सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 15 सप्टेंबर 2021 (16:20 IST)

‘धो-धो’ पावसाची शक्यता, 2 दिवस पुण्यात ‘हाय अलर्ट’

मागील चार पाच दिवसांपासून बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. राज्यात कोकणात पावसाचा जोर कमी झाला असून राज्यातील सर्वत्र पावसाचा  अंदाज हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे. राज्यातील पाच जिल्हे वगळता सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता आहे.परंतु उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर कमी होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
 
बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मागील आठवड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळला. राज्यासोबत गुजरातलाही पावसाने झोडपून काढले आहे त्यानंतर आता बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला हवेच्या कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकत आहे.यामुळे उद्यापासून महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
 या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस
 
मध्य महाराष्ट्र,कोकण,खानदेश, विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आहे. तर पालघर आणि नाशिक या दोन जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे.पुढील 24 तासत पालघर आणि नाशिक जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा आणि विदर्बात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.दरम्यान आकाशात विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
 
पुढील 2 दिवसात पुण्यात मुसळधार पाऊस
मागील आठवड्यापासून पुणे शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. आजही पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.आज आणि उद्या पुण्यात हवामान खात्यानं यलो अलर्ट दिला आहे.उद्या राज्यातून जवळपास सर्वच जिल्ह्यांतून पाऊस गायब होण्याची शक्यता आहे.बुधवारी केवळ नाशिक, पालघर आणि पुणे जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला असून उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.