)

पुणे बोर्डाच्या १२ वीच्या प्रश्नपत्रिका जळून खाक

अहमदनगर : पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यात चंदनापुरी घाटात प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोला अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्‍या आहेत. घटनास्थळी पोलीस अग्निशामक दल दाखल होत टेम्पो विझवण्यात आला. मात्र तोपर्यंत टेम्पो संपूर्ण जळून खाक झाला होता.
 
बुधवारी पहाटे धावत्या टेम्पोला अचानक आग लागली. या टेम्पोमधून मध्य प्रदेशातील भोपाळ येथून पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका नेण्यात येत होत्या. दुर्घटनेत प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या असून या प्रश्नपत्रिका बारावीच्या असाव्यात असा पोलिसांचा अंदाज आहे. 
 
पुणे बोर्डाला या घटनेची माहिती कळवण्यात आली असून त्यांच्या उपस्थितीत पंचनामा केला जाणार आहे. त्यानंतर या नेमक्या कोणत्या प्रश्नपत्रिका होत्या, हे स्पष्ट होईल, असं पोलीसांनी सांगितलं आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर टेम्पोने पाठीमागील बाजूने अचानक पेट घेतला. आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आल्यावर त्यांनी टेम्पो रस्त्याच्या कडेला थांबवला. चालक मनीष चौरसिया व मॅनेजर रामविलास राजपूत यांनी ही आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु केला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आग अटोक्यात आणली. आगीत कोणीही जखमी झालेलं नाही.