गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021 (21:42 IST)

उच्चशिक्षित तरुणीचा प्रताप, डेटिंग साईटवरून तरुणांना फसविले, अखेर पोलिसांकडून अटक

पुण्यात उच्चशिक्षित तरुणीने बंबल आणि टिंडर डेटिंग साईटवरून तरुणांसोबत चॅटिंग करून त्यांची आर्थिक लुट केल्याचा प्रकार समोर आला आहे. या तरुणीकडून १५ लाख २५ हजारांचे २९ तोळे सोन्याचे दागिने व मोबाईल जप्त करण्यात आले असून, या २७ वर्षीय तरुणीला अटक केली आहे. 
 
ही तरूणी चॅटिंगच्या माध्यमातून तरूणांना हॉटेलमध्ये बोलावायची व तिथं त्यांना मद्यातून बेशुद्धीच्या गोळ्या देऊन, त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू, पैसे घेऊन पसार व्हायची. अशाप्रकारे एकूण १६ तरुणांना तिने आतापर्यंत गंडा घातला आहे. नेटफ्लिक्सवरील चित्रपट बघून वेगळं काही तरी करायचं म्हणून तिने असे गुन्हेगारी कृत्य केल्याचं पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणीने चेन्नई येथील एका तरुणाशी बंबल या डेटिंग अॅपवरून संपर्क साधून, त्याला चॅटिंगद्वारे मैत्रीच्या जाळ्यात ओढले. यानंतर तिने संबंधित तरुणाला पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड येथील सयाजी हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले. त्यानुसार तो तरुण हॉटेलवरील एका खासगी रूममध्ये तिला भेटण्यासाठी आला. त्यानंतर आरोपी तरुणीने त्याच्या मद्यामध्ये बेशुद्धीच्या गोळ्या टाकल्या व तो तरुण बेशुद्ध होताच त्याच्याजवळील पैसे व सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. याप्रकरणी तरुणाने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
 
तपासात आरोपी तरुणीला पकडण्यासठी, बंबल या टेडिंग अॅपवरून बनावट रिक्वेस्ट पाठवून तिला बोलण्यास भाग पाडले. त्यानंतर, ओळख वाढवून तिला भेटण्यासाठी बोलावून गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने सापळा रचून तिला अटक केली.
 
तरुणी भेटायला आलेल्या तरुणाला बेशुद्ध करून त्यांच्याकडून मोबाईल घेऊन बंबल अॅपवरील चॅटिंग डिलीट करायची व तो मोबाईल फोडून कचऱ्यात टाकायची. त्यामुळे पोलिसांच्या हाती ठोस पुरावा येत नव्हता. तरुणी उच्चशिक्षित असल्याने, तिने आपण नोकरी करत असल्याचे घरात सांगितले होते.