पुणे शहरातील वाहतुकीमध्ये बदल, शहरातील मुख्य रस्त्यांसाठी नवी नियमावली जारी
गणेशोत्सवानिमित्त पुणे शहरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे.शहरातील मुख्य रस्त्यांवर एकेरी पादचारी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. 8 सप्टेंबरपर्यंत गणपती दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना एकेरी पादचारी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. दुपारी तीन ते रात्री गर्दी संपेपर्यंत येणाऱ्या भाविकांना एकेरी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. पुणे वाहतूक पोलिसांकडून शहरातील मुख्य रस्त्यांसाठी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यानुसार आता पुढील आठ दिवस वाहतुकीचे नियोजन असणार आहे.
या रस्त्यांपैकी काही रस्ते जाताना तर काही रस्ते येताना वापरावे लागणार आहेत. वाहतूक पोलिसांकडून गणेशोत्सव काळात भाविकांना काही अडचण येऊ नये यासाठी पादचारी एकेरी मार्ग, पादचारी दुहेरी मार्ग असे रस्त्यांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.
यामध्ये जिजामाता चौक ते रामेश्वर चौक आणि बेलबाग चौक ते बाबू गेनू गणेश मंडळ हा मार्ग फक्त जाण्यासाठी तर बेलबाग चौक ते गणपती चौक आणि तुळशीबाग गणपती ते जिलब्या मारुती चौक हा मार्ग येण्यासाठी वापरावा लागणार आहे. हे सर्व रस्ते मुख्य रस्ता शिवाजी मार्गाला जोडले गेलेले आहेत.
पुण्यातील गणेशोत्सव पहाण्यासाठी या काळात राज्यभरातून भाविक येतात. त्यामुळे शहरात गर्दी होते.श्रीमंत दगडूशेठ गणपती आणि मानाच्या गणपतीसह इतर गणपती मंडळाच्या दर्शनाला येणाऱ्या नागरिकांसाठी पोलिसांकडून हे बदल करण्यात आले आहेत.