मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 मे 2021 (21:36 IST)

आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबतचा अंतिम निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत

कोरोनामुळे पंढरपूरची आषाढी वारीही गेल्या वर्षी रद्द करण्यात आली. याच संदर्भात पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा केली. वारकऱ्यांचे पालखी सोहळ्याबाबतची मते जाणून घेतली. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच वारकऱ्यांच्या आरोग्याचाही विचार करणे महत्त्वाचे आहे. योग्य वेळ आल्यावर अधिक चर्चा करुन आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबतचा अंतिम निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वांच्या मते घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. 
 
श्री संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा त्याचप्रमाणे पंढरपूरच्या आषाढी पायी वारीला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेकडो वर्षांची परंपरा आहे. राज्यात काही महिन्यात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे राज्यात म्युकरमायकोसिस आजाराचे प्रमाण देखील वाढले आहे. तरीही आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी वारकरी संप्रदायांनी मांडलेली भूमिका येत्या आठवड्यात होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येईल व यावर सर्वाच्या मते निर्णय घेण्यात येईल, असे अजित पवार यांनी सांगितले.