दरोड्याच्या तयारीतील सराईत गुन्हेगार असलेल्या दोन सख्ख्या भावांना अटक
दरोड्याच्या तयारीतील सराईत गुन्हेगार असलेल्या दोन सख्ख्या भावांना पोलिसांनी अटक केली. घरफोडीचे १२ तर वाहनचोरीचे आठ गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून ३० लाख ६०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, तीन टीव्ही, पाच चारचाकी वाहने, चार दुचाकी हस्तगत केल्या आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा, विरोधी पथकाने ही कारवाई केली.
सुरजितसिंग राजपालसिंग टाक (वय ३२), जितसिंग राजपालसिंग टाक (वय २६, दोघे रा. हडपसर, पुणे), असे अटक केलेल्या सख्ख्या भावांचे नाव आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरजितसिंग व जितसिंग हे दोन्ही इंद्रायणीनगर येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना मिळून आले. २३ जानेवारी रोजी त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे चाैकशी केली असता, साथीदारांसह त्यांनी पिंपरी-चिंचवड, पुणे शहर व ग्रामीण भागात घरफोडी व वाहनचोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, ते टोळीने गुन्हे करतात. गुन्हे करण्यासाठी ते चोरीच्या वाहनांचा वापर करीत होते. चारचाकी वाहन चोरून ते १० ते २० किलोमीटरवर एका ठिकाणी पार्क करीत. त्यानंतर चोरीच्या दुचाकीने त्याठिकाणी जाऊन चोरीच्या चारचाकी वाहनातून घरफोडी किंवा गुन्हे करण्यासाठी जात. घरफोडी करून झाल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी चारचाकी पार्क करून तेथील दुचाकीने चोरीचा मुद्देमाल घेऊन निघून जात.
पिंपरी-चिंचवड शहरातील देहूरोड, पिंपरी, भोसरी, चिंचवड, सांगवी, भोसरी एमआयडीसी, निगडी, चिखली, दिघी, वाकड या पोलीस ठाण्यांतील तसेच म्हाळुंगे पोलीस चाैकीत दाखल विविध १७ गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच पुणे शहरातील बंडगार्डन व खडकी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक, असे दोन गुन्हे तर पुणे ग्रामीणमधील लोणी काळभोर व मंचर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक, असे एकूण २१ गुन्हे उघडकीस आले आहेत. दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजय तुंगार, उपनिरीक्षक मंगेश भांगे, यांच्या पथकाने ही कामगिरी केली. या पथकाला ५० हजारांचे बक्षीस पोलीस आयुक्तांनी जाहीर केले आहे.